चहापान
आठवी नववीत असताना प्रभाकर पाध्येंचा जपानी चहा पध्दतीवर आम्हाला धडा होता. आता त्याचे नावही आठवत नाही. पण जपानी लोकांनी त्याला समारंभाचं दिलेलं रूप आणि त्यातल्या कलात्मकतेने रंगवलेल्या पध्दती, गेशा वर्णनं असं त्या चहापानाचं अर्धुकसं वर्णन मनावर ठसलं. ते वय असं होतं की नुसतच ठसलं, पुर्ण कळाले नाही. पण त्याचा पाठपुरावा मधल्या काही वर्षात घेतला गेला.
चहा हे जवळपास सगळ्यांचेच आवडते पेय. पण तो फक्त प्यायचा म्हणून प्यायचा नाही, तर त्याच्या खुबी, नजाकती जाणून घ्यायला लागले. वेगवेगळ्या लोकांच्या चहा पिण्याचा वेगवेगळ्या तऱ्हा अनुभवल्या. बदलीच्या निमित्ताने फिरल्यामुळे असेल आणि तो धडा मनात असल्यामुळे खूप वेगवेगळे प्रकार बघितले. चहा बद्दल माहिती गोळा केली. त्यासाठी नेट पिंजले. काहींच्या चवी चाखल्या. काही ऐकल्या, काही बघितल्या पण पिण्याचे धाडस झाले नाही. मग हळुहळू चहा बद्दल बरीच माहिती गोळा झाली आणि ती कधीही काढून वाचत बसायचा छंदही लागला. माझ्याप्रमाणे काही चहाप्रेमी असतील त्यांच्यासाठी हा ऐकीव, वाचीव आणि चाखीव खजिना रिता करायचा ठरवला.
सगळ्यात पहिल्यांदा चहा प्यायची आवड मोठयाईने लावली. आधी गंमत म्हणून आई नसताना हळूच पिलेला चहा किती थ्रिलींग वाटायचा. नंतर मोठयाई चहा करायला सांगू लागली. मग आपणच चहा करतोय तर थोडा पिला जातोच. असे करत करत आणि आठवीत का नववीत तो धडा वाचल्यावर तर शौकाने चहा प्यायला शिकले.
खरा पहिला सुंदर चहा पिला तो आमच्या दुधवाल्या मामांच्या शेतात. ते दरवर्षी हुरडा खायला बोलवायचे. आम्ही आलो की, मोठ्या पितळेच्या भांड्यात ताज्या दुधाचा, बिन पाण्याचा चहा उकळत असायचा. घरी भरपूर शेती, दुधदुभते आणि मामांचा हातही मोठा. त्यामुळे चुलीवरचा कडक चहा समोर यायचा. खमंग अप्रतिम चव. कुठेही आलं, विलायची फ्लेवर नसलेला, असली चहा असायचा तो. मळकट कपात अस्सल खानदानी चहा.
आमच्या दादांना चॉकलेटी चहा खुप आवडायचा. नेहमी ते दुकानातून घेऊन यायचे. रोझ टी चव बदल म्हणून बरा वाटतो.
नंतर जसजसं वय वाढत गेलं, तसतसा वेगवेगळ्या रूपात चहा भेटू लागला. कँटिन मधला कडक, कमी साखरेचा, गप्पांच्या नादात कधी संपून जातो ते न कळणारा. मैत्रिणीकडे गेल्यावर तिच्या आईने खास आलं घालून केलेला चहा. एका मैत्रिणीकडे छान बाग होती. बागेत गवती चहाचा वाफा होता. त्यामुळे तिच्याकडे गेलं की हमखास गवतीचहा पिला जायचा आणि येताना घरी न्यायला तिची आई कागदात गवतीचहाचे गुंडाळे बांधून द्यायची. अभ्यासाच्या रात्री चहा पिऊन जागरणं चालायची. किती तरतरी आणायचा तो त्यावेळी. लग्न ठरल्यावर एकमेकांकडे चोरून बघत हळूच पिलेला चहा, त्याची न कळालेली चव, अजूनही आठवलं की मन गुदगुदुन हसतं. अशी चहाची कितीतरी रुपे आणि त्याला प्रत्येक जीवन प्रसंगाचे कंगोरे.
आम्ही दक्षिण भारतात फिरायला गेलो होतो. तिकडे कॉफीचे जास्ती प्रस्थ. पण चहा तो चहाच. त्याचे भक्त सर्वत्र. तिथे काळा चहा म्हणजे पत्ती साखर टाकून पाणी उकळून ठेवतात आणि जेव्हा हवा असेल तेव्हा गरम करून, दुसऱ्या भांड्याने त्यात गरम दुध एकत्र करतात. पण तेही एकत्र करण्याची पद्धत म्हणजे एका ग्लासमध्ये काळा चहा व दुसऱ्या ग्लासमध्ये गरम दुध घेऊन उंचावरून एकमेकात ओततात आणि मग प्यायला देतात. पण या पध्दतीत ग्लास सतत पोळत असतो. त्यामुळे चहा पिण्यापेक्षा चटकेच जास्त सहन करावे लागतात. मग चवीवरचे लक्ष उडते आणि त्यातली मजा निघून जाते.
काश्मिरमधे चहाचं पारंपरिक रूप एकदम वेगळं आहे. तिथे थंड वातावरणात शरीराला मानवणारा काश्मिरी कहावा पिला जातो. तो दुध न घालता बनवतात. आम्ही गोल्डन लिली बोट हाऊसवर होतो तेव्हा तिथल्या लोकांना कहावाबद्दल विचारले व तो चहा बनवताना पाहण्याची इच्छा दर्शवली. कुणाला त्यांच्या संस्कृतीबद्दल आदर, आवड दाखवली की, ती समोरची व्यक्ति एकदम भारावून जाते. त्यांनी खुशीने आम्हाला बोट हाऊस वरच्या किचनमधे नेले.
कहावा तयार करायचा विधी पण राजेशाही वाटतो. काश्मिरी ड्रेस घातलेल्या सुंदर तरुणीने एका भांड्यात तीन कप पाणी, लवंगा, दालचिनी टाकून ते उकळत ठेवले. वेलदोडयाची पुड करून त्यात टाकली. केशर भिजवून ठेवले होते. पाणी उकळल्यावर त्या गाळणीत दोन चमचे चहापत्ती ठेऊन गाळण भिजेल इतपतच पाण्यात बुडवून ठेवली. तीन ते पाच मिनिटांनी चहाचा रंग सोनेरी झाल्यावर गाळणी बाजूला काढून ठेवली. एखाद्याला कडक चहा हवा असेल तर अजून थोडावेळ गाळणी पाण्यात बुडवून ठेवतात. या सोनेरी चहामध्ये दोन तीन चमचे मध आणि किंचित मीठ टाकले. यात लिंबू आवडेल का असेही विचारून, त्यानंतर केशर मिश्रित पाणी टाकले व ते सर्व पाणी हलवून घेतले. चिनी मातीच्या नक्षीदार कपात तो कहावा भरून त्यावर किसलेला बदाम टाकला. हा चहा गरम, थंड अश्या दोन्ही पध्दतीने पिता येतो. खरं तर हा चहा चवीचवीने चाखत माखत, सुरेल गाणे ऐकत, बोटीच्या दर्शनी भागातल्या खुर्चीवर रेलून पाण्याकडे, कमळांकडे बघत, तसेच भोवताली असलेल्या सुंदर नजाऱ्यांवर नजर फिरवत असताना, हळुवार चहाचे घोट घेत घेत पिण्यासारखा असतो. त्या सगळ्याचे सौन्दर्य आणि चहाचा कण न कण साजरा करावा वाटतो.
काही दिवस आम्ही उत्तर भारतात होतो. तिथे थंडीमुळे लोकं बराच चहा पितात. नक्षीदार नाजुक किटली, दुध साखरेचे छोटे भांडे, शुगर क्युब ठेवायला एक बाउल, तो क्युब उचलायला छोटा चमचा, नाजुक किणकिणाट करणाऱ्या, रंगसंगती साधणाऱ्या कपबश्या हे सगळं ठेवायला सुशोभित ट्रे. असा सरंजाम बंगल्यासमोरच्या बागेतल्या हिरवळीत टेबलावर ठेऊन सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा संध्याकाळच्या वाऱ्यांच्या झुळकांबरोबर चहाचा आस्वाद घेतला जातो. काही भागात कुल्हड या मातीच्या भांड्यातून चहा पितात. कुल्हडमुळे चहाला विशिष्ट प्रकारचा मातीचा सुगंध येतो. इथे आणि महाराष्ट्रात जास्त पत्ती टाकून उकळलेला चहा पिण्याची पध्दत आहे. काही ठिकाणी तर सायीचा जाड थर टाकून मलई मारके चहा दिला जातो. कुठेतरी वाचण्यात आलं होतं की एका हॉटेलमध्ये ८५ प्रकारचे चहा बनवले जातात.
गुजरातमध्ये आम्ही होतो तेव्हा असं आढळून आले की तिथे चहाचं वेड जरा कमी आहे. बऱ्याच बायका चहा न पिणाऱ्या भेटल्या. काही जणी कोरा चहा प्यायच्या. तिथे सोडा प्यायची खूप आवडीची पध्दत दिसली. रात्री जेवणं झाली की कुटुंबच्या कुटुंब फिरत फिरत सोडा शॉपवर येतात. तरीही गुजरातमध्ये उकाळा नावाचा कडक चहा पिण्याची पध्दत आढळून आली. तसेच एका बां नी ( आजींनी ) त्यांच्या काळची मजेदार प्रथा ऐकवली. गावात, परदेशी गेलेला माणूस सुट्टीवर परत आला की गावातले लोकं त्याला पारावर चहा प्यायला बोलवायचे. घरून येताना सगळेजण स्वतःची कपबशी घेऊन यायचे. जे चहा आणणार ते कडीच्या डब्यात चहा घेऊन यायचे. सुट्टीवर आलेला पाहुणा, गावजेवण करावे तसे गावचहा प्यायचा. किती सामुहिक भावना. परदेशातल्या कोरड्या संस्कृतीपुढे इथे किती आपलेपणा वाटत असेल त्या माणसाला.
लदाखमध्ये गेलो होतो तेव्हा याकचे दुध टाकून बनवलेल्या चहाची चव घेतली. पण ती मात्र फार आवडली नाही.
हे तर झाले चाखीव अनुभव. पण चहाप्रेमापायी बाकी देशातल्या चहा संस्कृतीवरही माहिती गोळा केली. ते परत परत वाचायला फार मजा येते. माझ्यासारखे कोणी असतील तर त्यांना ही वर्णनं आवडतील म्हणून वेगवेगळ्या काही देशातल्या चहा पद्धतींवर लिहीत आहे. इथे ज्या ज्या देश्यांच्या विविध पध्दती देत आहे त्या पारंपारिक आहेत. आजच्या नेट जेटच्या युगात सगळीकडे सगळे मिळते. पुर्वी लोकं जिथे जे पिकायचे तेच खायचे, आणि ते त्यांच्या शरीर दृष्टीने बरोबरही असायचे.
सगळ्यात प्रथम आपल्या भारताला लागून असलेला तिबेट देश. तिबेटमध्ये याकचं दुध घालून चहा पिला जातो. प्रथम तो बारीक कुटून, गरम पाण्यात उकळून घेतात. नंतर त्यामध्ये याकचं दुध, लोणी, मीठ टाकून ते घुसळलं जातं. किटलीमध्ये ते मिश्रण तापवतात व उभ्या लाकडी कपात चहा ओतून प्यायला देतात. अजून एक पध्दत, ते याकच्या दुधाचे पनीर बनवतात. मीठ लावून एका पिशवीत भरून ठेवतात. पाहिजे तेव्हा त्याचे चौकोनी तुकडे, चहाच्या पाण्यात टाकून तो चहा पितात. ह्या चहाने खुप ऊर्जा येते. जी तिथल्या थंडीशी सामना करायला आवश्यक असते.
रशियन लोकं दिवसातून किंवा काही दिवसांनी एकदा पोटभर जेवतात. आपली उर्जास्थिती टिकवण्यासाठी सतत चहा पितात. या सतत चहा पिण्यासाठी घरोघरी ‘समोवार’ हे चहाचे पाणी तापवायचे, बंबासारखे एक सुरेख रेखीव भांडे असते. पूर्वी रशियन लोकं चहासाठी झऱ्याचे पाणी जास्त चांगले म्हणून ते पाणी वापरायचे. पाणेकरी झऱ्याचे पाणी भरून ‘चहापाणी’ असे ओरडत ते दारोदार विकायचा व गृहिणी ते पाणी विकत घ्यायच्या. या समोवारात चहासाठी लागणारं पाणी तापवलं जायचं. दुसरीकडे किटलीमध्ये खूप कडक काळा चहा बनवला जायचा. चहाच्या कपात हा कडक व कोरा चहा ओतून मग त्यात चवीनुसार समोवारच्या नळातून गरम पाणी घेतलं जातं. आवडीनुसार त्यात लिंबू, मध, किंवा जॅम घातला जातो. काहीजणं खडीसाखर तोंडात ठेवून चहाचे घुटके घेतात. आजही ही पध्दत असेल.
चहा समारंभाच्या जपानी धड्यामुळे चहाप्रेमाचं बीज मनात पडलं. जपानने चिनी चहापध्दती आणि झेन बौध्द तत्वज्ञान एकत्रितपणे वापरलं आणि जपानी चहा समारंभ उदयाला आला. चानोयू, साडो, किंवा ओचा या नावाने तो समारंभ ओळखला जातो. सेन तो रिकयू यांनी इ. स. १५०० मध्ये, जपानी चहा हा पिण्यापूरता मर्यादित न ठेवता तो एक आध्यात्मिक अनुभव बनवला. या समारंभाचे शहरांमधून, गावांमधून ठिकठिकाणी खास आयोजन केलेले असते. हा समारंभ चहाच्या खास खोलीत किंवा बागेत मोठ्या व मोकळ्या जागी करतात. यजमानांची तयारी होईपर्यंत पाहुण्यांना प्रतिक्षागृहात बसवले जाते. तेथे जपानी शैलीचे रेशमी व कागदी कलात्मक पडदे लावलेले असतात. त्यावर कॅलिग्राफी स्क्रोलमधे सुप्रसिध्द म्हणी, विशेषता बौध्द कविता, प्रसिध्द ठिकाणे यांचे वर्णन केलेले असते. या स्क्रोलचे वैशिष्ट म्हणजे सद्भाव, आदर, शुध्दता, शांतता, या चार तत्वाचे ते दर्शक आहे. यजमानाची चहाची तयारी झाल्यावर, पाहुण्यांना मातीच्या वाटेवरून चहाच्या खास खोलीत नेतात. त्या खोलीत जाण्याआधी दगडी भांड्यात हात तोंड धुवायला सांगितले जाते. त्यानंतर एका छोट्या दरवाजातून पाहुण्यांना चहाच्या खोलीत नेतात. हा दरवाजा इतका छोटा असतो की तिथे जाताना वाकूनच खोलीत जावं लागतं. त्यांच्या पद्धतीनुसार वाकून खोलीत प्रवेश करणे म्हणजे चहाच्या खोलीला नमस्कार करणं. पाहुणे खोलीत आले की सर्वप्रथम गोड पदार्थ देतात. खोलीची अंतर्गत सजावट, कॅलिग्राफी स्क्रोल बघत, शांती अनुभवत ‘बागशा’ नावाची मिठाई खाल्ली जाते. सजावटीमध्ये इकेबाना, चबाना, पध्दतीने फुलं सजवलेली असतात. यजमान किमोनो घालून चहा सर्व्ह करतात.
चहा समारंभ सुरू होतो तो साहित्याची सफाई करण्याने. एका विशिष्ट पध्दतीने बाऊल, चहाचा चमचा, बांबूने बनवलेला ब्रश धुतला जातो. मग बाऊलमध्ये प्रत्येकी तीन चमचे ‘माचा’ चहापत्ती घालतात. त्यात गरम पाणी टाकून बांबूच्या ब्रशने हलवत तो घट्ट केला जातो. आवश्यकतेनुसार पाणी घालून सुपासारखा दाट तयार झालेला माचा चहा प्रथम पाहुण्याला दिला जातो. त्याचा चहा पिऊन झाल्यावर त्या बाऊलची कडा साफ करून घेतात आणि पुढच्या पाहुण्याला तो बाऊल दिला जातो. हा प्रकार सर्व पाहुण्यांचा चहा पिऊन होईपर्यन्त सुरू रहातो.
अमेरिकन लोकं आईस टी पितात. आता सर्व प्रकारचे चहा पिले जातात, पण काळा चहा, बर्फ टाकून तो थंड करतात आणि त्यात चवीनुसार साखर व फळांचे तुकडे बारीक करून टाकतात. असा चहा त्यांचा आवडीचा आहे. आपापल्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारांनी हा चहा बनवून पिता येतो.
ब्रिटिश लोकांचा तर चहा पिणे हा एक शानदार कार्यक्रम ( घरगुती किंवा बाहेरही ) असतो. नक्षीदार टेबलक्लॉथ घातलेल्या टेबलवर केक, बिस्किटं, पेस्ट्री, कुकीज असे सर्व आकर्षकरित्या मांडून ठेवतात. त्याबरोबर नक्षीदार सुंदर किटलीत, काळा चहा बनवून त्यावर त्यावर टिकोझी घातलेली असते. चिनी मातीच्या एका भांड्यात साखर किंवा क्युब ठेवून, एक चोच असलेले भांडे गरम दुधाने भरलेले असते. बाकी पदार्थांचा आस्वाद घेत गप्पा मारत ज्याला जसा चहा पाहिजे तसा बनवून पितात. हा एक कौटुंबिक किंवा जिव्हाळा वाढवणारा सोहळा मानला जातो.
ओमानमधे चहा पध्दतीला कावा म्हणतात. इथे जपानी पध्दतीचे बिन कानाचे छोटे छोटे कप असतात. आपण त्यांच्या घरी गेल्यास त्यांच्या प्रथेप्रमाणे स्त्री पुरुष यांची बसण्याची व्यवस्था वेगवेगळी केलेली असते. या पाहुणचाराच्या खोलीला ‘मजलिस’ म्हणतात. जपानी पध्दतीप्रमाणे खाली बसून चहा घेण्याची रीत आहे.
प्रथम तुमचे स्वागत सुगंधी धुपाने केले जाते. जमिनीवर बुटका पण रुंद असा टिपॉय असतो. खाली गुबगुबीत गालिचे अंथरलेले व शाही सोफासेट असतो. तिथून जरा अंतरावर ही चहा घेण्याची सोय केलेली असते. इथल्या परंपरेनुसार चहात दूध घातले जात नाही. सौम्य प्रमाणात तो उकळतात. प्रथम पाणी गरम करून सुरईत ओतले जाते व बाकीचा मसाला म्हणजे कावा बनवण्यासाठी दालचीनी पावडर, काश्मिरी हिरव्या चहाची पाने चुरून वेलची कुटून, किसलेला बदाम व साखर हे सगळे गरम पाण्यात टाकतात व लगेच किटलीत ओतून पाच मिनिटांनी कपात पिण्यास देतात. हा चहा गाळत नाही.
जास्वंदी फुलापासून बनवलेला चहा पण छान लागतो. सुकलेली फुलं, दोन तीन लवंगा, किसलेले आलें, जेव्हढी फुलं असतील त्यांच्या आदमासाने साखर, एक मोठा चमचा लिंबाचा रस घालून तो उकळतात. सात कप पाणी असेल तर ते तीन कप होईपर्यन्त उकळतात. पुन्हा त्यात चार कप पाणी घालून, थंड झाल्यावर गाळलेल्या चहात बर्फ घालतात. मग तो चहा दिला जातो.
ओमानी लिंबाचा चहा. याचे वैशिष्ट म्हणजे लिंबे मिठाच्या पाण्यात उकळून सुकवली जातात. त्यांना झातर म्हणतात. अश्या लिंबाच्या चहाला चार कप पाणी घेतले तर पाच ते सहा झातरची साले,( वाळलेली लिंबे फोडून साल वेगळे काढता येते.) दोन मोठे चमचे मध व थोडी साखर घालून पाच मिनिटापर्यंत उकळतात. मग गाळून हा गरमागरम चहा दिला जातो.
लाल रंगाचा, साधी पावडर टाकून तीन प्रकारे चहा केला जातो. पुदिना, रोजमेरी, सागेची सुकवलेली पाने, झातरची सुकवलेली पाने घालून चहा बनवला जातो.
अनंत प्रकारच्या आवडीनिवडी व त्यानुसार वेगवेगळ्या पध्दतीने बनवलेला चहा. वेगवेगळ्या देशांच्या चहा प्रकारावर लिहायचे म्हटले तर मोठे पुस्तकच होईल.
.................................................