समोर इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसलेली स्त्री आनंदी पाटील असते. रसिकाच्या अगोदरच्या ऑफिसमधील ज्युनियर असते. जिणे एके काळी रसिकाच्या हाताखाली काम केलेलं असते. तिचा हातात रसिकाची बायोडेटा फाईल असते. रसिकाला पाहताच ती कुत्सित हसते.
तिला पाहून न पाहिल्यासारखं करते आणि परत तिच्या फाईल बघण्यात गुंग होते.
"मे आय सीट मॅडम"
"ओ.. येस येस, यू कॅन"
"मी पाहिली तुमची फाइल, तुमची मागील रेकॉर्डस् खूप चांगली आहेत. पण तुम्ही जो पाच वर्षाचा गॅप घेतलात त्यामुळे आता तुमच्या सध्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर कंपनी कसा विश्वास ठेवणार. आम्हाला या पदासाठी खूप अनुभवी आणि कार्यक्षम व्यक्ती हवी आहे.
तुम्ही हुशार आणि कार्यक्षम आहात हे मी माझ्या वैयक्तिक पातळीवर सांगू शकेन पण नोकरीत घेतलेल्या गॅपमुळे तुमच्या सध्याच्या अनुभवाबद्दल मला शंका आहे.
आम्ही विचार करून तुम्हाला कळवू.. या तुम्ही..."
रसिकाला, आनंदीने तिला दिलेली वागणूक बघून रागही आला नि वाईटही वाटलं.
आनंदी आपली ज्युनिअर असताना आपण किती सांभाळून घ्यायचो तिला, तिला न समजणारी प्रत्येक गोष्ट समजावून सांगायचो.
एकदा तर तिच्या हातून किती मोठी चूक झाली होती. माझ्या वेळेत लक्षात आली म्हणून नाहीतर कंपनीचे खूप मोठे नुकसान तर झालेच असते आणि आनंदाची नोकरीही गेली असती.
हा, कधी कधी रागवायचो देखील.. ते ही तिच्या चांगल्यासाठी, तीची बॉस म्हणून तेवढा हक्क तरी नक्कीच होता मला..
एक बॉस म्हणून तिची वागणूक बरोबर असेलही पण इंटरव्ह्यू नंतर ती माझ्याशी एक मैत्रीण म्हणून दोन आपुलकीचे शब्द बोलली असती तर मला खूप बरं वाटलं असतं. ऑफिस मधून बाहेर पडली तेंव्हा आपण कुठं जातोय हे ही तिच्या लक्षात आलं नाही. एका रिक्षावाल्याने जोरात हॉर्न वाजवला तेंव्हा ती भानावर आली. लगेच रिक्षा पकडून घरी यायला निघाली .विचारांच्या तंद्रीत घर कधी आलं तिला समजलचं नाही..
"मॅडम, कुठं जायचं, उजवीकडे की डावीकडे.."
" थांबा इथेच "
घरी आल्यावरही तिचं मन कशातही लागत नव्हतं. कुणाल आज लवकर घरी आलेला असतो.
तिला आलेली बघून ,"कसा झाला इंटरव्ह्यू, काय काय विचारलं, मग मिळेल की नाही ही नोकरी.."
"अरे हो हो, किती प्रश्न विचारशील. आणि काय रे, मलाच नोकरी द्यायला तिथं का माझी मैत्रीण बसली आहे की माझे नातलग. मी एकटीच नव्हते तिथं, माझ्यापेक्षा अनुभवी आणि हुशार बरेचजण होते तिथं.
इतरांपेक्षा माझा बायोडेटा उत्तम असला तरी पाच वर्ष मी गॅप घेतल्याने मला सध्याच्या अदयवत तंत्रज्ञानाची माहिती बरीच कमी आहे. त्यामुळे त्यांनी विचार करून कळवतो असं सांगितलं ."
एकंदरीत तिचा मूड बघून रसिकाच्या मनाची अवस्था कुणालला लक्षात आली. तो ही थोडा वेळ शांत बसला.
"कुणाल, तुला माहित आहे, आज माझा इंटरव्ह्यू कोणी घेतला, आनंदी पाटील, माझी अगोदरच्या ऑफिसमधील ज्युनियर.
तुला सांगू का, तिला पाहून आधी मला खूप बरं वाटलं की आपल्याला ही नोकरी मिळू शकेल आणि आनंदी मला
सध्याच्या अदयवत तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यातही मदत करेल जसं मी तिला शिकवलं होतं.
पण तिनं माझा हिरमोड केला. नुसतं नावापुरती ओळख दाखवली. त्यात मला ती त्या कंपनीची बॉस जास्त आणि माझी मैत्रीण कमी वाटली..खूप वाईट वाटलं रे मला!
आणि स्वतःचा रागही आला की का आपण गॅप घेतला आपल्या एवढ्या चांगल्या करियरमध्ये..
नाहीतर आज मी तिथं आनंदीच्या जागी असते."हे सांगत असताना रसिकाला आनंदीचा किती राग आला आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.
कुणाल शांत बसून ऐकत होता. आता तिला काहीही समजावण्यात अर्थ नाही हे त्याला कळत होते. ती त्या मनःस्थितीत नव्हती. त्यानं तिला जवळ घेऊन थोपटले.
तू बस, मी मस्त चहा बनवतो आपल्या दोघांसाठी..
कुणाल स्वयंपाकघरात तर गेला परंतु त्याच्या मनात वेगळेच विचारचक्र सुरु झालं..