अध्याय 16
लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्याच्या वेषात रावणाचे आगमन :
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
लक्ष्मण आश्रमातून गेल्यावर भिक्षेकर्याच्या वेषात रावणाचे आगमन :
लक्ष्मण गेला रामापासीं । सीता एकली गुंफेसीं ।
रावण आला तेचि संधीसीं । सीतेपासीं भिक्षुवेषें ॥ १ ॥
एतदंतरमासाद्य दशग्रीवः प्रतापवान् ।
परिव्राजकरुपेण वैदेहिमन्ववर्तत ॥ १ ॥
गुंफे नसतां श्रीरामलक्ष्मण । शून्य मंदिरी रिघे श्वान ।
तेंवी आला दशानन । सीताहरणकार्यार्थी ॥ २ ॥
गर्भजन्में जन्मली नाहीं । सीता देहींच विदेही ।
तिचे हरन करावया पाहीं । आला लवलाहीं लंकानाथ ॥ ३ ॥
सीताहरण करुं म्हणतां । मुळींच भीक लागली लंकानाथा ।
चौपालवी आली हाता । अंगीं अशुभता बाणली ॥ ४ ॥
चौदा चौकड्यांचें राज्यलक्ष्मण । ते गेलें न लागतां क्षण ।
भिकारी जाला आपण । सीताहरण करुं म्हणता ॥ ५ ॥
सीतेचा आश्रम देखतां । भेणें पळाली राजवैभवता ।
भिक्षेनें वरिलें लंकानाथा । ऐसें सामर्थ्य सीतेचें दुर्धर ॥ ६ ॥
अभिलाषितां लाविली भीक । लंकेस सीता नेलिया हे देख ।
राक्षस मारवील एकाएक । लंका निःशेख जाळिल ॥ ७ ॥
वळचणीमाजी दिपकळी । ठेवितां ते तत्काळ जाळी ।
तेंवी राक्षसकुळीं । करील होळी क्षणामध्यें ॥ ८ ॥
अभिलाषितां कामधेनु । निर्दाळिला सहस्रार्जुनु ।
तेंवी सीताहरने रावणु । कुळनिर्दळणु राक्षसां ॥ ९ ॥
सीतेला पाहून रावणाची झालेली अवस्था :
सीता पाहूं जातां जाण । पळाली त्याची आंगवण ।
भिक्षुरुप अति हीन । दिनवदन भिक्षार्थी ॥ १० ॥
स्वयंवरी सीता देखतां जाण । रावणा जाहला अति अपमान ।
येथेंही सीता पाहतां पूर्ण । निजापमान भिक्षुकत्वें ॥ ११ ॥
बाप सीतेचें विदान । दृष्टीनें गांजिला रावण ।
आपणियां आपण दे अपमान । दीनवदन भिक्षार्थीं ॥ १२ ॥
रावणा सन्निपात सीतेचा संपूर्ण । न कळे शुभाशुभ चिन्ह ।
भिक्षुवेषें अत्यंत हीन । दीनवदन भिक्षार्थी ॥ १३ ॥
षण्मासिक अन्निपात । रावणासी जाला येथ ।
सीताभिलाषीं निश्चित । निजात्मघात सकळेंसीं ॥ १४ ॥
ऐसिया युक्तीं रावण । धरोनि भिक्षुत्व संपूर्ण ।
करोनि नारायणस्मरण । आला आपण आश्रमा ॥ १५ ॥
सीता देखतां गोरटी । रावणाची खुंटली दृष्टी ।
पूर्ण अभिलाष जाला पोटीं । अति गोमटी रामकांता ॥ १६ ॥
स्वरुपरुपें अति सगुण । रुपरेखा गुणलावण्य ।
सर्व अवयव सुखैकघन । सुखनिधान जानकी ॥ १७ ॥
केवळ लावण्याची पुतळी । निखळ सौंदर्याची ओतिली ।
बरवेपणासी चढली । सीता शोभली सुखरुप ॥ १८ ॥
सीतासौंदर्यें निवाले नयन । विसरला भूक तहान ।
देखोनि सुखावलें निजमन । नवनिधान जानकी ॥ १९ ॥
सीतेसी होतां दृष्टीभेटी । भेटीसवें आनंदकोटी ।
इचेनि योगें सुखसंतुष्टी । आनंअ सृष्टीं असेना ॥ २० ॥
ऐसिया सौंदर्याची बोली । कदाकाळीं नाहीं ऐकिली ।
सीता घवघवीत देखिली । भुली पडली इंद्रियां ॥ २१ ॥
नैव देवी न गंधर्वी नासुरी न च किन्नरी ।
एवं रुपा मया नारी दृष्टरुपा महीतले ॥ २ ॥
देवदानवगंधर्वादि स्त्रियांत तिच्या तुलनेची कोणीही नाही :
देवी गंधर्वी सुरेश्वरी । त्याही न पावती इची सरी ।
रंभा उर्वशी किन्नरी । इच्या नखाग्रीं न सरती ॥ २२ ॥
दैत्यदारा आणि दानवी । सरी न पावती मानवी ।
सावित्री न पवे इची पदवी । सर्वावयवीं सुखरुप ॥ २३ ॥
पद्मिनी नारी अति विख्याता । सरी न पवती वनदेवता ।
उमा रमा हरिहरकांता । इची स्वरुपता त्यां नाहीं ॥ २४ ॥
मंदोदरी येथें कायसी । जेंवी खद्योत सूर्यापासीं ।
सीता लावण्याची राशी । सीमा रुपासीं न करावे ॥ २५ ॥
अमृतप्रय इची बोली । ऐकतां पीयूषा पडली भुली ।
परमहंस नये चाली । वेडावली मनोबुद्धि ॥ २६ ॥
अंगी खुपती चंद्रकिरण । सुखैकघन सुकुमार ।
अकार उकार निर्विकार । मनोहर जानकी ॥ २७ ॥
आणिक स्त्रिया मनोहर । कवि वर्णिती स्तुतिमात्र ।
परी सीता मनोहर साचार । मज किंकर इये केलें ॥ २८ ॥
मज हिंडता सक्ळ सृष्टीं । ऐसी देखिली नाहीं दृष्टीं ।
इसी झालिया भोगभेटी । सुखसंतुष्टी स्वानंदें ॥ २९ ॥
सीतासुखभोगसंतुष्टी । यासी काटाळें ना सृष्टीं ।
भाग्य असलिया लल्लाटीं । सीता गोरटी तैं लाभे ॥ ३० ॥
जरी स्वयंवरीं धनुष्य उचलतें । तरी तैंच सीता वरिती मातें ।
धनुष्य भोवलें मजभोवतें । सामर्थ्य तेथे न चलेचि ॥ ३१ ॥
आतां ही आहे अति सांकडीं । सीता एकली वनीं निर्वडी ।
श्रीरामाची पडल्या उडी । माझी नरडी मुरडील ॥ ३२ ॥
सांडोनि न वचें सीतेसी । श्रीरामाचा धाक मानसीं ।
छळोनि हरावया सीतेसी । भिक्षुभावेंसी बोलत ॥ ३३ ॥
कासि कस्य कुरश्च त्वं किंनिमित्त च दंडकम् ।
एका चरसिं कल्याणि घोरराक्षससेवितम् ॥ ३ ॥
इह वासश्च कान्तारे किमर्थं ते वरानने ॥ ४ ॥
रावणाचा सीतेला प्रश्न – या भयावह अरण्यात तू एकटी कशी आलीस ?
रावण केवळ कपटवेषी । स्वयें होवोनि संन्यासी ।
येवोनियां सीतेपासीं । सद्भावेंसीं पूसत ॥ ३४ ॥
तूं तंव लावण्याची राशी । वनीं एकली कां वससी ।
कोणी न देखों संगतीसीं । निजवृत्तांतासी मज सांगे ॥ ३५ ॥
तूं कोण कोणाची पैं कैची । एकाकी वस्ती कानाची ।
हे वृत्ति नव्हे साधुत्वाची । वस्ती वनींची अति कठीण ॥ ३६ ॥
दुस्तर वस्ती दंडकारण्यीं । राक्षस मायावी ये वनीं ।
स्त्रिया हरिती सिंतरोनी । ब्राह्मण मारोनी भक्षिती ॥ ३७ ॥
ऐसिया कठिण वनस्थळीं । तूं तंव दिससी राजबाळी ।
वनीं वससी कां वेल्हाळी । हें समूळीं मज सांगें ॥ ३८ ॥
स्वयंवरापासून साद्यंत वृत्तांत सीता सांगते :
ऐकोनि अतीताचें वचन । सीता सांगें निजकथन ।
मी तंव दशरथाची सून । कन्यारत्न जनकाचें ॥ ३९ ॥
स्वयंवरीं रावणा अपमानून । श्रीरामें हरचाप भंगून ।
परशुरामातें जिंकोन । पर्णन केलें पैं माझें ॥ ४० ॥
श्रीराम आणि लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।
हे चवघे बंधु जाण । जीवप्राण येरयेरां ॥ ४१ ॥
राया दशरथानें जाण । कैकेयीभाष्यनिर्बंधन ।
वना धाडिले श्रीरामलक्ष्मण । दंडकारण्यवनवासीं ॥ ४२ ॥
नेम मर्यादा चवदा वर्षी । श्रीरामें वसावें वनवासीं ।
मजही धाडिलें वनवासासी । निजसेवेसीं श्रीरामा॥ ४३ ॥
श्रीरामसेवेसीं सावधान । माझें करावया संरक्षण ।
सवें दिधला लक्ष्मण । वीर दारुण प्रतापी ॥ ४४ ॥
श्रीरामें मारिलें ताटकेसी । सुबाहु मारिला रणकर्कशी ।
मारीच उडविला आकाशीं । बाणार्धेसीं झडपोनी ॥ ४५ ॥
विराधें मज धरितां जाण । श्रीरामें विंधोनियां बाण ।
एकेंचि घायें घेतला प्राण । दुष्टनिर्दळण श्रीराम ॥ ४६ ॥
विराधाऐसा महाबळी । घायें मेळविला धुळी ।
तेणें राक्षस कापती चळचळीं । आर्तुबळी श्रीराम ॥ ४७ ॥
मग येवोनि गंगातटीं । आश्रम करोनि पंचवटीं ।
वनवासातें तो कंठी । सुखसंतुष्टीं स्वानंदें ॥ ४८ ॥
सार्धवर्षत्रयोदश । रामें क्रमिला वनवास ।
आतां उरले षण्मास । मग प्रवेश अयोध्ये ॥ ४९ ॥
सुवर्ण मृग वधावयासी । श्रीराम धांवला वनासी ।
लक्ष्मण गेला तयापासीं । तेणें मज देखसी एकली ॥ ५० ॥
येथे मी एकटीच नसून माझे दोगेजण संरक्षक आहेत, ते येईपर्यत थांबण्याची विनंती :
मी एकली नव्हे जाण । मज रक्षावया दोघे जण ।
दुर्धर वीर श्रीरामलक्ष्मण । न लागतां क्षण येतील ॥ ५१ ॥
मृग मारोनियां जाण । आतां येतील रामलक्ष्मण ।
तंववरी रहावें आपण । भिक्षा पूर्ण देईल राम ॥ ५२ ॥
श्रीराम अतीतांचा सेवक । तुम्हांसी देखिल्या होईल सुख ।
भिक्षा देईल आवश्यक । तुम्हीं नावेक रहावें ॥ ५३ ॥
ऐकतां सीतेची गोष्टी । रावण थरथरां कांपे पोटी ।
मागें पाहे चकितदृष्टीं । उठाउठीं पळूं पाहे ॥ ५४ ॥
करावया सीतेचें हरण । अत्यंत साक्षेपी रावण ।
गोड बोलाच करी प्रश्न । विश्वास पूर्ण उपजावया ॥ ५५ ॥
एह व्यालमृगाः सिंहा वृकव्याघ्रश्च राक्षसाः ।
कथमस्मिन्महारण्ये न बिभेषि वरानने ॥ ५ ॥
रावणाने सीतेला निर्भय असण्याचे कारण विचारल्यावरुन तिने पूर्वीची कावळ्याची कथा सांगितली :
ये वनीं श्वापदें दुस्तर । व्याघ्र सर्प सिंह शूरक ।
वृक जंबुक तरस तगर । निशाचर नरभक्षी ॥ ५६ ॥
स्त्रिया भयभीत त्रिभुवनीं । तुज भय नुपते दुर्धर वनीं ।
हेंचि सांगें मजलागोनी । तूं कैसेनि निःशंक ॥ ५७ ॥
अतीता तूं ऐकें सावधान । वनीं वसतां श्रीरघुनंदन ।
प्रतापतेजें अति दारुण । संरक्षण निजभक्तां ॥ ५८ ॥
हृदयीं हाणोनियां नखें । मज अभिलाषिलें काकें ।
रामें सोडिलें दर्भईषिके । वचनें एकें माझेनि ॥ ५९ ॥
श्रीरामाची दर्भईषिका । निवारेना ब्रह्मादिकां ।
काक हिंडतां तिहीं लोकां । शिवादिकां दुर्धर ॥ ६० ॥
श्रीरामईषिका देखोन । चळीं कांपत इंद्रवरुण ।
कळिकाळ घाली लोटांगण । यम आपण शिरीं वंदी ॥ ६१ ॥
ईषिके नाहीं निवारण । काक श्रीरामा आला शरण ।
मग ईषिकेनें वाम नयन फोडून । कृपेनें प्राण वाचविले ॥ ६२ ॥
तैंपासोनि श्वापद गाढें । कोणी न पाहे मजकडे ।
तेथें राक्षस कायसें बापुडें । मजपुढे यावया ॥ ६३ ॥
श्रीरामाची प्रतिची प्रतिज्ञा पूर्ण । जो जो करील सीताहरण ।
त्याचा घेईन मी प्राण । दुर्धर बाण सोडोनि ॥ ६४ ॥
शूर्पणखा वगैरे कपटीवेषाने आलेल्यांची रामाने बोळवण कशी केली :
पक्षियावरी अति पुरुषार्थ । करोनि प्रतापी श्रीरघुनाथ ।
ऐसा न मानावा अर्थ । रणकंदनार्थ अवधारीं ॥ ६५ ॥
श्रीरामा नावडे कपटदृष्टी । शूर्पणखा अति खोटी ।
छळों आली पंचवटीं । केली नकटी सौमित्रें ॥ ६६ ॥
शूर्पणखाकैवारी जाण । मारिले त्रिशिरा खर दूषण ।
चवदा सहस्र राक्षणगण । रामें संपूर्ण निर्दाळिले ॥ ६७ ॥
लक्ष्मणें युद्धाआंत । अद्यापि लाविला नाहीं हात ।
त्याचा अनुच्छिष्ट पुरुषार्थ । इद्रंजितवधार्थ ठेविलासे ॥ ६८ ॥
मारिले त्रिशिरा खर दूषण । तैं श्रीरामेंच केला पण ।
मारोनि कुंभकर्ण रावण । अयोध्यागमन मग करणें ॥ ६९ ॥
ऐसा प्रतापी श्रीरघुकुळटिळक । पशुपक्षियां त्याचा धाक ।
त्याचेनि बळें यथासुख । वनीं निःशंक मी विचरें ॥ ७० ॥
असे सांगून सीता बसण्यासठी आसन देते :
ऐसें सीता स्वयें बोलोन । अतिथीस घाली आसन ।
तंव तिसीं करावया सन्निधान । चाले आपण हरणार्थी ॥ ७१ ॥
तिला पळविण्यास लक्ष्मणरेषेची अडचण :
तंव लक्ष्मणाची मर्यादारेखा । उल्लंघवेना दशमुखा ।
करितां बळाचा आवांका । मर्यादारेखा नुल्लघवे ॥ ७२ ॥
रेखा रावण जंव पाहे तळीं । तंव ते खोल सप्तपाताळीं ।
वरती पाहतां निराळीं । नभोमंडळीं जडलीसे ॥ ७३ ॥
तळींहूनि जावया नाहीं गती । उल्लंघावया न चले शक्ती ।
रेखेनें रोधिला लंकापती । सीतेप्रती न वचवे ॥ ७४ ॥
सीतेपासीं न वचवे जाण । मग कैसेनि करवेल हरण ।
सत्य सत्वाथिला लक्ष्मण । रेखारक्षण जानकिये ॥ ७५ ॥
सीता सांडोनि गेला लक्ष्मण । रेखा ठेविली दृढ रक्षण ।
अत्यंत कष्टतां रावण । सीताहरण न करवे ॥ ७६ ॥
मारीच निमालासे देखा । आणि माझेनि नुल्लंघवे रेखा ।
वेगीं आलिया रघुकुळटिळका । दाही मस्तकां छेदील ॥ ७७ ॥
ऐसिया विचाराच्या गोष्टी । उठल्या रावणाच्या पोटीं ।
सीता देखोनि गोरटी । उपरमदृष्टि उपजेना ॥ ७८ ॥
अत्यंत भुकेचे ढोंग करुन रावण सीतेला त्या रेषेच्या बाहेर आणतो :
मग मांडिलें पूर्ण कपट । संन्यासी आलिया स्त्रियांनिकट ।
तो जाणावा महापापिष्ठ् । अति निर्दुष्ट यतिधर्मीं ॥ ७९ ॥
संन्यासधर्माचें लक्षण । निद्य स्त्रियांचे दर्श्न ।
निंद्य स्त्रियांसीं संभाषण । सान्निधान अतिं निद्य ॥ ८० ॥
श्रीराम परमार्थी नेटका । तरी कां धर्माआड ठेविली रेखा ।
याच विशींची आशंका । पाळें न देखा जावया ॥ ८१ ॥
या वनींचे राक्षस वासी । भीत भीअ आलों मी या वनीसी ।
तुम्हां देखोनि मनुष्यवेषीं । येथे भिक्षेसी मी आलों ॥ ८२ ॥
तूं राक्षससुंदरी मनुष्यवेषी । भीतरी नेसी मारायासी ।
अत्यादरें बोलाविसी । सन्मान देसी भक्षावया ॥ ८३ ॥
ऐसें ऐकोनि अतिथिउत्तर । सीता म्हणे श्रीहरहर ।
आम्ही नव्हों गा निशाचर । नित्य किंकर अतिथींचे ॥ ८४ ॥
मग सीता आणावया रेखेबाहेरी । रावणें बुद्धि योजिली पुरी ।
क्षुधेनें पीडलों हो भारी । डोळां अंधारी येतसे ॥ ८५ ॥
जरी कृपा आहे अतीतासीं । बाहेरी आणोनि भिक्षा देसी ।
तरी गंगातीरीं सावकाशीं । निजआहारासी करीन ॥ ८६ ॥
गोड बोलसी जैसें पीयुख । परी न घालिसी ये वेळ भीक ।
माझेनि न साहवेचि भूक । तरी आतां विमुख मी जातों ॥ ८७ ॥
मग सीता म्हणे स्वामिनाथा । विमुख न वचाव सर्वथा ।
रेखा उल्लंघोनि तत्वतां । भिक्षा निजस्वार्था देईन ॥ ८८ ॥
विमुख जालिया अतीत । श्रीरामसौमित्र युद्धाआंत ।
जयो कदा न पावत । अतित विघात होईल ॥ ८९ ॥
सुखी केलिया अतीत । सुखी होईल श्रीभगवंत ।
श्रीरामलक्ष्मण युद्धाआंत । यशवंत होतील ॥ ९० ॥
राखितां लक्ष्मणमर्यादारेख । अतीत होऊ पाहे विमुख ।
येणें पापें पावेल पति दुःख । भिक्षा आवश्यक मी घालीन ॥ ९१ ॥
ऐसा विचार मानसीं । सीतेनें करोनि निश्चयेसीं ।
भिक्षा आणावया अतीतासी । स्वयें गुफेसीं रिघाली ॥ ९२ ॥
सीता भिक्षा आणण्यास आत गेली असता आश्रमात देवांचे आगमन :
तंव हडबड जाली देवांसी । स्वर्गी होती कासाविसी ।
सकळ देव आणि ऋषी । ब्रह्मयापाशीं स्वयें आले ॥ ९३ ॥
जे सुटावी देवांची बांधवडी । आजिची आहे लग्नघडी ।
बुद्धि विचारावी गाढी । सुरसांकडी फेडावया ॥ ९४ ॥
भिक्षा देतां रावणाप्रती । रावण सीता धरील हातीं ।
क्षणार्धे भस्म करील सीता सती । आदिशक्ती जगादंबा ॥ ९५ ॥
जेंवी पतंग दीपाप्रती । आलिंगितां मरोन जाती ।
तेंवी सीता धरिता हातीं । भस्मगति रावणा ॥ ९६ ॥
रावण जालिया भस्मी भूत । मग लंकेसी न ये रघुनाथ ।
देवबांधवडी समस्त । इंद्रजित सोडीना ॥ ९७ ॥
सुरगणांची भीती :
ऐसें विचारोनि जाण । गुंफेसी येऊनि सुरगण ।
धरिले सीतेचे निजचरण । भिक्षा आपण न घालावी ॥ ९८ ॥
अतीअ जातां विमुख । श्रीरामलक्ष्मण पावती दुःख ।
तुम्ही सर्वज्ञ देवलोक । हा विवेक मज सांगा ॥ ९९ ॥
मग देव सांगती आपण । अतिथिरुपें हा रावण ।
तुझें करुं आला हरण । भिक्षा आपण न घालावी ॥ १०० ॥
मग बोलिली सीता सती । रावणें मज धरितां हातीं ।
त्यासी लावीन कल्पांतख्याती । भय किती मज त्याचें ॥ १ ॥
रावण कायसें बापुडें । धा तोंडांचें ते किडें ।
त्यांचे भय मजपुढें । वाडेंकोडें काय सांगा ॥ २ ॥
तंव देव म्हणती ऐक माते । रावणबंदीं आम्ही समस्तें ।
तुवां निर्दळिलिया रावणातें । इंद्रदित आमुतें सोडीना ॥ ३ ॥
करावया आमुचें बंधमोचन । तुम्हां दोघांचें अवतरण ।
तूंचि पाहें विचारुन । पूर्वविधान निजयोग ॥ ४ ॥
देवांना सीतेने रहस्य सांगून समाधान केले :
ऐकोनि देवांचे वचन । सीता जाली हास्यवदन ।
पावोनि मूळींची निजखूण । काय आपण बोलली ॥ ५ ॥
जरी मी राहिलें गुप्तस्थिती । तरी रावण आलासे भिक्षार्थी ।
त्यासी काय कराल युक्ती । ते मजप्रती सांगावी ॥ ६ ॥
देव बोलती निजयोग्यता । रावणाच्या भिक्षार्था ।
आम्हीं करुंमायिक सीता । तेणें जनक्दुहित स्वयें हांसे ॥ ७ ॥
साकार आणि सचेतनता । मायिक रुपें श्रीरामकांता ।
करुं न शके तो विधाता । तुम्ही तत्वतां महामूर्ख ॥ ८ ॥
पर्जन्याची जळगार । करुं न शकती अति चतुर ।
तेंवी ब्रह्मादिक सुरवर । कृत्रिम अवतार करुं न शकती ॥ ९ ॥
जैसी माझी सगुण काया । तैसी मद्रूप माझी छाया ।
मी धाडितें भिक्षा द्यावया । सुरकार्या साधावया ॥ ११ ॥
ऐकोनि सीतेचे वचन । समस्तीं घातलें लोटांगण ।
सीतेचे वंदोनि श्रीचरण । राहिले लपोन विमानीं ॥ १११ ॥
भीक्षा घालण्यासाठी स्वतः न जाता आपल्या छायेला पाठवले, मूळ रुपात व छायेत तंतोतंत साम्यः
भिक्षा घालावया लंकानाथा । सवेग छाया बाहेर येतां ।
हेचि मुख्यत्वें सती सीता । सत्य समस्तां मानलें ॥ १२ ॥
ठाणमाण गुणलक्षण । रुपरेखा समसमान ।
सुर सिद्ध साध्य चारण । अवघ्यांही ज्ञान सत्य सीता ॥ १३ ॥
यक्ष राक्षस दैत्य दानव । सत्य सीता मानितामानव ।
बाप जानकीचें लाघव । छाया सजीव पैं केली ॥ १४ ॥
सद्भावें समर्थ जानकी । स्वयें राहोनि अग्निमुखीं ।
छाया धाडिली भिक्षेसी निकी । येतां सकळिकीं देखिली ॥ १५ ॥
भिक्षा घेवोनि वेगेंसीं । उल्लघेनियां मर्यादरेखेसी ।
सीता आली रावणापासीं । तंव येरु अभिलाषी हरणार्थ ॥ १६ ॥
भिक्षा वाढीत असता रावणाने ति धरले व तो खर्या स्वरुपात प्रगटतो :
जेंवी छाया न राहे रुपापासीं । तेंवी उल्लंघोनियां मर्यादरेखेसी ।
भिक्षा देतां रावणासी । तो आकर्षी सीतेतें ॥ १७ ॥
हस्ते हस्तं विनिक्षिप्य चकार सुमहव्दपुः ।
तच्च सौम्यं परित्यज्य भिक्षुरुपं स राक्षसः ॥६॥
भिक्षा देतां अतीताप्रती । अतीतें सीता धरिली हातीं ।
तंव येरी आंसडोनि हस्तगतीं । पडिला क्षिंती रावण ॥ १८ ॥
जंव रिघे मर्यादरेखेआंत । तंव तो आकर्षी लंकानाथ ।
सांडून भिक्षुवेष समस्त । जाला अदभुत राक्षस ॥ १९ ॥
दहा शिंरें वीस भुजा । मी तंव लंकेचा हो राजा ।
तुज मी करीन निजभाजा । भोगीं माझा सुखभोग ॥ १२० ॥
सीतेजवळ रावणाचा अनुनय :
राम तापसी दीनवदनी । कष्टलीसी वसतां वनीं ।
तुज करीन पट्टराणी । मुख्य विलासिनी मंदोदरी ॥ २१ ॥
तुज बैसतां माझे अंकीं । मंदोदरी मुख्य सेवकी ।
ऐशीं सहस्र राण्या आणखी । तुझ्या बटकी मी करीन ॥ २२ ॥
मी ब्रह्मयाचा नातु प्रसिद्ध । कुबेराचा धाकता बंधु ।
माझा वंश अति सुद्धु । सांडीं छंदु श्रीरामाचा ॥ २३ ॥
वसंत वळगे शेजारें । सेज रचिजे कुसुमाकरें ।
चंद्र निववी शीतळ करें । करीन किंकरें सुर सिद्ध ॥ २४ ॥
सुरश्रेष्ठ इंद्रादिक । तुझे वोळंगेच पायिक ।
मुख्य मी आज्ञेचा सेवक । अलोलिक भोग भोगीं ॥ २५ ॥
माझें देखिलिया अशोकवन । तुझें निवेल तन मन ।
धन्य म्हणसील दशानन । लंकाभुवन देखिलिया ॥ २६ ॥
सीतेचा आक्रोश, रावणाला धाक देते :
सीता आक्रंदे राम राम । रावाण अत्यंत सकाम ।
तिचे प्राप्तीचा संभ्रम । आवडीं खेंव देऊं पाहे ॥ २७ ॥
सीता म्हणे रावणासी । वोळंबा चाखों पाहे अग्नीसी ।
तेंवी तूं मज भोगूं पाहसी । जळोन मरसी मत्कामें ॥ २८ ॥
पतंग आलिंगी दीपकळी । तो तत्काळ होय होळी ।
तैसी भोगूं जातां जनकबाळी । तूं सकुळीं मरशील ॥ २९ ॥
अहल्याभिलाष सुरेंद्रा । सर्वांगीं भगें जाहली इंद्रा ।
तैसी अभिलाषितां रामदारा । बाणधारा निमसील ॥ १३० ॥
श्रीराम सूर्य रावण खद्योत । राव कांजी श्रीराम अमृत ।
तुझें ठायीं जो भोगासक्त । ते निश्चित दंश मशक ॥ ३१ ॥
श्रीराम केवळ क्षीरसमुद्र । रावण मुताचे थिल्लर ।
त्याचे ठायीं भोगतत्पर । ते शूकर नरदेही ॥ ३२ ॥
श्रीराम जगाचें जीवन । रावण डोंबाड परिच्छिन्न ।
तेथें रमती ढोंक हीन । साधु निमग्न श्रीरामीं ॥ ३३ ॥
अतिथिवेषें अति कपटी । संन्यासिरुपें स्त्रीलंपटी ।
विषयगोडीचिया गोष्टी । आमिषासाठी मरे मासा ॥ ३४ ॥
मम भर्ता तदा ब्रह्मन्वयसा सर्प्तीवशकः ।
अष्टादश तु वर्षाणि ममायुर्वगम्यते ॥ ७ ॥
वयाचा विचार करताही त्याचा हा प्रयत्न निंद्य व दूषणास्पद :
वना निघतां श्रीरामचंद्रा । सत्ता वीस वर्षे त्या अवसरा ।
माझें वय वर्षे अठरा । वसिष्ठद्वारा ऐकिलें ॥ ३५ ॥
तूं तंव बहुकाळाचा म्हातारा । विषय भोगितां आली जरा ।
तूं माझिया अभिलाषद्वारा । निशाचरा कां मरसी ॥ ३६ ॥
मज न्यावया कैंची शक्ती । वृथा वल्गतोसी धरुनि भ्रांती ।
धांवण्या येवोनि श्रीरघुपती । करील शांती बाणें एकें ॥ ३७ ॥
सुटल्या श्रीरामाचें कुर्हाडें । केउतें पळसी बापुडें ।
बाण सोडोनियां गाढे । धड दुधडें पाडील ॥ ३८ ॥
श्रीराम येईल त्रिशुद्धी । रावणें जाणोनियां दुर्बुद्धी ।
सीता घेवोनिया खांदीं । चपळपदीं निगाला ॥ ३९ ॥
तंव पिशाचवदन खरसंयुक्ता । सारथियें सन्मुख आणिलें रथा ।
मग रावणें रथीं वाहोनि त्वरिता । होय निघता लंकेसी ॥ १४० ॥
एकाजनार्दना शरण । रावणें केले जानकीहरण ।
आतां ऐकोनि सीता आक्रंदन । जटायु दारुण युद्ध करील ॥ ४१ ॥
जटायु रावणातें दंडून । सीता सोडवील आपण ।
रावण करील जटायुच्छळण । तेंही निरुपण अवधारा ॥ ४२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थ-रामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
जानकीरावणहरणं नाम षोडशोऽध्याय ॥ १६ ॥
॥ ओंव्या १४२ ॥ श्लोक ७ ॥ एवं १४९ ॥