The way to know God... in Marathi Spiritual Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | परमेश्वर जाणण्याचा मार्ग...

Featured Books
Categories
Share

परमेश्वर जाणण्याचा मार्ग...




*परमेश्वर जाणण्याचा मार्ग !*
______________________
संकलन: - मच्छिंद्र माळी, छत्रपती
संभाजीनगर.

जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो; स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा 'अमक्या न्यायाधिशाने निकाल दिला' असे म्हणतो. म्हणजेच काय की, तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले, त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. म्हणूनच, सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असे सांगतात त्याचेही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही, आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असे असते, अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे. तशी इच्छा झाल्यावर, देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल; कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल, कुणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे. तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल; कुणी याग, कुणी हठयोग, तर कुणी जपतपादि साधने सांगतील. अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावे ? तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला आहे, त्यांनी काय केले ते पाहावे. असा मार्ग कुणी चोखाळला ? तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे. म्हणून ते काय सांगतात ते पाहावे.

आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथे चार वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात, आणि जिकडे जायचे ते त्यावर लिहिलेले असते. समजा आपल्याला पंढरपूर जायचे आहे; आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का ? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे, तसेच आपले झाले आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत, आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत. म्हणूनच, संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा, आणि तो मार्ग जरी कठीण वाटत असला, तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावे.
तात्पर्य - संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भितीच नाही.
_________________________________


" गीता म्हणजे कृष्णाचा अर्जुनाला उपदेश"
____________________________________
ज्ञानेश्वरीचा एक महत्त्वाचा विशेष असा की, या ग्रंथात श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील प्रेमाचे मोठे हळुवार वर्णन वारंवार आले आहे. अर्जुन मोहग्रस्त आहे. या मोहामुळे तोच परमात्म्याला ज्ञान सांगत आहे, असे असले तरी परमात्म्याचे चित्त अर्जुनाविषयी अत्यंत प्रेमळ आहे. अशा या प्रेमळ सख्याला – म्हणजे श्रीकृष्णांना – अर्जुन म्हणाला, देवा, आतापर्यंत तुम्ही म्हणालात ते सर्व मी नीट ऐकले आहे. ब्रह्मस्थितीत त्याचे कर्म व कर्ता यांपैकी कांहीच उरत नाही असे तुमचे मत दिसते. तर मग तुम्ही मला युद्ध करण्याचा आग्रह का करता ? माझ्याकडून युद्ध करवून घेण्यात तुम्हांला कसलाच संकोच वाटत नाही का ? असे हे हिंसात्मक कर्म तुम्ही माझ्याकडून का करवून घेता ? देवा, तुम्ही कर्माचा लेशही उरू नये असे म्हणता आणि माझ्याकडून युद्ध करविता, याचा मेळ कसा बसावा ?
" देवा, तुमच्या अशा संदिग्ध बोलण्यामुळे माझ्यासारख्या अज्ञानी माणसाने काय करावे ? माझ्यात आता विवेक निर्माण होईल अशी आशाच खुंटली आहे. तुमच्या बोलण्याला जर उपदेश म्हणावा तर मग आणखी दुसरा भ्रम तो कोणता ? अशा उपदेशाने आत्मबोध कसा होणार ? वैद्य पथ्य सांगतो, पण तोच जर विष देईल तर रोग्याचा दोष कसा दूर होणार ? आंधळ्याने आडमार्गाला जावे किंवा माकडाला दारू पाजावी, त्याचप्रमाणे देवा, तुमच्या उपदेशामुळे माझे झाले आहे, मी अज्ञानी आहे. तुम्ही योग्य विचार सांगाल असे वाटले, पण नवल असे की देवा, तुमच्या विचारांत गुंताच अधिक दिसतो. आम्ही तुला सर्वस्व अर्पण करावे आणि तूच जर असे बोलावेस तर सर्व संपलेच नाही का ?


🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩