Mrunmayichi dayari - 3 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मृण्मयीची डायरी - भाग ३

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

मृण्मयीची डायरी - भाग ३


मृण्मयीची डायरी भाग ३रा


तारीख...५/९/१९८८


काल दादाचा फायनल ईयरचा निकाल लागला.तो प्रथम श्रेणीत प्रथम आला होता.सगळे खुप कौतुक करत होते त्यांचं. मीपण त्याचं अभिनंदन केलं तर माझ्याकडे लक्ष न देता आईला म्हणाला "आई ही मंद माझं अभिनंदन करतेय" आणि हसला.


मी अभिनंदन केल्यावर इतरांना थॅंक्यू म्हणतो तसं मला का म्हणाला नाही.मंद म्हणून का हसला.


माझी कोणतीच गोष्ट दादाला का आवडत नाही. त्याला माझ्याशी बोलायला का आवडत नाही? मी तर त्याला त्रास होईल असं कधीच वागत नाही. त्याचे मीत्र आले की मी खोलीच्या बाहेरच येत नाही.


कोणाला सांगू मनातलं कळतच नाही.आई बाबा दादा ताई सगळे आपल्याच कामात असतात. दादा आणि ताईला काही अडचण आली की आई बाबा कसे धावत जातात. मग माझ्यावेळी का नाही आई-बाबा येत?


हा मृण्मयीचा प्रश्न वाचल्यावर वैजूला एक जबरदस्त हुंदका फुटला. तिच्या मनात आलं की का आपण मृण्मयीच्या मनाच्या जवळ जाण्याचा कधीच प्रयत्न का केला नाही?


ती इतकी अपेक्षा करत होती आमच्या सगळ्यांकडून. आमच्यापैकी एकालाही कशी तिची हाक ऐकू आली नाही. खूप तिला आपल्याही नकळत आपण दूर लोटलं.


ती आमच्यासारखी बडबडी नव्हती म्हणून आम्ही सगळ्यांनी तिला मंद का ठरवलं. डायरीत जे तिनी लिहलय ते कोणी वेडी माणूस लिहीलं का असं? वैजूला आणखी रडायला आलं.


ती मीतभाषी होती हे आमच्या लक्षात का आलं नाही. आम्ही चौघेही खरच आपल्याच विश्वात असायचो. तिच्या जगात कधीही डोकावुन बघण्याचा आमच्या चौघांपैकी कुणीही प्रयत्न केला नाही. केला असता तर आज मृण्मयी वेगळी घडली असती.आज मृण्मयी जीवंत असती.


तिच्यातले गूण आम्हीं ओळखायचा प्रयत्न केला नाही. आमची महत्वाकांक्षा आमच्यासाठी खूप मोठी होती. मृण्मयीला छान लिहीता येतं. चित्र काढता येतात हे आम्ही कधी बघीतली नाही.


तिच्याकडे तेव्हाच लक्ष दिलं असतं तर आज तिने काहीतरी वेगळं करून दाखवलं असतं.


वैजूनी रडत रडतच पुढं पान उघडलं.


तारीख...८/९/१९८८


आज वैजूताईचं लग्नं पक्कं झालं. घरातले सगळे खूष आहेत. पण हा आनंद माझ्यापर्यंत त्यांनी पोचवलाच नाही. त्या सगळ्यांचं आनंदीत होणं.चेष्टामस्करी करणं मी सगळं लांबून बघत होते. मी नव्हते त्यांच्या जगात. माझं जग ही डायरी आणि चित्र एवढंच होतं.


ताईचा होणारा नवरा बघायची माझी खूप इच्छा होती. दादानी बघीतलं. तो तर बोलला सुद्धा त्यांच्याशी. मी नुसतंच बघीतलं असतं. ताईनी सुद्धा मला सांगीतलं नाही त्यांच्याबद्दल.माझी ओळखपण करून दिली नाही.


का सगळे असं वागतात माझ्याशी.माझं डोकं आजकाल खूप दुखतंय या सगळ्या विचारांनी.मी एकदा दोनदा आईला सांगीतलं डोकं दुखतं म्हणून.तिनी लक्षच दिलं नाही.


मी शाळा सोडली तेव्हापासून आईचा माझ्या वर राग आहे.मी का शाळेत जात नाही हे मी तिला सांगीतलं तर म्हणाली,


" तुलाच अभ्यास नकोसा झालाय.काम करायला नको असतं. दुकानातुन काही आणि म्हटलं की नाही उत्तर तयार असतं. नुसती घरात बसली असतेस. डोकं दुखायला झालंय काय? नाटकं सगळी."


माझं म्हणणं कोणालाच कधीच कळणार नाही का? देवांनी का मला असं बनवलं. दादा ताई सारखं बडबडं का नाही केलं?मी बडबडी असती तर ताई दादा माझ्याशी किती बोलले असते.दादा मला सारखं मंद म्हणाला नसता.आई बाबा माझ्यासाठी धावत आले असते.


मी जेवले नसते तर आईनी येऊन प्रेमानी भरवलं असतं. किती वेगळं जग असतं माझं. दादा, ताई ,आई ,बाबा यापैकी कोणालाही देवा माझ्यासारखं कमी बोलणं का नाही दिलं? तसं दिलं असतं तर माझ्या बरोबर आणखी कोणीतरी असतं. फक्त ही डायरी क्रेयान कलरच नसते.


माझं जग किती आनंदी झालं असतं.


या ओळीवर पण वैजूला ढसढसा रडू येऊ लागलं. तिच्या लक्षात आलं खरच माझ्या होणा-या नव-याला बघण्याची भेटण्याची तिची इच्छा असणं किती स्वाभाविक होती. मलाच कळायला हवं होतं.मी आईच्या म्हणण्यात आले आणि माझा आनंद तिच्यात वाटून घेतला नाही.


आता काय उपयोग? मृण्मयी आम्ही खूप दुष्टपणा नी लागलो ग तुझ्याशी. तू आमची असून सोयीस्कर तुझ्याकडे दुर्लक्ष करत गेलो. सुरवातीला चुकून झालं.नंतर तेच बरोबर वाटायला लागलं.आम्हा चौघांना तुझं अस्तीत्व आमच्या आयुष्यात नको होतं.म्हणूनच सारंग तुला मंद म्हणाला तरी आई कधीच त्याला रागावली नाही. हे आईचं चुकलं. सारंगचही चुकलं.


तारीख...१०/९/१९८८


आई मला त्या डाॅक्टरकडे घेऊन गेली होती. त्या माझ्याशी छान बोलल्या. इतकं छान आई नाही बोलत माझ्याशी.त्या डाॅक्टर हसतात पण किती छान. त्यांच्या गालाला खळी पडते.मला नाही पडत तशी खळी.


जे जे लोकांमध्ये चांगलं ते माझ्यात नाही.माझ्याजवळ फक्त ही डायरी आहे. हा पेन आहे आणि माझे क्रेयाॅन. मी मनातलं या डायरीत लिहीते आणि चित्र काढते. त्या डाॅक्टर मॅडमनी मला ही डायरी आणायला सांगीतली. माझी डायरी मी सगळ्यांपासून लपवून ठेवते.पण त्या डाॅ.मॅडमना दाखवीन.


त्या मला खूप आवडल्या म्हणून त्यांना मी दाखवीन. आमच्या घरातले सगळे मला आवडतात.मीच त्यांना आवडत नाही.असं का?


वैजू स्वतःशी पुटपुटली. "आम्ही सगळ्यांनी तुला दूर लोटलं. आयुष्यात आम्ही केवढी मोठी चूक केली.तू इतकी भावना प्रधान मुलगी होतीस आम्हीच तुला ओळखलं नाही. आज जग इतक्या वेगानी धावतय तू त्याचा वेग पकडू शकली नाहीस कारण तू खूप हळवी आणि संवेदनशील मनाची होतीस.आम्हाला तेच कळलं नाही.


आम्ही मात्र तुला बरोबर न घेता जगाबरोबर धावलो.तू मागे पडलीस तरी लक्ष दिलं नाही.तू खूप प्रयत्न केलास आमच्याबरोबर येण्याचा.तुझे प्रयत्न ही डायरी वाचल्यावर कळले.


आधी कळले असते तर ? आत्ता तू सुद्धा आमच्याबरोबर असतीस मग ही तुझी डायरी वाचायची वेळ नसती आली.कसं समजवू स्वतःला मलाच कळत नाही.


आम्ही खूप अपराधी आहोत ग तुझे. आता आम्ही कितीही आमचा गुन्हा कबूल केला तरी तू कशी येणार परत. तू तर अशा ठिकाणी गेलीस जिथुन परत येण्याचा रस्ताच नाही.


वैजू हमसून हमसून रडू लागली. ती डायरीची पुढची पानं ऊलटवू शकत नाही. तिची हिम्मत झाली नाही पुढचं वाचण्याची. आपल्या निष्काळजीपणा मुळे एका संवेदनशील मुलीची जीवनयात्रा संपली. संपली नाही आपण सगळ्यांनी मिळून तिला तिचं जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केलं.असच वैजू ला वाटायला लागलं. म्हणजे आपण तिचे खुनी आहोत. ही गोष्ट वैजूच्या मनात वारंवार यायला लागली.


वैजू मृण्मयीच्या खोलीतल्या सगळ्या वस्तूंना पुन्हापुन्हा स्पर्श करुन त्यात मृण्मयीला शोधू लागली. वैजूच्या मनात इतकी अपराधी भावना दाटून आली की हताशपणे ती स्वतःच्या कपाळावर मारून घेऊ लागली. बराच वेळानी तिचा स्वतःवरचा राग हळुहळू कमी झाला.


कितीतरी वेळ ती डायरी वरच्या सश्याच्या चित्राकडे बघत होती. सश्यासारखीच कोमल मनाच्या मृण्मयीचं आयुष्य किती खाच खळग्यांनी भरलं होतं. तिने कशी सगळ्यां खाच खळग्यातून वाट काढली असेल?


आपल्याला तर पावलोपावली कुणाचा तरी आधार लागतो. इतकं छान सुखी जीवन असताना एखादी क्षुल्लक गोष्ट मिळाली नाही तर आपण किती अस्वस्थ होतो.आणि मृण्मयी तिला तर क्षुल्लक गोष्टी सुद्धा मिळाल्या नाहीत. हक्काचं आई-बाबा आणि आमचं प्रेम पण मिळालं नाही. कसं वाटलं असेल तिला?


वैजूनी हळूच थरथरत्या हातांनी पुढचं पान उघडलं.


तारीख...५/१०/१९८८


आज खुप दिवसांनी डायरी उघडली कारण मनात अपमानाचा बाॅम्ब फुटण्याच्या बेतात होता.तो फुटाण्याच्या आधी या डायरीत त्याला बंद करून ठेवायचं आहे. सगळीकडुन माझा अपमान होतो.ताईच्या साखरपुड्याला हाॅलमधील एका खुर्चीवर चुपचाप बसून राहायचं असं आईनी मला बजाऊन सांगीतलं.


ताई खूप सुंदर दिसत होती. तिच्याभवती तिच्या मैत्रीणी होत्या. त्या तिला खूप चिडवत होत्या.मी हाॅलमधील एका कोप-यात बसले होते.जशी काही मी ताईची कोणीच नाही.त्या नानुला तो वेडा असून त्याचे आई-बाबा कसे त्याला आपल्या जवळ घेऊन बसले होते..


ताईशी आणि तिच्या नव-याशी त्या नानुनी हात मीळवला. त्याच्याशी ताई कसं गोड बोलत होती.तोतर वेडा आहे त्याला काही कळत नाही. तरी बोलले त्याच्याशी. मी कुठे वेडी आहे.मग माझी का नाही ओळख करून दिली?


मी आता ताईंशी कधीच बोलणार नाही.अगदी या जगातून जाईपर्यंत.मी या जगातून गेले तर काय होईल? सगळे खूष होतील. आई कशाला रडेल? तिला मी तिच्या गळ्यातलं ओझं वाटते.दादा तो सुद्धा नाही रडणार.तो मला मंद म्हणतो.मी मंद नाही तरी त्याला लाज वाटते.


यानंतर या तारखेला मृण्मयीनी काहीच लिहीलं नव्हतं.वैजू सुन्न झाली.


केवढं भयाण सत्य या डायरीतुन वैजू समोर ऊलगडलं होतं.मृण्मयी म्हणाली तसं खरच बाॅम्ब होता तिच्यावर आलेला एकेक प्रसंग.


त्या नानूला किती प्रेमाने जवळ घेतलं मी. माझ्याबरोबर फोटोही काढला त्याचा.लाळ गाळत असलेल्या आणि चिकट तोंडाच्या मुलाचा.शी: मृण्मयीचा नानू पेक्षा जास्त हक्क होता माझ्याबरोबर फोटो काढण्याचा.


आपण आपल्या सुखात इतके रमलो की नानू आणि मृण्मयी यामधला फरक नाही बघू शकलो.जतीन माझा नवरा दोनदा म्हणाला होता तुझ्या बहिणीला बोलव फोटो काढू. आपण दुर्लक्ष केलं.कारण आईनीच तंबी दिली होती.


फार वाईट घडलं ग मृण्मयी त्या दिवशी. मीच वागले तसं.आता कितीही पश्चात्ताप केला तरी पुन्हा तू परत येणार नाहीस की तो साखरपुड्याचा दिवस परत येणार नाही.


मृण्मयी सशासारखी नाजूक,मनानी हळवी होती.तिच्यापुढे आम्ही चौघेही कठोर हृदयाचे अगदी दगड आहोत म्हटलं तरी चालेल.आपल्याच घरून एवढा तिरस्कार सहन केला तिनी तरी आमच्या जवळ येण्याची,आमचं प्रेम मिळवण्याची तिची धडपड सुरू होती.


आम्हाला दिसलीच नाही तिची धडपड.वैजू आता इतकी खंतावली की तिला स्वतःला स्वतःचा इतका राग आला की रागाच्या भरात तिनं स्वतःच्याच थोबाडीत लगावलं आणि रडत पलंगावर कोसळल्या सारखी पडली.


---------------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका...मीनाक्षी वैद्य.