Ramayan - Chapter 1 - Part 11 in Marathi Spiritual Stories by MB (Official) books and stories PDF | रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 11

Featured Books
Categories
Share

रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 11

अध्याय 11

श्रीवसिष्ठरामसंवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

विश्वामित्र उवाच –
तस्य व्यासतनूजस्य मलमूत्रापमार्जन् ।
यथापयुक्तं तद्‌ राम तावदेवोपयुज्यते ॥१॥

श्रीव्यासाच विरक्त पुत्र । सांगितले शुकाचे चरित्र ।
जनकें त्याचा विकल्पमात्र । केला निरहंकार द्वारपाळद्वारें ॥१॥
सज्ञानाचें कृपावचन । द्वारपाळाद्वारें जाण ।
करोनि विकल्पाचें दहन । पूर्ण समाधान श्रीशुकासी ॥२॥
जैसी विरक्ती शुकासी । तैसी विरक्ती श्रीरामासी ।
राज्यवैभव नावडे त्यासी ।
त्वांही करावा शिगुरू साचार । विश्रांतीचें घर विवेकापासीं ॥४॥

वासनासंक्षयो नाम मोक्ष इत्युच्यते बुधैः ।
पदार्थवासनासक्तिर्बंध इत्याभिधीयते ॥२॥

सकळ वासनेची शांती । या नांव मुख्य मुक्ती ।
विषयवासनाउत्पती । बद्धता निश्चितीं या नांव ॥५॥
देही असोनि विदेहस्थिती । ज्यासीं नाहीं विषयासक्ती ।
त्यासी बोलिजे जीवन्मुक्ती । जाण निश्चितीं रघुनाथा ॥६॥

विश्वामित्र श्रीरामांना स्वकुलगुरुकडूनच उपदेश घेण्यास सुचवितात :

यावरी श्रीरामाचें मनोज्ञान । शुकाच्या ऐसें संपूर्ण ।
विश्वामित्रें सांगावे ज्ञान । तें जाणोनि चिन्ह ऋषि बोले ॥७॥

रघूणामेष सर्वेषां प्रभुः कुलगुरूं सदा ।
सर्वज्ञः सर्वसाक्षी च त्रिकालमलदर्शनः ॥३॥

रामा तुज द्यावया समाधान । उपदेशावया ब्रह्म ज्ञान ।
वसिष्ठ कुळगुरू सज्ञान । सदा संपन्न षड्गुणैश्चर्यैं ॥८॥
भूत भविष्य वर्तमान । त्रिकाळ ज्ञाता सर्वज्ञ ।
अंतर्यामी साक्षी पूर्ण । गुरुत्वें गहन श्रीवसिष्ठ ॥९॥
सूर्यवंशी जे जे उत्पन्न । त्यांसी वसिष्ठ सांगे ज्ञान ।
श्रीवसिष्ठाचें ज्ञानमहिमान । हरि हर आपण वंदिती स्वयें ॥१०॥
तुजऐसा कुळगुरू असतां । मी उपदेशूं नये रघुनाथा ।
तरी वसिष्ठासी अनन्यता । ज्ञानप्रात्यर्थ शरण रिघें ॥११॥
पुढिलाचा शिष्य अति वरिष्ठ । त्यासी चाळवी तो गुरू भ्रष्ट ।
उपदेशी तो ज्ञाननष्ट । अति पापिष्ठ प्रलोभें ॥१२॥
कुळीं असतां सज्ञान गुरु । त्यासी त्यागी तो पापिष्ठ नरू ।
स्वयें उपदेशी तो पापाचारू । हा निजनिर्धारू ज्ञानोपदेशीं ॥१३॥
वसिष्ठ ज्ञानगुरू सूर्यवंशी । त्याच्या शिष्यासी जो उपदेशी ।
तेणें जोडिल्या पापराशी । गुरुत्वें शिष्यासी उपदेशतां ॥१४॥
यालागीं गा रघुपती । पावावया ब्रह्मप्राप्ती ।
वसिष्ठ ज्ञानगुरुसी प्रार्थीं । तेणें तूं विश्रांति पावसी सुखें ॥१५॥
ऐसें सांगोनि श्रीरामासी । विश्वामित्र बोले वसिष्ठासी ।
पूर्णाधिकार रघुनाथासी । तूं कां उपदेशीं उदास ॥१६॥
वसिष्ठा तूं काहीं स्मरतोसी । पूर्वीं वैर आम्हां तुम्हांसी ।
तें वैर शांत करावयासी । ब्रह्मा उपदेशी निजगुह्यज्ञान ॥१७॥
या गुह्यज्ञानाच्या पोटीं । मीतूंपणाची मावळे गोष्टी ।
वैर निमाले उठाउठीं । स्वानंदपुष्टी आम्हां दोघां ॥१८॥
ज्या स्वानंदाचिये स्थिती । आम्हां तुम्हां जाली अति प्रीती ।
विकल्प नुपजे कल्पांती । तेंचि श्रीरामाप्रती उपदेशीं ॥१९॥
तें ज्ञान विसरलों म्हणसी । आठव विसरातें स्वयें ग्रासी ।
नाठवतां आठव अहर्निशीं । विसरू त्यापासीं असेना ॥२०॥

गुरुशिष्यांचा अन्योन्य संबंध :

ज्ञानाची ज्ञानगंभीरी । विरक्त शिष्याचे सुक्षेत्रीं ।
उततिष्ठे निजनिर्धारीं । ते गुरुची खरी गुरुगरिमा ॥२१॥
कामक्रोधादि महाज्वाळें । ज्याचे शिष्याचें ज्ञान न पोळे ।
तेणें गुरुत्वें अति प्रांजळें । अद्ग्ध सोज्वळें तें ज्ञान ॥२२॥
शिष्याचे विकल्प समस्त । खंडोनि निर्विकल्प् करीत ।
तेंचि ज्ञान अखंडित । शुद्ध शास्त्रार्थ या नांव ॥२३॥
शुद्ध शास्त्रार्थ प्रतिपादिती । तेचि सद्‌गुरू उपदेशिती ।
ज्या शिष्यासी होय प्रतीती । त्या गुरुत्वाची ख्याती हरिहरा वंद्य ॥२४॥
शिष्यासी नाहीं ब्रह्मप्रचीती । शब्दज्ञानें सतेज युक्ती ।
मनीं विषयांची आसक्ती । ते जाण निश्चिती अशिष्य ॥२५॥

अशिष्यायाविरक्ताय यत्किंचिदुपदिश्यते ।
तत्प्रयात्यपवित्रत्वं गोक्षीरं श्वदृतावित ॥४॥

अशिष्य कोण ?

मनुष्यदेहांचिया प्राप्तीं । संसार तरावया गुरुभक्ती ।
ऐसा भाव नाहीं ज्याचे चित्तीं । तो जाण निश्चितीं अशिष्य ॥२६॥
ज्यासी विषयवासना चित्तीं । ज्यासी संसारावर आसक्ती ।
लौकैषणेची अति प्रीती । तो जाण निश्चितीं अविरक्ता ॥२७॥

परिशिष्याला उपदेश करणे निंद्य :

ऐशियातें जे उपदेशिती । ते अपवित्र उपदेशस्थिती ।
जेवीं श्वानचर्मपात्राप्रती । गोक्षीर भरीती धारोष्ण ॥२८॥
परशिष्यासी उपदेशन । तें गुरुत्वासी अति दूषण ।
अशिष्यासी सांगावे ज्ञान । तें निंद्य पूर्ण सर्वार्थें ॥२९॥
सच्छिष्यासी सद्‌गुण । देखोनि सांगावे गुह्य ज्ञान ।
त्या गुरुचें गुरुत्व धन्य । परम पावन परमार्थीं ॥३०॥

वसिष्ठ ऋषींची योग्यता :

हें विश्वामित्रांचें वचन । ऐकोनियां अति गहन ।
सिद्ध साधक ऋषिजन । करिती स्तवन धन्य धन्य ॥३१॥
व्यास नारद याज्ञवल्की । शुकप्रमुख शौनकीं ।
विश्वामित्रातें निजमुखीं । सकळिकीं पुनः पुनः स्तविजे ॥३२॥
जो ब्रह्मज्ञानाचा महामेरू । जो स्वानंदाचा सुखसागरू ।
तो बोले वसिष्ठ ऋषीश्वरू । चित्तचमत्कारू वचन ज्याचें ॥३३॥
ब्रह्म्नयापासोनि ब्रह्मप्राप्ती । परी ब्रह्मयासमान ज्ञानशक्ती ।
वचनमात्रें ब्रह्मप्राप्ती । सच्छिष्य पावती स्वानंदे ॥३४॥
ज्ञान वैराग्य औदार्य ख्याती । यश श्री ऐस्वर्यस्थिती ।
हे साही गुण वसिष्ठासी असती । भगवंत म्हणती तेणें त्यासी ॥३५॥
सूर्यवंशी निजसन्मानीं । गुरुत्वें जे मुकुटमणी ।
रायें पूजिला अनुदिनीं । जो वरासनीं उपविष्ट ॥३६॥
वसिष्ठे करितां उपदेश । शिष्य तत्काळ होय निरास ।
त्या निरासतेची काय । जेणें सावकाश धरिली असे ॥३७॥
श्रीराम अधिकारिशिरोरत्न । परी न पुसतां ब्रह्मज्ञान ।
सांगो नये गा आपण । हें मुख्य लक्षण उपदेशीं ॥३८॥

शिष्याच्या विनंतीशिवाय त्याला उपदेश करणे व्यर्थ :

वसिष्ठाची महाख्याती । सूर्य जिंतिला दंडशक्ती ।
तो विश्वामित्राप्रती । उपदेशस्थिती सांगत ॥३९॥
सद्‌गुरूतें न प्रार्थितां । शिष्य आदरें न पुसतां ।
ज्ञान सांगो नये गा सर्वथा । सांगे तो तत्वतां गुरू मुर्ख ॥४०॥
गुरू स्वयें म्हणे शिष्यास । तूं घे माझा उपदेश ।
तेव्हांच गुरुत्व पडिलें सोस । वाढला असोसे गुरुत्व लोभें ॥४१॥
यालागीं शिष्यें न पुसतां जाण । आपण साम्गो नये ब्रह्मज्ञान ।
जरी राम अधिकारिरत्न । तरी अप्रश्नी ज्ञान सांगो नये ॥४२॥
शिष्य उपदेशी उदासभूते । गुरू साक्षेपी उपदेशार्थ ।
तेणें गुरुत्वा जाला घात । अविवेकें लोलुप शिष्यार्थीं ॥४३॥

वसिष्ठांनी विश्वामित्राची केलेली स्तुती :

विश्वामित्रा तुझी आज्ञा । माझेनि न करवे अवज्ञा ।
आतां सांगेन ब्रह्मज्ञाना । साधूची आज्ञा मज वंद्य ॥४४॥
विश्वामित्रा तूं साधुरत्न । सुरवरां वंद्य महिमान ।
क्षत्रिय होत्साता ब्राह्मण । स्वयें ज्ञानें संपूर्ण वश्य केलें ॥४५॥
त्या तुज साधूची निजाज्ञा । हरिहरां न क्अवे अवज्ञा ।
यालागीं मी रघुनंदना । गुह्यज्ञाना सांगेन ॥४६॥
माझे तुझे वैरा शांती । जें उपदेशिलें प्रजाप्रतीं ।
ते अखंड स्मरे स्फूर्ती । संसारप्रवृत्तिनिवर्तक ॥४७॥
तेणें ज्ञानें मी आपण । उपदेशीन रघुनंदन ।
ज्या उपदेशासी विघ्न । कल्पांती जाण बाधेना ॥४८॥
विघ्नचि होय निर्विघ्न । प्रपंच होय चैतन्यघन ।
शिष्य होय ब्रह्मा पूर्ण । अज्ञान तें ज्ञान होवोनि ठाके ॥४९॥
ऐसा हे गुह्य स्थिती । उपदेशीन श्रीरामाप्रती ।
हे वसिष्ठाची वचनोक्ती । ऐकोनि निश्चितीं सुखावे राम ॥५०॥
मग वसिष्ठासी श्रीराम आपण । सद्‌भावें घाली लोटांगण ।
अनन्यभावें तुज शरण । मी शिष्य पूर्ण गुरुवर्या ॥५१॥
ऐसा सद्रदित कृपावचन । करुणा भाकी दीनवदन ।
स्वामीनी कृपा करावी आपण । मज दीना उद्‌भरावें ॥५२॥
जेवी दीपें गवाक्षांसी दीप्ती । तीं गवाक्षें दीपासी नेणती ।
तेंवी तुझेनि सूर्यवंशा ज्ञानप्राप्ती । ते तुझी ज्ञानस्थिती मी नेणें ॥५३॥
तुझें अगाध ब्रह्मज्ञान । तें मी नेणेंचि अज्ञान ।
तूं कुलगुरूं सनातन । म्हणोनि चरण दृढ धरिले ॥५४॥

श्रीरामांची योग्यता :

श्रीराम स्वयें चैतन्यघन । देवकार्यार्थ अवतार पूर्ण ।
करावया धर्मसंरक्षण । मनुष्यपण नटनाट्य ॥५५॥
तेणे पैं म्हणविता अज्ञान । ब्रह्मीं ब्रह्मत्व न्यून ।
अथवा म्हणवितां सज्ञान । ब्रह्मीं ब्रह्मत्व पूर्ण अधिक नव्हे ॥५६॥
एवं ज्ञानाज्ञानातीत । श्रीराम स्वयें सदोदित ।
तोही लोकसंग्रहार्थ । गुरुत्वें वंदित वसिष्ठतें ॥५७॥
देवोनि सद्‌गुरुसी सन्मान । श्रीराम न पुसता ब्रह्मज्ञान ।
तैं ज्ञानमार्ग विच्छिन्न । स्वयें आपण केलासें होय ॥५८॥
करावया दीनोद्धारा । गुरुशिष्यपरंपरा ।
स्थापावया रघुवीरा । कळवळा पुरा ज्ञानमार्गीं ॥५९॥

श्रीरामांची वसिष्ठांना विनम्र विनंती :

यालागीं श्रीराम आपण । केवळ होवोनि अज्ञान
गुरुत्वें वसिष्ठासी सन्मान । देवोनि ब्रह्मज्ञान विनीतत्वें पुसे ॥६०॥
घेवोनि अज्ञानत्वाची बुंथी । केवळ अज्ञानप्रश्नोक्ती ।
स्वयें पुसताहे रघुपती । तेही उपपत्ती अवधारा ॥६१॥

श्रीराम उवाच –
प्राक्तनं वासनाजालं नियोजयति मायया ।
मुने तथैव तिष्ठामि कृपण: किं करोम्यहम् ॥५॥

ऐकें मुनि सावधान । जैसे माझें पूर्व प्राक्तन ।
मी त्या प्रारब्धाधीन । स्वयें कर्तेपण मज नाहीं ॥६२॥
पाहतां प्रारब्धाकडे । मी तंव केवळ बापुडें ।
म्यां काय करावें पुढें । हे धडपुढें लक्षेना ॥६३॥
देह असतां प्रारब्धाधीन । जेणें होय ब्रह्मज्ञान ।
तैसी कृपा करावी परिपूर्ण । ज्ञानविज्ञानपरिपाकें ॥६४॥

वसिष्ठ उवाच –
अंते वयसि हे राम श्रेयः प्राप्तोति शाश्वतम् ।
स्वप्रयत्नोपनीतेन पौरुषेणैव नान्यथा ॥६॥

मनुष्याने देहाचा उपयोग ब्रह्मज्ञान व ब्रह्मप्राप्तीकडेच करावा :

मनुष्यदेहीं ब्रह्मप्राप्ती । तो देहभाव नसावा चित्तीं ।
विदेहत्वें परमार्थागती । विवेकसद्युक्ति निज पुरुषार्थ ॥६५॥
नरदेहाऐसें गोमटें । शोधितां त्रैलोक्यीं न भेटे ।
आणि देहाऐसें वोखटें । अत्यंत खोटे आन नाहीं ॥६६॥
वोखटें म्हणोनि त्यागावें । तरी मोक्षसुखा नागवावें ।
गोमटें म्हणोनि भोगावें । तें अवश्य जावें अधःपाता ॥६७॥
हें भोगावे ना त्यागावे । निजपुरुषार्थलाघवें ।
भगवन्मार्गीं लावावें ।
तरीच पावावें परमार्था । उपाव अन्यथा असेना ॥६९॥

शुभाशुभाभ्यां मार्गाभ्यां वहंती वासनासरित् ।
सा मनः पुरुषार्थेन योजनीयेति मे मतिः ॥७॥

प्रथम मनोजय व तो होण्यासाठी वासनानियंत्रण :

मनोरथ नानावृत्ती । या नांव वासनासरिता म्हणती ।
इयेमाजी बुडाले नेणों किती । बळी ते तरती निज पुरुषार्थें ॥७०॥
शुभाशुभ वासना ओघ । सबळ बळें वाहती अनेक ।
ते विवेकें मोडोनि सांग । परमार्थीं चांग पुरुषार्थ कीजे ॥७१॥
त्या पुरुषार्थाचें लक्षण । अशुभ वासना त्यागून ।
परमार्थीं दृढ राखावें मन । हे मुख्य लक्षण परमार्थाचें ॥७२॥
बाळक लाविजे अभ्यासीं । शनैः शनैः योग्यता होय त्यासी ।
तेवीं आत्मानुसंधानें चितासी । सावकासीं राखावें ॥७३॥
अनुसंधान सांडिता । चित्ता वळवून लावावें परमार्था ।
येविषयीं करावें पुरुषार्था । चित्तजयार्था साटोप ॥७४॥
दांत खावोनियां नेहटीं । लागावें मनोजयाच्या पाठीं ।
हात चुरीनियां उठाउठीं । मनोजय दृष्टीं लक्षावा ॥७५॥
अंगे आवरोनियां अंग । मनोजय करावा सांग ।
हाचि परमार्थाचा मार्ग । अति अव्यंग रघुनाथा ॥७६॥
सावधान अहोरात्र । चित्तें लक्षावें चिन्मात्र ।
हेंचि परमार्थाचें सूत्र । अति पवित्र निजनिष्ठा ॥७७॥
मनें मना सावधान । मनें मना निर्दाळणा ।
मने मना अनुसंधान । या नांव पूर्ण पुरुषार्थ ॥७८॥
सकळाच्या वित्पत्ती । अनभ्यासें शांत होती ।
तैसी नव्हे ज्ञानस्थिती । क्षणार्धें प्राप्ती प्रबळे स्वयें ॥७९॥

वेदशास्त्राध्ययनाने ज्ञानार्जन साधना :

वेदशास्त्र श्रुति पुराण । नाना कळा अति विंदान ।
अनभ्यासें होय क्षीण । ज्ञानाचें लक्षण ऐसें नव्हे ॥८०॥
प्राप्तकाळीं जाण । अभ्यासेंवीण वाढे पूर्ण ।
जन्ममरण करी क्षीण । तंव तंव प्रबळपण ज्ञानाचे ॥८१॥
साधक ज्ञान सांडूं पाहे । सांडूं जातां अधिक होय ।
ऐसी ज्ञानकळेची सोय । सुलभत्वें आहे सुखरूप ॥८२॥
ज्ञानसुलभत्वें सुखप्राप्ती । तरी कां साधक सदा शिणती ।
त्यांसी अनुताप नाहीं चित्तीं । अवैराग्यें प्राप्ती ज्ञानाची नव्हे ॥८३॥
यालागीं आपण । महत्व सांडोनिया पूर्ण ।
रंकाचे रंक होउनि जाण । ज्ञानगवेषण करावे ॥८४॥
भूक नाहीं ज्याचें पोटीं । तो पंचामृत पायें लोटी ।
तेवीं अवैराग्यें करंटी । शुद्ध ज्ञानेंसीं भेटी शिणता नोहे ॥८५॥

वरं शरावहस्तस्य चांडालगारवीथिषु ।
भिक्षार्थमटनं रामं न मौर्ख्यं हंत जीवितम् ॥८॥

हातीं घेवोनि खापर । ज्ञानार्थ चांडाळाचे घरोघर ।
भीक मागणें श्रेष्ठ साधर । परि मूर्ख शरीर त्याहूनि निंद्य ॥८६॥
मूर्खत्वें सार्वभौम पूर्ण । तें सोलींव दुःख दारुण ।
जो ज्ञान पावोनि अकिंचन । तो वंद्य जाण ब्रह्मादि देवां ॥८७॥
तें पावावया निजज्ञान । विवेकवैराग्य संपन्न ।
सद्‌गुरुसी । रिघता शरण । तैं मूर्खपण मावळे ॥८८॥

श्रीराम उवाच –
एवंस्थिते बद्धमुक्तें कथमेतज्जने स्थिते ।
क्रमो गुरुपदेशस्य स्वात्मज्ञानस्य करणम् ॥९॥

खरं ज्ञानासाठी गुरुशिष्यांच्या आत्मैक्याची जरुरी :

ऐसिया स्थितीं आचार्या । वर्ततां जगज्जळमायां ।
कैसेनि तरिजे गुरुवर्या । सांग त्या उपाया आत्मप्राप्तीलागून ॥८९॥
गुरुवाक्यें ब्रह्मप्राप्ती । ऐसीं श्रुतिशास्त्रें गर्जती ।
ते प्राप्तीची निजसिथती । पावेन निश्चितीं गुरुराया करीं ॥९०॥

वसिष्ठ उवाच –
उपदेशक्रमो राम व्यवस्थामात्रपालनम् ।
ज्ञप्तेस्तु कारणं शुद्धा शिष्यप्रज्ञैव केवलम् ॥१०॥

गुरुपदेशाचिया गोष्टी । नाहीं ज्ञानाची भरली वाटी ।
जे शिष्याचे लावी होटीं । ब्रह्मज्ञान पाठीं पावेल ॥९१॥
गुरुपासीं नाहीं ज्ञानाचा गोळा । जो गिळवी शिष्यासी तत्काळ ।
गुरुरुपें नाहीं ज्ञानधनमोटळा । जे शिष्याजवळां स्वयें दे ॥९२॥
गुरुने देइजे आपण । शिष्यें घेइजे अंजुळीपूर्ण ।
तैसें नव्हे ब्रह्मज्ञान । अतर्क्य विंदान ज्ञानप्राप्तीचें ॥९३॥
उपदेशक्रम रघुनाथा । गुरू न सांगोनि सांगा ।
शिष्य कानेंवीण ऐकतां । प्राप्ति परमार्था तैं लाभे ॥९४॥

सावधानता व चित्तशुद्धीची आवश्यकता :

दृष्टीनें देखिजे सावधान । तेंचि कूर्मीच्या पिल्यां अमृतपान ।
दृष्टि तरळतांचि जाण । पडे लंघन तयांसी ॥९५॥
तेवीं श्रीगुरुशिष्येंसीं एकात्मता । तेणें शिष्य लाभे परमार्था ।
अणुमात्र भाव पालटतां । उपदेशरिता पडे शिष्य ॥९६॥
गुरु सांगे गुह्य ज्ञान । शिष्य तें त्यजूनी सेवी गुण वर्ण ।
वर्णावर्णदेहाभिमान । गेलिया मन ज्ञान स्वयें लाभे ॥९७॥
सच्चिदानंदनिजवार्ता । गुरू सांगे शिष्यस्वार्था ।
शिष्य स्वार्थी सांडोनि चिंता । तरीच परमार्था पाविजे ॥९८॥
ज्या शिष्याचे चित्तीं चिंता । देहेगेहादि अति ममता ।
तो गुरूपदेशीं नित्य रिता । प्राप्ति परमार्था की नव्हे ॥९९॥
विषयस्वार्थ ज्याचे पोटीं । तो आस्थेच्या सांगे दोन चार गोष्टी ।
ते प्रज्ञा अतिशये चोरटी परमार्थभेटी होवो नेदी ॥१००॥
यालागी तत्काळ । पवावया ब्रह्म प्रबळ ।
एकी शिष्यप्रज्ञाचि गा केवळ । परमार्थफळ तेणें लाभें ॥१॥
शिष्यासी नाहीं चित्तशुद्धी । त्यासी शास्त्रें नव्हें आत्मबुद्धी ।
तो शास्त्र विकूनियां विषय साधी । हित त्रिशुद्धी नव्हेचि शास्त्रें ॥२॥
शिष्या चित्ती विषयासक्ती । गुरूपदेशें नव्हे परमार्थप्राप्ती ।
तो उपदेश जाय व्यर्थ अतीं । करी विपरीत ज्ञानगर्वें ॥३॥
उपदेश स्वयें व्यर्थ गेला । सवेंचि ज्ञानगर्व घेवोनि आला ।
ज्ञातेपणें ताठा चढला । नायके बोला श्रेष्ठांच्या ॥४॥
स्वयें उपदेश केला व्यर्थ । परी वाढला अति अनर्थ ।
चित्तशुद्धी नाहीं सत्य । तेथें परमार्थ कदा न घडे ॥५॥
चित्तशुद्धि ज्याचे मनीं । तो परमार्थ पावे पाषाणीं ।
कळे चित्तशुद्धीची करणी । दावी जनीं वनी जनार्दन ॥६॥

राम उवाच-
इयतो दृश्यजातस्य ब्रह्मांडस्य जगत्स्थिते :
मुने सत्ता कथं तत्र क्क मेरूः सर्षपोदरे ॥११॥

या प्रचंड ब्रह्मांडाचे आकलन व्हावे कसे असा श्रीरामांचा प्रश्न :

साधकभावनेच्या पोटीं । दृश्य जाळॆंसी ब्रह्मांडकोटी ।
हरपती उठाउठी । राईच्या पोटीं मेरू जेवीं न मावे ॥७॥
ब्रह्मभावना सूक्ष्म सपूर । तीमाजी दिसे तें चराचर ।
केवीं हरपे जगडंबर । शमक गिरिवर गिळील कैसा ॥८॥

वसिष्ठ उवाच –
साधुसंगमसच्छास्रपरो भवसि राम चेत् ।
तीद्दनेनैव नो मासैः प्राप्तोसि परमां धियम् ॥१२॥

गुरुत्वाम्याशी तादात्म झाल्यावर कुलगुरुचे उत्तर :

साधुत्वें पाहतां साधूसी । मुख्य साधुत्व सद्‌गुरुसी ।
तो जें स्वात्मत्व उपदेशी । सच्छास्त्र त्यासी बोलती ज्ञाते ॥९॥
त्या गुरूवाक्यीं एकत्मता । शिष्य जालिया सर्वात्मता ।
तो दिवस मास न लागतां । योग्य परमार्था तत्काळ होय ॥११०॥
तत्काळ होय येग्यता । हाही विलंबू न साहे सर्वथा ।
हृदयीं सिद्धचि निजात्मता । गुरुवाक्य पाहतां नैराश्य लाभे ॥११॥
केवळ तंतु पाहतां दृष्टी । वस्त्र लोपे उठाउठी ।
सूक्ष्मब्रह्म लक्षितं दृष्टी । ब्रह्मांडकोटी मावळती ॥१२॥
मरोनियां जो मेला । तो मागुतेन जन्मा आला ।
जो जिताचि जिवें निमाला । तो सुखी जाला सत्संगे ॥१३॥
पाहातां सूक्ष्मदृष्टी सावधान । शून्यांचें हरपे शून्यपण ।
तैं जो होय ब्रह्म पूर्ण । साधुसज्जन समागमें ॥१४॥
जंव जंव नाहीं होय देहो । तंव तंव सुखाचा उत्सव ।
निःशेष होय देहाचा अभाव । परमानंद पहा हो सत्संगे ॥१५॥

सत्संगमहिमा :

सत्संगें ज्या अकिंचनता । तो ब्रह्मादिकां वंद्य सर्वथा ।
त्रैलोक्यवैभवा हाणोनि लाथा । ऐसी प्रसन्नता सत्संगें ॥१६॥
ऐसिया सत्संगापरतें । श्रेष्ठ साधन नाहीं येथें ।
त्या सत्संगमहिमेतें । ऐक निश्चितें सांगेन ॥१७॥
सत्संगें नाहीं द्रष्टेपण । पुढे दृश्य नाहीं जाण ।
देखतेवीण दर्शन । तें ब्रह्मर्पू रघुनाथा ॥१८॥

दृश्य, द्रष्टा व दर्शन ह्यांची संपुटी :

दृश्य द्रष्टा होहींतें । दर्शन प्रकाशे निश्चितें ।
तें दर्शन आकळे जयातें । ब्रह्मस्थिती त्यातें अभंग ॥१९॥
साकरकणिता भिन्न भिन्न । परी त्या कणिका साकरचि आपण ।
तेवीं चराचर दृश्यमान । तेंब्रह्म पूर्ण पूर्णत्वें ॥१२०॥
उंच नीच अलंकार । परी ते एकचि भांगार ।
तेवीं पाहतां चराचर । वस्तु परात्परा परब्रह्म ॥२१॥
म्हणती घटाकाश मठाकाश । परी ते सहजचि महदाकाश ।
तेंवी दृष्य दर्शनीं द्रष्टाभास । भासतो चिद्विलास चिन्मयत्वें ॥२२॥
या निजात्मदृष्टी पाहतां । विषयीं विषयो ब्रह्मरूपता ।
तेचि उपपत्ती तत्वतां । ऐकें रघुनाथा सांगेन ॥२३॥

पांच प्रकारच्या विषयांच्या त्यागाची आवड हाच आनंद :

मुख्य विषयो पंचविध । धब्द स्पर्श रूप रस गंध ।
यांची गोडी तो परमानंद । आत्मविद जाणती ॥२४॥
विषयांचे गोडपण । ते गोडीच ब्रह्म पूर्ण ।
ते गोडीचे जें ज्ञातेपण । ते चैतन्यघन जाणावें ॥२५॥
यस्यानंदस्य मात्रा जीवंति । विषयगोडी ते ब्रह्मस्फूर्ती ।
भोक्ता भोगी स्वयें चिच्छक्ती । जाणीव ते निश्चिती परब्रह्म ॥२६॥
यालागी गा रघुनाथा । जेणें जाणिजे विषयस्वादता ।
ते जाणीव आली ज्याच्या हाता । तो जाणा तत्वता स्वदेहीं ब्रह्म ॥२७॥

श्रीराम उवाच-
येनैव भगवन्धीरा निश्चयेन महाधिया ।
विशोकाः संस्थितास्तन्मे ब्रह्मन्प्रब्रूहि तत्वतः ॥१३॥

विशोकावस्था कशाने प्राप्त होते असा श्रीरामाचा प्रश्न :

मागील धीर वीर परमार्थीं । पावले विशोक ब्रह्मप्राप्ती ।
ते विशोकतेची स्थिती । मज का निश्चितीं प्रकटेना ॥२८॥
ऐसी उपदेशीं ज्ञानपदवी । जे धैर्यातें धैर्यचि आंगवी ।
अंग अंगातें स्वयें हरवी । विशोक सर्वभावीं जेणें मी होय ॥२९॥
ब्रह्मज्ञानाच्या उपपत्ती । सांगितल्या नाना युक्ती ।
जेणें सद्यः पावें ब्रह्मप्राप्ती । ते मज निश्चितीं सांगा स्वामी ॥१३०॥

वसिष्ठ उवाच-
श्रूयतां ज्ञानसर्वस्वं श्रुत्वा चैवावधारयेत् ।
भोगेच्छामात्रको बंधस्तत्यागो मोक्ष उच्यते ॥१४॥

कुलगुरुंचे उत्तर :

ऐकें बापा रघुवीरा । सांगेन ज्ञानाच्या सर्व सारा ।
जो श्रवणार्थीं चातक खरा । तो वाक्यसुखसारा झेलोनि घे ॥३१॥
ज्ञानकथा अवघेची ऐकती । परी ऐकिलें तें नाचरती ।
यालागीं श्रवणाची होय माती । परमार्थप्राप्ति त्यां कैची ॥३२॥

लक्षपूर्वक न ऐकण्याने नुकसान :

पावन कथा ज्ञानगर्वोक्ती । अनवधानें ते श्रवण न निवती ।
मा ते चित्तामाजी केवी पावती । त्यांची मनाची वस्ती उद्वस सदा ॥३३॥
ऐसी निजकथा ऐकती । ते ऐकतांचि नायकती ।
त्यासी परमार्थाची प्राप्ती । कदा कल्पांती घडेनां ॥३४॥
ऐकें श्रीरामा सावधान । येथें भोगेच्छा मुख्य बंधन ।
ते त्यागी तो ज्ञाता पूर्ण । तेथें मुक्तपण सहजची ॥३५॥
इच्छात्याग अति कठीण । जो त्यागी तोचि विचक्षण ।
त्याही त्यागाचें लक्षण । निर्वाण खूण अवधारीं॥३६॥

मनाचेच मानाचा निग्रह :

मनें मनातें आवरावें । मने मनातें निग्रहावें ।
मने मनातें निग्रहावें ।
मने मनातें धरावें । मनें मारावें मनातें ॥३७॥
मनें मनाचा निग्रहो ऐसा । तेथें समूळ निमे आशा ।
चैतन्याचा ओते देहठसा । प्रपंच आपैसा परब्रह्म होय ॥३८॥
ऐसिया सूक्ष्म अति युक्तीं । परब्रह्माची सद्वःप्राप्ती ।
स्वयें परब्रह्मची आहाती । प्राप्ती अप्राप्ती भावाभावें ॥३९॥
स्वयंभू हृदयीं ब्रह्मस्थिती । ब्रह्मप्रभा इंद्रियवृत्ती ।
तें अभावें ब्रह्म नव्हे म्हणती । सद्‌भावें होती परब्रह्म ॥१४०॥
या सद्‌भावाची उपपत्ती । निश्चयें सांगेन रघुपती ।
दृढ धरावी सावधानवृत्ती । हे ब्रह्मस्थिती अभंग ॥४१॥
जेथें कामक्रोधा सलोभता । निःशेष नाहीं ते ब्रह्मशांतता ।
ते शांति ब्रह्म स्वभावता । सबाह्य पूर्णता सर्व देहीं ॥४२ ॥
ज्यासी मी म्हणिजे आपण । तें मीपणेंचि वपु चैतन्य ।
इंद्रियांचे कर्माचरण । तेंही आचरण पूर्णब्रह्मत्वें ॥४३॥
काया वाचा मनसा आचरण । तें तें सहजें ब्रह्म पूर्ण ।
हे ज्यासी आकळली खूण । तों तत्काळ जाण परब्रह्म जाला ॥४४॥
तो तत्काळ जाण परब्रह्म जाला । म्हणतां लाज लागली पैं बोला ।
स्वयें ब्रह्मरूपें संचला । जाला न जाला ज्ञानाज्ञानें ॥४५॥
यालागीं गा रघुनाथा । स्वतः सिद्ध ब्रह्मरूपता ।
स्वयें स्वयंभू ये हाता । या श्लोकार्था विनटोनी ॥४६॥
इंद्रियांचे कर्माचरण । सर्व देहीं समसमान ।
तें कर्मयोगीं सावधान । ब्रह्मानुसंधान निजनिष्ठा ॥४७॥
योगी स्वधर्मकर्म करिती । कर्मीं स्फुरे ब्रह्मप्रचीती ।
तेचि परमात्म्याची निजभक्ती । नित्य मुक्ती सावधात्वें ॥४८॥
योगी जागृतीं सावधान । चित्सावधानत्वें देखती स्वप्न ।
सुषुप्तिसुखें समाधान । चिद्रूप पूर्ण भोगिती सदा ॥४९॥
ऐसा अवस्थात्रयीं सावधान । हेंचि भगवंताचे भज ।
हेंचि परमात्मयाचें पूजन । हेंचि समाधान जीवशिवांचें ॥१५०॥
ऐसा सद्‌भावें साचार । जो सावधान चिरंतर ।
त्यासी ब्रह्मरूप चराचर । विषयमात्र चिद्रूप ॥५१॥

यदिदं किंचिदाभाति जगज्जालं प्रद्दश्यते ।
तत्सर्वममलं ब्रह्म बहिरंतर्व्यवस्थितम् ॥१५॥

आपणाला जे जे दिसते ते ते सर्व ब्रह्मच होय :

जें जे दिसे दृश्य दर्शन । जें जें विषभोगायतन ।
तें तें निर्मळ ब्रह्म जाण सबाहय पूर्ण परब्रह्म ॥५२॥
मा हें एकैक सांगों किती । त्यासी ब्रह्मरूप त्रिजगती ।
सहज ठसावे रघुपती । तेही उपपत्ती अवधारीं ॥५३॥
ब्रह्म दृश्य द्रष्टा दर्शन । ब्रह्मचतुर्दश भुवन ।
भूतपरंपरा ब्रह्म पूर्ण । मी म्हणणें तें मीपण परीब्रह्मत्वें ॥५४॥
ब्रह्मरूपें भासती मित्र । ब्रह्मरूपें भासती पुत्र ।
शत्रु भासती चिन्मात्र । सुहृद समग्र सद्रूपत्वें ॥५५॥
शत्रु मित्र सखे बंधु । हा परब्रह्मी अपवादु ।
ब्रह्म केवळ स्वानंदकुंद । परमानंदु परिपूर्ण ॥५६॥
ब्रह्मीं प्रपंच नाहीं ऐकिला । ब्रह्मी प्रपंच नाहीं आथिला ।
ब्रह्मीं प्रपंच नाहीं स्पर्शला । भ्रांती भाविला निजभावना ॥५७॥
भ्रांतासी जग दुःखप्रतीती । ज्ञात्या सुखरूप विश्वमूर्ती ।
अंधा दगड पडे त्रिजगती । देखणे देखती स्वप्रकाशत्वें ॥५८॥
यालागीं ज्या परमाबुद्धी । ते तोडिती भेदाची विधी ।
भेद तोडावया त्रिशुद्धी । भगवद्वबुद्धी सर्वत्र ॥५९॥
ज्या ब्रह्मभावों सर्वभूतीं । ते स्वये परब्रह्म होती ।
ते पूर्वीच ब्रह्म आहेती । भावनाभ्रांतिच्छेदक ॥१६०॥
जो करी अमृतपान । तो अमर होय आपण ।
ज्या सर्वभूतीं भगवद्‌भजन । ते परब्रह्म पूर्ण स्वयें होती ॥६१॥
ऐकें श्रीरामा जगाची स्थिती । परब्रह्म कां परम भ्रांती ।
तिसरियाची नाहीं वस्ती । जाण निश्चितीं रघुनाथा ॥६२॥
नानाकारे जगाची प्रचीती । तेचि मुख्यत्वें सोलींव भ्रांती ।
तें भ्रांतीची निजस्थिती । ऐंक तुजप्रती सांगेन ॥६३॥

भ्रमेणाहं भ्रमेण त्वं भ्रमेणोपासका जनाः ।
भ्रमेणेश्वरभावत्वं भ्रमेणेश्वरभावत्वं भ्रममूलमिदं जगत् ॥१६॥

अहंभावना हा भ्रम असून ते भ्रांतीचे मूळ लक्षण आहे :

अहमात्मा जें मीपण । तें मुख्य भ्रमाचें निजकारण ।
तूं म्हणणे हा भ्रम दारूण । मीतूंपणा भ्रममूळ ॥६४॥
देव भक्त दोन्ही भिन्न । ऐसें जें कां उपासन ।
तें ज्ञानाचें मुख्य अज्ञानपण । सूक्ष्म भ्रम पूर्ण अतर्क्यत्वें ॥६५॥
ब्रह्म अखंडत्वें पूर्णस्थिती । तेथें देव भक्त भिन्न मानिती ।
हें ज्ञानगुह्य अति भ्रांती । अतर्क्य निश्चितीं सज्ञाना ॥६६॥
ईश्वर तो अति वरिष्ठ । येरें भूतभौतिकें अति कनिष्ठ ।
हे भ्रमाचें अति कचाट । येथें श्रेष्ठ भुलविले भ्रमे ॥६७॥
दोरीं सर्प जन्मला नाहीं । तो उपजे भ्रांतीचे ठायीं ।
तेवीं ब्रह्मी जग नाहीं । आभासे पाहीं भ्रममूळें ॥६८॥
जग देखणें हा परम भ्रम । जग न देखणें ते परब्रम्ह ।
हें जाण गृह्य निजवर्म । तूं पुरुषोत्म परमात्मा ॥६९॥
मी तुज सांगो तरी तूं परमात्मा । तुझा तूंच पाहें महिमा ।
तुझ्या स्वरूपासी नाहीं सीमा । अपार अप्रमेय रघुनाथ ॥१७०॥
तूं आत्मा आत्मत्वें परिपूर्ण । तू कर्माकर्म विहीन ।
तुज नाहीं स्थान मान । तें निजलक्षण अवधारीं ॥७१॥
तुझ्या स्वरूपाच्या निजस्थानीं । आकाश लोपें कोणे कोणीं ।
पाहतां न दिसे नयनीं । गेलें हरपोनी मिथ्यात्वें ॥७२॥
पाहतां स्वरूप शुद्धत्वें । लाजिले पैं शोधिता सत्वें ।
स्वयें सामावलें महत्वें । मायेचें सत्व असत्वा आलें ॥७३॥
राईच्या कोटीच्या अशांप्रती । वस्तु सावकाशें नांदती ।
अणुमाजी सुखस्वरूपस्थिती । वस्तुविश्रांति सावकाशें ॥७४॥
सूक्ष्महुनि सूक्ष्म सार । जें नित्यत्वें नित्याक्षर ।
तें तुझें स्वरूप साचार । जीवशिवत्वें विचार अव्ययी विरें ॥७५॥

वस्तूला माता पिता नाहीत म्हणून जन्ममरणही नाही :

वस्तूसी नाहीं माता पिता । यालागीं न घडे जन्मकथा ।
जन्मेवीण मरणवार्ता । आत्मात्वीं सर्वथा असेना ॥७६॥
एवं जन्ममरणातीता । अपार सुखें सदोदित ।
त्या स्वरुपा नांव रघुनाथ । जाण निश्चित श्रीरामा ॥७७॥
वेद वेदांग पुराण । श्रुति स्मृति शास्त्र विज्ञान ।
इतिहासाचें गुह्य ज्ञान । तें हें निरुपण रघुनाथा ॥७८॥
सर्व साराचें मुख्य सार । तो हा इतिहास साचार ।
सकळ ज्ञानाचें ज्ञानगव्हर । अति उदार मुक्तत्वें ॥७९॥
हें निरुपण जीवीं घोटे । तैं विषयांचे लाहाणें फिटे ।
जन्ममरणाचें खत फाटे । भवभय आटे मृगजखत्वें ॥१८०॥
या इतिहासाचें निजवर्म । कर्मचि होय परब्रह्म ।
साधक होय आत्माराम । नित्यत्वें परम निजमोक्ष जोडे ॥८१॥
म्यां निरुपलें जें निरुपण । तें जीविन्मुक्ताचें लक्षण ।
तूं आत्माराम आपण । पूर्णत्वें पूर्ण परमात्मा तूं ॥८२॥

श्रीरामांची पूर्णानन्दमय अवस्था :

ऐकोनि वसिष्ठाचें वचन । श्रीराम स्वयें आपण ।
आपुलें देखे पूर्णपण । स्वानंदघन सुखरूप ॥८३॥
होतां स्वरूपीं भेटीं । चित्तचैतन्या पडली मिठी ।
हर्षबाष्प दाटलें कंठीं । आनंद पोटीं न समाये ॥८४॥
आनंद हृदयीं न माये । तो नेत्रीं उलथूं पाहे ।
पूर्ण दाटला विस्मयें । देहाची सोय स्फुरेना ॥८५॥
प्राण पांगुळला जेथींचा तेथ । कंठ जाहला सद्र्दित ।
इंद्रिये उपरमलीं समस्त । पाडिलें ताटस्थ्य चिद्रुपत्वें ॥८६॥
सर्वांगीं रोममूळीं । आलीं स्वेदकणीका निर्मळी ।
मुक्तमोतियांची जाळी । पांघुरविली निजसत्वें ॥८७॥
निःशेष नाठवे मी तूपण । खुंटली वाचा पडिलें मौन ।
जीवशिवाचें पुसिलें भान । चित्त समाधान पावलें ॥८८॥
श्रीराम चैतन्यघन । जाला स्वस्वरूपीं निमग्न ।
त्यासी व्यवहारप्रवीण । श्रीवसिष्ठें केवीं आपण केलें ॥८९॥
ऐसें भरद्वाजें वाल्मीकाप्रती । स्वयें पुसिलें अति प्रीतीं ।
वाल्मीकीही तदर्थीं । कथासंगती सांगतु ॥१९०॥

वाल्मीकिरुवाच –
यदा परिणतः साधुः स स्वरूपे महात्मनः ।
विश्वामित्रस्तदोवाच वसिष्ठं ऋषिसत्तमम् ॥१७॥

तटस्थ देखोनि श्रीरामासी । विश्वामित्र जाला कासाविसी ।
तो कळवळोनि वसिष्ठासी निजकार्यायी सांगत ॥९१॥

विश्वामित्र उवाच –
हे वसिष्ठ महाभाग ब्रह्मपुत्र महामुने ।
गुरुत्वं शक्तिपातेन तत्क्षणादेव दर्शितम् ॥१८॥

श्रीरामांची समाधी उतरण्याबद्दल विश्वामित्रांची वसिष्ठांना विनंती :

स्वामी वसिष्ठां तू ब्रह्मपुत्र । तुझ्याच गुरुत्वाचें चरित्र ।
ब्रह्मप्राप्तीं तूं अति पवित्र । अति विचित्र अनुपम्य ॥९२॥
तुझ्या गुरुत्वाचें वर्म । मिथ्या देहादि इंद्रियकर्म ।
शिष्य होय पूर्ण ब्रह्म । ते समाधि परम श्रीरामीं ॥९३॥
शक्तिपातें शिष्योत्तमा । पावविलें न करितां श्रमा ।
हे तुज्या गुरुत्वाची गरिमा । अगाध महिमा तिहीं लोकीं ॥९४॥
शिष्याच्या सकळ वृत्ती । वचनें लाविसी व्रह्मास्थिती ।
शिष्य पावे ब्रह्मस्थिती । शक्तिपातु निश्चिती या नांव ॥९५॥
लव निमिष घटिका मुहुर्त । शिष्यासी बाणली हे स्थिती ।
शक्तीपातु निश्चितीं । ऐसी ख्याति गुरुवाक्ये ॥९६॥
वचनें छेदिसी संशयातें । निःशब्दें बोधिसी शब्दार्थें ।
हस्तमस्तकसामर्त्थें । शिष्य परमार्थें सुखी करिसी ॥९७॥
असो दर्शन स्पर्शन । मुख्य तुझें कृपावलोकन ।
शिष्यासी सहज समाधान । चैतन्यघन चित्सुखें ॥९८॥
चित्सुखें सुखसंपन्न । हें तुझ्या कृपेचें आयतन ।
तुझे कृतेस्तव पूर्ण । ब्रह्मसमाधान श्रीरामीं ॥९९॥
श्रीरामीं पूर्ण समाधिअवस्था । ठेली कर्मक्रियाकर्तव्यता ।
पुढील अवतारकार्यार्था । वसिष्ठा वृथा होऊं नेदी ॥२००॥
स्वामी वसिष्ठा अवधारीं । कृपा करीं आम्हांवरी ।
श्रीराम ये देहावरी । ते युक्तीं विवरीं स्वसत्ता ॥१॥
सर्व इंद्रिया सदा उब्दोध । कर्मकर्तव्या नित्य सावध ।
माझा यज्ञ होय सिद्ध । तैसा प्रबोध करीं रामा ॥२॥
समाधि आणि उत्थान । दोहीं अवस्थांचे तुज ज्ञान ।
शिष्यासी देसी समाधान । सर्वेचि प्रयोजन बोधिसी ॥३॥
करावया सुरकार्यार्थ । अवतार श्रीरघुनाथ ।
तो त्वां केला समाधिस्थ । ठेला तटस्थ निर्व्यापारें ॥४॥
श्रीराम होतां तटस्थ । खुंटला अवतारकार्यार्थ ।
माझेंही कार्य तेथ । यज्ञसिद्ध्यर्थ राहिलें ॥५॥
माझ्या कार्यांचे स्मरण । वसिष्ठा तूंच आपण ।
दशरथासी प्रार्थून । मज दिधले राम-लक्ष्मण । यज्ञरक्षण करावया ॥७॥
हें तुझें वाक्य होईल मिथ्या । देवकार्यार्थ राहील सर्वथा ।
यालागीं श्रीरघुनाथा । कृतकार्यार्था प्रबोधीं ॥८॥
अनागत भाष्य ऋषि वाल्मीकें आपण । केलें शतकोटी रामायण ।
तें मिथ्या होऊं नेदीं वचन । श्रीरघुनंदन प्रबोधी ॥९॥

सिद्धाश्रमं मया नीतो रामो राक्षसमर्दनम् ।
करिष्यते ततो॓ऽहल्यामुक्तिं च जनकात्मजाम् ॥१९॥

श्रीरामचरित्राचे श्रवणपठण करणारे सर्व उपाधीतून तरतील :

अनागत भाष्य अति पवित्र । वदलें वाल्मीकांचे वक्त्र ।
श्रीरामाचें चरित्र । अति विचित्र अवधारीं ॥२१०॥
ताटका अति विकटक । रामें निर्दाळिली आत कंटक ।
जनवन केलें निष्कंटक । सिद्धाश्रमीं लोक सुखें वसती ॥११॥
ते सिद्धश्रमीं माझें स्थान । तेथें आणिला रघुनंदन ।
करूनि राक्षसमर्दन । जयो संपूर्ण श्रीरामें ॥१२॥
करील अहल्योद्वारण । शिवचापप्रभंजन ।
जानकीचें पाणिग्रहण । चहूं बंधूचें लग्न जनकालयीं स्वानंदे ॥१३॥
जामदग्न्य श्रीराम । युद्धीं पावती सुख परम ।
परशुरामासी उपरम । जाला परम श्रीराम ॥१४॥
श्रीरामाचें वनाभिगमन । तेणें दंडकारण्य पावन ।
तीर्थां पवित्रता पूर्ण । श्रीरामचरण शिववंद्य ॥१५॥
समुद्री शिळा स्वयें तरती । बिभीषणा लंकाप्राप्ती ।
रामनामाची ख्याती । त्रिजगती उद्धरील ॥१६॥
सीताशुद्धीनेचि छळें । निर्दळील राक्षसकुळें ।
राम वंदिजे कळिकाळें । तें चरित्र प्रांजळें वसिष्ठा करीं ॥१७॥

यर्द्यष्टो यैः स्मृतो वाप्पि बोधितो यैः श्रुतोति यैः ।
सर्वावस्थागतानां तु जीवन्मुक्तिं प्रदास्यति ॥२०॥

जिहीं अत्यंत आदरेसीं । ऐकिलें श्रीरामचंद्रचरित्रासी ।
जे राम स्मरती अहर्निशी । मुक्ति त्यांसी अनयासें ॥१८॥
जो सार्थकें करी रामस्मरण । जो सार्थकें परिसे नित्य आपण ।
ते दोघे जीवन्मुक्त जाण । इंद्रियाचरण करिताही ॥१९॥
ज्यांचे मुखीं रामनामाची वस्ती । जे सदा रामनाम जपती ।
त्यासी स्वदेहेंसी नित्य मुक्ती । इंद्रियार्थीं रमतांही ॥२२०॥
जे अवस्थात्रयी नित्यमुक्त । जे सदा राम जपत ।
श्रीराम स्वयें तेथ । असे क्रीडत स्वानंदें ॥२१॥
ऐसी त्रैलोक्याची गती । श्रीरामचरित्रे तरती ।
श्रीवसिष्ठा तुझे हाती ।
आमुचिया कृपास्थिती । श्रीराममूर्ति प्रबोधीं ॥२४॥
श्रीराम सदोदित दैवहीन । परी रामापाशीं नाहीं दैन्य ।
जगाचेनि भाग्य आपण । श्रीरघुनंदन प्रबोधीं ॥२५॥
दैवेंवीण भाग्यवंत । जगीं एक श्रीरघुनाथ ।
तो वृत्ति पावोनियां येथ । चरितार्थ संपादू ॥२६॥
सर्व जगीं विजयी पूर्ण । ऐसा जो कां रघुनंदन ।
त्यासीं माझे निजमन । जो जगज्जीवन जगाचा ॥२७॥
वसिश्ठा आमुचे कृपेंवारीं । श्रीरघुनाथासी प्रबोध करीं ।
तो अवतारचरित्र करी । तो ये व्यवहारीं प्रवर्तवीं ॥२८॥

वाल्मीकिरुवाच –
इत्युपत्वा स स्थितस्तूष्णीं विश्वामित्रो महामुनिः ।
वसिष्ठस्तु महातेजा रामचंद्रमभाषत ॥२१॥

हे ऐकून वसिष्ठांकडून श्रीरामांची समाधी दूर करण्याचा प्रयत्न :

वाल्मीकि सांगे भारद्वाजासी । तटस्थ देखोनि श्रीरामासी ।
विश्वामित्र वसिष्ठासी । रामप्रबोधासी प्रयोजी ॥२९॥
तंव विश्वामित्र आपण । श्रीरामानुवाद बोलोन ।
निजकार्यार्थीं धरोनि मौन । तें वसिष्ठ सर्वज्ञ जाणोनि बोले ॥२३०॥

राम राम महाबाहो महापुरुष चिन्मय ।
नायं विश्रांतिकालो हि लोकानंदप्रदो भव ॥२२॥

समाधिलक्षण :

ऐकें बापा रघुनाथा । तुज कायसी समाधी अवस्था ।
तूं काळाचा आकळिता । चिदानंदता स्वरूपें ॥३१॥
परिसें आजानुबाहु महाभुजा । हा समाधिकाळ नव्हे तुझा ।
तूं त्रैलोक्याधिराजा । देवसमाजा समग्रा सुखीं करीं ॥३२॥
सुखी करीं साधुसंत । सुखी करीं निजभक्त ।
सुखी करीं लोक समस्त । अवतारचरित्रानुक्रमें ॥३३॥
केवळ निष्कर्म राहणें । तें जीवसमाधीचें लक्षण ।
तेहीं केवळ अपक्वपणें । परिपक्व चिन्ह तें ऐके ॥३४॥
सर्व भूतांचे गुणगुण । जगाचें दोषदर्शन ।
दिसतां न मोडे ब्रह्मपण । ते समाधि पूर्ण पूर्णत्वें ॥३५॥
भूतांचे विकर्माचरण । भासतां भासें चैतन्यघन ।
त्या नांव शुद्ध समाधान । समाधि संपूर्ण त्या नांव ॥३६॥
ऐसें न होतां समाधान । केवळ जें तटस्थपण ।
तें मुग्धावस्थेचें लक्षण । समाधि संपूर्ण ते नव्हे ॥३७॥
भूतांचे सकळ मळ । ज्याचे दृष्टीं होती निर्मळ ।
ते समाधि सुखकल्लोळ । येर समूळ भूतादिभाव ॥३८॥
आशंका- म्हणती संसार मिथ्याभूत । तुवांचि करुन दिधला येथ ।
तेथें कैंचा देव कैंचा भक्त । अवतारचरित्र तें कैचें ॥३९॥
जेथें नाहीं मींतूपण । तेथें नाही कर्मक्रियाचरण ।
समूळ लौकिक नाहीं जाण । लोकसंरक्षण म्हणसी कैंचें ॥२४०॥
अवधारीं गा रघुनाथा। ब्रह्मअवताराची निजसत्ता ।
नये जीवांचिये हाता । जरी यथार्थता मुक्त जाले ॥४१॥
जयां त्रिगुणमे जीवपण । भ्रमें भुलोनि आपण ।
ब्रह्म म्हणती कैंचे कोण । तयां उद्धरण तुझेनी ॥४२॥
अवताराचें सामर्थ्य पूर्ण । प्रपंचपरमार्थी सावधान ।
उभयतां दिसों नेदी न्यून । ते निजचिन्ही अवधारी ॥४३॥

अंतरेको बहिर्नाना अंतर्बोधो बहिर्जडः ।
अंतस्त्यागी बहिःसंगी लोके विहर राघव ॥२३॥

बाह्याभ्यन्तर स्थितीचा विचार :

अंतरीं आत्मा अद्वैत एक । तेणें मिथ्या समूळ लोह ।
बाह्य कर्म जाणोनि संपादी लौकिक । विधिर्पूक वेदोक्त ॥४४॥
अंतरीं केवळ शुद्धबुद्ध । बाह्य दिसे जैसा विषयबद्ध ।
जडत्वें भासे जैसा मुग्ध । दिसे शुद्ध विषयार्थी ॥४५॥
अंतरी निःशेष विश्यत्याग । बाहेंद्रियां विषयभोग ।
भोगितां दिसे जरी सांग । तरी विषयांचें अंग आतळेना ॥४६॥
अंतरी पूर्ण निरास । बाह्य लोलुपत्वें करी आस ।
जेंवि मस्केंमाजी आकाश । फुगक्या आभास अडकलें दिसे ॥४७॥
अंतरीं निरपेक्ष निर्मळ । बाह्य नाना अर्थीं तळमळ ।
लाघवी लोक झकवी सकळ । तैसी कळवळ मुक्तासी ॥४८॥
अंतरी काम क्रोध निमाले । शांतीचे कल्याण पाहलें ।
बाह्य क्रोधानळें खवळले । जेवीं मृगजळें मासेमारी ॥४९॥
बाह्य कार्यकारणावेशा । गुरगुर करी व्याघ्र जैसा ।
अंतरी मृदु लोणी तैसा । कोणाही सहसा खुपेना ॥२५०॥
बाह्य दिसे कार्यकरिता । परी अंतरीं अकर्ता निजात्मता ।
माशी कुलालचक्रीं भवता । दिसे परी तत्वतां हलेना ॥५१॥
प्रपंच आणि परमार्थीं । उभयंता सावधस्थिती ।
हे अवताराची अवतारशक्ती । ते तुज निजमूर्ति रघुनाथा ॥५२॥
ऐसिये गा स्थितीवरी । तूंही निजात्मचरित्रीं ।
स्वानंदे क्रींडें संसारीं । लोकाचारीं अविकळत्वें ॥५३॥
जेवीं बुद्धिबळें वाडेंकोडे । मिथ्या राजा मिथ्या प्रधान हत्ती घोडे ।
हे जाणोनि खेळ खेळी पुढें । तेवीं मुक्ताकडे भवभाव ॥५४॥
सोंकटियां जीवभावा नाहीं । तरी मारिलें म्हणती पाहीं ।
तेवीं मुक्त देहींच विदेही । भय नाहीं मरणाचें ॥५५॥
सोंकटी निमालियाही पाठीं । कोण धर्मात्मा चडे वैकुंठी ।
कोण पडिले नरकसंकटीं । तेवीं निजात्मदृष्टी भव मिथ्या ॥५६॥
ऐसिया स्थितीवरी । तूंही सुखें संसारीं ।
स्वानंदे क्रीडा करीं । भय न धरीं श्रीरामा ॥५७॥
राजा प्रधान पशु प्यादा कटक । बुद्धिबळीं अवघें काष्ठ येक ।
तरी करिती खेळाचें कौतुक । तैसे सांसरिक मुक्तासी ॥५८॥
ऐसिया योगाची वृत्ती । रघुनाथा रघुपती ।
त्वांही सुखें संसाराप्रती । स्वानंदस्थिती क्रीडावें ॥५९॥
ऐसिया योगाची वृत्ती । रघुनाथा रघुपती ।
त्वांही सुखे संसाराप्रती । स्वानंदस्थिती क्रीडावें ॥५९॥

तस्माद्‌राज्यादिविषर्यान्पर्यालोच्य विनश्वरान् ।
देवकार्यादिसंभारांस्त्यज पुत्र सुखी भव ॥२४॥

हे सर्व लक्षात आणून समाधिविसर्जन करावे :

वोडंबरीचा आंबा सफळ । रस गोड परी मिथ्या मूळ ।
तेवीं मिथ्या लौकिक सकळ । जाणोनि अविकळ लोक संरक्षीं ॥२६०॥
बहुरूपियाची राव राणी । नसोनि करिते संपादणी ।
तेवीं तूं श्रीराम राजा राजपणीं । मर्यादारक्षणीं वेदोक्त ॥६१॥
तुवांही निजावतारवृत्तीं । सुखें असावें संसाराप्रती ।
धर्ममर्यादा पुरोणोक्ती । स्वानंदस्थिती क्रीडावें ॥६२॥
तोडीं नवग्रहांची बेडी । सोडवीं देवांची बांधवडी ।
उभवी रामराज्याची गुढी । आज्ञा धडफुडी तिहीं लोकीं ॥६२॥
सांडी समाधीची भ्रांती । धनुष्य बाण घेवोनि हातीं ।
रामनामाची ख्याती । त्रिजगती उद्धरीं ॥६४॥
एसें वसिष्ठ सांगतां । रामा परमानंदीं तल्लीनता ।
त्याच्या प्रबोधाची कथा । होय सांगता वाल्मीक ॥६५॥

वाल्मीकिउवाच-
उत्युत्कोपि यदा रामः किंचिन्नोचे लयं गतः ।
तया सुष्मुम्नया सोपि प्रविष्टो हृदयं शनै ॥२५॥

श्रीराम पूर्वस्थितीप्रत येईनात म्हणून वसिष्ठांनी सुषुम्ना नाडीत प्रवेश करून त्यांचे प्रबाधन केले म्हणून सर्वांस आनंद :

यापरी श्रीरघुनाथा । वसिष्ठें स्वये प्रबोधितां ।
रामा परमानंदीं लयंगता । कार्यकार्यार्थ स्फुरेना ॥६६॥
ऐसें जाणोनियां पूर्ण । तेव्हा वसिष्ठें आपण ।
सुषुम्नां नाडीं प्रवेशोन । करी प्रबोधन श्रीरामा ॥६७॥
वसिष्ठ चैतन्यरूप आपण । तेणें चेतना चेतविली पूर्ण ।
चेतनें चेतविला प्राण । सावधान ! हृदय करणें ॥ ६८ ॥
प्राण प्रवेशे सोळा सवडी । तेणें चेतविल्या सर्वही नाडी ।
तेणें नेत्रांची झांपडी । शनैः शनैः गाढी उघडिता जाय ॥६९॥
उन्मीलित दोनी नयन । श्रवण जालें शब्दायतन ।
शरीर जालें सावधान । वसिष्ठे पूर्ण बोधिला ॥७२॥
प्रबोधोनि श्रीरघुनंदन । वसिष्ठें उन्मीलित केले लोचन ।
विश्वामित्रा आनड घन । सुरगण संतोषले ॥७३॥
सुखावले ऋषीश्वर । आनंदले मुनिवर ।
अवघे करिती जयजयकार । श्रीरामचंद्रप्रबोधें ॥७४॥
न देखे गुणोषदर्शन । न देखें विधिनिषेधनलक्षण ।
न देखे कर्माकर्मण । श्रीरघुनंदनप्रबोधीं ॥७५॥
यापरी श्रीरघुनंदन । स्वयें जाला सावधान ।
तो बोलिला विविधविधान । तेंचि कथन अवधारा ॥७६॥

श्रीराम उवाच –
न विधिर्न निषेधश्च त्वत्प्रयादादहं पुनः ।
तथापि तव वाक्यं तु करणीयं हि सर्वदा ॥२६॥
सर्वे शृणूत भद्रं वो निश्चयेन सुनिरुचितम् ।
आत्माज्ञानात्परं नास्ति गुरोरपि च तदिः ॥२७॥

ऐकें गा वसिष्ठा महामुनी । तुझें वाक्य प्रतापकरणी ।
विधी निषेध हे दोनी । मी मनीं नयनीं । देखें ना ॥७७॥
ऐके स्वामी मुनिनाथा । तुझी गुरुवाक्यसमर्थता ।
कर्म क्रिया कर्तव्यता । मज सर्वथा उरली नाहीं ॥७८॥
कर्म कार्य कर्तव्यता । मज उरलीं नाहीं तत्वता ।
तरी तुझें वाक्य गुरुनाथा । मज सर्वथा अनुल्लंघ्य ॥७९॥
तुझेनि वाक्यें जैसे तैसे । जें बोलसी अनायासें ।
ते मज सर्वथा आयासें । अति विश्वासें करणीय ॥२८०॥
सद्‌गुरूचें निजवचन । प्राणांतींही नुल्लंघी पूर्ण ।
तेंचि शिष्याचें निजलक्षण । जे परिपाळण गुरुवाक्य ॥८१॥
वेद शास्त्र स्मृति पुराण । तेथें हेंचि लक्षण ।
जें गुरुवाक्यांचे परिपालन । हेंचि विधान विधियुक्त ॥८२॥
गुरुवाक्योल्लंघन । हेंचि महापाप दारुण ।
महापापा प्रायश्चितविधान । वज्रपाप पूर्ण गुरुवाक्यावज्ञा ॥८३॥
गुरुअवज्ञापरिपाटीं । महापातकें ज्याच्या अंगुठीं ।
ऐशिया पापांच्या उठती कोटी । वज्रपापांच्या कोटी गुरुअवज्ञा ॥८४॥
गुरुअवज्ञेची मात । स्वधर्मकर्मा करी घात ।
अंगीं रोकडा वाजे अनर्थ । नरकपात अनिवार ॥८५॥
सूक्ष्म साराचा सार गुण । सकळ निश्चयां निश्चयो पूर्ण ।
अवघे ऐका सावधान । आत्मज्ञान महालाभ ॥८६॥
आत्मज्ञानेंवीण सकळा । चवदा विद्या चौसष्टी कळा ।
त्या दुःखरूपें अवधिया विकळा । सुखसोहळा आत्मज्ञानीं ॥८७॥
सकळसिद्धांतमर्यादा । मुख्यज्ञान आत्मविद्या ।
येरी अवघिया अविद्या । ज्या प्रसिद्धा चवदाही ॥८८॥
त्या आत्मज्ञानाचा निजज्ञाता । सद्‌गुरुहूनि अधिकता ।
नाहीं अधिक दैवता । मुख्य गुणातीत तो वंद्य ॥८९॥
ब्रह्मा आणि हरि हर । तेही सद्‌गुरूचे किंकर ।
सद्‌गुरूहूनि थोर । नाहीं सत्पात्र तिहीं लिकीं ॥२९०॥
ऐसें बोलता आपण । प्रेमें वोसंडला रघुनंदन ।
वसिष्ठाचे श्रीचरण । शिरीं पूर्ण वंदिलें ॥९१॥
श्रीरामापादाभिवंदन । वसिष्ठें दिधले आलिंगन ।
एका जनर्दना शरण । पूर्ण समाधान गुरुशिष्या ॥९२॥
ऐकोनि रघुनाथाच्या गोष्टी । चवदा भुवनेंसी वैकुंठी ।
टाळी पिटिली उठाउठीं । गुरुमहिमा गोमटी ऐकोनी ॥९३॥
तेणें सुखी जाले सिद्ध ऋषीश्वर । सुखी जाले सुरवर ।
अवघे करिती जयजयकार । सुमनसंभार वर्षले ॥९४॥
दिव्यसुमनांचा सडा । तो विराजे चहूंकडां ।
तेणें श्रीराम शोभला गाढा । चिन्मात्र चोखडा सामंकृत ॥९५॥

वाल्मीकिउवाच –
एतत्ते सर्वमाख्यातं रामचंद्रकथानकम् ।
अनेकक्रमयोगेन भारद्वाज सुखी भव ॥२८॥

श्रीरामकथा श्रवणाची फुलश्रुती :

वाल्मीक सांगे आपण । भारद्वाजा तूं सावधान ।
रघुनाथाचें आत्मज्ञान । प्रबोधलक्षण अवधारिलें ॥९६॥
जें जालें ज्ञानश्रवण । त्याचें धरोनि अनुसंधान ।
तुवांही आपणा आपण । सुखी संपूर्ण करावें ॥९७॥
ऐसें सांगोनि भारद्वाजासी । वाल्मीक जाला संतोषी ।
त्या वसिष्ठाव्या वचनासी । अति उल्हासीं सतवीत ॥९८॥
धन्य वसिष्ठाची लीला । वंद्य सुरनरां सकळां ।
तेणें चिद्‌रात्नांची वचनमाळा । श्रीरामाचें गळां बाणली ॥९९॥
तिव्हिया चिद्रंधासी । लाधोनियां अहर्निशीं ।
कवि भ्रमरण जाले तिसीं । रसाअमोदासी सेविती ॥३००॥
तिचिया पावोनियां योगासी । योगी पावले योग्यतेसी ।
तेणें सुखावोनि अहर्निशीं । देहभावासी विसरले ॥१॥
बाप गुरुवाक्यकटाखें । अलक्ष लक्षेंवीण लक्षे ।
वसिष्ठें निजगुरपक्षें । निजमोक्ष नांदवी ॥२॥
रामवसिष्ठकहाणी । हे मोक्षमार्गींची निशाणी ।
मोक्ष रिधे येवोनि श्रवणीं । कथा सावधानीं अवधारीं ॥३॥

य इदं शृणृयान्नित्यं गुह्यं रामवसिष्ठयोः ।
सर्वावस्थोपि श्रवणन्मुक्तिमार्ग निगच्छति ॥२९॥

वदांतवार्निका निजजीवन । उपनिषदांचे सार पूर्ण ।
ओंकारार्धमात्रालक्षण । तें हें गुह्यज्ञान वसिष्ठ ॥४॥
श्रीरामवसिष्ठगुह्यज्ञान । त्याचे नित्य सावधान ।
जो सादर करी श्रवण । तो मुक्तत्वें पूर्ण सर्वावस्थीं॥५॥
ज्यासीम् सार्थवसिष्ठश्रवण । ते प्रपंची वर्तता जाण ।
नभाणेंसे अलिप्त पूर्ण । त्यांसीं कर्मबंधन बाधीन ॥६॥
वसिष्ठभवणनित्यवस्ती । ज्यासी जागृति-स्वप्नसुषुतीं ।
त्यासी सर्वदा वरी मुक्ती । हे गुरुत्वें ख्याती वसिष्ठाची ॥७॥
जागृतीं वसिष्ठाचें श्रवण । तेंचि स्वप्नी मनन ।
तेणें सुषुप्तीं समाधान । हे अगाध ज्ञान वसिष्ठाचें ॥८॥
वसिष्ठग्रंथशतसहस्त्री । त्यांतील श्लोकसत्त्याहत्तरीं ।
एकजनार्दनें त्यावरी । ज्ञानार्थकारी टीका केली ॥९॥
श्लोकान्वयें सत्यार्थ । कर्ता जनार्दन समर्थ ।
तेथील जो ग्रंथार्थ । अर्थ विशद करी जनार्दनस्वामी ॥३१०॥
कथा ग्रंथार्थें अर्था आली । श्रीरामनामें पाल्हेजली ।
निजमोक्षमार्गी ठेवी झाली । ज्ञानकांडा केली समाप्ति ॥११॥
पदप्रमेय उथळखोली । हे जनार्दन चालवी चाली ।
कवीत्वाची सखोल बोली । बोलविता अविकळ जनार्दनु ॥१२॥
एका जनर्दना शरण । वसिष्ठांचे ज्ञाननिरुपण ।
त्याचे कृपेस्तव जाण । जालें संपूर्ण पूर्णत्वें ॥१३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें बालकांडे एकाकारटीकायां
श्रीवसिष्ठरामसंवादो नाम एकादशोऽध्याय: ॥११॥
ओंव्या ॥३१३॥ श्लोक ॥२९॥ एवं ॥३४२॥