Baag in Marathi Short Stories by Madhavi Marathe books and stories PDF | बाग

Featured Books
Categories
Share

बाग

                                                                                                  बाग

 आमच्या बदल्यांमुळे आम्हाला काही काही फार सुंदर अनुभव घेता आले. त्यातला एक सुंदर अनुभव म्हणजे बागेचा. प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्या घराभोवती खूप छान बाग असावी. अंकलेश्वरला हे स्वप्न पुर्ण झाले.

    घर लागल्यानंतर समोरच्या मोठ्या मातीच्या चौकोनी तुकड्याकडे लक्ष वळवलं. उत्साहाच्या भरात त्याच्यासाठी, पाणी टाकायला पाइप, खुरपं इतर तत्सम खरेदीही झाली. पण जेव्हा मातीत हात घातला आणि चार घाव इकडे तिकडे घालून झाले की लक्षात आलं हे फक्त हौसेचं काम नाही. हौसेने फक्त कुंड्यामधेच आपण बागकाम करू शकतो. मोकळ्या मातीत काम करायचे तर ढोर मेहनत लागते. हे लक्षात येताच माझे शहरी हात तिथेच थांबले व माळ्याचा शोध सुरू झाला. दोन माळ्यांची वर्णी लावून त्यांनी बागकाम सुरू केले.

   प्रथम लॉनसाठी, गवताच्या लादया मधल्या बाजूला रोवून कडेने जास्वंद, पारिजात, मधुमालती, बोगनवेल, रातराणी, लिली, मे फ्लॉवर, तगर, सोनटक्का, नेवाळी, जुई, जरबेरा, गुलाबाचे प्रकार, चाफा, ब्रम्हकमळ, अशी झाडं लावली. मागे गवतीचहा, लिंबू, पपई, कढीपत्ता, विडयाच्या पानांचा वेल अशी झाडं लावली. मनासारखी बाग लावून झाल्यावर, जसजशी ती बाग रुजू लागली तसतसे झाडांच्या पालवी बरोबर मनाला पालवे फुटू लागले. एखाद्या छान गाण्याची सीडी लावून पाईपने पाणी घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तासभर त्या बागेत नवीन फुलं, पानं, कळ्यांची चाहूल निरखत, अतिक्रमण करणाऱ्या किडींना बाजूला करत अर्धमशागत चालू होती. लवकरच माळ्याच्या पुर्ण मशागतीला व माझ्या अर्ध्यमशागतीला फळं दिसू लागली. झाडं जोमाने वाढू लागली. जास्वंदीचा तर वृक्षच झाला. मधुमालतीचे गुलाबी घोस लटकून तिची वेल वरच्या मजल्यावर चढू लागली. जुई तर बारमाही होती. असंख्य पांढऱ्याशुभ्र कळ्या, फुलांनी आपला सुवास घमघमत मिरवू लागली. गुलाबाचे रंगीबिरंगी ताटवेही बहरले. पारिजाताची नाजुक पांढरी केशरी देठाची फुलं अंगणात सडा घालू लागली. पहाटेच्या वेळी आपल्या सुवासाने घमघमत वातावरण प्रसन्न, पवित्र करू लागली. हिरव्या पानांचे पांढरे स्वस्तिक बागेला मांगल्य देऊ लागले. कुंदाची टपोरी पांढरी फुलं, मंद सुवासाने, बालपणी हौसेने केसात माळलेल्या गजऱ्यांची आठवण करून देऊ लागले. चाफ्याचा आधी नुसताच उभा असलेला दांडा नंतर पालवून फुलांनी भरून गेला. त्या फुलांचा दरवळ, रामकृष्ण आश्रमात शुचिर्भूत मनाने घेऊन गेला. किती ठिकाणच्या गोष्टी आपल्या सुवासाने जोडलेल्या असतात. पिवळी, पांढरी, गुलाबी या बोगनवेलींनी तर बागेला सौंदर्याचा मुकुट चढवला होता. सोनटक्याची शुभ्र पांढरी फुलं सुवासाच्या कारंज्यासारखी वाटत होती. सगळ्यात सुवासाची कडी म्हणजे रातराणी. तिचं रूप म्हणजे हिरव्या छटांनी सजलेली एकरंगी छत्री. हिरव्यागार पानांमधून पोपटी हिरव्या रंगाचे घोसच्या घोस लटकत आपल्या सुवासाची उधळण करायचे. घंटेच्या आकारातली ती नाजुकशी फुलं पानाआड कुठे लपून असायची. एक काळी चिमणी त्याच्या फांदीवर बसून आपली काळी लांब चोच त्या फुलातल्या परागकणात अलगद सरकवायची. रात्र झाली की आमचं घर अक्षरशः सुवासाने भरून जात होतं. आसमंत घमघमत होता. एक लेख वाचला होता, सुगंधी वाडा म्हणून. तसे आता आमचे घर सुगंधी वाडा बनले होते.

     एप्रिलमधे लिली, मे फ्लॉवर फुलले की बागेला ऐश्वर्याचं रूप यायचं. एकेका दांड्याला चार फुलं. असा आपला मुकुट ते सजवायचे. फिकट गुलाबी रंगातल्या लिलीवर अधून मधुन पांढरी छटा असायची. फुलांच्या मध्यावर पुंकेसराला काळ्या बिया त्या रंगसंगतीमधे उठून दिसायच्या. मे फ्लॉवरचा मोठा बॉल लाल फुलांनी बहरून यायचा.

     बाग फुलल्यावर पुढची पायरी म्हणजे येणारे किटक, पक्षी, फुलपाखरांच्या वेगवेगळ्या जाती. पांढऱ्यावर काळे ठिपके, काळ्यावर पांढरे, पिवळे, लाल ठिपके, तर कधी निळ्या रंगातले  फुलपाखरं, आता बागेतल्या फुलांवरून अलगद उडू लागले. उडताना मधुनच आपले पंख पालवून गुलाबाच्या फुलात शिरत, नाहीतर जास्वंदीच्या झेल्यात दडून मध खात बसत होते. गवताच्या हिरवळीवर पांढरे बगळे येऊन चालण्याचा सराव अधुन मधुन करून जात असत. तसेच पिवळ्या पोटाची देवचिमणी, मधुमालतीच्या गुलाबी झेल्यावर बसून आवाज देत रहात होती. काय रंगसंगती होती ती. नुसती लयलूट. चिमण्यांचा पसारा सगळा तगरीच्या झाडवरच असे. एकसाथ तिथे बसून चिवचिवाट करत, बाजूचे तांदूळ खात गप्पा मारत बसत. मधेच नळाच्या तिथे पाणी सांडून झालेल्या छोट्या तळ्यात जुईच्या फुलांच्या गळून पडलेल्या पखरणीतून आपली छोटी चोच बुडवून पाणी पीत. मग आपली अंग त्या सुवासिक पाण्यात बुचकळत आणि नंतर फडफड करून अंगावरचं पाणी निथळून टाकत. सुगंधी स्नान आटोपून परत तगरीच्या झाडावर भुर्रकन पोहोचत. अशी आळीपाळीने कितीतरी वेळा त्या चिमण्यांची सुगंधी स्नान चालू असायची. आनंदाचा मेळावा पेलत ते झाड स्तब्ध उभं असायचं. जणू वारं आल्यावरही हलायचं नाही अशी त्या सुगंधी चिमण्यांची ताकीद झाडाला मिळालेली असावी. तगरीचं झाड म्हणजे वर पुर्ण हिरव्या पानांच्या पांढऱ्या फुलांच्या जाळीने भरलेलं आणि खाली त्याची काळी चौकोनी सावली व गळून पडलेले पांढरे फुलं, या रंगानी विखुरलेले असायचे.

     अशा सुंदर बागेमध्ये कुणी आपलं हक्काचं निवासस्थान केलं नाही तरच नवल. विणीच्या हंगामाआधी चिमण्यांचा नवा उद्योग चालू झाला. गवताचे पाते तोडून, तोंडात ते लांब पाते घेऊन त्या उडायच्या आणि हेरलेल्या घरट्याच्या जागी ठेऊन ते विणायला सुरवात करायच्या. हा तर माझ्यातल्या स्त्रीला नवीन चाळा मिळाला. हे सगळं पाहून लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकात असायची ना तशी बोलकी बाग असच काहीसं वाटू लागलं.

    ख्रिसमस ट्री, वारं आलं की आपल्या चौफेर अंगानी नाचत असायचा. अजून एक पक्षी नेहमी त्या झाडाच्या टोकावर येऊन बसायचा. नाव महित नाही पण मोठा आणि पिवळ्या अंगावर काळे ठिपके असलेला तो पक्षी होता.

    बाजूच्या अंगणात दोन मोठी कासवे ठेवलेली होती. लॉनवर त्यांना सोडले की तृप्ततेने ते सगळीकडे फिरायचे. ऊन लागायला लागले की मधुमालती नाहीतर बोगनवेलीच्या पसाऱ्यात दडून बसायचे. भारव्दाजाची जोडी कधी या झाडावर कधी त्या झाडावर बसून घुमत राहायची.

     बाग फुलल्यावर फुलं तोडायचा कार्यक्रमही चांगला अर्धा तास चालायचा. किती सुंदर अनुभव होता तो. निसर्गाच्या त्या सुवासात मन प्रसन्न व्हायचं. त्या फुलांनी केलेली पुजा, प्रभू अस्तित्वापर्यन्त घेऊन जायची. अशा रंगीबिरंगी जीवनात तृप्त असताना आमची परत बदली झाली, आणि ऐन भरातली ती स्वप्नवत बाग, स्वप्नातच दडवून तिचा निरोप घ्यावा लागला. मनातले कढ आवरत ती बाग दुसऱ्याच्या हाती सोपवली, आणि त्या बागेच्या रुपानी अनुभवलेला जिवंत अनमोल ठेवा नजरेत, मनात भरून त्या गावाचा निरोप घेतला.

                                                                                  .................................................