Ramayan - Chapter 1 - Part 27 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 27

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 27

अध्याय 27

श्रीरामजानकी अयोध्याप्रवेश

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांनी विष्णुचाप वरुणास दिले :

परशुराम गेला स्वस्थाना । स्वस्थता दशरथाचे मना ।
आनंद वाढला चौगुना । रघुनाथ जाणा निजविजयी ॥ १ ॥
सांडोनि वैष्णवचापासी । भार्गव गेला स्वाश्रमासी ।
धनुष्य दिधलें श्रीरामासी । तेणें वरुणासी तेंदिधलें ॥ २ ॥
मी आपुलिया निजात्मशक्तीं । रणीं जिंकोनि राक्षसपंक्ती ।
वैष्णवचाप हें असतां हातीं । लोक म्हणती धनुष्यबळ ॥ ३ ॥
माझ्या यशाची निजपुष्टीं । अवघी जाईल धनुष्यासाठीं ।
यालागीं तें उठाउठीं । राम जगजेठी स्वयें त्यागी ॥ ४ ॥
स्वसामर्थ्य नाहीं ज्यासी । धनुष्य यश केंवी होईल त्यासी ।
यालागीं श्रीराम नव्हें अभिलाषी । म्हणोनि वरुणासी दिधलें ॥ ५ ॥

अयोध्येत प्रवेश, प्रजाजनांकडून सत्कार :

अयोध्येत प्रवेशावया सत्वर । उल्लास करी नृपवर ।
आनंदें गर्जती गजभार । सैन्यसंभार आल्हादी ॥ ६ ॥
निशाण भेरी मृदंग शंख । ढोल चौडकी काहळा अनेक ।
जयजयकारें सकळिक । नगरान्मुख निघाले ॥ ७ ॥
ऋषी पढती शांतिपाठ । ब्रींदे गर्जताती भाट ।
सिंहनाद करिती वीर वाट । घडघडाट रथांचा ॥ ८ ॥
वसिष्ठें दूर धाडिले पुढें । नगर शृगारावया वाडेंकोडें ।
रंगमाळा कुंकुमसडे । मखरें तोरणें ठायीं ठायीं ॥ ९ ॥
गुढिया उभविल्या घरोघरीं । पताका झळकती अंबरीं ।
दिव्यभूषणें दिव्यांबरीं । नरनारी शोभती ॥ १० ॥
कुंकुम केशर सौमनमाळा । कंठीं रत्नशपदक रत्नंमेखळा ।
नवरत्न हार ऋळे गळां । जनलीला शोभत ॥ ११ ॥
पूर्णकशश द्वारोद्वारीं । दधि दूर्वा सुमनें त्यांभीतरीं ।
प्रदीप्त दीप ठेविले हारीं । घरोघरी आल्हाद ॥ १२ ॥
राजगृहीं अति उत्सावो । गुढिया मखरें उभविती पाहो ।
विजयी जाला श्रीरामराओ । आजानुबाहू प्रतापी ॥ १३ ॥
श्रीरामें शिवचाप भंगुनी । परशुरामाते जिंकोनी ।
सीता आणिली पर्णोनी । जनवदनीं हे वार्ता ॥ १४ ॥
एक म्हणती गुरूच्या यागीं । राक्षस मारिले रनांगणी ।
सुबाहु छेदिला सर्वांगीं । मारीचालागीं घाय केलें ॥ १५ ॥
आणिक म्हणती दुष्ट ताटिका । नित्य पीडीतसे लोकां अनेकां ।
श्रीरामें देखतांचि देखा । बाणें एका निवटिली ॥ १६ ॥
एक म्हणती श्रीरामें अवलीळा । चरणें उद्धरिली अहल्या शिळा ।
श्रीराम परब्रह्मपुतळा । सच्चित्कळा साचार ॥ १७ ॥
साकार आणि निराकार । स्वयें श्रीराम चिन्मात्र ।
चन्य चन्य लोकांचे नेत्र । श्रीरामवक्त्र देखती ॥ १८ ॥
देखतां श्रीरामाचें मुख । निःशेष जाय तहान भूक ।
परमानंदे कोंदाटे सुख । हरिख ओसंडे ॥ १९ ॥
ऐसी श्रीरामाची कीर्ती । घरोघरीं अनुवादती ।
आला ऐकोनि रघुपती । सामोरे येती नगरस्थ ॥ २० ॥
छत्रचामरें गजभारें । वाजती नानाविध तुरें ।
शोभायमान चारी वोहरें । आला गजरें रघुवीर ॥ २१ ॥
चारी पुत्र चारी सुना । देखतां धणी न पुरे मना ।
पाहतां पारणें होतसे नयनां । भाग्यभावना दशरथा ॥ २२ ॥
श्रावणपितयाचा शाप । दशरथासी सुखस्वरूप ।
पुत्र पावला सद्‌रूप । चित्स्वरूप श्रीराम ॥ २३ ॥
जैसा मातेचा निजकोप । वरी कठिण आंत सुखरूप ।
तैसा ब्राह्मणाचा शाप । शापें निष्पाप सुख देत ॥ २४ ॥
श्रावणपितयाचिया शापासाठीं । दशरथा श्रीरामभेटी ।
भोगेत आनंदाच्या कोटी । सभाग्य सृष्टीं दशरथ ॥ २५ ॥

श्रीरामदर्शनार्थ सर्वांची स्पर्धा :

नगरी प्रवेशे रघुपती । चारी मुक्ती पुढे नाचती ।
पायघडियांचे गर्तीं । पायीं लोळती पुरुषार्थ ॥ २६ ॥
अनुहताचिया संगती । नानाविधें तुरें वाजती ।
नादें कोंदाटे चिच्छक्ती । नभस्थिती चिन्मात्र ॥ २७ ॥
श्रीराम पहावया प्रेम पडिभरीं । एक चढली परेच्या उपरी ।
एक चढोनियां गोपुरीं । एक जनांभीतरीं राप पहाती ॥ २८ ॥
एक सलज्ज एकांतीं । गवाक्षरें राम पहाती ।
एक एकातें धरोनि हातीं । राम दाविती अनुलक्षीं ॥ २९ ॥
हा नव्हे तो नव्हे पैल तो तो । ऐसें देखणे जो दावितो ।
तोचि अनुभवएका होतो । पाहणें पाहवितो श्रीराम ॥ ३० ॥
एक चढोनि जीवाचे माथां । सादरें पाहती श्रीरघुनाथा ।
एक सांडोनि जीवभावता । श्रीरघुनाथा भेटती ॥ ३१ ॥
नावडे जीवशिवसाम्गात । एकाकी एकपणाआंत ।
परपूर्ण पाहती रघुनाथ । आल्हादयुक्त स्वानंदें ॥ ३२ ॥
एक प्रेमाचेनि पडिपाडें । आनंदें नाचती रामापुढें ।
एक ते अत्यंत निधडे । पाहाती चहूंकडे श्रीराम ॥ ३३ ॥
एकातें श्रीराम सांगाती । एकासी श्रीराम नित्यगती ।
एक श्रीरामाच्या निजस्थितीं । स्वयें वर्तती सर्वदा ॥ ३४ ॥
एक निःसंग निश्चितीं । लोकाचिये लोकस्थिती ।
स्वये श्रीराम पाहती । आशंकावृत्ती त्यां नाही ॥ ३५ ॥
एकाची नवलनवाई । गजबजेंसी भिणें नाहीं ।
श्रीराम पाहती ठायीं ठायीं । आडवें कांहीं येवों न शके ॥ ३६ ॥
ऐसिया लोकांचिया पंक्ती । श्रीरामासी पाहूं येती ।
मंडपघसनी जनासी होती । श्रीराममूर्ती पहावया ॥ ३७ ॥
पायघड्या पदवाहणें । दीपावळी नीरांजनें ।
ओवाळिती धनधान्यें । राम पहावया उल्लास जनासी ॥ ३८ ॥
श्रीराम जातां निजनगतीं । पाहों न येती अग्निहोत्री ।
पाहतां विटाळ होईल भारी । तंव राम दुरी अंतरला ॥ ३९ ॥
श्रेत्री स्वयंपाकी केवळ । श्रीराम पाहतां होय विटाळ ।
आधणीं टाकावया तांदूळ । चाटू तत्काळ विसरले ॥ ४० ॥
ऐशिया विटाळाची परी । श्रीराम अंतरला दुरीच्या दुरी ।
धुपधुपित पाकाभीतरीं । कर्मअमहंकारीं गुंतले ॥ ४१ ॥
आम्ही उत्तम आश्रमवासी । श्रीराम जातो जनप्रदेशीं ।
पाहतां स्पर्श होईल आम्हांसी । दुरून संन्यासी पाहूं म्हणती ॥ ४२ ॥
विटाळ भेणें दुरूनि पाहतां । श्रीराम न दिसे सर्वथा ।
आश्रमाभिमाने पाहूं जातां । राम तत्वतां लक्षेना ॥ ४३ ॥
अनुलक्षोनि श्रीरामासी । पिंगळा वेश्या धांवे उल्लासीं ।
मार्गीं झगटली सन्याशासी । हें लक्ष तिसी असेना ॥ ४४ ॥
मज कां झगटली हे रांड । रागें सम्न्यासी ठोकी दंड ।
येरी पाहतां श्रीरामाचें तोंड । दंडे उदंड सुखी जाली ॥ ४५ ॥
स्वामी तुमच्या दंडाचा घाव । तेणें दंडिला माझा अहंभाव ।
तों दंडीना तुम्हांसी पाहाहो । पाहतां रामराव विटाळ देखा ॥ ४६ ॥
श्रीराम पहतां विटाळ उडे । तो विटाळ संन्याशामाजी दडे ।
म्हणोनि विटाळाचें सांकडें । संन्याशाकडे सर्वदा ॥ ४७ ॥
श्रीराम पाहतां विकल्पविटाळ । भक्तभावीं न राहे तीळ ।
तो सद्‌गंध संन्याशामाजी सळ । आश्रमीं केवळ राहिला ॥ ४८ ॥
मी आत्मा सर्वांभूतीं परिपूर्ण । ऐसें भूतां देवोनि अभयदान ।
स्वयें केलें संन्यासग्रहण । तोचि आपण विटाळ देखे ॥ ४९ ॥
श्रोत्री स्वयंपाकी संन्यासी । हे निजमाहेर विटाळासी ।
त्यांमाजी तो सदा मुसमुसी । देखती जगासी अपवित्र ॥ ५० ॥
ऐसी विवादतां वेश्या संन्याशासीं । श्रीराम गेला स्वयें स्वाश्रमासी ।
संन्यासी करितां मृत्तिकास्नानासी । आली हातासी मृत्तिका ॥ ५१ ॥
मी पवित्र जग अपवित्र । हें स्वयंपाकाचें मुख्य सूत्र ।
तेणें विटाळे श्रीरामचम्द्र । दुरी दुरतर अंतरला ॥ ५२ ॥
वर्णाभिमान स्वाश्रमाभिमान । कर्माभिमान धर्माभिमान ।
न वंचितां सर्वाभिमान । रघुनंदन भेटेना ॥ ५३ ॥
वेश्या बोलतां सद्युक्तीसी । पिंगळा वेश्या कोण म्हणसी ।
जे अवधूतें चोविसां गुरुंसी । यदूपासीं सांगितली ॥ ५४ ॥
श्रीराम पावला राजभवन । शांति येवोनि आपण ।
जीवभावाचें निंबलोण । सांडी ओंवाळून वोहरांसी ॥ ५५ ॥

श्रीरामाचे राजप्रासादात आगमन :

चारी पुत्र सुना चारी । वसिष्ठें धरोनियां करीं ।
प्रवेशला राज मंदिरीं । उल्लास भारी राणिवसां ॥ ५६ ॥
वाजती मधुर मंगळतुरें । द्विज गर्जती जयजयकारें ।
वोहरें देखोनि मनोहरें । राण्याआदरें पाहों आल्या ॥ ५७ ॥
पहिलें कौसल्येसी नमन । चारी सुना अंकी वाहून ।
फरा कंकण । पदकभूषण । दे आपण स्वानंदें ॥ ५८ ॥
लागतां सुमित्रेच्या चरणां । अति हरिखें आलिंगी चारी सुना ।
कटिमेखळा करकंकणा । दे आपण स्वानंदें ॥ ५९ ॥
कैकयीसी करितां नमन । चहूं सुनांसी दे चुंबन ।
तांत आपुल्या दोघी सुना जाण । त्यासी घाली आपण सुमनमाळा ॥ ६० ॥
आणखी राणिवसांच्या नारी । वोहरें आलिंगती प्रीतीकरीं ।
ओवाळिती नानापरी । आल्हाद भारी राणिवसां ॥ ६१ ॥
करावया गृहप्रवेशासी । कृत्रिम लक्ष्मी भाणवसीं ।
देखोनि श्रीरामसामर्थ्यासी । लक्ष्मीं पूर्णांशेसीं प्रकटली तेथें ॥ ६२ ॥
कृत्रिम लक्ष्मीचें अंतर । तेथें प्रवेशली लक्ष्मी साचार ।
तिणें तिचें रूप मनोहर । अति सुम्दर आभासे ॥ ६३ ॥
सीता आणिली धनुर्भंगेसीं । दुसरी सीता कैंची भाणवसी ।
हे आश्चर्य ज्यात्यासीं ऋषिही मनासीं विस्मित ॥ ६४ ॥
ते देखतां लक्ष्मीयेसी । सीता साशंकित मानसीं ।
हे स्त्री असतां गृहवासी । रामे कां मज सीतेसी पर्णिले ॥ ६५ ॥
आम्ही दोघी स्त्रिया असतां । केंवी एकपत्नी्त्व रघुनाथा ।
असो हे एकपत्नीात्व कथा । सवती तत्वतां मज जाली ॥ ६६ ॥
सवती ओढवली कपाळासी । म्हणोनि क्षोभें पाहतां तिसी ।
लक्ष्मी लागली पायांसी । मी तुझी दासी जानकीये ॥ ६७ ॥
प्रेमें देतां आलिंगन । दोहींचें मोडले दोनपण ।
दोहीं ठायीं एकत्व पूर्ण । आपणा आपण देखती ॥ ६८ ॥
लक्ष्मी तेचि सीता आपण । सीता तेचि लक्ष्मी जाण ।
श्रीरामाचें एकपत्नी्पण । सीतेसी पूर्ण कळो सरलें ॥ ६९ ॥
सीतालक्ष्मीचें एकपण । त्यादोघी जाणती आपण ।
हें ब्रह्मादिकाम् न कळे विंदान । कीं जाणे पूर्ण वसिष्ठ ॥ ७० ॥

लक्ष्मीपूजन, आपल्या पत्नी्सह चारही बंधू दशरथ व वसिष्ठाचे सेवेस तत्पर :

शुद्ध विद्या जोडली शस्त्रास्त्रीं । स्त्रिया आणिल्या अति गजरीं ।
कीर्तिं फार जाली लोकांतरीं । येवढी सामग्री श्रीरामा ॥ ७२ ॥
तेही चौघे बंधु चौघी स्त्रियांसी । दशरथाचे सेवेंसीं ।
सावधान अहर्निशीं । वसिष्ठापासीं किंकरत्वें ॥ ७३ ॥
त्यांमाजी श्रीराम जाण । वसिष्ठासी प्रिय संपूर्ण ।
तो दशरथाचा जीवप्राण । आवडे संपूर्ण सर्वांसी ॥ ७४ ॥
राम आवडे सर्व भूतां । रामेम् सर्वांसी सुखरूपता ।
तोही वसिष्ठाच्या वचनार्था । होय वंदता किंकरत्वे ॥ ७५ ॥
गुरुमहिमा अति थोर । तो संरक्षी रामचम्द्र ।
लोकसंग्रहणार्थ साचार । दावी विचार भजनाचा ॥ ७६ ॥

श्रीराम-सीता यांचे परस्पर प्रेम :

श्रीरामाच्या मनोगता । अनुकूल वर्ते सीता ।
सीतेचिया मनोरथा । परिपूर्णता श्रीरामें ॥ ७७ ॥
सीतेचा भाव श्रीरामीं पूर्ण । राम सीतेसीं संपूर्ण ।
सीता रामें सुखसंपन्न । सुखी रघुनंदन सीतेचेनि ॥ ७८ ॥
रामरसें रसज्ञ सीता । सीतेच्या रसने श्रीराम भोक्ता ।
श्रीराम देखणें सीता डोळसता । तिचेनि देखता श्रीराम ॥ ७९ ॥
श्रीरामें सीता सुंदर पूर्ण । सीतेने राम शोभे सगुण ।
श्रीरामें सीता सुलक्षण । सीतेचेनि लक्ष्यलक्षण श्रीरामा ॥ ८० ॥
श्रीराम सीतेचा निजभोग । सीतेचेनि श्रीराम सुरंग ।
श्रीराम सीता शोभे सांग । सीता सर्वांग श्रीराम ॥ ८१ ॥
सीता रस श्रीराम स्वाद ।सीता सुमन श्रीराम सुगंध ।
सीता बुद्धि श्रीराम बोध । अनन्यसिद्धि येरयेरां ॥ ८२ ॥
सीता वचन श्रीराम वचनार्थ । सीता पद श्रीराम पदार्थ ।
सीता मुक्ति श्रीराम मुक्त्यर्थ । परम स्वार्थ येरयेरां ॥ ८३ ॥
सीता जीव राम जीवन । सीता मन राम मनोज्ञ ।
सीता चित्त श्रीराम चैतन्य । आनंदघन येरयेरां ॥ ८४ ॥
सीता धरा श्रीराम धारक । सीता चालण श्रीराम चाळक ।
सीता व्याप्य श्रीराम व्यापक । सुखसंतोष येरयेरां ॥ ८५ ॥
सीता क्रिया श्रीरामकर्ता । सीता भोग्य राम भोक्ता ।
सीता ज्ञान राम ज्ञाता । एकात्मता अतिप्रीतीं ॥ ८६ ॥
सीता शर्करा राम गोडी । सीता व्यवसाय राम जोडी ।
एकात्मता अति आवडीं । न कळे फुडी श्रुतिशास्त्रां ॥ ८७ ॥
येरयेरांविण जाण । न करिती उदकपान ।
येरयेरांविण न खाती पान । प्रीती अनन्य येरयेरां ॥ ८८ ॥
येरयेरां वेगळेपन । होऊं न शकती अर्धक्षण ।
अणुमाजी दोघे जण । नांदती पूर्ण पूर्णत्वें ॥ ८९ ॥
ऐसीऐसिया अनन्यगतीं ।श्रीराम भोगी सीता सती ।
सीतेचिया निजात्मप्रीतीं । श्रीराममूर्ति उल्लासे ॥ ९० ॥
सीतेचा भावार्थ संपूर्ण । देखोनि उल्लासे रघुनंदन ।
सीता भाव धरी द्विगुण । प्रति चतुर्गुण श्रीरामीं ॥ ९१ ॥
सीता भाव धरी अधिकाधिक । तंव तंव श्रीरामीं ओसंडे सुख ।
कैसी अति प्रीति अलोलिक । एकएकां अनन्य ॥ ९२ ॥
जैसा ज्यासी श्रीरामीं भक्ती । तैसी त्यावरी रामप्रीती ।
हें बोलिलेंसे बहुतां ग्रंथीं । मीच किती अनुवादों ॥ ९३ ॥
जैसा भाव तैसी प्रीती । जैसी प्रीती तैसी प्राप्ती ।
जैसी प्राप्ती तैसी स्थिती । हाचि परमार्थीं मुख्यार्थ ॥ ९४ ॥
ग्रंथी राखोनियां गुह्यार्थ । मुख्यत्वें दावावा परमार्थ ।
हाचि कवित्वाचा निजस्वार्थ । येणें रघुनाथ संतुष्ट ॥ ९५ ॥

बालकांडाचा उपसंहार :

संतुष्ट होती श्रोते । संतुष्ट होती वक्ते ।
संतुष्ट होती कथाकर्ते । श्रीरामचरित्र रामायणन ॥ ९६ ॥
कथा परिसतां रामायण । पूर्वज उद्धरती जाण ।
पूर्वजांचें नवलाव कोण । उद्धरे संपूर्ण त्रिजगती ॥ ९७ ॥
श्रीरामकथेची नव्हाळी । हे सदाशिवाची जपमाळी ।
मणिकर्णिका अंतकाळीं । जपे कर्णमूळीं तें हें ब्रह्म ॥ ९८ ॥
सावधान करणें निजमना । तेचि मणिकर्णिका सत्य जाणा ।
आदरेम् परिसतां रामायणा । तें तारक पूर्ण परब्रह्म ॥ ९९ ॥
आदरें रामकथाश्रवण । तें तारक ब्रह्म रामायण ।
काशी मणिकर्णिका आपण । हात जोडून उभ्या तेथें ॥ १०० ॥
यालागी रामकथेपासीं । तीर्थें तिष्ठती अहर्निशींं ।
चारी मुक्ति होती दासी । कथाउल्हासी परमानंद ॥ १ ॥
कथा रामायणी अगाध । पदोपदीं परमानंदे ।
श्रवनें ओसंडे आनंद । निजात्मबोध श्रीरामें ॥ २ ॥
रामायणाच्या निजकीर्ती । सुखें शिवादिक डुल्लती ।
तेणें पावन त्रिजगती । कथाश्रवणार्तीं श्रीराम संतोषे ॥ ३ ॥
यापरी अयोध्येप्रती । सीतेचे अनन्य प्रीतीं ।
वसता झाला रघुपती । जाली समाप्ती बाळकांडा ॥ ४ ॥
वश्य करोनि वैराग्य वितंड । साधिलें ब्रह्मज्ञान अखंड ।
ऐक्या आणोनि पिंडब्रह्मांड । बाळकांड संपविले ॥ ५ ॥
साधिली शस्त्रास्त्रविद्या उदंड । गुरुयाग सिद्धी नेला प्रचंड ।
झाडोनि अहल्यापापखंड । बाळकांड संपविले ॥ ६ ॥
ताटिका सुबाहु केलीं दुखंड । राजे लाजवूनी उदंड ।
मारीचाचें ठेंचोनि तोंड । बाळकांड संपविले ॥ ७ ॥
भंगोनि शिवाचे कोदंड । सीता संशया देवोनि दंड ।
अहंरावनाचें काळें तोंड । करूनि बाळकांड संपविलें ॥ ८ ॥
परशुरामप्रताप प्रचम्ड । तो करोनि खंडविखंड ।
विष्णुचापाचें दमुनि बंड । बाळकांड संपविलें ॥ ९ ॥
यापरी संपलें बाळकांड । पुढें रामप्रताप प्रचंड ।
राक्षस वधिजेतील वितंड । ते कांडे आंड अवधारा ॥ ११० ॥
एकाजनार्दना शरण । कथा रम्य रामायण ।
जालें बाळकांड संपूर्ण । कृपा पूर्ण संतांची ॥ ११ ॥
संतकृपा परिपूर्ण । अगाध कृपा रामायण ।
तें मी वदावया अतिदीन । श्रीजनार्दन स्वयें वदवी ॥ १२ ॥
स्वयें श्रीरामचि ग्रंथ कथिता । श्रीरामचि ग्रंथकर्ता ।
श्रीराम ग्रंथ लिहविता । वननीं वदविता श्रीराम ॥ १३ ॥
एकाजनार्दना शरण । यापरी श्रीराम आपण ।
कथा करवी रामायण । केलें संपूर्ण बालकांड ॥ १४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामजानकी अयोध्याप्रवेशो नाम सप्तविंशतितोमोध्यायं ॥ २७ ॥
॥ ओंव्या ११४ ॥