श्यामची आई: मूल्य शिक्षणाचे विद्यापीठ!
शासनाला मूल्य निश्चित करून, शिक्षकांना प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो परंतु आई नावाचे असे एक विद्यापीठ आहे, तिथे शेकडो मूल्यं कोणतेही प्रशिक्षण न घेता, अत्यंत जिव्हाळ्याने, आत्मीयतेने शिकविले जातात, अंगी बाणवले जातात अगदी अशिक्षित माता असली तरीही! श्यामची आई! पांडुरंग सदाशिव साने अर्थात सानेगुरुजी यांच्या आईने लहानपणापासूनच श्यामवर केलेल्या संस्काराचे अत्यंत मार्मिक भाषेतील लेखन म्हणजे श्यामचे आई हे पुस्तक! विविध प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित झालेले हे पुस्तक आज घराघरात आहे. सुप्रसिद्ध लेखक, वक्ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या पुस्तकाच्या संदर्भात लिहितात...
'अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्याच्या मुखातून किंवा लेखनीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या 'ज्ञानेश्वरी' मध्ये आहे, तसे गुरुजींच्या 'श्यामची आई' मध्ये आहे. या दोन्ही काव्यांत शुद्ध आणि निर्मळ प्रेम अगदी तुडुंब भरुन वाहत आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच 'श्यामची आई' हे मराठी भाषेचे एक अमर भूषण आहे, ह्यात शंका नाही.'
यापेक्षा वेगळा, समर्पक असा गौरव, समीक्षा 'श्यामची आई' या पुस्तकाची होऊच शकत नाही.
इतक्या सहजतेने आणि समर्पक शब्दात आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे.
लहानपणी झालेले संस्कार हे दीर्घकाळ असतात, जणू ते रक्तात भिनले जातात. 'श्यामची आई' या ग्रंथात एकूण बेचाळीस अध्याय (धडे) आहेत. सानेगुरुजी यांच्यावर त्यांच्या आईने केलेले संस्कार केवळ सानेगुरुजी यांच्यासाठीच मार्गदर्शक आहेत असे नाहीत तर त्यानंतर अनेक पिढ्यांसाठी हे संस्कार मार्गदर्शक, उपयुक्त ठरत आहेत. श्यामची आई हे पुस्तक नाही किंवा वाचले नाही अशी घरे किंवा व्यक्ती तुरळक सापडतील. ह्या पुस्तकातील संस्कारयुक्त अशा छत्तीस आठवणी गुरुजींनी नाशिक येथील तुरुंगात ९ फेब्रुवारी १९३३ ते १३ फेब्रुवारी १९३३ या पाच दिवसात लिहिल्या तर बाकीच्या आठवणी तुरुंगवास संपल्यानंतर लिहिल्या आहेत. हे लेखन पूर्ण करुन आज नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत परंतु त्याचा मराठी माणसावर असलेला प्रभाव आजही कायम आहे. ही सानेगुरुजींच्या शब्दांची आणि लेखनीची कमाल आहे. सानेगुरुजींनी आश्रमातील मित्रांच्या आग्रहाखातर आपल्या जीवनातील दररोज रात्री एक- एक आठवण सांगितली आहे.
या आठवणीपैकी काही आठवणींचा उहापोह मी करीत आहे. आईने केलेल्या संस्काराबाबत सुरुवातीलाच गुरुजी लिहितात, 'कोंड्याचा मांडा करुन कसा खावा आणि दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमाविता कसे राहावे, हे आईनेच मला शिकविले...' किती उत्कृष्ट शिकवण आहे ना ही. मुलांनी स्वाभिमानाने जगावे यासाठी हा गुरुमंत्र ठरावा शिवाय त्रिकालाबाधित अशी ही शिकवण आहे. हुंडा! वधूला आणि वधुपित्याला अनादिकालापासून कायम सतावणारा हा प्रश्न आहे. मुलींच्या अस्मितेला दुखविणाऱ्या ह्या समस्येबद्दल गुरुजी म्हणतात, 'हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे, दोन्ही गोष्टी निंद्य. गाईसही विकू नये असे सांगणारा माझा धर्म थोर, परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलांमुलींसही विकतात यापरता अधर्म कोणता?' हुंडा देणाराने नि घेणाराने दोघांनीही लक्षात घेण्याजोगे असे मार्गदर्शक विचार आहेत.
सानेगुरुजींचे घराणे म्हणजे वैदिक घराणे! सणवार, नित्यनेमाने पूजाअर्चा इत्यादी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असे. गुरुजींचे वडीलही दररोज पूजा करायचे त्यांना दररोज लागणारी फुले आणून देण्याचे काम श्यामला करावे लागे. एका रविवारी श्यामच्या आधीच त्याच्या मित्रांनी सारी फुले तोडल्यामुळे श्यामला एकही फुल मिळाले नाही. श्यामला मित्रांचा खूप राग आला. दुसऱ्या रविवारी श्याम भर दुपारी फुले आणायला गेला. परंतु फुले उमलली नव्हती तरीही श्यामने साऱ्या कळ्या तोडल्या. घरी आल्यावर एका ताम्हणात पाणी घेतले आणि त्या कळ्या ताम्हणात टाकल्या. चार वाजता आईने फुले आणली का हे विचारताच श्यामने फुलांचे तबक आणून आईसमोर ठेवले परंतु त्यातील एकही फूल उमलले नव्हते ते पाहून आई नाराज झाली आणि म्हणाली,
"श्याम, कळी झाडावरच उमलू द्यावी. उमलण्यापूर्वी तोडू नये..." तितक्यात श्यामचे सारे मित्र आले. त्यांना एकही फूल मिळाले नव्हते. आईला खरा प्रकार समजला नि ती जास्तच उदास झाली. तिने त्या मुलांना काही कळ्या दिल्या. मुलं निघून गेल्यावर आई म्हणाली,
"दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता आणू नये, विचारुन आणावीत. कुणी समोर नसेल तेव्हा त्यांना हाक मारावी. कळ्या तर मुळीच तोडू नयेत. कळ्या बाहेरच्या पाण्यात किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजीत असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात..."
साध्या शब्दांत किती मोठा आशय आणि उपदेश सामावलेला आहे. ह्या उदाहरणाचा थेट संबंध बालविवाहाशी जोडला तर तो अनुचित ठरु नये. कारण तो काळ बालविवाहाचा होता. आज बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा असला तरीही फारसा फरक पडला नाही. छोटी मुलगी म्हणजे एक कळी! योग्य वय झाल्याशिवाय मुलीचे लग्न करु नये हा महत्त्वाचा संदेश यातून नकळतपणे दिला आहे.
आश्रमात राहताना प्रत्येकालाच घरची आणि त्यातही आईची आठवण येणे साहजिक आणि नैसर्गिक! त्यातच श्यामचे त्याच्या आईवर नितांत प्रेम! आईच्या येणाऱ्या आठवणीबद्दल एकदा श्याम आपल्या मित्रांना सांगतो, 'आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे होते...' अत्यंत सुंदर असे हे शब्द आहेत. आई म्हणजे जणू ईश्वर ही उपमाच किती गोड आहे ना. दूर राहणाऱ्या अपत्याला दुःखाच्या समयी आईची आठवण हमखास येते परंतु गुरुजी म्हणतात, त्या प्रमाणे आईची आठवण म्हणजे दुःखहारी मलम आहे.
श्यामची आई म्हणजे मूर्तीमंत परोपकारी, दयाळू, प्रेमळ! प्राणीमात्रावर दया करणारी. मग ती मजुरीन असो, शेजारीन असो, मोरी गाय असेल, मनीमाऊ मथी असेल किंवा अजून कुणीही असो आईची सर्वांवर सारखीच माया असे. शेजारी, गावात कुणी आजारी असेल तर श्यामची आई मदत करीत असे. आर्थिक परिस्थिती गरिबीची असली तरीही घरातील खाण्याच्या वस्तू देऊन मदत करीत असे. यातून नकळत परोपकार, बंधूभाव, शेजारधर्म, पाणीमात्रावर दया अशा अनेक गोष्टी घडून येत असत.
मोरी गाय! श्यामच्या आईने पोटच्या लेकराप्रमाणे तिच्यावर प्रेम केले. मोरी गायही दूध काढल्यासाठी यशोदा मातेशिवाय कुणाला जवळ येऊ देत नसे. एका महाभयंकर साथीच्या आजारात दुर्दैवाने मोरी गायीचा मृत्यू झाला. यशोदा आईला अत्यंत दुःख झाले. त्या दिवशी त्या जेवल्या नाहीत. तशा दुःखातही आईने मांडलेले विचार अजरामर झाले आहेत. शब्द गायीसाठी असले तरीही समाजासाठी एक बहुमोल संदेश त्या शब्दांत सामावलेला आहे.
कधी कधी आई बोलताना म्हणे 'मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारख तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली.' माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली, ज्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ हे अधिकाधिक येऊ लागले. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्यदेवता, आधारदेवता, या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गो-पूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहो, देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो; परंतु तिला खायला प्यायला देत नाही; तिचे दूधही मिळत नाही; मिळाले तर रुचत नाही, खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे, दास्य सांगितले आहे. "
माणूस आनंद असो, दुःख असो स्वतःच्या नकळत अनेकदा फार मोठा संदेश देऊन जातो. काही व्यक्तिंचे असे विचार, संदेश नेहमीच विचारणीय, अनुकरणीय असतात. गायीच्या बाबतीत आज जी परिस्थिती आपण अनुभवत आहोत तिचा सत्यांश वरील संदेशात आपणास आढळून येतो. असे संदेश श्यामच्या आई या पुस्तकात अनेक ठिकाणी आहेत. कधी श्यामच्या आईच्या सहजपणे बोलण्यातून तर कधी श्यामच्या सहजतेने बाहेर पडणाऱ्या बोलातून. एकेठिकाणी गुरुजी लिहितात,
'या जगात नुसते प्रेम, केवळ दया असून भागत नाही. जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट शक्ती.
प्रेम, ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, त्याला कृतार्थ होता येईल....'
एकदा एक पाखरु झाडावरून खाली पडले. छोट्या पाखराला वाचवण्यासाठी श्यामने आणि त्याच्या भावाने प्रयत्नांची शर्थ केली परंतु दुर्दैवाने त्यांना त्यात यश आले नाही. यामुळे दुःखी झालेल्या श्यामची समजूत आईने खूप छान पद्धतीने काढली. बोलताना आई म्हणाली,
'तुम्ही पाखराला प्रेम दिलेत, चांगले केले. तसेच पुढे एकमेकांवर करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल; परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल. तुम्ही भावंडे एकमेकांना कधी विसरु नका. तुमची एक बहीण आहे, तिला कधी विसरू नका, तिला कधी अंतर देऊ नका; तिला भरपूर प्रेम द्या...' घटना किती साधी आहे. एक पाखरु पडते काय, ती भावंडं इतरांप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करतात आणि हा धागा पकडून श्यामची आई किती दूरदृष्टी ठेवून समजावून सांगते. या पुस्तकात लिहिलेल्या अनेक घटना केवळ बालकांसाठी किंवा श्यामला उपदेश व्हावा यासाठी असल्या तरीही सामाजिक भान ठेवून, समाजाला अज्ञान, हुंडा, कर्ज इत्यादी अनेक बाबींची लख्ख जाणीव करून देणाऱ्या आहेत, नव्हे सानेगुरुजींनी आपल्या शब्दसामर्थ्याच्या जोरावर त्या घटना समाजापुढे ठेवल्या आहेत. यातून श्याम घडत केला. आईची शिकवणीचा परिणाम झालेला आणि लहानपणी खोडकर असलेला श्याम मित्रांना सांगतो, आईच्या शब्दांनी मी जागा झालो, मला दिशा मिळाली. जीवनात तेज आले, प्रकाश आला. निराळी दिशा दिसू लागली आणि देवासमोर उभे राहून प्रार्थना केली की, आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन...' अनेक वेळा बोल जिव्हारी लागत असले तरीही ते असा परिणाम साधून जातात...
धर्म! आजचा कळीचा मुद्दा! प्रत्येकाच्या काळजात घर केलेला, आचरणात येणारा. परंतु धर्माच्या बाबतीत फार सुंदर असे विचार गुरुजी व्यक्त करतात, 'मोह सोडणे म्हणजे धर्म! प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यासाठी करणे म्हणजे धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे, सर्वांत धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश...' सोबतच देवाबद्दलही अत्यंत विनयाने नि भक्तीभावाने गुरुजी सांगतात,
'म्हणजे बापडा, पापी असे देवाला वाटते. तर त्याने ते रूप धारण केले असते काय?" मी विचारले.
अशाच एका प्रसंगी आई म्हणाली, "श्याम! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने सशाचे रूप घेतले. कासवाचे घेतले, डुकराचे घेतले. सिंहाचे घेतले. देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे. हरीजनाच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गाई चारतो. त्याला गृह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम देवाला सारी प्रिय आहेत. तू माझा, म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची. मला आवडेल, ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु, श्याम! ज्याचे आपल्या आईबापांवर, बहिणभावावर प्रेम नाही, तो हरीजनांवर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा. मग एकानाथाप्रमाणे हरीजनाच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल..." सर्वधर्मसमभाव, बंधूप्रेमाचा यापेक्षा अधिक चांगला उपदेश कोणता असू शकेल?
कर्ज! भारतीय समाजजीवनात आवळलेला एक फास, जणू चक्रव्यूह! अशा या समाजोपयोगी गोष्टींसाठी सानेगुरुजींचे त्या काळातील विचार अत्यंत प्रेरणादायी असे आहेत. सानेगुरुजींचे घराणे एकेकाळी अत्यंत श्रीमंत घराणे होते परंतु नशिबाच्या फेऱ्यात अडकून होत्याचे न होते झाले जणू राजाचा रंक झाला आणि कर्जाच्या फेऱ्यात अडकला. त्या प्रसंगी गुरुजींचे विचार समजून घ्यायला हवेत. गुरुजी लिहितात, कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू नये. उपवास काढावे; परंतु ऋण नको. ऋणाने एकदाच सुख होते, ते म्हणजे ऋण घेताना. त्यानंतर ते नेहमी रडविते, भिकेस लावते. कर्जाने स्वाभिमान जातो, मान हरपतो. कर्ज म्हणजे मिंधेपणा. दीनपणा...
किती बहुमूल्य विचार आहेत हे. कर्जामुळे माणूस सर्वस्व गमावून बसतो. माणूसपण हरवतो, खाजगी आयुष्य हरवून बसतो.
गुरुजी पुढे समाजाला एक विनवणी करतात, 'गड्यांनो! तुमच्या बायकामाणसांची, पोराबाळांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये, अब्रूचे धिंडवडे होऊ नयेत असे वाटत असेल तर कर्जाला स्पर्श करू नका. कर्ज असलेच तर शेतभात, दागदागिने सारे विकून आधी कर्जमुक्त व्हा...'
असे समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार गुरुजींनी का लिहिले असावेत? गुरुजींचे वडीलही कर्जबाजारी होते. कर्जवसुलीसाठी आलेल्या सावकाराच्या नोकराची बडदास्त ठेवताना श्यामच्या आईच्या नाकीनऊ येते परंतु तिचा राग तेव्हा अनावर होतो, तिच्या तळपायाची आग मस्तकात शिरते जेव्हा तो माणूस म्हणतो,
"घर बांधायला पाटल्या विकल्यात, सावकाराचे देणे देण्यासाठी बायको विका..."
तोवर ओठांवर गच्च दात आवळलेली श्यामची आई एखाद्या वाघिणीच्या त्वेषाने बाहेर आली आणि त्याला खडसावून हाकलून लावले... यावेळी श्यामच्या वडिलांना काय वाटले असेल? एकेकाळी दुसऱ्यांना आर्थिक मदत करणारा हा गृहस्थ इतरांकडून कर्ज घेतो, कर्ज फेडायला उशीर होत असल्यामुळे वसुलीसाठी आलेल्या माणसाचा पाहुणचार करावा लागतो, त्याचे बोल ऐकून घेतो.
परिस्थिती मानवाला किती अगतिक, लाचार बनवते ह्याचे हे ठळक आणि हृदयद्रावक असे उदाहरण आहे.
सानेगुरुजींचा शब्द संचय, शब्द सामर्थ्य आणि शब्दांना विचारात योग्य रीतीने, योग्य ठिकाणी व्यक्त करण्याची हातोटी विलक्षण आहे. प्रसंग, घटना वरवर साधी वाटत असली तरीही त्यात दडलेला गहन अर्थ, सामाजिक संदेश ओळखून ती मांडण्याची तीव्र बुद्धी, प्रबळ इच्छाशक्ती असल्याने अनेकदा सहजगत्या ते विचारांची, उपदेशांची श्रुंखला मांडून जाता. ते पारतंत्र्याचे दिवस होते. सानेगुरुजींचे चित्त थाऱ्यावर नसल्याचे पाहून एका मित्राने कारण विचारताच गुरुजींनी खिन्नपणाने एक जळजळीत सत्य मांडले,
'पारतंत्र्य सर्वभक्षक आहे. सर्व संहारक आहे. हिंदुस्थानात आज मरण आहे, जीवन नाही; शोक आहे, आनंद नाही; कृतघ्नता आहे, कृतज्ञता नाही; लोभ आहे, प्रेम नाही; पशुत्व आहे, माणुसकी नाही; अंधार आहे, उजेड नाही; अधर्म आहे, धर्म नाही; भीती आहे, निर्भयता नाही; बंधने आहेत, मोकळेपणा नाही; रुढी आहेत, विचार नाही. हे विराट दुःख, सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते. माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत. त्यांची सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत. मी उदास होऊ नये, तर काय करु?'
सानेगुरुजींच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती परंतु त्यांना चिंता होती, भारत मातेची! त्यांना काळजी होती, लाखो मातांची, त्यांना घोर लागला होता गरिबांच्या ऋणमुक्तीचा! त्यांचा चेहरा काळवंडत असे, अज्ञान- विषमता पाहून!
सततच्या कष्टाने, कायमच्या चिंतेने, घरादारासोबत इतरांच्या गरिबीचा घोर लागल्याने, काही दुर्दैवी परंतु अनाकलनीय घटना घडल्यामुळे यशोदाबाई थकल्या. तरीही पतीला मदत व्हावी म्हणून झिजत राहिल्या. शेजारच्या घरी स्वयंपाक, त्यांच्या बाळंत झालेल्या मुलीला नि बाळाला न्हाऊमाखू घालत राहिल्या. अंगात ताप असतानाही काम करणे हे त्यांचे जणू ब्रीद होते. मानसिक तयारी असली, मन थकले नसले तरीही शरीर थकत चालले होते. अंगात त्राण नसताना काम करण्याचा परिणाम शेवटी अंथरुणावर पडण्यात झाला. अंथरुणावर खिळलेल्या असल्या तरीही स्वतःच्या तब्येतीची काळजी नव्हती तर कुटुंबाची, शेजारच्या घराची काळजी होती. दोन मुले त्यातही श्याम शिक्षणासाठी दूर राहत होता. मोठा मुलगा भेटून गेला परंतु श्यामच्या भेटीशिवाय अत्यंत कष्टप्रद अशा रीतीने, पतीच्या हातून पाणी पिऊन, त्यांच्या मांडीवर जीव सोडला. तिकडे श्यामला त्याच सकाळी अस्वस्थ, बेचैन वाटत होते. आईची आठवण येत होती परंतु घरी जाण्यासाठी लागणारे पैसे नव्हते. किती विचित्र परिस्थिती होती ना, मायलेकरु एकमेकांच्या भेटीसाठी तळमळत होते, व्याकूळ झाले होते परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अशा परिस्थितीत श्यामचा एक मित्र धावून आला. त्याच्या मदतीने श्याम आईच्या भेटीला निघाला तर खरा पण आईची भेट झाली का? झाली तर कोणत्या परिस्थितीत झाली या प्रश्नांची उत्तरे आणि उपदेशात्मक असले तरीही उपदेशाचे अनावश्यक डोस नसलेले 'श्यामची आई' हे पुस्तक वाचायलाच हवे...
००००
श्यामची आई : बोधकथासंग्रह
लेखक : सानेगुरुजी
आस्वादक: नागेश शेवाळकर,
पुणे
(९४२३१३९०७१)