Aaropi - 17 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | आरोपी - प्रकरण १७

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

Categories
Share

आरोपी - प्रकरण १७




न्यायाधीश मुळगावकरांनी आपला अंगावरचा झगा जरासा सारखा वरून घेतला.
“ मिस्टर खांडेकर मला असं समजलं की मागच्या वेळेला कोर्ट तर तहकूब केल्यापासून बऱ्याच काही नाट्यमय घडामोडी घडल्या क्षिती आलूरकर च्या प्रकरणात?”
“अगदी बरोबर आहे युवर ऑनर. त्याच अनुषंगाने मला इन्स्पेक्टर तारकर यांना साक्षीसाठी पुन्हा पिंजऱ्यात बोलवायचे आहे” खांडेकर म्हणाले.
इन्स्पे.तारकर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात पुन्हा उभा राहिला. त्याला सरकारी वकिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांने सांगितलं की त्यांन आणि त्याच्या हाताखालच्या पोलिसांने मधुरा महाजन च्या घरी अचानक धाड टाकली. त्या वेळेला त्याला कार्पेट च्या खालच्या चोर कप्प्यात मोठी रोख रक्कम ठेवलेली दिसली. ते जेव्हा आत शिरले त्यावेळेला पाणिनी पटवर्धन आणि कनक ओजस हे तिथून निघण्याच्या तयारीत होते. त्या दोघांनी त्याला अडवलं. आतल्या रोख रकमेची मोजदाद केली आणि ती जवळ जवळ पंधरा लाख रक्कम असल्याचं निष्पन्न झालं.”
“उलट तपासणी घ्या.” सरकारी वकील खांडेकर पाणिनी ला उद्देशून म्हणाले .अत्यंत कंटाळवाण्या सुरात आणि जांभया देत पाणिनी म्हणाला, “काही प्रश्न नाहीत माझे.”त्या नंतर खांडेकरांनी हस्ताक्षर आणि ठसे तज्ज्ञाला बोलावलं आणि त्याच्या कडून काढून घेतलं की ज्या बॅटरी ने मधुर वर हल्ला झाला , त्यावर आरोपी च्या हाताचे ठसे होते.
“उलट तपासणी घ्या.” खांडेकर म्हणाले.
पाणिनी ने एकच प्रश्न विचारला, “ ठसे आरोपीचे आहेत हे ठीक आहे पण हे ठसे कधी पासून आहेत तिथे आहेत हे तू सांगू शकतोस का?”
“ नाही.” साक्षीदार म्हणाला.
“त्यावर फक्त आरोपीचेच ठसे आहेत की इतरही काही ठसे आहेत?” पाणिनी ने विचारलं.
“ इतर सुध्दा ठसे आहेत पण आरोपीचे आहेतच.”
“ इतर ठसे आहेत म्हणजे ती बटरी इतरांनी पण हाताळलेली असू शकते?” पाणिनी ने विचारलं.
“ ऑब्जेक्शन. हा साक्षीदाराचा अंदाज आहे.कोर्टाला अंदाज नाही घटनांची साक्ष लागते.” खांडेकर ओरडले.
“ या साक्षीदाराची पूर्ण साक्षच रद्द करावी युअर ऑनर.” पाणिनी ओरडला.
“”का ? का?” –खांडेकर
“ बरोबर आहे पटवर्धन म्हणताहेत ते.” न्या.मुळगावकर म्हणाले. “हा साक्षीदार तुम्ही सरकार पक्षाने तज्ज्ञ माणूस म्हणून आणलाय.त्याच्या ज्ञानाच्या आधारे तो त्याचा अंदाज व्यक्त करू शकतो आणि तुम्हाला हे मान्य नसेल तर आरोपी चे हाताचे ठसे त्या बॅटरी वर मिळाले हे त्याचे म्हणणे सुध्दा तुम्हाला मान्य करता येणार नाही. साक्षीदाराने उत्तर द्यावं, पटवर्धन यांच्या प्रश्नाचं.”
“ हो इतरांचे ठसे आहेत म्हणजे ती बॅटरी इतर माणसांनी सुध्दा हाताळलेली असू शकते. मात्र ठशांचे वय ठरवता येत नाही.म्हणजे किती काळापूर्वी ते उमटले ते सिध्द नाही करता येत.”
“ दॅट्स ऑल ” पाणिनी म्हणाला.
त्या नंतर खांडेकरांनी मधुर महाजनच्या घरा शेजारी रहात असलेल्या माणसाची साक्ष काढली. क्षिती तिथे टॅक्सी करून आल्याचं आणि टॅक्सी उभी करून घरात गेल्याच सांगितलं. त्याची सुध्दा पाणिनी ने उलट तपासणी घेतली नाही.
न्यायाधीश पाणिनी कडे कुतूहलाने पहात होते. त्यांना वाटत होतं की बहुदा गेल्या चौवीस तासात घडलेल्या घडामोडीमुळे पाणिनी चा केस मधला रस संपला असावा. या कोर्टात फारसा विरोध न करता आरोपी वरील आरोप सिध्द होवू द्यावेत ,आणि वरील कोर्टात प्रकरण जाईल तेव्हा काय ते बघू असं पाणिनी ने ठरवलं असावं.
खांडेकरांनी आपले सर्व साक्षीदार संपवले आणि आरोपीला दोषी ठरवावं अशी कोर्टाला विनंती करून ते खाली बसले.
“ मला वाटत की आरोपीला दोषी ठरवायला पुरेसा प्राथमिक पुरावा सदर झाला आहे.” न्या. मंगरुळकर म्हणाले. “ खर सांगायचं तर काल पर्यंत मला तसं वाटत नव्हतं, हे मी मोकळे पणाने सांगतो.पण आज ज्या पद्धतीने सरकारी वकिलांनी आपले साक्षीदार सदर केले आणि पटवर्धन यांनी ज्या.............”
त्यांचं बोलणं खुंटलं, जेव्हा त्यांनी पाहिलं की अचानक पाणिनी उठून उभा राहिला आणि म्हणाला, “ माफ करा न्यायमूर्ती महाराज, पण बचाव पक्षाने अजून आपली केस संपवली नाही. आम्ही आमचे काही साक्षीदार इथे बोलावू इच्छितो. त्या पैकी एक साक्षीदार आहे , जी माझ्या मता नुसार ठार आंधळी स्त्री आहे, तिच नाव.. किंवा ती ज्या नावाने सध्या वावरते आहे, ते नाव आहे मिसेस मणिरत्नम.या नावाने आम्ही तिला समन्स काढलंय.त्याला प्रतिसाद म्हणून ती अत्ता इथे आली असेल, जर आली नसेल तर माझी विनंती आहे की तिला वॉरंट बजावण्यात यावं. ”पाणिनी म्हणाला.
कोर्टात बसलेल्या लोकांमधून मागच्या रांगेतून एक बाई उठून उभी राहिली, आणि म्हणाली, “ मिसेस मणिरत्नम इथे आल्या आहेत. मी त्यांना घेऊन पुढे येते.”
पाणिनी ने समाधानाने मान डोलावली आणि खाली बसला.
न्या.मंगरुळकरांनी पाणिनी कडे बघितलं. “ पटवर्धन, तुमचा साक्षीदार सादर करायचा हक्क मी डावलत नाही, पण हा प्राथमिक खटला आहे. इथे साक्षीदाराच्या खरे खोटे पणाची शहानिशा केली जाणे अपेक्षित नसतं. सरकार पक्षाने सदर केलेल्या साक्षीदारांची साक्ष ही सकृत दर्शनी आहे तशी स्वीकारायची पद्धत इथे असते. वरच्या कोर्टात तुम्ही जाल तेव्हा त्यातील त्रुटी किंवा फोलपणा दाखवण्याचा तुम्हाला हक्क असतो.”
“मला माहीत आहे ते.” पाणिनी त्रोटक पणे म्हणाला.
कोर्टाच्या मागून मीनल गोखले आपल्या बरोबर एका स्त्री ला घेऊन चालत पुढे आली. तिने हातात अंध लोक वापरतात तशी एक काठी घेतली होती.डोळ्याला गडद काळ्या रंगाचा गॉगल.तिला मीनल गोखले ने जरी खांद्याला धरले असले तरी तिच्या चालण्यात एक आत्मविश्वास जाणवत होता.तिचा पोषाख सुध्दा चांगला खानदानी होता. पिंजऱ्यात येऊन तिने शपथ घेतली.
“ आपलं नाव?”
“ मधुरा मणिरत्नम.” ती म्हणाली.
तिची सर तपासणी घ्यायला पाणिनी उभा राहिला. “ मिसेस मणिरत्नम, मला तुम्ही या पूर्वी कधी बघितलं आहे, तुमच्या आयुष्यात?” पाणिनी ने विचारलं.
“ गेल्या दहा वर्षांच्या आयुष्यात मी कधी कुणालाच बघितलेलं नाही.”
“मी, तुमच्याशी कधी बोललोय? यापूर्वी?”
“ तुमचा आवाज ऐकलंय यापूर्वी मी.”
“ कधी?” पाणिनी ने विचारलं.
“ तुम्ही मीनल गोखले बरोबर माझ्या विषयी बोलत होतात तेव्हा. म्हणजे माझ्या आणि मधुरा महाजन च्या संबंधा बद्दल बोलत होतात तेव्हा, माझ्या घरात तुम्ही येणार होतात तेव्हा.”
“ पण त्यावेळी मीनल गोखले तुम्हाला बोलवत होत्या ते सरिता या नावाने हाक मारून. मधुरा म्हणून तिने हाक मारली नाही. ” पाणिनी म्हणाला
मी आणि मीनल दोघींनी, ते नाव मुद्दामच चव्हाटयावर आणायचं नाही असं ठरवलं होतं. त्याला कारणे होती. तुम्ही मधुरा महाजन आणि माझ्या संबंधाबद्दल कसं शोधून काढलंत ते मला माहीत नाही पण मी तेव्हा ओळखून गेले की आता ....”
खांडेकर तिला थांबवत मधेच म्हणाले, “ याचा या केस शी काही संबंध आहे युअर ऑनर?”
“ मी तो पुढे दाखवून देणार आहे.” पाणिनी म्हणाला.
“ तो तुम्ही आधीच दाखवायला पाहिजे होता.”
“ ठीक आहे. दाखवतो आधी.” पाणिनी म्हणाला. “ मिसेस मणिरत्नम, मला सांगा, तुमचं आणि क्षिती अलूरकर चं काय नातं आहे? ”
“ मी तिची सख्खी आणि एकमेव आत्या आहे. मधुरा आत्या.”
कोर्ट एकदम सुन्न ! खांडेकर बधीर.त्यांचं लढायचं सगळं अवसानच संपलं.
“ तर मग त्या घरात राहणारी आणि स्वतःला मधुरा महाजन म्हणवून घेणारी स्त्री कोण आहे?”पाणिनी ने विचारलं.
“ माझ्याकडे बराच काळ माझी नर्स म्हणून काम करणारी चैत्राली चिटणीस” मिसेस मणिरत्नम म्हणाली.
“ आणि ही चैत्राली चिटणीस तुमची तोतया म्हणूस वावरत होती?” पाणिनी ने विचारलं.
“ होय.”
“तुमच्या संमतीने ? ” पाणिनी ने विचारलं.
“ अर्थात.”
“ तुम्ही जरा सविस्तर खुलासा कराल का ?”
“ करते. आता यात काहीच लपवून ठेवण्यासारखे नाही.” मिसेस मणिरत्नम म्हणाली,पण ती थकल्या सारखी वाटत होती. “ माझं नाव मधुरा मणिरत्नम.मला माझ्या भावा शिवाय म्हणजे ध्रसित अलूरकर शिवाय कोणीही सख्खा नातलग नव्हता. ध्रसित हा नावा प्रमाणेच अत्यंत धाडसी होता.पण अतीच होता. त्याला पैशा शिवाय काहीही प्रिय नव्हते.आपले नातलग सुध्दा. त्याची मुलगी क्षिती ला मात्र माझा लळा होता पण तिने मला तिच्या खूप लहान पणी पाहिले होते. तिला माझा चेहेरा सुध्दा आठवत नसेल मोठी झाल्यावर. मला वाटतंय की या खटल्यात ती आरोपी आहे.वाईट वाटतंय मला की मी बघू शकत नाही तिला. तर, या चैत्राली आणि माझ्यात खूप साम्य होतं.तिने सुरुवातीला माझी नोकराणी म्हणून आणि नंतर मला अंधत्व आल्यावर माझी नर्स म्हणून माझी सेवा केली.मी आंधळी झाल्यावर मी तिला माझी तोतया म्हणून वावरण्यास सांगितलं. पण मी एकदम पुढे गेले सांगतानाच.मधल्या काही घटना गाळून.”
“ हरकत नाही , सावकाश आठवून सांगा.” पाणिनी म्हणाला.
एखादी रहस्य मय कथा ऐकावी किंवा सिनेमा पाहावा तशी कोर्टात शांतता होती. न्यायाधीश खुर्ची च्या टोकावर सरकून बसले होते.
“ मध्यंतरीच्या काही वर्षात माझे कुणाशीच संबंध नव्हते. भावाशी मी स्वतःहूनच कमी केले होते. अल्पावधीत मोठ्या फायद्याचे आमिष दाखवणाऱ्या आणि भोळ्या माणसाना लुटणाऱ्या त्याच्या फसव्या स्कीम चा मला कंटाळा आला होता. त्यात अडकलेले लोक मला माझ्या दारा पर्यंत यायला नको होते.याच दरम्यान माझं लग्न ग्लोसी कंपनीचा मालक जय मणिरत्नम याच्याशी झालं.तेव्हा ही कंपनी लहान होती.पण माझ्या नवऱ्याने , जय ने ती नावा रुपाला आणली,मोठी केली.तो गेला.त्याने माझ्या नावावर मोठी मिळकत आणि कंपनीचे शेअर्स करून ठेवले होते. पण त्याच्या जोडीने त्याने एक दुर्दैव माझ्या मागे लावून दिले होते, ते म्हणजे त्याचा मुलगा, स्वकुल मणिरत्नम. पहिल्या पत्नी पासून झालेला, जो सध्या कंपनीचा प्रमुख आहे. तो त्या पदाला अगदीच नालायक इसम आहे.माझ्या भावा सारखाच उधळा.लवकरच तो आमची कंपनी संपवेल. ” थोडं थकल्यामुळे तिने पाणी मागून घेतले.
“ अंधत्व आल्यामुळे मला बॅंक खाते चालवणे अशक्य होते.मी माझ्या कडचे शेअर्स आणि विशेषतः पैसे, मी घरातच ठेवायचा निर्णय घेतला.चैत्राली चिटणीस च्या मदतीने मी त्या घरातच पैसे दडवण्यासाठी जागा शोधली.मी पैसे ठेवायला किंवा काढायला त्या घरात अधून मधून जात असे. रात्री अपरात्री सुध्दा.अनेक वर्षं त्या घरी राहिल्यामुळे तिथला इंच अन् इंच मला पाठ आहे.रात्री अपरात्री सुद्धा मी जायची तिथे.अर्थात आम्हा आंधळ्यांना रात्र आणि दिवस सारखेच !”
“ क्षिती , तुला भुताटकी सारखे पाय वाजल्याचा भास व्हायचा तो हाच !” पाणिनी तिच्या कानात कुजबुजला.
“ त्या कालावधीत चैत्राली, माझी भूमिका जगत असतानाच , ग्रीष्म महाजन च्या प्रेमात पडली. विवाहित पण आधीच्या बायकोला, शेफाली ला घटस्फोट न देता त्याने चैत्रालीशी लग्न केलं.या मुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मला माझ्या भावाला , म्हणजे ध्रसित अलूरकर याला कळवावच लागलं की मी ग्रीष्म शी लग्न केलं म्हणून, कारण चैत्राली माझी तोतया असल्याने ती जे करेल ते मीच केलं असं होणार होत.”
मिसेस मणिरत्नम पुन्हा थोडी थांबली.
“ त्या नंतर माझा भाऊ आणि भावजय अपघातात गेले, ग्रीष्म ही क्रिकेट खेळताना गेला, त्याच्या कजाग बायकोने, शेफालीने सगळी इस्टेट हडप केली. मी चैत्राली ला सांगितलं की क्षिती ची आत्या,मधुरा महाजन, म्हणून तू क्षिती शी संपर्क कर आणि तिला इकडे बोलावून घे. मला बघायचं होत की क्षिती तिच्या बापाच्या वळणावर गेल्ये की तिचे पाय जमीनीवर आहेत.मी चैत्राली ला , क्षिती आल्या नंतर तिच्या समोर, माझी म्हणजे आत्या ची भूमिका कशी वठवायची याच्या सूचना दिल्या.सर्व काही ठीक चालल होत पण त्या कपाटात मोठी रोख रक्कम असल्याची बातमी बाहेर आली आणि मी अडचणीत आले. ”
“ स्वकुल मणिरत्नम, माझा सावत्र मुलगा, म्हणजे माझा नवरा जय मणिरत्नम च्या पहिल्या पत्नीचा मुलगा, त्याला माहीत होत की त्याच्या वडिलांनी कंपनीचे मोठया रकमेचे शेअर्स माझ्या नावे केले आहेत. ते शेअर्स त्याला हवे होते कारण कंपनीच्या संचालकांच्या निवडणुका आहेत.शिवाय माझ्या कडे रोख रक्कमही खूप आहे.माझ्या अंधत्वाचा फायदा घेऊन स्वकुल ने ती केव्हाच हडप केली असती. म्हणूनच मी स्वतः पडद्यामागे राहून माझी तोतया निर्माण केली त्यामुळे मी कुठे आहे ते स्वकुल ला माहीत नव्हते. त्याला वाटत होतं की मधुर महाजन म्हणून आयुष्य जगात असलेली चैत्राली चिटणीस , हिच्या कडेच ते शेअर्स आहेत.”
“ पण मग सगळी रोख रक्कम चैत्राली रहात असलेल्या घरात , म्हणजे तुमच्या घरात का ठेवलीत? तुम्ही सध्या रहात असलेल्या म्हणजे मीनल गोखले च्या शेजारी म्हणून रहात असलेल्या घरात का नाही ठेवली?” पाणिनी ने विचारलं.
“ कोण म्हणतं तिथे नाही ठेवली? ” मिसेस मणिरत्नम उद्गारली “ तिथेही काही आहेच.”
पाणिनी आणि खुद्द न्यायाधीशांनी ही तिचा हुशारीला दाद दिली.
“ ओह ! स्मार्ट! पुढे बोला.” पाणिनी म्हणाला.
“ माझे काही हित चिंतक कंपनीत आहेत, त्यांना ही स्वकुल नकोसा झालाय, त्यांनी मला कंपनीची अंतर्गत गोपनीय माहिती पुरवली. त्यासाठी मी अंध विक्रेती म्हणून कंपनीच्या आवारात स्टॉल टाकला.कंपनीच्या संचालक पदाच्या निवडणुका होत्या,त्यात स्वकुल ला बाहेर काढायचं मी ठरवलं होतं पण तो माझ्या अंदाजा पेक्षा हुशार निघाला, त्याने साहीर सामंत नावाच्या त्याच्या मित्राला हाताशी धरलं आणि मधुरा महाजन वर म्हणजे चैत्राली वर छाप पडायला सुरवात केली. मला हा डाव कळल्यावर मी चैत्रालीला सावध केलं होतं पण तिने ते ऐकलं नाही.तशी ती हट्टी होती.तिला वाटायचं मी उगाचच सामंत वर संशय घेत्ये.”
“ त्या चुकीचं प्रायश्चित्त तिला मिळालं, तिच्या डोक्यात बॅटरी चा फटका बसलाच !”
“ तो फटका कुणी मारला?” पाणिनी ने विचारलं.
“ मला नाव माहीत नाही,पण ज्याने मी धडपडावं म्हणून वाटेत वॉटर कुलर ठेवला, त्यानेच चैत्राली वर हल्ला केलं असेल.आम्हा आंधळ्यांना सरावाने कुठेही बिन दिक्कत जाता येतं पण अशी एखादी नवीन वस्तू वाटेत असेल तर सावरता येत नाही.त्या कुलर ला मी धडपडले आणि खाली काचा पडल्या,मी एका माणसाचा पळून जाताना आवाज ऐकला आणि नंतर दोन- तीन माणसांचं एकमेकांशी बोलणं ऐकलं. मला त्यामुळे लगेच निघायला लागणार होतं, मागच्या जिन्याने. मीनल तिथे माझी वाट बघत होती,गाडी घेऊन. पण चैत्रालीवर, म्हणजे मधुरा वर हल्ला झाला तेव्हा त्या घरी मी नव्हते.”
“दॅट्स ऑल.” पाणिनी म्हणाला.
मीनल गोखले ने तिला सावकाश पिंजऱ्या बाहेर यायला मदत केली.त्या दोघी पुन्हा मागच्या खुर्ची वर बसायला जात असतांना,क्षिती च्या जवळून गेल्या तेव्हा क्षिती चा गळा दाटून आला.
“ आत्या ! ” ती एकदम उद्गारली आणि तिला मिठी मारली.
न्यायाधीशांनी सुध्दा याला हरकत घेतली नाही,त्या दोघी आपल्या जाग्यावर बसल्यावर त्यांनी हळूवार हातोडा आपटला.
“ पुढे चालू करा.” ते म्हणाले.
“ मी हे सर्व लगेचच संपवून टाकतो, युअर ऑनर.” पाणिनी म्हणाला. “ इन्स्पे.तारकर ला मी माझा साक्षीदार म्हणून बोलावू इच्छितो.”
“ तारकर, तुला लक्षात नाही का आले, की ज्या माणसाने कुलर हलवला, त्याचे बोटांचे ठसे सर्व कुलर वर उमटले असतील म्हणून?”
तारकर पिंजऱ्यात आल्यावर पाणिनी ने विचारलं.
“ सुरुवातीला मी तिथे कमी पडलो.पण नंतर सर्व कुलर आम्ही तपासाला. पण फुटलेल्या काचेवर बोटांचे ठसे उमटल्याचं आम्हाला दिसून आलं.” पाणिनी ने विचारलं.

तुम्ही ते जतन करून ठेवले आहेत?”
“ अगदी उत्तम प्रकारे.काचेवर बोटांचे आहेत.पण कुलर वर अर्धवट पंज्याचे पण आहेत, म्हणजे ज्याने कुलर थोडासा उचलला, ओढत पुढे आणला, त्याचे. ” तारकर म्हणाला.
“ आता मला सांग, कुलर वरचे ठसे आणि बॅटरी वर सापडलेले ठसे जुळतात?” पाणिनी ने विचारलं.
“बॅटरी वर बऱ्याच जणांचे ठसे आहेत.क्षिती चे आहेतच शिवाय इतरांचे पण आहेत.” तारकर म्हणाला.
“ तसं नाही मला म्हणायचं, कुलर वर आणि बॅटरी वर समाईक असे काही ठसे आहेत की नाहीत?”-पाणिनी
“ आहेत पण ते कोणाचे आहेत ते नाही सांगता येत.”
“ पण तु हे सांगू शकतोस ना की बॅटरी वर आणि कुलर वर अशा दोन्ही ठिकाणी जे समाईक ठसे आहेत,ते आरोपी क्षिती चे नाहीत म्हणून?”-पाणिनी
“ नाहीत. तिचे नाहीत. तिचे फक्त बॅटरी वर आहेत.”-तारकर
“ दॅट्सऑल , इन्स्पेक्टर. ” पाणिनी म्हणाला.
पिंजरा सोडताना खांडेकरांनी संभ्रमित नजरेने तारकर कडे पाहिलं.
“ संपलेत तुमचे साक्षीदार?” खांडेकरांनी मधेच तोंड घालत विचारलं.
“ अत्ता तर सुरु झालेत.” पाणिनी फक्त त्यांनाच ऐकू जाईल असं म्हणाला.
“ युअर ऑनर, माझा पुढचा साक्षीदार हा बचावाचा असला तरी तो होस्टाईल विटनेस आहे, म्हणजे विरोधातील आहे.त्यामुळे त्याला थोडे आक्रमक आणि सूचक प्रश्न विचारावे लागणारेत.त्यासाठी आधीच परवानगी असावी.” पाणिनी म्हणाला.
“ कोण आहे हा साक्षीदार?” न्या. मंगरुळकर यांनी विचारलं.
“ चंद्रवदन विखारे.” पाणिनी म्हणाला.
“ बोलवा त्याला. त्याच्या विरोधीपणा बद्दल शंका येईल मला तेव्हा मी तुम्हाला निर्णय देईन त्या बद्दल.म्हणजे तुम्हाला हवंय तसं सरसकट आक्रमक प्रश्नाला माझी परवानगी नाही.” न्या. मंगरुळकर म्हणाले.
चंद्रवदन विखारे, म्हणजे पाणिनी जेव्हा ग्लोसी कंपनीच्या रिसेप्शनिस्ट शी बोलत असतांना तिथे आला होता , तो माणूस, साधारण देह यष्टी असलेला,परंतू जरा आक्रमक आणि आत्मविश्वास असणारा होता.त्याने शपथ घेतली आणि पाणिनी च्या प्रश्नांना उत्तर द्यायला सज्ज झाला.त्याच्या चेहेऱ्यावर एक खुन्नस असलेले भाव तरळले.
“ तू शेफाली महाजन चा मुलगा आहेस?” –पाणिनी
“ हो.”
“ शेफाली च्या पहिल्या पती पासून झालेला?”-पाणिनी
“ तुमचा प्रश्न म्हणजे,आमच्या कुटुंबाच्या खाजगी बाबीत हा हस्तक्षेप आहे, पण उत्तर ‘हो’ असं आहे.”
“स्वकुल मणिरत्नम शी तुझे काही व्यावसायिक संबंध आहेत?” &.
“ तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं आहे?” चंद्रवदन विखारे म्हणाला.
“ तुमच्या मधील व्यवसायाचा सविस्तर तपशील नकोय मला.मला माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ या स्वरूपात दे.”-पाणिनी.
“तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये.” विखारे पुन्हा म्हणाला.
पाणिनी ने सौम्या बसलेल्या टेबला वरून एक स्टील चं रायटिंग पॅड उचललं, त्या पॅड च्या चिमट्याला एक पत्र होतं. ते पाणिनी ने विखारे च्या हातात दिलं. त्याने ते हातात घेतलं.
“ हे , मी ग्रीष्म महाजन ला लिहिलेल्या पत्राची प्रत आहे.नीट वाच आणि मला सांग की ज्या पत्राची ही प्रत आहे, ते मूळ पत्र तू पाहिलं आहेस का?” &.
स्टील चं पॅड हातात घेऊन त्याला चिमट्याने अडकवलेल्या पात्राकडे नजर टाकत तो म्हणाला, “ या केस शी त्याचा काय संबंध आहे?”
“ मूळ पत्र तू बघितलं आहेस का एवढचं तुला विचारलं मी.” पाणिनी म्हणाला.
“ तुमचा प्रश्न कळलाय मला, माझा प्रश्न तुम्हाला कळला नाहीये.मी विचारलं की या केस शी या पत्राचा संबंध आहे का?”
“ मी तो कोर्टाला नंतर दाखवून देईन. तू प्रश्नाचं उत्तर दे.”
चंद्रवदन विखारे जरा घुटमळला. मग जरा मनाचा निग्रह करत म्हणाला, “ ठीक आहे, बघितलं होत मी हे पत्र. आई ते बघून खूप एक्साईट झाली होती, मी तिला समजावलं की हा आपल्यासाठी सापळा आहे,कारण माझी खात्री होती की ग्रीष्म महाजन ला तुम्ही ओळख नव्हतात.तुमची कधी भेट सुध्दा झाली नसेल.तो कशाला येईल तुमचा सल्ला घ्यायला? ” साक्षीदार उद्गारला आणि त्याने रागाने ते स्टील चं रायटिंग पॅड फेकून दिलं.
“ तुमच्या सहकार्याबद्दल आभार मिस्टर विखारे.” पाणिनी म्हणाला आणि त्याने खाली पडलेलं पॅड हातात रुमाल घेऊन अगदी कडेला बोटाने चिमटीत धरून उचललं. खांडेकर वकीलांच्या समोर इन्स्पे.तारकर बसला होता त्याच्या दिशेने पाणिनी चालत गेला,आणि एका खाकी कागदाच्या मोठया पाकिटात ते स्टील चे पॅड टाकून तारकर कडे दिलं.
“ तारकर, या स्टील च्या पॅड वर चंद्रवदन विखारेचे तळ हाताचे आणि बोटाचे ठसे अत्ता उमटलेत. हे ठसे तू कुलर वरच्या आणि तुटलेल्या काचे वरच्या आणि त्याच बरोबर ज्या बॅटरी ने चैत्राली उर्फ मधुरावर हल्ला झाला .त्यावर उठलेल्या ठशांशी, जुळवून पहा. तू उत्तरा पर्यंत पोचशील तारकर ! ” पाणिनी उद्गारला आणि खाली बसला. त्याच्या म्हणण्याचा अर्थ लक्षात यायला विखारेला एकच क्षण लागला आणि त्याच क्षणी खांडेकरांनी विखारे कडे पाहिलं. पटकन ते उठून उभे राहिले.
“ युअर ऑनर, ही तपासणी होई पर्यंत, कोर्टाचं कामकाज अर्धा तस थांबवूया का?” त्यांनी विचारलं.
“ अगदी , आपण थांबू.” न्यायाधीश म्हणाले.
विखारे पिंजऱ्यातून बाहेर पडला आणि कोर्टाच्या दाराकडे जाऊ लागला.खांडेकरांनी पाणिनी कडे पाहिलं.पाणिनी ने नकारार्थी मान हलवली.
“”पळून जाणं हा गुन्हा केल्याचा पुरावा समजाला जातो.या माणसाची मानसिकता अशी आहे की तो पळून जायचा प्रयत्न करेलच.या शहराच्या बाहेर जाताना त्याला पकडा म्हणजे तुम्हाला त्याच्या विरुध्द अधिक बळकट पुरावा मिळाला म्हणून केस दाखल करता येईल.
“ पाणिनी, ” प्रथमच खांडेकर त्याला एकेरी उल्लेख करून म्हणाले. “ तुझा अंदाज जर खरा ठरला, विखारे बद्दलचा, तर तू खटला जिंकलास म्हणून मी तुझ्यावर जळणार नाही.”
“ माझा अंदाज बरोबर आहे.” पाणिनी म्हणाला
(१७ समाप्त)