Ramayan - Chapter 3 - Part 15 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 15

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 15

अध्याय 15

लक्ष्मणाचे सांत्वन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांची हाक ऐकून सीता घाबरते :

श्रीरामस्वरासमान । मारीचानें केलें आक्रंदन ।
ऐकोनि सीता करी रुदन । श्रीराम आपण सांपडला ॥ १ ॥
राम रणरंगधीर संपूर्ण । विकट योद्धा अति दारुण ।
तरी तो आक्रंदे दीनवदन । पाव लक्ष्मणा म्हणोनि ॥ २ ॥
श्रीरामाचें आक्रंदन । ऐकोनियां दीनवदन ।
उगाचि राहिला लक्ष्मण । याचें का मन द्रवेना ॥ ३ ॥

अतृस्वरं तु तुं भर्तुर्विज्ञाय सद्दशं वने ।
उवाच लक्ष्मणं सीता गच्छ जानीहि राघवम् ॥ १ ॥
सखायं भ्रातरं ज्येष्ठं रामं पंथानमागतम् ।
काक्रंदमान तु वने भ्रातरं त्रातुमर्हसि ॥ २ ॥
तं क्षिप्रमभिधावं त्वं भ्रातरं शरणैषिणम् ।
रक्षसां वशमापन्नं सिहानामिव गोवृषम् ॥ ३ ॥

परंतु लक्ष्मण मात्र स्वस्थचित्त असलेला पाहून सीतेला खेद व चिंता :

सीता म्हणे लक्ष्मणासी । आजि कां निष्ठुर झालासी ।
राक्षसीं रोधिलें रामासी । तूं कां न धांवसी धांवण्या ॥ ४ ॥
तूं जिवलग बंधु सखा । रणांगणींचा पाठिराखा ।
ऐकोनि श्रीरामाच्या हाक । धांवण्यां तूं कां न धांवसी ॥ ५ ॥
जैसा व्याधिग्रस्त केसरीं । वनीं वेढिजे वानरीं ।
श्रीराम तैसा वनांतरी । निशाचरीं वेढिला ॥ ६ ॥
श्रीराम रणरंगधीर पूर्ण । तोही आक्रंदें आला शरण ।
शरणागताचें रक्षण । केंवी आपण न करिसी ॥ ७ ॥
ऐसें बोलोनियां सीता । लक्ष्मणचरणीं ठेवी माथा ।
श्रीराम पावला अति आकांता । धांवणें तत्वता करीं वेगीं ॥ ८ ॥

श्रीरामांच्या सामर्थ्याचे महिमान :

ऐकोनि सीतेचें वचन । सौमित्र घाली लोटांगण ।
ऐक माते सावधान । रघुनंदननिजमहिमा ॥ ९ ॥

देवि देवमनुष्येषु गंधर्वेषु पततत्रिषु ।
राक्षसेषु पिशाचेषु किन्नरेषु मृगेषु च ।
अशक्यस्तव वैदेहि भर्ता जेतुं न संशयः ॥ ४ ॥

सुरासुर नर किन्नर । दानव मानव निशाचर ।
यक्ष राक्षस विद्याधर । पळती सत्वर श्रीरामबाणें ॥ १० ॥
पिशाच गुह्यक गंधर्ववीर । त्रैलोक्यींचे निधडे शूर ।
पक्षी पन्नग विखार । पळती सत्वर श्रीरामबाणें ॥ ११ ॥
विरिंच्यादि सुरेश्वर । कांपती देखोनि श्रीरामशर ।
पिनाकपाणि श्रीशंकर । तोही श्रीरामासमोर होऊं न शके ॥ १२ ॥
देखोनि श्रीरामाचा बाण । शंकर घाली लोटांगण ।
त्या श्रीरामासी मारील कोण । व्यर्थ रुदन कां करिसी ॥ १३ ॥
तुज देखतां त्रिशिरा खर । मारिलें चवदा सहस्र निशाचर ।
त्या श्रीरामासी मृग किंकर । केंवी साचार मारवे ॥ १४ ॥
श्रीरामबाणाच्या निजनेटें । मेरुमांदारपर्वतफुटें ।
कळिकाळाचें पोट फाटे । घायें उतटे ब्रह्मांड ॥ १५ ॥

सीतेला लक्ष्मणाचे आश्वासन :

ऐसिया श्रीरामासी देख । मृग बापुडें एकलें एक ।
केंवी मारुं शकेल रंक । वृथा दुःख तूं कां करिसी ॥ १६ ॥
श्रीराम वध्य नव्हे कोणासी । श्रीराम वधील सर्वांसी ।
तूं कां रडसी आक्रंदेसी । मृत्यु श्रीरामासी असेना ॥ १७ ॥
वसिष्ठें सांगितलें निजवर्म । अजरामर श्रीराम परब्रह्म ।
हें नाठविसी तूं मूर्ख परम । रुदनधर्म तो मिथ्या ॥ १८ ॥
लक्ष्मणा धांव धांव सत्वर । हां तंव नव्हे श्रीरामस्वर ।
राक्षस वदती मावकर । ते तूं साचार मानिसी ॥ १९ ॥
ऐक आतां माझें उत्तर । मृग मारोनियां सत्वर ।
आतांचि येईल तुझा भर्तार । धरीं धीर जानकिये ॥ २० ॥

श्रीरामांनी जातेवेळी दिलेल्या आज्ञेचे लक्ष्मण स्मरण देतो :

राक्षसांचिये छळणवचनीं । तुज एकलें सांडोनि वनीं ।
न वचें श्रीरामाच्या धांवणीं । सत्य वाणी हे माझी ॥ २१ ॥
श्रीराम सांगे वारंवार । जीवावरी आलिया दुर्धर ।
तरी न सांडावी सीता सुंदर । तुजसमोर नेमिलें ॥ २२ ॥
माझेंविशींची कांही चिंता । लक्ष्मणा तुम्ही न करावी सर्वथा ।
श्रीराम बोलिला तुजदेखतां । अति सावध सीता रक्षावी ॥ २३ ॥
पुनःपुनः सांगे कानीं । राक्षस मायावी ये वनीं ।
सीता नेतील छळोनी । सावधानीं राखावी ॥ २४ ॥
छळावया वनांतरी । जाली शूर्पणखा अति सुंदरी ।
राक्षस येतील तैसियेपरी । सीता तिळभरी न विसंबें ॥ २५ ॥
श्रीरामाची शिकवण ऐसी । आणिक मी केंवी करुं तुझ्या बोलासी ।
तुज सांडोनि वनवासीं । रामापासीं न वचें मी ॥ २६ ॥
उल्लंघोनि श्रीरामवचन । तुझेनि बोलें जाता आपण ।
राक्षसीं केलिया तुझे हरण । रोकडें मरण मज आलें ॥ २७ ॥

आत्मबुद्धिर्हितार्थाय गुरबुद्धिर्विशेषतः ।
परबुद्धिर्विनाशाय स्त्रीबुद्धिः प्रलयं गतः ॥ ५ ॥

सर्व अनर्थाचे मूळ कारण स्त्रीबुद्धी :

निजात्मबुद्धि ते हितासी । सद्गुरुबुद्धि सुखैकराशी ।
परबुद्धि ते विनासासी । मूळ प्रळयासी स्त्रीबुद्धि ॥ २८ ॥
ऐकतां स्त्रीवचन जमद्ग्नी । तो निमाला तत्क्षणीं ।
रेणका घायवटें पडे धरणीं । क्षत्रियां रणीं निर्दाळिलें ॥ २९ ॥
तीन सप्तकें वधिले क्षत्री । रुधिरपूर वाहे धरित्रीं ।
स्त्रीवाक्याची हे थोरी । जे चराचरीं आकांत ॥ ३० ॥
ऐसी स्त्रीवाक्याची परी । हितोपदेशीं अनर्थ करी ।
तुज साडोनि गुंफेमाझारी । तळभरी दुरी मी न वचें ॥ ३१ ॥
अति कठिण माझा भावो । मज नाहीं श्रीरामस्नेहो ।
तुज एकलें सांडोनि पहा हो । शोधूं श्रीरामरावो न वचें मी ॥ ३२ ॥
मज काढावया गुंफेबाहेरी । धांव धांव म्हणिजे निशाचरी ।
ऐसी मायिक हाक मारी । तुजहूनि दूरी मी न वचे ॥ ३३ ॥

सीतेचा संताप व लक्ष्मणाला अभिशापः

ऐसें बोलतां लक्ष्मणा । सीतेसी कोप आला चौगुणा ।
सांडोनि मर्यादेची गणना । कठिण वचना अनुवादे ॥ ३४ ॥

नैव चित्रं सपत्‍नेषु पापं लक्ष्मण यद्भवेत् ।
त्वव्दिधेषु नृशंसेषु नित्यं प्रच्छन्नचारिशु ॥ ६ ॥

प्रत्यक्ष श्रीरामाची हांक । तें म्हणसी तूं नायिक ।
माझे ठायीं तुझा अभिलाष । पापी निष्टंक तूं एक ॥ ३५ ॥
माझा अभिलाष धरोनि मनीं । वनासी आलासी सेवक होऊनि ।
श्रीराम राक्षसी वधिल्या वनीं । मज निजपत्‍नीं करु पाहसी ॥ ३६ ॥
सापत्‍नांची हेचि बुद्धी । बंधूंसी बंधु छळोनि वधी ।
त्याची भोगावीं भोगसमृद्धीं । हे दृष्टबुद्धि तुजपासीं ॥ ३७ ॥
संवचोराचें सांजणें । तैसी सेवा केली लक्ष्मणें ।
नाना युक्तीं श्रीराम मारवणें । मज आपण भोगावया ॥ ३८ ॥
श्रीरामसेवा केली प्रबळ । त्या सेवेचें हेंचि फळ ।
पत्‍नी करावी जनकबाळ । सेवा सफळ येणें तुझी ॥ ३९ ॥
परदारकामिक दुष्ट । सेवा करोनि अति शठ ।
आजि कळला भाव स्पष्ट । महानष्ट तूं पापी ॥ ४० ॥
श्रीराम सन्नि देखोनी । म्हणसी जानकी माझी जननी ।
श्रीरम राक्षसीं वधिलिया वनीं । सीता पत्‍नी करुं पाहसी ॥ ४१ ॥
मी तंव श्रीरामाचें रंक । परपुरुषाचें न शिवें अंक ।
जळो तुझें काळें मुख । माझा अभिलाष करुं पाहसी ॥ ४२ ॥
तूं तंव माझा अभिलाषी । मजपासोनि दुरी न वचसी ।
मीच जाईन श्रीरामापासीं । काय त्यासी वर्तलें ॥ ४३ ॥

अश्रुपूर्णमुखी सीता तथोक्त्वा पुनरब्रवित् ।
गोदावरीं प्रवेक्ष्यामि हीना रमेण लक्ष्मण ॥ ७ ॥
पिबामि वा विषं तीक्ष्ण प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
न त्वहं राघवादन्यं कदापि पुरुषं स्पृशे ॥ ८ ॥

आत्मघात करण्याची सीतेची धमकी :

लक्ष्मणा ऐकें सावधान । श्रीरामवेगळीं मी आपण ।
होईन गंगेमाजी मग्न । कीं हुताशन प्रवेशें ॥ ४४ ॥
किंवा करीन विषभक्षण । अथवा पर्वतपतन ।
अथवा वृक्षाग्रीं वेंघोन । देईन प्राण अधःपतनें ।
अथवा वृक्षाग्रीं वेंघोन । देईन प्राण अधःपतनें ॥ ४५ ॥
परी तुजसीं अंगसंग । नाहीं करणें विषयभोग ।
बोलणें हेंचि माझें निर्व्यंग । तूं निःसंग विषयार्थी ॥ ४६ ॥
श्रीरामावेगळें आणिकातें । नाहीं स्पर्शणें जीतें ।
ऐसे जाणोनि निश्चितें । भजें भावार्थे श्रीरामा ॥ ४७ ॥
ऐकोनि सीतेची दुष्ट वाणी । सौमित्र बोटे घाली कानीं ।
श्रीरामनाम स्वयें स्मरोनी । अति उद्विग्न संतप्त ॥ ४८ ॥

लक्ष्मणाचा मनःक्षोभ, सीतेला रामाज्ञेची स्पष्ट जाणीव :

जानकीचे वर्मी वाग्बाण । साहों न शकेचि लक्ष्मण ।
दृढ खोचलें अंतःकरण । वचनें प्राण सोडूं पाहें ॥ ४९ ॥
ऐसें बोलोनि अति कठिण । सीता आक्रोशें करी रुदन ।
तें देखोनि लक्ष्मण । बोलें दारुण क्षोभोनी ॥ ५० ॥

स्वभावोऽयं हि नारीणां त्रिपु लोकेषु कथ्यते ।
विमुक्तधर्माश्चपलास्तीक्ष्णा भेदकराःस्त्रियः ॥ ९ ॥
उपशृण्वंतु मे सर्वे साक्षिभूता वनेचराः ।
न्यायवादी यथावाक्यमुक्तोऽहं प्रुरुषं त्वया ॥ १० ॥
स्त्रीस्वभावेन दुष्टेन दुरुक्तेन न्यवस्थितम् ।
यास्यामि यत्र काकुत्स्थः स्वस्ति तेऽस्तु वरानने ॥ ११ ॥

स्त्रीस्वभाव दुष्ट अदभुत । जे नवमास वाहे उदरांत ।
जे सोसी सदा नरक मूत । त्या मातेसी सुत पारखा करी ॥ ५१ ॥
बंधुबंधुंसीं वैराकार । वाढवावया मुख्य साचार ।
स्त्रीसंगाचा बडिवार । वेगळाचार सुहृदांसीं ॥ ५२ ॥
मी बोलें नित्य नित्य निष्पाप । तो त्वां छळोनि श्रीरामप्रताप ।
मजवरी घालिसी अभिशाप । हें महापाप जानकिये ॥ ५३ ॥
सांडोनि मर्यादा धर्मार्गळा । स्त्रिया होती उत्सृंखळा ।
तें म्यां आजी देखिलें डोळां । जनकबाळा अभिशापें ॥ ५४ ॥
मज तुज साक्ष येथें । ऐकताती समस्त भुतें ।
उल्लंघावया श्रीरामाज्ञेतें । अभिशापोक्तें भज छळिलें ॥ ५५ ॥
तुज सांडोनि वनांतरी । तिळभरी म्यां न व्हावे दूरी ।
हे श्रीरामाज्ञा वंदितां शिरीं । नानापरीं त्वां छळिलें मातें ॥ ५६ ॥
त्वां मज घातला अभिशाप । तुझें तुज फळेल पाप ।
श्रीराम न भेटे सद्रुप । भोगिसी संताप षण्मास ॥ ५७ ॥
तूं जननी मी अपत्य । हा तंव माझा दृढ भावार्थ ।
तुझा तुज फळेल वचनार्थ । अति अनर्थ पावसी ॥ ५८ ॥

लक्ष्मणाच्या शपथा व निरुपायानें जाणें :

मी अपत्य तूं जननी । हा सद्भाव माझे मनीं ।
तरी राम भेटे मृग वधोनी । द्वंद्वबंधनीं निर्मुक्त ॥ ५९ ॥
श्रीरामाज्ञेचें रक्षण । तुजपासीं होतो जाण ।
म्या केलिया वनाभिगमन । राक्षस हरण तुज करिती ॥ ६० ॥
पुढें श्रीरामाची दृष्टादृष्टी । सहसा तुजसी न होईल भेटी ।
सोशिल्या विघ्नांचिया कोटी । श्रीराम दृष्टीं देखसी तूं ॥ ६१ ॥
तुज सांडोनि निर्बधन । माझेनि न करवेची गमन ।
माझें निजसत्व संपूर्ण । संरक्षण तुज असो ॥ ६२ ॥

आश्रमातून जाताना रेषाबंधन व ती रेषा न ओलांडण्याचा सीतेला दंडक :

तूं न मानसी माझा भावो । मज पुसेल श्रीरामरावो ।
त्यालागीं रक्षणनिर्वाहो । करोनि पाहो मी जातों ॥ ६३ ॥
श्रीरामाचा निजसखा । निर्विकल्प शुद्ध नेटका ।
तरी हे माझी मर्यादा देखा । ब्रह्मादिकां अनुल्लंघ्य ॥ ६४ ॥
माझे मर्यादेची रेखा । कळिकाळासी अटक देखा ।
तेथें राक्षसां पै रंका । केंवी आवांका करवेल ॥ ६५ ॥
राक्षसां न करवे हरण । ऐसें ठेविलें निजरक्षण ।
तुवां पाळावें येगढें वचन । रेखाउल्लंघन न करावें ॥ ६६ ॥
योगी संन्यासी तापसवेषी । भिक्षेसी येतील आश्रमासी ।
तूं विश्वासूं नको तयांसीं । मर्यादेसी नुल्लंघीं ॥ ६७ ॥
उल्लंघोनियां रेखेसी । जरी तूं भिक्षा देऊं जासी ।
तरी तूं राक्षसीं हरिजेसी । दुःखी होसी जानकिये ॥ ६७ ॥
ऐसें सांगोनि लक्ष्मण । करावया श्रीरामगवेषण ।
सवेग निघाला आपण । धनुष्यबाण सज्जोनी ॥ ६९ ॥

त्यक्त्वा सदुस्त्यजसुरेप्सितराजलक्ष्मीं
धर्मिष्ठ आर्यवचसा सदगादरण्यम् ।
मायामृगं दयितयेप्सितमन्वधाव
व्दंदे महापुरुष ते चरणारविंदम् ॥ १२ ॥

श्रीराम व लक्ष्मण यांची भेटः

देव वांछिती राज्यवैभव । पितृवाक्यें त्यजोनि सर्व ।
चरणचालीं श्रीराघव । आला स्वयमेव वनवासा ॥ ७० ॥
सीताप्रियेचें पियवचन । ऐकोनियां श्रीरघुनंदन ।
मायामृगीं करी धांवन । ते श्रीरामचरण वंदी सौमित्र ॥ ७१ ॥
ध्वजवज्रांकुशरेखा । श्रीरामपदें पाहत देखा ।
चालिला लक्ष्मण निजसखा । स्वानंदें देखा डुल्लत ॥ ७२ ॥
श्रीरामपदीं प्रेमपूर्ण । पद दों लोटांगण ।
श्रीरामचरण लागल्या जाण । धन्य प्राण पैं माझा ॥ ७३ ॥
श्रीरामचरण लागल्या जाण । तृण पर्ण मुक्तिका पाषाण ।
मस्तकीं वंदी तो रजःकण । धन्य चरण रामाचे ॥ ७४ ॥
श्रीरामपदें देखतं दृष्टीं । सौमित्रासी आनंदकोटी ।
गातां नाचत चालतां दृष्टीं । तंव श्रीराम जगजेठी देखिला ॥ ७५ ॥
मृग मारोनि गंगातटीं । अश्वत्थतरुच्या तळवटीं ।
स्वस्थ बैसला श्रीराम जगजेठी । तंव देखिला दृष्टीं सौमित्रें ॥ ७६ ॥
कुमित्रा गेल्या कल्पकोटी । श्रीरामासीं नव्हेचि भेटी ।
तो सौमित्रें देखिला दृष्टीं । स्वानंदपुष्टी सदोदित ॥ ७७ ॥
नाहीं श्रीरामीं युद्धकंदन । नाही राक्षस ना बंधन ।
नित्यमुक्त श्रीरघुनंदन । सुखसंपन्न देखिला ॥ ७८ ॥
लक्ष्मणा धांव धांव सत्वर । हें तंव मायिक उत्तर ।
सौमित्रें जाणोनि सत्वर । श्रीरघुवीर वंदिला ॥ ७९ ॥
दोघां जाली दृष्टादृष्टी । आनदें ओसंडली सृष्टी चरण ।
वंदोनियां उल्लाटीं । पडली मिठी आलिंगनीं ॥ ८० ॥
दोनी दीपक एक होती । दोहींची मिळोनि एक दीप्ती ।
श्रीरामसौमित्र तैसिया रीतीं । क्षेम देती एकत्वें ॥ ८१ ॥
समुद्री रिघतांचि लवण । स्वयें समुद्र होय आपण ।
तेंवी श्रीरामलक्ष्मण । जालें परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ८२ ॥
श्रीरामा नाठवे रामपण । येरा नाठवे भक्तपण ।
खुंटले बोल तुटलें मौन । आनंदीं निमग्न सदोदित ॥ ८३ ॥
सीतें छळिलें अभिशाप-वृष्टीं । ते नाठवे लक्ष्मणा गोष्टी ।
आणि ठाकोनि जावें पंचवटी । हेंही श्रीरामपोटी नाठवे ॥ ८४ ॥
ऐसे स्वानंदाचे पोटीं । दोघां पडली एक मिठी ।
संरक्षावया सृष्टी । सुटली मिठी प्रेमाची ॥ ८५ ॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । एकले सांडोनि सीतेसी ।
तूं कां येथें धांवलासी । तें मजपाशीं सांग वेगें ॥ ८६ ॥

ततो लक्ष्मणमायातं ददर्श विगतप्रभम् ।
विषण्णः सविषण्णेन दुःखितो दुःखभागिना ॥ १३ ॥

सीतेच्या रक्षणाविषयी विचारल्यावर लक्ष्मण गहिवरतो :

पुसतां सीतेचें रक्षण । निवांत जाला लक्ष्मण ।
दुःखे दुःखी अति दारुण । अश्रुपूर्ण मुख दिसे ॥ ८७ ॥
पुसों जातां सीतेची गोष्टी । लक्ष्मणासी दुःखकोटी ।
देखोनियां मुखसान्निष्टीं । श्रीराम पोटीं धाकिन्नला ॥ ८८ ॥
स्वयें सीतेनें सौमित्रासी । दृष्ट दुरुक्तीं अति संत्रासीं ।
धांवण्या धाडिला मजपासीं । अति दुःखेंसी दुःखित ॥ ८९ ॥
सौमित्र नुल्लंघी माझे वचना । परी वर्मस्पर्शाची संज्ञा ।
सीतेनें करविली आज्ञा । श्रीरामें सर्वज्ञा कळों सरलें ॥ ९० ॥

स्त्रीवाक्याच्या कठोरपणामुळे सीतेला एकाकी सोडणे भाग पडले :

स्त्रीवाक्याचे दारुण बाण । हृदयीं खोचलें संपूर्ण ।
तेणें अति दुःखी लक्ष्मण । आला धांवोन मजपासीं ॥ ९१ ॥
सीता सांडोनि कां आलासी । ऐसें पुसतां लक्ष्मणासी ।
लक्ष्मण लागला पायांसी । उकसाबुकसीं स्फुंदत ॥ ९२ ॥
आलिया विघ्नांच्या कोटी । परी मी न सांडितों पंचवटी ।
परि सीताभिशापगोष्टी । ऐकून उठाउठीं मी पळालों ॥ ९३ ॥
ऐसें बोलली दारुण । जेणें तत्काळ ये मरण ।
करितां तुझें नामस्मरण । माझे प्राण वांचले ॥ ९४ ॥
जरी न करितों तुझें नामस्मरण । तरी तात्काळ मज येते मरण ।
देखोनियां तुझे चरण । सावधान पावलों ॥ ९५ ॥

सीतेच्या मर्मभेदक बोलण्याचा परिणाम :

जानकी अनुवादकथक । ऐकें स्वामी सावधान ।
जे जे विंधले वाग्बाण । तें ते प्रकरण अवधारीं ॥ ९६ ॥
लक्ष्मणा धांव धांव ऐसे गर्जन । मायामारीचाक्रंदन ।
ऐकोनि सीता करी रुदन । युद्धबंधन श्रीरामा ॥ ९७ ॥
जानकी म्हणे धावं सत्वर । राक्षसीं वेढिला रघुवीर ।
त्याचा करीं रणोद्धार । तूं सहोदर पाठिराखा ॥ ९८ ॥
म्यां दिधलें प्रतिवचन । राक्षस बापुडें मशक कोण ।
त्यासी नाटोपे रघुनंदन । ऐकें महिमान रामाचें ॥ ९९ ॥
मिळाल्या दैत्यदानवांच्या थाटी । आलिया राक्षस कोट्यनुकोटी ।
श्रीराम नाटोपे जगजेठी । नळी निवटी बाणें एकें ॥ १०० ॥
सीता न मानी तुझा प्रताप । अति आक्रंदें करी संताप ।
धांवण्या धांव सकृप । राम सद्रूप पाहत दृष्टीं ॥ १ ॥
श्रीरामाज्ञा माझे शिरीं । तुजपासोनि तिळभरी ।
परता नव्हें धांवण्या बाहेरी । निजनिर्धारी बोलिलों ॥ २ ॥
तुज सांडोनि एकली नारी । मज जातां धांवण्यावारी।
तुज हरिल्या निशाचरीं । तिघांचें शिरीं दुर्नाम ॥ ३ ॥
श्रीराम सांगे आळवूनी । सीता राखावी सावधानीं ।
तो मी धांवण्या न धावें वनीं । तुजपासोनी दुरी न वचें ॥ ४ ॥
ऐसा ऐकोनि माझी वाणी । सीता क्षोभली शतगुणीं ।
पूर्वमर्यादा सांडोनी । वर्मी खोंचोनी अनुवादे ॥ ५ ॥
श्रीराम धांवण्या न धांवोनी । दुरी नव्हेसी मजपासोनी ।
राम राक्षसीं वधिल्या वनीं । मज निजपत्‍नी करुं पाहसी ॥ ६ ॥
माझा अभिलाष धरोनि मनीं । सेवा करिसी संवचोरपणीं ।
श्रीराम राक्षसीं वधिल्या वनीं । मज निजपत्‍नी करु पाहसी ॥ ७ ॥
परदारिया अति लंपटा । सेवकवर्गामाजी महानष्टा ।
मुख न दावीं मज पापिष्ठा । दुष्टा भ्रष्टा चांडाळा ॥ ८ ॥
होवोनि श्रीरामाचा सवता । वना आलासी मजभोवतां ।
येणें वाक्यें सांडोनि सीता । आलों रघुनाथा तुजपासीं ॥ ९ ॥
महामारक जें कां विख । तें मज घेतां निजपीयूख ।
परी सीतावाक्याचें असुख । परम दुःख श्रीराम ॥ ११० ॥
पित्यानें गांजिल्या शांतवी माता । मातेनें गांजिल्या शांतवी पिता ।
येणेंचि भावें श्रीरघुनाथा । आलों तत्वतां मी तुजपासीं ॥ ११ ॥

श्रीरामाचे लक्ष्मणाला अलिंगन :

ऐकोनि सौमित्राचें वचन । श्रीरामें दिधलें अलिंगन ।
तेणें जाले समाधान । सुखसंपन्न तेणें दोघे ॥ १२ ॥
साकर विरोनि होय जीवन । जिवना आलें गोडपण ।
तेंवी दोघे राकलक्ष्मण । सुखसंपन्न येरयेर ॥ १३ ॥
लोह परिसासीं पडतां गाठी । तत्काळ काळिमेसी होय तुटी ।
तेंवी सौमित्रेंसीं श्रीरामभेटी । दुःखकोटी निमाल्या ॥ १४ ॥

श्रीरामांना खर्‍या रहस्याची कल्पना असल्यामुळे सीतेच्या वर्तनाची त्यांना जाणीव होती :

ऐकोनि सीतेचें वचन । विस्मित श्रीरामाचें मन ।
मायामृगाचें विंदान । जाणे संपूर्ण श्रीराम ॥ १५ ॥
मायामृगें आक्रंदोन । धांवण्या आणिला लक्ष्मण ।
मागें येवोनि रावण । सीताहरण करील ॥ १६ ॥
ऐसा जाला कृतकार्यार्थ । जाणोनियां श्रीरघुनाथ ।
सुख मानिलें पोटांत । राक्षस अंत करावया ॥ १७ ॥
जाणोनि मायामृगाची गोष्टी । बाइलेचिया बोलासाठीं ।
राम कां धांवला मृगापाठीं । श्रोतीं पोटी न मानावें ॥ १८ ॥
स्त्रीकामाच्या अति प्रीतीं । मायामृगीं श्रीरघुपती ।
नाहीं धांवला कामासक्तीं । गूढ ग्रंथोक्तीं अवधारा ॥ १९ ॥
सीता केवळ नव्हे पत्‍नी । परमभक्तशिरोमणी ।
चरणचालीं आली वनीं । सेवेलागोनी श्रीरामा ॥ १२० ॥
राज्यीं असतां श्रीरामासीं । सेवा वांटली सेवकांसी ।
स्वयें करावया सेवेसी । उल्हासेसी वना आली ॥ २१ ॥
सीता निर्विकार भक्त । श्रीराम जाणे मनोगत ।
तिचा पुरवावया भावार्थ । स्वयें धांवत मृगामागें ॥ २२ ॥
भक्ताचिया वचनासाठीं । प्रकटला कोरडे काष्ठीं ।
तो श्रीराम धावें मृगापाठीं । सुखसंतुष्टी सीतेच्या ॥ २३ ॥
भक्ताचें भावें वचन । कदा नुल्लंघी श्रीरघुनंदन ।
सीतासद्भावें आपण । करी धांवणें मृगापाठीं ॥ २४ ॥
जैसा भाव तैसा देव । यदर्थीं नाहीं संदेह ।
देखोनि सीतेचा निजसद्भाव । धांवे श्रीरामराव मृगापाठीं ॥ २५ ॥
मायामृगीं करी धांवन । समूळ सांगितलें आपण ।
सीता निर्भत्सीं लक्ष्मण । तेंही निरुपण अवधारा ॥ २६ ॥
त्रैलोक्यपावन श्रीरामख्याती । वाढवावया अगाध कीर्ती ।
लक्ष्मणा दवडी सीता सतीं । नाना वक्रोक्तीं छळोनी ॥ २७ ॥
मुख्य सीतेचें मनोगत । श्रीरामें वधावा लंकानाथ ।
तेची साधावया कार्यार्थ । केला छळणार्थ सौमित्रा ॥ २८ ॥
श्रीराम सीता सौमित्र । तिन्हीं मूर्ती अति पवित्र ।
प्रकटावया श्रीरामचरित्र । कथाविचित्रानुवादु ॥ २९ ॥
अवताराचें नटनाट्य । प्रगट करावया सष्ट ।
कथानुवाद दिसे बिकत । तोचि निर्दिष्ट परमार्थ ॥ १३० ॥
सीता सती स्वयें सद्रूप । ते लक्ष्मणा लावी अभिशाप ।
हे मूर्खांचे मूर्ख जल्प । कथानुरुप अति गूढ ॥ ३१ ॥
येरयेरांचें मनोगत । जाणोनियां स्वये वर्तत ।
अगाधकीर्ति श्रीरघुनाथ । जग पुनीत श्रीरामनामें ॥ ३२ ॥
श्रीरामकथेचें अक्षर । क्षराक्षरातीत पर ।
श्रोते वक्ते अति पवित्र । कथाचरित्र अनुवादू ॥ ३३ ॥
केवळ जपतां श्रीरामनाम । नामें वक्ता होय परब्रह्म ।
त्याचा चरित्रसंभ्रम । आनंद परम परमार्थी ॥ ३४ ॥
एकाजनार्दना शरण । भेटेल श्रीराम लक्ष्मण ।
येरीकडे सीताहरण । स्वयें रावण करुं पाहे ॥ ३५ ॥
सीता साधावया पंचवटीं । रावण येवोनियां कपटी ।
त्या दोघांच्यां धर्मगोष्टी । कथाकसवटी अनुपम्य ॥ १३६ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
श्रीरामलक्ष्मणानुवादो नाम पंचदशोऽध्यायः ॥ १५ ॥
॥ ओंव्या १३६ ॥ श्लोक १३ ॥ एवं १४९ ॥