Ramayan - Chapter 1 - Part 18 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 18

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 18

अध्याय 18

शिवधनुष्याचा प्रताप व सीतास्वयंवरात रावणाची फजिती

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

स्वयंवरास आलेले निमंत्रित राजे-महाराजे :

स्वयंवरसभेची स्थिती । स्वर्गीं देव विमानीं पाहती ।
शहाण्णव कुळींचे भूपती । दाटलें क्षितीं सन्मानें ॥ १ ॥
आले तपस्वी ऋषीवर । आले यक्ष गंधर्व किन्नर ।
स्वयंवरा आले निशाचर । दैत्य महावीर तेही आले ॥ २ ॥
धैर्य वीर्य महाशौर्य । रूपगुणी गुणगांभीर्य ।
धर्माधर्म अति औदार्य । ऐसे नृपवर्य येते झाले ॥ ३ ॥
जे गोब्राह्मणां साह्यार्थीं । ज्यांची यशकीर्ती महाख्याती ।
ज्यांचे पवाडे स्वर्गीं गाती । स्वयंवरार्थीं येते जाले ॥ ४ ॥
जे दान देती सर्वस्व । ज्यांची वैकुंठीं वर्णिती वाढिव ।
ज्यांचें त्रैलोक्यीं प्रसिद्ध गौरव । तेही राजे येते जाले ॥ ५ ॥
ज्यांच्या शस्त्रांचा महामार । साहों न शकती सुरासुर ।
जे दानीं नित्य तत्पर । ते नृपवर येते जाले ॥ ६ ॥
दानें दळें बळें प्रबळ । शह्हाण्णव कुळींचे भूपाळ ।
येते जाले सकळ । सीतार्थीं केवळ स्वयंवरा ॥ ७ ॥
स्वयंवरी धनुष्याचा पण । तें जनके आणावें आपण ।
ज्यासी असेल आंगवण । तो त्यासी गुण लावील ॥ ८ ॥

सभेत शिवधनुष्य आणण्याची प्रधानास आज्ञा :

ऐसें ऐकोनि रायाचें वचन । जनकें बोलाविला प्रधान ।
धनुष्य आणावें आपन । आज्ञापन स्वयें केलें ॥ ९ ॥
तंव बोलिले महाऋषी । आधीं आणावें नोवरीसीं ।
मग आणावें धनुष्यासी । वचन सर्वांसी मानलें ॥ १० ॥
सीता नाकळे कर्मबंधासी । नाहीं जन्मली गर्भवासी ।
स्रष्टा स्रजूं न शके जीसी । रामप्रभावेंसी समप्रभव ॥ ११ ॥
श्रीराम चैतन्याची कळा । चिच्छक्ति ते जनकबाळा ।
तिच्या स्वरूपाचा सोहळा । सभाग्य डोळां देखती ॥ १२ ॥

सीतेचे आगमन, तिचे महिमान, चंद्राशी तुलना :

सालंकृत गजावरी । सीता बैसली नोवरी ।
तिच्या सौंदर्याची थोरी । चराचरीं अनुपम्य ॥ १३ ॥
शून्यत्वें वाळिलें आकाश । तें शरण आलें सीतेस ।
राम वंदावया सावकाश । मस्तकीं केश तें जालें ॥ १४ ॥
शून्यत्व सांडोनि तत्काळ । जालें मस्तकीं केश कुरळ ।
तेंचि आकाश सुनीळ । जेथें चंद्रमंडळ मुखचंद्र ॥ १५ ॥
चंद्र पूर्णिमेसीच पूर्ण । मुखचंद्र सदा संपूर्ण ।
चंद्रा राहूचें पर्वीं ग्रहण । येथें नित्य ग्रहण श्रीरामें ॥ १६ ॥
चंद्रबिंबास कळंक । मुखचंद्र नित्य निष्कळंक ।
देखतां सीतेचें श्रीमुख । होती निर्दुःख भावार्थीं ॥ १७ ॥
चंद्रीं नक्षत्रें पुढेंमागें । तैसी तानबडे मोतिलगें ।
कुंकुम सुरंग रामरंगें । तोचि निजांगें मळवट ॥ १८ ॥
श्रीराम देखिलियावरी । घालूं विसरली ते भोंवरी ।
भंवर्यां निमायेच्या करीं । राजे भ्रमचक्रीं पाडिले तिणें ॥ १९ ॥
सीताभ्रमाचिया भवरीं । रावण पडला भ्रमचक्रीं ।
जानकीभ्रमें स्वयेंवरी । आपदा थोरी भोगील ॥ २० ॥
भंवरीभ्रमाचा निजनाश । करावया श्रीरामचि कळस ।
त्याचेनि नांवे भ्रमाचा नाश । होय सावकाश श्रीरामें ॥ २१ ॥
रामनामें निरसे भ्रम । यालागीं भंवर्यारचा संभ्रम ।
जानकीसी नाहीं परम । भंवरीचें नांव ते निघे ॥ २२ ॥
जानकीचें निजनिढळ । रामचरनें सदा सफळ ।
निचेंचि धन्य कपाळ । वानिती सकळ ऋषिवर्य ॥ २३ ॥
चंद्रबिंबीं काळिमेचा काट । तैसा कस्तुरीचा मळवट ।
मुखचंद्रीं मिरवे चोखट । त्यावरी बोट कुंकुमाचें ॥ २४ ॥
श्रीरामरंग अति सुरंग । तेणें रेंगे रंगलें कुंकुम चांग ।
अवहेपण अति अभंग । निढळींचें अंग शोभवी शोभा ॥ २५ ॥
चंद्र सदा क्षयरोगी । तेणें व्हावया नित्य निरोगी ।
जडला जानकीच्या अंगीं । जाला सवेग अर्धचम्द्र ॥ २६ ॥
सेवावया श्रीराम अधरामृत । अर्धचंद्र होवोनि तेथ ।
चंद्रमा राहिलासें टपत । पाहे एकांत प्रकृतिपुरुषां ॥ २७ ॥
तया अर्धचम्द्रावरती । भांगी सेंदूराची आरक्ती ।
भावें भाळावया रघुपती । प्रेमाच्या प्रीतीं पूजिली माया ॥ २८ ॥
माया विकल्पें दे अविद्या । भाविका हे शुद्ध सद्विद्या ।
जानकीची श्रीरामीं मेधा । त्याच्या निजपदा विनटेल ॥ २९ ॥
भांगींची नव्हे सेंदूरस्थिती । तेणें ओघें आली सरस्वती ।
भावें भेटावया रघुपती । विरक्तीच्या प्रीतीं अनुरक्त ॥ ३० ॥
तिच्या दोहीं तटीं हंसळिया । श्रीरामध्यानें बैसलिया ।
म्हणोनि मुक्ताफळीं शोभलिया । बाह्या जालिया सीतेसी ॥ ३१ ॥
जेवीं नक्षत्रें नभोमंडळीं । तेवीं मस्तकीं मोतियांची जाळी ।
श्रीरामानुसंधानें ओंविली । मस्तका आली मुक्तत्वें ॥ ३२ ॥
त्यावरी भक्तिफरा झळकत । नवविधारत्नहविराजित ।
स्वर्गथां वांकुल्या दावित । भजा रघुनाथ अक्षयार्थ ॥ ३३ ॥
श्रीराम लक्षितां दृष्टीं । सुटली भवयांची गांठी ।
सह सांडोनियां व्यंकटी । अवलोकोनि उठी स्वरूपता ॥ ३४ ॥
जगाची जे डोळसता । सदा शिणली दृश्य देखतां ।
सीतेच्या डॊल्य़ां शरणागतां । आली रघुनाथा पहावया ॥ ३५ ॥
श्रीरामाचें पूर्णपण । देखता डोळे सुखसंपन्न ।
यालागीं जगाचें देखणेपन । सीतेसी शरण स्वयें आलें ॥ ३६ ॥
जजगाची देखणीं अवस्था । तीही डोळा डोळसता ।
श्रीरामाची सुखस्वरूपता । पहावया तत्वतां अति सादर ॥ ३७ ॥
यापरी सीतेचे नयन । देखणेपणें सुलोचन ।
त्यावरी सूदलें अंजर । रामनिधान साधावया ॥ ३८ ॥
साधूचें अवक्र आस्तिक्य । तैसें शोभे सरळ नासिक ।
नाकें निवटोनि नास्तिक्य । प्राणासी सख्य श्रीरामें ॥ ३९ ॥
सदा सैराट विचरे प्राण । तेणें वसविले जानकीचें घ्राण ।
होतां श्रीरामसन्निधान । समाधान प्राणांसी ॥ ४० ॥
सेवावया श्रीराम अधरामृत । सीतेचे अधर अति आरक्त ।
त्याचिया आर्ती अति आसक्त । लाजवीत प्रवाळा ॥ ४१ ॥
उपमें प्रवाळें अति कठिण । अधर मृदु गगनाहून ।
तें सीतेचे अधरपान । रघुनंदन स्वयें जाणे ॥ ४२ ॥
सकळांच्या मुखींचे दांत । रसाविषयीं अति अदांत ।
जानकी मुखींचे ते दांत । यालागीं रघुनाथ भाळला मुखा ॥ ४३ ॥
अधरतळींची चिबुका । रामरगें गोंदिली देखा ।
श्यामतेज वर्ण नेटकां । रघुकुळटिळका भाळवी ॥ ४४ ॥
मुक्त रिघोनि सुवर्णापाशीं । वनिताघरीं आलें नाकासीं ।
जानकीनाकें मुक्तिसुखासी । श्रीरामासी देखिलिया ॥ ४५ ॥
लाजवोनि बारा सोळां । तेज मिरवे गंडस्थळा ।
देखतां ठक पडे डोळां । लागली सकळां तकमक ॥ ४६ ॥
देखोनि जानकी मुखचंद्र । लाजिन्नला रजनिकर ।
लाजा होवानिया अर्धशरीर । जाला अर्धचंद्र जानकीभाळीं ॥ ४७ ॥
चंद्रासी गति नित्य नक्षत्रें । मुखचंद्रा गति रामचंद्रें ।
चंद्र प्रतिपाळी चकोरें । येणें मुखचंद्रें जीव शिव ॥ ४८ ॥
चंद्रीं उदयास्त अहर्निशीं । मुखचंद्र उदयास्तांतें ग्रासी ।
उद्यतप्रभा मुखचंद्रासी । जिवशिवांसी प्रकाश ॥ ४९ ॥
शुद्ध श्यामता श्रीरामा । तेचि सुनीळ नभोपमा ।
तेथें मिरवे मुखचंद्रमा । श्रीरामव्योमामाझारीं ॥ ५० ॥
स्मरणाची गळसरी गोमटी । ऐक्यभावें पडिली गांठी ।
न तुटतां धरिली कंठीं । लोकदृष्टीं अलक्ष ॥ ५१ ॥
जे कंठी रामनाम ठसा । तेथें चितांक रिघे कैसा ।
चितांकलेणें ते दुर्दशा । सीतेच्या मानसा शृंगार श्रीराम ॥ ५२ ॥
जीवशिवपद सांडोनि देख । श्रीरामपदींचा पदांक ।
तेंचि हृदयींचें पदक । केलें आवश्यक जानकीया ॥ ५३ ॥
हृदयपदकाचें महिमान । चिद्‌रत्नींश जडित पूर्ण ।
मुक्तमौक्तिकें ओंवून । गुनेंविण ल्यालीसें ॥ ५४ ॥
त्रिगुण आणिले निर्गुणेंसीं । तेचि बाहुवटे सीतेसी ।
रामकीर्तिमुखें जडोन त्यांसी । उभयबाहूंसी भूषण ॥ ५५ ॥
ओंकारामाजिल्या श्रुती । कर्मकांडीच्या उपपत्ती ।
वेदार्थकंकणें सीतेच्या हातीं । रुणझुणती स्वानम्दें ॥ ५६ ॥
दशांगुलीं दशमुद्रिका । चढत्या वाढत्या जडल्या टीका ।
दशावताचाच्या मणिका । जीवाच्या जीविका जडित केल्या ॥ ५७ ॥
पंचभूतें पंचाम्गुळिका । सीतेच्या मुष्टी होती एका ।
श्रीराम सीतेची धनरेखा । तिहीं लोकीं जगद्वंद्य ॥ ५८ ॥
गुणीं गोंविले मुक्तफळां । न पवती मुक्तीचा जिव्हाळा ।
येवोनि पडती जानकीच्या गळां । श्रीराम स्वलीला सेवावया ॥ ५९ ॥
सुमनें विमनें जालीं फळा । राम जीवींचा जिव्हाळा ।
सेवावया सूत्रें बांधोनि गळा । सीताकंठी माळा सुमनें जाली ॥ ६० ॥
भक्त सकामत्वें अति गांजली । निष्काम राम सेवावया वहिली ।
सीतेचे अंगी रिघाली । कांचोळी जाहली नवखंड ॥ ६१ ॥
भक्ति सर्वदा नवखंड । नवखंडें ते अखंड ।
सीता सांडवूनि नवविध बंड । केली अखंड श्रीरामभजनें ॥ ६३ ॥
पृथ्वी नवखंडें नांदली । तेही जडजाड्यत्वा उबगली ।
भक्ति नवखंडें अखंडली । सीतेची जाली कांचोळी ॥ ६४ ॥
येणेंचि स्वार्थें धरित्रीं । सीता धरिली होती उदरीं ।
हे निघालिया बाहेरी । धरा उद्धरी श्रीरामसंगें ॥ ६५ ॥
भक्तिभावाचें बिरडें । कांचोळिये घातले फुडें ।
श्रीराम फेडील सांकडें । आणिका नवखंडी नुगवे हें ॥ ६६ ॥
आंगींचे अंगी भिन्नअंभिन्नी । जीव शिव वाढले हृदयस्थानीं ।
तेणेंचि कुचभारे कामिनी । व्यंजनस्तनी शोभत ॥ ६७ ॥
विद्या अविद्या पारखें दोनी पाहीं । दोनी आच्छादी दोहीं ठायीं ।
एक देही एक विदेही । गुणागूआन्वयीं बांधल्या कसण्या ॥ ६८ ॥
त्रिगुणांचे गोंडे नागर । पाठीवरी रुळती सुंदर ।
श्रीराम व्यावया तत्पर । शोभती मनोहर जानकीसीं ॥ ६९ ॥
त्रिगुणांची ग्रंथी दारुन । छेदिईल श्रीराम आपण ।
आणिकाचें न चले जाणपण । ते गिळिती गुण गर्वाभिमानें ॥ ७० ॥
भक्तिवैराग्यनित्यदीप्त । रामअ नुरागें अनुरक्त ।
तेचि सेंदुरी साडी आरक्त । हर्षयुक्त नेसली ॥ ७१ ॥
शोधित सत्वाचा सात्विक । क्षीरसागरींचा क्षीरोदक ।
वैरणा शोभे अति चोख । तेजें आलोक लोपत ॥ ७२ ॥
परधानेंसी समसूत्र । तेंचि जानकीचे कटिसूत्र ।
तेणेंचि महत्त्व अपार । शोभे सुंदर कटिसूत्रें ॥ ७३ ॥
किंकिणीजालमाळा । कटिसूत्रीं सिद्धी सकळा ।
क्षुद्रघंटिका ऋद्धि प्रबळा । कटिमेखळा शोभत ॥ ७४ ॥
पृष्ठभागीं रुळे वेणी । माजी अनर्घ्य श्याम मणी ।
मूद मिरवताहे चिद्रेत्नींी । शोभे कामिनी सौभाग्यें ॥ ७५ ॥
तिच्या वैराग्यपल्लवासी । मुक्तमोतियें झळकती कैसीं ।
तें देखून भाळलें संन्यासी । अहर्निशीं अनुलक्ष ॥ ७६ ॥
सामवेदींचा नाद गम्भीर । तेंवी अंदुवाजा गजर ।
नादे भुलले राजकुमर । वरनीं तत्पर भूपाळ ॥ ७८ ॥
देव म्हणती हे सीता । व्हावी आमुची देवकांता ।
दैत्यदानवांच्या चित्ता । आमच्या हाता हे यावी ॥ ७९ ॥
यक्ष राक्षस गंधर्वगण । नर किन्नर सिद्ध चारन ।
सीतास्वयंवरी कोण पण । अवघेजण पुसती ॥ ८० ॥

विश्वामित्रांनी चनुष्य आणविले :

विश्वामित्र म्हणे रायासी । आतां आनावे धनुष्यासी ।
रायें प्रेरिलें प्रधानासी । ते परिवारेंसीं निघाला ॥ ८१ ॥
धनुष्या मांदुस अष्टचक्र । पांचशतें महावीर ।
ओढितां न ओढे अणुमात्र । मागें गजभार लोटिती ॥ ८२ ॥
जे जे मार्गीं भेटती त्यांसी । ते ते लाविती ओढावयासी ।
एवं अत्यंत प्रयासीं । धनुष्य सभेसी आणिलें ॥ ८३ ॥

धनुष्याचा राजांवर परिणाम, धनुष्यप्रताप :

बाहेरी काढितांची चाप । दैत्य दानव सकंप ।
राजीं सांडिला प्रताप । वाढिवेचा दर्प सांडिला सकळीं ॥ ८४ ॥
जनक सांगे सकळाळ्सी । हरें येणेंचि त्र्यंबकेसीं ।
बाणें भेदिलें त्रिपुरासी । आणि दक्षयासासी विध्वंसिलें ॥ ८५ ॥
येणेंचि धनुष्येंकरीं । एकवीस वेळां धरित्री ।
परशुरामें केली निःक्षत्री । तें हें स्वयंवरी आणिले पणा ॥ ८६ ॥
या धनुष्यातें उचलोन । जो पुरुषार्थें वाहील गुण ।
त्यासी सीतेचें पाणिग्रहण । घडेल जाण त्रिशुद्धी ॥ ८७ ॥
ऐकोनियां रायाचें वचन । तटस्थ ठेले सकळ जन ।
त्यामाजी पुरुष पंचानन । वहावया गुण उठिले ॥ ८८ ॥
ज्यांची वाढीव अति प्रबळ । जे रणांगणीं रणकल्लोळ ।
राजे उठिले सबळ । नांवे सकळ अवधारा ॥ ८९ ॥

उपस्थित शक्तिमान् राजांची सूची :

शिखिध्वज कुशध्वज । ताम्रध्वज जगध्वज ।
राम आलासे गरुडध्वज । भूभुजा लाज लावावया ॥ ९० ॥
सुरथ भरत विदूरथ । विचित्ररथ चैत्ररथ ।
गुप्त आलासे रघुनाथ । सीताकांत व्हावया ॥ ९१ ॥
वीरसेन वीरघ्न । भारसेन भद्रघ्न ।
तेथें आलासे रघुनंदन । सीतावरण करावया ॥ ९२ ॥
जयपाळ अजयपाळ । वीरपाळ विजयपाळ ।
राम आलासे प्रनतपाळ । धनुर्बळ भंगावया ॥ ९३ ॥
चित्रकेतु विचित्रकेतु । श्वेतकेतु द्धुम्रकेतु ।
राम आलासे भक्तकेतु । गर्वघातु रावणाचा ॥ ९४ ॥
केशी कारुष कलिंग । मद्र माथुर अंग वंग ।
राम आलासे श्रीरंग । धनुर्भंग करावया ॥ ९५ ॥
राजे धरोनि आंगवण । धनुष्या वाहूं पाहती गुण ।
तंव तेथें आला रावण । मूळेंवीण अति गर्वी ॥ ९६ ॥

रावणाचे आगमन आणि अहंकारी भाषा :

देखोनि रावणाचा यावा । कंप सुटला रायां सर्वां ।
धाक देवां दैत्यां दानवां । हा लग्नीं मानवां अरिष्ट ॥ ९७ ॥
लोक जाले हाहाभूत । जनक झाला साशंकित ।
राम बैसला सावचित्त । रावणांतक कृतकारी ॥ ९८ ॥
गर्वें बोले रावण । मज करितां सीताहरण ।
येथें निवारूं शके कोण । परी पुसूं पण स्वयंवराचा ॥ ९९ ॥
रावण पुसे जनकासी । कोण पण या स्वयंवरासी ।
येरु म्हणे जो गुण वाहील धनुष्यासी । सीता त्यासी वरील ॥ १०० ॥
धनुष्य वाहणें गोष्टी थोडी । महारन करूं तांतडीं ।
अंगा न येतां परवडी । जानकी रोकडी पर्णीन ॥ १ ॥
ऐसी बोलोनि वचनप्रौढी । मग रावण उठिला लवडसवडी ।
सभांगणीं घातली उडी । धनुष्य तांतडीं धरूं गेला ॥ २ ॥
तंव तळीं राहिलां माथा । तळवट वरी आला हाता ।
गर्वें न कळे लंकानाथा । पाहे सभोंवता सभेसी ॥ ३ ॥
म्हणे म्हां वहिला गुण । सीता आणि हातीं धरून ।
सभेसी रावणें जिंकिला पण । वळंगोनि आपण गर्जत ॥ ४ ॥

रावणाला पाहून सीता सचिंत, ती ईश्वराची करुणा भाकते :

तें देखोनिया सीता । थोर गजबजली चित्ता ।
म्हणे अगा हे उमाकांता । तुझे चाप सर्वथा न उचलो यासी ॥ ५ ॥
माते धरित्री ये वेळी । रावणा नेट नेदीं पायांतली ।
त्यासी तों न्यावें रसातलीं । धनुष्याच्या मुळीं घाली भार ॥ ६ ॥
आपुला धराभार समस्त । घालावया धनुष्याआंत ।
रावणाचा चके हात । तैसा कार्यार्थ साधावा ॥ ७ ॥
रावणातें पूर्ण छळी । ते वेगीं पावो कंकाळी ।
आमची कुलदेवता भद्रकाळी । धनुष्य समूळी धरून राखो ॥ ८ ॥
इंद्रियाधिष्ठात्री देवता । मज साह्य होवोत समस्ता ।
धनुष्य नुचलो लंकानाथा । ऐसी अशक्तता यासी यावी ॥ ९ ॥
रावणाच्या शरीरींचे प्राण । मज साह्य व्हावें संपूर्ण ।
यासी न चढे चापगुण । तैसा क्षीण करावा ॥ ११० ॥
आपले चाप विसरोन । केउता गेला त्रिनयन ।
रावणाचें काळें वदन । करावें संपूर्ण श्रीशंकतें ॥ ११ ॥
सीता निजशक्ति आदिमाता । तिचा स्तुतिवाद ऐकतां ।
साह्य जाल्या इंद्रियदेवता । रावणा क्षीणता आणिली प्राणें ॥ १२ ॥
ऐसा औट कोटी भूतावली । घेवोनि आली भद्रकाळी ।
महादेव जटा मोकळी । धनुष्याजवळी तो आला ॥ १३ ॥
म्हणे माझ्या स्वामींची कांता । केंवि जाय रावणाच्या हाता ।
क्रूर काळाग्नीच्या सत्ता । धनुष्या आंतौता प्रवेशला ॥ १४ ॥
रावणाचेनि अदृष्टें । धनुष्य जालें उफराटे ।
माथा बसले तळवटे । तळ तो गर्विष्ठें धरिला हातीं ॥ १५ ॥

रावणाची फजिती व अधःपात :

जेथें गर्व आणि अभिमान । तेथें अवश्य वसे अपमान ।
तेणें गर्वेंचि रावण । धनुष्या गुण वाहूं गेला ॥ १६ ॥
तंव तें पूर्वींच पालथें । बळें करूं जातां उलथें ।
भोवंडितां न भोंवे विसा हातें । रावणाभोंवतें भोविन्नलें ॥ १७ ॥
धरिता न धरवे महाभारी । लोटितां न लोटवे विसांहीं करीं ।
येऊनि आदळे उरावरी । पालथा शिरीं पडियेला ॥ १८ ॥
रावण आदळतां भूतळीं । न्याहा उठिला पाताळीं ।
दाहीं मुखीं भरली धुळी । रावण तळमळत पडियेला ॥ १९ ॥
सभारंगण तोचि पाटा । धनुष्य तोचि वरवंटा ।
ऐसा रावण लाठा । सभेचे चोहटां झाला ॥ १२० ॥
रावण पडतां अधोगती । धुळी उधळली सभेप्रती ।
रायांच्या तोंडी पडली माती । जानकीच्या चित्तीं आल्हाद ॥ २१ ॥
दहाही घरघरती गळे । वीसही वटारिले डोळे ।
मुखींहूनि लाळ गळे । गात्रें विकळे पडलीं पैं ॥ २२ ॥
प्रधान धांविन्नला कैवाडें । धनुष्य काढूं जातां कडे ।
रावनाची रगडती हाडें । अति चरफडे आक्रंदें ॥ २३ ॥
तुम्ही साह्य नव्हां सांगाती । प्रधान नव्हेती माझे घाती ।
रागें क्षोभला प्रधानांप्रती । क्षीणशक्ती जल्पत ॥ २४ ॥
जनकासी म्हने रावण । धनुष्यें माझा गेलिया प्राण ।
इंद्रजित आणि कुंभकर्ण । कुळनिर्दळण करिती तुझें ॥ २५ ॥
मी रावण अति कृतांत । धनुष्यें गर्वहत ।
जनका आतां तुझे उचित । तें त्वाम् निश्चित करावें ॥ २६ ॥

जनकाकडून रावणावर उपचार :

जनकासी भूतदया भारी । घायीं सांपडलिया वैरी ।
त्यासीही व्हावें परोपकारी । तोचि संसारीं परमार्थिक ॥ २७ ॥
महावीर सहपरिवारीं । जनक धांविन्नला त्वरेंकरी ।
चाप काढिलें वरचेवरी । रावणातें करी सावध ॥ २८ ॥
उदकें शिंपिलें मुखकमळा । तेव्हां तो उठोनि बैसविला ।
आणोनियां शुद्धजळां । केला गुळणा रावणें ॥ २९ ॥
करोनियां शुद्धाचमन । मग केले उदक प्राशन ।
होवोनियां सावधान । बैसला आपण निजासनीं ॥ १३० ॥
मज जाला अपमान । आतां धनुष्य वाहील कोण ।
ते पहावया विंदान । क्रोधें रावण बैसला ॥ ३१ ॥
धनुष्या गुण न चढवितां । जनक कोणासी देईल सीता ।
तरी मी त्याच्या करीन घाता । क्रोधें क्षुद्रता पाहूं ठेला ॥ ३२ ॥

रावणाची दुरवस्था पाहून हा पण पूर्ण होण्याची आशा मावलली :

देखोनि रावणाची दुर्दशा । मग राजींही सकळीं सांडिला धिंवसा ।
सांडिली जानकीची आशा । चापवळसा अनिवार ॥ ३३ ॥
सर्वथा चापा न चढे गुण । चढवूं जातां जाईल प्राण ।
मग जानकी भोगील कोण । जाल्या अपमान सभेसी ॥ ३४ ॥
एवं नरवीर समस्त । धनुष्यार्थीं जाले विरक्त ।
आतां उठोनि श्रीरघुनाथ । चापाचा अंत पुरवील ॥ ३५ ॥
एकाजनार्दना शरण । चापें अपमानिला रावण ।
त्यासी श्रीराम वाहील गुण । शेखीं घेईल प्राण चापाचा ॥ ३६ ॥
रामकथा अति रसाळ । श्रवनांच्या मुखा येतसे लाळ ।
सुखाची जिव्हा करी लळलळ । जीवें मुखकमळ पसरिलें अर्था ॥ ३७ ॥
रामकथाक्षर पावावया । नेत्रीं सांडिल्या व्यंकट भंवया ।
तें कथाक्षर आलिंगावया । स्फुरती वाह्या अष्टांगे ॥ ३८ ॥
रसना चाखतां कथारस । इतर रस होती विरस ।
ऐसी रामथा सुरस । श्रोतीं अवकाश मज द्यावा ॥ ३९ ॥
रामकथेचा प्रताप । वर्णावया मी अति अल्प ।
श्रीजनार्दनकृपादीप । कथा सुखरूप स्वयें दावीं ॥ १४० ॥
एकाजनार्दना शरण । अति रमणीय रामायण ।
सज्जनीं द्यावें अनुसंधान । चापभंजन श्रीरामें ॥ ४१ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायने बालकांडे एकाकारटीकायां
चापकथानिरूपणं नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
॥ ओव्या १४१ ॥