Swpnasprashi - 1 in Marathi Moral Stories by Madhavi Marathe books and stories PDF | स्वप्नस्पर्शी - 1

Featured Books
  • ભીતરમન - 58

    અમારો આખો પરિવાર પોતપોતાના રૂમમાં ઊંઘવા માટે જતો રહ્યો હતો....

  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

Categories
Share

स्वप्नस्पर्शी - 1

                                                                                                  स्वप्नस्पर्शी : १                                      

मनोगत

स्वप्नस्पर्शी हे पुस्तक व्यावहारिक कर्तव्यपूर्ती पार पाडल्यानंतर जो वेळ आपल्यासाठी उरतो त्यावर आधारित आहे. जीवनात काही गोष्टी करायच्या राहून गेल्या, त्या करायला काळ आपल्याला थोडा वेळ देतो. तेव्हा त्या गोष्टी करून आनंद घ्यावा. त्याची पुर्तता करून समाजासाठी व स्वतःसाठी जरूर जगावे. त्यावेळेसही आपण कारण नसताना कौटुंबिक जीवनात अडकून पडलो तर नंतर काळ आणि कुटुंब दोघही तुमची किंमत करत नाही. घरासाठी कितीही कष्ट उपसले तरी त्यात आपल्याला समाधान मानून घ्यावं लागतं. पण त्या समाधानाची फिकीर समोरचा करेलच असे जरूरी नाही. आपण कामात किती व्यस्त आहोत आणि तुम्ही कसे रिकामपणे काही न करता जगता अश्या विचारावर समोरच्याचा भर असू शकतो. प्रत्येकाचा जगण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, आणि तो त्या पध्दतीने जगतो. हे संस्कार लहानपणीच बिंबवले गेले तर त्या हीन भावनेला फार कमी जणांना सामोरे जावे लागेल. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा असू शकतो. त्यामुळेच तर जगात इतके प्रकार तयार होऊ शकले. वैविध्यता आली. त्या वैविध्यतेतून आपल्याला काय आवडतं ते जगून तृप्त होण्याची संधी मिळाली. पण फार कमी जणांना आपल्याला खरच काय हवे आहे हे लक्षात येते. मग त्यांनी त्या वाटा निवडल्यावर, त्या जरा जगावेगळ्या असल्या की टीकेचा सामना करावा लागतो. त्याच्याशी सामना करण्याची कुवत एखाद्यापाशी नसली तर त्याला आपलं स्वप्न, आवड दूर सारावी लागते. मग ती कुवत शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक अश्या कितीतरी प्रकारानी नसू शकेल. पण त्यावरही मात करून एखाद्याने झेप घेतली तर ती भलेही बाकीच्यांच्या दृष्टीने फार मोठी नसेल पण त्या व्यक्तीसाठी ती एक गरुडझेप असेल. त्याचा प्रत्येक क्षण आनंदाचा असेल. त्याच्या आनंदात जगाला सहभागी करायलाही उत्सुक असेल. पण जगाने सहभागी होणे नाकारले तरी त्याला त्याची खंत नसेल. या पुस्तकात सरळ साध्या माणसांची साधी स्वप्न पुर्णतेची कहाणी आहे. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी असतातच. पण त्या अडचणींनाच आपलं जीवन न बनवता ओघवतं राहणारं कुटुंब दर्शवलं आहे. प्रत्येकाच्या स्वप्नांचा आदर करा. एव्हढाच या पुस्तक लिहिण्यामागे उद्देश आहे.

                                                                                                  १  

      पहाटेच्या हलक्याशा झुळकींनी जाग येऊन राघवांनी डोळे उघडले. मनाला अजुन जाग आली नव्हती. केवळ शरीर त्या पहाटवाऱ्याचा सुखद अनुभव घेत जागे झाले, पण मन मात्र परत निद्रेच्या त्या नितांत सुंदर राज्यात वापस जाण्याचा प्रयत्न करू पहात होते. शरीराच्या साथीशिवाय त्याला त्या राज्यात जाता येत नव्हते आणि शरीराला या जगातील पहाटवाऱ्याचं सौंदर्य मनाशिवाय अनुभवता येत नव्हतं. कारण शरीरावर ज्या अनुभूती उमटतात त्यांचा रसास्वाद आधी मन चाखतं. मग त्याच्या खुणा शरीरावर उमटतात. राघवांनी त्या दोघांना एकत्र केल्याबरोबर विचारांच्या लहरी उमटत गेल्या. मग येऊ लागले वरचेवर विचारतरंग.

       आज ऑफिसमधे त्यांचा सेंड ऑफ होता. पी. डब्लू. डी. मधे नोकरी करून त्या ऑफिस चक्राला पुर्णविराम मिळणार होता. सगळं जीवन मनासारखं जरी गेलं नसलं तरी पेचप्रसंगही फार आले नव्हते. सर्वसामान्यांसारख्या अडचणी येत जात संसार झाला होता. दोन मुलांची शिक्षणं होऊन ते  मार्गी लागले होते. एक परदेशात तर दुसरा इथेच स्थायिक होऊन त्यांचेही संसार सुरू झाले होते. आता कशात अडकावं असा काहीही प्रश्न नव्हता. विचारांचे तरंग गिरक्या घेत आयुष्याचा मागोवा घेऊ लागले. मन हे नेहमी सुखाच्या शोधात फिरत असतं आणि दुःखं कुरवाळत असतं. कालमानाने, सुखाच्या बोथट झालेल्या भावना आणि दुःखाच्या काटेरी वेदना क्षीण होतात. पण एकाच स्थितीचा, पर्वाचा आनंद व निरागस हसू मन परत परत अनुभवायला तयार असतं. ते म्हणजे बालपणीचा काळ. 

      राघवांच्या मनातून सुखद लहरी उमटल्या. जवळपास पन्नास वर्षापुर्वीच्या काळात ते डोकावून बघू लागले. त्यांचं मन आईच्या मऊ चौघडीवर झोपलेल्या त्या मुलाजवळ पोहोचलं. अश्याच सुंदर पहाटवाऱ्याने त्या मुलाची झोप चाळवली होती. आईच्या जात्याची घरघर आणि अनुनासिक आवाजातल्या ओव्यांनी त्याला जाग आली. त्यातील काही अर्थ उमगत नव्हते. तरी नाद, अलंकार, ठेका, याने तो बांधला गेला. आपसुक मऊ उबदार गोधडीचे सुख बाजूला सारून माजघरात गेला. आई आणि आजी कंदिलाच्या उजेडात जात्यावर दळण दळीत होत्या. कंदिलाचा मंद उजेड त्यांच्या हालचालींनी भिंतीवर वरखाली होत होता. राघवला बघून “ उठला ग माझा गणू ” म्हणत आजी क्षणभर थबकली. राघव आजीच्या मांडीवर डोकं ठेवून आडवा झाला आणि दोघींच्या नादमय हालचाली बघत ओव्या ऐकत राहिला. त्याची आई सगळ्या घरादाराची नावं गुंफून नाती एकत्र बांधून ठेवत होती. ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात त्यामुळे जिव्हाळा ओसंडून वहात होता. घरदार कामाला लागलं होतं. स्वैपाकघरात चुल पेटवून मोठी काकू चहाचं मोठं पातेलं त्यावर ठेवत होती. दुसरी काकू बाहेर सडा रांगोळी घालत होती. आजोबा अंगणातल्या झोपाळ्यावर बसून नामजप करत होते. एक काका गोठ्यामधे वासराला दुध प्यायला सोडून गोठा साफ करत होते. आजोबांचा दंडक होता वासरं पोटभर दुध पिल्यावरच गाई म्हशींच्या धारा काढल्या जायच्या. दुध काढल्यावर, निरसं दुध पोरांना प्यायला दिले जायचे. मग उरलेल्याचे दोन भाग करून एक भाग घरात वापरायचा आणि एक भाग विक्रीला जायचा. दुसरा काका चुलीसाठी, बंबासाठी लाकडं फोडत होता. मागच्या अंगणात मोठा चुलाणा पेटवून पाणी तापत ठेवलं जायचं. बंबही तापत असायचा. एव्हढया सगळ्या बारदानाला आंघोळीचं पाणी पुरवायचं म्हणजे थोडं थोडकं असून चालायचे नाही. आबा बैलांना, गाई गुरांना वैरण चारा घालत होते. राघवची मोठी बहीण चंदना, बारीक रेघा जुळवत ठिपक्यांची देखणी रांगोळी घालत होती. शबरी पुजेसाठी फुलं तोडत होती.

       आई, आजीचं दळण संपलं तसा राघवही उठला. परसातल्या अंगणात येऊन उभा राहिला. समोर उगवतीचे रंग आकाशात सर्वत्र पसरले होते. समोरच्या शेतमळ्याभोवती बागेत फुललेल्या फुलांचे सुवास दरवळत होते. आकाशातले पक्षी दूरवर उडून दिसेनासे होईपर्यंत राघवची नजर त्यांचा पाठलाग करत राहिली. ते दिसेनासे झाल्यावर तो वडिलांच्या मागे जाऊन गाई गुरांच्या अंगावरून हात फिरवू लागला. अजून लहान असल्यामुळे कुठल्याच कामामधे तो धरला जात नसे. शाळा संपली की मनमुराद खेळणं, अभ्यास, आजी आजोबांच्या लाडात आणि रात्री आईच्या कुशीत गोष्टी ऐकत झोपणं हेच राघवचं विश्व होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत वडिलांबरोबर रानात झोपायला जावं हा त्याचा आणि भावंडांचा आवडीचा कार्यक्रम होता. गडद अंधारात उगवलेल्या चांदण्यांच्या मोजदादीत कधी झोप लागायची कळायचे नाही. कधी तरी रात्री जाग यायची. तेव्हा आकाशात तेजाने लुकलुकणाऱ्या चांदण्या डोळ्यासमोर झगमगत असायच्या. शेजारी बाबांची मायेची गरम कुस, वावरातला गार वारा राघवच्या मनात हिरवं बीज पडलं होतं ते तिथेच. त्या कळत्या न कळत्या वयातच मातीशी नाळ जुळली गेली होती. हुशार राघवला मात्र कुणी शेतात रमण्यासाठी किंवा काम करण्यासाठी भाग पाडत नव्हते. शाळेत कायम पहिल्या नंबरावर असलेला राघव सगळ्या घरादाराच्या अपेक्षांचा डोंगर संभाळत शिकत राहिला. त्याचे हात आणि मन माती, हिरवं रान हुंदडण्यासाठी आसुसलेलं असायचं. पण उन्हाळा आणि दिवाळी सुट्ट्यांच्या कवडश्यावर त्याला समाधान मानावं लागायचं. त्यातून सातवी नंतरची शाळा तालुक्याला असल्यामुळे, तिथे रहाणाऱ्या एका काकांकडे त्याची रहाण्याची सोय करण्यात आली. काका काकू दोघं मायाळू. पण शिस्तीचे कडक होते. त्यामुळे राघवचा शारीरिक व मानसिक विकास योग्य प्रकारे होऊन शिक्षणाला अजुन पोषक वातावरण मिळाले. राघवने वडिलांचे नाव काढले. इंजिनियर होऊन सरकारी नोकरीत लागल्यावर वडीलांना मदत करण्याचे त्याने ठरवले होते. पण वडिलांनी ते नाकारले. त्यांचे स्वप्नं होते की, आपला मुलगा शिकून मोठा व्हावा. सरकारी नोकरीत असावा. गाडी बंगल्याचा धनी व्हावा. या सर्व अपेक्षा पुर्ण झाल्याने ते सुखावले होते. पैशा अडक्याला घरी कमी नव्हती. सख्खे, चुलते गुण्यागोविंदाने नांदत होते. नोकरीच्या, संसाराच्या व्यापात अडकल्यावर राघवांना गाव, जमिन एक स्वप्न भासू लागले. कधी तरी लग्न, सण, समारंभ, दोनचार दिवसांच्या सुट्ट्या अश्या तुकड्यांच्या मेव्यावरच समाधान मानावं लागलं. बायकोची सर्वार्थाने साथ होती. मुलांची शिक्षणं, चुलत भावांची मुलं शिक्षणाला इकडे आणून त्यांना योग्य दिशा देणं. गावाकडचा माल विक्रीला घेऊन आलेल्यांना जेवू घालणं, त्यांच्या रहाण्याची सोय, कधी पैशाची तजवीज, लग्न सोयरीक जमवायला मदत अश्या प्रकारची आघाडी राघव सांभाळू लागले. शिकला सवरलेला म्हणून त्यांना घरी विशेष मान असे. त्यांच्या शब्दाला किंमत होती. ते ही समजदारपणे सगळ्यांची मनं राखून प्रत्येकाला मदत करत होते. पण त्यांचं मन आसुसलेलं होतं मातीमध्ये. हिरव्या रानामध्ये. नोकरीच्या व्यापात तर हे शक्यच नव्हतं. आजी आजोबा मंद होत गेलेल्या ज्योतीप्रमाणे हळुवारपणे विझुन गेले. मायेचं मोठं वलय नाहीसं झाल्यासारखं राघवांना वाटत होतं. मोठे काका काकू वयाने थकल्यामुळे त्यांच्या मुलाकडे शहरात रहायला गेले. दुसऱ्या काकाची बायको गेली. त्यांना बाबांनी सांभाळून घेतलं. आईनी मुलांना योग्य वळण लावून त्यांचा संसार थाटून दिला. आता गावाकडच्या घरात आई वडील, काका आणि त्यांचा एक मुलगा एव्हढेच उरले होते.

      आज राघवांचा ऑफिसचा शेवटचा दिवस. त्यांचं मन परत वर्तमानात येऊ लागलं. स्वरूपा आवाज देत होती. “ अहो उठा, आजच्या दिवस ऑफिस आहे. उद्यापासून पाहिजे तेव्हढे झोपा.” राघव उठले. मन कसं आनंदानी भरून आलं होतं. आत्ता विचारात आपल्या स्वप्नांना हात लावल्याचं त्यांना जाणवत होतं. हिरवं स्वप्नं. आता ते प्रत्यक्षात उतरू शकणार होतं. वाट खूप अवघड नव्हती. पण कष्टाची होती. इतके दिवस डोक्याने मेहनत केली आता शारीरिक करावी लागेल. पण आता त्याची तमा नव्हती. पैशाच, माणसांच बळ त्यांच्या पाठीशी होतं. त्यांचे बेत पक्के होत आले. अजुन मुलांशी जरी त्या बाबतीत ते बोलले नव्हते तरी स्वरूपाला या स्वप्नांची जाणिव होती. तिलाही ते आवडले होते. भराभर आवरून राघव तयार झाले.

        ड्राइव्हर आला. त्याचे डोळे आताच पाण्याने भरून आले. तिशीत राघव होते तेव्हापासून हा बाळू ड्राइव्हर त्यांना मिळाला होता. बरोबरीने दोघांनी किती प्रवास केले, किती वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतले होते. सख्य निर्माण झालेल्या नात्यात मालक नोकर हा भाग राहिला नव्हता. अजून त्याची थोडी नोकरी बाकी होती, ती संपली की तो राघवांना जॉइन होणार होता. बाळूला जवळ घेत राघव म्हणाले “ अरे मी इथेच तर आहे. आणि तू येतोच आहेस ना नोकरी संपली की इकडे. कधी काही लागलं तर सांगत जा. ये चल चहा घेऊ.” त्याला चहा नाश्त्याला बसवले. थोड्याफार फरकाने ऑफिसमध्ये हेच वातावरण होतं. सहवासाने निर्माण झालेलं प्रेम ओढ लावतच. राघवांचही मन भरून आलं होत. इतकी वर्ष ज्या नोकरीने आपल्याला पोसले, आनंद दिला त्या भावनेविषयी ते कृतज्ञ राहिले जेष्ठ कनिष्ठ सगळ्यांच्या संवादानंतर आपले कृतज्ञ भाव व्यक्त करून राघवांनी निरोप घेतला. बाळूने हारतुरे, भेटवस्तू गाडीत ठेवल्या. एक मोठा निःश्वास टाकत राघवांनी ऑफिसबाहेर पाऊल ठेवले, आणि आयुष्यातील एक पर्व संपल्याची जाणिव होऊन जरा अस्वस्थ झाले. पण तेव्हढ्यात स्वप्नांच्या हिरव्या स्पर्शानी त्यांना सावरले. कारमध्ये बसून बाळूशी गप्पा मारत घरचा रस्ता धरला. पण मन मात्र स्वप्नांची वाट शोधत फिरत होतं. तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला होता.

                                      ...............................................................................................................................................