Aanandi in Marathi Short Stories by राजेश जगताप - मुंबई books and stories PDF | आनंदी

Featured Books
Categories
Share

आनंदी

                          

“उजळून आलंय आभाळ रामाच्या पहारी...!!

आन् गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी..!!”

टाळाची बारीक किनकिन.. आन् जोडीला चिपळ्या वाजण्याचा आवाज कानावर पडला तशी म्या आंगावरली गोधडी फेकून दिली..

“आये...वासुदेव आलाय गं...” म्हणंत पळत पळत आंगणात गेलो.बाहेर झुंजूमुंजू झालं व्हतं.. आंगणातल्या नींबाच्या झाडावर चिमण्यांचा चिवचिवाट चालू व्हता..

डोक्यावर मोराच्या पखाची गमतीदार टोपी.. पायापवतर मळकाटल्याला पांढरा झगा.. इठ्ठालावाणी धोतर नेसल्याला, एका खांद्याला लटकावलेली झोळी, कपाळावर आन् कानाला गोपीचंदनाचा टीळा.. गळ्यात तुळशीच्या माळा, लाल काठाचं उपारणं, अनवाणी हळूहळू पावलं टाकीत..सवताभवती गोल गोल गिरक्या मारीत वासुदेव आला व्हता..निसता आला नव्हता तर आख्या गावातले वाडे आन् आळ्या जागवित आला व्हता...खोप्यातली चिमणी पाखरं जागवित आला व्हता..येलीवरल्या कळ्या आन् फुलावरल्या पाकुळ्या जागवित आला व्हता.सुर्व्यानारायणाचा सांगावा घेऊन आला व्हता... किसन देवाचं गाणं म्हणंत.. उठा उठा सांगत व्हता...

म्या बाहेरच्या वट्टयावर बसून त्याच्याकडं टक लावून पहात व्हतो.. त्याचं गाणं तसं मला समजत नव्हतं. पण ऐकाया लई ग्वाड वाटायचं..आगदी रातच्याला मला कुशीत घेऊन आई थापटंत..थापटंत म्हणती तसं.

थोडा येळ बारीक पावलांन नाचता नाचता आन् किसन देवाचं गाणं म्हणता..म्हणता.. तो दमला असावा.

“राम कृष्ण हरी...!! पांडुरंग... पांडुरंग..!!” म्हणंत माझ्या शेजारी येऊन बसला..

“बाबा तुम्हाला झोप येत न्हाई का.. एवढ्या सकाळी सकाळी येताय.. नाचून नाचून पाय दुखत्यात का न्हाई..?” म्या इचारलं

“बाळ राजं .. तुम्ही किसनदेवाचं रुप हाये.. तुम्हाला जागवायचं आसतंय..मंग झोपून कसं चालंन..? पाय बी दुखत्यात ..पण तुम्हाला पाह्यलं म्हणजी समदा शीणभार उतरून जातोय..” त्यानं हासत..हासत माझ्या डोक्यावरून कौतुकानं हात फिरावला.

“जा.. आईला सांग मला दान घाल..”

आईनं ऐकलं का काय.. काय माहित..पण सुपात जोंधळे आन् पीठ घेऊन आली.. तांब्या भरून पाणी बी आणलं व्हतं.. आईला पाहून तो उठून उभा राह्यला.. आईनं तांब्यातल़ं पाणी त्याच्या पायावर वतलं.. सुपातले जोंधळे आन् पीठ त्याच्या झोळीत घातलं.. डोक्यावरून नीट पदर घेतला. दोन्ही हातानं पदराचा शेव धरून त्याच्या पायावर डोकं ठिवलं..

“आखंड आहिव लेण्याची कारभारीण व्हयं गं मावली...!”आसा आशिर्वाद देऊन त्यानं आईला नमस्कार केला.. झोळीत हात घालून मुठभर जोंधळे परत सुपात टाकले आन् ..सुप दोन्ही हातानं वर धरून..

“दान पावलं..दान पावलं..वासुदेवाला दान पावलं...आज्या पंज्याला दान पावलं...साईत्रीचं दान पावलं ...सितामाईचं दान पावलं..” आसं म्हणंत गिरकी घेऊन तो थांबला..सुप आईला परत दिलं.

“लई दिसानं येणं केलं..” आईनं आपूलकीनं इचारपूस केली..

“लेक आलीय..बाळातपणाला..तिला आणाया गेलतो..आता तिची समदी तयारी करायची व्हती.. देवाच्या किरपानं सुखासुखी मोकळी व्हवून भरल्या कुशीनं आपल्या घरी गेली म्हणजी सुटलो..!”

“व्हईन..व्हईन..समदं ग्वाड व्हईन.. च्या देऊ का घोटभर?”.. आईनं इचारलं..

“दे..ss वं..माय आसंन तर..पाणी बी दे प्यायला...”

तव्हा त्याच्या रापल्याला तोंडामागं कष्टाचा डोंगर आन् डोळ्यात दुखाचं तळं दिसलं व्हतं..

आईनं घरात जाऊन च्या आन् पाणी आणलं..त्याला दिलं..

त्यानं.. हातात पाणी घेऊन तोंडावर मारलं..उपारण्याला त्वांड पुसलं..मान वर करून तोंडात पाण्याची धार धरून घटाघटा पाणी प्यायला...बशीत ..च्या वतून तो घोट घोट पेऊ लागला..एक एक घोट पोटात गेल्यावर शीण कमी व्हवून त्याच्या तोंडावर समाधान दिसू लागलं... कपबशी खाली ठिवून तो उठला..उगवतीला सुर्व्यानारायणाचा रथ गुलाल उधळीत निघाला व्हता.. मारवतीच्या देवळात ..ठण् , ठण् आसा घंटानाद सुरू झाला व्हता..

“येतो ss वं...मायं..!” आस् म्हणून तो चालू लागला... चालता चालता..टाळाची किनकिन आणि चिपळ्याचा आवाज सुरू झाला..

“तुळंस ..वंदावी..वंदावी...

माऊली..भक्ताची सावली..

तुळंस.. वंदावी..वंदावी...!”

गिरक्या घेत घेत.. हळुवार पावलानं तो दिसानासा झाला..

इतका येळ भरल्यालं आ़ंगण रिकामं रिकामं वाटंत व्हतं..एक श्रावण सर आवचित आली आन् मला आनंदानं भिजवून गेली व्हती. सगळं आंगण कोरडं कोरडं वाटाया लागलं व्हतं..झाडावरची पाखरं रानाच्या वाटंला लागली व्हती..

आज..आई आन् आबा रामाच्या पहा-यातंच उठले व्हते. आईची सैपाकाची लगबग चालली व्हती. आबा देवपूजा करीत बसले व्हते.. आबांनी किनकिन घंटी वाजवून देवाला हात जोडले, देवाच्या पायावर डोकं ठिवून उठले.

“जना...आवारलं काय गं..? झालं आसंन तर न्याहारी दे..म्हणजी येरवाळी जाऊन ..तिस-या पहारापावतूर परत येतो..”

“व्हयं जी..झालंच हाये.. तुम्ही बसा.. म्या न्याहारीला वाढते..”

बसता बसता आबांनं मला इचारलं “नाना.... म्या बाजारला जातोय.. येतोस का तू? “

“आबा बाजार लई लांब हाये का?”

“व्हयं..म्हणजी तीन चार कोसावर आसंन..” आबांनी सांगितलं.

आता तीन चार कोस म्हणजी किती ...? मला काय बी समाजलं न्हाई..तरी बी म्या आपलं उगाच म्हणलं..

“नको बाबा..लई लांब हाये.. माझं पाय दुखत्याल..पण बाजारातून मला खायला काय आणशील..? “

“तू सांग.. तुला काय पायजेल..?”

“मला गोडीशेव आन् रेवड्या पायजेल..बजारात मिळत्यात काय? “

“व्हयं..मिळत्यात..आणखी काय आणू..? “आबांनी इचारलं..

“आणखी काय बी नको.. मला गोडी शेव रेवड्याच पायजे..”

“बरं.. बरं.. गोडी शेव रेवड्याच आणतो..आता तरी खुश हायेस ना?” आबानं मायेनं पाठीवरून हात फिरावला.. एक मुका घेतला..

आईनं न्याहारी दिली..आबा न्याहारी करून .. बाजारला जायला निघाले..

“कोणाची छकडागाडी मिळाली तर बघा वं... “

“व्हयं.. व्हयं...पण वाट पहात थांबायचा न्हाई म्या..वाटानं चालता चालता..कोणी भेटलं तर पहातो..”

आबा बाजारला का गेलते मला काय बी ठावं नव्हतं.. आन् म्या इचारू बी कशाला.. मला गोडी शेव रेवड्या मिळणार व्हत्या.. इकडं तिकडं पोरासंग खेळता खेळता दुपार झाली.. आईनं जेवायला हाक मारली..

“नाना..ss !! चल जेवून घे.. काय भूकबीक लागती का न्हाई तुला? चल ये लवकर.. “आईनं दटावल..

म्या जाऊन तडक जेवाया बसलो..

“आरं..काय हातबीत धुवायचं का न्हाई..? कुठं कुठं..मातीत खेळून आला आसंन काय माहित.. ऊठ.. ऊठ..आदुगर.. हातपाय धुवून मगंच जेवायला बसायचं.. कळलं का?”

“पण म्या तर सकाळी आंघूळ केली .. तव्हा हात पाय बी धुतले व्हते..मग आता परत कशापायी?”मला परत ऊठायचा लई कटाळा आला व्हता..

“मग सकाळी न्याहारी बी केली व्हती ना..तरी बी आता जेवायला पायजे ना..तसंच सकाळी आंघूळ केली आसंन तरी जेवायला बसायच्या आदुगर हातपाय धुवायला पायजेल..“आईनं समजून सांगितलं..

“आई.. आबा कव्हा येणार गं..?”

“येतील तिसऱ्या पहारापवतर..का रं.?”

“न्हाई.. काय न्हाई..आसंच इचारलं..” खरं म्हणजी मला गोडीशेव रेवड्या पायजे व्हत्या.. म्हूण इचारलं व्हतं..पण आईला कसं सांगायचं..?

दुपारची कामं आवरून आई झोपली.. म्या बी तिच्या बाजूला लोळत पडलो व्हतो..पण मला झोप काय येत नव्हती..डोळ्यासमोर गोडी शेव रेवड्या लपाछपी खेळत व्हत्या.. लाल लाल गोडी शेव आन् खरपूस भाजल्याल्या पांढ-या तिळात घातल्याली गुळाची गोडी.. म्या मनातल्या मनात..रेवड्या काय भारी लागत्यात.. आसं म्हणंत व्हतो..निसत्या आठवणीनं तोंडाला पाणी सुटलं व्हतं.

“आई.. आबा कव्हा येतील गं.?” म्या आईला इचारलं..पण तिला झोप लागली व्हती.. “काय करु..? उठवू का तिला? पण नको... “आसं म्हणून म्या बाहेर गेलो.. वट्टयावर उभा राहून.. बाजारच्या वाटाकडं..मान वर करून.. करून.. पाह्यलं..पण आबा काय दिसले न्हाई..

परत घरात येऊन आईच्या शेजारी पडलो..ती कव्हा उठतीय त्याची वाट पहात व्हतो.. कव्हा तरी कुशीवर वळंन.. वळता.. वळता डोळे उघाडले तर तिला इचारता येईल.. आबा कव्हा येणार..? पण ती तशीच शांत झोपली व्हती..

घटका दोन घटका गेल्यावर आई उठली.. उन्हं पार कलली व्हती.. झाडाच्या सावल्या लांब लांब झाल्या व्हत्या.ती उठून बाहेर गेली.. म्या बी तिच्या मागं मागं गेलो...तिनं तोंडावर पाणी मारलं आन् घरात आली. म्या बी तिच्या मागं घरात आलो.. पदराला त्वांड पुसून तिनं केसांवरून फणी फिरावली, केसाचा अंबाडा बांधला.. म्या तिच्याकडं पहात व्हतो...

“काय रं नाना..? आसा काय पाहतोस? काही पायजेल का ?”

“काय न्हाई.. कुठं काय..? “

आई बाहेर जाऊन वट्टयावर बसली. म्या बी तिच्या शेजारी बसलो.. खालच्या मानानं..हळूच इचारलं..

“आई आबा कव्हा येणार..?”

“व्हयं रं आतापावतूर यायला पायजेल व्हतं..का वखुत झाला कोणा दखल..”

मावळतीला आभाळ लाल आन् निळंजांभळ झालं व्हतं.. समदे पाखरं घराकडं निघाले व्हते..आंधार पडाया लागला व्हता..आई काळजीत दिसंत व्हती. तसा वरच्या आळीचा तुकातात्या बाजारच्या वाटानं परत येताना दिसला..आई वट्टयावरुन खाली गेली.. डोक्यावरचा पदर नीट केला आन् पुढं गेली....

“तात्या..ss .. आवं .. तात्या..नानाचा बाप दिसला व्हता काय..?”

“व्हयं...दुपारच्याला दिसला व्हता..पण जरा गडबडीत दिसंत व्हता.. काय बोलणं झालं न्हाई..”

“बरं ..वैरण हाये ना तुमच्याकडं..?”

“हाये की..तुला पायजेल का काय?”

“व्हयं एक पेंढी पायजेल व्हती..”

“मंग ये घराकडं..”आसं म्हणून तुकातात्या घराच्या वाटाला निघाला..

आई बी त्याच्यासंग गेली.. घटकाभरांन वैरणीची एक पेंढी घेऊन आली.

मला आबाचा लई राग आला व्हता.. “कशाला गोडी शेव रेवड्या आणतो म्हणले..पार आंधार पडाया लागलाय आन् आजून बी आले न्हाई..आईनं काय तर वैरण आणली हाये..आता काय वैरण खाऊ..?”

आंगणातल्या नींबाच्या झाडावरचा चिवचिवाट कमी व्हवू लागला व्हता.. आई घरात गेली आन् देवापुढं दिवा लावला..हात जोडून उभी राहिली.. म्या बी तिच्या बाजूला हात जोडून उभा राहिलो..

“जना...ss.. ए ..ss नाना...!!”

आबांची हाक आली..तसा म्या बाहेर पळालो..आई बी लगालगा माझ्या मागं आली.. आन् पाहातो तर काय.. आबा हातात गायीचा कासरा धरून उभे व्हते...आईच्या तोंडावर पूनवाचा चांद उगावला व्हता..

“आबा.. कोणाची गाय हाये?” म्या इचारलं..

“आपलीच हाये....!”

“आगं..जना मला पाणी तरी दे प्यायाला..आशी काय बघतीस..? गाय कव्हा पाह्यली नाहीस का काय? “आबा लई आनांदले व्हते..

“व्हयं की..पण तुम्ही हितंच थांबा..!”आसं म्हणून आई गडबडीन घरात गेली..आबाला पाणी आणून दिलं.. परत आत गेली..

एका ताटात दिवा घेऊन आली..कुकाचा करांडा बी आणला. तांब्या भरून पाणी आन् भाकर आणली..

आईनं तांब्यातलं पाणी गायीच्या पायावर वतलं..करांड्यातलं कुकू तिच्या कपाळावर लावलं..ताट ववाळून.. भाकर तिला खाऊ घातली.. तिच्या पायावर डोकं ठिवलं..आबाच्या बी पाया पडली..उभी राहिली तव्हा आईच्या डोळ्यात पाणी आलं व्हतं..

भरल्या डोळ्यानं मला म्हणली “नाना..तु बी पाया पड...”

“म्या न्हाई.. मला शिंग मारलं तर..?”

“आरं.. न्हाई.. न्हाई..लई..ss गुणाची हाये ती..” म्हणंत..आबांनी एका हातानं कासरा धरून दुसरा हात तिच्या पाठीवर ठिवला...

म्या पुढं व्हवून घाबरत घाबरत तिच्या पायावर डोकं ठिवलं...आन् वळखत आसल्यावाणी ती मला चाटायला लागली.. म्या बी उठून तिच्या गळ्याला मिठी मारली..ती एकदम देवागत शांत उभी व्हती..

आबानं कासरा माझ्या हातात दिला आन् म्हणले.. आण तिला वट्टयावर..

म्या कासरा धरून वट्टयावर आलो तशी ती बी मागं मागं आली..घर वळखीचं असल्यागत शांत उभी व्हती..आबानं तिला खुट्ट्याला बांधलं.. दोन दिसा आदुगर आबानं वट्टयावर खुट्टा का ठोकला व्हता आन् आईनं वैरण कशाला आणली ते मला आता समाजलं व्हतं..

आईनं पाण्याची बादली भरून तिच्यापुढं ठिवली..वैरण घातली..ती तीन चार कोस चालून आल्यानं तहानली व्हती.. घटाघटा पाणी पेऊन बादली रिकामी केली.. आन् वैरण खायाला लागली..

“नाना...ए.. नाना..! “आबांची हाक ऐकून मी घरात पळालो..

आबांनी पिशवीतून एक पुडा काढून मला दिला..”वळख बघू काय हाये..”

“गोडी शेव रेवड्या...ss..” म्या उड्या मारत वट्टयावर गेलो..पूडा सोडून गायीच्या पुढं धरला..तिनं जीभ आडवी तिडवी करुन गोडी शेव रेवड्या खाऊन टाकल्या..

“आरं आरं.. नाना.. काय केल़ंस हे?” आबा हासाया लागले...

“ जे मला आवडतं ते समदं मी तिला देणार.. म्या तिचं त्वांड गॉड केलंय..”

तव्हा आई बी बाहेर आली..कौतुकानं पहात आबाला इचारलं. “कितीला मिळाली.?”

“काय इचारु नको.. तिच्या मालकानं लई जीव खालला..शंभरचे सवाशे केले, सवाशेचे एकशे चाळीस केलें, दीडशे मंग पावणे दोनशे केले पण गडी दोनशेच्या खाली उतरायला तयार व्हईना.. बरं म्या हिला पहिल्यांदा पाहिलं तव्हाच मला लई आवाडली व्हती.. पाठीवरून हात फिरावला , थोडी मान कुरवाळली तशी हात चाटाया लागली.. बाजारात आजून चक्कर मारायचा इचार करुन पुढं गेलो..तर ह्या मावलीनं दावं तोडलं आन् आली माझ्या मागं.. म्या पुढं, ही माझ्या मागं आन् मालक तिच्या मागं.. आख्खा बाजार पायाखाली घातला.. मागल्या जलमाचं काही नातं गोतं हाये का काय..कोणा दखल..पार दिस कलता कलता इस कमी दोनशेला सौदा तुटला..”

“आबा ..हीचं नांव काय हाये?”

“आरे.. पांडुरंगा.. म्या तिच्या मालकाला इचारलंच न्हाई.. आता तुच सांग काय नाव ठिवायचं..ते.”

“नाना.. म्या सांगते ऐक. तिला पाहून तुझा आबा आनांदले.. तिला पाहून तू आन् म्या बी आनांदले.. आपून तिला आनंदी म्हणायचं का?”

“व्हयं.. व्हयं..” म्या टाळ्या वाजवून उड्या मारल्या..

त्या दिसापासून ती आमची आनंदी झाली.. ती आक्शी चित्रात दाखवत्यात तशी गाय व्हती.... व्हयं..‌अगदी तशीच.. तांबूस रंगावर पांढरं ठिपकं असल्याली, मध्यम आंगकाठीची.. शिंगं एकदम सरळ आन् टोकाला झकास वळल्याली..हे हरणावाणी टपोरं डोळं..लई भारी आन् खिल्लारी दिसायची.. आंगाचा बांधा अगदी देवानं मोजून मापून घडावल्यावाणी...लई जीव लावणारी आणि शांत..

दुसऱ्या दिशी आईसंग म्या बी लवकर उठलो. दार उघडून तडक बाहेर गेलो. आनंदी आरामात बसली व्हती.. मला पाहून तिनं कान टवकारल़ं. म्या आनंदी म्हणून तिला मिठी मारली.. तशी ती उठून उभी राहिली..माझा हात चाटायला लागली..

सकाळचं आवरुन आबांनी आन् म्या न्याहारी केली. आबांनी आनंदीला सोडलं.

“जना..! म्या हिला जरा माळावरून चारुन आणतो..”

“व्हयं.. नानाला बी घेऊन जावा..”

“बरं .. बरं.. नाना चल माझ्या संग. आपून आनंदीला चारुन आणू..”

कासरा धरून आबा वट्टयाच्या खाली उतारले.. आन् कासरा माझ्या हातात दिला. आबा पुढं , म्या आन् आनंदी त्यांच्या माग माग चाललो व्हतो..घटकाभरांन माळावर पोहोचलो..आबानं कासरा सोडून तिला मोकळं केलं..माळावरचं हिरवंगार गवात ती आवडीनं खाऊ लागली..

“नाना..चल आपून तिकडं बाभळीखाली बसू..”

“आबा आनंदी पळून गेली तर..? “

“आरं कुठं जाईल ती..? सवताच्या मालकाचं दाव तोडून माझ्या मागं आलीय ती..मंग पळून कशी जाईल..? आन् नाना.. तसं बी जनावर आसलं तरी आपून त्याच्यावर इश्वास ठिवायाला पायजे..व्हय की न्हाई..?”

दोन घटका आबा आसंच मला काय काय सांगत व्हते.. काही समजत व्हतं .. काही न्हाई समाजलं..पण ते मला समजून सांगताना त्यांची कळकळ दिसत व्हती..मग मला म्हणले..

“नाना..जा ..आनंदीला वहाळावरून पाणी पाजून आण..”

“म्या एकटा कसं काय नेऊ तिला?” खरं म्हणजी म्या कधी शेळीला बी कुठ घेऊन गेलो नव्हतो.. मनातून घाबारलो व्हतो...

“बरं..चल म्या बी येतो..पण आसं घाबरून कसं चालंन .. थोडं मनानं धीट व्हायला शीक.. काय..समाजलं का?” आबांची शिकवणी चालली व्हती..

वहाळाचं खळाळतं निर्मळ पाणी आनंदी पोटभर प्याली.. म्या बी पाण्यात उतारलो. खळखळंत वाहणारं पाणी पायाला गुदगुल्या करू लागलं.. पायाजवळ चार पाच बारीक बारीक माशे दिसले.. म्या खाली वाकून दोन्ही हाताची वंजळ करून धरू पाह्यलं..पण एक बी घावला न्हाई..सुळकन् सुळकी मारुन पापणी लवायच्या आत चार हात लांब गेलं.. म्या हात पाय धुवून पाणी पेलो..आनंदीच्या आंगावर पाणी उडावलं..थंडी भरल्यागत तिनं कातडं हालावल़ं.. कासरा धरून आनंदीला बाहेर आणलं..

“नाना..तु आनंदीला घेऊन घरी जा.. म्या कोणाकडं जोंधळ्याचं धाटं, न्हाई तर उसाचं वाढं मिळालं तर घेऊन येतो..”

“पण आबा..आता तिनं प्वाटभर गवात खाल्लंय..परत उसाचं वाढं कशाला..?”

“नाना.. आपून सकाळी न्याहारी केली व्हती..मंग आता दुपारच्याला पुन्हा जेवणार का न्हाई..? आता तिचं प्वाट भरलं आसंन तरी बी तिची संध्याकाळची सोय करायला पायजेल.. जनावराला चारापाणी येळावर दिलं म्हणजी घराला बरकत येती..समाजलं ?”

मी आनंदीला घेऊन घराच्या वाटाला लागलो. पण ती वाट माहित आसल्यावाणी माझ्या पुढं पुढं चालली व्हती..तडक वट्टयावर जाऊन खुट्ट्याजवळ उभी राहिली आणि हांबारली..तिचा आवाज ऐकून आई बाहेर आली..

“नाना..हे रं काय ? ही तुझ्या आदुगर घरी आली..? तुझे आबा कुठं गेले? “

“आगं.. तिला समदं ठावं हाये..आबा गेलेत उसाचं वाढं आणायला.. मला बी भूक लागलीय..वाढ मला जेवायला..”

“थांब जरा.. तुझे आबा आल्यावर संगंच बसू...”

उसाच्या वाढ्याचा भारा डोक्यावर घेऊन आबा आले..संध्याकाळची चांगली सोय झाली म्हणंत भारा खाली ठिवला..

“कोणाकडून आणले वाढे..?” इचारता इचारता आईनं जेवायला वाढलं..

“आप्पाच्या मळ्यातून आणले.. तिला हिरवा चारा द्यायला पायजेल..तीन महिन्याची दोन जिवाशी हाये ती..” आबांच्या आवाजात काळजी आन् कौतुक दिसंत व्हतं..

“व्हय का..? बेस झालं..”आई आनांदली व्हती..

म्या हात पाय धुवून जेवायला बसलो तव्हा आई म्हणली...”आं ss.. आज दिस कुणीकडं उगावला म्हणायचं.. सकाळी आंघूळ केली नव्हती का काय ?”

आई आन् आबा दोघं बी हासाया लागले..

दिसामागून दिस जात व्हतं...आनंदीच्या येण्यानं घरात आनंद मावत नव्हता. मला तर तिच्याबिगर करमतंच नव्हतं.तिला चारायला कधी माळावर, कधी वावराच्या बांधावर घेऊन कधी आबा तर कधी म्या घेऊन जात व्हतो. कव्हा कव्हा आई आन् आबा तिच्यासाठी घरीच काहीतरी हिरवा चारा घेऊन येत व्हते. समद्याला लळा लागला व्हता.कोणी बी जाता येता तिला हाक मारल्याबिगर पुढं जात नव्हतं. कोणी तात्या,कोणी दादा, कोणी मोठ्याबा म्हणून आबाला हाक मारून इचारायचे .. एवढी गुणाची गाय कुठं घावली?

एका दिशी आई आबाला म्हणली, “आनंदीचं दिस भरत आल्यात.तिच्यासाठी वट्टयावर काही तरी आडूसा करायला पायजे.” आबानं लगबगीनं तिच्यासाठी ऊसाचं चिपाड घालून आडूसा तयार केला व्हता.

दोन-चार दिसं लोटलं.. रातची जेवणं झाल्यावर आई, आबा आन् म्या वट्टयावर बसलो व्हतो.. आभाळात जोंधळ्याच्या भाकरीवाणी पांढरासुत चांद उगावला व्हता.. आख्या आभाळात मोग-याच्या फुलावाणी चांदण्यांच्या सडा पडला व्हता.. कोणी चमचम चमकत व्हती तर कोणी एखाद्या साधूवाणी डोळं मिटून शांत बसली व्हती. चंद्रावर कधी वडाचं झाड दिसतं व्हतं तर कधी हारणाची गाडी दिसत व्हती..मधीच कापसाची म्हातारी उडत उडत आल्यावाणी ढगाचा तुकडा इकडून तिकडं जात व्हता..आई उठली आन् मला एक टपली मारली..

“नाना..चल झोपायला..रात झालीयं..”

“थांब ना थोडा येळ.. आभाळात चांदण्या काय भारी दिसत्यात..”

“मग तू बस.. म्या जाते..झोप आल्यावर ये घरात..”आई नाराज झालेली पाहून म्या गुमान तिच्या मागं मागं गेलो.. आई मला कुशीत घेऊन थापटंत व्हती. म्या डोळं मिटून आभाळभर पसरल्याल्या चांदण्या बघता बघता कव्हा झोपलो कळलं बी न्हाई..

सकाळी नेहमीसारखा चिमण्यांचा चिवचिवाट चालू व्हता. आई आन् आबा बी उठले व्हते..पण आईची काही तरी लगबग चालली व्हती..ती सारखी बाहेर जात व्हती. घरात येऊन काही तरी घेऊन परत बाहेर जात व्हती.. म्या उगाच तोंडावर पांघरूण घेऊन झोपल्यावाणी करीत पडून व्हतो..

“काय कापसावाणी पांढरं पांढरं दिसतंय..”आईचा आवाज..

“व्हयं .. व्हयं..जसा काय ससा..”आबांचा आवाज..

“पांढरा..पांढरा..ससा..?” म्या तोंडावरली गोधडी बाजूला सारली ..तडक उठून आईला हाक मारुन इचारलं..”आई.. कुठंय गं ससा..?”

“ये.. बाहेर..हा बघ वट्टयावर बसलाय..”आई हासायला लागली..

म्या बाहेर पळालो..पण ससा कुठं दिसला न्हाई..”कुठंय ससा..? “

“हा काय.“म्हणून आईने आनंदीकडं बोट दाखवलं..

तिच्या पोटाखाली काही तरी पांढरं दिसलं..नीट पाहिलं... “आं..ss वासरू..? आई .. वासरू.. कोणाचं हाये गं.?”

“आनंदीचं हाये..” आईच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता..

“आनंदीचं..? रातच्याला तर नव्हतं..मग आता कुठून आलं..?” म्या आईला इचारलं.

“आरं..राती तु चंद्राला बघत बघत झोपला का न्हाई..मग त्यानंच आणून ठिवलंय तुझ्यासाठी..”

“म्या त्याला हात लावू काय?”

“थांब जरा.. “आसं म्हणून आबांनी त्याला उचलून घेतलं.. आन् माझ्याजवळ ठिवलं.खरंच सशावाणी पांढरं.. पांढरं व्हतं.. इवलेसे डोळे, इवलेसे कान आन् शेपटी.बारीक काठीवाणी पाय..लई ग्वाड दिसत व्हतं..

“ते लहान हाये..लांबूनच बघ..हात नको लावू..” आईनं सांगितलं.

“आई..एकदा हात लावून बघू काय..? “

“बरं..बरं..पण एकदाच हां.”

म्या त्याच्या पाठीवर हात फिरावला..कापसावाणी मऊ..लागलं. त्याला उचलून घ्यावं आसं वाटलं..पण नको आई वराडली तर..

त्याचं नाव आबानी ठिवल..कान्हा..!!

आता रोज सांजच्याला आई धार काढायची तव्हा आनंदी गपगुमान उभं राहायची..कंधी बी पाय इकडं तिकडं केला न्हाई. ..आई धार काढायची तव्हा मला लई मज्जा वाटायची..सडाला धरुन पिळल्यावर तीन चार धारा एकदम चरवीत पडायच्या.. तव्हा जो चssर...चssर..आसा आवाज यायचा तो ऐकाया लई भारी वाटायचा.. दूध काढून झाल्यावर आई मला ताजं ताजं दूध प्यायला द्यायची..पण मला आवडंतच नव्हतं..दूध प्याल्यावर प्वाट फुगायचं... तरी बी आई बळबळ एक कप दूध प्यायला द्यायची...

एक दिस म्या आईला म्हणलं..”आई मला नको दूध देऊ ..त्याच्या परीस कान्हाला दे..”

“व्हयं त्याला बी देतेच की.. त्याच्या आईचं दूध हाये. म्हणजी पहिला हाक त्याचाच हाये.. त्याचं प्वाट भरल्यावरच म्या आपल्यासाठी घेती..”

दिवाळीत भाऊबीजाला आत्या आली..तिनं कान्हाला पाह्यलं..लई हाराकली आन् आबाला म्हणली..

“दादा वासरू लई भारी हाये..मोठा खोंड झाल्यावर कामाला ऐकायचा न्हाई बघ..”

“व्हयं.. व्हयं..म्हूण तर समदं दूध त्यालाच पाजतोय..”

आबाची ववाळणी करायला आत्यानं पाट मांडला..पाटाभवती रांगूळी काढली..ववाळणीचं ताट तयार करून तिनं आबाला पाटावर बसावलं..आबाच्या कपाळावर गंधाचा टीळा लावला..ताट ववाळून.. ताटातला रूपाया कपाळावर लावला.आबाला एक नारळ आन् करगूटा दिला..करंजी फोडून आर्धी आबाला भरावली.. ताटात ववाळणी घालण्यासाठी आबानं खिशात हात घातला..तसा आत्यानं आबांचा हात धरला..

“दादा..या वख्ताला मला खिशातली ववाळणी नको..”

“ववाळणी नको ..? आसं काय म्हणतीस आक्का.. रिकामं ताट कसं जाऊ देवू?”

“म्या ववाळणी नको आसं कव्हा म्हणलं? म्या खिशातली ववाळणी नको आसं म्हणलंय..”

“म्हणजी .. मग काय? म्या काय समाजलो न्हाई..!”

“आरं दादा..म्हणजी या वख्ताला ववाळणी म्हणून तुझं वासरू पायजे..”

आत्याची मागणी ऐकताच आबानी आईकडं आन् माझ्याकडं पाहिलं..आईचे डोळे पाणावले व्हते..

“आक्का एवढ्या बारीला नको.. पुढच्या येळाला जे वासरू व्हईल ते म्या सवता तुझ्या दारात आणून बांधील..”

“दादा.. म्या ववाळणी मागितली हाये.. आता तुला वाटंत आसंन म्या रिकामं ताट घिवून जावं तर तुझी मरजी.. आन् तसं बी पुढच्या बारीला कालवड झाली तर?..मला खोंड पायजे..म्हूण पुढं जे काय व्हईल ते आन् त्याच्या बी पुढलं समदं तुलाच ठीव..”

भरल्या मनानं आबा म्हणले..” बरं ..घिवून जा..पण तीन चार महिनं थांब..आजून सडाच वासरू हाये ते..”

“म्या कव्हा म्हणले..आताच घिवून जाते.. आता मी शिमग्याला येईन.. तव्हाच घिवून जाईन..तवसर त्याला दूध पेवू दे..झालंच तर हिरवा चारा बी खाऊ घाल..चांगला पोसाया पायजे..”

दिवाळी उलटून दोन महिने झाले व्हते..एक दिस आबाला बरं वाटंत नव्हतं. मला त्यांनी खळ्यातून कोरफडीचं पान आणाया सांगितलं. म्या पळत पळत जाऊन कोरफडीचं पान आणलं.आबांनी त्याच्यातला गर काढून दोन तुकडे आशेच गिळले..हे त्यांचं नेहमीच औषध व्हतं..

एकाचे दोन, दोनाचे चार दिस झाले..पण आबाला बरं वाटत नव्हतं..ताप उतरतंच नव्हता. भाकर तुकडा बी खात नव्हते..त्यांचा एक मैतर व्हता..इठूबा..तो काही तरी झाडपाल्याचं औषध देत व्हता.. त्यानं आईला कशाचा तरी कढा करून द्यायला सांगितलं..

एकामागून एक दिस जात व्हते..पण आबा उठत नव्हते..पाणी बी घशाखाली उतरत नव्हतं..आई सकाळी नेहमीसारखी लवकर उठली..तिनं आबाला हाक मारली..

“आवं..उठता का...च्या देती..घोटभर घ्या..!”

पण आबाचा आवाज आलाच न्हाई..जवळ जाऊन तिनं आबाला हलवून परत हाक मारली..

“आवं..उठा..च्या देती..”

पण आबाचा आवाज आलाच न्हाई.. आईनं परत हालवून हाक मारली..

“आवं उठा..!..आवं..”

पण आबा उठलेच न्हाई.. आन् आईनं हंबारडा फोडला..भितीवर हात आपटून बांगड्या फोडल्या..आई आसं का करतीय मला काहीच समजत नव्हतं..

आईच्या रडण्याच्या आवाजानं शेजारच्या आया बाया गोळा झाल्या. त्या बी रडाया लागल्या.. आईच्या कपाळावरलं कुकु पुसलं.आख्खा वाडा गोळा झाला.. म्या येड्यावाणी कोपऱ्यात उभा राहून पहात व्हतो.. काय झालंय काहीच कळत नव्हतं.. तव्हा एका काकूनं मला जवळ घेतलं आन् म्हणली..

“नाना.घाबरू नको.. आबा देवाघरी गेल्यात..”

“आबा देवाघरी गेले म्हणजी..? कुठं हाये देवाचं घर .. मला बी आबाकडं जायाचं हाये..”

“आसं बोलू न्हाई लेकरा.. लहान पोरांना न्हाई जाता येत तिकडं. लई लांब हाये ते..जा तू बाहेर खेळ जा..”

 घटकाभरात आमच्या आंगणात आख्खा गाव गोळा झाला.. भजनी मंडळी बी आले.. त्यांचं भजान चालू व्हतं..

“आम्ही जातो आमुच्या गावा..आमचा राम..राम ..घ्यावा..”

दुपारच्याला आत्या आली..ती बी रडाया लागली..एखादी नवीन बाई आली की आई पुन्हा रडत व्हती..दिस कलांडला.. आबाला आंगणात आणलं..आंघूळ घातली.. बांबूची शीडी केली..तिच्यावर आबाला ठिवलं.. मडक्यात इस्तू ठिवून माझ्या हातात दिलं आन् पुढं चालाया सांगितलं..समदे आबाला घिवून माझ्या मागं मागं येत व्हते..समदे गावाबाहेर एका ठिकाणी पोहचले.. तिथं एकावर एक लाकडं रचून ठिवले व्हते.. आबाला शीडीवरुन उचलून या लाकडावर ठिवलं. परत त्यांच्या आंगावर लाकडं ठिवले.इतके सगळे लोकं आलेत आन् तरी बी आबा उठत का नाही काही समजत नव्हतं..एकानं एका लाकडाला आग लावून माझ्या हातात दिलं.. मला हाताला धरून आबाला फेरी मारली.. आन् माझ्या हातानं त्या लाकडाला आग लावली..

“आरे..आरे .‌माझे आबा.. त्यांना भाजंल की..” आसं म्हणून म्या तिकडं धाव घेतली..दोघा तिघांनी धरून मला ओढत बाजूला नेलं.. घटकाभर थांबून मला घेवून समदे घरी आले.. घरात बाया आईभवती गोळा व्हवून रडतंच व्हत्या..माझ्या आबांना या लोकांनी तिकडं नेऊन आसं का केलं..? समद्याचा लई राग आला व्हता.

थोड्या दिसांनी आईनं आन् वाड्यातल्या चुलत्यांनी मिळून सगळ्या गावाला जेवायला बोलावलं.. कोणी तरी येत व्हतं.. जेवून जात व्हतं..आई तशीच रडत व्हती..ती माझ्याशी बोलंतही नव्हती.. मला कुशीत घेऊन झोपतही नव्हती..माझे आबा मला परत कधीच दिसले न्हाई..

आनंदी चारा खात नव्हती.. पाणी पेत नव्हती.. कान्हा तिच्या शेजारी गपगुमान उभा असायचा.. अशीच एका दिशी आत्या आली आन् कान्हाला घेऊन गेली..

“म्या आईला इचारलं..आई आत्या कान्हाला शिमग्याला घेऊन जाणार व्हती ना..?”

“व्हयं..पण जाऊ दे..तुझ्या आबाची ववाळणी व्हती..आज ना उद्या कव्हा तरी द्यायचीच व्हती..”

आता ..आंगणात कान्हा बिगर आनंदी एकटीच व्हती.. घरात आई आन् म्या एकटा व्हतो.. एका दिशी आईनं गावातल्या गुराख्याला बोलवून आनंदीला त्याच्याकडं राखायला दिली.. मला बी साळात घातलं व्हतं..आनंदी गुराख्याकडं..आई कोणाच्या तरी मळ्यात रोजानं कामाला आन् म्या साळात.. आसं तीन ठिकाणी तिघं झालो व्हतो..घर मातुर व्हतं तिथंच उदास व्हवून बसलं व्हतं..

गुराखी रोज सकाळी आनंदीला घेऊन जात व्हता . सांजच्याला आणून सोडीत व्हता.. एका दिशी आनंदी घरी आलीच न्हाई.. आईनं इकडं तिकडं इचारलं तव्हा तिला कोंडवाड्यात ठिवल्याचं समाजलं.. कोणाच्या तरी पिकात शिरली व्हती म्हणं दोन रुपये दंड भरून तिला सोडावलं..

शिमगा गेला, पाडवा जाऊन पावसाळा सुरू व्हवून दोन महिने उलाटले व्हते.. रानं समदे हिरवंगार झाले व्हते.घट बसले व्हते..आन् पहिल्या माळीला पावसाला सुरुवात झाली..आई म्हणली..

“आता ह्यो बाबा माळात आडाकला तर दस-यापवतर जायाचा न्हाई.”

आन् तसंच झालं..पावसाची झड लागली दिसभर आन् रातच्याला बी सारखी रिपरिप चालली व्हती.. समदं घर गळाया लागलं व्हतं.. जिथं जिथं गळत व्हतं तिथं आईनं कुठं परात, कुठं कळशी, चरवी, बादली, झालंच तर एखादं मडकं आशे समदे भांडे ठिवले व्हते..पण आख्खं घर वल्लं झालं व्हतं.. वट्टयावर आनंदीच्या आंगावर आईनं पोतं घातलं व्हतं.. ते बी समदं भिजलं व्हतं..

तिसऱ्या माळीला सांजच्याला आनंदी घरी आलीच न्हाई.. आईनं गुराख्याला इचारलं, कोंडवाड्यात पाहिलं पण ती कुठंच घावली न्हाई.. दुसऱ्या दिशी कोणी तरी ती वहाळाच्या शेजारी पाहिल्याचं सांगितलं..

आई तडक तिकडं गेली. आनंदी तिथं बसली व्हती.आईनं हाक मारल्यावर हांबारली. पण ती उठली न्हाई.. आईनं जवळ जाऊन पाहिलं. तिचा खुबा सूजला व्हता.शेजारच्या मळ्यातून आप्पा पाटलांच पोरगं आलं.त्यानं गुराख्यानं तिला खुब्यावर काठी मारल्याचं सांगितलं.तिथं जखम झाली व्हती.त्यानं आईला मदत करून आनंदीला कसंबसं उभं केलं..लंगडत लंगडत ती आईसंग घरी आली..पण वट्टयावर चढता येईना म्हूण आंगणातच बसली..

आईनं गरम पाण्यानं तिचा खुबा शेकला..पण ती वरडत व्हती.. चारा खात नव्हती .. पाणी पेत नव्हती..जखम चिघळत चालली व्हती.. पाऊस थांबत नव्हता.. आईनं तिच्या आंगावर दोन पोते घातले.. गोधडी घातली..पण ती भिजंतच व्हती..जखम लई चिघाळली. तिच्यात किडे पडले व्हते..

एका रातीला कुत्र्यांनं मासाचा लचका तोडला..जखम आणखी मोठी झाली.. रातभर वरडत व्हती.. सकाळी आईला आन् मला पाहिल्यावर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाण्याची धार लागत व्हती..आई सगळे उपाय करून थकली..कशानंच आराम पडत नव्हता..रोज रातच्याला कुत्रे लचके तोडीत व्हते..जखमेत पाणी जाऊन आख्खा खुबा सडला व्हता..नववी माळ संपली..

उद्या दसरा.. पाऊस थांबत नव्हता.. आनंदीनं अन्नपाणी सोडलं व्हतं.. कापडाच्या बोळ्यानं आई तिला पाणी पाजीत व्हती.. सकाळी म्या आन् आई आंगणात गेलो.. आम्हाला पाहून आनंदीच्या डोळ्याला पाण्याची धार लागली..तिनं एकच हंबारडा फोडला आन् मान टाकली... दस-याची दहावी माळ आनंदीच्या गळ्यात पडली..पावसाची रिपरिप थांबली व्हती..आंगण, वट्टा आन् घर समदं सुनं सुनं झालं व्हतं..आबा गेले, कान्हा गेला आन् आज आनंदी गेली..पाऊस पण गेला.. म्या आईच्या पदराला धरून उभा व्हतो.. तिच्या डोळ्यातलं पाणी गेलं नव्हतं.. ते तसंच कायमचं वहात राहणार व्हतं...

.... राजेश जगताप- मुंबई

9821435129