Hold Up - 24 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | होल्ड अप - प्रकरण 24

Featured Books
Categories
Share

होल्ड अप - प्रकरण 24


“ मला कशाने धक्का बसेल आणि कशाचा फायदा होईल हे तुम्ही मला सुचवायची गरज नाही,तुम्ही स्वतःच्या पायाखालची वाळू घसरत नाहीये ना तेवढच बघा.” पाणिनी म्हणाला. आणि बाहेर पडला........
(प्रकरण २३ समाप्त.) पुढे चालू....
होल्ड अप प्रकरण २४
“ सरकार विरुध्द इनामदार हा खटला पुढे चालू करा.” एरंडे म्हणाले.
“ सकृत दर्शनी असं दिसतंय युअर ऑनर की मला हवा असलेला साक्षीदार आज दुपारी तीन वाजे पर्यंत इथे हजर राहू शकेल.पण मी आधी म्हणालो त्या नुसार मला आरोपीला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आणायचंय पण टे अगदी शेवटचा साक्षीदार म्हणून आणि त्यानंतर मेहेरबान कोर्टावर मी निर्णय सोपवणार आहे.पण त्या आधी मला सिया माथूर ची तपासणी करायची आहे. ” पाणिनी म्हणाला
“ सर्वसाधारण परिस्थितीत तुमचं म्हणणं मी मान्य केलं असतं,पटवर्धन,कारण कोणत्या क्रमाने साक्षी घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार तुम्हा वकीलांना असतोच.पण इथे परिस्थिती अशी आहे की कोणाचेच नियंत्रण राहिले नाही त्यावर.सिया माथूर दुपारी दोन पर्यंत येऊ शकणार नाही हे आता स्पष्ट झालंय.” न्या.एरंडे म्हणाले.
“ ठीक आहे, प्राप्त परिस्थितीत मी मरुशिका मतकरी यांना उलटतपासणी साठी पुन्हा बोलावू इच्छितो.त्यांना दोन तीनच प्रश्न विचारायचे आहेत मला. ” पाणिनी म्हणाला
“ युअर ऑनर, सरकार पक्षाने आपल्या बाजूने साक्षी पूर्ण केल्या आहेत.मगाशीच मी ते जाहीर केलं आहे. पटवर्धन यांनी अत्ता पर्यंत मरुशिका मतकरी यांची दोन वेगवेगळया टप्प्यात अगदी सविस्तर उलट तपासणी घेतली आहे.हे उघड दिसतंय की दुपारी जेवणाच्या सुट्टी पर्यंतचा वेळ घालवण्यासाठी पटवर्धन वकील हे पुन्हा मरुशिका यांना उलट तपासणी साठी बोलावताहेत.” आरुष काणेकर म्हणाला.
“ हे तुमचं मत आहे की तुम्ही हरकत घेताहात?” एरंडे म्हणाले.
“ हरकत घेतो आहे. आय ऑब्जेक्ट.”
“ सस्टेंड ”
“ मग मी मिस्टर कामोद यांना पुन्हा उलट तपासणी बोलावतो.” पाणिनी म्हणाला”
“आय ऑब्जेक्ट ”
“ सस्टेंड ”
“ तर मग मी बचाव पक्षातर्फे मरुशिका मतकरी यांना साक्षीदार म्हणून बोलावू इच्छितो.” पाणिनी ने आपली चाल बदलत नवा पवित्रा घेतला.
“ तुमचा साक्षीदार ? ” आरुष काणेकर हादरला.
“ हो . माझा साक्षीदार ! तिला उलट तपासणीत प्रश्न विचारायला तुम्ही देत नसाल तर तेच प्रश्न मी तिला बचाव पक्षाची साक्षीदार म्हणून विचारीन.” पाणिनी म्हणाला
“ मरुशिका मतकरी ना बोलवा.” न्यायाधीशांनी बेलीफ ना आदेश दिला.
मरुशिका पुन्हा कोर्टात हजर झाली. आपल्या स्मित हास्याने तिने आपल्यावर काहीही तणाव नसल्याचं काणेकर वकीलांना दाखवून दिलं.
“ पुन्हा शपथ घेण्याची गरज नाही.तुम्ही आधी घेतलीच आहे. तुम्हाला कल्पना आहेच की तुम्ही आता साक्ष देणार आहात ते बचाव पक्षाच्या साक्षीदार म्हणून.” एरंडे म्हणाले.
“ होय सर.”
“ मरुशिका, माझ्याकडे एक कागद आहे.तुम्हाला दाखवतो.” पाणिनी म्हणाला आणि त्याने आपल्या खिशातून एक पिवळ्या रंगाचा कागद काढून तिच्या समोर धरला.
“ या कागदावर काही मजकूर लिहिलाय, मरुशिका, तो तुमच्या अक्षरात आहे?” पाणिनी ने विचारलं
कागद पाहताच मरुशिका चा चेहेरा पडला.तिने पटकन आपली पर्स उघडली पण पाणिनी चे लक्ष तिकडेच आहे हे पाहून ती बंद केली.आपले ओठ तिने दाबून धरले आणि कपाळावरचा घाम पुसला.
“ उत्तर द्या.” पाणिनी पुन्हा म्हणाला.
“ नाही, माझं नाही ” मरुशिका पटकन म्हणाली.
“ कोणाचे आहे ते? माहिती आहे?” पाणिनी म्हणाला
“ मी.. मला.. मी...”. मरुशिका अडखळली.
आरुष काणेकर उठून तिच्या मदतीला धावला.
“ आय ऑब्जेक्ट. स्वतःच्याच साक्षीदाराची उलट तपासणी घेतली जाते आहे ही.”
“ ओव्हररुल्ड. उत्तर द्या.” एरंडे म्हणाले.
“ मला वाटतंय ते कामोद यांचे हस्ताक्षर आहे.” मरुशिका म्हणाली.
“ तुमच्या ताब्यात कामोद यांच्या अक्षरातला हा कागद तुमच्याकडे कधी आला? ” पाणिनी ने विचारलं
“ माझी हरकत आहे याला.तिच्या ताब्यात तो कागद होता असं दाखवण्यात आलेले नाही.त्यामुळे हा प्रश्न गैरलागू , अवाजवी आहे आणि स्वतःच्याच साक्षीदाराची उलट तपासणी घेतल्यासारखा आहे. ”
“ ओव्हररुल्ड. उत्तर द्या.” एरंडे म्हणाले .
“ तुमच्या ताब्यात कामोद यांच्या अक्षरातला हा कागद तुमच्याकडे कधी आला? ” पाणिनी ने पुन्हा विचारलं.
“ मी...मला... शनिवारी सकाळी.”-मरुशिका
“ कोणी दिला तो? ”
“ कामोद यांनी.”
“ कुठे दिला?” पाणिनी ने विचारलं
“ आरुष काणेकर यांच्या ऑफिस मधे.”-मरुशिका
“ मी पुन्हा विनंती करतो युअर ऑनर की ही तपासणी थांबवावी.या कागदाचा खटल्याशी संबंधच नाही.कागद बद्दल आम्ही सर-तपासणीत काहीही विचारले नव्हते त्यामुळे उलट तपासणीत पुन्हा हा प्रश्न विचारला जाऊ नये.” काणेकर म्हणाला.
“ मिस्टर काणेकर पटवर्धन हे प्रश्न उलट तपासणीत विचारत नाहीयेत.ते मारुशिका ची त्यांचा बचावाचा साक्षीदार म्हणून सर-तपासणी घेताहेत. उलट तपासणीला तुमचीच हरकत होती जी मी मान्य केली.पण त्यांचा साक्षीदार म्हणून त्यांनी कोणाला बोलवावं हे त्यांनी ठरवायचं आहे.” एरंडे म्हणाले, “ आणखी एक म्हणजे मिस्टर काणेकर, सुरवातीला मलाही वाटलं होतं की पाणिनी पटवर्धन हे वेळकाढू पण करताहेत मरुशिका ना पुन्हा बोलावून म्हणून मीच त्यांच्या उलट तपासणीला वोरोध केलं होतं पण आता पटवर्धन यांच्या प्रश्नामधून जे पुढे येतंय त्यावरून हे काहीतरी वेगळ आहे असं मला जाणवायला लागलंय. तुमची हरकत फेटाळत आहे मी. ”
आरुष खाली बसला.
“ पटवर्धन, मी तुम्हाला विचारतोय की ज्या कागद बद्दल तुम्ही मरुशिका ना प्रश्न विचारताय, तो तुमच्या ताब्यात कोर्टाने दुपारची सुट्टी देण्याच्या आधी होता?” न्या. एरंडे यांनी विचारलं.
“ नव्हता युअर ऑनर.” पाणिनी म्हणाला
“ नव्हता युअर ऑनर.” पाणिनी म्हणाला
“ सरकार पक्षाने त्यांची बाजू मांडून झाली आहे असं जाहीर केलं त्यावेळी सुध्दा तो कागद तुमच्याकडे नव्हता?”
“ नव्हता.” पाणिनी म्हणाला
“ मीच तुम्हाला असं सुचवतो,मिस्टर पटवर्धन, की या साक्षीदाराची उलटतपासणी घेण्याची जी विनंती तुम्ही केली होती माझ्याकडे, जी मी नामंजूर केली होती, ती तुम्ही पुन्हा करा.” न्या.एरंडे म्हणाले.
“ माझी जोरदार हरकत आहे या गोष्टीला.” काणेकर ओरडून म्हणाला. “ कोर्टाच्या संकेताला हे धरून नाही.आम्ही आमची बाजू मांडून झाली आहे असं जाहीर केलंय. पटवर्धन ना संपूर्ण संधी देण्यात आली होती, उलटतपासणी घेण्याची.ती त्यांनी सर्वार्थाने घेऊन झाली आहे.आता त्यांना पुन्हा संधी देऊ नये.”
“ पटवर्धनना च नाही तर मी तुम्हालाही अजून संधी द्यायला तयार आहे, तुम्हाला आणखी काही पुरावे किंवा साक्षीदार सादर करायचे असतील तर.” एरंडे म्हणाले. “ पटवर्धन, चालू कर तुमचे प्रश्न. तुमचा हा साक्षीदार तुमच्या दृष्टीने विरोधी बाजूचा म्हणजे होस्टाईल विटनेस आहे हे मान्य करतंय कोर्ट. करा चालू.”
“ मरुशिका, या कागदावरचे अक्षर हे मिस्टर कामोद यांचे आहे आणि हा कागद त्यांनी तुम्हाला आरुष काणेकरांच्या ऑफिस मध्ये शनिवारी सकाळी दिला. बरोबर आहे?” पाणिनी ने विचारलं
ती जरा अडखळली. “ हो मिस्टर पटवर्धन.”
“ तुम्ही तो कागद वाचलाय? ”
“ हो.”
“ त्यातल्या मजकुराकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो.” पाणिनी म्हणाला
“ आय ऑब्जेक्ट.” काणेकर ओरडला. “ तो कागद पुरावा म्हणून स्वीकारायला माझी हरकत आहे.त्यातला मजकूर इथे वाचला जाण्याला माझी हरकत आहे.”
पाणिनी ने न्यायाधीशांकडे पाहिलं.त्यांच्या चेहेऱ्यावर गोंधळलेले भाव होते.ऑब्जेक्शन वर निर्णय काय द्यायचा या बद्दल.
“ मला वाटत मी आधी जरा तो कागद बघतो.” एरंडे म्हणाले आणि त्यांनी तो कागद हातात घेतला.वाचला.त्यांच्या तोंडावर कठोर भाव उमटले. “ अत्ता आहे त्या स्थितीत मी सरकार पक्षाची हरकत मान्य करतोय पण त्याच बरोबर हे सांगतो की पाणिनी पटवर्धन ना मी या साक्षीदाराची उलटतपासणी घेण्याची पूर्ण मुभा देणारे.पुरावा म्हणून हा कागद कोर्टात सदर होण्यापूर्वी त्याची अधिक ओळख पटवणे गरजेचे आहे.पण उलटतपासणी साठी हा कागद आधारभूत धरायला माझी परवानगी आहे. पटवर्धन, चालू कर पुढे.”
“ मरुशिका, तुम्ही वारंवार सांगताय, की शुक्रवार पासून म्हणजे कोर्टाचे कामकाज संपल्या पासून तुम्ही कमोड शी संपर्क केलेला नाही.बरोबर?” पाणिनी ने विचारलं
“ मी असं म्हंटलं होतं की मी शुक्रवार पासून म्हणजे कोर्टाचे कामकाज संपल्या पासून मी कमोद शी बोलले नाही. ” मरुशिका म्हणाली.
“ अच्छा, म्हणजे तुम्ही संपर्क केलात तर ! ” पाणिनी म्हणाला
“ संपर्क कशाला म्हणायचे यावर ते अवलंबून आहे.” मरुशिका म्हणाली.
“ त्याने तुमच्याशी संपर्क केला?”
“ त्याने मला तो कागद दिला.”—मरुशिका
“ होल्ड अप च्या रात्री जेवताना काय घेतलंत तुम्ही?” अचानक पाणिनी ने वेगळाच प्रश्न विचारला.
“ स्टार्टर मध्ये मंचुरियन आणि बटाटा चिप्स , नंतर पंजाबी कोफ्ता.”
“ नंतर होल्ड अप च्या ठिकाणावर तुम्ही कसे पोचलात?”
“आम्ही कॉलेज रोड ने गेलो.” –मरुशिका
“ बरं, तर मग शनिवारी सकाळी तुम्हाला कामोद यांनी हा कागद तुम्हाला दिला, त्यवर कामोद च्या हस्ताक्षरात खालील प्रमाणे मजकूर लिहिला होता, ” पाणिनी म्हणाला आणि त्याने कागद हातात घेऊन त्यावरचा मजकूर मोठ्याने वाचला.
‘आपण दोघांनी हॉटेल वनराई मधे रात्रीचे जेवण केले.जेवणात आपण स्टार्टर म्हणून मंचुरियन आणि बटाटा चिप्स , नंतर पंजाबी कोफ्ता ही भाजी खाल्ली.त्यानंतर आपण कॉलेज रोड ने जायला निघालो.होल्ड अप सुरु झाला तेव्हा मी सिगारेट पेटवायच्या तयारीत होतो.त्याच वेळी माझ्या हातून लायटर सटकला आणि खाली सित कव्हर वर पडला.......’
पाणिनी ने वाचन संपवलं. पुन्हा तो मरुशिका कडे बघत म्हणाला, “ यावर बरंच काही लिहिलंय अजून, पण मी तुम्हाला विचारतो,मरुशिका, की तुम्हाला असा मजकूर लिहिलेला हा कागद कामोद ने दिलं होता की नाही आणि तुम्ही तो वाचला होता की नाही?”
मरुशिका ने घाबरून आरुष काणेकर कडे मदतीसाठी पाहिलं.तो उठून उभा राहिला.
(प्रकरण २४ समाप्त)