Mathuaji in Marathi Short Stories by Madhavi Marathe books and stories PDF | मथुआजी

Featured Books
Categories
Share

मथुआजी

                                                                                             मथुआजी

   आमची नाशिकला बदली झाली. थोडा आनंद, थोडे कुतूहल. नवीन गावाबद्दलची साशंकता या सगळ्या सकट आम्ही नाशिकला येऊन पोहोचलो. नवीन फ्लॅट छानच होता. आजुबाजूला तुरळक वस्ती दिसत होती. समोर थोडं दुरवर बंगल्यांची रांग दिसत होती. शेजारी बिटको फॅक्टरी. बंगल्यांच्या भोवती हिरवळीचं अपार सुख दिसत होतं. फॅक्टरीच्या आवारात वटवृक्ष नांदत होते. हळूहळू बस्तान बसून दिनक्रम सुरू झाला. पुस्तकाशिवाय एकही दिवस जाऊ न देणारी आता परत त्या ओढीने लायब्ररीचा शोध घेऊ लागले. मैत्रिणीकडून एका लायब्ररीचा पत्ता कळाला. शोधत शोधत त्या घरापाशी आले. एक जुनाट बंगली. चार खणाचं घर. पण घराभोवती एक एकर एव्हढं आवार पसरलेलं. त्या आवारात अनंताची फुलं दृष्टीस पडली. केळीचं एक झाड आपल्या पानांना झोके देत केळफुलाला वारा घालून फुलवताना दिसलं. वेगवेगळ्या गुलाबांच्या रंगसंगतीने आणि भरीला मोगऱ्याच्या सुवासाने त्या बंगलीला वेगळीच शोभा आली होती. तरीही मनाने, त्या बंगल्याभोवतीच्या उदास वातावरणाला टिपलच. पायऱ्या चढून आत गेले. दारावरच्या बेलनी दाराबाहेर कोणीतरी आले आहे ही खबर आत पोहोचवली. त्याचा आवाज ऐकून एक वृध्द आजी बाहेर आल्या. गोऱ्या रंगाच्या, लहान चणीच्या असुरक्षित भावनेने समोरचा माणूस कश्या प्रकारचा आहे हे अजमावत बघणाऱ्या आजी मनात कुठेतरी माया लावून गेल्या. लायब्ररी लावायला आले आहे म्हंटल्यावर त्यांच्या चेहेऱ्यावर हसू फुललं. “ अगं मथु, ही बघ लायब्ररी लावायला आली आहे.” असं म्हणत मला आत घेऊन गेल्या. स्वच्छ नीटनेटकं घर, ममतेचा ओलावा भरून राहिलेल्या घराने मला लगेच आपलसं केलं.

     तेव्हढ्यात आतल्या खोलीतून एक आजी बाहेर आल्या. त्यांना पहाताच एकदम दचकायला झालं. आजींनी ओळख करून दिली. ही आमची मथु. त्यांच्यापेक्षा दोन वर्षानी लहान असलेली बहीण. “ काय गं घाबरलीस का मला बघून.”  नाही. म्हणत भीती लपवायचा केविलवाणा प्रयत्न करत हसले. ही आमची पहिली भेट. त्यानंतर सोपस्कार पार पाडून, दोन पुस्तकं घेऊन मी बाहेर पडले.

     मथु आजींना एक डोळा नव्हता. घरी असताना त्या डोळ्याची खोबणी तशीच राहू देत आणि बाहेर पडताना खोटा डोळा लावत. गोरीपान, लांबसडक गुडघ्यापर्यन्त केस असलेली मथु आजी बिनडोळ्याची पहायला मात्र भीती वाटायची. हळूहळू सहवास वाढत गेला तसतसा त्यांचा परिचय होत गेला. या दोघी बहिणी अविवाहित होत्या. मोठ्या आजी शाळेत शिक्षिका होत्या. आता रिटायर्ड होऊन शांतपणे त्यांची कालक्रमणा चालू होती. मथुआजी नर्स होत्या. वडीलोपार्जित घरात दोघी एकमेकींच्या आधाराने रहात. त्यांना एक भाऊ होता पण तो वेगळा रहात होता. हे घर मिळवण्यासाठी चालणाऱ्या त्याच्या कारवाया आजी ऐकवत असत. वडीलांनी आधीच बहीणींच्या नावावर घर करून दिले असल्यामुळे त्याचं फारसं काही चालायचं नाही. तरीही एकदा त्यांच्यावर मारेकरी घालायचा प्रयत्न त्याने केला होता. या दोघींच्या मृत्यू नंतर ते घर, आजुबाजूला एक कॉलनी वसेल एव्हढे आवार, ही सगळी इस्टेट त्या बहिणींनी संघाला अर्पण केली होती त्यामुळे संघाचे लोकं त्या दोघींची काळजी घ्यायचे.

     मथुआजी जेव्हा तरुण होती, फुलायचं वय होतं तेव्हाच तिला उजव्या डोळ्याचा कॅन्सर झाला. त्याच्याशी झुंजता झुंजता तो डोळा काढून टाकावा लागला. जीवनानी फुलायच्या आधीच शरीराच खच्चीकरण केलं. पण मथु आजी मनाने बळकट राहिली. अश्या अवस्थेत आपल्याशी कुणी लग्न करू धजणार नाही हे तिने जाणून घेतलं. आहे ते जीवन स्वीकारून आपलं जीवित कार्य करू लागली. पेशा नर्सचा असल्यामुळे सेवाभावी वृतीने दुसऱ्यांच जीवन फुलवून देतदेतं आत्मसुखाचा अनुभव घेऊ लागली. पण तेही नियतीला बघवलं नाही. तिने दुसरा आघात केला. आजीच्या छातीत दुसरी गाठ आली. ती कश्याची आहे या टेस्ट होईपर्यंत तिथला कॅन्सर बराच पसरत गेला. पुन्हा सगळ्या टेस्ट, तेच जीवघेणे उपचार, तिच ससेहोलपट, औषधांचे साइड इफेक्ट इतकं करूनही तो अवयव काढून टाकावा लागला. एवह्ढ्या दोन कॅन्सरशी झुंज देऊनही मथुआजी परत उभी राहिली. कुठला जीवनस्त्रोत तिला जगायला बळ देत असेल ? अनाकलनीय होतं. कुणाच्यातरी बळावर माणूस आपलं दुख तारून नेताना बघितलं होतं. ते उदाहरण असावं. मथुआजीला एक मोठी बहीण सोडली तर दुसरं कुठलच स्थान नव्हतं. आम्ही लायब्ररीत येणारे थोडेफार लोकं त्यांचे कुटुंबीय झालो होतो. तिथे गेलं की चहा, कधी खास कोकणी पदार्थ मोठ्या आजी खायला द्यायच्या आणि मग आमचा गप्पांचा फड जमायचा. दोन्ही आजी आपापल्या आठवणी सांगत बसायच्या. त्यातून आम्हाला जीवनाचे धडे मिळायचे. खुप छान ग्रुप जमला होता.

     बघता बघता नियतीने परत आमच्या समोरच मथुआजीवर घाला घातला. त्यांना आताश्या घशाला त्रास होऊ लागला होता. काहीतरी खाण्यात आलं असेल असे समजून घरगुती औषधं सुरू झाली. मथुआजी आता थकल्यासारखी दिसू लागली. जीवनातल्या पुर्ण सत्याला सामोरी गेलेली तिची इच्छाशक्ती आता हरल्यासारखी झाली. फुलासारखी टवटवीत आणि झऱ्यासारखी खळखळून हसणारी आजी आता उडता न येणाऱ्या फुलपाखरसारखी दिसू लागली. फुलपाखरांचे रंग, अंग सगळं तसच असतं पण पंख थोडा दुखावला गेल्यामुळे एका जागी बसून रहाण्याची वेळ आल्यावर ते फुलपाखरू केविलवाणं बसून रहातं, तशी ती बसलेली असायची. हळूहळू परत त्याच टेस्ट, तेच उपचार सगळं सुरू झालं. घशाच्या कॅन्सरनी त्यांच्या शरीरात मुळ धरलं होतं. गिळण्याची प्रक्रिया कमी कमी होऊ लागली. ऑपरेशन तर या वयाला अवघड असल्यामुळे बाकी जे उपचार शक्य होते ते चालू होते. उभ्या जन्मात तीन कॅन्सरला झुंज देणं, सामान्य माणसाचं काम नव्हतं. नियतीला स्वीकारण्याची त्यांची ताकद असामान्य होती. मनाच्या धैऱ्याला सीमा नव्हती. पण देवानीही आता जीवनाशी लढून थकलेल्या जीवाला कुशीत घ्यायचं ठरवलं. मथुआजीची कश्याबदलही तक्रार नव्हती. ना आपल्या नशिबाला दोष देताना त्यांना कुणी पहिलं होतं. त्या एकखांबी तंबूने एका असीम धैऱ्यावर उभे राहून लोकांना त्याखाली आश्रय दिला होता. मथुआजी आता अंथरूणाला खिळली. आवाज तर कधीच गेला होता. आम्ही घरी गेलो की फक्त बघायच्या आणि हसायच्या. मोठ्या आजींना जपा असे डोळ्यानेच सांगायच्या. मोठ्या आजीही धेर्याच्या आपलं खचलेपण कधीही त्यांनी समोर दिसू दिलं नाही. पण आमच्या समोर हळुवार व्हायच्या. पाठची बहीण जिने खऱ्या अर्थाने आयुष्यभर साथ दिली ती आता सोडून चालली हे सत्य त्या म्हाताऱ्या जीवाला पेलवत नव्हतं. हळूहळू मरण आपले जाळे मथुआजीवर पसरवू लागले. त्यांच्या खोलीत ती मरणकळा जाणवू लागली. अस्थिपंजर झालेली काया भेसूर दिसू लागली. घाबरलीस का मला म्हणणारी मथुआजी आता खरच घाबरवू लागली. थोड्याच दिवसात तिला देवानी आपल्या कुशीत घेतलं आणि त्या तडफडत्या शरीराने तृप्तीचा हुंकार दिला. आता कुठलीही वेदना नव्हती. स्वच्छ मोकळ्या आकाशातला मोकळा श्वास आता विशाल झाला होता.

                                                          ..................................................................................................