Ramayan - Chapter 3 - Part 2 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 2

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 3 - अरण्यकाण्ड - 2

अध्याय 2

विराध राक्षसाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अत्री आश्रमात श्रीरामांचे आगमन :

अतिऋषि वसे जेथ । आतुरविश्रांतिपर्वत ।
तेथें आला श्रीरघुनाथ । समवेत स्त्रीबंधू ॥ १ ॥
देखोनि अत्रीचे चरण । श्रीरामें घातलें लोटांगण ।
ऋषीनें दिधलें आलिंगन । समाधान ध्येयध्याना ॥ २ ॥
सीता आणि लक्ष्मण । दोघीं घातलें लोटांगण ।
दृढ मस्तकीं धरले चरण । सुखसंपन्न ऋषि जाला ॥ ३ ॥
श्रीरामें अति उल्हासता । अनसूयाचरणीं ठेविला माथां ।
अत्रि म्हणे श्रीरघुनाथा । तुझी हे माता पुरातन ॥ ४ ॥

अनसूया व सीतेची भेट, सीतेचे अभिनंदन :

ऐकोनि अत्रीचें वचन । सौमित्रें वंदिले तिचे चरण ।
सीतेनें घातलें लोटांगण । दिधलें आलिंगन अनसूये ॥ ५ ॥
सीतेसी देखतांचि दृष्टीं । अनसूयेसी सुखानंद पोटीं ।
धन्य धन्य तूं गोरटी । पतिसन्निष्ठी पतिव्रता ॥ ६ ॥
तुझे अंगी बाळपण । पतिच्या व्रता अनुलक्षून।
चरणचालीं वनाभिगमन । तूं संपूर्ण पतिव्रता ॥ ७ ॥
पतीचें वचन नुल्लंघिता । जे अनुसरे पतीच्या व्रता ।
तेचि सती पतिव्रता । ते तूं सीता सभाग्य ॥ ८ ॥
ऐसी करोनियां स्तुती । उचलोनियां दोहीं हातीं ।
आलिंगिली अति प्रीतीं । सतिया सती स्वानंदे ॥ ९ ॥
जाणोनि सीतेचें हृग्दत । अनसूयां जाली कृपायुक्त ।
आपुलें पतिव्रतेचें व्रत । सीतेसी देत स्वानंदें ॥ १० ॥

सीतेला पतिव्रता व्रत व दिव्यवस्त्र समर्पण :

देवोनि पतिव्रतेचें व्रत । अनसूया उल्हासयुक्त ।
दिव्य वस्त्रें अंगरागयुक्त । स्वानंदे देत तें ऐका ॥ ११ ॥

अब्रवीच्चापि सकलं हर्षं सीते करोम्यहम ।
इदं दिव्यांबरं माल्यं वस्त्रमाभरणानि च ॥ १ ॥
अंगरांगं च वैदेहि महार्हं च विलेपनम् ।
मया दत्तमिदं सीते तव गात्राणि शोभयेत् ॥ २ ॥

अनसूया कृपायुक्त । सीतेसी दिव्य वस्त्रें नेसवीत ।
आणि दिव्य चंदनें चर्चित । माळा घालित दिव्यसुमनी ॥ १२ ॥
सीतेचे पुरवावया कोड । घातला ताडाचा पैं तोड ।
अहर्निशीं पडेल उजेड । सरली चाड शशिसूर्यां ॥ १३ ॥
तोडाचिया दिव्यदीप्तीं । शशिसूर्य खद्योत होती ।
अनसूयेची निजख्याती । पतिसामर्थ्य अत्यभ्दुत । स्वयें अर्पित सीतेसी ॥ १५ ॥
माझिया दिव्यवस्त्रांची थोरी । मळिन नव्हेती परिचारीं ।
जाऊ नेणती रजकद्वारीं । निजतेजाकारीं निर्मळ ॥ १६ ॥

उटी व सुमनमालेचे दान :

उटी धुतां ओहळेना जाण । देहीं दिव्य चंदनाचें महिमान ।
करितां अभ्यंगमर्दन । सुगंधपण उडेना ॥ १६ ॥
दिव्य सुमनांची माळा । सुकों नेणे कदाकाळा ।
नित्य टवटवीत गळां । सुपरिमळा मघमघित ॥ १८ ॥
सीते सावध परिसेयीं । तूं माझा प्रसाद पावलीसी ।
तुज भय नाहीं राक्षसांपासीं । निःशंक होसी निर्भय ॥ १९ ॥
वियोग जालिया रघुनाथा । वियोग न बाधी तुझिये चित्ता ।
पूर्वापर पूर्वकथा । होय सांगतां श्रीराम ॥ २० ॥
म्हणोनि हात ठेविला माथां । अनसूयें अनुग्रहिली सीता ।
तोचि उपदेश पावोनि तत्वतां । सुखस्वानंदता सीता जाली ॥ २१ ॥
अनसूया महापतिव्रता । पुढें पाहूनियां कार्यार्था ।
वधावया लंकानाथा । कृपेनें सीता अनुग्रहिली ॥ २२ ॥
श्रीराम सौमित्र सीता । देखोनि उल्हास अत्रीच्या चित्ता ।
पर्वापार पूर्वकथा । होय सांगता श्रीराम ॥ २३ ॥

अनसूया महाभागा तापसी धर्मचरिणी ।
दशवर्षसहस्त्राणि यया तप्तं महातपः ॥ ३ ॥
दशवर्षाष्यनावृष्ट्या ढग्धे लोके निरंतरम् ।
यथा मूलफले सृष्टे जान्हवीव प्रवर्तिता ॥ ४ ॥

अनसूयेची पूर्वकथा :

अनसूया महापतिव्रता । त्पस्विनी अति वृद्धता ।
चंद्रकिरणांसम शोभे माथा । पतिधर्मार्था अनुकूळ ॥ २४ ॥
न रिघतां गिरिकंदरीं । बैसोनियां घरच्या घरीं ।
दहा सहस्त्र वर्षैवरीं । इचिया तपाची थोरी अगाथ ॥ २५ ॥

दहा हजार वर्षे उग्र तपश्चर्या :

घरचे घरीं कोण तप । ऐसा पुसावया करिसी संकल्प ।
ऐक त्या तपाचें स्वरुप । अति निष्पाप सांगेन ॥ २६ ॥
कोणाची न करी असूया । यांलागीं नांवें अनसूया ।
काम क्रोध लोभ न बाधी जया । तें रघुवर्या महातप ॥ २७ ॥
तपें करकरोनि तापस । कोपें केलें अतिशयें कर्कश ।
दंडमुंडन वृथा वेष । पडली ओस तपश्चर्या ॥ २८ ॥
काम क्रोध तिसरा लोभ । सांडणे हें तप दुर्लभ ।
तें घरचे घरी जाले सुलभ । अति निर्लोभ अनुसया ॥ २९ ॥

अनसूया का म्हणतात :

जेथें लोभ तेथें असूया । निर्लोभ तेथें अनसूया ।
याचें नाम तपश्चर्या । जाण रघुवर्या निश्चित ॥ ३० ॥
नुल्लंघणें पतिवचनासी । हें परम तप स्त्रियांसी ।
तें दहा सहस्त्र वर्षें इयेसी । अनसूयेसी फावलें ॥ ३१ ॥
उल्लंघितां पतीचे वचन । पतिव्रतांसीं पडिलें खान ।
नाहीं सामर्थ्य ना समाधान । स्त्रीपुरुष श्वानप्राय वसवसती ॥ ३२ ॥
दहासहस्त्र वर्षेपर्यंत । माझा नुल्लंघी वचनार्थ ।
तेणें तपें हे समर्थ । ऐक सामर्थ्य इयेचें ॥ ३३ ॥

अवर्षणकालात सर्वांचे रक्षण :

दहा वर्षे अनावृष्टी । दुर्भिक्ष पडिलें इया सृष्टीं ।
तृण नाहीं पृथ्वीचे पोटीं । वृथा गोष्टी तेथें कैंची ॥ ३४ ॥
ते काळीं फळमूळयुक्त । इणें वांचविले जन समस्त ।
परांडमुख नव्हे अहोरात्र । जन संतृप्त फळामूळीं ॥ ३५ ॥
गौतम पेरी प्रातःकाळीं । माध्यान्हीं आणोनि दे साळी ।
तेणें अहल्याबाळीं । ऋषिमंडळी वांचविली ॥ ३६ ॥
गौतमें वाचविले ब्राह्मण । इणें वाचविले वर्णावर्ण ।
पशुपक्षी सूकर श्वान । तृप्तिभोजनें अनुद्वेगें ॥ ३७ ॥
जंव जंव मागते येती द्वारासी । तंव तंव उल्हास अनसूयेसी ।
तृप्ति देतां समस्तांसी । अहर्निशीं उल्हास ॥ ३८ ॥
वृक्ष नाहीं पृथ्वीसीं । तरी पुरवी फळमूळांसीं ।
अगाध सामर्थ्य इयेपासीं । द्विजदेवांसी अतर्क्य ॥ ३९ ॥
जेंवी प्रवाहो गंगाजळा । तैसें पुरविले फळमूळां ।
इचिया सामर्थ्याची कळा । अतर्क्य सकळां द्विजदेवां ॥ ४० ॥

ब्रह्मा, विष्णू, महेश कसोटी घेण्यास येतात :

अवर्षणीं तृप्तिभोजन । द्यावें हें इचें व्रत संपूर्ण ।
एकोनि तिन्ही देव आपण । इचें छळण करुं आले ॥ ४१ ॥
ब्राह्मणवेषें याज्चा करुन । इचें घेऊनियां वचन ।
म्हणती नग्न होवोनि आपण । इच्छाभोजन द्यावें आम्हां ॥ ४२ ॥
ऐकोनि त्यांची वचननोक्ती । शंका नाहीं इचे चित्तीं ।
हो म्हणत स्वानंदस्थितीं । ऐक रघुपति विनोद ॥ ४३ ॥

जलप्रोक्षणाने तिघेही देव बालक झाले :

माझें चरणतीर्थ घेवोन । त्यांसी केलें अभिषिंचन ।
तंव ते तिन्हीं बाळकें जाली जाण । अति अज्ञान षाण्मासिक ॥ ४४ ॥
मग होवोनियां नग्न । पायांवरी अभ्यंगून ।
तिघां देवोनि स्तनपान । करी परियंदण पालखी ॥ ४५ ॥

देव-स्त्रियांची केविलवाणी स्थिती :

लक्ष्मी सावित्री पार्वती । तिघी समर्थ्ये विवादती ।
त्यांसीं दावावया इची स्थिती । तिन्ही मूर्ती छळूं आल्या ॥ ४६ ॥
पुढिलासी करुं जातां छळण । छळिताचि छळे आपण ।
निन्ही देवां आलें बाळपण । अति अज्ञान स्वये जाले ॥ ४७ ॥
दश मासांची अहोराती । अनसूयेनें केली निश्चितीं ।
तत्काळ तिहींची प्रसूती । अपत्यप्राप्ती पावले ॥ ४८ ॥
अतिशयें भोगिती आपत्ती । यालागीं अपत्य म्हणती ।
स्वविष्ठा स्वयें चिवडिती । ते बाळत्क्प्रती तिन्हीं देवा ॥ ४९ ॥

देव – स्त्रियांनी अनसूयेची प्रार्थना करुन पतिराजांची मुक्तता केली :

लक्ष्मी सावित्रई पार्वती । देखोनी तिघी कुसमुसती ।
पति अडकले अनसूयेहातीं । सामर्थ्य तीप्रति चालेना ॥ ५० ॥
जैसे सूर्यापुढें खद्योत । तैया तिघी जाल्या गर्वहत ।
अनसूयेसी लोटांगण घालित । पति मिर्मुक्त करीं माये ॥ ५१ ॥
ती म्हणे पुसावें ऋषीप्रती । त्या मग येती काकुळती ।
ऋषीराया कृपामूर्ती । पतिनिर्मुक्ति सांगावी ॥ ५२ ॥
अनसूया पतिव्रताशिरोरत्‍न । माझें लाहोनि आज्ञापन ।
तिघांचें हारोनि अज्ञान । केले सावधान सुखरुप ॥ ५३ ॥
केलें अनसूयेचें स्तवन । तिघे पुत्र जाले जाण ।
अत्रिगोत्रीं उत्पन्न । ब्रह्मा आपण चंद्र जाला ॥ ५४ ॥

दत्तात्रेय अवताराची उत्पत्ती, त्यांचा आशीर्वाद :

रुद्र दुर्वास जाला कोपाग्नी । विष्णू जाला दत्तात्रेय मुनी ।
ते हे श्रीरामा तुझी जननी । जुनाट जुनी अनसूया ॥ ५५ ॥
ते हे तुझी आदिमाता । सत्य मानीं श्रीरघुनाथा ।
इचे चरणीं ठेवितां माथा । तुम्हां निर्भयता वनवासीं ॥ ५६ ॥
अनसूया परम पतिव्रता । इणें अनुग्रहिली सीता ।
तुम्हासि वनवासीं असतां । भय सर्वथा असेना ॥ ५७ ॥
ज्या या पावाल भयासी । तेथें तेथें निर्भय तुम्हांसी ।
ज्या ज्या पावाल अपेशासी । अपेशीं यशी जगद्वंद्य ॥ ५८ ॥
तिघें राहोनि त्रिरात्र । फळमूळांचा अति आदर ।
देखोनि सीतेचा निर्धार । सुख अपार अनसूयेसी ॥ ५९ ॥

अत्री ऋषींच्या अनुज्ञेने श्रीराम तेथून पुढे जातात :

अभिनंदोनि अत्रिऋषी । नमस्कारोनि अनसूयेसी ।
श्रीराम निघाला दंडकारण्यासी । राक्षसांसी अंतक ॥ ६० ॥
ऋषिआश्रम वनसमेळीं । अग्निहोत्राची नव्हळी ।
पाहतां यागाची शुद्ध शैली । श्रीराम वनस्थळीं विचरत ॥ ६१ ॥

भयविव्हल करणारे विराधवन :

कोठें त्रिरात्र कोठें पंचरात्र । कोठें वस्ती सप्तरात्र ।
कोठे राहोनि एकरात्र । गमनीं तत्पर श्रीराम ॥ ६२ ॥
तंव पुढें देखिलें दुर्गम वन । पळती गज सिंह व्याघ्र हरिण ।
ससे साळ्या वृक जंबुकगण । घेवोनि प्राण पळताती ॥ ६३ ॥
सिंह मारावे गजथाट । ते कां पळती एके वाट ।
व्याघ्र फोडिती हरिणकंठ । ते कां समसगट पळताती ॥ ६४ ॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । महभ्दय दिसे श्वापदांसी ।
विसरोनियां वैरभावासी । अति आक्रोशीं पळताती ॥ ६५ ॥

विराधाकडून सीताहरण :

यांसी भयाचें काय कारण । ऐसें विचारितां रघुनंदन ।
तंव विराधें धांवोन । सीता हरण पैं केलें ॥ ६६ ॥
पुढें श्रीरामलक्ष्मण । सीता मागें होती आपण ।
सीतेचें देखोनि सुंदरपण । विराधें हरण तत्काळ केलें ॥ ६७ ॥
सीता धरोनि दोहीं हातीं । बैसविली अंकाप्रती ।
मी होईन तुझा पती । चिंता चित्तीं करुं नको ॥ ६८ ॥
तूं अप्सरा कीं खेचरी । वनदेवता कीं सुरेश्वरी ।
भाग्यें सांपडलीस हो सुंदरी । सुखें माझ्या घरी नांदावें ॥ ६९ ॥
तुजसारिखी सुंदर । जरी रिघसील माझे घर ।
गजमुक्ताफळांचे अलंकार । उत्तम शृंगार तुज करीन ॥ ७० ॥
मज जोडली सुंदर कांता । उल्हास राक्षसाचे चित्ता ।
परी त्यासी शंकेना सीता । श्रीरघुनाथाचेनि बळें ॥ ७१ ॥
श्रीरामाच्या बाणांपुढें । विराध राक्षस केवळ बापुडें ।
मज नेईल कोणीकडे । मरण रोकडें पावेल ॥ ७२ ॥
वन अत्यंत गूढ गहन । पुढे गेले श्रीराम लक्ष्मण ।
त्यांसी विराध न देखे आपण । सीता दोघे जण न देखती ॥ ७३ ॥

रामस्मरणाने सीता निर्भय :

अनसूयें अनुग्रहिली सीता । तीस भय नाहीं सर्वथा ।
ते स्मरे श्रीरघुनाथा । धाव कृपावंता श्रीरामा ॥ ७४ ॥
ऐकतां श्रीरामस्मरण । राक्षस जाला कंपायमान ।
म्हणे नको करुं स्मरण । वचन तीक्ष्ण मज बाधी ॥ ७५ ॥
ऐसें ऐकोनि सीतेचें वचन । परतले श्रीराम लक्ष्मण ।
परी गूढ गहन महावन । सीतादर्शन नव्हे त्यासी ॥ ७६ ॥
लक्ष्मण कोपला उभ्दट । बाण सोडोनि घनदाट ।
वन छेदोनि केलें सपाट । देखिला पापिष्ठ विराध ॥ ७७ ॥

ददर्श गिरिशृंगाभं पुरुषादमवस्थितम् ।
वक्रनासं विरुपाक्षं विकृतं घोरदर्शनम ॥ ५ ॥

लक्ष्मणाकडून अरण्य साफ होताच विराधाने रामलक्ष्मणांना दर्शन :

राक्षस देखिला अति क्रूर । पर्वतोपम महाथोर ।
वक्र नासिक वक्र वक्त्र । कपाटोदर दुर्धर्ष ॥ ७८ ॥
अष्ट महासिंहाचीं मढीं । शूळीं खोंचोनि खांदी कावडी ।
मृग व्याळ चितळे बापुडीं । मारी कोडी श्वापदांच्या ॥ ७९ ॥
सदंत गजांचीं शिरें । गजचर्में थबथबिती रुधिरें ।
मारोनि पंच पंच व्याघ्रें । खांदी क्रूरें वाहिजेती ॥ ८० ॥
जिव्हा तांबडी लखलखित । नेत्र दिसती अति आरक्त ।
भूंतां करावया अंत । सवें धांवत वनासी ॥ ८१ ॥

सरामं लक्ष्मणं दृष्ट्वा सीतां च शुभलक्षणाम् ।
अभ्यधावत्सुसंकुद्धो लेलिहान इवांतकः ॥ ६ ॥

विराधें देखोनि श्रीराम लक्ष्मण । मग सीतेसी पुसे हे दोघे कोण ।
श्रीराम भर्तार दीर लक्ष्मण । माझी सोडवण करुं आले ॥ ८२ ॥
मग तो म्हणे तूं माझी कांता । तुज तंव न सांडीं सर्वथा ।
या दोघांसी मी भक्षीन आतां । तूं काहीं चिंता करु नको ॥ ८३ ॥
ऐसें बोलोनिया देख । विकट देवानियां हाक ।
धांवोनि श्रीरामासन्मुख । काय तो मूर्ख बोलत ॥ ८४ ॥

विराधाकडून श्रीरामाचा अधिक्षेप :

तुम्हांसवें सुंदर सीता । ते तंव जाली माझी कांता ।
तुम्हांसी मी न मारी आतां । पळावें जीविता वांचवोनी ॥ ८५ ॥
तुम्ही म्हणाल युद्ध करीन । तरी मी क्षणार्धे मारीन ।
तुमचें रुधिर प्राशीन । मांसभक्षीन स्वानंदे ॥ ८६ ॥
अरे मी विराध महाबळी । वसताहें ये वनस्थळीं ।
तुम्ही दोघे मूर्ख समूळीं । जे भार्यासमेळीं आलेती ॥ ८७ ॥
तुम्हां दोघां तापसपण । तरी कां वाहतां धनुष्यबाण ।
तुम्ही कोठील कोणाचे कोण । हें मज संपूर्ण सांगा ॥ ८८ ॥

श्रीरामाचे उत्तरः

मग त्यासी सांगे श्रीराम आपण । धनुष्यें गांजिला रावण ।
तें भंगिलें वाहोनि गुण । तो मी जाण श्रीराम ॥ ८९ ॥
सुबाहूचा घेतला प्राण । मारीच उडविला संपूर्ण ।
ताटिका वधिली निजबाणें । तो मी जाण श्रीराम ॥ ९० ॥
एकवीस वेळी धरित्री । जेणे भार्गवें केली निःक्षत्री ।
तोही लाजविला शौर्यैकरी । तो मी निर्धारीं श्रीराम ॥ ९१ ॥
सूर्यवंशीचा विख्यात । श्रीराम दाशरथी काकुत्स्थ ।
करावया राक्षसांचा अंत । वना निश्चित मी आलों ॥ ९१ ॥
सीता माझी निजवधू । आणि लक्ष्मण माझा धाकटा बंधू ।
तूं कोण राक्षससंबंधू । मूळानुवादू मज सांगें ॥ ९३ ॥

विराधाची दर्पोक्ती, लक्ष्मणाचे शरसंधान :

तंव राक्षस म्हणे श्रीरघुनाथा । जगाद नामें माझा पिता ।
शतरदा माझी निजमाता । विराध मी तुमच्या घाता करीन ॥ ९४ ॥
ऐसे ऐकतां वचन । लक्ष्मण क्षोभला दारुण ।
धनुष्यीं वाहोनियां गुण । तीक्ष्ण बाण सोडिले ॥ ९५ ॥
कंकपत्री । सुवर्णपुंख चौधारी ।
भेदले राक्षसाचे जिव्हारी । तेणें तो भारी क्षोभला ॥ ९६ ॥
घ्यावया लक्ष्मणाचा प्राण । शूळ सोडिला गर्जोन ।
श्रीरामें विंधिला बाण । मध्येंच जाण तोडिला ॥ ९७ ॥

श्रीरामबाणाने विराध विद्ध :

सवेंचि श्रीरामें पैं जाण । विराधासी पाचारुन ।
रुक्मपुंख सोडिला बाण । अति तीक्ष्ण धगधगीत ॥ ९८ ॥
विराधा झांपडी पडिली तेणें । मागें पळणें कां पुढें होणें ।
नाठवे करणें न करणें । येणें जाणें खुंगलें ॥ ९९ ॥

विराधाला आत्मबोध :

श्रीरामबाणाची लखलख । विराधासी एकाएक ।
पाडोनि ठेलें जी ठक । क्रिया निःशेष विसरला ॥ १०० ॥
विसरला राक्षसधर्म । विसरला युद्धसंभ्रम ।
विसरला क्रियाकर्म । घायें निर्भ्रम विराध केला ॥ १ ॥
श्रीरमाचा निजबाण । घेवोनि आला श्रीरामस्मरण ।
धाकें निमाला देहाभिमान । गर्भबंधन धेवोनी ॥ २ ॥
ऐसी हृदयशुद्धि देखोन । हृदयीं भेदला श्रीरामबाण ।
बोध पावोनि संपूर्ण । राक्षसें प्राण सोडिला ॥ ३ ॥
धन्य श्रीरामाचा बाण । लागलां राक्षसें सोडिला प्राण ।
बोधा पावला संपूर्ण । तेंचि निरुपण अवधारा ॥ ४ ॥

उवाच रामं संहृष्टः प्रांजलिश्चीलतेंद्रियः ।
कौसल्या सुप्रजास्तात रामस्त्वं विदितो मया ॥ ७ ॥
वैदेही च महाभागा लक्ष्मणश्च महारथः ।
अभिशापादहं घोरां प्रविष्टो राक्षसीं तनुम् ॥ ८ ॥

विराधकृत रामस्तुती :

बाणें भेदिलें जिव्हार । वाहती रुधिराचे पूर ।
विकळ पडतां शरीर । हर्षे निर्भर विराध ॥ ५ ॥
भेदतां श्रीरामाचा बाण । विकळेंद्रिय चलितप्राण ।
घायें पावला संपूर्ण । दुःखनिर्दळण श्रीरामवाणें ॥ ६ ॥
घाव लागतां व्हावें दुःख । दुःख जावोनि पावला सुख ।
विराला जाला परम हरिख । बाणें अलोलिक सुखी केलें ॥ ७ ॥
धन्य धन्य हे श्रीराममूर्ती । धन्य धन्य हे बाणाची सुखशक्ती ।
धन्य धन्य हे सीता सती । स्पर्शे निर्मुक्ति राक्षसत्वा ॥ ८ ॥
लक्ष्मणें कोपोनि उभ्दट । घोरारण्य केलें सपाट ।
माझ्या मोक्षाची ते वाट । केली निर्दुष्ट सौमित्रें ॥ ९ ॥
जो कां करी शुद्ध मित्र । त्यासी म्हणती सौमित्र ।
लक्ष्मण सुमित्र साचार । निशाचर मी सुखी केलों ॥ ११० ॥
मी राक्षसा अति अपवित्र । श्रीरामबाणें केलों पविर ।
मज वंदिती सुरनर । सुखी साचार केलों बाणें ॥ ११ ॥
बाणीं कैंचा सुखसंभ्रम । बाणीं सुखरुप श्रीराम ।
बाणीं सबाह्य श्रीराम परम । सुखसंभ्रम तेणें मज ॥ १२ ॥
शापें राक्षसतनु अधम । त्या शापाचें करोनि भस्म ।
श्रीरामें केलें परम । निजात्मधाम ठाकावया ॥ १३ ॥
जन्ममरणाचा महाधाक । घायें फोडील निःशेख ।
जितां मरतां नाहीं दुःख । ऐसें निजसुख दिधलें श्रीरामें ॥ १४ ॥
कैंचा शाप तूं येथें कोण । ऐसा श्रीरामें पुसिला प्रश्न ।
तेही विषयींचें निरुपण । समूळ कथन अवधारीं ॥ १५ ॥

अभिशापादहं घोरां प्रविष्टो राक्षसीं तनुम् ।
तुंबुरुर्नाम गंधर्वः शप्तो वैश्रवणेन वै ॥ ९ ॥
प्रसाद्यमानश्च मया सोSव्रर्वान्मां महायशाः ।
यदा दशरथी रामस्त्वां वधिष्यति संयुगे ॥ १० ॥
तदा प्रकृतिमापन्नोभवान्सवर्गं गमिष्यति ।
इति वैश्रवणो राजा रंभासक्तं शशाप ह ॥ ११ ॥

पूर्ववृत्तांत, शाप, उःशाप सांगून विराध गंधर्वलोकी जातो :

धनद कुबेर तूं जाणसी । तेणें पाचारिलें गावयासी ।
मी तुंबरु आसक्त रंभेसीं । मद्यपानेंसीं उन्मत्त ॥ १६ ॥
बळें मज नेलें तेथ । देखोनियां मदगर्वित ।
तूं राक्षस होसी उन्मत्त । घोर वनांत अघोरा ॥ १७ ॥
शाप ऐकतां अद्भुत । मी जालों भयभीत ।
लोंटांगण घालोनि तेथ । उःशापार्थ प्रार्थिला ॥ १८ ॥
श्रीराम सीता लक्ष्मण । वनवासा जातां जाण ।
तूं करिसी सीताहरण । युद्ध दारुण होईल ॥ १९ ॥
लागतां श्रीरामाचा बाण । तूं तत्काळ सांडिसी प्राण ।
तेव्हा जावोनि शापबंधन । निजात्मभुवन पावसी ॥ १२० ॥
ऐसी उःशापाची निजकथा । ते आजि जाली तत्वतां ।
तुझा बाण लागतां श्रीरघुनाथा । अलौकिकता सुखप्राप्ति ॥ २१ ॥
तुझ्या बाणाची होतां भेटी । अहं कोहं सोहं त्रिपुटी ।
छेदोनियां उठाउठीं । स्वानंदपुष्टीं सुखी केलें ॥ २२ ॥
लागतांचि तुझा निजबाण । माझें निवटिलें जन्ममरण ।
शाप बापुडें तें कोण । सुख संपूर्ण पावलों ॥ २३ ॥
जे जाहली सुखप्राप्ती । त्यासी कधीं नव्हे विकृती ।
कल्पांतीं नव्हेचि च्युती । ऐसी सुखप्राप्ती श्रीरामबाणें ॥ २४ ॥
मज उःशापें गंधर्वप्राप्ती । गंधर्वदेहीं करितां वस्ती ।
मज बाधेना देहअहंकृती । ऐसी नित्यमुक्ति श्रीरामबाणें ॥ २५ ॥

विराधोक्ति

तव प्रसादामुन्क्तोSहमभिशापात्सुदारुणात् ।
भुवनं स्वं गमिष्यामि स्वस्ति तेSस्तु महाभुज ॥ १२ ॥
अध्यर्धयोजने तात महर्षिःसूर्यसन्निभः ।
इतो वसति धर्मात्मा शरभंगः प्रतापवान् ॥ १३ ॥
तं शीघ्रमभिगच्छ त्वं स ते श्रेयोSभिधास्यति ॥ १४ ॥

ऐसें बोलोनि आपण । श्रीरामासीं केलें नमन ।
तंव विराधासी विमान । देदीप्यमान उतरलें ॥ २६ ॥

जातेवेळी विराध श्रीरामांना शरभंग ऋषींच्या आश्रमात जाण्यास सांगतो :

राक्षसदेह सांडोनि क्षितीं । विराध बैसतां विमानाप्रती ।
श्रीरामाचे वसतीची स्थिती । गमनोक्ती सांगत ॥ २७ ॥
येथोनियां अर्धयोजन । शरभंग वसे तपोधन ।
तपस्तेजें देदीप्यमान । तेथें आपण अवश्य जावें ॥ २८ ॥
तो तुम्हां वनवासाची गती । सांगेल वनवासाची स्थिती ।
तुझेनि त्यासी निजमुक्ती । जाण निश्चितीं श्रीरामा ॥ २९ ॥

श्रीरामाचे आगमन होणार म्हणून शरभंगाने सत्यलोकाला जाण्याचे नाकारले :

इंद्र आला शरभंगापासीं । त्यासी न्यावया सत्यलोकासी ।
तो राहिलासे तुझे भेटीसी । सत्यलोकासी नवचोनी ॥ १३० ॥
श्रीराम दंडकारण्या आला । तेणे विराध मारिला ।
तुझा प्रताप जाणोनि भला । असे राहिला भेटीसी ॥ ३१ ॥
श्रीरामाच्या भेटीपुढें । सत्यलोक तें बापुडें ।
ऐसे ज्ञान त्यासी धडफुडें । भेटीचे चाडें तिष्ठत ॥ ३२ ॥
मज सुखी केले राक्षसासी । तैसेचि सुखी करीं शरभंगासी ।
विराधें सांगोनि श्रीरामासी । पुढती तिघांसी वंदिलें ॥ ३३ ॥
मग बैसोनि विमानीं । प्रवेशला निजान्मभुवनीं ।
श्रीरामचरित्र देखोनी । विस्मित मनीं सुरवर ॥ ३४ ॥
मग करिती जयजयकार । वर्षती सुमनांचे संभार ।
विराध वधोनि दुर्धर । श्रीरामचंद्र निजविजयी ॥ ३५ ॥
विराधाचें घोर वन । तेथें रिघों शके कोण ।
तोही तारिला विंधोनि बाण । कृपाळु पूर्ण श्रीराम ॥ ३६ ॥
एकाजनार्दना शरण । जालें विराधउद्धरण ।
पुढें शरभंगाचें दर्शन । कथा पावन अवधारा ॥ ३७ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
। विराधवधो नाम द्वितीयोSध्यायः ॥ २ ॥
॥ ओंव्या १३७ ॥ श्लोक १४ ॥ एवं १५१ ॥