मृण्मयीची डायरी भाग २रा.
मागील भागावरून पुढे…
तारीख… १६/६/१९८८
इतरांचं जाऊ दे आईनी पण कधी गंभीरपणे माझी दखल घेतली नाही. वैजुताई आणि सारंग दादा सारखं मलापण माझी मतं आहेत हे तिला कळतच नव्हतं.
मला वाटायचं माझ्याजवळ आईनी येऊन बसाव.प्रेमानी डोक्यावरून हात फिरवावा.पण असं कधीच झालं नाही.मग दादा,ताईंच्या डोक्यावरून कशी येता जाता हात फिरवायची. त्यांचा गालगुच्चा घ्यायची. माझ्यावेळी तीला हे आठवलं नाही कधी.
आई जेव्हा दादा ताईचे लाड करायची तेव्हा ते मी आधाशासारखं माझ्या डोळ्यांनी पिऊन घ्यायचे.
तारीख...१५/६/१९८८
मला नेहमीच सगळेच मंदच समजत आले.मला ओरडून सांगावं वाटलं की मी मंद नाही. मी इतरांसारखी हसू शकते, रागाऊ शकते, बोलू शकते.
मला सगळं येतं पण मला दादा ताई सारखं खूप बडबड करायला नाही आवडत. म्हणून मी खूप बोलत नाही. म्हणून लोकांना वाटतं मी मंद आहे.
एकदिवस मित्रांसमोर दादा मला म्हणाला "एक मंदे पाणी घेऊन ये पटकन" मला कळलं नाही म्हणून त्यांच्याकडे बघत बसले. तेवढ्यात त्याचा मित्र म्हणाला " अरे हिचं नाव तर मृण्मयी आहे.मंदा काय म्हणतोस?"
त्यावर दादा म्हणाला "बघ गेली का ती? तिला जरा उशीराच कळतं म्हणून मंदा म्हटलं.मला हे नाव खूपच आवडलं.मंदे पाणी आण." आणि दादा बरोबर सगळे त्याचे मित्र खो-खो हसायला लागले.
ही माझी टर ऊडवली दादानी. त्याला गंमत आली.पण माझ्या मनाला किती जखम झाली असेल याचा त्यांनी विचारच केला नाही.त्यादिवशीपासून आई प्रमाणेच दादाही माझ्यापासून लांब गेला.
तारीख...५/७/१९८८
खूपदा मी माझ्याशीच बोलायचे. ते बघीतल्यावर लोक म्हणायचे वेड लागलंय हिला. मला हसू यायचं स्वत:शी बोलणं म्हणजे वेडेपणा आहे का?आपण स्वतःशी कधीच बोलत नाही. इतरांशी मात्र खूप बोलतो.आपल्याला आपली ओळख कधीच होत नाही. हा आपल्यावरच आपण अन्याय नाही का करत.
तसं बघीतलं तर माझ्या घरी सगळेच माझ्यावर प्रेम करणारे आहेत अजूनही करतात. मी अशी जगाच्या दृष्टीनी वेड्यासारखं वागत असले तरी.
सगळे माझ्यावर प्रेम करतात मला माहिती आहे.पण दादा ताई वर करतात तसं नाही करत. कोणालाच माझ्या जगात येऊन बघावं वाटतं नाही. मी आजकाल आणखी गप्प का झाले? याचा शोध नाही घ्यावासा वाटत त्यांना. का?
तारीख… १०/७/१९८८
मला छोट्या छोट्या गोष्टी लिहायला आवडतात.माझ्या गोष्टीत राक्षस असतोच.देवमाणुस असतो.प्रत्येक वेळी माझ्यासाठी त्या राक्षसाला मारतो. एक गोष्ट मी आईला दाखवली तर आई म्हणाली "हे काय वेडविद्र लिहीलय.गोष्ट लिहायची होती तर छान लिहायची.आणि तिच्या कामात मी गोष्ट वाचायला लावली म्हणून वही दणकन जमीनीवर आदळून ती तिचं काम करू लागली.
हीच गोष्ट मी वैजूताईला पण दाखवायला नेली तर तिची मैत्रीण आली होती. त्या दोघींचं माझ्याकडे लक्षच नव्हतं.मी तशीच निराश होऊन आपल्या खोलीत गेले.
तारीख...११/७/१९८८
काल माझा संतोष मामा आला होता. मला संतोष मामा आवडायचा कारण तो माझ्याशी बोलायचा. माझ्या कविता गोष्ट वाचायचा. तो आला की मला आनंद व्हायचा. यावेळी त्यानी माझ्यासाठी खूप छान पेन आणलं होतं. म्हणाला,
"मृण्मयी तुला लिहायला आवडतं नं ! हां बघ तुझ्यासाठी छान पेन आणलाय.आता या पेननी आणखी छान छान लिहीशील नं?".
तो पेन बघून मला नाचावंस वाटलं.मी तो पेन घेणार तेवढ्यात दादानी तो पेन मामाच्या हातून घेतला. मला रडू आलं. दादा मामाला म्हणाला
" अरे एवढा महागाईचा पेन हिला कशाला देतोय? मी घेतो हा. तिच्यासाठी कोणताही साधा पेन आणून दे. तिला चालेल." मामांनी लगेच त्याच्या हातातला पेन घेऊन मला दिला.
दादा खूप चिडला.मामा म्हणाला,
" हे बघ ती छान लिहीते म्हणून तिला हा पेन दिलाय. तुला देईन नंतर."
"अरे संतोष कसली छान लिहीते ती. वेडविद्र काहीतरी भयानक लिहीते." असं आई मामाला म्हणाली.यावर मामा म्हणाला
"तिला जश्या पद्धतीनं व्यक्त व्हायचंय होऊ दे.त्याच्यावर कोणतीही कमेंट करू नका. असं लिहीता लिहीताच ती आपल्या कोशाच्या बाहेर येईल.आणि छान लेखिका सुद्धा होईल. हो कि नाही माझी मनीमाऊ? लिहीणार नं छान छान?"
मामाचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला.या जगात कोणीतरी माझ्या बरोबर आहे.माझी भावना समजून घेत आहे.तो दिवस माझ्यासाठी खास होता. मला पेन दिलं म्हणून नाही तर तो मला इतरांसारखा मंद समजत नव्हता.
वैजूनी डायरीची पुढचं पान ऊलटवलं
तारीख… २०/७/१९८८
आज वैजूताईला बघायला मुलगा आला होता. मला खोलीबाहेर यायचं नाही म्हणुन आई बाबांनी निक्षून सांगीतलं होतं. मला खूप उत्सुकता होती त्या मुलाला बघायची. मी आईला सांगीतलं. आई म्हणाली,
"काही नको बाहेर यायला. त्यांच्यासमोर काहीतरी वेडवाकड़ बोलशील, नाहीतर काहीतरी करशील. तुझ्यामुळे मुलाला वैजू पसंत आली तरी नाईलाजानी तो नाही म्हणेल. चांगलं स्थळ ऊगाच हातचं जाईल.गप बस खोलीतच."
मी वेडं वाकडं कुठे वागते मला कळत नाही.मी डोक्यानी कमी नाही त्या नानू सारखी. तो आपट्यांचा नानू वेडा आहे.तो रस्त्यांनी जातांना स्वतःशीच जोरजोरात बडबड करतो. हातवारे करतो. कोणाकडेपण बघून हसतो.मी कुठे अशी बडबड करते. मी तर कमीच बोलते. तरी मला वेडं म्हणतात.
त्या नानुवर त्याचे आई-बाबा कधी ओरडत नाही. दिवसभर तो भटकत असतो. मी तर कुठेच जात नाही. माझ्या खोलीच्या बाहेरच येत नाही. कोणावर ओरडत नाही. तरी मी वेडी आहे.
मी वेडी आहे की ज्यांना मी वेडी वाटते ते वेडे आहेत? कळत नाही.
तारीख...२०/८/१९८८
वैजू ताईला खूप मैत्रीणी होत्या. त्या घरीपण यायच्या. त्यांना मी कशी आहे हे माहिती होतं. ताईची एकच मैत्रीण निलीमा माझ्याशी बोलायची.बाकीच्या माझ्याकडे वेगळ्याच नजरेनी बघायच्या. त्या असं बघायच्या तर ताईंनी कधी त्यांना सांगीतलं नाही की तुम्ही असं बघू नका तिच्याकडे. का नसेल सांगीतलं? तिला भीती वाटली का आपल्या मैत्रीणी आपल्याला सोडून जातील याची.
दादाचे पण मीत्र घरी यायचे. तोही तसाच वागायचा. तोतर मला खोलीबाहेर येऊ नको म्हणायचा. त्याचे मीत्र आले की मी खोलीतच असायची. माझी मैत्रीण म्हणजे ही डायरी ,क्रेऑन कलर आणि ड्राॅईंगची वही.मी मनातलं सगळं या डायरीत लिहीते. वहीवर चित्र काढते. डायरीत मी इतकं छान लिहू शकते मग मी वेडी कशी असेन?
मला चित्र काढता येतात. मग मी कशी वेडी असेन? मला खूप बोलता नाही येत. जमत नाही खूप खूप वेळ बोलायला. म्हणून मी वेडी आहे का?जे खूप बोलत नाही ते वेडे असतात?
मला कमी बोलायला आवडतं. चित्र काढायला खूप आवडतं. डायरीत लिहायला आवडतं.मी चित्र काढते मग मी वेडी कशी? मी डायरी लिहीते मग मी वेडी कशी?
त्या नानूला कुठे येतं चित्र काढता! त्याला तर अ,आ,इ पण येत नाही.पण त्याचे आई बाबा नाही रागवत त्याला. मग त्याच्यापेक्षा मी शहाणी आहे. हो मी खरंच शहाणी आहे.पण तरी मला मंद समजतात.
तारीख २२/८/१९८८
माझं गप्प राहणं बघून आईच्या मैत्रीणीनी आईला सांगीतलं की मृण्मयीला समुपदेशनासाठी घेऊन जा.आई बाबांना सांगत होती तेव्हा मी ऐकलं.काय असतं हे समुपदेशन?
मला हिम्मत झाली नाही आईला विचारायची.
आईनीच काल सांगीतलं. की,
"ऊद्या तुला एका डाॅ.कडे घेऊन जाणार आहे.शहाण्यासारखी वाग. ते जे प्रश्न विचरतील त्याला नीट उत्तर दे." आता हे डाॅ.कुठून आले.?या प्रश्नाने माझा गोंधळ उडाला.
तारीख...२३/८/१९८८
आज आई मला त्या डाॅ.कडे घेऊन गेली होती.थोडावेळ मला बाहेर बसवून आईचं फक्त आत गेली. थोड्यावेळानी आई बाहेर आल्यावर मला आत पाठवलं.
मी आत गेले. डाॅ.हसून म्हणाल्या,
"बस मृण्मयी."
मला खूप आनंद झाला कोणातरी अनोळखी व्यक्तीला माझं नाव माहिती आहे. मी त्यांच्याकडे बघून हसले.त्यापण हसल्या. त्या हसल्या की खूप गोड दिसत होत्या.त्यांच्या गालाला खळी पडते होती.
त्यांनी विचारलं.
" मृण्मयी तुला काय आवडतं?"
"मला तुम्ही नावांनी हाक मारलं ते आवडलं.तुमच्या गालाला खळी पडते तीपण मला आवडली." यावर हसतच त्या म्हणाल्या,
"अरे वा! तुझ्या लक्षात आलं माझ्या गालाला खळी पडते."
"हो."यावर डाॅ.हसत म्हणाल्या
" किती छान. लोकांना कळतच नाही ग माझ्या गालाला खळी पडते. तुला एका क्षणात कळलं. मला तू आवडलीस..आणखी तुला काय आवडतं?"
"मला चित्र काढायला आवडतं.मला लिहायला आवडतं"
"हो.काय लिहायला आवडतं?"
" काहीपण.मनात येईल ते मी डायरीत लिहीते."
"छान. तू रोज लिहीतेस डायरी?"
" हो.पण कधीकधी नाही लिहीत."
" का?"डाॅक्टरांनी विचारलं.
" कधी कधी मला लिहावसच वाटतं नाही."
" काग लिहावस वाटत नाही?"
"मला कोणी वेडी म्हटलं,मंद म्हटलं की मला लिहावंस नाही वाटतं."
"पण तू वेडी कुठे आहेस?तू मंदपणे नाहीस."
"आहे. माझा दादा मला मंद म्हणतो.त्याच्या मित्रांना पण सांगतो."
"काय सांगतो? तू मंद आहे असं?"
" हो."
यानंतर त्या खूप वेळ काहीच बोलल्या नाही.मीपण त्यांच्याकडे बघत होते.नंतर त्या म्हणाल्या.
"आपण पुढच्या आठवड्यात परत भेटू.तेव्हा तू तुझी चित्रकलेची वही घेऊन येशील.मला दाखवायला.तुला आवडेल मला तुझी चित्र दाखवायला?मला आवडेल तुझी चित्र बघायला डायरी वाचायला."
" हो.मी आणीन. तुम्ही मला आवडल्या." मी बाहेर आले..
आज मी खूप आनंदात होते कारण घराबाहेरच्या या मॅडमनी मला नावानी हाक मारली.माझी डायरी आणि चित्रांची वही मागीतली. बाहेर आई बसली होती. तिच्याबरोबर मी घरी आले.पूर्ण रस्ताभर तिनी काहीच विचारलं नाही बोलली नाही. मला वाटलं त्या मॅडम माझी आई असत्या तर किती छान झालं असतं.
मी त्यांना माझी डायरी माझी चित्रांची वही नक्की दाखवीन.
मृण्मयीच्या मनात काय विचार चालू आहे याच्याशी आईला काही देणं घेणं नव्हतं. मैत्रीणीनी सुचवल्याप्रमाणे एकदाचं दाखवलं डाॅक्टरला झालं. संपला विषय असे भाव आईच्या चेह-यावर होते.मृण्मयी मात्र पुढल्या भेटीची वाट बघत होती.
वैजूला मात्र आठवलं की आई मृण्मयीला पुन्हा त्या मॅडम कडे घेऊन गेलीच नाही आपण विचारलही होतं.पण आईनी काहीतरी थातूरमातूर कारणं सांगीतली होती. आपणही आपल्या संसारात व्यस्त झालो आणि पुढे विसरून गेलो.याची आज वैजूला खूप खंत वाटत होती.
तेव्हाच आपण आईच्या मागे लागलो असतो तर आज मृण्मयी या कोषातून बाहेर आली असती. आपल्या सारखीच तिच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे गेली असती. वैजूच्या डोळ्यातून टपटप पाणी येऊ लागलं.
--------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका...मीनाक्षी वैद्य.