When the eyes are less and the heart is crying more... in Marathi Motivational Stories by Tushar Karande books and stories PDF | जेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडत…

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

जेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडत…

नमस्कार मंडळी

नऊ महिने नऊ दिवस एका छोट्याशा जीवाला जन्म घेण्यासाठी आईच्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस वेळ घ्यावा लागतो , तेव्हा कुठे तो मासाचा एक गोळा पूर्णपणे आकार घेऊन जन्माला येत असतो.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बाळाचे सर्वात पहिले अवयव म्हणजेच ऑर्गन निर्माण होत असेल तर ते म्हणजे त्याचे “हृदय”.

तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात हे हृदयाचे ठोके आईच्या गर्भात वाजायला लागले की समजावे एक नवा जीव तिच्या गर्भात आकार घ्यायला सुरुवात करत आहे आणि मग तिथून पुढे निसर्ग नियमाप्रमाणे एक एक अवयव निर्माण होऊन नऊ महिन्यात हे गोंडस बाळ जन्माला येते. हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

असा हा जीव जन्माला आल्यावर सभोवतालच्या वातावरणात वाढत असताना त्याच्यावर अनेक संस्कार घडत जातात, जीवनातले अनेक चढ उतार पार करता करता कधी खुशी तर कधी गम या भवऱ्यात तो आपलं जीवन व्यतीत करू लागतो , अर्थात आता त्यात तुम्ही सर्वजण आलात आणि मी सुद्धा.

आयुष्यातल्या या प्रवासात अशी सुखदुःखाची गणितं मांडता मांडता कधीकधी आपण खूप हतबल होतो , थकून जातो , कदाचित शरीराने कमी पण मनाने जास्त , 

अशा वेळेस आपण नेहमी म्हणतो कुणी आपल्याला दुखावले तर मनाला खूप वाईट वाटते , 

कधीतरी ऐकतो की कुणाला एक वेळ शारीरिक जखम दिलेली परवडते पण मनाला दिलेली जखम कधीच भरून निघत नाही …

ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण तर सर्वतोपरी लोकांच्या लक्षात असणारच…

ही अशी बरीच वाक्य गेली कित्येक वर्ष कानावर पडत असताना मला कधी कधी प्रश्न पडतो की का लोकं “मन” या शब्दाचा वारंवार वापर करत असतील?

काय असतं हे मन?

कुठे असतं हे मन?

सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे ,

आईच्या गर्भात एका बाळाची आणि त्याच्या सर्व अवयवांची वाढ होत असताना या मनाची वाढ कुठे होत असते बरं? डॉक्टर कधी सांगत का नाही की बाळाचे मन आज अमुक मोठे झाले आहे किंवा तमुक प्रकारे त्याची वाढ होत आहे?

जी गोष्ट डोळ्याला दिसत नाही ,  माणसाच्या शरीराच्या अवयवांचा भाग नाही , जर त्याला कोणी पाहिलेले नाही मग मन या शब्दाचा वापर आपण सारखे सारखे का करतो?

शरीरावर झालेली जखम रक्त आल किंवा खरचटले तर ती दिसून येते ,

वाईट प्रसंग घडल्यावर डोळ्यातून पाणी येते तसेच खूप आनंद झाला तरी देखील पाणी हे डोळ्यातूनच येते 

म्हणजेच काय तर आपल्याला होणाऱ्या सुखदुःखाची पावती हे डोळ्यातले अश्रूच आपल्याला देत असतात..

पण मग या मनाचं काय? असा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा त्याचे उत्तर खर तर मला माझ्याच आयुष्यातून आणि माझ्या सभोवताली असलेल्या लोकांकडूनच मिळत.

आता सगळ्यात आधी बघूया हे मन म्हणजे?[अर्थात माझ्या दृष्टिकोनातून, प्रत्येकाच दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो] 

मन म्हणजे हृदय रुपी सिंहासनावर बसलेला एक परमेश्वराचा अदृश्य अंश…. ज्याला आपण पाहू शकत नाही…पण त्याचा आपल्याशी एक अंतर्गत संवाद कायम चालू असतो… आपण उपभोगत असलेल्या प्रत्येक क्षणाचा तो साक्षीदार असतो  आणि म्हणूनच आपल्या सर्व भाव-भावनांची तार याच्याशी जोडली गेलेली असते.. 

मन म्हणजे परमेश्वराचा अंश,  जो आपल्या शरीरात प्रवेश करण्या आधी त्याचं हृदय रुपी सिंहासन तयार करतो आणि मग त्यावर स्थानापन्न होऊन मानव रुपी मनुष्याला आकार देत त्याच्या अंतकाळापर्यंत त्याच्यासोबत कायम राहतो,  ते हे मन 

[आणि म्हणूनच बाळ जन्माच्या आधी सगळ्यात आधी त्याचे हृदय  आकार घेत असावे असा निसर्ग नियम  असावा] 

त्यामुळे कदाचित मनाला दुखावणे म्हणजे साक्षात परमेश्वराला दुखावणे ही भावना त्यामध्ये असावी असं मला वाटतं.

एक वेळ बुद्धी वापरून घेतलेले निर्णय हे चुकीचे ठरू  शकतील, पण मनाचा आवाज ऐकून घेतलेले निर्णय कधीच चुकीचे ठरत नाही याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येत असतो.. 

माणसाचे मन सुखी , आनंदित असेल तर त्याचे डोळे चटकन बोलतात आणि त्यामुळे त्याची प्रकृती सदृढ राहते , पण  तेच मन जर  कायम दुःखी असेल,  उदास असेल तर त्याचे पडसाद लगेचच त्याच्या डोळ्यातून आणि  कालांतराने शरीरात होणाऱ्या अनेक व्याधीमधून उघड होताना आपल्याला दिसतात.

खरंच किती मोठी ताकद दडली असेल या मनामध्ये आणि त्याच्या शक्तीमध्ये ,  ठरवलं तर अपंग व्यक्ती सुद्धा माउंट एव्हरेज चढून खाली उतरेल , किंवा शरीराच्या कोणत्याही आजारावर मात करून पुन्हा उभे राहिलेले अनेक लोक आणि त्यांची उदाहरणे आपण पाहिली आहे ती या मनशक्तीच्या जोरावरच.

म्हणतात ना हाताची सर्व बोटे काही सारखी नसतात कोणाचे मन खूप धैर्यवान असते तर कोणाचे कठोर,  जेणेकरून कोणत्याही परिस्थितीवर मात करून त्यावर विजय प्राप्त करण्यासाठी.. 

पण व्यक्ती तितक्या प्रकृती या तत्त्वानुसार , या जगात हजारो लोक अशी सुद्धा आहेत जे मनाने आजही हळवी असतात, मृदू असतात,  जीवनात घडलेल्या अनेक चढू  उतारामुळे,  पाहिलेल्या अनेक दुःखांमुळे ते खूपच खचून जातात..,

सुखापेक्षा जेव्हा फक्त दुःख ज्याच्या वाट्याला जास्त येते अशा लोकांची मनस्थिती कलमडून गेल्याचं मी फार जवळून पाहिल आहे …

अशा वेळेस जाणवतं की असे लोक त्यांच्या डोळ्यांपेक्षा त्यांच्या मनातूनच खूप रडत आहेत, फरक फक्त इतकाच की डोळ्यातून पाणी येत नाही म्हणून लोकांना त्यांच आतलं खरं दुःख जाणवत नाही 

का कुणास ठाऊक ,  पण याचा अनुभव देणाऱ्या अनेक व्यक्ती माझ्या जीवनात मला वारंवार भेटत असतात,  त्यांचं मन माझ्यापुढे हलकं करत असतात..

कधी घडत, जेव्हा एखादी व्यक्ती डोळ्यातून कमी पण मनाने जास्त रडत असते?
इतरांचे काय मत असू शकेल मला माहित नाही पण मला भेटलेल्या लोकांच्या अनुभवावरून साधारण एक अनुमान मी काढू शकतो की…

जेव्हा…

आपलीच मुले आपल्या आई-वडिलांना अनाथ आश्रमांचा रस्ता दाखवत असतात त्यावेळेला त्यांचे आई-वडील डोळ्यातून कमी आणि मनातून जास्त रडत असतात 


आपली मुलं कितीही चांगली असली आणि समजूतदार असली तरी, लग्नानंतर मुलांचा संसार सुखाचा घडावा ,  त्यांना त्यांच्या जीवनात मोकळीक मिळावी , त्यामध्ये आपली लुडबुड नको असा विचार करून आपल्याच मुलांचा संसार आणि त्याची वेगळी चूल मांडून देत असताना प्रत्येक आई-वडिलांचे डोळे कमी आणि मन नक्कीच जास्त भरून येत असणार , मुलांच्या सुखासाठी ते तेवढं सहन करतात, पण कधी कधी त्याची जाणीव मात्र मुलांना कधीच होत नसते. 


स्वतःला कितीही त्रास झाला तरी चालेल पण आपल्याच मुलांना  , सुनांना , जावयाला कोणत्याही प्रकारचा त्रास नको या विचाराने त्यांच्याकडे हक्काने न जाता , काही वेळ प्रसंगी पोळी भाजी केंद्रातून डबे आणून दिवस काढणारे वयस्कर आई-वडील मी फार जवळून अनुभवले आहे , त्यावेळेस त्यांच्याकडे बघून नेहमी जाणवते की त्यांचे डोळे कमी आणि त्यांचं मन कुठेतरी जास्त रडत आहेत 


तुमची स्वतःची चुकी असताना देखील,  तुमच्यावर खूप प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या सोबत असलेल नातं न तोडता ,  सर्व प्रकारची तडजोड करून तुमच्या सोबतच जेव्हा संसार करत असते त्यावेळी जाणवतं कि ती प्रत्येक व्यक्ती डोळ्यांनी कमी आणि मनाने जास्त रडत आहे किंवा कुठेतरी खूपच निराश आणि हातबल झालेली आहे 


माझ्या अमुक अमुक मुलांपैकी तमुक तमुक मुलाने माझ्याशी खूपदा भांडण करून मला खूप जास्त त्रास दिला आहे ,मला खूप रडवले आहे असे जेव्हा एक  माऊली स्वतःच मन मोकळं करते तेव्हा जाणवतं तिचे डोळे कमी आणि मन कुठेतरी दुःखाच्या सागरात बुडालेल आहे , तिच्यावरची परिस्थिती म्हणजे जणू –  सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही 


जमीन प्रॉपर्टी अशा भौतिक सुखाच्या हव्यासापोटी आपल्याच आई-वडिलांना, नातलगांना कोर्टकचेरीची वाट दाखवलेली अनेक कुटुंब आणि अशा या वादात मात्र ,कोणाचे तरी डोळे कमी पण काळीज [मन] जास्त जड झालेली लोकं मला फारच परिचयाची आहेत 


इच्छा असताना देखील नातवंडांकडे जाता येत नाही,  हवा तस वेळ त्यांच्याशी  घालवता येत नाही, कामाच्या व्यापामुळे मुलांचा संवाद त्यांच्या पालकांशी घडत नाही , आणि मग फोन वरचे दोन शब्द ऐकून मनोमन सुखावलेले प्रत्येक आजी आजोबा , आई-वडील मी जवळून पाहिले आहेत.. अशा वेळेला जाणवतं की त्यांनी डोळ्यातले अश्रू जरी लपवले असले तरी त्यांचे मन कुठेतरी त्या प्रेमाला आसुसलेले आहे.. 


जेव्हा एक स्त्री किंवा पुरुष सिंगल पेरेंट म्हणून आपल्या लेकरांसाठी जीवनाशी संघर्ष करत असतात तेव्हा जाणवते कि ती व्यक्ती डोळ्याने कमी आणि मनाने दुःखाचे अनेक डोंगर पार करत आहे ,  पण त्याच्या अश्रूंचे पडसाद जगासमोर न मांडता आपला संघर्ष  ते शांतपणे लढत आहेत. 

आणि असे बरेच अनुभव… 

 असे अनुभव रोजच्या जीवनात फार जवळून पाहिल्यानंतर मी काय  शिकतो..

खरंच दिसतं तसं नसतं , कारण लोक तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करत असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं.. पण त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष मनामध्ये काय चालू आहे , किंवा त्या व्यक्तीच्या अंतर्गत काय  वेदना  असू शकतील हे वाचण्यासाठी कदाचित एक वेगळीच दृष्टी माणसाकडे असावी लागेल , हीच आज काळाची गरज होऊन बसली आहे. 


अशा वेळेस त्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे मला पुसता येत नसतील पण ते जे काही बोलतील, सांगतील ते फक्त ऐकून घेऊन त्यांच्या मनावरचा ओझं हलकं करण्यास मी त्यांना मदत करतो..

काळजी करू नको सर्व ठीक होईल हे समाधानाचे दोन शब्द बोलून त्यांचे मन शांत करण्याचा प्रयत्न करतो ,  जमल्यास एखाद्या दुसऱ्या विषयावर बोलून किंवा त्यांना आवडेल अशा ठिकाणी त्यांना नेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो

पुढच्याच ठेच मागचा शहाणा या युक्तीनुसार जेव्हा जेव्हा इतर लोकांनी दिलेले असे दुःखद अनुभव मी जवळून बघतो त्या प्रत्येक गोष्टी मी माझ्या आयुष्यात करण्याचे टाळतो… 

खरंतर ज्या लोकांकडून असं दुःख प्राप्त झाल आहे अशा लोकांकडून खूप शिकण्यासारखं असतं …कारण जीवनात आपण कसं वागाव हे सर्वजण आपल्याला सांगू शकतात पण कसं वागू नये अशा  गोष्टींची शिकवण अशा लोकांकडूनच आपल्याला नकळतपणे मिळत असते 

शरीरावर झालेल्या जखमा कालांतराने भरून निघतातच पण मनावर झालेल्या जखमा आणि त्याचे ब्रण  हे कायम मनावर कोरले जात असतात म्हणून कोणाला चांगले बोलता आले नाही तर वाईट ही बोलू नये ही शिकवण नेहमीच लाखमोलाची ठरते आणि ती आत्मसात करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. 

डोळ्यातून आलेल पाणी आणि त्यामागे असलेले दुःख किती मोठ असू शकेल याचा अंदाज कधीकधी आपण लावू शकतो पण जेव्हा मन रडतं तेव्हा त्याचा आवाजही होत नाही आणि त्यामागे असलेले दुःख किती खोलवर  रुजले आहे त्याचा  मागोवा कोणीच घेऊ शकत नाही.

आजचा काळ बदललाय,  लोकांच्या आवडी निवडी, विचार करण्याची पद्धत सर्वच आता काळानुरूप आणि कलियुगाला शोभेल असेच होत चालले आहे….

एकाच वेळेस आपण सर्वांना सुखी किंवा आनंदी नाही ठेवू शकत , त्यामुळे कुठे ना कुठेतरी कोणीतरी दुखावलं जाणारच याची जाणीव आपल्याला असली तरी एक गोष्ट मात्र आपण कटाक्षाने पाळू  शकतो आणि ती म्हणजे आपल्या वागणूकीतून, आपल्या कर्मातून कमीत कमी लोकांना त्रास होईल आणि जास्तीत जास्त लोकांची मन जिंकली जातील असे निर्णय ,आयुष्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर घेता येणं आपल्याला शिकल पाहिजे.

मी माझे हे विचार आज कागदावर मांडू शकत असलो तरी शेवटी मी सुद्धा एक सर्वसामान्य माणूसच आहे , चुका माझ्याकडून सुद्धा होत असतात त्यामुळे झालेल्या चुका सुधारून पुढे चालत राहणे याचा मी प्रयत्न करत असतो.

आपली चुकी असो किंवा नसो एखादं नातं टिकवण्यासाठी दोन पावलं पुढे येऊन स्वतः क्षमा मागून इतरांना सुद्धा माफ करण्याची सवय अंगी बाणवली तर या आयुष्याला खरंच एक सुंदर वळण मिळेल यात शंकाच नाही.

हे जग बदलेल की नाही याचे उत्तर कदाचित माझ्याकडे नाही पण मी स्वतः बदललो तर नक्कीच माझ्या आजूबाजूला आणि माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात मी थोडा बहुत का होईना एक सकारात्मक फरक नक्कीच आणू शकेल , त्यांच्या मनावरचं ओझं थोडं कमी करू शकेन यावर माझा पूर्ण विश्वास आहे… 

तुम्ही देखील या गोष्टीचा विचार करा , आणि कोणत्याही प्रकारच भावनिक नातं जोडताना ते पुरेपूर निभवता येईल का याचा सारासार विचार करून मगच पुढचं पाऊल उचला..कारण शेवटी आपल्या साधुसंतांनी म्हणूनच ठेवले आहे

मन चंगा तो कटोती मे गंगा.. 

धन्यवाद. 

Tushar K