Labadi in Marathi Short Stories by राजेश जगताप - मुंबई books and stories PDF | लबाडी

Featured Books
Categories
Share

लबाडी

 

 

          .... लबाडी .....

..कॉक्..कोकॉक.. कोss...

पहिला कोंबडा आरावला .. आन् धनगाराची आनशी उठली.. बाहेर आली.. आभाळाकडं पाहिलं.. मोग-याच्या फुलावाणी पांढरासुत चांदण्याचा सडा पडला व्हता.. तीन कांडं आन् बाजलं कललं व्हतं . सुक्राची चांदणी चंद्राला पाहून खुदकन हासत व्हती....पण आज आनशीला हासायला येळ नव्हता.. तिचा धनी आंगावर घोंगडं पांघरून बाजल्यावर निवांत झोपला व्हता..आनशीला पाहून बाजल्याखाली आंगाचं मुटकूळं करून झोपल्यालं वाघ्या कुत्रं बाहेर आलं.. मागचे पाय मागं आन् पुढचे पाय पुढं लांब ताणून आळस झटकून आंग मोकळं केलं..शेपूट हालवित आनशीजवळ आलं..

“वाघ्या... उठलास का रं ?.”

वाघ्या आणखी जवळ आला.. जोरजोरात शेपूट हालवित तिच्या पायाशी घुटमाळला..

“चल..आज आपल्याला देशावर जायचं हाय.. तुझ्या धन्याला काय आठवण हाय का न्हाई . उठंव त्यास्नी”

वट्टयावरली जळणाची लाकडं उचलून ती घरात आली..चूल पेटीवली.. आंघूळीसाठी पाण्याचं भगूलं चूलीवर ठिवलं...तांब्याभरून पाणी घेतलं.. वट्टयावर जाऊन हात धुवून तोंडावर पाण्याचे दोन चार सपके मारले.. वाघ्यानं धन्याला उठीवलं व्हतं.. तंबाखू मळता मळता बारकू म्हणला..

“आनशे.. त्वा वाघ्याला बरं शिकीवलं हाये... उठवायला सांगितलं आन्..गड्यानं लगूलग आंगावरलं घोंगडं वढलं.”

“आव मग..! लहान व्हता तव्हापासून लेकरावाणी संभाळलंय. त्याला भाकर घातल्याबिगर कव्हा बी तोंडात घास घेतला न्हाई.. माझं धाकटं लेकरूच हाये ते. बरं.. उठा लवकर.. च्या देते.. मग दोन चार हांडे पाणी घेऊन या..”

बारकू उठला..घोंघडं झटकून घडी घालून ठिवलं.. पाण्याचा डबा घेऊन झाड्याला गेला.. वाघ्या त्याच्या मागं मागं निघाला. तव्हा त्यो म्हणला..

“लेका ..आता इकडं काय काम हाय तुझं..? का आनशीनं मला एकटं सोडायचं न्हाई आसं सांगून ठिवलंय तुला.? जा घरला.. आलोच म्या..”

वाघ्या मागं फिरला.. वट्टयावर दाराजवळ बसला.. आनशीची कामाची लगबग मान वळवून वळवून पहात व्हता.. बारकू आला.. हातपाय धुवून म्हणला..

“आनशे..! च्या झाला आसंन तं दे गं..! पाण्याला आंघूळ झाल्यावर जाऊ का...आदुगर आणून देऊ.?”

“आंघूळ आता नका करू.. समदं आवरून वाड्याची बांधाबांध करायची हाय.. आंग घामानं चिगाट व्हईल.. समदं आवारल्यावरंच आंघूळ करा..”

“हे बरं हाय तुझं...सवता आंघूळ करून बसलीय.. आन् मला म्हणतीय..मगशान् करा.. वाघ्या बघतोस ना ..?”

तसा वाघ्या त्याच्या पायात घुटमाळला..

“आवं.. आसं काय करताय.. मला सैपाक करायचा हाय.. देवाला निवद दावायचा हाय.. हे समदं काय पारूशा आंगानं करु काय...?.. घ्या...च्या.. घ्या..”

गरमागरम चहाचा घोट बारकूला ताजंतवानं करीत व्हता.. चहा पिऊन बारकूनं हांडा आन् पोह-या घेतला.. पायात पायतान घालून म्हणला..

“वाघ्या.. येतोस का रं..?”

जागच्या जागी शेपूट हालवित तो तसाच गप बसून राह्यला.. पडल्या मानानं कान टवकारले आन् परत डोळे मिटून शांत बसला...

“आरं ..चल की लेका.. मघाशी सवता येत व्हता. आता म्या ये म्हणतोय तर जागचा हालाया तयार न्हाई..”

“वाघ्या जा..रं.. तुझ्या धन्याला भ्या वाटंत आसंन.. उठ जा..” आनशी म्हणली..

तसा वाघ्या उठला आन् वट्टयावरून खाली उतारला.. धन्याची वाट पहात उभा राह्यला..

“आनशे.. हे बरं न्हाई..! म्या उठ म्हणलं तर जागचा हालाया तयार नव्हता.. त्वा जा म्हणली तर लगेच वट्टा उतरून खाली गेलाय..”

“जावा.. आता... रस्त्यानं जाता जाता इचारा त्याला .”

बारकू वट्टा उतरून खाली आला तव्हार वाघ्या बारवाच्या वाटाला लागला व्हता.. पुढं वाघ्या आन् मागं बारकू.. वाघ्या पळत व्हता आन् बारकू झपाट्याने चालला व्हता..पण वाघ्या त्याच्या आधी बारवावर पोहचला..बारवाला एक चक्कर मारुन बारकूची वाट पहात उभा राह्यला..

“ वाघ्या.. माझ्या संग चालायचं नव्हतं तं आला कशापायी..?

बारकूनं रहाटावर पोह-या टाकून कासरा मोकळा केला.. कुssई....कुssई.. करीत रहाट फिरला.. धापकन् पोह-या पाण्यात पडला.. बारकूनं.. कासरा धरून हिसका दिला तसा पोह-या पाण्यात बुडाला..बारकूनं डाव्या उजव्या हातानं कासरा वढला..पोह-या वर आला.. हांड्यात रिकामा झाला.. आसं दोन चार येळा केल्यावर हांडा भरला.. उचलून खांद्यावर घेतला..

“वाघ्या.. त्वा थांब इथंच.. म्या जाऊन येतो..”

आशा. चार पाच चकरा मारून बारकूनं वट्टयावरला रांजण भरला.. हांडा बी भरून ठिवला... वाघ्या आला नव्हता..तो तिथंच बारवावर बारकूची वाट पहात थांबला व्हता..बारकूच्या हे ध्यानात आलं तव्हा तो म्हणला..

“आनशे.. एवढा हांडा रिकामा करती का कशात.. म्या पोह-या बारवावरंच ठिवलाय.. आन् पोह-या तिथं हाय तव्हार वाघ्या बी याचा न्हाई..”

आनशीनं हांडा आंघूळीच्या भगूल्यात रिकामा केला.. पोरांना हाका मारीत म्हणली..

“ए ..! आन्या..ए..! इंदे.. आरं उठा.. आवरायचं हाये.. उठा पटापट..”

इंदू उठली.. आथरुण पांघरून घडी घालून ठिवलं.. पण आन्या काय उठला नव्हता..तव्हार वाघ्या आन् बारकू बी आला.. म्हणला..

“चिमणे..उठलीस ..का गं..? चल आंघूळ करून घे पटकन.. मला वाडा आवरायला मदत कर जरा..”

“आवं तिला नका सांगू वाडा आवरायला.. आंघूळ झाल्यावर मला मदत करीन..भांडे कुंडे, सैपाकाचं सामान सुमान काय घ्याचं हाये का न्हाई..?

“चिमणे..मग आसं कर.. मला न्याहारीला दे.. आन् मग जाय आंघूळीला..”

“इंदू...न्याहारी म्या देते..तू तुझं आंघूळीचं पाणी वतून घे आन् भगूलं भरून चुलीवर ठीव..”

“रावसाहेब.. कव्हा उठणार हायेत..त्यास्नी बी उठवा..का इथंच ठिवून जायाचं हाये..? बारकूनं आन्याकडं पाहून आनशीला इचारलं..

“आवं..उठंन त्यो बी.. हे घ्या..! न्याहारी करून पटापट वाडा आवरायला घ्या..”

न्याहारी करून बारकूनं मेंढराचं वाघूरं सोडलं. गोळा करून एका आंगाला ठिवलं.. मेंढरं आंग झटकून उभे राह्यले.. वाघ्या शेपूट हालवित पुढं आला.. बारकू आन् मेंढराकडं बघत उभा राह्यला..बारकूनं बाजलं उचलून घोड्याच्या पाठीवर बांधलं.. घरातलं सामानसुमान आणता आणता म्हणला..

“आन्या..!...ए...आन्या..उठ रं.. आवरून घे. घटकाभरानं निघायचं हाये.. उन्हं चढल्यावर वाट सुधरायची न्हाई.. उठ.. पटकन..”

डोळं चोळीत चोळीत आन्या उठला..आथरुन पांघरुण घडी घालून ठिवलं.. घरात जाऊ लागला.. तव्हा बारकू म्हणला..

“आन्..हे पाह्य आन्या पटापटा आवरून ये.. मला मदत कर .. ऐकलं का..?”

“व्हयं..बा ..”

आनशीनं घरातलं सामान जागच्या जागी ठिवलं.. जेवढं लागंन तेवढं काढून वट्टयावर आणून ठिवलं.. इंदूनं आन्याला आंघूळीचं पाणी काढून दिलं.. त्याची आंघूळ झाल्यावर न्याहारीचं वाढून घेतलं.. दोघा बहिणभावानं न्याहारी केली.. आन्या बापाला मदत कराया बाहेर गेला.. इंदू आनशीला मदत करायला घरातच थांबली..

वट्टयावरलं सामान उचलून आन्यानं बारकूला दिलं.. एक एक करून सगळं सामान बारकूनं घोड्यावरल्या बाजल्यावर ठिवलं.. आनशीनं घर आवारलं.. उगवतीला फटफटलं व्हतं.. बारकूला हाक मारून म्हणली..

“आवं..! ऐकलं का..वाईच इकडं या जरा..”

“आलो..थांब.. एवढा कासरा आवळून घेतो..” घोड्याच्या पाठीवरलं बाजलं कासरा आवळून त्यानं नीट बांधलं..

“बोल.. काय म्हणती..?”

“आवं..ते दागिनं पाटलाकडं ठिवायचं व्हतं.. तेवढं पटकन देऊन येवा..मग निघायचं..”

“व्हयं.. व्हयं.. आण इकडं.. “आनशीनं घरात जाऊन एक बारकं मडकं आणून बारकूला दिलं.

“हे घ्या.. आन् निसतं देऊ नका.. एक एक डाग पाटलास्नी दाखवून त्यांची खात्री करून द्या आन् सवताची बी करून घ्या..म्हणजी मग कटकट नको..”

“आनशे.. आगं आपून हे दर वरसाला करतोय.. पाटील आपल्याला नवं हायेत का आपून त्यास्नी नवं हाये..?”

“आवं.. पण तरी बी डाग चार हायेत का दहा हायेत हे दावून खात्री करून दिल्याली बरी..जावा.. पटकन..”

दागिन्याचं मडकं उपारण्यात गुंडाळून बारकू भागवत पाटलाच्या घरी गेला.. पण घराला कुलूप व्हतं.. शेजारच्या बानू बाईला हाक मारली..

“मावशे... ए.. !बानूमावशे..”

पदराला हात पुशीत बानूबाई बाहेर आली..म्हणली..

“कोण..बारकू..? का रं लेकरा.. सकाळी सकाळी आलास, काय झालं..?”

“काय न्हाई गं.. हे पाटलास्नी भेटाया आलतो.. पण दाराला कुलूप हाये.. कुठं गेलेत?”

“आरे..ते रातीच गेल्यात गायवाडीला..पोर बाळात झालीय..”

“कोण.. शोभा..बाळात झालीय का ..? हे बेस झालं..”

“व्हयं...लगनाला पाच वरीस झाल्यात.. पाटलाच्या जीवाला लई घोर लागला व्हता..”

“बरं.. चल येतो म्या.. आम्ही बी आज वाडा घेऊन देशावर चाललोय..”

“व्हयं का..? बरं हाय.. लेकरा बाळाला संभाळून जावा.. उगा कोणाशी वाद घालू नको..”

“व्हय..मावशे.. घराकडं येता जाता ध्यान आसू दे..”

आसं म्हणून बारकूनं तिच्या पायाला हात लावला.. बानू मावशीनं त्याच्या पाठीवर हात ठिवून आशिर्वाद दिला..

बारकूनं खालच्या आळीच्या सावकाराच्या वाड्याची वाट धरली.. वाड्याचं दार आजून उघाडलं नव्हतं.. त्यानं कडी वाजवून हाक मारली..

“सावकार.. ओ.. सावकार.. घरात हायेत का ?”.

“कोण.. हाये रं.. ?”

“सावकार .. म्या बारकू हाये..”

सावकारानं दार उघाडलं. त्याला वाटलं बारकू पैशे मागायला आला आसंन.. म्हणून तो वरडून म्हणला..

“काय झालं रे... सकाळी सकाळी काय आई मेली का बाप मेलाय ? सुक्काळीच्यांनो तुम्हाला काही येळ काळ हाये का न्हाई? उठले का सुटले सावकाराचं दार वाजवायला..आरं सावकाराला बी काय पोटापाण्याचं बघाया लागतंय का न्हाई.. ?”

“आवं.. सावकार पर माझं ऐकून तर घ्या..”

“काय.. ऐकायचं..? रडून गागून काही तरी खोटं नाटं बोलून पैशे घेत्यात आन् परत त्वांड दावित न्हाईत.. मग सावकारानं तुमच्या दारात दहा येळा चकरा मारायच्या..”

“सावकार आवं मला पैशे नको.. माझं दुसरं काम हाये..”

“आरे व्वा..! सावकाराच्या दारात येऊन पैशे नको म्हणतोय.. कमाल झाली.. मग दुसरं आणि काय काम काढलंय.?..सावकाराकडं पैशाबिगर कोणाचं काही काम आसतंय का ..? बरं सांग काय काम काढलंय..?

“सावकार.. म्या तीन चार महिन्यांसाठी वाडा घेऊन देशावर चाललोय.. “

“बरं मग.. म्या काय करू..? तुझ्यासंग येऊ का काय ?”

“आवं सावकार आसं कसं व्हईल?.. “ आसं म्हणून त्यानं उपारण्याखालचं मडकं काढलं..म्हणला..

“सावकार हे दागिने हायेत.. तुमच्याकडं ठिवा..”

“दागिने हायेत” आसं ऐकताच सावकार हराकला.. नरमाईनं म्हणला..

“आरं..पर.. म्या काय करू याचं..?”

“सावकार आवं तीन चार महिने जित्राबाला घेऊन रानूमाळ हिंडाया लागंन.. कव्हा या गावात तर कव्हा त्या गावात.. हे कष्टाचं धन हाये. संग घेऊन कसं जायचं..? तव्हा म्या परत येईस्तोवर तुमच्याजवळ ठिवा..”

“किती तोळयाचे हायेत..?”

“वीस तोळ्याचे हायेत सावकार..”

“बरं..बरं..ये घरात ये..!”

बारकूला घरात घेऊन सावकारानं दाराला कडी घातली.. म्हणला..

“बस..बस... काय च्या पाणी झालायं का देऊ..?”

“च्या घेतलाय सावकार..”

“आरं पर ते तुझ्याघरी.. तु कुठं आमच्या घरी रोजरोज येतोय.. च्या तर घ्यावाच लागंन..आहो..! मालकीण बाई पाण्याचा तांब्या आन् च्या आणा..”

“आवं..आसू द्या सावकार.. हे एकडाव नीट बघून घ्या .. आन् मला मोकळं करा.. उन्हं चढल्यावर वाट उरकायची न्हाई.. जित्राबास्नी बी तरास व्हतोय मग..”

“आरं.. जाशील आन् जायाचंच हाय तुला.. पण हे समदं माझ्याकडं ठिवावं आसं का वाटलं तुला..?”

“सावकार.. खरं म्हणजी म्या दरवरसाला पाटलाकडं ठिवतोय..पर ते काल रातच्याला गेलेत गायवाडीला.. शोभा बाळात झालीय म्हणं..मग त्यांच्यामागं तुमच्यापरीस इश्वासाचं माणूस दुसरं कोण हाये..?”

सावकाराच्या बायकूनं पाण्याचा तांब्या आन् च्या आणून ठिवला.. बारकू च्या पेत व्हता तव्हार सावकारानं दागिने नीट निरखून पाहिले.. समद्याची नोंद केली.. आन् म्हणला.

“बारकू..त्वा एवढ्या इश्वासानं माझ्याकडं हे समदं आणून दिलंय.. खरं म्हणजी हे तुझं उपकार हायेत.. इश्वास आजकाल औषाधाला बी सापडत न्हाई.. “

“आवं.. सावकार आसं कसं म्हणतायसा.. उपकार तुमचं हायेत.. येतो आता.. पुन्यांदा आपली भेट आता तीन चार महिन्यांनंच..व्हतीय बघा..”

“ये..ये.. जपून जा रं बाबा.. “

“व्हयं.. व्हयं.. सावकार.. रामराम..”

“रामराम.. रामराम.. “

बारकूच्या डोक्यावरलं वझं सावकारानं आपल्या डोक्यावर घेतलं म्हणून तो सावकाराचं उपकार मानीत मानीत घरी आला.. आनशीनं समदं आवारलं व्हतं.. दुसऱ्या गावाला जायचं म्हणून पोरं बी आनांदली व्हती.. आनशी म्हणली..

“लई येळ केला.. कव्हा निघायचं..? ते घोडं बी बिचारं जागच्या जागी उभं राहून दमलं आसंन..”

“आगं... पाटील घरी नव्हते.. ते गेल्यात गायवाडीला..शोभा बाळातीण झालीय.. मग सकाळी सकाळी सावकाराच्या दारात उभं रहायची पाळी आली.. सावकाराकडं ठिवल्यात दागिने..”

आनशीच्या काळजात चर्रss झालं..पण आता इलाज नव्हता.. तिनं बारकूला आंघूळीचं पाणी काढून दिलं.. बारकूनं पटापट आंघूळ उराकली.. देवाला हात जोडले..निवद दावला..

भरल्या डोळ्यानं मनावर दगड ठिवून कवाडामागची काठी घेऊन घराबाहेर पाय ठिवला.. आनशीनं दार वढून कडी घातली.. कुलूप लावलं.. शेणाचा गोळा घेऊन कुलूपावर लावून भोक बंद केलं.दाराच्या उंब-याला हाळद कुंकू लावून डोकं टेकलं..बारकूनं बी डोकं टेकलं.. आन् घोड्याचा कासरा मोकळा करून मेंढराला वाट दावली..

गावकुसाला खंडूबाचं देऊळ व्हतं.. समद्यानी देवाच्या पायावर डोकं ठिवलं.. पायाखालचा भंडारा उचलून कपाळावर लावला..म्हणला..

“देवा.. खंडूबाराया.. तुझ्याच भरवशावर गावाची शीव वलांडून जातोय.. लेकरा बाळाला पोटाशी धर.. गेल्यापावली सुखासुखी माघारी आल्यावर येईल जेजुरीला.. माझी माय म्हाळसाई आन् बानाईला भेटायचं हाये.. गावाची शीव सोडायची आज्ञा द्या आता.. डोळ्यातलं पाणी पुसत पुसत .. देवळा म्होरल्या पाच फूट लांबीच्या कात्रीजवळ गेला.. भंडारा वाहून डोकं टेकलं..म्हणला..

“मावले.. कव्हा मनात वाईट वंगाळ येऊ देऊ नको.. लांडीलबाडी, चोरीमारी, बेइमानी आसलं काय बी मनात येऊ देऊ नको आन् हातून घडून देऊ नको.. तुझ्या पायाशी जगाचा न्याव व्हतोय.. परतून येईल तव्हा तुझ्या पायाला हात लावतानी कापरं भराया नको.. मला जसा हाये तसाच ठिव.. गुन्हेगार म्हणून तुझ्या म्होरं आणू नको.. “

मागं वळून गावच्या पांढरीला डोळं भरुन पाहिलं.. दंडवत घालून गावातल्या समद्या देवाची माफी मागितली.. माती उचलून कपाळाला लावली.. आता पुढलं तीन चार महिनं गाव परका व्हणार व्हता..पण त्याला इलाज नव्हता.. पदराशी जित्राबं हायेत.. त्यांचा जीव जगावण्यापायी हे करायाच लागंन...

“येळकोट.. येळकोट.. जय मल्हार..” म्हणून बारकूनं त्वांड फिरावलं.. वाघ्यानं मेंढरं शिस्तीत पुढं नेली व्हती..दुपारपवतर कारवाडीची शीव वलांडली.. वाटाशेजारच्या वडाखाली घोडं थांबीवलं.. बाजलं खाली घेऊन त्याला मोकळं केलं..माळावर मेंढरं मोकळी केली.. उन्हाचा कडाका वाढला व्हता.. मेंढरं पुढं गेलीच न्हाई.. समदे सावलीत गोळा झाले.. आनशीनं भाकरीचं गठूडं सोडलं.. वाघ्या येऊन शेजारी बसला..

“वाघ्या.. भूका लागल्या व्हयं रं लेकरा..? बस ..बस.. खाली बस.. तुला बी देते भाकर..”

समद्याची जेवणं झाली.. बारकूनं चिमूटभर तंबाखू हातावर घेतली.. तेवढ्यात एक फटफटी येऊन थांबली..आ

“आरे.. बारकू हाये का..?”

“व्हयं.. पाटील.. रामराम.. तंबाखू देऊ का..? म्हणून तो उठून उभा राहिला..

“रामराम.. तंबाखू नको गड्या.. तालुक्याला चाललोय.. उन्हाचा तडाखा लागून भवळ आली..मग काय करायचं..? बरं आसं कर दोन चार दिस आमच्या वावरात मेंढरं बशीव..कालंच भुईमूगाचं रान मोकळं झालंय..”

“पाटील.. परतीच्या वाटानं बशीवतो की.. दोन-चार काय चांगला आठ दिस मुक्काम करतो..”

“नको.. नको.. आरं तुला परताया लागत्याल तीन चार महिने.. तव्हार रान आसंच पडून देऊ का..? ऊस लावायचा हाय मला.. पहिलं माझं रान आन् मग तुला जिकडं जायाचं आसंन तिकडं जाय..”

“बरं.. पाटील.. तुमच्या मनासारखं व्हवू द्या.. म्या काय तुमच्या बोलण्याबाहेर हाये का? या जाऊन निवांत.. बरं वढ्याला पाणी हाये का न्हाई..? जित्राबं तहानली आसतीन..”

“वढ्याला आता कुठलं पाणी..? त्यो बंधारा हाय नव्हं.. ने तिकडं..”

पाटील आपल्या वाटंला लागलं.. बारकूनं मेंढरं बंधा-यावर नेऊन पाणी पाजून परत आणली.. आन् कारवाडीची वाट धरली.. गावापासून पुढं पाटलाचं वावर एक कोसावर व्हतं.. दिस बुडता बुडता बारकूचा वाडा पाटलाच्या वावरात पोहचला..पाटलीणबाई पुढं आल्या ..म्हणल्या..

“बारकूदादा..? आवं काय सपान पडलं व्हतं का काय..? पाटलांनी कालंच तुमचं नाव काढलं व्हतं.. आसं कसं आवचित येणं केलं..?”

“सकाळी वाडा घेऊन निघालो व्हतो.. दुपारच्याला बंधा-याच्या वाटंला वडाखाली बसलो व्हतो.. पाटील भेटले.. म्हणले दोन चार दिस मेंढरं बशीव ... मग काय ..धरली वाट आन् आलोय..”

“बरं.. दमले आसाल.. आन् ही इंदू का काय ? बया.. किती गं मोठी दिसाया लागलीय .”

“व्हयं वं मावशे.. एरांडावाणी वाढतंच चाललीय.. चार सहा महिन्यांत परकर पोलकं टाकून लुगडं नेसाया लागंल बघ..”

“आगं.. लेकीच्या जातीचं आसंच आसतंय बघ... एकडाव आंगाला कोंब फुटले का मग..दिस इतभर आन् पोर हातभर वाढतीय..पदर आलाय का न्हाई..?”

“न्हाई आजून.. पर कव्हा बी कोपऱ्यात बसंन.. काय नेम न्हाई..”

“बरं आसू दे...आनशे आज सैपाक पाणी करू नको.. आमच्याकडंच या जेवायला..”

“मावशे.. भाकरी हायेत.. कोरड्यास तेवढं दे.. “

“आगं..आसू दे त्या भाकरी.. म्हणं कोरड्यास दे.. गप गुमान जेवायला या..”

रातच्याला जेवणं झाली.. पाटील आन् बारकू घोंगडं टाकून तंबाखू खात बसले व्हते..पाटलीणबाईला आनशी म्हणली..

“मावशे..त्वा बी बस तिकडं.. म्या आन् इंदी भांडे घासून आवरून येतो.. “

आनशी आन् इंदू घर आवरून आल्या.. पाटलीणबाईच्या शेजारी बसल्या.. बोलता बोलता बारकू म्हणला..

“पाटील ..तुमची नात लई गॉड गाणं म्हणतीय..नाचती बी आशी का भुईला पाय लागत न्हाई..”

“खरं का काय..? व्हयं गं इंदू..? चल मग व्हवून जाऊ दे एकडाव.. “

इंदू हासली.. लाजून खाली मान घातली.. तव्हा आनशी म्हणली

“आगं.. आसं लाजाया काय झालं.. इथं का कोणी परकं हाये..? आजा आन् आजीच हाये.. म्हण .. गाणं म्हण..”

“व्हयं.गं..पोरी..ऐकू दे तरी तुझं गाणं..म्होरल्या वरसाला एखाद्या बारीला तुझ्या बापानं तुझं लगीन लावून दिल्यावर मग काय लवकर भेट बी व्हणार न्हाई..”

पाटलीणबाई आसं म्हणल्या तशे इंदूचं डोळं भरुन आलं.. आईच्या पदराआड त्वांड लपीवलं..

“आगं.‌.रडाया काय झालं..? कव्हा तरी लगीन करायाचं लागंन... “ आनशी म्हणली..

“पाटलीणबाई.. उगा तुम्ही लेकराचं मन दुखावलं...इंदू..! आसं एवढी तेवढी गोष्ट मनाला लावून घेऊ न्हाई.. आगं..ये इकडं ये..”

इंदू उठली..पाटलानं तिला जवळ घेतलं.. पाठीवरून हात फिरावला.. डोळं पुसलं..

“हां.. चाल.. आता..कर सुरू..”

इंदू हासली.. केसांच्या बटा कानामागं सारल्या.. खाकरून गळा मोकळा केला.. पाटील आन् पाटलीणबाईच्या पायाला हात लावला.. डोळं मिटून ..श्वास उरात भरला.. आभाळाला हात जोडून म्हणली...

धनगाराची पोर देखणी मी

बानूबाई माझं वं नाव...

जेजुरीचा भरतार माझा

चंदनपुरी माहेराचं गाव...!

चंदनाचा वाडा माझा

खंडी मेंढराची दावणीला...

सण दिवाळीचा आला..

साडी चोळी घ्या पावणीला..!

टिपूर चांदण्यात इंदूची पावलं मोरावाणी नाचली.. तिच्या गळ्यातलं गाणं ऐकून पाटील खुश झालं.. म्हणले..

“बारकू..आनशे..नीट ऐका..दर दिवाळीला इंदूला इकडं आणून सोडायचं.. तिची साडी चोळी माझ्याकडं.. पाटलीणबाई..! उद्या सकाळी इंदूला घेऊन गावात जावा.. तिच्या पसंतीची साडी चोळी घ्या.. “ आसं म्हणताना पाटलानी डोळे पुसले..

चार दिस झाडावरलं पाखरू उडावं तसं भूर्रकन् गेले.. पाटलीणबाईनं पुरणपोळीचं जेवण केलं..बारकूनं पहाटंला उठून वाडा आवारला.. दिस उगवायच्या येळाला पाटलाच्या पायाला हात लावला..समद्याचे डोळे पाणावले व्हते.. पाटलाच्या मळ्यातून बारकूचा वाडा पुढल्या गावाला निघाला.. जाता जाता हात हालवून निरोप घेतला..

“बारकू.. परतीच्या वाटानं जाता जाता येऊन जा रं..!”

“व्हयं... व्हयं...”

बघता बघता बारकू नजरंआड गेला.. तो दिसत व्हता तव्हार पाटील आन् पाटलीणबाई बांधावरंच उभे व्हते..

गाव सोडून महिना झाला व्हता.. शंभर सव्वाशे मैलाची वाट चालून बारकूचा वाडा देवगावला आला व्हता.. पाटाशेजारी पाल ठोकलं व्हतं.. रातच्याला जेवणं झाल्यावर बारकू आन् आनशी बसली व्हती.. इंदू पालाच्या मागं भांडे घशीत व्हती.. आन्या आईच्या मांडीवर डोकं ठिवून आभाळातल्या चांदण्या मोजीत व्हता.. मोजता मोजता चुकत व्हता.. चांदण्या मोजता मोजता आन् चुकता चुकता तो झोपला.. इंदू आली.. आईच्या पदराला हात पुसून बसली..आभाळाकडं पाहून बारकूला म्हणली ..

“बा.. ह्या चांदण्या खाली पडत न्हाईत का जागच्या हालंत न्हाईत.. चिटकावलेल्या आसत्यात काय ?”

“ येडी का खुळी गं तू..? आगं..ते टांगल्यालं हायेत का चिटकावल्यालं हायेत ते देवाला ठावं.. आपून फक्त बघायचं आन् देवाचं उपकार मानायचं..”

“आवं.. बरं झालं.. इंदू बोलली.., मला लई दिसापसून तुम्हाला एक इचारायचं व्हतं..पण ध्यानातंच राहत नव्हतं..”आनशी म्हणली

“आता तुझं आणि काय..? आन् हे पाह्य म्या काय कोणी जाणकार माणूस न्हाई.. हां आता मेंढराचं काही इचारलं तर समदं सांगन..”

“मेंढराचं.. मला ठावं न्हाई काय..? मला इचारायचं व्हतं.. आपल्या गावातल्या खंडूबाच्या कात्रीचं जे काय म्हणत्यात ते खरं हाय का ?”

“व्वा..! आनशे.. तुझं बी डोस्क चालतंय म्हणायचं.. पण हे तुझ्या मनात आलं तरी कसं म्हणायचं..?”

“ते सांगीन कव्हा तरी.. ती भानगड काय हाये तेवढं सांगा.. देवाच्या दारी कातर का ठिवलीय आन् ती बी पाच फूट लांबीची..”

“त्याचं आसं हाय.. म्हणजी तसं म्या बी कव्हा पाहिलं न्हाई.. जे हाये ते म्या बी ऐकूनच हाये..तर सांगायचं म्हणजी..समजा गावात काही बी वाईट वंगाळ घटना घडली..म्हणजी चोरी मारी , लांडीलबाडी.. आसं काही तरी.. घटना घडली आन् तो माणूस पकाडला आन् तो न्हाई म्हणत आसंन न्हाई तर एखाद्यावर संवशय आसंन आन् तो कबूल करीत नसंन.. तर त्याला देवापुढं आणायचं.. त्याच्या हातानं देवाची पूजा करून भंडारा उचलाया सांगायचं.. ज्या हातानं भंडारा उचालला आसंन तो हात कात्रीत ठिवून म्हणायचं.

“देवा तुझं दहा डोळे हायेत.. तू समदं बघतोस.. म्या तुझा भंडारा उचलून सांगतोय का ही घटना माझ्या हातून घडलेली न्हाई.. आन् जर का म्या खोटं बोलत आसंन तर तू जो काही न्याव करशील तो मला मंजूर हाये..”

“आसं म्हणून त्यानं आपला हात कात्रीत ठिवायचा.. तो खरं बोलत आसंन तर त्याला काय बी व्हणार न्हाई.. पण जर का खोटं बोलत आसंन तर ...”

“तर काय व्हतंय.. बा..?” इंदूनं इचारलं.

“तर.. कातर आपसूक बंद व्हती आन् त्याच्या हाताचे दोन तुकडे व्हत्यात..”

“आं... खरं का काय..?” इंदू आ वासून पाहू लागली.

“आगं .. आसं ऐकलंय..पण कव्हा पाहिलं न्हाई.. “

“आवं.. पण कव्हा तरी एखादी घटना घडलीच आसंन की..”आनशीनं इचारलं.

“व्हयं.. आसं म्हणत्यात का सावकाराच्या खापर पणजानं गावातल्या एका गरीबाला पाचशे रुपये याजानं दिलते.. ते त्याला परत करून बी तो नाकबूल गेला व्हता.. मग तकराद सुभेदाराकडं गेली.. त्यानं सावकाराला खरं खोटं इचारलं.. तो परत नाकबूल गेला.. मग त्याला खंडूबाच्या देवळात आणलं. भंडारा उचलून कात्रीत हात ठिवाया सांगितलं... आन् कातर बंद झाली.. सावकाराच्या हाताचे दोन तुकडे झाले..तव्हापसून गावात परत आशी घटना घडली न्हाई आसं म्हणत्यात..”

देवगाव सोडून पंधरा दिस झालते.. कुठं एक कुठं दोन आसं करता करता दहा बारा मेंढरं कमी झाली व्हती.. लहानपणापासून लेकरावाणी संभाळल्याल्या मेंढराला कोणाच्या तरी तोंडाचे चोचले पुरवायला दिल्यावर बारकू आन् आनशीच्या काळजात कालवाकालव व्हायची.. दोन दोन चार चार दिस आनपाणी ग्वाड लागत नव्हतं.. दिस काढायचे व्हते.. एकाचा जीव जगावण्यापायी दुसऱ्याचा जीव जात व्हता.. मनावर दगड ठिवून वाट तुडवाया लागत व्हती..

आमूशा व्हवून चार दिस झालते.. रातच्याला जेवणं उराकली.. वैशाख लागला व्हता..समद्यांनी आथरुणावर आंग टाकलं..दिसभर ऊन्हं डोक्यावर घेऊन वाट तुडावता तुडावता दमून जात व्हते.. आथरुणावर आंग टाकल्या टाकल्या डोळा लागला व्हता..निम्या रातीला वाघ्या भुकाया लागला.. बारकूला जाग आली.. पडल्या पडल्या त्यानं कानूसा घेतला.. कोणत्या तरी जनावराचा गुरगुरल्याचा आवाज आला..तो ताडकन उठला.. काठी आन् बॅटरी हातात घेऊन आनशीला उठीवलं..

“आनशे.. ए.. आनशे .. आगं ऊठ..”

आनशी ऊठली...म्हणली..

“का..वं.. काय झालं..?”

“आगं.. काही तरी जनावर घुसलंय वाटतं..” आसं म्हणून त्यानं बॅटरीचा उजेड वाघू-यावर टाकला.. आन् जे दिसलं ते पाहून त्यानं धाव घेतली.. लांडग्याचा कळप घुसला व्हता..वाघ्याच्या भुकण्याचा आवाज जास्तच वाढला.. त्यानं..झेप घेतली..लांडग्यानी चार पाच मेंढरं मारली व्हती.. एका लांडग्यानं वाघ्याचं नरडं धरलं...वढीत वढीत लांब नेलं.. बारकूनं काठीचा तडाखा दिल्यावर लांडगे पळून गेले.. वाघ्या खाली पडला व्हता..बारकूनं मेंढरं उचलून बाहेर आणले.. आनशीनं वाघ्याला उचलून आणलं.. लांडग्याच्या दातानं वांग्याचं नरडं फुटलं व्हतं.. तो आनशीकडं पाहून आचके देत व्हता.. आनशीनं लगबगीनं त्याला पाणी पाजलं.. पण.. वाघ्यावर काळानं घाला घातला व्हता.. तोंडातलं पाणी उलटून बाहेर आलं.. आन् वाघ्यानं मान टाकली..

आनशीनं वाघ्याला मांडीवर घेतलं.. तिच्या डोळ्याला पाण्याची धार लागली व्हती..तिचा लाडका लेक तिला सोडून गेला व्हता.. पोरं बी रडत व्हती.. बारकू डोळे पुसता पुसता मेंढराकडं आन् वाघ्याकडं पाहत व्हता..तांबडं फुटलं तसं तो आनशीला म्हणला..

“आनशे..! इंदू..! पटापटा आवरून घ्या.. लांडग्याच्या तोंडाला रघात लागलंय.. रातच्याला परत येतील...वाडा हालवाया पायजे.. आजच्या आज इथून जेवढं लांब जाता येईल तेवढं लांब गेलं पायजे..”

आनशी आन् इंदू कामाला लागली.. आन्या आन् बारकूनं जवळच्याच जांभळीच्या झाडाखाली खड्डा खणला. वाघ्याला उचलून मूठमाती दिली.. आनशीला भडभडून आलं..वाघ्याला जिथं पुरलं व्हतं तिथली दोन चार मुठी माती घेऊन पदराला बांधली.. डोकं टेकून म्हणली...

“ए.. लेकरा.. तुझी माय आज तुला एकल्याला सोडून जातीय..माफ कर लेकरा.. पुढल्या जल्मी माझ्या कुशीला ये.. तुझ्या नावानं पान्हा फुटू दे..”

भाकरीचं टोपलं घेऊन आनशी जड पावलांनी निघाली.. बारकूनं वाघ्याकडं पाहून डोळे पुसले.. मेंढरं वाटंला लागली..पण त्यास्नी वाट दावाया.. वाघ्या नव्हता.. गावातून जाता जाता बारकूनं लांडग्यानं मारल्याली मेंढर गावपाटलाला दिली.. पुढच्या गावची वाट धरली...ते गाव वलांडून पल्याडल्या माळावर बारकूनं पाल टाकलं.. झाडाखाली घोंगडं आथारलं....म्हणला..

“आनशे..! चल.. दोन चार घास खाऊन घेऊ.. पोरं बी सकाळधरनं उपाशी हायेत.. पाण्याची घागर दे.. म्या पल्याडल्या मळ्यातून पाणी आणतो..”

आनशीनं घागरीतल्या पाण्यानं ताटं धुवून रिकामी केली..बारकूला दिली..बारकू बांधाबांधानं मळ्यात गेला.. हिरीवर जाऊन उभा राह्यला.. कोणी दिसतंय का म्हणून भवताली पाह्यलं..एक खोप दिसली.. तिकडं पाहून म्हणला..

“कोणी हाये का...?

“कोण रं बाबा तू..? आन् काय पायजेल तुला..?” एक बाई खोपीतून बाहेर येत म्हणली..

“मावशे.. जरा पाणी पायजेल व्हतं..”

“घे.. की.. बादली हाये बघ तिकडं... पण तू कोण हाये ते सांगितलं न्हाई..”

“म्या बारकू धनगर हाये...वाडा घेऊन चाललोय.. पलिकडं माळावर पाल टाकलंय.. जेवणं करायची हायेत.. म्हणून पाणी न्यायला आलतो..”

बारकू पाणी घेऊन आला.. आनशीनं ताटं वाढली.. खाली मान घालून सगळे जेवले.. कोणी कोणाशी बोलत नव्हतं.. कसातरी दिस गेला.. संध्याकाळी चार पाच माणसं आली.. म्हणली..

“कोणत्या गावचा वाडा हाये..?”

“धनगरवाडीचा हाये ..मालक...”

“बरं..नाव काय तुझं..?”

“म्या बारकू हाये मालक..”

“तर बारकू.. उद्या गावात जत्रा हाये.. समद्यानी परसादाला यायचं..”

“व्हयं.. व्हयं..येऊ की मालक..”

“आंग.. आसं.. पण परसादाला तू काय देणार हायेस..?”

“आता .. म्या पाव्हणा माणूस.. म्या काय देणार.. हातावर प्वाट घेऊन रानूमाळ हिंडतोय..”

“आरं..मग ज्या रानात आन् माळावर हिंडतोय ते आसंच पडल्यात का त्याला कोणी मालक बी आसत्यात..”

“व्हयं.. हायेत ना... तुम्हीच मालक हायेत..”

“मग..ऐक.. उद्या देवाच्या परसादाला चार मेंढरं पाहिजेत.. “

ते ऐकून बारकूच्या काळजाचं पाणी पाणी झालं.. काल रातच्याला चार पाच लांडग्यानी मारली..आन् आता परत हे चार....

“आरं.. काय इचार करतोय..?”

“काय न्हाई मालक पर..मेंढरं नका मागू.. पायजे तर शे दोनशे रुपये घ्या..”

“ए..! शे दोनशीच्या.. लई पैशेवाला हायेस व्हयं रं..? गप गुमान देतोस का ..?”

आसं म्हणून त्यानं बारकूचा गळा धरला...आनशीनं पुढं येऊन त्याचे पाय धरले..

“मालक.. सोडा.. सोडा.. घेऊन जा.. चार न्या.. पाच न्या.. दहा न्या.. न्हाई तर आख्खा वाडा न्या..” आनशी रडता रडता..म्हणाली.

“च्या मारी.. हीच्या... लईच बोलतीय.. वाडा नेऊ आन् तुला मागं कशाला ठिवू.. ? आं..ss आसं म्हणून त्यानं आनशीचा हात धरला.. दुसऱ्यानं इंदूचा हात धरला..

“नका.. मालक.. माफी द्या.. चुकलं आमचं... घ्या तुमच्या पसंतीनं.. घ्या..”

बारकूनं त्याला हाताला धरून नेलं..चार मेंढरं काढून दिली. मेंढरं घेऊन ते गेले.. बारकूनं आनशीला आन् पोरानला पोटाशी धरलं..म्हणला..

“आनशे.. बास् झालं आता.. आता इथं घटकाभर बी थांबायचं न्हाई.. पटापट आवरून घे.. परतीची वाट धरली पायजे..”

“आवं.. पण रातच्याला..? सकाळी येरवाळी निघू की..”

“नको.. रातीतून जेवढी वाट उराकता येईल तेवढी उरकून जाऊ.. आतापवतर पंधरा सोळा मेंढरं गेलं हायेत.. वाघ्या गेलाय.. हे वरीस काय धारजीनं दिसत न्हाई.. गाव गाठल्यालाच बरं.. तशे बी तीन महिने झाले हायेत..”

बारकून वाडा आवरून परतीची वाट धरली.. चालता चालता हातावर भाकर घेऊन खाल्ली..रातीतून पाच सहा गावं मागं टाकली व्हती..वाटच्या कडंला थांबून आनशीनं सैपाक केला.. बारकूनं मेंढरं पाणी पाजून आणली..घडी दोन घडी थांबून पुन्यांदा वाट धरली.. आसं करता करता बारकूचा वाडा गावात पोहचला..

घराच्या कुलपाला लावलेलं शेण तसंच व्हतं.. पाहून बारकू आन् आनशीनं सुटकेचा निःश्वास टाकला.. सकाळी उठून आनशीनं आवरून सैपाकाला लागली.. बारकूनं बारवावरून आठ दहा हांडे पाणी आणलं..बारवाच्या वाटावर त्याला वाघ्याची आठवण झाली.. डोळ्यात पाणी आलं.. दुपारी तो सावकाराच्या घरी गेला...

“सावकार...!... ओ... सावकार..!”

बारकूचा आवाज ऐकून सावकार.. बाहेर आला.. त्यांच्या हातातली काठी पाहून बारकू म्हणला..

“सावकार.. हे वं काय...? हातात काठी कशापायी..?”

“आरे... दोन आडीच महिने झाले.. घरात पूजा घालायची व्हती.. म्हणून बारवावर पाणी आणायला गेलतो.. पोह-या बारवात पडला.. काढायला आत उतरलो..पाय-या वरून पाय घसरून खाली पडलो.. पाणी कमी व्हतं.. खालच्या दगडावर आपटलो.. आन् पाय मोडला.. बसवून घेतला पण हाड नीट जुळलं न्हाई..चालतानी तरास व्हतोय..मग हातात काठी आली.. काठी बिगर चालताच येत न्हाई बघ... बरं एवढ्या दुपारचा आलाय.. काय काम काढलंय.?

“ आता..काम आणि दुसरं काय आसणार..?.. तुमच्याकडं दागिने ठिवले व्हते..ते न्यायला आलतो..”

“दागिने...? कोणते दागिने..? आन् मला कव्हा दिलते..?”

“आवं सावकार आसं काय करताय.. म्या वाडा घेऊन गाव सोडला तव्हा सकाळी सकाळी येऊन तुम्हाला एका मडक्यात घालून दिलते.. तेच .. न्यायला आलतो..”

“ए..बाबा.. आरं येडा बिडा झाला का काय..? सावकाराकडून लोकं पैशे नेत्यात.. एखाद्या बारीला दागिने गहाण ठिवून पैशे नेत्यात..पण त्वा आसं काय बी केलं न्हाई.. मग तुझे दागिने माझ्याकडं कशाला आसतीन?”

बारकूचं डोकं गरागरा फिरु लागलं.. तो डोकं धरून खाली बसला.. म्हणला..

“सावकार तुमच्या पाया पडतो..गरीबावर आसा जुलूम करू नका.. आवं लई कष्टानं एक एक रुपाया जोडून केलं हायेत.. मालक दया करा..आवं.. थोडं थिडकं न्हाई.. इस तोळ्याचे हायेत ‌..”

“ए... बाबा..नशापाणी करून आला हायेस का काय ? जा नीघ.. खायला घरात आन्न न्हाई आन् म्हणं इस तोळ्याचे दागिने हायेत..आरे कधी इस गूंजा तरी सोनं पाह्यलं व्हतं का..? चाल.. नीघ इथून.. आन् परत दारात पाय ठिवायचा न्हाई..”

आसं म्हणून सावकारानं खाडकन दार लावलं.. कपाळावर हात मारुन बारकू घरी आला.. आनशीला सावकार दागिन्याला नाकबूल गेल्याचं सांगितलं.. तव्हा आनशी म्हणली..

“आवं..मग हे पाटलाच्या कानावर घाला.. ते करतील काय तरी..”

“काही..उपेग व्हणार न्हाई.. सावकार लई वंगाळ हाये.. आन् तसा बी आपल्याकडं काय पुरावा बी न्हाई..

इंदू शेजारी बसून आईबापाचं बोलणं ऐकत व्हती.. काय तरी आठावल्यासारखं करून ती म्हणली...

“बा... आरं मग त्या सावकाराचा हात धरून खंडूबाच्या कात्रीवर ठिव.. व्हवू दे त्याच्या हाताचं तुकडं..”

बारकूनं इंदूला पोटाशी धरलं.. आता त्याला खंडूबाच्या कात्रीचाच आधार व्हता.. आनशीला घेऊन तो तडक पाटलाच्या घरी गेला.. सावकाराचा कांगावा पाटलाच्या कानावर घातला.. पाटलानं सावकाराला बोलवून इचारलं..पण तो कानावर हात ठिवून म्हणला..

“पाटील.. तुम्ही बी काय.. कोणाचं काय बी ऐकून आसं वागताय..शोभत न्हाई तुम्हाला..पण निदान काही पुरावा तरी दाखवा आन् मग इचारा..”

सावकार आसा कबूल व्हणार न्हाई हे पाटलानं वळीखलं.. पंचायत बोलवून पंचाला सांगितलं.. समद्यानी इचार करून सावकाराला खंडूबाच्या देवळात बोलवायचं ठरीवलं..

सकाळी सकाळी समदे देवापुढं गोळा झाले.. सावकाराला सांगावा धाडला.. त्याला बोलवून घेतलं.. देवळात पंचानी बैठक घेतली.. सावकाराला सांगितलं...

“सावकार.. बारकूचे दागिने तुमच्याकडं आसतील तर त्याचे त्याला परत द्या..गरीबांचं धन आसं पचत नसतं.. मन मोठं करा.. आन् त्याचं त्याला देऊन टाका.”

“पंचमंडळी.. आवं तुम्ही न्याय करायचा का आसं कोणाचं बी लोढणं कोणाच्या गळ्यात बांधायचं..? काही देणं घेणं न्हाई... पुरावा न्हाई.. तो म्हणतोय ते खरं आन् माझं खोटं... तुमचं लई चुकतंय.. “

“सावकार आसं आसंन तर मग दोघाला बी भंडारा उचलून कात्रीवर हात ठिवाया लागंन.. कबूल हाये..का..?”

“ आवं..मग उचलू की भंडारा.. कर न्हाई त्याला डर कशाला..?”

पंचांनी लगूलग गुरवाला बोलवून घेतलं..खंडूबाची पूजा करून.. सावकार आन् बारकूला भंडारा उचलाया सांगितलं..आदुगर बारकूनं उजव्या हातानं भंडारा उचलून कात्रीवर ठीवला..म्हणला..

“देवा.. म्या माझं इस तोळ्याचे दागिने सावकाराकडं ठिवले व्हते.. हे जर खोटं आसंन तर .. माझ्या हाताचं तुकडं कर..”

आसं.. म्हणून बारकूनं हात जोडून उजवा हात कात्रीवर ठिवला.. पण काहीच झालं न्हाई.. आता बारी सावकाराची व्हती.. सावकार पुढं आला.. भंडारा उचलून म्हणला..

“देवा.. म्या तुझा भंडारा उचलून सांगतो का बारकूचं सोनं माझ्याकडं न्हाई.. जर माझ्याकडं आसंन तर माझ्या हाताचं तुकडं करून न्याय कर..”

आसं म्हणून सावकारांनी आपल्या हातातली काठी कात्री शेजारी उभ्या आसल्याल्या बारकूच्या हातात देऊन कात्रीवर हात ठिवला.. पण काहीच झालं न्हाई..

सगळ्याची आपसातली कुजबुज वाढली.. देवाचं सत्व खरं का खोटं.. आसं बोलू लागले.. पंचांनी पुन्यांदा बारकूला भंडारा उचलाया सांगून कात्रीवर हात ठिवायला सांगितलं.. पण या वख्ताला बी काही झालं नव्हतं.. आता पंचांनी सावकाराला भंडारा उचलून हात ठिवायला सांगितलं.. सावकारानं काठी बारकूला देऊन कात्रीवर हात ठिवला.. पण कात्री जागची हालत नव्हती..

आता पंचांच्या मनाचीबी चलबिचल झाली.. न्यायनिवाडा कसा करायचा हा मोठा पेच पडला व्हता.. समदे पंच उठून देवासमोर उभे राहिले..हात जोडून देवाची मनधरणी केली... आन् पुन्हा एकडाव शेवटच्या बारीला दोघांनी भंडारा उचलावा आसं ठरलं..बारकूनं भंडारा उचलून कात्रीवर हात ठिवला..ह्या वख्ताला बी तेच झालं.. कातर जशी व्हती तशीच राह्यली.. बारकू जड मनानं आन् डोळे पुशीत पंचाशेजारी जाऊन बसला...आता समदे डोळ्यात जीव आणून सावकाराकडं पाहू लागले... सावकारानं बी भंडारा उचलून.. सांगितलं..

“देवा खंडूबा.. म्या बारकूचं सोनं माझ्याकडं आसंन.. आन् म्या खोटं बोलत आसंन तर तू जो बी न्याय करशील तो मला मंजूर हाये...”

आन् वख्ताला मातूर चमत्कार झाला...कातर जागची हालली.. थरथर हालाया लागली.. आन् बंद झाली.. सावकाराचा हात तुटून खाली पडला व्हता..समदी कातर रक्तानं लाल झाली व्हती.. सावकार... मेलो मेलो बोंबलत बेसुध व्हवून खाली पडला.. देवाच्या दारी ख-याची जीत झाली.. खोटं हारलं.. पंचांनी सावकाराच्या तोंडावर पाणी शिपाडलं.. सावकारानं डोळं उघाडलं.. दोन चार जणांनी उचलून देवळात आणून पाणी पाजलं. पाटलानी इचारलं...

“सावकार.. काय भानगड हाये..?आता तरी खरं बोला.. तुमच्याकडं बारकूचं सोनं हाये का न्हाई..?

“पाटील.. तुमची शोभा बाळातीण झाली तव्हा तुम्ही तिला भेटायला गेलते.. सकाळी सकाळी बारकू आला..इस तोळे सोनं माझ्याकडं ठिवाया दिलं..पण काही लिखापढी झाली नव्हती... म्हणून म्या नाकबूल करायचं ठरीवलं.. तालुक्याला जाऊन सोनं इतळून ह्या हातातल्या काठीत भरलं.. पहिल्या दोन वख्ताला भंडारा उचालला तव्हा म्या काठी बारकूच्या हातात दिली व्हती.. म्हणजे त्याचं सोनं त्याच्याकडंच आसल्यानं मला काय बी झालं नव्हतं..पण मला वाटलं.. देव बीव काय नसतोय.. म्हणून तिसऱ्या बारीला काठी माझ्या हातातच ठिवली... आन् देवाचा न्याव झाला...मंडळी.. म्या लबाडी केली .. मला माफी द्या...

.... राजेश जगताप-मुंबई

९८२१४३५१२९