श्रेयानं कपाट आवरायला घेतलं होतं. ड्रॉव्हर स्वच्छ करताना तिला एका डबीत विपुलनं दिलेली खड्याची अंगठी दिसली. तिला विपुलला विसरायचं होतं. त्याची कुठलीही आठवण नको होती. वरवर कितीही प्रयत्न केले तरी मनाच्या तळाशी दडून बसलेली आठवण अशा काही प्रसंगांमुळे उसळून वर यायचीच. ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलं, त्यानंच आयुष्यातलं सगळ्यात जास्त दु:ख दिलं. तिच्या सत्ताविसाव्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीचा दिवस. त्याच दिवशी विपुल अन् नेहा, तिची धाकटी बहीण, दोघांनाही तिनं गमावलं होतं. ज्या बहिणीसाठी ती नेहमीच ढाल बनून उभी असायची. तिनेच श्रेयाच्या विपुलला तिच्यापासून हिसकावलं होतं. आई गेल्यानंतर तिनं नेहाला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. ती विपुलला नेहमी म्हणायची, ‘‘नेहा माझी बहीण नाही, मुलगी आहे. तिला मी फुलासारखी जपते. तिला मी दु:खी अवस्थेत बघूच शकत नाही,’’ त्याच बहिणीनं श्रेयाला डोंगराएवढं मोठं दु:ख दिलं होतं. त्यातून बाहेर पडताना श्रेयाला किती कष्ट झाले होते.तिचं मन कडू आठवणींनी विपष्ण झालं. विपुलची आठवण आली की नेहमीच असं व्हायचं.
‘'श्रेया…,श्रेया…कुठं आहे, तू?’’ ज्ञानेश्वरच्या तिच्या नवऱ्याच्या हाकांनी ती भानावर आली.
श्रेया खोलीबाहेर येताच ज्ञानेश्वरनं म्हटलं, ‘‘आज आपल्याला नमनकडे जायचंय, विसरलीस का?’’
‘‘खरंच की! मी विसरलेच होते…मी आवरते हं लवकरच!’’? श्रेयानं म्हटलं. ती भराभर आवरू लागली. आरशासमोर मेकअप करताना तिनं स्वत:लाच दटावलं, ‘‘इतकी का मी आहारी जाते जुन्या आठवणींच्या? विपुल गेला सोडून तर जाऊ देत ना? आपणही त्याला विसरायला हवं. असं रडत बसून कसं चालेल? तुला ज्ञानेश्वर सारखा भक्कम आधार मिळाला आहे ना? झालं तर मग!’’
ज्ञानेश्वर बद्दल तिच्या मनात अपार आदर दाटून आला. किती प्रेम करतो तो श्रेयावर. ती त्याच्या आवडीची निळी साडी नेसली. त्यावर शोभणारे दागिने व सुंदरसा अंबाडा घालून ती समोर आली, तेव्हा ज्ञानचे डोळे आनंदानं चमकले. पसंतीचं हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटलं. मुलगा सौरभ, ज्ञान व ती असे तिघं खूपच दिवसांनंतर एकत्र बाहेर पडले होते. सौरभची लाडीक बालसुलभ बडबड ऐकत असताना श्रेयाच्या मनावरचं मळभ सहजच दूर झालं. नमनकडे त्याच्या मुलाचा साखरपुडा होता. खूपच आनंदी अन् उत्साहाचं वातावरण होतं. श्रेया त्या वातावरणात मुक्तपणे वावरली अन् तिनं ज्ञानसोबत डान्सही केला.
तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. वळून बघते तो एक वयस्कर स्त्री होती. श्रेयाच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. ती भयचकित नजरेनं तिच्याकडे बघू लागली.
ती स्त्री विपुलची आई होती. त्यांच्या डोळ्यात पूर्वीप्रमाणेच वासल्य होतं. अचानक त्यांना बघून श्रेयाला काहीच सुधरेना अन् मग एकाएकी त्या स्त्रीला मिठी मारून श्रेया गदगदून रडू लागली. मनातल्या भावना अश्रूवाटे व्यक्त झाल्या.
त्या बाई तिला हळूवारपणे थोपटत होत्या जणू तिची वेदना, व्यथा त्यांना कळत होती. श्रेया प्रथमच अशी व्यक्त झाली होती. खरं तर श्रेयानंच त्यांच्याशी संबंध तोडले होते. त्यांच्याशीच नाही तर विपुलशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, वस्तू, प्रत्येत आठवणीशी तिनं फारकत घेतली होती. तिला कुठूनही विपुलशी, त्याच्या नावाशी संपर्क नको होता. पण आज विपुलची आठवण तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती.
एकाएकी ती भानावर आली. हे काय करतेय ती? का अशी कुणापुढे हतबल होतेय? जुन्या आठवणीत गुंतायचं नाहीए तिला.
ती झटकन् त्यांच्यापासून दूर झाली. समोर ज्ञान उभा होता. ती अश्रू लपवत तिथून निघून वॉशरूममध्ये शिरली. ज्ञान विपुलच्या आईबरोबर बोलत होता.
परतीच्या वाटेवर श्रेया अभावितपणे विपुलचाच विचार करत होती. तिचं मन तडफडत होतं, ज्या विपुलसाठी सगळं जग सोडायला तयार होती, त्यालाच आयुष्यातून वजा करून ती जगत होती. मस्ती करून, पक्वान्नांवर ताव मारून सौरभ झोपला होता. ज्ञान सावधपणे गाडी चालवत होता.
रात्रभर श्रेया प्रयत्न करूनही विपुलच्या आठवणींमधून स्वत:ला मुक्त करू शकली नाही. जुने क्षण, जुने प्रसंग डोळ्यांपुढे उभे राहत होते. हातात हात घालून त्यांनी दोघांनी भविष्याची सोनेरी स्वप्नं रंगवली होती. किती गुजगोष्टी करत बसायची ती दोघं. विपुल शांत, समजूतदार होता.
आजपर्यंत श्रेयाला कळलं नाहीए की त्याची अन् नेहाची इतकी सलगी कधी अन् केव्हा झाली…विपुलनं नेहासाठी श्रेयाला दूर लोटलं. दुधातल्या माशीप्रमाणे आयुष्यातून काढून टाकलं.
श्रेयाचा विपुलवर किती विश्वास होता. तो तिचा विश्वासघात करेल असा स्वप्नांतही विचार केला नव्हता. तिनं आणि तिची लाडकी बहीण नेहा…तीही अशी वागेल याची तरी कुठं कल्पना होती तिला. नेहा कॉलेजच्या फायनल ईयरला होती. तिचं इंग्रजी थोडं कच्चं होतं. श्रेयानंच विपुलला म्हटलं होतं की नेहाला जरा अभ्यासात मदत कर. आपण आपल्याच हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड मारतोय हे तेव्हा श्रेयाला समजत नव्हतं.
त्या दिवशी कॉलेजमधून थकून भागून आलेली नेहा भयंकर काळजीतही होती. एकाएकी श्रेयाला मिठी मारून ती जोरजोरात रडायला लागली. पाठोपाठ विपलुही घरात आला. श्रेयानं त्याला बसायची खूण केली अन् ती नेहाला थोपटून शांत करू लागली. तेवढ्यात विपुल म्हणाला, ‘‘श्रेया, तुझ्याशी जरा बोलायचं आहे.’’
‘‘बोलूयात आपण, पण आधी जरा नेहाला शांत करू देत…नेहा, काय झालंय? का रडतेस?’’
‘‘मी कारण आहे तिच्या रडण्याचं,’’ विपुलनं सांगितलं.
‘‘म्हणजे?’’
श्रेयाला काहीच कळेना.
‘‘म्हणजे माझ्यामुळेच नेहा रडतेय.’’
‘‘काय बोलतो आहेस, मला काहीच कळत नाहीए.’’ श्रेयाला अजुनही उलगडा होत नव्हता.
‘‘मला ठाऊक आहे श्रेया, तुला समजायला हे कठीण आहे, पण मला समजून घे. माझा अगदी नाईलाज आहे. मी नेहाच्या प्रेमात पडलोय…मला हिच्याशीच लग्न करायचंय. मी तिच्याशिवाय राहू शकणार नाही.’’
‘‘काय?’’ श्रेया केवढ्यांदा किंचाळली. ‘‘तू? तू नेहावर प्रेम करतो आहेस? अन् मग मी माझ्यावर प्रेम करत होतास ना? की ती एक फालतू गोष्ट होती? मनोरंजन, वेळ घालवण्यासाठी एक पोरखेळ नाही विपुल, नाही, माझा यावर विश्वास बसत नाहीए.’’
ती वळली. तिनं लगेच नेहाचे खांदे धरून तिला विचारलं, ‘‘नेहा, विपुल काय म्हणतोय? काय आहे हे सगळं? तो खोटं सांगतोय ना? तू खरं खरं सांग…नेहा सांग!!’’
‘‘ताई, अगं, मला ठाऊक नाहीए…माझ्या आयुष्यात काय लिहिलंय ते…मी तुला काय सांगू?’’
‘‘फक्त एवढंच सांग की तू आणि विपुल एकत्र आयुष्य घालवणार आहात का? विपुल म्हणाला ते खरं आहे का?’’
नेहानं मान खाली घातली अन् होकारार्थी हलवली. आता श्रेयाकडे विचारण्यासारखं किंवा ऐकण्यासारखं काहीच नव्हतं. डोक्यावर धाडकन् काही पडावं तसं वाटलं तिला. ती तिथून उठली अन् आपल्या खोलीत जाऊन अश्रूंना वाट करून दिली.
त्यानंतर विपुल कधी श्रेयासमोर आलाच नाही. त्यानं श्रेयाच्या बाबांजावळ नेहाशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा घरात वादळच उठलं. घरात श्रेया अन् विपुलच्या लग्नाची तयारी चालू होती अन् इथं मात्र वेगळंच घडलं होतं. घरात आधी वादळ अन् मग त्या नंतरची शांतता भरून होती.
श्रेयाला तर काय करावं, कसं वागावं समजत नव्हतं. विपुलनं लग्नाला परवानगी देत नाहीत म्हणताना नेहाला घेऊन गावच सोडलं…तो लांब कुठं तरी निघून गेला, कुठं गेला हेही फारच कमी लोकांना ठाऊक होतं.
श्रेयाच्या घरच्यांनी विपुल अन् नेहाशी संबंधच तोडले. विपुलनंही परत कधी विचारपूस केली नाही…श्रेयाची प्रेमकहाणी तिचं आयष्य उद्ध्वस्त करून संपली.
काही दिवस सगळ्यांचेच विचित्र अस्वस्थतेत गेले. हळूहळू पुन्हा आयुष्य पूर्वपदावर आलं. घरच्यांनी स्थळं बघायला सुरूवात केली अन् ज्ञानेश्वर सगळ्यांना पसंत पडला. आयुष्याचा डाव पुन्हा मांडण्यासाठी श्रेयाला स्वत:शीच खूप झगडावं लागलं. तिनं ज्ञानशी लग्न केलं पण मनातून पहिलं प्रेम जात नव्हतं. ती मोकळेपणानं ज्ञानला साथ देऊ शकत नव्हती. ज्ञानही समजूतदार होता. त्यानं श्रेयाला समजून घेतलं. सौरभचा जन्म झाल्यावर श्रेयाला आयुष्यात पुन्हा रस वाटू लागला.
सगळी रात्र जुन्या आठवणींच्या आवर्तात गेली. सकाळी उठली तेव्हा श्रेयाचं डोकं जड झालेलं होतं. कशीबशी कामं आटोपत होती. सौरभ शाळेला अन् ज्ञान ऑफिसात गेल्यावर थोडा वेळ झोपावं असा तिनं विचार केला होता. बारा वाजून गेले होते. आता आडवं व्हावं असा विचार करत असतानाचा दराची घंटी वाजली. थोडं वैतागूनच तिनं दार उघडलं अन् ती चकित झाली.
समोर विपुल उभा होता. दमलेला, थकलेला, त्रासलेला…आजारी दिसत होता. क्षणभर श्रेयाला ओळखता आलं नाही. काळे केस पांढरे झाले होते. तजेलदार रंग फिकटला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं…
श्रेयाला अवघडल्यासारखं झालं, ‘‘तू…इथं? तू माझ्याकडे कशाला आला आहेस विपुल? मला तुझ्याशी एक अक्षरही बोलायचं नाहीए.’’
‘‘खरंय श्रेया, पुन्हा नाही मी येणार…फक्त हे पत्र तुला द्यायला आलो होतो.’’ हातातलं पाकिट तिला देत तो बोलला. त्याचे डोळे भरून आले होते. पत्र तिला देऊन तो त्वरेनं निघून गेला.
श्रेया अवाक् होऊन काही वेळ तिथंच उभी होती. ज्या व्यक्तिला क्षणभरही आठवायचं नाही असं तिनं ठरवलेलं असतानाच तिच व्यक्ती तिच्या दारी आली होती. तिच्या नकळत तिच्या मनात इच्छा होती की ज्यानं तिला दुखावलं त्यालाही कधी सुख मिळू नये. पण आज त्याला अशा अवस्थेत, डोळ्यांत अश्रू घेऊन उभा असलेला बघून तिला गलबलून आलं. ती दारातून घरात आली. एक दीड तास काहीच न सुचून वेड्यासारखी या खोलीतून त्या खोलीत फिरत होती. शेवटी धाडस करून तिनं ते पाकीट उघडलं. हात थरथरत होते. बहिणीचं अक्षर बघून तिला त्या पत्राचा मुका घ्यावासा वाटला…पण दुसऱ्याच क्षणी तिरस्कार उफाळून आला. तिनं पत्र वाचायला सुरूवात केली
‘ताई, क्षमा मागायचा हक्क नाहीए मला, तरी क्षमा मागतेय…हे पत्र तुला मिळेल तोपर्यंत कदाचित मी या जगातून गेलेली असेन. इतके दिवस काही गोष्टी आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवल्या होत्या. पण आता खरं काय ते सांगते म्हणजे मी मरायला मोकळी.’’
‘‘ताई, माझं विपुलवर किंवा विपुलचं माझ्यावर प्रेम नव्हतं…नाहीए…विपुल फक्त तुझेच आहेत. तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे त्यांचं अन् म्हणूनच तुझ्या लाडक्या बहिणीचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी आपली आहुती दिली…माझ्याशी लग्न केलं. ताई कुणा एका नराधमानं मला नासवलं. त्या प्रकारामुळे मी फार कोलमडले होते. तरीही मी त्याला लग्नाची गळ घालणार होते, पण त्यापूर्वीच एका अपघातात तो मरण पावला. मी सुटकेचा नि:श्वास सोडला, पण माझ्या पोटात त्याचा गर्भ वाढत होता…मी डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यांनी मला तपासलं अन् सांगितलं की आता गर्भपात जिवावरचा ठरेल.
‘‘मी वेड्यासारखी रडत होते…काय करू सुचत नव्हतं. नेमके त्याचवेळी कुणा नातलगाला घेऊन विपुल डॉक्टराकंडे आले होते. त्या क्षणी ते भेटले नसते तर मी विष खाऊन जीव देणार होते. तसं ठरवलंच होतं, पण विपुलनं तुझी शपथ घालून खरं काय ते माझ्याकडून काढून घेतलं. मी खूप घाबरले होते. बाबांच्या इभ्रतीची काळजी होती. ते हार्ट पेशंट होते. त्यांना हार्ट अॅटक येऊ शकला असता. मी स्वत:ला क्षमा करू शकत नव्हते.
‘‘पण विपुलनं धीर दिला. यातून मार्ग काढू म्हणाले म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. माझ्या मुलाला त्यांचं नाव दिलं. इतक्या लांब बदली करून घेतली…माझ्या प्रेगनन्सीबद्दल कुणालाच काही कळू दिलं नाही.
मी विचार केला होता की सगळं व्यवस्थित पार पडलं की मी पुन्हा तुझ्याकडे येईन. खरं काय ते सांगेन. पण विपुलनं मला अडवलं. तुझं लग्न होईपर्यंत आम्ही थांबायला हवं. तुझ्या लग्नाबद्दल कळलं होतं. पण माझ्या येण्याचा अपशकुन नको म्हणून नाही आले…तुझ्यासमोर येण्याचं धाडसही नव्हतं.
‘‘ताई मला क्षमा कर. आयुष्य संपत आलंय माझं. एक गोष्ट अगदी खरी की माझी काळजी घेतली विपुलनं, माझ्या मुलाला स्वत:चं नाव दिलं, पण त्यांनी मला कधी स्पर्शही केला नाही. मलाही फक्त त्यांचा आधार मिळाला. ते तुझेच आहेत…जमल्यास माझ्या मागे त्यांची काळजी घे.’’
– तुझीच अभागी बहीण नेहा.
पत्र वाचता वाचता श्रेयाला रडू अनावार झालं. किती भोगलं बिचारीनं…अन् विपुल केवढा महान, किती त्याग केला त्यानं लाडक्या बहिणीसाठी… तिला भेटायला हवं…कुठं…कसं? विपुल तर केव्हाचाच निघून गेला होता.
अंथरूणावर पडून रडता रडता थकून तिला कधीतरी झोप लागली. पत्रं हातात तसंच होतं. तिला जाग आली तेव्हा ज्ञान ऑफिसातून परतला होता. चहा करून घेत होता. ती धडपडून उठली. तेवढ्यात चहाचे कप घेऊन ज्ञानच खोलीच आला.
‘‘चहा घे…आपल्याला जरा बाहेर जायचं आहे,’’ तो गंभीरपणे म्हणाला.
सॉरी, मी नाही येऊ शकत…’’ ती थकलेल्या आवाजात म्हणाली.
‘‘श्रेया, नाही म्हणू नकोस. तुला यावंच लागेल.’’ ज्ञानच्या आवाजात जरब होती.
जायची तर अजिबात इच्छा नव्हती. कुठं जायचं तेही ठाऊक नव्हतं. पण न जाण्याचं कारण तरी काय सांगणार होती ती? मुकाटयानं आवरून गाडीत जाऊन बसली. ज्ञान न बोलता गाडी चालवत होता. एका मोठ्या हॉस्पिटलसमोर गाडी थांबवून ज्ञाननं म्हटलं, ‘‘श्रेया, तुझ्या बहिणीला भेटून ये.’’ त्याच्या आवाजात आता जरब नव्हती, कोवळीक होती.
‘‘काय म्हणताय तुम्ही?’’ दचकून श्रेयानं म्हटलं अन् तिला एकदम रडूच फुटलं.
तिला थोपटून शांत करत तो म्हणाला, ‘‘ही वेळ बोलत बसण्याची नाही. ताबडतोब नेहाला भेट.’’ त्यानं तिला आधार देऊन गाडीतून उतरवलं.
दोघंही जवळजवळ धावतच आत गेले. वॉर्डमधल्या बेडवर नेहा अखेरचे क्षण मोजत होती. खरं तर ज्या अपराधीपणाच्या भावनेनं तिचं आयुष्य व्यापलं होतं…त्यानंच कॅन्सरच्या दुखण्याला जन्म दिला होता.
श्रेयाला बोलवत नव्हतं, पण तिचा स्पर्श होताच नेहानं डोळे उघडले…श्रेयाला बघताच तिने टाहो फोडला.
‘‘ताई, मला क्षमा कर…मी तुझी अपराधी आहे.’’
‘‘नको गं असं बोलू..दोष तुझा नव्हता, तुझ्या नशिबाचा होता. स्वत:ला दोषी मानू नकोस.’’
‘‘मी आता वाचणार नाही ताई, तुला भेटायलाच जीव अडकला होता. फक्त विपुलना क्षमा कर.’’ तिनं शेजारी उभ्या असलेल्या विपुलचा हात श्रेयाच्या हातात दिला. विपुलच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. दाटलेल्या कंठानं श्रेयानं म्हटलं, ‘‘नेहा, विपुलची तर काही चूकच नाहीए. त्यानं तर स्वत:ची आहुती दिली आहे. मी कोण त्याला क्षमा करणार?’’
नेहाच्या चेहऱ्यावर संतोष झळकला. बराच वेळ श्रेया नेहाचा हात हातात घेऊन बसली होती.
डॉक्टरांनी उपचार संपल्याचं सांगून टाकलं होतं. काही तास फार तर नेहानं काढले असते. ज्ञानेश्वरनं ही नेहाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशिर्वाद दिला. विपुलशी हस्तांदोलन करून त्यानं श्रेयाला निघायची खूण केली.
किती वर्ष उलटून गेली. लाडकी धाकटी बहीण शेवटी का होईना भेटली. मनातलं किल्मिष नाहीसं झालं. विपुलचा मोठेपणा प्रत्ययाला आला…आता मनात राग, चीड, तिरस्कार काहीही नव्हतं. फक्त प्रेम अन् प्रेमच होतं.
पण त्याच क्षणी तिला ज्ञानेश्वरचा मोठेपणाही आठवला.
‘‘ज्ञान, तुम्हाला कसं समजलं, नेहा इथं आहे?’’
‘‘अगं, तू रडता रडता झोपली होतीस, मी घरात आलो तेव्हा पत्र तुझ्या हातात होतं. मी ते वाचलं…मलाही फार वाईट वाटलं…तुझी व नेहाची भेट तर व्हायलाच हवी…मला एकदम विपुलची आई आठवली. नमनकडच्या पार्टीत त्या भेटल्या होत्या…मी त्यांचा मोबाइल नंबर घेऊन ठेवला होता. मी त्यांना फोन केला…त्यांच्याचकडून हॉस्पिटलचा पत्ता मिळाला.’’
श्रेयाच्या मनात ज्ञानबद्दल अपार आदर आणि कृतज्ञता दाटून आली. त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवून तिनं म्हटलं, ‘‘तुमचे उपकार कसे फिटतील…किती चांगले आहात तुम्ही…’’
‘‘माझे नाही, विपुलचे उपकार मानले पाहिजेत नेहा, त्यानं खरोखर फार मोठा त्याग केलाय. त्याला सांभाळणं ही आता आपली जबाबदारी आहे. त्याला एकटा पडू द्यायचं नाही. आपल्या घराशेजारीच एखादं घर घेता आलं तर आई, विपुल अन् नेहाचा मुलगा आपल्या सोबतीनं राहू शकतील.’’
‘‘ज्ञान, किती मोठं मन आहे तुमचं…माझं भाग्य म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात…माझं अन् विपुलचं नातं जेवढं मला समजलं नव्हतं, तेवढं तुम्ही समजून घेतलंत…माझी मन:स्थिती जाणून घेऊन नेहाशी माझी भेट घडवून आणलीत. नेहाच्या मृत्युनंतर विपुल किती एकटा पडेल हेही तुम्हालाच समजलं. खरोखर तुम्ही थोर आहात. मीच तुम्हाला समजून घ्यायला कमी पडले…मला क्षमा करा.’’ श्रेया भरल्या गळ्यानं म्हणाली.
ज्ञाननं हसून तिला आश्वस्त केलं. सगळीच नाती आता स्पष्ट झाली होती.
- प्रदीप धयाळकर.