अरण्यकाण्ड
अध्याय 1
श्रीरामांचे दंडकारण्यात गमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकं अक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ १ ॥
कुजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम् ।
आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलम् ॥ २ ॥
श्रीरामनाम महिमा :
श्रीराम चूतवृक्ष प्रबळ । त्यावरी वाल्मीक कवि कोकिळ ।
नारदवसंतें फुटली कीळ । मधुराक्षरी सरळ आलापु केला ॥ १ ॥
त्या मधुराक्षरांमाजी मधुर । श्रीरामनाम हें सुखसार ।
सुखी केले चराचर । सुखें शंकर डुल्लत ॥ २ ॥
उफराटें राम ये अक्षरी । मरा मरा या उत्तरीं ।
नारद वाल्मीका उपदेश करी । दों अक्षरीं उद्धरला ॥ ३ ॥
नाम शुद्ध हो अथवा अशुद्ध । जो जपे तो पावन शुद्ध ।
श्रीरामनाम जगद्वंद्य । परमानंद हरिनामें ॥ ४ ॥
चोरटा वाल्मीक तरे संसारीं । हेही नामाची कोण थोरी ।
नाम पावन जगदुद्धारी । नाम उद्धरी महापातक्यां ॥ ५ ॥
इतर कवी गज गजरी । वाल्मीक कवि वनगजकेसरी ।
श्रीरामनामें सिंहनाद करी । रानभरी नवरसां ॥ ६ ॥
नवरसांचा रसिक । वनरंगडा रघुकुळटिळक ।
श्रीरामनामाचा एकैक श्लोक । सुखदायक नवरसां ॥ ७ ॥
हास्यादि नवरसवृत्ती । श्रीरामरसें त्यांसी सुख प्राप्ती ।
वाल्मीकनामाच्या नामोक्तीं । पावन होती कविकुळें ॥ ८ ॥
श्रीरामनामेंवीण जे तोंड । ते केवळ जाणा चर्मकुंड ।
भीतरीं जिव्हा चामखंड । कवित्वकाटें काटली ॥ ९ ॥
ऐकता कथा रामायणी । नवरसपापां होय घुणी ।
नामें उद्धरली कुंटणी । पवित्रवाणी श्रीरामनामें ॥ १० ॥
श्रीरामकथेची नव्हाळी । शिव वंदी प्रेमसमेळीं । कळा भूतळीं जगद्वंद्य ॥ ११ ॥
तें शतकोटी रामायण । येथें आकळूं शके कोण ।
तेथें अपुरतें मी दीन । कथा जनार्दन स्वये वदवी ॥ १२ ॥
भरताचे अयोध्येकडे प्रयाण :
करीतां लिंगदेहाचें मर्दन । तेंचि जन मानिती अर्दन ।
यालागीं नांवे श्रीजनार्दन । निजव्याख्यानशास्त्रार्थै ॥ १३ ॥
असो काय काय बहु शास्त्रार्थै । मुख्य श्रीरामकथा येथें ।
तेंची श्रवण मनन करावें ग्रंथे । सावध चित्तें अवधारा ॥ १४ ॥
भरत आलिया अयोध्येसी । मागें श्रीराम वनवासीं ।
काय वर्तलें एके दिवसीं । ते कथेसी अवधरा ॥ १५ ॥
प्रतियाते तु भरते वसंरामस्तपोवने ।
लक्षयामास सोव्देगास्तत्रारण्यनिवासिनः ॥ ३ ॥
राममासाद्य निरतांस्तानलक्षयदुत्सुकान् ॥ ४ ॥
भरत अयोध्ये गेलियावरी । मागें चित्रकूटवासी ऋषीश्वरीं ।
अति उद्वेगचित्तेंकरीं । परस्परीं बोलती ॥ १६ ॥
ब्राह्मणांची कुजबूज :
ते येवोनि श्रीरामाप्रती । खुणावोनियां कुजवुजती ।
तें देखोनियां श्रीरघुपती ।साशंकित चित्तीं स्वयें जाला ॥ १७ ॥
भरत आला होता सैन्येंसीं । कांही उपद्रव जाला ऋषींसीं ।
किंवा कांही मजपासी ।अधर्मासी देखिलें ॥ १८ ॥
अथवा लक्ष्मणें यासी । कांहीं दिधलें अपमानासी ।
किंवा कांही सीतेपासीं । अधर्मासी देखिलें ॥ १९ ॥
ऐसी अति चिंता श्रीरामासी । तंव तें कळों सरलें जाबाली ऋषीसी ।
तो येवोन श्रीरामापासीं । सत्वरेंसीं बोलत ॥ २० ॥
कृतांजलिरुवाचेढमृर्षिर्जाजलिकस्तदा ।
अथर्षिर्जरया वृद्धस्तपसा नियतेंद्रियः ॥ ५ ॥
चलनं तात वैदेह्यास्तपस्विषु विशेषतः ।
त्वन्निमित्तमिदं तावत्तापसान्प्रति वतर्त ॥ ६ ॥
जाबाली ऋषींकडून वृत्तांतकथन :
जाबाली ऋषि अति वृद्ध । तापसामाजी अति प्रसिद्ध ।
इंद्रियनेमीं अति अगाध । प्रज्ञाप्रबुद्ध ऋषिवर्य ॥ २१ ॥
ऐसा जो कां ऋषि जाबाली । तेणें करोनियां कृतांजळी ।
मृदु मधुर वाक्यें मंजुळी । श्रीरामाजवळी बोलत ॥ २२ ॥
श्रीरामापासोनि दुश्चरित । न घडे जागृतिस्वप्नसुषुप्तींत ।
तुझेनि नामें दुष्कृती तरत । तो तूं सांशकित कां होसी ॥ २३ ॥
तुझेनि मुखचंद्रें चंद्र निष्कळंक । त्या तुझें देखतां श्रीमुख ।
कोटिजन्मांचे हरे दुःख । परम सुख कोंदाटें ॥ २४ ॥
लक्ष्मणापासोनि अनुचित । मूर्खही सत्य न मानित ।
तुझिया भक्तापासोनि अकृत्य । न घडे निश्चित श्रीरामा ॥ २६ ॥
निजभक्ताचें अनुचित । तें तूं करिसी अति पुनीत ।
प्रल्हादें करविला पितृघात । किर्ति लोकांत अति पावन ॥ २६ ॥
प्रल्हादाचा पितृघात । वंद्य केला त्रैलोक्यात ।
जे निजमायेचा करिती अंत । ते तें अति आप्त मानिसी ॥ २७ ॥
मातृघात पितृघात । जे जे करिती तुझे भक्त ।
ते ते मानिसी परम आप्त । अति पुनीत तिहीं लोकीं ॥ २८ ॥
मातृघातकी परशुराम । पितृघातकी प्रल्हाद परम ।
या दोघांचे स्मरतां नाम । भेटे श्रीराम स्वानंदें ॥ २९ ॥
प्रल्हाद भक्तमुकुटमणी । पढविला प्रातःस्मरणीं ।
दुजा ब्रह्मचारिशिरोमणी । वेदीं पुराणीं वानिजे ॥ ३० ॥
यांहूनि सौमित्र परम भक्त । सखा आणि अति पुनीत ।
यापासोनि अनुचित । न घडे निश्चित श्रीरामा ॥ ३१ ॥
सीता तुझी धर्मपत्नी । अयोनिजा जनकनंदिनी ।
अधर्म तियेपासोनी । जागृतीं स्वप्नीं घडेना ॥ ३२ ॥
अधर्माची आशंकता । तुम्हांमाजी नाहीं श्रीरघुनाथा ।
ऋषि बोलती जे वार्ता । ते ऐक आतां सांगेन ॥ ३३ ॥
जनस्थानीं वसते जे जन । त्या तापसांचें अति कंदन ।
राक्षसीं केले अन्योन्य । तें भय संपूर्ण सांगती ऋषिवर्य ॥ ३४ ॥
त्या महाभयाची वार्ता । ऋषी शंकले तुज सांगतां ।
मजहातीं तुज श्रीरघुनाथा । तिहीं हे कथा सांगविली ॥ ३५ ॥
तापसां करीं कोण बाधु । ऐसा पुसती संबंधु ।
रावणाचा धाकटा बंधु । खर नामें अगाध राक्षस तो ॥ ३६ ॥
त्रिशिला आणि खर दूषण । हे तिघे बंधु सखे जाण ।
चवदा सहस्त्र रक्षससैन्य । जनस्थानीं बसविलें ॥ ३७ ॥
त्या राक्षसांभेणें भयभीत । तुझा आश्रम करोनि येथ ।
ऋषी राहिले समस्त । त्या राक्षसां अंत श्रीराम ॥ ३८ ॥
राक्षसांच्या युद्धाची भीती :
परी आजी आली असे नवी वार्ता । तेणें भय भारी ऋषीतें समस्तां ।
तुज सांडोनि श्रीरघुनाथा । आणिका पर्वता जाऊं पाहती ॥ ३९ ॥
राक्षस खराप्रति सांगत । श्रीरामासवें ऋषी समस्त ।
राहिले चित्रकूटांत । तो स्वयें येथ येऊं इच्छी ॥ ४० ॥
ससैन्य बंधु तिघे जण । रातोराती घाला घालून ।
मारोनि रामलक्ष्मण । सीता आपण नेऊं पाहती ॥ ४१ ॥
सन्मुख यावें तुम्हांप्रती । तंव तुम्ही परमपुरुषार्थी ।
हा धाक सदा वाहती । तुमची ख्याती कळली असे ॥ ४२ ॥
ताटका वधिली एके बाणें । सुबाहु घेतला प्राणें ।
मारीच उडविला सत्राणें । त्यासीं जुंझणें प्राणांत ॥ ४३ ॥
धनुष्यें रावणा लाविली ख्याती । तें मोडिलें घेवोनि हातीं ।
त्यासीं युद्ध न घडे निश्चितीं । निद्रिस्त रातीं मारावें ॥ ४४ ॥
हा राक्षसीं केला इत्यर्थ । तेणें ब्राह्मण चळी कांपत ।
तुझ सांगवया साशंकित । तें म्यां समस्त श्रुत केलें ॥ ४५ ॥
ऐकें श्रीरामा निश्चित । तेथें वन आहे अति गुप्त ।
धाकें ऋषी जाताती समस्त । तुम्हींही तेथें शीघ्र यावें ॥ ४६ ॥
बहुमूलफलं चित्रमविदूरादितो वनम् ।
सबांधव इतो गच्छ यदि चित्तं प्रवर्तते ॥ ७ ॥
गुप्तस्थानी जाण्याची सुचना :
निकट वन अति गहन । अतर्क्य तर्केना गुप्तस्थान ।
फळ मूळ गंगाजीवन । विश्रामस्थान वस्तीसी ॥ ४७ ॥
तेथें यावें तुम्ही तिघें जणीं । ऐसें ऋषीश्वरांचे मनीं ।
तें गुह्य बोलतां कानी । जालीं तुझ्या मनीं आशंका ॥ ४८ ॥
हात जोडोनि समस्तांसी । श्रीराम विनवी ऋषीश्वरांसी ।
सुखें असावें आश्रमासी । त्या राक्षसांसी मी जाणें ॥ ४९ ॥
संरक्षावे गोब्राह्मण । हेचि व्रत स्वधर्माचरण ।
मी श्रीराम असतां रक्षण । भय तुम्हांलागून पैं नसे ॥ ५० ॥
बाणीं भेदीन मेरुगिरी । मारीन राक्षसांच्या हारी ।
मी रघुवीर असतां सेवक घरीं । कैसियापरी भय तुम्हां ॥ ५१ ॥
ऐसें बोलता श्रीरामासी । विचार करिती अवघे ऋषी ।
तिन्ही धुरा दळबळेसीं । केंवी दोघांसी आकळती ॥ ५२ ॥
एक घेवोनि पळेल सीता । एकला उरेल श्रीराम झुंजतां ।
समस्त राक्षसांच्या घाता । कैसा साहता तो होय ॥ ५३ ॥
सुबाहु मारिला तत्वतां । तैं जवळी नव्हती सीता ।
दोघे बंधु एकात्मकता । केलें घाता सुबाहुच्या ॥ ५४ ॥
राक्षसांच्या प्रचंड सेनेपुढे तिघांचा पाड कसा लागणार :
स्त्रियेचे चिंतेकरितां । धैर्य नुरे पुरुषार्था ।
स्त्रीलोभ हृदयीं असतां । जयो सर्वथा न पाविजे ॥ ५५ ॥
तीन्ही धुरा भद्रजाती । श्रीराम झुंजेल एकला किती ।
चारी शर निरसोनि जाती । मग पळती माघारे ॥ ५६ ॥
हृदयीं स्त्रीलोभ असतां । युद्धीं नुरे एकाग्रता ।
मंत्रबीज गिळी चिंता । जयो सर्वथा न पाविजे ॥ ५७ ॥
हे तिघे वनीं गुप्त होती । मग राक्षस आम्हासीं भक्षिती ।
याची सांडोनियां संगती निघा निश्चितीं अवघेही ॥ ५८ ॥
युक्ति सांगती श्रीरामाप्रती । तुम्ही दोघे जण पुरुषार्थी ।
तरी न रहावे येथिले वस्ती । यावे निश्चितीं आम्हासवें ॥ ५९ ॥
राक्षस धर्मयुद्धी नव्हेती । छळणें पळणें त्यांची शक्ती ।
सिंतरोनियां नाना युक्तीं । मग मारिती सुरवरांतें ॥ ६० ॥
राक्षस निशाचर होती । येवोनियां रातोरातीं ।
निदसुरा तुम्हां मारिती । तुमची शक्ति ते काय ॥ ६१ ॥
ऐसें बोलतां ऋषीश्वर । राम नेदीच प्रत्युत्तर ।
ब्राह्मणांमाजी विकल्प थोर । धैर्यनिर्धार असेचिना ॥ ६१ ॥
विश्वास नाहीं ब्राह्मणांसी । माझी संगति न घडे यांसी ।
त्यागोनियां श्रीरामासी । निघाले ऋषी तत्काळ ॥ ६३ ॥
रहावया एकरात्री । धीर न धरवे ब्राह्मणांप्रती ।
त्यागोनियां श्रीरघुपती । अन्यत्रगती निघाले ॥ ६४ ॥
श्रीरामांच्या नकारामुळे ब्राह्मणांचे तेथून प्रयाण :
अधैर्ये ते कंपायमान । आज्ञा पुसती ब्राह्मण ।
श्रीरामें करोनियां नमन । म्हणे आपण सुखें जावें ॥ ६५ ॥
अविश्वासी द्विजवरें । हातीं स्त्रिया कडिये लेंकरें ।
माथां घेवोनि यज्ञपात्रें । आश्रमांतरा ऋषी गेले ॥ ६६ ॥
सचिंतेषु प्रयातेषु तपस्विषु विशेषतः ।
विवृद्धं राक्षसं दृष्ट्वा रामोSपि गमनोत्सुकः ॥ ८ ॥
लक्ष्मणोSपि प्रयातेषु तपस्विषु विशेषतः ।
न तत्रारोचयव्दासं वैदेही च सुमध्यमा ॥ ९ ॥
मग श्रीराम विचारी निजमनीं । राक्षस वाढले जनस्थानीं ।
तयांच्या बीजनिर्दळणीं । आजि येथोनि निघावें ॥ ६७ ॥
सीता म्हणे श्रीरघुनाथा । समस्त ऋषी गेले असतां ।
येथे राहणें रुचेना आता । आजचि तत्वतां निघावें ॥ ६८ ॥
मग बोलिला लक्ष्मण । ऋषीश्वर गेले भयभीतमन ।
तें भय निर्दळवाया आपण । शीघ्र प्रयाण करावें ॥ ६९ ॥
करावें राक्षसनिर्दळण । तेणें श्रीरामा उल्हास पूर्ण ।
तेणे सर्वांगा आलें स्फुरण । दंडकारण्य शोधावया ॥ ७० ॥
बाहु थरकती समूळीं । पिंजारल्या रोमाबळीं ।
करावया राक्षसांची होळी । महा आतुर्बळीं श्रीराम ॥ ७१ ॥
उल्हास श्रीरामाचे चित्ता । सौमित्रासी हौय सांगता ।
घेवोनियां आयुधां समस्तां । सहितसीता निघें वेगीं ॥ ७२ ॥
एकाजनार्दना शरण । चित्रकूटवस्ती त्यावोनि जाण ।
केलें श्रीरामे प्रयाण । दंडकारण्यप्रवेशा ॥ ७३ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
दंडकारण्यगमनं नाम प्रथमोSध्यायः ॥ १ ॥
॥ ओंव्या ७३ ॥ श्लोक ९ ॥ एवं ८२ ॥