Dheyasiddhi in Marathi Motivational Stories by संदिप खुरुद books and stories PDF | ध्येयसिद्धी

Featured Books
Categories
Share

ध्येयसिद्धी

             सन २००९ साली संदीप औरंगाबाद या ठिकाणी बी.एस.सी च्या प्रथम वर्षामध्ये शिकायला होता. त्याची घरची परस्थीती अत्यंत बिकट होती. त्याचे वडील एका कापड दुकानावर कामाला होते. त्याची आई शेतामध्ये मजुरी करायची. त्याचा मोठा भाऊही पुण्याला इंजिनिअरींगला शिकायला होता. लहाणपणापासून नेकनूर सारख्या गावामध्ये राहिलेला व कधीही आई-वडीलांना सोडून बाहेरगावी न राहिलेला संदीप औरंगाबादमध्ये जरा नाराजीतच राहायचा. त्याच्या आई - वडीलांना दोन्ही मुलांना शिक्षणासाठी पैसे पाठवताना नाकी नऊ यायचे.

        त्याचवेळी संदीपला लिखाणाचा छंद जडला. वर्तमानपत्रामध्ये त्याच्या कविता, लेख, कथा छापून यायच्या. त्याला शिक्षणात अजिबात रस नव्हता. त्याला लेखक व्हायचे होते. त्याचवेळी आपले आई-वडील एवढया कष्टाने आपल्याला पैसे पाठवतात. आपल्याला जर नोकरी मिळाली नाही तर शिक्षणासाठी एवढया कष्टाने आई-वडीलांनी दिलेला पैसा वाया जाईल याची त्याला भिती वाटायची‍. त्याच्या द्वीतीय वर्षाची कॉलेजची फीस भरण्यासाठी त्याच्या आई-वडीलांना व्याजाने पैसे काढावे लागले. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटले. त्याच्या सोबतचे त्याचे गावाकडील मित्रही नापास झाल्यामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडून गावाकडे परत गेले. त्यामुळे त्यानेही गावाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे व निळु फुले या दिग्गजांची भुमिका असलेला 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' हा मराठी चित्रपट प्रदर्शीत झाला होता. त्या ‍चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे व चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप हे औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी भाषण करताना सयाजी शींदे सरांनी सांगीतले, "या चित्रपटाची कथा ही बीड जिल्हयातील पाडळशींगी या छोटयाशा गावातील एका तरुणाने लिहिली आहे. तो तरूण म्हणजे 'अरविंद जगताप'."

        त्यांचे ते प्रेरणादायी शब्द ऐकून संदीपच्याही मनामध्ये लेखक होण्याची ईच्छा जागृत झाली. ठरल्याप्रमाणे तो आपले शिक्षण सोडून आपल्या गावाकडे आला. लेखक व्हायचं आहे. पुस्तक प्रकाशीत करायचे आहे. एवढंच त्याच्या डोक्यात होतं. पण मार्ग सापडत नव्हता. त्याने अभ्यासाव्यतिरिक्त ईतर पुस्तके वाचायला सुरुवात

केली.  वाचनालयातून पुस्तके आणून तो दिवसभर पुस्तके वाचत बसायचा. कधी कधी लिहीत बसायचा. पुणे, मुंबई या ‍ठिकाणी पुस्तका संदर्भातील लोकांना भेटण्यासाठी आपले हस्तलिखीत घेवून प्रकाशन संस्थेकडे चकरा मारायचा. बरेच प्रकाशक त्याने लिहिलेले वाचून न पाहता, आपल्या हातातही न घेता त्याला नकार दर्शवायचे. जवळचे पैसे संपले की तो परत यायचा. आपल्या आई-वडीलांचे असे पैसे खर्च करणे त्याला योग्य वाटत नव्हते.

        सुट्टीच्या दिवसांमध्ये त्याचा मोठा भाऊ गावी आला होता. त्याने संदीपच्या दिनचर्येचं निरीक्षण केलं. फक्त अवांतर वाचन करून आपल्या भावाचं भविष्य घडणार नाही असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने संदीपला आधी पोटापाण्याचं बघ एकदा चांगला स्थायिक झालास की मग तू तुझं ध्येय कधीही साध्य करू शकतोस व त्यासाठी तुला इतरत्र फिरायलाही पैसे येतील असा सल्ला दिला. संदीपला आपल्या मोठया भावाचे म्हणणे पटले. मग त्याच्या एका मित्राचा सल्ला घेवून तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला. नुकतेच बहीणीचे लग्न झाल्यामुळे आता घरच्यांजवळ पैसे नव्हते. त्यामुळे त्याने रंगकाम करुन पैसे जमवले व त्यातूनच स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके विकत घेतली. आपल्या आई-वडीलांना डोळयासमोर ठेवून तो अभ्यास करु लागला. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी त्या ध्येयाचे स्वप्न अंतर्मनातून पाहिले पाहिजे हे त्याने कोठेतरी वाचले होते. मग तो आपल्याला नोकरी लागली आहे, आपले आई-वडील खुष झाले आहेत असे स्वप्न तो डोळयांसमोर रंगवायचा. ते स्वप्न पाहून त्याला प्रेरणा मिळायची. मग तो वेळेचे योग्य नियोजन करून आणखी जोमाने अभ्यास करायचा. लेखक होण्याच्या ध्येयापायी त्याने दुसरे काहीच केले नव्हते. आता त्याला चोवीस वर्ष चालू होते. अभ्यास करताना बऱ्याच वेळा तो थोडया मार्कामुळे मेरीटमध्ये येत नव्हता. विक्रीकर निरीक्षक या पदाची तो पुर्व परीक्षा पास झाला. मुख्य परीक्षा होणार होती. परंतु त्यापुर्वीच त्याची लिपीक या पदावर महसूल विभागात नियुक्ती झाली. घरच्या परीस्थीतीमुळे त्याला लागेल ती नोकरी करायची होती. त्यामुळे त्याने ती नोकरी स्वीकारली.

        वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्याला नोकरी लागली होती. त्याला नोकरी लागल्यामुळे त्याचे आई-वडील खूष झाले होते. पण संदीप खुष नव्हता. कारण आणखी त्याचे ध्येय पूर्ण झाले नव्हते. लेखक होण्याचे त्याचे स्वप्न आणखी अधुरेच होते. अशातच आणखी पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा की लेखक होण्यासाठी

प्रयत्न करावेत याबाबत त्याची द्वीधा मनःस्थिती झाली होती. त्याच्या अधीकाऱ्यांना आपल्या कुटुंबालाही वेळ द्यायला मिळत नसल्याचे तो पाहत होता. त्यामुळे अभ्यास पूर्ण असतानाही व मोठे पद मिळण्याची शक्यता असतानाही त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोडून लेखक होण्याचा मार्ग पत्करला. आता गरजा भागण्यापुरता पैसा आला होता. पण वेळ नव्हता. आपल्या ध्येयापासून आपण दूर जात आहोत. आपल्याला लिहिण्यासाठी व वाचनासाठी वेळ मिळत नाही. या विचाराने तो बेचैन होत होता. अशातच त्याचे लग्नही झाले. त्यामुळे तो त्याच्या ध्येयापासून आणखी दूर जाऊ लागला.

        एके दिवशी खूप विचार करून त्याने ठरवले. आपल्याला वेळ मिळणार नाही तर आता वेळ काढावा लागेल. आपल्या मनातील गोष्ट त्याने आपल्या पत्नीला बोलून दाखवली. पत्नीनेही त्याला संमती दर्शवली. तो वेळेचे नियोजन करून लिखाण व वाचन करु लागला. लिहिलेली कथेबद्दल आपल्या पत्नीला अभिप्राय विचारू लागला. त्याच्या पत्नीलाही आपल्या नवऱ्याचे लिखाण चांगले असल्याची खात्री झाली. ती ही त्याला लिखाण करण्यास सतत प्रोत्साहन देवू लागली. महसूल सारख्या संवेदनशील विभागामध्ये काम करत असताना लिहीणे सोपे नव्हते. दिवसभराचा ताण बाजूला सारून रात्री व सकाळी तो आपल्या ध्येयासाठी वेळ देत होता. आता त्याला दोन भुमिका निभवाव्या लागत होत्या. एक ऑफीसमध्ये व एक लेखक म्हणून. दोन्ही अगदी विरुद्ध टोकाच्या भुमिका होत्या. कारण ऑफीसमध्ये काम करत असताना अत्यंत तणावात व वेगाने काम करावे लागत होते. त्याउलट लिहिताना मन व डोके शांत ठेवून लिहावे लागत होते. कारण जे मनातून कागदावर उतरते तेच वाचकांच्या मनाला भावत असते हे त्याला चांगलंच माहित होतं.

        त्याचे  लिखाण चालूच होते. अशातच अरविंद जगताप यांनी 'चला हवा येऊ द्या' या शोसाठी लिहिलेल्या पत्रांचे 'पत्रास कारण की' हे पुस्तक प्रकाशित झाले होते त्या निमित्ताने अरविंद जगताप व सयाजी शिंदे हे दोघेही बीडला आले होते. त्या निमित्ताने संदीप त्यांना भेटण्यासाठी बीडला गेला. परंतू खूप गर्दी असल्यामुळे त्याला त्यांना भेटता आले नाही.  आता संदीपचे पुस्तक लिहून पूर्ण झाले होते. परंतु त्याचवेळी कोरोना ही महामारी आली. त्यामुळे जवळपास दीड वर्ष लिहून असलेले पुस्तक त्याच स्थितीमध्ये राहिले. त्यानंतर त्याने खूप प्रकाशन संस्थेचे उंबरे           झिजवले पण त्याचे पुस्तक न वाचताच त्याचे पुस्तक नाकारले गेले. एक तर नोकरी करत असल्यामुळे त्याला बाहेर गावी जाता येत नव्हते. सुट्टी काढून गेलं तर काम होत नव्हते. वेळ व पैसा व्यर्थ खर्ची होत होता. त्यामुळे तो खूप बेचैन झाला होता.

        त्याचवेळी त्याने पहिल्या पुस्तकासाठी तो ज्यांच्याकडे पाहून  लिखाण करण्यास शिकला. ज्यांच्याकडे पाहून लेखक होण्याचं स्वप्न मनाशी बाळगलं त्यांचीच प्रस्तावना घ्यायची त्याने ठरवलं व त्याने त्याप्रमाणे प्रयत्न करण्यास सुरुवात केली. असं म्हणतात ना, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मनातून प्रयत्न केले तर निसर्गही तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी मदत करतो. तो त्याच्या पहिल्या पुस्तकाला त्याचे प्रेरणास्थान प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांची प्रस्तावना मिळवली आहे. खुद्द अरविंद जगतापही पुस्तक प्रकाशन सोहळयासाठी उपस्थीत आहेत. पुस्तक प्रकाशनामुळे त्याचे कुटुंबीयही आनंदी झाली आहे. त्याचा मित्र परिवार आनंदात आहे. असे स्वप्न आपल्या अंतर्मनात नेहमी पाहायचा. त्यासाठी सकारात्मक विचार करायचा. नियोजन करून प्रयत्न करायचा. त्याच्या अंतर्मनातून पाहिलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी नियतीही त्याच्या मदतीला आली. अरविंद जगताप सरांनी प्रस्तावना लिहिण्याचे मान्य केले.

        काही चांगलं व्हायचं असेल तर कधी-कधी वेळही लागतो. एके दिवशी त्याला त्याच्या मित्राने न्यु ईरा पब्लीकेशन, पुणे याचे श्री.शरद तांदळे युवा उद्योजक व लेखक यांच्या विषयी सांगीतले. त्यांनी पुस्तक पाठवून द्या आम्ही तुम्हाला कळवू असे सांगीतले. संदीपने त्यांच्या ईमेलवर आपल्या टंकलिखीत केलेल्या पुस्तकाची पीडीएफ फाईल पाठवली.काही दिवसांनी शरद तांदळे यांनी संदीपला भेटण्यास बोलावले. व आम्हाला तुमचे पुस्तक आवडले आहे. आम्ही ते प्रकाशीत करू असे सांगीतले. संदीपच्या आनंदाला पारावार उरला नाही. सन २००९ साली पाहिलेले स्वप्न 'रानमेवा' या कथासंग्रहाच्या रुपात २००२ साली सत्यात उतरणार होतं. अरविंद जगताप यांनीही पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली.

        रानमेवा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळयाचेही स्वप्न संदीपने आपल्या मनाशी रंगवले होते. तो त्याप्रमाणे कृती करु लागला. मा.जिल्हाधीकारी यांच्या अध्यक्षतेखाली व अरविंद जगताप यांच्या प्रमुख उपस्थीतीत आपल्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करण्याचा संदीपचा मानस होता. पण दोघांचीही वेळ व तारीख जुळवणे महत्त्वाचे होते. संदीपने जगताप सरांना पुस्तक प्रकाशनासाठी येण्याची विनंती केली. ते ही वेळात वेळ काढून पुस्तक प्रकाशनासाठी हजर राहिले. मा. जिल्हाधीकारी महोदयांनाही आपल्या महसूल परिवारातील सदस्याने एवढया व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पुस्तक लिहिले याचा खूप आनंद झाला. त्यांनीही पुस्तक प्रकाशनासाठी वेळ व तारीख दिली. अरविंद जगताप हे ही आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून संदीपच्या पुस्तक प्रकाशन सोहळयासाठी उपस्थीत राहिले. त्या दिवशी पुस्तक प्रकाशन सोहळा संदीपने मनामध्ये पाहिलेल्या स्वप्नासारखाच झाला. त्याचे बारा वर्षापासूनचे लेखक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्याचं पहिले पुस्तक प्रकाशीत झाले. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे पाहून लेखक होण्याचं स्वप्न त्याने पाहिले होते. त्यांचीच प्रस्तावना त्याच्या पुस्तकाला लाभली व ते आवर्जून प्रकाशन सोहळयास उपस्थीत होते. त्यामुळे संदीपला आज बारा वर्षानंतर ध्येय पूर्ण झाल्याने समाधान लाभले होते.

        संदीपचे ध्येय आपल्यासाठी मोठे नव्हते. पण त्याच्यासाठी खूप मोठे होते. त्यासाठी त्याने प्रयत्नही केले. ध्येय छोटे असो किंवा मोठे असो ध्येय ते शेवटी ध्येयच असते. आपणही एखादे स्वप्न पाहत असाल. त्यासाठी आपल्या अंतर्मनामध्ये ते ध्येय पूर्ण झाल्याचे स्वप्न रंगवा. त्या ध्येयासाठी योग्य नियोजन करून व सकारात्मक ‍विचार करून योग्य कृती करा. तुमचे ध्येयही एक ना एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.