अव्यक्त प्रेमाची कथा.
पात्र रचना
संदीप आपल्या कथेचा नायक.
सुशीलाबाई संदीपची आई.
केशवराव संदीपचे वडील.
अभय संदीपचा मोठा भाऊ.
अश्विनी अभयची बायको.
रामलिंगम संदीपचे सहकारी.
रमेशकुमार संदीपचे सहकारी.
प्रसाद संदीपचे सहकारी.
विश्वनाथन साहेब कंपनीचे उपाध्यक्ष
शलाका आपल्या कथेची नायिका
भाग १
दंगा पेटला होता आणि गुंडांच्या हातात सापडू नये म्हणून शलाका सैरा वैरा पळत सुटली होती. पळता पळता, त्या अंधुक उजेडात तिला दिसलं की, एका दुकानात एक माणूस दार उघडून आतल्या खोलीत जातो आहे, शलाकाने क्षणाचाही विचार न करता तिकडे मोर्चा वळवला आणि त्या माणसाला ढकलून आत शिरली आणि दार खेचून लावून घेतलं. आत मधे पूर्ण काळोख होता. ज्याला ढकललं, तो माणूस आत कशावर तरी धडकला, आणि खाली पडल्याचं तिला जाणवलं. या सर्व पळापळीत शलाकाला धाप लागली होती आणि तिचा श्वास जोरात चालू होता.
पांच एक मिनिटं तशीच गेली, शलाकाला वाटलं होतं की हा माणूस आपल्यावर चिडणार, आणि तिने त्यांची तयारी पण ठेवली होती. पण दहा मिनिटं झाली तरी काहीच प्रतिसाद नाही, शलाका घाबरली, हा माणूस मेला तर नसेल ना? माझ्या धक्क्या मुळे कशावर तरी आदळल्याचा आवाज झाला होता, बेशुद्ध झाला असेल का? या विचारांनी ती अजूनच घाबरली. पण मग तिने जरा धीर केला आणि अगदी हलक्या आवाजात विचारलं “आप ठीक तो हैं ना?”
“मैं ठीक हूँ, और आपभी बात मत कीजिए, आवाज बाहर जाएगी, तो लोग अंदर घुसनेमे देर नहीं करेंगे.” – तो माणूस म्हणजे, संदीप म्हणाला. मग कोणीच काही बोललं नाही पण शलाका आता आश्वस्त झाली की अंधाराचा फायदा घेत नाहीये, त्या अर्थी माणूस चांगला आहे आणि त्याला काही लागलेलं नाहीये.
मग बराच वेळ तसाच गेला. बाहेर गोंधळ चालू होता आणि त्याचा आवाज आतमधे ऐकू येत होता. दोघंही जीव मुठीत धरून बसले होते. आपणहून स्वीकारलेला बंदीवास होता हा, किती वेळ असंच अडकून पडावं लागणार आहे हे कोणालाच कळत नव्हतं. शलाका मांडी घालून बसली होती, पण बराच वेळ तसंच बसल्याने त्रास व्हायला लागला होता, म्हणून तिने पाय लांब केले, पण लगेच जवळ घेतले कारण तिचा पाय संदीपच्या पोटाला लागला. “सॉरी, काहीच दिसत नाहीये, म्हणून तुम्हाला पाय लागला सॉरी” शलाका हिंदीत बोलली.
“नो प्रॉब्लेम, तुम्ही पाय लांब करा, नाहीतर अखडून जातील. जागा खूपच छोटी आहे, तुम्ही आरामशीर पणे बसा, कारण किती वेळ असं बसावं लागणार आहे हे माहीत नाही. सकाळी कदाचित पोलिस येतील, मगच आपण बाहेर पडू शकू.” संदीपने हिंदीतूनच उत्तर दिलं. रात्र चढत होती पण गोंधळ काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. मधे मधे थोडं शांत व्हायचं पण पुन्हा दुसरी टोळी यायची, आणि फुटलेल्या दुकानांना पुन्हा फोडून चालली जायची. हे ज्या दुकानात लपले होते, त्या दुकानावर चार वेळा तरी टोळ्या येऊन गेल्या, उरलं सुरलं सामान बघून त्यांची वाट लावून गेल्या. प्रत्येक वेळेस आतमधे दोघेही श्वास रोखून बसायचे. दम कोंडला जायचा पण जीव वाचवायचा, तर दूसरा इलाज नव्हता.
रात्री केंव्हा तरी पांच सहा जण आरडा ओरडा करत आले. दुकानात शिरले आणि अर्वाच्य भाषेत शिव्या घालत दारूची बाटली एक एक घोट घेऊन, आपसात फिरवत होते. ते टगे लोकं दारू पिऊन धिंगाणा घालणार, हे आता पर्यन्त संदीपच्या लक्षात आलं. होतं. शलाका त्यांच्या शिव्या ऐकूनच घाबरली, ती थोडं संदीपच्या बाजूला सरकली आणि विचारलं की हे लोकं काय करताहेत? संदीपने हळूच शलाकाच्या जवळ झुकून हलक्या आवाजात, म्हणाला “हे लोकं इथेच दारू पित बसले आहेत, घाबरू नका. पण शलाका दारू पिताहेत म्हंटल्यावर सॉलिड घाबरली. ती अजूनच संदीप जवळ सरकून बसली. आणि संदीपचा हात घट्ट धरून बसली. तसा संदीप पण तिच्या साठी अनोळखीच होता, पण गेले किती तर तास दोघे अत्यंत विपरीत परिस्थितीत बरोबर होते, त्याचा सहवास तिला आश्वासक वाटला होता.
अचानक बाहेरचा आवाज वाढला, त्यांची आपसातच भांडणं सुरू झाली. आणि अशातच शलाकाला शिंक आली. तिने ती रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण दबलेल्या आवाजात शिंक बाहेर पडलीच. तो आवाज ऐकला, आणि बाहेर पीनड्रॉप सायलेंस झाला. कोणी तरी विचारलं की कसला आवाज झाला म्हणून. “अंदरसे आया” कोणी तरी उत्तर दिलं. आणि मग सगळे जण शोधायला लागले. कोणाला तरी तो दरवाजा सापडला त्यांनी दरवाजा उघडला आणि अंधुक प्रकाशात त्यांना एक माणूस आणि एक मुलगी दिसली.
“अरे यार ये तो जॅकपॉट लग गया.” एक माणूस म्हणाला आणि त्या लोकांनी शलाकाला फरफटत बाहेर आणलं. आता पुढे त्यांचा काय विचार आहे, याची सांदीपला कल्पना आली. शलाका जिवाच्या आकांताने त्यांच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होती. संदीप काही लेचा पेचा नव्हता. दोघा जणांना नक्कीच भारी होता. आणि आता तर ती मुलगी एका भयंकर संकटात असतांना, त्याने चूप बसणं शक्यच नव्हतं. संदीप धावला आणि त्यांनी दोघांवर हल्ला केला, एकाला खाली पाडलं आणि पायांनी तुडवला, दूसरा अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दचकला आणि मागे सरकला. त्या एका क्षणापूरती शलाका त्यांच्या पकडीतून सुटली, “रुको मत, भागो” संदीप ओरडला. संदीपची त्यांच्याशी मारामारी चालूच होती. कुठून तरी हा आरडा ओरडा ऐकून अजून दोघं जण तिथे येऊन पोचले, त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला.
सहजा सहजी चालत आलेली सुवर्ण संधि सोडायला कोणीच तयार नव्हतं. त्यांनी धावत येऊन अतिशय तत्परतेने शलाकाला पकडलं आणि दाबून धरलं. शलाकाला पकडलेली पाहिल्यावर सर्वांनाच चेव आला आणि त्यांनी संदीपची धुलाई सुरू केली. संदीप खरं तर पळून जाऊ शकला असता, पण शलाका गुंडांच्या तावडीत असतांना, पळून जाण्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात आला नाही. गुंडांच्या आता लक्षात आलं होतं, की जो पर्यन्त हा माणूस उभा आहे तो पर्यन्त ते शलाकाला हात लावू शकणार नाही, मग त्यांच्या पैकी दोघा जणांजवळ लोखंडी कांबी होत्या, ते समोर आले आणि बाकी दोघांनी संदीपला पकडून ठेवलं. त्या दोघांनी अत्यंत निर्घृण पणे हातातल्या लोखंडी कांबीने संदीपच्या शरीरावर अनेक प्रहार केले. संदीप लोळा गोळा होऊन रक्त बंबाळ अवस्थेत खाली पडला. त्याच्या डोक्यावर मार लागला होता आणि डोकं फुटून रक्त स्त्राव होत होता. शलाका हे सगळं पहात होती आणि किंचाळत होती.
संदीप अतीव वेदनेने खाली पडला, मग त्या लोकांनी शलाकाकडे मोर्चा वळवला. शलाकाने त्यांच्या हातून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण गुंडांच्या पुढे तिचे सर्व प्रयत्न तोकडे पडले. शलाका ऐकत नाही हे बघितल्यावर त्यांनी तिला गुरा सारखं बडवलं. शेवटी सहन न होऊन शलाका निपचित पडली. तिला तसंच खाली सोडून दिलं आणि कोण पहिला कोण दूसरा याबद्दल चर्चा सुरू झाली. संदीप हे सगळं पाहत होता, अतिशय अगतिक झाला होता, काहीच हालचाल करण्याच्या पलीकडे त्यांची अवस्था झाली होती. निमूटपणे जे घडतेय, आणि जे घडणार आहे, ते पाहण्या शिवाय काहीही करायला त्याच्या जवळ सामर्थ्य उरलं नव्हतं.
“अरे, या पोरीच्या बॉय फ्रेंड ला जवळ खेचा, त्याला पण पाहू द्या, त्याची गर्ल फ्रेंड कशी दिसते ते.” कोणी तरी एक जण हिंदीतूनच म्हणाला. मग दोघा जणांनी संदीपला फरफटत शलाकांच्या शेजारी ओढलं. आता त्या लोकांनी शलाकाच्या अंगावरचे कपडे काढायला सुरवात केली. तिची होत असलेली विटंबना, पाहणं संदीपला अशक्य झालं. त्यांनी डोळे मिटून घेतले आणि काही क्षणातच तो अति रक्त स्त्रावांमुळे बेशुद्ध झाला. उरलेली रात्र शलाकासाठी नरक यातना देणारी ठरली. केंव्हा तरी ती बेशुद्ध पडली, पण त्या लोकांना त्याचं काही सोयर सुतक नव्हतं.
“अरे, ये तो मर गई” कोणी तरी उद्गारलं.
“तुला काय करायचे, तू आपलं काम कर मी लायनीत उभा आहे. ती मेली तर आपल्याला काय फरक पडणार आहे? मरु दे.” दुसर्याने तितक्याच तत्परतेने उत्तर दिलं.
आता उजाडलं होतं आणि दिवसाच्या प्रकाशात गुंडांना तिथे थांबणं धोक्याचं वाटलं म्हणून सर्वांनी तिथून पलायन केलं. संदीप आणि शलाका दोघंही बेशुद्ध होते. संदीप रक्त बंबाळ अवस्थेत होता, आणि शलाकाची अवस्था अत्यंत वाईट होती.
लाऊड स्पीकर वर करफ्यू ची घोषणा करत एक पोलिस व्हॅन त्या रस्त्यावर आली आणि त्यांना संदीप आणि शलाका दिसले, त्यांनी ताबडतोब अॅम्ब्युलन्स बोलावली. दोघा जणांना उचलून घेऊन गेले आणि हॉस्पिटल मधे अॅडमिट केलं. हॉस्पिटल मधे इतकी गर्दी होती, की दोघांना वेग वेगळ्या हॉस्पिटल मधे अॅडमिट करावं लागलं.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com