Ramayan - Chapter 2 - Part 3 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 3

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 3

अध्याय 3

दुष्ट मंथरेचा कैकेयीवर प्रभाव

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

रामराज्याभिषेक निश्चितीमुळे इंद्रादिकास चिंता, त्या देवांची ब्रह्मदेवाला विनंती :

श्रीरामराज्यभिषिंचन । तेणें इंद्रादिकां चिंता गहन ।
समस्त देवीं मिळॊनि जाण । चतुरानन विनविला ॥१॥
देव म्हणती ब्रह्मयासी । तुझें आश्वासन आम्हांसी ।
राम अवतरला सूर्यवंशी । तो रावणासी वधील ॥२॥
सपुत्र सबंधु सप्रधान । राम करील राक्षसकंदन ।
तेणें देवांस बंधमोचन । ते मिथ्या वचन होऊ पाहे ॥३॥
सत्य करीं आपुलें वचन । आमुचें करीं बंधमोचन ।
आमचे आपत्तीचें विंदान । सावधान अवधारीं ॥४॥
इंद्र बारी चंद्र छत्रधारी । यम पाणी वाहे घरीं ।
वायु सर्वदा पूजे ओसरी । विधि तेथें दळकांडा ॥५॥
अश्विनी सूनू दोनी । तिही परिमळ द्यावे स्त्रियांलागुनी ।
विलंब होतां अर्ध क्षणीं । दासी धांवोनि धुमसिती ॥६॥
माको असे तराळी । सटवी बाळती प्रक्षाळी ।
रात्रीं जागर घाली कराळी । मेसको वळी शोभनिका ॥७॥
मैराळ देव कानडे । करिती राक्षसांच्या दाढ्याखाडें ।
आरसा न दाविती जयापुढें । तोचि रोकडे बुकाळी ॥८॥
नवग्रहांची पीडा गाढी । ते रावणें घातले बांधवडीं ।
पायीं घालोनियां बडी । पायरीबुडीं अडकविले ॥९॥
राहू केतू शनि अंगारी । त्यांची पीडा सुरासुरीं ।
रावणें करूनियां पायरी । मंचकावरी वेंधतू ॥१०॥
विघ्न राहूं न शके जयापुढें । तो गणेश होवोनि बापुडें ।
गाढवांचे कळप गाढे । चहूकडे वळीतसे ॥११॥
अग्नीस पापदा बहुवस । रावणाचें मैळे असोस ।
नानापरींचे स्पर्शदोष । धूत अहिर्निशीं धुपधुपित ॥१२॥
उदकक्रिया वरुणाहाती । व्यजनसेवा नित्य वसंती ।
निरोप सांगावया बृहस्पती । प्रजापति शांतिपाठक ॥१३॥
ऐसें आम्ही देव समस्त । रावणाचे नित्यांकित ।
लंकेसि आलिया रघुनाथ । बंधनिर्मुक्त करील ॥१४॥
राघवासी राज्याभिषिंचन । तैं त्यासी न घडे लंकागमन ।
आमचें नव्हे बंधमोचन । अति दीन वदताती ॥१५॥

विघ्न करण्यासठी ब्रह्मदेवाची विकल्पास आज्ञा :

ऐकोनि देवाची विनंती । ब्रह्मा विचारी नि्जचित्तीं ।
राज्याभिषेकासी विघ्नप्राप्ती । ते दृढयुक्ती योजिली ॥१६॥
अविद्येचा अति लाकडा । कार्यनाशासी अति नेटकां ।
विघ्न करावया रामाभिषेका । विकल्प देखा धाडिला ॥१७॥

विकल्पाच्या अडचणी :

विकल्प म्हणे ब्रह्मदेवा । पट्टाभिषेक श्रीराघवा ।
तेणे माझा कोण केवा । सर्वथा रिघावा नव्हे माझा ॥१८॥
जेथें श्रीरामाचें नाम । तें स्थान मजसी अति दुर्गम ।
रामराज्यासी विघ्न परम । तें कर्म मज ठाकेना ॥१९॥
श्रीरामाचे राज्य जेथ । विकल्प केंवी रिघे तेथ ।
श्रेष्ठा सर्वज्ञा तूं समर्थ । श्रीरामीं पुरुषार्थ न चले माझा ॥२०॥

ब्रह्मदेवाचे रहस्यकथन :

ब्रह्मा सांगे गुह्य गोष्टी । न पडोनि श्रीरामाचे दृष्टीं ।
रिघावें मंथरेचे पोटीं । विकल्पपुष्टी तीमाजी ॥२१॥
मंथरा कैकेयीची आंदणी दासी । ते दासी भरतराज्या अभिलाषी ।
ते सदा श्रीरामातें द्वेषी । सापत्‍नभावेंसी अति दृष्ट ॥२२॥
जेंथे श्रीरामाचा द्वेष । तेथें विकल्पवस्ती सावकाश ।
तीमाती करोनिया प्रवेश । करी विध्वंस अभिषेका ॥२३॥
विध्वंसोनि अभिषेकासी । राज्याभिषेक भरतासी ।
श्रीराम करावा वनवासी । या कार्यार्थासी शीघ्र करीं ॥२४॥

कलिंगणफळाच्या द्वारे मंथरेच्या शरीरात प्रवेश, विकल्पाचा तिच्यावर प्रभाव :

विकल्प म्हणे वचन सत्य । मंथरा वसे अयोध्येआंत ।
माझा प्रवेश नव्हे तेथ । केंवी कार्यार्थ साधेल ॥२५॥
ब्रह्मा सांगे विकल्पासी । नगराबाहेरवनक्रीडेसी ।
मंथरा येईल आरामासीं । तुझ्या प्रवेशासी तेथें संधी ॥२६॥
विकल्प लागे ब्रह्मयापायीं । प्रवेशेन मंथरादेहीं ।
वश्य करोन कैकेयी । तरी राज्य नाही भरतासी ॥२७॥
श्रीराम ज्येष्ठ भरत कनिष्ठ । कैसेनि घडेल राज्यपट ।
वचन न मानिती वरिष्ठ । ज्येष्ठ श्रेष्ठ निजज्ञाते ॥२८॥
ब्रह्मा म्हणे विकल्पासी । तूं सर्वज्ञ ज्ञात होसी ।
भरत पावे रघुराज्यासी । त्या वर्माची मी सांगेन ॥२९॥
दशरथें निजभाकेसीं । दोन वर दिधले कैकेयीसी ।
एकें वरें श्रीराम वनवासी । एकें भरतासी राज्यपट ॥३०॥
ऐकोनि ब्रह्मयाची गोष्टी । विकल्प बांधी शकुनगांठी ।
संचरावया मंथरेपोटी । अति संकटीं चालिला ॥३१॥
अयोध्या देखोनि रामप्रतापें । विकल्प धाकें चळीं कापें ।
तेथींचा तेथे स्वयें लपे । श्रीरामदर्पें साशंक ॥३२॥
गुप्त रहावया बुडी । लपे हिवराचिया खोडीं ।
निळीची सुनीळ झाडी । देवोनि दडी स्वयें राहे ॥३३॥
म्हणॊनि तीं झाडें जाण । अपवित्र म्हणती सज्जन ।
तें तें विकल्पाचें स्थान । विध्वंसन शुभकार्या ॥३४॥
या झाडा वेगळें काही । विकल्प स्पर्शावया ठाव नाहीं ।
यालागीं ती निंद्य पाहीं । सर्व कार्यासी अपवित्र ॥३५॥
कलिंगफळीं अपवित्र वस्ती । जे सेविती त्यां विकल्पप्राप्ती ।
मंथरेची त्या फळाची प्रीती । देखे अवसितीं आरामीं ॥३६॥
मंथरा आली आरामासी । देखोनि कलिंगफळासी ।
ते जाले अति उल्लासी । सेवावयासी सादर ॥३७॥
कलिंगफळ आवडे भारी । सेवितां अति प्रीतिकरीं ।
विकल्प संचरला भीतरीं । क्षणामाझारी व्यापिली ॥३८॥
मग विचारी हृदयांत अर्थ । पढियंतीचा सुत भरत ।
मागें अभिषेकी रघुनाथ ।
केवळ कुडा हा दशरथ । अति अनर्थ हा आम्हां ॥४०॥
राज्य आल्या श्रीरामासी । भरत होईल परदेशी ।
कैकेयी होईल कौसल्येची दासी । मग आम्हांसी सुख कैचें ॥४१॥

मंथरेचा रामाविषयी मत्सर, कुब्जा का म्हणतात ? :

ऐसी भावना भावूनी । रामराज्याचा द्वेष मनीं ।
मंथरा क्रोधाग्नि होऊनी । कैकेयीभवनीं प्रवेशलीं ॥४२॥
मंथरा सहज श्रीरामातें द्वेषी । आंगण झाडी द्वेषभावेसीं ।
पुढें असतां श्रीरामासी । रज त्यापासीं लोटिलें ॥४३॥
श्रीराम म्हणे मंथरेसी । द्वेषें वरते कां न पाहासी ।
ते तूं अधोमुखी कुब्जा होसी । श्रीरामें तिसी शापिलें ॥४४॥
त्या शापाचे प्राप्तीसीं । पावली सत्वर आघातासी ।
यालागीं कुब्जा हो तिसी । स्वभावेंसीं निजनाम ॥४५॥

रामराज्याचा आनंदसोहळा पाहून मंथरेचा थयथयाट :

रामराज्याचा सोहळा । जंव जंव मंथरा देखे डोळां ।
तंव तंव क्रोध चढे बळा । द्वेषाचा आगळा आक्रोश ॥४६॥
कैकेयीचे निजभवनीं । रामराज्याचा उल्लास मनीं ।
गुढिया तोरणें ध्वजा सुमनीं । मंथरा देखोनि अति तप्त ॥४७॥
श्रीरामराज्यें उल्लासोनी । कैकेयी अलंकारभूषणीं ।
पर्यंकी विश्रांत ओटांगणी । दोघी जणी विडिया देती ॥४८॥
एकी घालिती विंजवणारा । तंव तेथें आली मंथरा ।
क्रोधें नेत्रे भोवंडी गरगरां द्वेषें थरथरां कांपत ॥४९॥

मंथरोवाच –
उत्तिष्ठ मूढे किं शेषे सौभाग्यबलगर्विते ।
उपप्लुतमद्यौघेन नात्मानमवबुध्यसे ॥१॥
अनिष्टे सुभगाकारे सौभाग्येन विकत्थसे ।
चलितं तव सौभाग्यं नद्याः स्त्रोत इवोष्णगे ॥२॥

मंथरा कैकेयीकडे जाते, क्रोधाचा अविष्कार :

मंथरा अति क्रोधेसीं । काय बोले कैकेयीसी ।
उठीं मूढे काय जिनसी । सुख मानिसी तें दुःख ॥५०॥
रामराज्याचें मानिसी सुख । गुढियातोरणें अति हरिख ।
तेंचि तुज होय महादुःख । परी तूं मूर्ख नेणसी ॥५१॥
मी रायाची पढियंती । रेणें गर्वे तुज पडली भ्रांती ।
सुभाग्य गेलें कौसल्येप्रति । ते तूं निश्चितिं नेणसी ॥ ५२ ॥
जळें केळी पोफळी वाढती । ते जळस्त्रोत आलिया मूळाप्रती ।
तेणेंचि ते वृक्ष उलथती । ते नाशस्थिति तुज आली ॥५३॥
ऐकोनि मंथरेची उग्रवाणी । कैकेयी सौभाग्यशिरोमणी ।
तिसी पुसे आश्वासोनी । क्रोध कैसेनि तुज आला ॥५४॥

कैकेय्युवाच-
कैकेयी त्वब्रवीत्कुब्जां कश्चित्क्षेमं न मंथरे ।
विषण्णवदनां हि त्वां लक्षये भृशदुःखिताम् ॥३॥

कैकेयीला आश्चर्य व जिज्ञासा :

कोणे तुज काय अपमानिलें । तुज कोणें काय गांजिलें ।
तुज कोणीं काय बोलिलें । तें मज वहिलें सांग पां ॥५५॥
तुं माझी जिवलग होसी । कधी क्रोध न देखें तुजपासी ।
क्रोध सांडावा मज सांगसी । ते तूं दुःखी होसी अति क्रोधें ॥५६॥
तुझे ठायीं चिंता दरुण । चिंतेने मुख दिसे मळिण ।
ऐसें तुज दुःख कोण । तें मज संपूर्ण सांग पा ॥५७॥
तुज कोण बोलिलें दुष्ट मात । कोणें तुजकडे उचलिला हात ।
त्याचा करीन मी घात । समूळ वृत्तांत मज सांगे ॥५८॥

मंथरा तु वचः श्रुत्वा कैकेय्या मधुराक्षरम् ।
उवाच क्रोधसंयुक्ता वाक्यं वाक्यविशारदा ॥४॥
सास्म्यगाधे भय मग्ना दुःखशोकसमन्विता ।
दह्यमानानलेनेव त्वद्धितार्थमिहागता ॥५॥

मंथरेचे रामासंबंधी द्वेषाविष्करण :

ऐकोनि कैकेयीचें वचन । मंथरा जाली क्रोधायमान ।
तुज आलें हो दारुण विघ्न । तें तूं आपण नेणसी ॥५९॥
राजा दशरथ आपण । तुज छळितो संपूर्ण ।
त्याचें तूं तेणसी लक्षण । पढियंतीपणें अति गर्वी ॥६०॥
तूं गर्वित जे राज्यवैभवेंसीं । तें राज्य राजा देतो श्रीरामासी ।
वैभव गेलें कौसल्येपासीं । तूं नेणसी मूर्खत्वें ॥६१॥
तुज आलें दुःख गहन । त्यामाजी मी अति निमग्न ।
तुझेनि दुःखें दह्यमान । तुझे मूर्खपण देखोनी॥६२॥
तुझिया वृद्धीं मी वर्धमान । तुझेनि सुखें मी सुखसंपन्न ।
तुझेनि दुःखे दुःखायमान । तुझेनि जाण अति संतप्त ॥६३॥
राजा वैभवलोभें तुजशीं । तेणेंचि रायें तूं ठकिजेसी ।
भरत दवडोनि मातुळासी । मागें रामासी राज्यपट ॥६४॥
राज्य दिधलिया श्रीरामासी । दास्यभोग तो भरतासी ।
सत्तासामर्थ्य कौसल्येसी । तूं श्लाघसी मूर्खत्वें ॥६५॥
तूं माझे वाक्य विवेकें विवरीं । होई भरतासी साहाकारी ।
आपले हित आपण करीं । गर्वावारी ठकूं नको ॥६६॥

भरतराज्यभिषेकाबद्दल कैकयीस परमानंद :

ऐकोनि मंथरेचें वचन । कैकेयी झाली सुखसंप्पन्न ।
रत्‍नखचित कंठाभरण । दिधलें दान मंथरेसी ॥६७॥
कंठींचें पदक अमोलिक । मंथरेसी देवोनियां देख ।
रामराज्याचें सर्वासी सुख । तूंचि कां दुःख मानिसी ॥६८॥

रामे वा भरते वाहं विशेषं नोपलक्षये ।
तस्मातुष्टास्मि यद् राजा रामं राज्योभिषेक्ष्यति ॥६॥

भरताहुनियां अधिक । राम प्रिय मज आत्यंतिक ।
तूं मूर्खत्वें मानसी दुःख । मज महासुख रामराज्यें ॥६९॥
भरत इष्ट राम अनिष्ट । ऐंसे मानिती ते महापापिष्ठ ।
राम ज्येष्ठां अति श्रेष्ठ । राज्याभीष्ट श्रीराम ॥७०॥
जैसा भरत तैसाचि राम । मज तंव दोन्ही समसमान ।
कुब्जे तूं का मानिसी विषम । मूर्ख परम तूं एकी ॥७१॥

मंथरा कैकयीचा संवाद :

ऐकोनि कैकेयीचें वचन । कुब्जा क्रोधे मुर्च्छापन्न ।
कंठीचें काढोनि आभरण । दिधलें टाकोन अति रागें ॥७२॥
राज्य गेले श्रीरामासी । वैभव गेले कौसल्येसी ।
ठकिलें दशरथें तुजसी । सुख मानिसी मूर्खत्वें ॥७३॥
कुब्जा अति क्रोधे बोलत । कएकेयी तीतें संबोधित ।
राम रायाचा ज्येष्ठ सुत । अधिकार प्राप्त राज्याचा ॥७४॥
राम गुणी गुणगंभीर । त्रैलोक्यामाजी महाशूर ।
त्यासी राज्याच अधिकार । तूं पामर रामद्वेषी ॥७५॥
राम भरतासी करील वोखटें । हें तंव काळ्त्रय़ीं न घटे ।
कुब्जे बोलसी तितुके खोटें । श्रीराम तूं हट्टें द्वेषिसी ॥७६॥
ऐकोनि कैकेयीची गोष्टी । कुब्जा रागें कपाळ पिटी ।
तूं एक मूढ या सृष्टीं । राम राज्यपटीं बैसविसि ॥७७॥
कैकेयी नायके आपुले बोला । ऐसा मंथरेने निश्चय केला ।
तुणें दुःख न देखवे मजला । प्राण आपुला मी त्यागीन ॥७८॥
म्हणोनि गडबडां लोळे । केश सुटले मोकळे ।
कैकयी उठोवोनि तये वेळे । भावबळें आलिंगी ॥७९॥
क्षेम देतां नवलपरी । विकल्प् होत मंथेरेउदरीं ।
तो रिघाला कैकेयीमझारीं । क्षणाभीतरीं अति वेगें ॥८०॥
हृदया हृदय लागता देख । दोहीं ठायीं विकल्प् एक ।
वाढिन्नला आत्यंतिक । रामाभिषेकद्रुढद्वेषी ॥८१॥
मंथरा बोले कैकेयीप्रती । रामराज्य तुज अपघाती ।
तें तू न मानसी चित्तीं । म्यां तुज किती शिकवावें ॥८२॥
दास दासी तुज अनेक । परी ते दशरथी सेवक ।
तुज आत्पत्वे मीच एक । मजही मूर्ख तूं म्हणसी ॥८३॥

सापत्‍नभावाचे शब्दचित्र :

सांपत्‍न ते केवळ शत्रु । तूं हा न मानसी माझा मंत्रू ।
येचविषयीं शास्त्रविचारू । पूर्वापारूं सांगेन ॥८४॥
कश्यपापासूनि संभूत । सापत्‍नबंधु देवदैत्य ।
ते येरयेरांचा करिती घात । पुराणार्थ गर्जती ॥८५॥
येची अर्थीं वेदोक्ती । याज्ञवल्की महामूर्ती ।
बोलिला उपनिषदाप्रती । ते प्रचीति अवधारीं ॥८६॥

देवासुरविमर्दाश्च श्नुता बहुविधा त्वया ।
स्वार्थास्वार्थं स्वमुद्दिश्य भ्रात्रा भ्राता बहिष्कृतः ॥७॥
भ्रातृणां एकजातानां एकद्रव्याभिलाषिणाम् ।
पिशुनानां न पश्यामि सौभ्रात्रं क्वचिदप्यहम् ॥८॥

एवं वेदशास्त्रविचारीं । सापत्‍न ते मुख्य वैरी ।
तुवांही पुराण परिसिलें घरीं । तें तुज गर्वैकरीं नाठवे ॥८७॥
देव आपले स्वार्थसिद्धीं । दैत्यांतें मारिती महायुद्धीं ।
दैत्य आपले हितावबोधीं । देवां ग्रासूं पाहती ॥८८॥
पाहें पां श्वानचियेपरी । भांडूं लागती एकाहारी ।
तैसा कलहो राजपुत्रीं । कैंची मैत्री सापत्‍नीं ॥८९॥

इंद्राचे दितीशी कपटवर्तन :

दिति देवांची सापत्‍नमाता । तिसी गरोदर असतां ।
तिच्या गर्भाच्या करावया घाता । इंद्र विनीत सेवा करी ॥९०॥
पाहोनियां विषम संधी । इंद्र तिचा गर्भ वधी ।
वज्रें सप्तसप्तधा छेदी । केले विशुद्ध मरुद्रण ॥९१॥
यालागीं सापत्‍नांसी थोर । स्वभावें सदा नित्य वैर ।
हा नेणसी तू विचार । मजचि पामर तू म्हणसी । ॥९२॥

कैकेयीवर झालेला विपरीत परिणाम :

ऐकोनि मंथरेचिया बोला । कैकेयीसी उल्लास जाला ।
राज्याभिषेक नव्हे भला । श्रीरामीं धरिला दृढ द्वेष ॥९३॥
राम ज्येष्ठ भरत कनिष्ठ । कनिष्ठासी राज्यपट ।
वचन न मानीं हें स्वयें वसिष्ठ । तोही अति श्रेष्ठ निजज्ञानें ॥९४॥
जरी म्यां राजा वश्य केला । तरी वसिष्ठ नायके माझ्या बोला ।
कनिष्ठा राज्यापट वाहिला । नाहीं बोलिला शास्त्रार्थैं ॥९५॥
वसुष्ठ सांगेल शास्त्रार्थ । तेथें काय करील दशरथ ।
अटक पडलिया वेदोक्त । राज्य भरत केंवी पावे ॥९६॥

मंथरेने सुचविलेली युक्ती :

मंथरा सांगे कैकेयीसी । जरी तूं माझा बोल करिसी ।
राज्य साधीन भरतासी । क्षणार्धेसीं मी एक ॥९७॥
कैकेयी बोले पुढती । कोणे युक्तीं राज्य भरतीं ।
साधिसील ते उपप्पती । यथानिगुतीं । मज सांगे ॥९८॥
वसिष्ठवामदेवादि ॠषी । राज्या मानितील भरतासी ।
ते तुज युक्ती आही कैसी । यथार्थेंसईं मज सांगे ॥९९॥

पूर्वीच्या दोन वरांची आठवण :

मंथरा बोले आपण । तुझी तुज नाहीं आठवण ।
रायें करूनि भाषप्रमाण । दोन वर पूर्ण दिधले ॥१००॥
ते दोन वर रायापसीं । मागावे ये संधीसीं ।
एकें राम वनवासी । एकें भरतासी राज्यपद ॥१०१॥
पूर्वदत्त मागतां आम्हासीं । कांही न बोलवे वसिष्ठासि ।
नेदीं न म्हणवे दशरथासी । नजभाकेसी गुंतला ॥२॥
ऐकोनि मंथरेचें वचन । कैकेयीसी विस्मय पूर्ण ।
कुब्जे तुं तंव अति सज्ञान । वरद स्फुरण तुज आलें ॥३॥
मज रायाचें वरदान । परी माझी मज नाहीं आठवण ।
त्याचें समयीं स्फुरलें ज्ञान । अति सज्ञान तूं कुब्जे ॥४॥
मंथरा म्हणे कैकेयीसी । तुझेनि विजयो दशरथासी ।
हात घातला रथांकासी । केंवी दुःखासी साहवलें ॥५॥
संग्रामीं रथचक्राच लोट । तुझा बाहू व्हावा पीठ ।
कैसेनि धरवला नेट । तें मज स्पष्ट सांगा पां ॥६॥

कैकेयीला बालवयात अवमानित ऋषिकडून शाप व उःशाप :

ऐकतां मंथरेचा प्रश्न । कैकेयी उल्लासे संपूर्ण ।
सांगे ऋषीचें शापवचन । आणि वरदान तयाचें ॥७॥
पितृगृहीं मज बाळपण । तेथें आला ॠषि सज्ञान ।
कुशासन कुशावरण । आणि आभरण कुशांचें ॥८॥
दृद्ध जटिल रोमांचित । म्यां तेथें केलें वो अनुचित ।
वाकुल्या दाविल्या अति निंदित । तरी क्षमायुक्त महाऋषि ॥९॥
उगें देखोनियां ऋषींसीं । म्यां त्यचिये नाकीं लाविली मसी ।
क्षोम पावोनियां तापसी । अति आवेशीं शापिलें ॥११०॥
नानापरी तूं मज निंदिसी । ते तूं जगी निंद्य होसी ।
उश्शाप मागावया त्यासी । बाळभावेंसीं मि नेणें ॥११॥
मसी लाविली माझे तोंडी । ते तूं जगीं होसील काळतोंडी ।
अपेशाची उभवोनि गुढी । निंद्यत्वें रोकडी नादशील ॥१२॥
देवपूजा विसरला शोभोक्तीं । ते म्यां दिधली त्याचे हाती ।
तेणें वदला तो वरदोक्ती । ऐक तुजप्रती सांगते ॥१३॥
येणेंचि हातें भ्रतारासी । संग्रामी तूं साह्त होसी ।
वररद्वय पतिपासीं । तूं पावसी राजबळें ॥१४॥
रथचक्री तुझा हात । संग्रामीं न होईल व्यथाभूत ।
होईल विजयी तुझा कांत । ऐसा वरदार्थ वदला ऋषी ॥१५॥
याउपरी मज आता । पुढे काय कर्तव्यता ।
मंथरे सांगसी ज्या ज्या अर्था । तो तो सत्वतां मी करीन ॥१६॥

कुब्जेकडून कैकेयीला शिकवण :

ऐकोनि कैकेयीचे बोल । कुब्जा विचार सांगे सखोल ।
तुवाम् कोप करावा प्रबळ । मुख्यत्वें केवळ रायावरी ॥१७॥
सांडोनियां दिव्याभरणासी । मुक्तकेश मळिणवासी ।
तुवां रिघावें प्रायोपवेशीं । वरद्वयासी मागावया ॥१८॥
राजा येईल तुजपासीं । मुख न दाखवावें तयासी ।
काहीं न बोलावे तयासीं । अति निश्चयेंसीं क्षोभवावें ॥१९॥
राजा देईल सुवर्णमेरू । अथवा रत्‍नांचा सागरू ।
तें तूं न करींच अंगीकारूं । वरदविचारू सांडोनी ॥१२०॥
राज्यपट द्यावा भरता । वनवास द्यावा श्रीरघुनाथा ।
त्याही वनवासाची कथा । ऐक आता सांगेन ॥२१॥
अयोध्येनिकट वनाआंत । वनवासी जलिया रघुनाथ ।
प्रजा समस्त जातील तेथ । उद्वसीं भरत केवीं राजा ॥२२॥
राम अति प्रिय प्रजांसी । राम आवडे प्रधानांसी ।
अवघे जातील तयापासीं । मग भरतासी राज्य कैचें ॥२३॥
दंडकारण्य दूर देशीं । गंगातीरीं राम वनवासी ।
श्रीरामाची वार्ता अयोध्येसी । कदाकाळेंसी न यावी ॥२४॥
अयोध्येची कथावार्ता । रामें नायकावी सर्वथा ।
ऐसें जालिया तत्वतां । राज्य भरता भोगेल ॥२५॥

मंथरेला इनाम :

ऐकोनि मंथरेची युक्ती । उल्लास कैकेयीच्या चित्तीं ।
आलिंगली दोहीं हातीं । अति प्रीतीं सद्‌भावे ॥२६॥
रागें सांडिलें होतें पदक । तें स्वयें लेवविलें देख ।
कानींची कुंडले अमोलिक । दिधलीं आवश्यक अति प्रीतीं ॥२७॥
भरता अभिषेकिलियापाठीं । सुवर्णे मढीन तुझी पृष्ठी ।
रत्‍नखचित टिळक ललाटीं । घालीन कंठीं मुक्तामाळा ॥२८॥

कैकेयीचा क्रोधागारात प्रवेश :

अनुमोदूनि मंथरेसी । कैकेयी निघाली प्रायोपवेशीं ।
सांडोनि अलंकारवस्त्रांसी । मळिणवासासीं भूमिशय्या ॥२९॥
आता येवोनि दशरथ । पुसेल कैकेयीचा स्वार्थ ।
वना निघेल रघुनाथ । तोही कथार्थ अवधारा ॥३०॥
एकाजनार्दना शरण । देवकार्यार्थ संपूर्ण ।
वना निघेल रघुनंदन । दशवदनवधार्थ ॥१३१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकाया
कैकेय्या मंथरोपदेशो नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
॥ ओंव्या १३१ ॥ श्लोक ८ ॥ एवं १३९ ॥