"मलाही लिहिता येते पण वेळच मिळत नाही' असं एखाद्या माणसानं म्हटलं की, तो धादांत खोटा बोलतो असे समजावे. कंड असला की, माणूस वेळ काढतोच.. मग त्याला योग्य वातावरण लागत नाही, मूड लागत नाही.
जनार्दन गव्हाळे हे अशाच बिझी लेखकापैकी एक आहेत. ते मूळचे पत्रकार आहेत. पत्रकाराचे जीवन हे ढोरडॉक्टरसारखे असते. फोन आला की चालले..अॉफिसात गेल्यावर बातम्या लिहा..टाईप करा.. आलेल्या बातम्या एडिट करा, पानं लावा.. अशाही घोरात त्यांनी 'आंबेटाकळीची आमराई' हे आठवणींचं पुस्तक लिहून काढलं. या पुस्तकात बालपणीच्या आठवणी आहेत. आपल्या सब कॉन्शीयस माईंडमधून त्यांनी हुडकून काढल्या. ह्या आठवणी म्हणजे काही फुसाळ्या नाहीत, तर जे अनुभवलं..जे भोगलं ते शब्दात मांडलं. जी माणसं जीवनात आली ती शेंड्यापासून बुळखापर्यंत रेखाटली.
लेखकाची भाषा लाईव्ह आहे. तिला वऱ्हाडीचा टच आहे. ती भाषा पोटातून ओठात आली आहे. बालपणीचं वर्णन करताना ते लिहितात, "लहानपन म्हटलं की काहीच सूत नसते..भंटोलासारखं नद्यानाल्यातून..कुपाकाट्यातून हिंडत राह्यने हाच धंदा असते..त्यावेळी शेंबळाची वान नव्हती..कोनत्याही पोराच्या नाकपुळ्या हाऊसफूल राह्यत..काहीच्या नाकाची गळती वरखाली सुरुच राहे..याले आमच्याकडे लोयती म्हनतात..'
गव्हाळे हे वाचकाला...खळ्यागोट्यातून..या मेरीहून त्या मेरीलोक फिरवून आणतात.लहानपनीचे खेळ...घनगळी..पाटगाळं..इटीदांडू..चोरपोलीस..आबाधुबी..चिलीपाट यासारख्या लुप्त होणाऱ्या खेळाची उजळणी करून देतात. त्या काळात भेटलेल्या अफलातून व्यक्तीरेखा..त्यांचे संवाद हसवता हसवता अंतर्मुख करतात.. गावात मोतीरामबुवाच्या पोरीचे लग्न असते, लग्नात सिऱ्याची पंगत करतात. गरिबाच्या घरचा सिरा म्हणजे साधासुधा..तेलाचा..! पंगत झाल्यावर नवरदेवाकडचा एक पाव्हना चारचौघात म्हणतो, "पंगत काही जमली नाही..सिरा काही खास नोता..असा सिरा तं आम्ही बैलाले खाऊ घालतो' हे ऐकून नवरीच्या बापाची बाजू घेत भगवान आबा म्हणाले, "मंग तं राज्या तुमचे बैलं गोड पादत असतीन.' हे रोकठोक उत्तर ऐकून पाव्हण्याची बोलतीच बंद झाली.
ह्याच भगवान आबाची नात सकाळी चहा न घेता शाळेत जाते..आबाला ते कळते..मग आबा डब्यात चहा घेऊन शाळेत जातात..तिला वर्गातून बाहेर बोलावतात. ओट्यावर बसून चहा पाजतात. अशी जिव्हाळ्याची माणसं या पुस्तकात भेटतात. चंदनशेख आंगात आणणारा तुळशीरामबुवा, कामचुकार सोनाबुवा..ही माणसं तर अजब आहेत. बोंडाची भाजी करताना "कशी जयली'..हे प्रकरण वाचताना हसून दम लागते.
लेखकाने पानापानावर वऱ्हाडी शब्दांची पेरणी केली. इतकेच नाही तर लुप्त होणाऱ्या शब्दाचा अर्थही सांगितला.. जसे कळोन..डुंगं..वरतं..खालतं..ठावा..व्हलगं..
गव्हाळे यांनी सिलेक्टेड आठवणी शोधून काढल्या. पानं भरवायचे म्हणून काहीही लिहिणारे अनेक लेखक मी पाहिले. गव्हाळेंनी अनुभवातून मोजकंच निवडलं..अन् तेच ताटात वाढलं..उदाहरण द्यायचे झाल्यास..त्या काळात लग्नप्रसंगी भोंग्यातून आऊट करत.. "जनार्दन गव्हाळे कुठेही असल्यास त्यांनी ताबडतोब लग्नमंडपात येण्याचे करावे..' ज्याचं नाव भोंग्यात आऊट झालं, त्याच्या आंगावर मुठभर मास चढत असे. गव्हाळे यांना निवेदन खास जमते. बोलके संवाद लिहिता येतात. सुरुवात अन् शेवटही चांगला जमतो..याचा अर्थ त्यांच्यात कथाकार लपला आहे. भविष्यात त्यांनी कथा, कादंबरी हा प्रकार हाताळला तर वऱ्हाडी साहित्याला एक कसदार लेखक मिळेल ..हीच अपेक्षा..!
- नरेंद्र इंगळे, (गुल्लेरकार) सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक,
श्रीकृपा कॉलनी, आकोट जि.अकोला.
आंबेटाकळीची आमराई
लिहिण्यासारखे महत्त्वाचे असे काही नाही. त्यामुळे काय लिहावं. आपण जे काही लिहिले ते दर्जेदार नसल्यामुळे कोण वाचणार? म्हणून आपल्याले काही लिहिता येत नाही बुवा, म्हणत काही लिहायचे नाही, असे ठरवले. ‘बरे जे कोणी लोक काहीतरी लिहीत असतात. ते तरी इतरांचा विचार करतात का? जे काही मनात आहे, ते कागदावर उमटवतात. कोणाला पटो, ना पटो, लिहिले पाहिजे. आपल्या भावना मनमोकळेपणाने व्यक्त करण्याचं हे उत्तम व्यासपीठ आहे. साधन आहे. मनसोक्त लिहून काढले की, मन हलकं होते. मोकळे होते. दुसरे म्हणजे आनंदही मिळतो. समाधानही मिळते. इतरांना आपले लिखाण निरर्थक वाटत असेल, पण एखादे पुस्तक लिहिले तरच जीवनाचे सार्थक झाले असे मानणारेही खूप आहेत. जगात इतकी पुस्तके आहेत, तरीही लिहिणारे थांबलेले नाहीत. त्यामुळे दररोज आठ- दहा पाने लिहायलाच पाहिजे. आपल्याजवळ महत्त्वाचा किंवा मोठा विषय नसला तरी काही ना काही लिहा. बारीक-सारीक, छोटे मोठे अनुभव लिहून काढा’. असा सल्ला ख्यातनाम वऱ्हाडी साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांनी मला दिला.
विशेष म्हणजे, माझी त्यांची भेट नाही. फक्त फोनवर बोलणं झालं. माझा स्वभाव ओळखून त्यांनी मोठा भाऊ म्हणून हक्काने सांगितले. आपल्या गावात लहानपणातल्या घडलेल्या ज्या काही घटना, किस्से आठवले, ते इथे मांडले. इतरांच्या दृष्टीने ते क्षुल्लक असतील, निरर्थक असतील. पण माझ्या दृष्टीने ह्या आठवणीतील गोष्टी लाखमोलाच्याच आहेत. हे लिहितांना बराच वेळ गेला असलातरी पुस्तक वाचून जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला, वाचकाला माझा स्वभाव कळाला, ओळख झाली, आणि आपलेसे वाटले तर या व्यर्थ, निरर्थक लिखाणाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल. मला जे काही म्हणावयाचे आहे, ते या पुस्तकात आहे. त्यानुसार लिहीत असताना इतर राहून गेलेेले बारीक सारीक मुद्दे कशाला सोडावं, असे म्हणत तेही यात घुसळून दिले आहेत. यातूनच ‘आंबेटाकळीची आमराई’ हे पुस्तक कागदावर उतरले. जे हाय ते हाय.
नंतर माझी पत्नी सौ. ज्योती हिने वेळात वेळ काढून घरीच मजकूर टाईप करून दिला. लहान मुलगा सौरभने त्यात काही करेक्शन केले. आणि आमचे मित्र शेगावचे श्री ब्रीजकिशोर अवस्थी यांनी छपाईयोग्य फाॅन्ट चेंज करून दिले. तर श्री विजय देशमुुख यांनी पीडीएफ बनवून दिले. त्यानंतर हे पुस्तक पूर्णत्वास आले आहे. आपल्याला कशी वाटली ‘आंबेटाकळीची आमराई'? हे नक्की कळवा. बरं का?
- जनार्दन गोविंदा गव्हाळे
चांदमारी फैल, खामगाव,
जि.बुलढाणा (विदर्भ)
संपर्क - ९१६८१४७०८०
टिप : या पुस्तकातील प्रसंग आणि पात्र काल्पनिक आहेत, साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा. कुणाचेही मन दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही.
.................
मी ज्यांना नावानिशी १९९५ पासून ओळखतो, असे वऱ्हाडी साहित्यिक मेड इन इंडिया कादंबरीचे लेखक तसेच दैनिक देशोन्नतीमध्ये ज्यांनी सतत १३ वर्षे ‘होबासकी उर्फ बांड्या पंचायती’ हे सदर चालविले, असे मा. पुरुषोत्तमभाऊ बोरकर यांचा २२ नोव्हेंबर २०१६ ला दुपारी अचानक फोन आला. प्रत्यक्ष ओळख नाही, अगोदर कधी भेट नाही, गोठ नाही आणि एवढ्या मोठ्या माणसानं आपल्याले फोन करावं. याचं नवलंच वाटलं. मग मी माझा परिचय देण्यास सुरुवात केली. म्हटलं ‘सर, मी देशोन्नतीत येणाऱ्या तुमच्या ‘होबासकी उर्फ बांड्या पंचायती’चा सुरुवातीपासून फॅन आहे. त्यातले तिरमखभाऊ; पंजाब, नथ्थु हे पात्र आपल्या खेड्यातले अस्सल नमुने तुम्ही वाचकांसमोर सादर केले. त्याच्यामुळे तुमची ओळख सांगायचं कामच नाही. फक्त आपली भेट झाली नाही एवढंच’. बरेचदा मनाले वाटे की, पुरुषोत्तमभाऊ बोरकर कोणते आहेत? अजून आपण पाह्यले नाहीत.
मागं मी आकोटले होतो, तेव्हा आपले विनोदी, ग्रामीण, वऱ्हाडी साहित्यिक गुल्लेरवाले नरेंद्रभाऊ इंगळेंनी बोलता बोलता सांगितलं होतं की, ‘तो आता पुण्याले असते’. मले अचंबा वाटला, एवढा मोठा माणूस, अन हे इंगळेसाहेब त्याहिले एकेरी नावाने उच्चारतात. मग त्यांच्यातील नात्याचा, संबंधाचा मला आपोआप अंदाज आला होता. आणि अशातच आता अचानक पुरुषोत्तमभाऊंचा फोन आल्याने मी आणखी विचारपूस केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘माझी सासरवाडी खामगाव आहे. पत्नीची तब्येत बरोबर नसल्याने आम्ही सासरवाडीलाच राहायला आलो आहे. सुटाळ्यात १५ लाखाचं घर बांधलं असून चरित्र लेखनाचे काम सुरू असते. आयुष्यभर दुसऱ्याची नोकरी केल्यापेक्षा आपला स्वत:चा छोटा मोठा उद्योग बरा. मी प्रकाशनही सुरू केले आहे. आपल्या मेड इन इंडिया, १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी आणि आमदार निवास रुम नं.१७५६ ह्या तीन कादंबऱ्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजल्या आहेत. आतापर्यंत मी ४२ वर्षात ४४ पुस्तके लिहिली आहेत. माझे पुण्या-मुंबईतील बरेच प्रकाशक ओळखीचे आहेत. तुम्हीही अनेक वर्षापासून पत्रकारितेत आहा. पूर्वी कुठे होते. आता कुठे असता? ‘याची आस्थेनं चौकशी केली.
इकडून म्हटले, ‘मीही खामगावचाच आहे सर. आणि माझं प्रॉपर गाव आंबेटाकळी आहे’. त्यावर त्यांच्या डोक्यात एकदम विचार आले आणि सूचवले. ‘तुम्ही ‘आंबेटाकळीची आमराई’ या नावाने एखादे पुस्तक लिहा. ते आपण पुण्या, मुंबईच्या चांगल्या प्रकाशकाकडून छापून घेऊ.’ मी म्हटले, ‘आपल्याले कसं काय ज्यमीनं, त्याच्यात काय लिहावं हेही समजतं नाही. आपण एखादेवेळी प्रत्यक्ष भेटू. तेव्हा करू सुरुवात’. तर ते म्हणाले, ‘कशाले भेटा लागते हो, एवढे तर आपण जवळचे आहो. आपल्याच भागातले आणि वऱ्हाडी भाषा बोलणारे आहो. करा आजपासूनच सुरुवात. रोज चार पाने झाले पाहिजेत’. असे म्हणून त्यांनी फोन ठेवला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच पुरुषोत्तमभाऊ बोरकर यांचा फोन आला. ‘केली की नाही लिहायला सुरुवात?’ मी घाबरत ‘नाही’ म्हटले, ‘काय लिहावं? सूचलचं नाही’. त्यावर ते म्हणाले, ‘तुमच्यासारख्या पत्रकाराले लिहायले कुठे विषय पाहिजे काहो ? आंबेटाकळीच्या लहानपणीच्या आठवणी लिहा, तुम्ही नदीत मासोया पकड्याले, खेकडे पकड्याले गेले असानं. आंब्याच्या झाडावर डाबडुबली खेळले असान की नाही?’ अशा आठवणी लिहून काढा अन् त्या पुस्तकाले नाव द्या ‘‘आंबेटाकळीची आमराई’’.
तेव्हा मी औरंगाबादच्या दिव्य मराठी कार्यालयात असल्याने कॉट बेसिकवर रुम करून राहायचो. सिडको एन ५ मधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रुमवर मी १० डिसेंबर २०१६ रोजी मा. बोरकरसाहेबांच्या आग्रहाखातर आमच्या गावातील लहानपणीच्या आठवणी लिहिण्यास सुरुवात केली आणि लवकरच ‘‘आंबेटाकळीची आमराई’’ लिहून मोकळा झालो.
मी काही फार मोठा माणूस नाही आणि आपले गावातही काही जास्त दिवस राहिलो नाही. बालपणातील ६ वर्षे आणि पहिली ते सातवी पर्यंतचे ७ वर्षे असे जवळपास १३ वर्षेच आंबेटाकळीत राहिलो. सध्या आमच्या गावात गेलो तर काळं कुत्रंबी मले ओळखणार नाही, अशी गत आहे. काही मोजकेच म्हणजे नात्यागोत्यातले, जातीवाले आणि वर्गात बरोबर शिकलेले या तीन कॅटेगिरीतील लोकच मला ओळखतात. जे काही ओळखत होते, त्याच्यातले बरेच जण खसकले आहेत. बाकीच्यांना एवढंच माहीत आहे की, आपल्या गावच्या गव्हाळे कंडक्टरचा जनार्दन नावाचा मोठा पोरगा ‘पत्रकार’ आहे. बस्स.
बरं असं असतानाही, आमचे आत्याभाऊ भिकाजी उंबरकार यांनी आपल्याले मोठा मान दिला. त्यांची मोठी मुलगी कु. मीनाचे लग्न आंबेटाकळीत झाले. त्या लग्नाच्या पत्रिकेवर त्यांनी अन्य प्रतिष्ठितांची नावे सोडून प्रेषक म्हणून माझेच नाव छापले होते. हे काय माझ्यासाठी कमी झाले. राजेहो.
..............
आपल्या विदर्भातील ३-४ जिल्ह्यात म्हणजे संपूर्ण वऱ्हाडात साधारण १२ टाकया अन् १३ हिंगणे आहेत. गावाच्या नावाबद्दल आबा सांगत की, टाकळी आणि हिंगणा या नावाची बरीच गावे आहेत. ही गावे कुठेही सापडतात. पण आंबेटाकळी मात्र आपल्या भागात एकच आहे. त्यामुळे आंबेटाकळी गावाचा अन् नावाचा आपल्याले फारच अभिमान. गावाच्या नावात आंबे आहे, त्याप्रमाणेच आमच्या शिवारातही चहुबाजुनं आंब्याच्या आमराई होत्या. म्हणजे ज्या ठिकाणी नुसती आंब्याचीच झाडे आहेत, त्याले आमराई म्हणतात. बहुतेक त्याकाळात आमराया जास्त असतीन म्हणून आमच्या गावाचं नावंही आंबेटाकळी पडलं असावं. हे झालं शुद्ध भाषेतलं नाव.
मात्र बोली भाषेत म्हणा की, अडाणीपणामुळे म्हणा, त्याकाळात आंबेटाकळी असा उच्चार कुणी करत नव्हते. आजूबाजूच्या लाखनवाडा, शिरला, बोरी अडगाव, पळशी, कंचनपूर, गवंढाळा, आसा दुधा, बोथाकाजी, पिंपळखुटा, वाहाळा, शहापूर, अटाळी येथील लोकं आपल्या वऱ्हाडी भाषेत ‘आंबेटाकी’ असाच उच्चार करायचे, अजूनही खेड्यातले बरेच लोकं बोलतांना आंबेटाकीच म्हणतात. पण आता परिस्थिती बदलली. साक्षरतेचं प्रमाण, दळण वळणाची साधने वाढले. आता बहुतेक लोकं ‘आंबेटाकळी’ असे म्हणताना दिसतात. काळाच्या ओघात गावाच्या नावातही सुधारणा झाली आहे. एवढं तरी आमच्या गावानं कमावलं.
पूर्वी म्हणजे, मी लहान असताना आंबेटाकळी लोकसंख्या १३००.. असा एक लहानसा बोर्ड खामगाव ते मेहकर मार्गावर गावाच्या पश्चिमेस आणि फाट्यापासून शिरल्याच्या दिशेने आसा रस्त्यावर लटकत होता. त्यामुळे आमचे गाव कोणत्या दिशेने आहे, हे कळत नव्हते. एवढे झाडं नि झुडपं होती. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना गावाबद्दल नव्हे तर फाटाच माहिती असायचा. आता त्याठिकाणी रस्त्यावर स्वागत कमान उभारण्यात आली आहे, आजूबाजूला दोन पेट्रोल पंप आहेत. वर्दळ वाढली. त्यामुळे गाव कुठे आहे. केवढे आहे, याचा इतरांना अंदाज घेता येतो.
खामगाव तालुक्यात असलेले हे छोटसं गाव तोरणा नदीच्या काठावर वसलेलं आहे. तोरणवाडा येथून उगम पावते, म्हणून तोरणा हे नदीचे नाव पडले असावे. नदी जास्त लांबीची नाही. पश्चिमेकड़ील लाखनवाडा, दुधा, आसा गावाजवळून आलेली नदी कंचनपूर, वाहाळा आणि शहापुरात मन नदीला मिळते. म्हणजे आमच्या नदीची लांबी ३९ किमी पेक्षा जास्त नसेल. पण पूर आले की, कंचनपूरसारखं गाव वाहून नेते. पुढे ही मन नदी पूर्णा नदीला मिळते, तर पश्चिमेकडे वाहणारी पूर्णा पुढे जळगाव जिल्ह्यात तापीला व नंतर अरबी समुद्राला मिळते.
आमच्या तोरणा नदीचं वैशिष्टे फारच वेगळे आहे. नदीत रेती म्हणून नाहीच, नुसतेच ‘टोयगोटे’ म्हणजे मोठमोठे दगडं आहेत. या दगडांचा फायदा असा की, गावातली बहुतांश जुनी घरे या दगडांनीच बांधलेली आहेत. मंदिराजवळ पश्चिमेला गावाच्या संरक्षणासाठी संत नारायण महाराजांनी दगडांचीच भिंत बांधून ठेवलेली आहे. पुराचे पाणी या भिंतीमुळे गावात अजून शिरले नाही आणि याच्यापेक्षाही या दगडांचा मोठा फायदा म्हणजे ‘डरने का नाम नही’ या गावातले लोकं निडर आहेत. त्यांना कधीच कशाची भीती वाटत नाही. त्याचं कारण हे नदीतले ‘दगडधोंडे’ भांडणात वापरल्या जातात. कुऱ्हाड, विळा, लाठी-काठी वापरण्याचे कामच नाही. पायाखाली दगड हजरच असतो. फक्त खाली वाकायची देरी आहे. नाही, हा गमतीचा भाग असला तरी तिकडचे पूर्णा काठचे लोक आमच्या नदीच्या पात्रातून सरके चालूही शकत नाही, असा अनुभव आहे.
तोरणा नदी आमच्या गावाशेजारून सूर्यातय वाहते. म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे गावातले लोकं पश्चिम दिशेला ‘वरतं’ आणि पूर्व दिशेला ‘खालतं’ म्हणतात. अन उत्तर-दक्षिणेला ‘डोंगरतय’ संबोधतात. गावाच्या दक्षिण दिशेला अजिंठा डोंगराची रांग असल्याने ‘डोंगरमुखे’ ही म्हणतात. यंदा वावर कसं पेरलं. तर सूर्यातय किंवा मग डोंगरमुखे अशी सांगायची भाषा आहे. गावाच्या खालतल्ली जमीन चांगली काळीशार, सुपीक आहे. याच शिवारात आमराया जास्त होत्या. त्यातल्या मोजक्याच आता उरल्या आहेत. चांदण्याची आमराई, महालेची आमराई अन् आप्पाची आमराई, बाकी आंब्याचे झाडं उरले नाही की खोड नाही. वानराच्या त्रासानं बऱ्याच शेतकऱ्यांनी आंब्याची मोठमोठी झाडे तोडली, कापली, विकली. काही लोक दरवर्षी आंब्याच्या झाडाचा छाट काढतात. फांद्या तोडून इंधनाच्या गंज्या, रांगा लावतात. पण ज्यांनी बुडापासून झाडे कापून लाकडे बेपाऱ्यांना विकली, त्यांनी एकदाच बक्कळ पैसा कमवला, अन गावरानं आंब्याची चव गमावून बसले, अशातले आम्ही आहो.
रेडिओवरून तेव्हा एक गाणं ऐकायला यायचं, ‘‘आरं ये, ये अमराईत शिरू, जरा बसून गंमत करू.’’ त्याची आठवण आता झाली. त्यावेळी आमच्या शिवच्या वावरात आमराई होती. बोरी अडगाव शिवारात आणि एकदम गावाच्या सिमेवर असलेल्या या वावरात आमच्या गावातला मजूर यायला तयार नसे, जाण्या- येण्यासाठी धड रस्ता नाही, गाडरस्ता आहे तर गवंढाळा फाट्यावरील चौफुलीपासून खाल्तं. म्हणजे फेराच फेरा, मग घरच्यांनाच टोले घ्यावे लागत. वावरात रिकामं जाऊन येणं म्हणजे पुरी तल्लफच होई. या वावरात आंब्याचे चांगले सात-आठ झाडं होते. त्यातले एक शेताच्या मध्यभागी काळीच्या माथ्यावर, एक अलिकडच्या धुऱ्याजवळ आणि पाच झाडं एकाजुटीनं दोन एकराच्या खालच्या डुंग्यात होते. हे ‘डुंगं’ म्हणजे चांगल्या शेतापासून हलक्या दर्जाचा दोन एकराचा वेगळा केलेला तुकडा, त्यातले हे पाच झाडं पाच रंगाचे, त्यांच्या फळांची चवही एकदम वेगवेगळी, आणि त्या झाडांची नावेही वेगवेगळी ठेवलेली. गाडग्या, गोंगली, शेंदऱ्या, गोलटी, मिठ्या अशी होती. या आमराईतल्या झाडांचं एक वैशिष्ट्ये म्हणजे दरवर्षी फक्त यातील एकाच झाडाला चांगला बार येत होता. गुढीपाडव्याच्या वेळेस मोहोर सर्वांनाचा लागायचा, पण तो काही कारणामुळे गळून जायचा. जे झाड चांगले येई, त्यावर मिठ्ठूपासून माकडांचा हमला सुरू असायचा. अन् ढोरावाले, चाऱ्यावाले हेही दगड गोटे मारून दणके घेत. आंबे पिक्याच्या अगोदर आंबट कैऱ्यांची चव सगळ्यांनाच चाखावीशी वाटे, गावापासून वावर दूर, रखवालीले कोणी नाही, मंग काय चोराईचेच राज्य, या सगळ्यांच्या तावडीतून जे सापडले, आपल्या हाती आले ते फळं आपले. त्यातही पाडाचे आंबे खाण्यासाठी वावरात काम करणारे मजूर तडफड करायचे. झकोला देऊन घोयात, वटीत दोन-चार आंबे घरी घेऊनच जायाचे. आंब्याचा फुलोर संपला, मोहोर गळला की, कैऱ्या खाण्यासाठी आम्ही झाडावर चढायचो. झाडाच्या पायथ्याशी एक पाय ठेवून दुसरा एका कोनाड्यासारख्या कोपऱ्यात ठेवायचो. खाली उभा असलेला एक जण ढुंगणाला टेका देत वर फांदीवर चढवून द्यायचा. या डांगीहून त्या डांगीवर, खोडाले धरून कैऱ्या तोडायच्या. आंबट कच्च्या कैऱ्या चड्डीच्या अन मनिल्याच्या खिशात ठेवायच्या. नंतर व्हायचा डाबडुबलीचा खेळ सुरू. अंबादास, साहेबराव, नंद्या, सुरशा, गणेश, इशा (विश्वनाथ) एका फांदीवरुन जसे माकड उड्या मारतात तशा उड्या मारत उन्हाच्या टाईमाले डाबडुबलीचा खेळ खेळत होतो. काही खेळ जमिनीवर खेळल्या जातात. काही हवेत खेळल्या जातात, काही मोबाइलमध्ये काही व्हीडीओ गेममध्ये खेळल्या जातात. पण आमचा हा खेळ वावरात आणि झाडावर चालत असे. कैऱ्या जशा मोठ्या होऊ लागल्या तशा भाकरीसंग खायाची मजा येई.
त्यात कमाल म्हणजे त्या कैऱ्या मस्तपैकी कापायच्या. त्याच्या फोडी, फाका करायच्या, धुवून घेतल्या की, त्यावर मीठ टाकायचे आणि कागदात गुंडाळून एकमेकांना खायला द्यायच्या. हा कागद बाहेरून ओला झालेला दिसत असल्याने त्याच्यात गरमी जिलेबी तर नसावी, असे वाटे. यामुळे त्या कैऱ्यातील आंबटपणा जाऊन त्यात गोडवा यायचा. कोणी भाकरीसंग खात असे तर कोणी निस्त्या. या कैऱ्याचा दुसरा उपयोग म्हणजे रायती घालण्यासाठी, रायती म्हणजे लोणच तयार करण्यासाठी होत होता. यावर्षीचं लोणंच पुढच्या वर्षापर्यंत आमच्या घरी असायचे. पण आत्याच्या गावाकडे अशा आमराई नव्हत्या. एक आत्या शेगावच्या इकडून चिंचोली येथे तर दुसरी तिकडून कवठा बहादुऱ्यात. एकही गाव रोडवर नाही. रस्त्यापासून दूरच. त्यामुळे फाट्यावर उतरा, टोले घेत पायदल जावा. मग उन्हाळ्यात आबाची घाई चालायची, कैऱ्या नेण्यासाठी मोजमाप, सुरू व्हायचे.
आमच्या गावात तेव्हा फाळानं आंबे मोजल्या जात. एका फाळात ६ आंबे असायचे. मंग एक-दोन फाळ एका आत्याच्या घरी, एकदोन फाळ दुसऱ्या आत्याच्या घरी नेण्यासाठी पोतड्या बांधायच्या, त्या पोतड्यात दगड आहेत की कैऱ्या हे आपल्याले डोक्यावरच्या ओझ्यावरुनच समजत होते. आणि आमच्या गावचा स्टॉपही जवळ नाही. नदीतून चालाले डोक्यावर ओझं घेऊन, इकडून तिकडून एस.टी.त चढवलेले आंबे घेत आबासोबत चिंचोलीला उतरायचे. उरलेले आंबे घेऊन कवठ्याला जायाचे. तर त्यासाठी लोहारा येथे उतरून २ मैल पायदळ जायचे. असा हा आंब्याच्या कैरीचा अन् नंतर पिकलेल्या आंब्याचा प्रवास सुरू राहायचा. झाडाच्या कैºया पिकायला लागल्या की, पाडाचा आंबा (शाक) खाण्यासाठी धडपड सुरू व्हायची. आंबा पाडी आला म्हणजे उतरण्याची घाई, ते खुळी, पोते, बकेटा दोन-तीन गडी माणसं, सारा ताफा वावरात असे. पुढे पुढे आंबा राखणीसाठी आम्ही बटाईने देत होतो. मंग अर्धे तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही अशी गत होत होती. काही नसलं तरी चालीनं, पण आंब्याचा रस अन् आंब्यांच्या रसासाठी लेकीबाईचे माहेरी जाणे येणे सुरू असायचे. आमच्या घरात उन्हायात निरा आंब्याचा सुगंध दरवळत असे. शिंदीच्या डाल्यात, जमिनीवर पोते अंथरून गवतात आंब्याची जवणी घालत, जवणी म्हणजे आंबे पिकू घालणे. आता जवणीची जागा कारपेटने घेतली आहे. आम्हाले आंबे पिकेपर्यंत सबुरी, धीर नसायचा, एक-एक उचलून अख्खं डालकं रिकामं करायचो. आत्याचे-मामाचे मुलं-मुली यायचे. घरासमोर नुसता आठोया म्हणजे कोया-गुठल्या अन् आंब्याचे सालटं पडलेले असायचे. आणि पावसाळ्यात त्या उकिरड्यावर आंब्याचे छोटे झाड उगवायचे. त्या कलमाची आठोई दगडावर घासून त्याची पुंगी बनवून आवाज काढायचे. खेळ चालू असत.
पण कालांतराने फळ येणारे ते झाडंही तोडून टाकले. अन ते शीचं वावरंही बुढ्यानं इकून टाकलं. आमच्याकडे वडिलांना बुडा म्हणतात. येथे आबाले बुडा म्हटले आहे. आता आबाही गेले अन् शीच्या वावरातले आंबेही. उरल्या फक्त आठवणी.
.....................
असं म्हटल्या जाते की, लहान मूल पाचव्या वर्षी समजदार होते. त्याच्या मेंदूची वाढ वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत पूर्ण होते. ग्रामीण भाषेत सांगायचे झाल्यास, ‘कानाला हात पुरतात काय?’ पूर्वी शाळेत नाव टाकण्यापूर्वी गुरुजी पालकांना भेटायचे. ‘तुमच्या बाळाला शाळेत टाका नां. मग कानाले हात पूरवून दाखव’. त्यावेळी वयाची एकच परीक्षा घेतली जायची. डोक्यावरुन स्वतःच्या कानाला हात पुरवून दाखवणे, समजा हात पुरला नाही तर त्याचे नाव टाकता येणार नाही. अशी ढोबळ व्याख्या वयाचा अंदाज बांधण्यासाठी करण्यात येत होती. बरं ते जाऊ द्या, म्हणायचं हे होतं की, माणसाला वयाच्या कोणत्या वर्षापासून समजू लागते? याचं उत्तर शोधायचे म्हटल्यास ते व्यक्तीपरत्वे वेगवेगळे असू शकते. परंतु वयाच्या अडीच वर्षापासून आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचे होत असलेले आघात मोठे झाल्यावरही आपल्याला आठवतात. काहींना काल सकाळी कशाची भाजी खाल्ली, हे आठवत नाही. पण वयाच्या साठाव्या वर्षी काही लोक आपल्या बालपणात लहान असताना कसे अनुभव आले होते याचे वर्णन करतांना आढळतात. त्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांची स्मृती ८४ व्या वर्षीही उल्लेख करण्यासारखीच आहे. विशेष हे की, घटना आठवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे वारंवारता. घडलेल्या घटनेचे स्मरण करुन देणारी एखादी व्यक्ती जिवंत असेल, चालता बोलतांना उदाहरण देताना त्या घटनेचे चिरकाल आठवणीत, स्मरणात राहण्यासाठी मदत होते. याव्यतिरिक्त त्यावेळचे फोटो किंवा व्हिडीओ शुटींग असले की, बालपणातील ती घडलेली गोष्ट आपल्या डोळ्यासमोर हुबेहुब उभी राहू शकते, असे मला वाटते. स्मरण किंवा आठवणी या विषयात मी काही पारंगत नाही. पण आठवले म्हणून लिहिण्याचा खटाटोप आहे.
सन १९७२ मध्ये २६ सप्टेंबर रोजी माझा जन्म तेव्हाच्या आकोट तालुक्यात पंचगव्हाणला झाला. त्या काळात वेगळी प्रथा होती. घरात पहिला मुलगा जन्माला आला की, आतासारखे पेढे वाटल्या जात नव्हते. तर साखर पान वाटले जायचे. माझ्या जन्मानंतर आमच्या आंबेटाकळी गावात डफडे बजावत घरोघरी जाऊन विड्याचे पान आणि त्यावर साखर वाटण्यात आली होती. आता तुम्ही म्हणणार,‘बाबू’ तू त्या वक्ती त पायण्यातच होता, मंग तुले कसं माहीत? म्हणजे ही गोष्ट त्या काळातील बऱ्याच गावकऱ्यांना माहीत होती. ती सांगोवांगी माझ्या कानावर पडत राहिली. असंच म्हणू शकतो. खरं काय नी खोटं काय? हे मी कसं सांगणार? बरं जाऊ द्या, बाळ जन्मल्यानंतर महत्त्वाचे काम असते ‘बायतिळा’ करणे. बायतिळा म्हणजे बाळाले गलोतं-टोपी आणि भांडे करणे अर्थात दागिने. माझ्या आजीने कपडेलत्ते कंबरीत चांदीचा करदोळा आणि हातात ‘चांदीचे कडे’ करून दिले होते. मी लहान असलो तरी घरात पहिला होतो. म्हणून हौशीखातर, आई-वडिलांनी ते दागिने अंगावर वापरू दिले. बाळाच्या हातातील दागिने पाहून त्यांनाही आनंद वाटे. कारण आपल्याच मुलाच्या हातात चांदीचे कडे आहेत. याचं प्रत्येक आई-बापाला अप्रुप असते. लहान आहे तोपर्यंत राहू दे त्याच्या हातात कडे, चांगले दिसतात लेकराले. म्हणून ठेवले. मी त्यावेळेस किती वर्षाचा असीन? याचा तुम्हाला अंदाज आला काय? नाही. पण लहान होतो हे सगळेच सांगू शकतात. मी त्यावेळी असेल अडीच-तीन वर्षांचा, असं माझे वडील आणि आजोबा सांगतात. गोष्ट अशी आहे की, त्यावेळी मी खेळत असताना बालपणातील मित्रासोबत आंबेटाकळी गाव अक्षरशः पालथे घातले होते. घरी आल्यानंतर आई-वडिलांना माझ्या हातात चांदीचे कडे नसल्याचे लक्षात आले. मग झाली माझी परेड सुरू ? सांग तू कुठे गेला होता? कोणाच्या सोबत गेला होता? तुला कोणी गोळ्या-बिस्कीट, पोंगा-पंडीत दिले काय? तू
कुणाच्या घरी जेवला? तुझ्या हातातले कडे कोणं काढले? प्रश्नांची सरबती आणि मी केवढा असेल तर अडीच-तीन वर्षांचा काय सांगणार? ‘बोडखं.’ बोलता बोलता मी म्हणालो, गजासंगं पलाटात गेलो होतो. आजी तिकडे बाजीवर झोपेल होती. आम्ही घरी येत होतो. तठी आमाले एक बाई घराची भित सारवतांना दिसली, तिनं मले एकट्याले घरात बलावलं, मी घरात गेलो तं तिच्या आंगणात लयमोठे मातीचे मडके, गंगाय होते. यावरुन घरच्यांनी अंदाज घेतला. आमच्या आंबेटाकळी गावात जवळपास सर्वच जातीचे लोक राहतात. त्यात, कुंभार समाजाचे फक्त दोनच घरे आहेत आणि सज्जन आहेत. एक म्हणजे रामदास वसे यांचे सातीतलं ग्रामपंचायतीजवळचे घर आणि दुसरे म्हणजे रुंजाजी कंठाळे यांचे गावाच्या शेवटच्या टोकावरील घर, त्यावेळी दोघांच्याही घरासमोर मातीच्या भांड्याच्या उतरंडी, रांगा असत. त्यापैकी सातीतील रामदास कुंभाराचे घर आमच्या घरापासून जास्त दूर नव्हते. त्यांच्याकडे चौकशी केली तर ‘आम्ही कशाला चांदीचे कडे घेऊ, हा पोरगा आमच्याकडे आलाच नाही’. असे सांगण्यात आले. नंतर ज्या आजीच्या बाजीजवळ आम्ही खेळलो, त्या कोंगसा बुढीच्या घराजवळ कुंभाराचे घर होते, त्यांच्याकडे विचारणा केली तर तिथेही कोणी कडे घेतल्याचे कबूल केले नाही. सांगा ‘माझ्या हातातील चांदीचे कडे कोणी काढले असतील? मी आज इतक्या वर्षानंतर ते कसे सांगू?’ ही घटना सत्य असली तरी चोरी करणारी महिला अद्याप समोर आलेली नाही. आणि जसजसे माझे वय वाढत गेले तसेच मित्रही वाढत गेले. आमच्या गावातील कुंभार समाजातील दोन्ही घरांशी आमचे संबंध एकदम सौहार्दपूर्ण आहेत. वसे कुटुंब गावातच वास्तव्याला आहे तर दुसरे कंठाळे यांचे कुटुंब शेगावला आहे. आणि रुंजाजीबुवा सारखा साधा, सरळ आणि सज्जन माणूस दुसरा मी पाहिला नाही. ही आठवण फक्त इथेच लिहिली आहे. ती अद्याप कुणाला सांगितली नाही. बरे असो, यातून कुणाचेही मन दुखावण्याचा प्रयत्न नाही, फक्त आठवण
.......
सन १९८० मध्ये मी तिसरीत असेन, साधारणतः ८ ते ९ वर्षाचा. तर छोटा भाऊ गणेश माझ्यापेक्षा तीन वर्षानी लहान. एकदम निरागस, तेव्हाची आठवण फक्त मनातच आहे. आतापर्यंत अनेकांनी विचारले असेल, पण जाऊ द्या तिकडे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करुन मन मारून दुसऱ्या विषयाकडे वळतो. एखादेवेळी पत्नी ज्योतीही विचारते की, ‘तुमची आई कशी दिसत होती?’. तर माझ्यासारखी होती. असं म्हणतात, खरं तर मी तिच्यासारखा आहो, अशी माझी आजी म्हणजे आईची आई, गिरजाबाई तसेच मामाच्या गावातील, पंचगव्हाणमधील नातेवाईक सांगतात. बाकी आटोपते घेऊन मी जास्त बोलायचे टाळत आलो. बाकी कुणाजवळ आई किंवा माय असा उल्लेखही केला नाही. कुठे स्वत:हून आठवणही काढली नाही. पण आज ९ जानेवारी २०१७ रोजी मनातली आठवण लिहितांना मात्र डोळ्यातून अश्रू वाहत होते.
हे लिहितांना आठवले माझ्या लहानपणाच्या पंचगव्हाण येथील मित्राच्या आईचे शब्द. मी आठवी ते दहावीपर्यंतची शाळा पंचगव्हाण ता. तेल्हारा जि. अकोला येथील भारत विद्यालयात शिकलो. बालपणीचा माझा जीवलग मित्र अमीरखा फुलबासखॉ हा आणि मी २४ तास सोबत असायचो. त्याला घरचे-दारचे सगळेच ‘लत्या’ म्हणून बोलावत. त्यामुळे त्याचे नाव लतिफ असेल, असे अनेकांना वाटते. पण मी त्याला नेहमी ‘अमीर’ म्हणूनच हाक मारतो. तो सध्या सौदी अरेबियात नोकरीनिमित्त कुटुंबासह स्थायिक झाला आहे.
सन १९९८ मधील गोष्ट आहे. माझे लग्न ज्योतीशी जुळले. १९ मे पूर्वी पत्रिका द्यायला पंचगव्हाणला गेलो. अमीर त्यावेळी नोकरीला औरंगाबादमध्ये होता. घरी त्याची आई हसिनाबी होत्या. त्यांना मी लहानपणापासून आजीच म्हणतो. लग्नाची पत्रिका देतेवेळी आजुबाजूच्या मुस्लिम बायाही तेथे होत्या. म्हटले, ‘आजी ये मग खामगावले, १९ तारखेला माझे लग्न आहे’. तेव्हा अमीरची आई बायांजवळ म्हणाली, ‘देखो आज देवकी होती, तो उसको कितना अच्छा लगता था, इसके शादी मे इसकी मॉ होनी थी, पर क्या करेंगे, जब ये इत्तासा था, तब ओ अल्लाह को प्यारी हो गयी’ त्यावेळेस मला फार गहिवरुन आले होते.
सांगायचे होते की, १९८० च्या दरम्यान वडील शेतीच करत होते. आबा-आजी, आई-वडील मी आणि गणेश असा आमचा परिवार एकाच ठिकाणी धाब्याच्या घरात राहत होता. बाजूला दरवाजालागूनच विहीर (आड) आणि तेथेच गुरांचा गोठा होता. आमच्याकडे त्यावेळी बैलजोडी होती. एका गोऱ्याला जोड लावण्यासाठीच आबांनी गावातील पुंडलीकराव घोगरे यांच्याकडून एक दुसरा गोऱ्हा विकत घेतला होता. त्याच्यामुळे त्या बैलाला आम्ही घोगर्या म्हणत होतो. घोगऱ्या आणि बांडा ही गोऱ्याची जोडी आमच्या वेटाळात उठून दिसत होती. सगळे काही ठीक असताना आम्हा दोघा भावांच्या पाठीवर बहीण जन्मास आली. तिचे नाव संगीता ठेवले. पण काय झाले कुणास ठाऊक, आई बाळंतपणात आजारी पडली. गावातल्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर खामगावच्या सरकारी दवाखान्यात भरती केले. सोबत नुकतीच जन्मलेली बहीण असल्यामुळे बाळाची आठवण येत होती. म्हणून आबा-आजी आणि वडिलांनी मला भेटीसाठी खामगावच्या दवाखान्यात नेण्याचे ठरवले. आणि माझा चुलत भाऊ रमेश सोबत मला पाठवून दिले. मी आईची बाळाची तब्येत पाहिली. काहीच वाटले नाही. आई रमेशला म्हणाली,घरातल्या पाटलीवर शिशी ठेवेल आहे. त्याच्यातले शेव गणेशले-जनाले अर्धे अर्धे देजो. या पोराईवर लक्ष ठेव, सुट्टी झाली की मी येतोच असे म्हणत रमेशने व मी निरोप घेतला. त्यावेळी गणेश मात्र घरीच होता. नंतर इकडे घरचे सगळे जण वावरात जात होते. तर मी शाळेत, बहुतेक त्या दिवशी सुटी होती. मी अन् आजी मैनाबाई (वडीलांची आई) वावरात गेलो होतो. दुपारी तीन वाजताच्या सुमारास पाऊल सगराने घराकडे येत होतो. नदीच्या काठावर चिंचीजवळ पांदण आहे. या खोलवाटीने घरी येत होतो. तर समोरून शांताबाई येत होती. जोरजोरात उरावर हात मारत रडत, आजीच्या गळ्यात पडली. मला तर काही समजलेच नाही. ‘आता काई खरं नाही, देवकी गेली ना माय बाई’ म्हणत दोघीही रडू लागल्या. रडत-पडत घरी आलो, तर इकडे निंबा मामा(शांताबाईचे पती) जे आबाचे भाचे आहेत. त्यांनी आणि वडिलांनी घोगऱ्या -बांडा धुरीले जुपला, अन् बैलगाडी घेऊन खामगावला गेले. आंबेटाकळीहून खामगावचे अंतर २६ किमी आहे. तिथे शेगाव रोडवर सरकारी दवाखान्याच्या बाजूला असलेल्या एका खोलीत म्हणजे पी.एम. रुममध्ये आईचे प्रेत ठेवले होते. तर बाहेर आईची आई म्हणजे माझी आजी गिरजाबाई छातीवर धडाधड हात मारून जोरजोरात रडत होती. पीएम झाल्यावर रात्री बैलगाडीने प्रेत घरी आणताच एकच गराडा पडला. लहानगी संगीता, गणेश आत्याजवळ, आजीजवळ होते. रमेशदादा मला इकडे तिकडे कुठेेतरी लपवत होता. अंत्यदर्शनाच्यावेळी आम्हांला तिघा भावंडांना तर काही समजत नव्हते, पण हजर असणाऱ्यांचे दुःख मावत नव्हते.
कालांतराने म्हणजे नऊ महिन्यानंतर माझी बहीण संगीताही गेली. आजी-आजोबा, बाबांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही.आई एकुलती एक. तिला भाऊ नाही की बहीण नाही, तिचे वडीलही लहानपणीच वारलेले. अशा परिस्थितीत आजीला एकच सहारा होता माझी आई देवकाबाई. आता तीही देवाघरी गेली. ज्या आशेवर आजी जगत होती. ती सगळी उद्ध्वस्त झाली. छातीवर दुःखाचा दगड ठेवत आजीने आम्हा दोघा भावांना आपली मुलं मानून सांभाळले, खूप खूप प्रेम दिले. तिला या जगात आमच्या परिवाराशिवाय दुसरे कोणी नव्हतेच.
अशातच मी आणि आईची आई गिरजाबाई आम्ही उन्हाळ्यात तत्कालीन जळगाव जामोद, आताच्या संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे नातेवाईकांच्या घरी लग्नानिमित्त गेलो होतो. त्यावेळी बहीण संगीता हसत खेळत होती. म्हणून गणेश तिच्या जवळ आंबेटाकळीलाच होता. चार आठ दिवसाचा मुक्काम पातुर्डा येथे झाला. लग्नाच्या धुमधडाक्यात असताना तेथे पत्र येऊन धडकले. आंबेटाकळीहून आलेल्या या अर्ध्या पत्रावर संगीता जग सोडून गेल्याचे लिहिलेले होते. एका वर्षात आई गेली आणि बहीणही गेली. तिचे नाव आता दुसऱ्या बहिणीला दिलेले आहे. तर सध्याच्या आईलाही देवकाबाई या नावानेच ओळखले जाते. यात सगळ्यात जास्त दु:ख जर कुणाला झाले असेल तर माझ्या आजीला, आईच्या आईला गिरजाबाईला.
आता बायको एखादेवेळी पित्र आणि अखजीच्या वेळी विचारते, तुमच्या आईचा एखांदा फोटो बिटो काढलेला नाही का? तुम्हाला आठवत असेल ना चेहरा? पण फोटो नसल्याने चेहराही आठवत नाही. आणि आई नसल्याची खंतही आता वाटत नाही. गेले ते दिवस पण तरीही कधी कधी असे वाटते की, माझी आई ज्यावेळी वारली, त्याच्या अगोदर काही वर्षे म्हणजे माझ्या जन्मापूर्वी जर वारली असती तर कदाचित मला हे जगही दिसले नसते. किंवा मीही या जगात नसतो.
.......
‘ओम जय जगदीश हरे.’ आता तुम्ही म्हणालं हे गाणं तर आम्ही कुठेही ऐकतो. त्यात काय नवल आलं. मोबाईलची रिंगटोन, बँड पार्टी, बॅन्जो पार्टीत नाहीतर एखादी गाडी, कार रिव्हर्स घेतांना या गाण्याची धून ऐकायला मिळते. पार बोजवारा उडवलेला दिसतो हे ऐकतांना. मूळ आरती कुठे आणि ही धून कुठे याचा काही ताळमेळच राहिलेला नाही.
सांगायचं हे होतं की, माझं गाव म्हणजे आजूबाजूच्या १०-१५ गावात एकमेव धार्मिक गाव म्हणता येईल. गावात अठरापगड जातीचे लोक राहतात. मुस्लीम धर्मीयाचं एकही घर नाही. सगळे धार्मिक उत्सव अगदी गुण्यागोविंदानं आजही साजरे होतात. आमच्या आंबेटाकळीत सन १९०० ते २००० या शंभर वर्षाच्या कालखंडात दोन संत पुरुष होऊन गेले. पहिले म्हणजे संत नारायण महाराज. हे भोंदूबाबा वगैरे नव्हते. तर सज्जन आणि संत सद्गुरु म्हणून आजही ओळखल्या जातात. अशा नारायण महाराजांचे गाव, महाराजांनी आपल्या हयातीत गावात श्री विठ्ठल रुख्माईचे भव्य असे मंदिर बांधून ठेवले आहे. तेथेच भुयार खोदून ठेवलेले आहे. अतिशय थंड राहणाºया या भुयारामध्ये एक पाण्याचा झिरा आहे. तो बहुधा आटत नाही. असे वयोवृध्द सांगतात.
असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि आंबेटाकळीचे ग्रामदैवत असलेल्या श्री संत नारायण महाराज यांच्या नावाचा जयजयकार केल्याशिवाय आंबेटाकळी परिसरातील कोणत्याही शुभकार्यास प्रारंभ होत नाही.
तोरणा नदीच्या काठी, आंबेटाकळी गाव ।
आंबेटाकळी गावात, नारायण देव ॥
नारायण देवाची, करतो मी सेवा ।
सर्व मंडळी आनंदाने जेवा ॥ असा श्लोक म्हणत पंगतीत जेवणाला सुरुवात करण्यात येते.अशा या आंबेटाकळी गावात जाण्यासाठी सध्या चारही बाजूने रस्ते आहेत. खामगाव ते मेहकर आणि बाळापूर ते उंद्री या मार्गावर असलेले हे गाव अकोला येथून ५० किमी. बुलडाणा येथून ६० किमी, मेहकर येथून ५१ किमी आणि खामगावपासून २६ किमी अंतरावर आहे.
सध्या स्थितीत गावात जे विठ्ठल रुखमाईचे भव्य मंदिर आहे, त्या मंदिराची पायाभरणी, उभारणी संत नारायण महाराजांनी केली आहे. कीर्तनाला जागा कमी पडत असल्यामुळे महाराजांनी गावकऱ्यांच्या मदतीने मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. नंतर पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठल रुखमाईची मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा केली. गावामध्ये मोठे मंदिर उभारल्यामुळे महाराज, लोकांना गीता, ज्ञानेश्वरी ग्रंथातील बोधामृत पाजू लागले. तसेच महाराजांनी दर दशमीला गावातून भजनी दिंडी,एकादशीला मंदिरात कीर्तन, दरवर्षी रामनवमी उत्सव सुरू केले.तेव्हापासून ते आजपर्यंत सुरू आहेत.
असे सांगितल्या जाते की, शके १७३२ मध्ये फाल्गुन शुद्ध तृतीयेला म्हणजे सन १८१० मध्ये गावाच्या दक्षिण दिशेने आंबेटाकळी गावात एका ९-१० वर्षीय बालकाचे आगमन झाले. त्याने आपले नाव फक्त नाऱ्या असल्याचे सांगितले. याचवेळी भिक्षा मागत असताना तो मैराळ नावाच्या ब्राह्मणाच्या घरी गेला. या ब्राह्मणास मुलबाळं नसल्यामुळे त्याने नाऱ्याला आपल्याकडे राहण्याचा आग्रह धरला. दरम्यान, नाऱ्याचा नारायण महाराज झाला. सुरुवातीला महाराजांनी गावाच्या पश्चिमेला एका झोपडीत राहण्यास सुरुवात केली. नंतर आपले ध्यान भ्रष्ट होऊ नये, एकांतवास राहावा, या उद्देशाने महाराजांनी मंदिराच्या बाजूला एक भुयार खोदले. त्यात पाण्याचा एक झराही खोदला. सध्या आंबेटाकळीत महाराजांचे स्वतंत्र मंदिर नसले तरी महाराजांनी बांधलेल्या विठ्ठल रुखमाई मंदिराजवळ असलेल्या आणि या भुयारामध्ये महाराजांची मूर्ती आहे. समाधीस्थळ आहे.
इसवी सन १९३२ मधील श्रावण शुद्ध तृतीयेला आंबेटाकळी येथील विठ्ठल रुखमाई मंदिरामध्ये सुखदेवबुवा मालठाणे यांचे कीर्तन सुरू असताना श्री संत नारायण महाराजांचे वैकुंठागमन झाले. जवळपास ते १३० वर्षांच्या वर जगले. त्यानंतर बराच कालखंड उलटला. दरम्यान, २ मार्च १९८७ रोजी श्री विठ्ठल रुखमाई संस्थानच्या वतीने हरिनाम सप्ताह आयोजित करून भुयारामध्ये महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
सध्या मंदिराचा कारभार संस्थानचे विश्वस्त पाहत असून उपरोक्त कार्यक्रमाशिवाय संस्थानमध्ये दरवर्षी रामनवमीनिमित्त हरिनाम सप्ताह, चातुर्मासात श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन त्याचप्रमाणे संत नारायण महाराजांचा प्रगटदिन, पुण्यतिथी इत्यादी धार्मिक उत्सव साजरे करण्यात येत आहेत. तसेच आंबेटाकळी ते सखारामपूर इलोरा पायदळ वारीचे आयोजन दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमीदरम्यान करण्यात येते. याव्यतिरिक्त कृष्ण जन्माष्टमी, हनुमान जयंती, प्रत्येक संतांची जयंती, पुण्यतिथी, दररोज हरिपाठ आणि दर एकादशीला हरिकीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत. एवढेच नव्हे तर दरवर्षी श्री संत गजानन महाराजांची पालखी नागपंचमीच्या दिवसात पंढरपूरची वारी आटोपून परत येतांना मंदिरात विसावते. अलिकडच्या काळात किसनगिरी महाराज गोसावी यांचीही पुण्यातिथी साजरी करण्यात येते. एकंदरित वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते.
श्री विठ्ठल रुखमाई मंदिराच्या बाजूला जि.प.ची मराठी पूर्व माध्यमिक शाळा आहे. ज्यामध्ये मीच काय आमच्या घरातील सर्व जण शिकले. पहिलीपासून सातवीपर्यंत शाळा आहे. माझा बालपणापासून सातवीपर्यतचा काळ फक्त आंबेटाकळीत गेला. नंतर गाव सोडले. परंतु बालपणातील छोट्या-मोठ्या गोष्टी काही वाक्य, काही गाणी अजूनही आठवतात.
तेव्हा मंदिराच्या समोर भला मोठा मंडप टाकल्या जाई. तेथे दरवर्षी आठवडाभर भागवत सप्ताहाचे आयोजन केले जात होते. गोंदीचे महाराज कथा वाचन करत होते. व्यासपीठाचे ठिकाण दरवर्षी एकच असायचे. राममंदिरासमोरील ओट्याजवळ भागवतीबुवाचे आसन असायचे. एकीकडे पुरुष भक्तांची तर दुसरीकडे महिला भक्तांची बसण्याची व्यवस्था असायची. बहुतेक कपाळाला बुक्का, चंदनाचा टिक्का, गंध लावलेले आणि गळ्यात तुळशीच्या माळा असलेली भाविक मंडळी सकाळी आठ वाजेपासून आपले आसन ग्रहण करायची. त्यामध्ये आमची शाळेत जाण्याची वेळ आणि गर्दी. आणि शाळेत जाण्याचा रस्ता मंदिरासमोरुनच. म्हणून येणाऱ्या जाणाऱ््यांसाठी भागवतकार महाराजांच्या समोरुन नारळी दोरी बांधून रस्ता काढून दिलेला होता. आम्ही शाळेत जातांना भागवत सुरू असायचे. पण चूपचाप न जाता, त्या नारळाच्या दोरीला झटके देत जायचो. सरळ न चालता विनाकारण खाली वाकून पायाला खाजवायचे. त्यावेळी आतासारखे फुलपँट नव्हते. सातवी काय पार दहावीपर्यंत खाकी चड्डी आणि पांढरे शर्ट असा शाळेचा गणवेश होता. मग कुणीतरी शाळेत येवून मास्तरकडे आमची तक्रार करायचा. जाऊ द्या हो पोरं आहेत ते. म्हणून मास्तरही अशांना टरकावून लावायचे. हा झाला सकाळी शाळेत येण्याचा दिनक्रम.
संध्याकाळी शाळा सुटण्याची वेळ, डोंगरातून गायी चरून येणाऱ्या गाई-गवाराची दाटी आणि भागवत कथा वाचन संपण्याची वेळ एकच यायची, कुठे ढोरं तर कुठे पोरं उड्या मारायचे. अशाही परिस्थितीत महिला-पुरुष भाविक भागवताचा प्रसाद हातावर घेऊन घराकडे जाताना रस्त्याने एकमेकांना दिवसभराचा सार सांगतांना दिसत होते. तर मंदिराच्या लाऊड स्पिकरवर म्हणजे भोंग्यात एक आरती ऐकायला मिळायची. ‘ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे’ त्यावेळी काहीही समजत नव्हते. पण भागवत कथा संपली, एवढे मात्र या आरतीमुळे पोरांना तसेच इतर गावकऱ्यांना समजत होते. मनोजकुमारच्या पूरब और पश्चिम या हिंदी सिनेमातील ही आरती पार पूर्वेकडील कंचनपूर गावापर्यंत ऐकायला जायची.
सायंकाळच्या वेळी घराकडे परतताना सर्वांच्या कानावर पडणाऱ्या त्या मधूर स्वरांनी संपूर्ण गावातील वातावरण अगदी भक्तीपूर्ण होई. प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर, व कोरस यांच्या आवाजातील ते स्वर आज सहजासहजी कुठेही ऐकायला मिळत नाहीत. ना धार्मिक, भक्तीपूर्ण वातावरण कुठे पाहायला मिळत, ना आंबेटाकळी सारखं तेव्हाचं गावं, ना गावकरी. धार्मिक कार्यक्रम सुरू असतात, पण ती मजा वेगळीच होती, राजेहो.
.........
तुम्ही कुठेही असा, कुठेही जा, तुम्हाला कुणी विचारत नाही ना किंमत देत नाही. हे खरे आहे जर समोरची व्यक्ती महत्त्व देत असेल तर ती तुम्हाला नव्हे तुमच्या कामाला देत असते हेही मान्य करावे लागेल. कामात माणूस कसा मस्त आणि व्यस्त राहतो. उगीचच म्हटल्या जात नाही, ‘रिकामं डोकं सैतानं का घरं’ विशेष म्हणजे, ज्याला काम आवडते, आपल्या कामात इंटरेस्ट आहे, त्याला क्षणभरही रिकामे राहावे वाटत नाही. सुटीचा एखादा दिवसही खूप बोअर जातो, अशी परिस्थिती आहे आणि काही असे महाभाग असतात की, त्यांना सुटीचाच ध्यास असतो. पुढची सुटी कधी आहे, याच फिकिरीत असतात. तर काहींना २४ तास रिकामे बसून चकाट्या पिटण्यात इंटेरस्ट असतो. काहीच काम न करता इतरांना अक्कल वाटण्यांत ते माहीर असतात. स्वत:ः काहीच न करता इतरांच्या टवाळ्या, चहाड्या करणे हाच त्यांचा उद्योग असतो. विशेषत: खेड्यात असे नग भरपूर सापडतात.
इकडे घरची बाई लोकाच्या कामाला जाते, दुसऱ्याच्या शेतात मजुरी करते, आपल्या मुलाबाळांना पोसते, अन् नवरोबा इकडे ऐदी खटारा. दिवसभर काम न करता इथेतिथे बसतो. एकट्या बाईच्या मजुरीवर घरखर्च चालवावा लागतो. अशी परिस्थिती ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. आमच्या आंबेटाकळी गावात पाराचा ओटा, चावडी, निंबाखालचा ओटा, मंदिराचा ओटा दिवसभर हाऊसफुल असतो. ज्यांच्या कडून शेतीची कामे आता होत नाहीत. ज्यांनी आपले आयुष्य शेतीत काबाडकष्ट करुन घातले ते म्हातारे विश्रांती घेत असतील तर ठिकच आहे. पण या ठिकाणी म्हातारे कमी आणि धडधाकट जास्त, असे चित्र दिसते. शेतात इकडे मजूर मिळत नाही. आणि ओट्यावर संख्या मावत नाही. कामाला जाण्यासाठी कोणी तयार होत नाही. असे नमुने सापडतात.
यातही एक विशेषतः असते. काही जण भारी (कठीण) काम असले की, नाहीच म्हणतात. एखाद्याने कुपाट्या ठोकणे, कुंदा काढणे, कोपया काढण्याचे काम सांगितले तरच होका घेतात.
मी लहान असताना आमच्या वेटाळात दोघांची अशीच जोडी होती. किसनाबुवा अन् सोनाबुवा. यातले एक नाव काल्पनिक आहे. या जोडीने कधी शेतात वखर, नांगर, तिफण धरली नसेल. नुसती खांद्यावर बेफाटीची काडी अन् हातात कुऱ्हाड घेतली की, निघाले कुपाट्याच्या काट्या तोडायले. कधी कधी त्यांच्या खांद्यावर कोपई राहत असे. कोपई म्हणजे शेतातील हराळी, कुंदा खोदून काढण्यासाठी वापरण्यात येणारे कुऱ्हाडीसारखा दांडा असलेले साधन किंवा हत्यार, आणि कुपाट्या म्हणजे, बोराटीच्या काटेरी फांद्या. शेताच्या धुऱ््यावर असलेल्या बोरीच्या झाडाच्या सुकलेल्या फांद्या तोडून त्यांची गंजी लावणे, नंतर ज्या शेताला कुंपण घालायचे तेथपर्यंत बैलगाडीतून नेणे. व शेताच्या भोवताली ह्या काट्या ठोकणे, यालाच कूप ठोकणेही म्हणतात. कारण शेताला तारेचे कुंपण करणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ते महागडे वाटायचे.
बरे असो, या जोडीने कधी शेतातले भारी काम केले नाही, हे त्यांचे मोठेपण म्हणालं लागीन, हलकं फुलकं म्हणजे हाल्लम टोल्लम काम केलं की, गमावला दिवसं, असा खाक्या होता.
आता अशी म्हण आली की, ‘‘खेत में नाही होना नाला, और घर मे नही होना साला’’ तसेच ‘‘ज्यांच्या शेतात हराळी, कुंदा, त्याने करु नये शेतातील धंदा’’ शेती म्हटली की, मोजक्याच आणि जी मंडळी घरच्या शेतात राब राब राबते. त्यांच्या शेतात हराळी, कुंदा लयाळी दिसणार नाही, बाकीच्या शेतात हराळी मावत नाही, दरवर्षी किसनाबुवा, सोनाबुवाले कोपया खंदायले सांगितले तरी मुळासकट कुंदा जात नाही. सुरू असलेल्या सारख्या पावसाने सखाराम पाटलाच्या वावरात हराळी दाटली होती. म्हणून कामासाठी सोनाबुवा खंडारेला सांगितले.
हातात काडी, कोपई घेऊन सोनाबुवानं सखाराम पाटलाच्या वावरातला कुंदा काढणं सुरू केले, इकडे पावसाची रिपरिप सुरू, तिकडे हराळी जोर काढे, इकडून कुंदा खोदला की, तिकडून वर येई, तरी या पठ्ठयानं दोन चार दिवसानं सखाराम पाटलाले सांगितले की, 'मालक वावरातला कुंदा एकदम सफाच करून टाकला. वावर एकदम निप्पक झालं'. बुधवारी गावात साथ असते. सातीत सोनाबुवानं मजुरीचे पैसे घेतले. दुपारच्या वेळी सखाराम पाटील सहज वावरात चक्कर मारायले गेला. तर हराळी, लयाळी टर्रर वर आलेली दिसली. त्यांच्यानं डोक्स एकदम भणकलं. चूपचाप सखाराम पाटील घरी आला. काही एक न बोलता सरकातीर दशरथ बुड्याच्या घरी गेला.
दशरथबुडा म्हणजे गावात फेमस, बुड्यानं त्याच्या आयुष्यात अर्ध्याच्या वर गाव रिकामं केलं. कुणाचीही अंत्ययात्रा असो, डफडे वाजवण्यासाठी डंका पिटण्यासाठी दशरथ बुड्याले सांगतल्या जात होतं.
"दशरथआबा एक काम करा लागते आपलं अर्जंट’ सखाराम पाटील म्हणाला.
दशरथबुडा, ‘‘सांगा नं बाप्पा, काही गडबड झाली काय? कोणी गेलं गिलं का?’’
सखारामबुवा, ‘‘तसं काई नाही, दुसरं अर्जंट काम हाये, दवंडी द्याची आहे आपल्या गावात. मी जसं चिठ्ठीवर लिहून देतो, तसी दवंडी प्रत्येक येटायात द्या. साथीत, देवळाजोळ, मळीपुढे, चावडीवर द्या.’’
हे ऐकताच दशरथबुड्यानं डफडे काढले, डमडम डमडम वाजवत, ‘‘सर्व लोकांना कळवण्यात येते की, ज्याला कुणाला आपल्या शेतातील हराळी, कुंदा खळ्ळून काढायचा असेल, त्यांनी ताबडतोब सोनाबुवा खंडारे यांच्याशी संपर्क साधावा हो. डिम..डिम..डिम. खरं तर दवंडी म्हणजे एकप्रकारची जाहिरातच, जणू जाहीर सूचना. आता पेपरमधून जाहिराती प्रसिद्ध होतात, त्यातलाच हा तेव्हाचा प्रकार. ही दवंडी सगळ्या गावात पिटल्या गेल्यानं सोनाबुवा पार हिरमुसला होऊन गेला होता.
जर का आताही तुम्ही गावात गेले अन् त्या काळातील आठवण उकरून काढली. बोलता बोलता विषय निघाला अन्् एखाद्याने विचारले की, सोनाबुवा चिडून आंगावरच धावते. मंग पोट्टेही सोनाबुड्याले उचकावून देतात. ‘काहो आबा, कोणं दिली होती हो दवंडी’ असं सोनाबुवाले मुद्दामहूनच विचारतात. अन् बुड्याले चिडवतात.
त्यावर सोनाआबा म्हणते, ‘जाऊ दे ससरीच्याले, त्याच्या मायचा...तो सक्या.... म्हणत शिवीगाळ करते. सोनाबुढ्याले एवढी झोंबली होती, त्या काळातली एक दवंडी.
............
जगात भूत नाही, हे सर्वांना माहीत आहे. परंतु ते कुठे राहते. असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर मिळेल चिंचीच्या झाडावर, खरे पाहता भूत किंवा चुडैल हा जो काही प्रकार आहे, तो पूर्णत काल्पनिक आहे. प्रत्यक्षात जगात कुठेही भूत अस्तित्वात नसून ते फक्त आपल्या डोक्यात आहे. असे असताना ग्रामीण भागातले लोक चिंचेच्या झाडाकडे भुताचे घर म्हणून पाहतांना दिसतात.
वास्तविक चिंच म्हटली की, तोंडाला आपोआपच पाणी सुटते. चिंचेच्या झाडाचा हिरवागार पाला बकर्या, मेंढ्या खातात. माकडे, लहान मुलेही पाला, फुलोर खातात. चिंचोणी तयार करण्यासाठी चिंचा वापरतात. झाडाला लागलेल्या चिंचा पाहून त्या दगड मारुन पाडाव्यात असे प्रत्येकालाच वाटते. लोंबकळणारे ते पिक लेले बाक्कोल हिरवेगार बाटूक हे सर्दी-खोकल्या पुढे काहीच नाहीत. बाक्कोल म्हणजे वीतभर लांब असलेली चिंच आणि बाटुक म्हणजे कांडभर आखुड असलेली चिंच ही आपली गावठी व्याख्या आहे.
लहानपणी गावात लग्नकार्यात सनई चौघडा आणि नंतरच्या काळात बँडबाजा सांगितल्या जायचा. आमच्या आंबेटाकळीत दोन चार जणांची सनई चौघड्याची पार्टी होती. तर त्यांच्याच कुटुंबातील नवतरुणांची सद्गुरु ब्रॉस बॅण्ड पार्टी होती. लग्नकार्यात मिरवणुकीत सनई किंवा काळी पुंगी हे वाद्य वाजवण्यासाठी हवा फुंकावी लागते. पण वाद्यवृंद ऐन रंगात आले की, काही टवाळखोर पोरं, मोठ्यांच्या सांगण्यावरुन त्यांची मजा घेत असत.
सकाळी उठले की, चिंचेच्या झाडाला दगड मारून भाकरे गुरुजीचा सुध्या खिसा भरून चिंचा आणे. एकदा काय झालं. त्याच्या घरासमोरून एका लग्नाची वरात वाजत गाजत जात होती, ओट्यावर उभा राहून हा पठ्ठ्या खिशातून एक एक बाटुक काढून खात होता. ते पाहून दुसऱ्या पोरांच्याही तोंडाला पाणी सुटे, सुध्यानं त्याचा भाऊ गज्याले अन् दोन-तीन पोराले चिंचा खायाले दिल्या. या वरातीतल्या बॅँडबाजात काळी पुंगी वाजवणाऱ्या मोतीराम मंगळे बुवाचे लक्ष अचानक या पोराईकडे गेलं. पोरांच्या हातातील चिंचा पाहून त्यांच्याही तोंडाला पाणी सुटलं आणि पुंगीतून हवा फुंकण्याऐवजी थुंकाच जाऊ लागला. रंगात आलेलं ‘खैके पाना बनारसवाला’ हे गाणं बंद पडलं. काय झालं, काय झालं हे वरातीतले लोक विचारत नाही, त पोरं घरात पळाली. असे इपित्तर नमुने तुम्हाले फक्त खेड्यातच पाह्याले भेटतीनं.
लहानपण म्हटलं की, काहीच सुत नसते, भंटलासारखं नद्या, नाल्यातून कुपा काट्यातून हिंडत राहणे, काही सापडते का? शोधत राहणे एवढाच धंदा असते. त्या काळात आजच्या सारखे स्टॅण्डर्ड पोरं नव्हते. आता सहा महिन्याच्या लेकराले फुलपॅन्ट नेसवतात. महागीचे बुट घालतात. आमच्या वेळी दहाव्या वर्गात जाईपर्यंत खाकी हाप पॅन्ट-पांढरा शर्ट असा शाळेचा ड्रेस होता. आणि ते कपडे वापरण्याचा टापटिपपणाही अंगी नव्हता. हाफ पॅन्टले मागून दोन लाईट लागेपर्यंत धोपटायचो. तर मनिल्याच्या दोन्ही खांद्यावर नाकातला शेंबुड पुसून बाह्या कयकल्या होतं. तरी चांगलं राहण्याचं भान नसे. बरं त्यावेळी शेंबडाचीही वान नव्हती. कोणत्याही पोराच्या नाकपुड्या हाऊसफुल राहत. काहीच्या नाकाची गळती वर खाली दिवसभर फुरफूर सुरू राहे, त्याले आमच्याकडे लोयती म्हणतात. तर काहीच्या नाक पुड्यात मेकड्या -कडक होऊन जात. सगळा मामला खारटं. अशात आंबटही पाहिजे म्हणून आम्ही चिंचा आणायला गेलो. ढाकरे गुरुजीचा सुध्या, त्याचा भाऊ गज्या आणि मी असे तिघं जण हॉटेलहून घरी येत होतो. हटेल म्हणजे त्या काळातील एस.टी.बस स्टॅण्ड. तेथे फक्त मुरलीधर इंगळे यांची एकच हॉटेल होती. म्हणून आम्ही फाट्यावर किंवा बसस्टॅण्डवर न म्हणता हटेलवर एवढेच म्हणता असो.
त्यावेळी बहुतेक मी चौथीत असीन. सुध्या म्हणजे फारच बंड पोऱ्या, ज्याले ‘अबुजा’ म्हणता येईल, असा गडी. आता तो शिक्षक आहे. हटेलवरुन गावात येतांनी नदीच्या तिकडच्या काठावर महाले बुवाचं आणि माळोकाराचं वावरं आहे. बाळापूर रोडच्या शेजारी या वावरात चिंचेचं झाड होतं. बहुतेक ते अजूनही तसच आहे. त्या झाडाला चिंचेचे बाक्कोल पिकलेले, लोंबकळलेले दिसल्याने आम्ही रस्त्यावरचे गिट्टीचे दगड जमा करुन खिशात घेऊन गेलो. निशाणा धरुन बाक्कोल पाडणं सुरू होते. एक जण दगडं मारायचा तर दुसरा झाडाखालच्या पडलेल्या चिंचा वेचायचा. असं सुरू असतांनी सुध्यानं चिचा पाडण्यासाठी दगड मारला, बाक्कोलचा निशाणा हुकला आणि तो दगड झाडाच्या खोडाला जोरात लागून उसळला. मी खाली चिंचा वेचत असताना टाळक्यात लागला. गिट्टीचा दगड डोक्यात जोरात लागल्याने खोल चोंद पडली. भळाभळा रक्त वाहू लागले. रक्तामुळे गाल, चेहरा रक्तबंबाळ झाला. त्या दोघा भावाले काही सुचत नव्हते. मी डोक्याला हात लावून एकदम खाली बसलो. जखम दाबून धरली. तरी रक्ताची धार कमी होईना, हातही रक्ताने माखले, कपडा, चिंधी दिसेना, गज्याने शर्ट फाडले, पण जमले नाही. शेवटी त्या दोघा भावांनी जखमेवर शेतातील माती टाकून रक्तप्रवाह थांबवण्याचा प्रयत्न केला. तरी रक्तस्त्राव सुरूच होता. आम्ही त्यावेळी असे ऐकले होते की, रक्तस्त्राव कमी होत नसेल तर जखमेवर लघवी केल्यास रक्तस्त्राव थांबतो.
मी खालीच बसलेला होतो. सुध्यानं हाफपँन्ट वर केली आणि माझ्या टकोऱ्यावर लघवी केली. नंतर शर्टाची पट्टी फाडून बांधली, जखम कोरडी होईपर्यंत घरी न जाता इकडे तिकडे हाल्लम टाल्लम केलं. हल्लम-टल्लम म्हणजे टंगळमंगळ किंवा टाईमपास बरं का ? मग घरी गेल्यावर याबद्दल कुणाजवळ अ- की- ब शब्द काढला नाही, अर्थात कुठेही आणि कोणाकडेही वाच्यता केली नाही. एवढेच नव्हे तर माझ्या डोक्यातील चोंद पाहून घरच्यांनी आतापर्यंत अनेकदा विचारले, पण मीही खरं सांगितलं नाही.
..........
आमच्या वेटाळात अलग-अलग प्रकारचे आडनाव आहेत. पूर्वी आडनावावरुन कुणी नाव घेतच नव्हते. जसे भगवान चांभार, मोतीराम पाटील, दशरथ मांग, तुळशीराम बेलदार, नामदेव कोल्हाटी, ज्ञानदेव वठ्ठी, रुंजाजी कुंभार, रावजी बौद्ध, तुळशीराम माळी अशा प्रकारे जाती वापरण्याची पद्धत होती. आमचे आडनाव गव्हाळे आहे. हे आता-आता लोकांनाा माहीत पडले. आमच्या आबाने आयुष्यभर भगवान रामू चांभार असेच नाव वापरले. कधी एखादे जुने भांडे सापडले तर त्याच्यावरही असेच नाव दिसे. कागदपत्रावरही असाच जातीवाचक उल्लेख होता. माझे वडील एस.टी. महामंडळात वाहक पदावर लागल्यामुळे त्यांना आडनावानेओळखू लागले तरीही बऱ्याच लोकांना माहीत नव्हते की ‘गव्हाळे’ हे सुध्दा आडनाव असते.
मी जेव्हा आंबेटाकळी येथील म.पू.मा. शाळेतून सातवा वर्ग पास झालो, आणि आठवीत पंचगव्हाण ता. तेल्हारा, जि. अकोला, येथे नाव टाकले. भारत विद्यालयात गेलो तर प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक माझे नाव, आडनाव काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत. मी जनार्दन गव्हाळे असे सांगितले की, जो-तो ‘लव्हाळे’ च ऐकायचा त्या गावात ‘लव्हाळे’ आडनाव असल्याने त्यांनाही ‘गव्हाळे’ आडनाव बहुधा ऐकायला मिळाले नव्हते. शेवटी काय तर गव्हाळे आडनाव आहे, हे मी सर्व परिचित केले, याचाही मला अभिमान आहे. यापूर्वी गव्हाळे आडनाव कुणी ओळखत नव्हते. अशातला भाग नाही. परंतु सन १९९५ पासून २०१६ पर्यंत बुलढाणा-अकोला जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात असल्यामुळे हे शक्य झाले, सर्वपरिचित झाले, यात काही वावगे आहे, असेही मला वाटत नाही.
जाऊ द्या, मी भलतीकडेच भरकटलो, नव्हे स्वत:चाच मोठेपणा सांगतोय की काय असे वाटायला लागले. मुद्दा असा आहे की, आमच्या वेटाळात ‘उंबरकार’ परिवाराचा डायरा मोठा आहे. आणि खेड्यात नावाले तर खूपच महत्त्व आहे. जर का? एखाद्याच्या लग्नाच्या पत्रिकेत एखाद्या भावबंधाचे नाव सुटले किंवा विसरल्या गेले की, मोठा राडा झाल्याशिवाय राहत नाही. अबोला, भांडणतंटे, रक्ताचे नाते तुटले, आम्ही तुमचे कोणी नाही, एवढेच नव्हे तर त्या लग्नावर बहिष्कार घातल्या जातो. याच कारणावरुन उंबरकार परिवारातील एक कुटुंब वाळीत टाकण्याचा प्रकार मी लहान असताना घडला होता. तेव्हा त्या कुटुंबाशी कोणी साधे बोलतही नव्हते. इतके नावाला महत्त्व लोकं देतात. तसे प्रत्येक जणच देतो.
आमच्या गावाच्या फाट्यावर मळसूर येथील सोपीनाथ महाराजांचे ठाणं आलं, तेथेच मंदिर उभारण्यात आलं. लहान असताना पौष महिन्यात पाच दिवस मी आजी-आजोबा सोबत तेथे धरणे बसायला जात होतो. धरणे बसणे हे काहीतरी धार्मिक दृष्ट्या कबुल केलेले व्रत असावे. बहुते पौष महिन्यातील सोमवारपासून शुक्रवारपर्यंत दररोज रात्री कडाक्याच्या थंडीत आम्ही देवाजवळ झोपत होतो. सोबत आणखी दोन-चार सवंगडी असत. फाट्यावर असलेल्या सुपोबुवाच्या या छोट्याशा मंदिराच्या दरवाज्याच्या अगदी एक लहानसा बोर्ड लावलेला होता. श्री सोपीनाथ महाराज संस्थान आंबेटाकळी त्याखाली होते अध्यक्ष जनार्दन बोबडे, माझेही नाव जनार्दन आणि अध्यक्षांचेही नाव जनार्दन असल्याने आमचे मामा मोतीराम उंबरकार हे मला ‘बोबडे’ असे आडनाव घेऊन चिडवत असत. तर याच काळात चिखलीचे काँग्रेस नेते जनार्दन बोंद्रे होते. म्हणून काही जण मला बोंद्रे म्हणून हाक मारत होते. तेव्हापासून मलाही नावाच्या प्रसिद्धीची हाव लागली. पी.पी.म्हणून मग काहीही करायचे.
त्या काळात खेड्या-पाड्यात रेडिओचे फार फॅन होते. गुरेढोरे चारणाऱ्या गुराख्याच्या एका हातात रेडिओ, शेळ्या-मेंढ्या चारणार्याच्या बगलीत रेडिओ दिसे. त्यावर आपली आवड, आपकी पसंद सारखे कार्यक्रम ऐकायला मिळत. पसंतीच्या गाण्याऐवजी मला ते रेडिओवर नाव येणंच फार महत्त्वाचे वाटत होते. आमच्या आबांनाही रेडिओ ऐकण्याचा शौक होता. आम्ही एक दिवस आकाशवाणी केंद्राचा पत्ता लिहून घेतला. अन् केंद्रावर पत्र पाठवण्याचा तडाखा सुरू केला. जवळपास सहावीत लागलेला हा छंद बराच वर्षे होता. त्या दरम्यान, आकाशवाणी जळगाव, पुणे, औंरंगाबाद, केंद्रावर माझे नाव यायचे. नातेवाईक, गावातील मंडळी रेडिओवर तुझे नाव आले होते. हे सांगायचे. फार बरं वाटायचं. दुसरं म्हणजे बालपणीचा मित्र अंबादासले एक कला अवगत होती. त्याची नक्कल करत मीही एक पोलादी खिळा पांचाळा जवळून तयार करुन घेतला. पूर्वी भांड्यावर खिळ्याने टकटक करुन नाव कोरली जायची. मी घरच्या भांड्यावर कलाकार्या करत माझेच नावे टाकणे सुरू केले. जर्मनच्या भांड्यावर नाव टाकणे सोपे असते. मग आजुबाजूच्या, मित्रांच्या, नातेवाईकांच्या घरची भांडी नावे टाकून झाल्यानंतर प्रत्येक भांड्याच्या बुडावर जे.जी. असं टाकायचा मोह आवरत नव्हता. त्यावेळी लग्नकार्यात भांडी,वस्तू सप्रेम भेट देणारांची नावे जाहीर करण्याची पद्धत सुरू होती. अजून एक फंडा म्हणजे लग्नकार्यात भोंग्यातून माईकद्वारे नावाचा उच्चार होणे, यासाठी धडपड सुरू असायची. माईकजवळ विष्णू घोपे हा मित्र असल्यामुळे त्याला सांगून जायचे की, ‘जनार्दन गव्हाळे’ जेथे कुठे असतील त्यांनी ताबडतोब लग्न मंडपात येण्याचे करावे. असे जाहीर करं त्यानुसार भोंग्यातून नाव जाहीर झाले. म्हणजे आपण खूपच मोठे झालो. असे वाटायचे.
नंतरच्या काळात आणखी एक शक्कल लढवली. एसटीच्या खिडकीला असलेल्या काचांना त्यावेळी हिरवा निळा रंग दिलेला असायचा. कोण्या गावाला जायचे असले की, घरुन खिळा घेऊन जायचे, गाडीत अगदी खिडकीजवळ बसायचे. आणि गाडी उभी राहीली की, हात बाहेरुन काढून खिळ्याने उलटे आपले नाव कोरायचे. बर्याच गाड्यांच्या खिडकीच्या काचावर माझे नाव लिहून ठेवले होते. ते बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर पाहतांना दिसत होते. स्वतःच्या नावासाठी (खुटी उपाड) उटपट्टांग धंदे फक्त लहानपणी सुरू होते.
दरम्यानच्या काळात मी पाचवी सहावीत असताना आम्हाला बोरीअडगांवचे पठाण सर आले होते. त्यांनी शाळेत शिस्त लावण्यासाठी चांगला उपक्रम राबवला. शाळेसमोर लावलेल्या झाडांना पाणी देणे, आवारातील घाण, कचरा, उचलणे स्वच्छता राखणे, प्रार्थना इत्यादी कामकाज व्यवस्थित व सुरळीत होण्यासाठी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्याचे एक मंत्रिमंडळ निवडले होते. त्यात माझ्याकडे स्वच्छतेची जबाबदारी दिली होती. आणि ऑफीसमध्ये भिंतीला सरांनी आमच्या मंत्रिमंडळाचा चार्ट बनवून लावला होता. त्यात माझ्या नावाचाही उल्लेख होता.शाळेत असताना आम्ही कच्चा आलू (बटाटा) कापून त्यावर इंग्रजीत उलटे नाव कोरत होतो. तो आलू शाईत बुडवून कुठेही शिक्का मारत होतो. मग पुढे आलू सोडून आम्ही कामातून गेलेल्या स्लीपर (रबरी) चप्पलचे शिक्के बनवत होतो. खऱ्या शिक्क्याची हौस पत्रकारितेच्या क्षेत्रात आल्यानंतर भागवली. त्यापूर्वी प्रसिद्धीसाठी काय काय नाही केले? फारच पीपी म्हणजे प्रसिद्धी पिसाट होतो. मग मोठेपणी मात्र चारोळी, लेख, बातम्या, फोटो, आघाडीच्या वृत्तपत्रात नावासह प्रकाशित झाले. दरम्यान १९९९ मध्ये जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन कार्यक्र मही प्रसारित झाला. २०११ मध्ये आय.बी.एन. लोकमतवरून मेहकरजवळील लक्झरी अपघाताची बातमी नावासह आली. दोन- तीन पुस्तके प्रकाशित झाले. आता व्हॉटस्अॅप, फेसबुक, इस्टाग्राम ही समाजमाध्यमं आली. तसेच अजून पत्रकारितेत प्रसिद्धीचा प्रवास सुरूच अाहे. त्यामुळे आता नावाचे किंवा प्रसिद्धीचे काही कौतुक उरले नाही.
.............
लहानपणी अभ्यासाकडे दुर्लक्ष अन् खेळाकडे लक्ष अशीच परिस्थिती असते. ते वयच तसं असते. आता शहरी भागातच नाही तर खेड्यातही बॅट/बॉलचे वेड लागले आहे. क्रिकेटसाठी बारा महिने तेरा काळ म्हणजे रात्रंदिवस खेळ सुरू च असतो. पूर्वी खेड्यात कसे हंगामी खेळ असायचे. सण त्यौहार, ऋतुनुसार खेळ खेळल्या जायचे. आता त्यातले बहुतेक खेळ लोप पावत चालले आहेत.
मुळात सुरुवात व्हायची ती पांगुळगाड्या पासून, पांगुळगाडा म्हणजे लाकडाचं पाटगाडं, खेड्यात सुताराकडून तीन चाके लावून बाळाला चालण्यासाठी आधार देणारं. आजकालच्या भाषेत ‘वॉकर’ म्हणा. ते गाडं लोटता-लोटता खेळत-खेळत मुले चालणं शिकत होते. थोडं मोठं झाल्यावर आल्या ‘घनगड्या’ आता तुम्ही म्हणाल, घनगडी ही काय नवी भानगड आहे? घनगडी म्हणजे रस्त्याने घरंगळत जाणारी लोखंडी वर्तुळाकार सळई. किंवा बैलगाडीच्या आखीला लावलेली लोखंडी गोलाकारातील पट्टीही वापरत होतो. दगडाच्या रस्त्यावरून ताराच्या साहाय्याने त्या घनगड्या दामटत किती किमी अंतर आलो, याचे भानही राहत नसे, आणि दम लागत नसे. ज्याच्याजवळ ह्या लोखंडी घनगड्या नसत ते पोरं वाहनाच्या टायरच्या चक्का घेऊन काडीने ढकलत, पळत सुटत. खेड्यातील रस्त्यातील दगडं चुकवत चक्का चालवणे, हेही त्या काळात आम्हाला एक कलाच वाटत होती. रस्त्यात दगडच दगडं. इकडे-तिकडे सांडपाण्यामुळे गारा (चिखल) त्यातून चक्का चालवणे, म्हणजे फारच जिकरीचे आणि मोठे काम वाटे.
दुसरा टाईमपास म्हणजे तारांचे गाडे बनवणे. एका ताराला वाकवून त्याचे दोन चाके तयार करणे, त्याला मधोमध लांब तार जोडून एका बाजूने त्याला स्टेअरिंगचे चाक करणे, हे गाडे धावत चालवायचे नसे. समोर लोटत एखाद्या वाहनाच्या चालकाप्रमाणे स्टेअरिंग फिरवण्यात खूप मजा वाटायची. जणू काही ठेला, ट्रक चालवण्याचा भास होई. त्यालाही काही जणं आणखी दोन चाके मागून जोडायची. त्यावर पत्र्याची ट्रॉली तारेने बांधून घ्यायची. हे गाडे फिरवत जाताना रस्त्यात कुठे शेणाचा पोवटा दिसला की, हाताने उचलून त्यात टाकायचा आणि घरी सडा-सारवणासाठी शेण घेऊन यायचे, हा त्यातला एक फायदा.
अशीच मजा आम्ही बांधकामासाठी आणून ठेवलेल्या विटांपासूनही घ्यायचो. विटेला छिद्र पाडून दोरी बांधून गाडी-गाडी खेळत असो. नदीला पूर आला की, पात्रात रेती वाहून येत होती. नदीच्या पाण्यात सारखे खडे गोटे आणि काठाला. चांगली बारीक रेती येई. त्या बारीक रेतीला भिंगी म्हणतात. त्याकाळी ओल्या वाळूत पाय खुपसणे आणि पायावर वाळू थापटून खोपा तयार करण्याची मजाही काही और होती. त्याला आम्ही धाबलीही म्हणत असो. हा काही खेळ नव्हता, पण वेगळा छंद होता.
नदीतील अशा बारीक भिंगीतून चालले की, पायाला मऊ वाटे. या रेतीतून एखादी वीट लोटत नेली किंवा दोरी बांधून ओढत नेली की, मागे वाळूत मस्त रोड बनत असे. आम्ही त्या विटांना एस.टी. बस समजून दोरीने ओढत असू. एकदाच नव्हे तर तयार झालेेल्या या रोडवरून वीटरुपी बसगाडी चालवत येरझारा मारत असोे. दोन-तीन मित्रांसोबत ह्या विटा रेतीतून ओढतांना जणू आपण एस.टी.चे ड्रायव्हर बनलो की, काय असे वाटायचे. विशेष म्हणजे, समोरून येणाऱ्या गाडीला कट मारण्यात फारच मजा येई.
बरं आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही तर कधी कधी या गाड्यांना अति जलदचे बोर्डही लावत असो. त्या काळात खामगाव डेपोतून शेगाव- श्रीरामपूर, शेगाव- पैठण, शेगाव- रावेर आणि शेगाव- शिर्डी ह्या गाड्या खूपच जोरात पळतात, असा समज होता. म्हणून आम्ही दोस्त मित्रही हेच बोर्ड लावत होतो.
आमच्या दुसऱ्या खेळातली एसटी म्हणजे, नारळाची दोरी. साधारणत: पाच फूट लांब दोरीच्या दोन्ही टोकांना गाठ बांधायची. तयार झालेल्या वर्तुळात दोघांनी घुसायचे. समोरच्याने तोंडाने थुका उडवत भुरभुर करायचे. स्टेअरिंगसारखे हात फिरवत शरीर हेकोडे तेकोडे करत पळायचे. मागे दुसऱ्या टोकाला असलेला तोंडानेच टिन टिन घंटी वाजवायचा. मध्येच टिन करून एखाद्याला दोरीत घुसवून सोबत पळवायचे. यातून एसटी चालवण्याचा आनंद आम्ही लहानपणी घेत होतो.
असे काही काही खेळत असतानाच विटीदांडू, नदी का पहाड, चोर-पोलीस, वांगे चिरणे, (अर्थात अंडा फोडणे) कुरघोडी, नदीत पोहणे, उड्या मारणे, सूर मारणे, आंब्याच्या झाडावर डाबडुबली, कबड्डी हे नेहमीचे खेळ सुरूच असत. याव्यतिरिक्त चेंडू दांडूत मजा यायची. विटी दांडू म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर एखाद्याचा डोळा गमावणे होय. माझ्या आजोबांनी विटी दांडूत त्यांच्या लहानपणी सखाराम उंबरकारचा डोळा फोडला होता म्हणे. त्याच्या आईने जोरदार भांडण केल्याने आम्हाला आबांनी विटी दांडूची परमिशन दिली नव्हती. तर ते स्वतःच सुतळी चिंध्या, कपड्यापासून चेंडू बनवून देत. वकट, लेंड, मुंड, नाल, अभित, आर, टोक्या असं काहीतरी मोजमाप करत आम्ही चेंडू दांडू खेळत होतो. आता मी जेव्हा तेलुगू भाषा लिहिण्याचा, वाचण्याचा प्रयत्न करतो. त्यात एक, दोन, तीन, चार या संख्यांना ओक्टी, रेंडू, मूड, नालुगू, ऐडू, आरु असे म्हणतात, हे लक्षात आले. म्हणजे लहानपणी जे काही ओंगळवाणे वाटणारे शब्द कानी पडत होते. त्यालाही अर्थ होता, हे आज कळाले आहे. नंतर याच सुती चेंडूचा वापर पोरांचे कपडे खराब करण्यासाठी व्हायचा. शाळा सुटली की, फेकून पाठीत मारायचा. धबाकुटी सुरू व्हायची. या धबाकुटीच्या खेळाले आम्ही अबादुबी म्हणो, समोरच्याचा नेम चुकवण्याची कला अनेकांजवळ होती. तर धावत जाणाऱ्याच्या पाठीत बरोबर रट्टा, धपका बसेल अशा पद्धतीने चेंडू मारायचा. ही तेव्हाची कला आजही कुत्र्या, मांजराला किंवा डुकराला दगड मारतांना अचूक कामी येत आहे.
दुसरा हंगामी खेळ म्हणजे कटवा रंगवणे, आमच्या आंबेटाकळी गावाच्या पूर्वेला कंचनपूरला जाणाऱ्या रस्त्यावर नदीकाठी भवानी मातेचं मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूच्या परिसराला मंदिराजवळ कुणी म्हणत नाही, त थेट ‘भवानी मायजोळ’ असाच शब्दप्रयोग केला जातो. या भवानी मायजोळ पूर्वापार परंपरेने दरवर्षी यात्रा भरते. भोळणी पुनवेला भरणाऱ्या यात्रेत त्यावेळपासून आजपर्यंत दोन-तीन रेवड्या-फुटाण्याच्या दुकानापेक्षा जास्त दुकान आले असतील असे वाटत नाही. त्यामुळे ‘बाबू’ बरोबर वापस येजो नाही तर जत्रीत भुलशीन अशी सूचना गावातले लोक एकमेकांना देतात पण जत्रीत जाऊन मनापासून देवीचे दर्शन घेऊन येतात. एवढेच आज शिल्लक राहिलेले दिसते.
त्याकाळी भोळणी पुनीवची जत्रा म्हटली की, आम्हाला कटवा तयार करण्याची घाई असे. ‘एयकई’ चा लंबा आणि सरळ फोक तोडून आणून त्याची साल काढली की, काडी चोपडीसटक दिसे, दोन-तीन फुटाच्या या काडीची दोन्ही टोकं निंबामामा व्यवस्थित करुन देतं. एक बाजू अंकुचीदार ठेवत. तर दुसऱ्या बाजूने बोंडी ठेवत. त्याच्यावर आम्ही गेरवाचा रंग देत असो. तेव्हा या नवीन कलरचा वापर केला जात नव्हता. दिवाळीतही गेरुचा रंग घरांना दिल्या जात असे.
कटवे रंगवले की, चालले भवानी मायच्या जत्रीत. काही जण कटवा तर काही कटोरा म्हणतात. त्यामुळे ‘कंटोरी कंचे, हातपाय लंचे’ असं म्हणत फक्त त्याचे दगडावर टोक टेकवत टेकवत मंदिरावज जत्रीत जात होतो. सोबतच मुलींच्या हातात टिपर्या असायच्या. नंतर जत्रीतून आले की खेळ सुरू व्हायचा तो असा-प्रत्येकाने आपला कटवा जमिनीवरुन घरंगळत जोरात लोटायचा. कटवा दूर जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड असे. पण ज्याचा दूर जाऊ शकला नाही, त्याच्यावर राज यायचे. दगडावर एक टोक ठेवून त्याला चकवत असत. रात्र होई पण खेळ संपत नव्हता.
आणखी एक खेळाचा प्रकार म्हणजे डावला करणे, डावला म्हणजे काय तर फुकटचा प्रवास. खेड्यातील मुख्य व्यवसाय शेती असल्याने वावरात जाणे काही नवीन नसते. पण प्रत्येक वावरात जाण्यासाठी बैलगाडीचा रस्ता असतेच असे नाही. काही वावरात जाण्या-येण्यासाठी धड रस्ता नसतो. उन्हाळ्याच्या दिवसात कोणाच्याही धुऱ्यावरून बैलगाडी नेता येते, काही वावराच्या धुऱ्यापर्यंत बैलगाडी नेता येते, विशेष हे की खेड्यात धुरा वावरालेही असते अन्् बैलगाडीलेही असते बरं का?
पण पावसाळ्यात आणि हंगामाच्या दिवसात पीक आणि रस्त्यात चिखल असल्यामुळे बैलगाडी शेतापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा वेळी शेतकरी आपले शेतीचे औजारे जसे की, वखर, डवरे, तिफन हे कळोणावर बांधून नेतात. कळोण म्हणजे इंग्रजी भाषेतील व्ही आकाराचे लाकूड, ते उलटे करून बैलाच्या खांद्यावर जुंपायचे. कारण बैलगाडीपेक्षा कमी रुंदीच्या जागेतून कळोण हाणता येते. शेतीचे किंवा पिकाचे नुकसानही होत नाही. कळोण जरी शेतकरी वापरत असले तरी आम्ही लहान मुले डाव-डाव करण्यासाठी कळोण इतर दोन मुलांना जुंपून पिटाळत होतो. इतकेच नाही, तर हा खेळ खेळताना बैल म्हणून जुपलेल्या मुलांच्या हातात दोरी बांधून हाकलत होतो. कधी कधी मुले जोरात धावले की, कळोण उलटे होऊन त्यावर डावला करणारा भलतीकडे आडवा तेडवा पडत होता. याच्यातही लहानपणी मजा येत होती.
त्यानंतर वावरातून काम करुन थकून-भागून आलेली काही मोठी माणसं रात्रीच्या वेळी गल्लीवर सुरनाट खेळत. याला काही ठिकाणी चिलीपाटही म्हणतात. जमिनीवर चुन्याने किंवा पाण्याने चौकोन आखून त्या रेषेवर समोरच्याला अडवण्याचा खेळ आम्ही नुसते लहानपणी पाहत होतो.
दिवस निंगाला की, नुसता खेळत राहते. सगळं लक्ष खेळातच, दोन ओळी शुद्धलेखन लिहिण्याचं जिवावर येते लेकाचं. याचं अक्षर म्हणसानं त निरा माकोड्याचे पाय. तिसरी, चौथीत गेला तरी अजून धड लिहिता-वाचता येत नाही. सकाळी दिवस निघाल्यापासून संध्याकाळलोक हातात नाव पुस्तक घेत नाही. असा सूर वडिलांकडून ऐकायला यायचा. विशेष हे की, वडिलांना सुरुवातीपासूनच शुद्धलेखनात फार इंटरेस्ट होता, दररोज मी एक पान किंवा अर्धेपान शुद्धलेखन लिहिलेच पाहिजे. त्या पानावर कोपऱ्यात त्या दिवशीची तारीखही लिहिलेली असावी, असा त्यांचा आग्रह होता. यामुळे अक्षर सुधारते, असे ते मला लहानपणापासूनच सांगत होते, पण लक्ष कोण देते. नळी फुंकली सोनारे, अन् इकडून तिकडे गेले वारे याप्रमाणे आपलं सुरू असायचं.
एक दिवस पहाटे उठल्यावर मित्र साहेबराव भेटला. चाल आपून खालतल्ल्या वावरातून जाऊन येऊ. म्हटलं शाळेच्या टाईमावर आलो पाहिजे लेका. असं म्हणत आम्ही बोलत चालत गप्पा मारत त्याच्या कंचनपूर रस्त्यावर असलेल्या वावरात गेलो. तेथे त्याचे बाबा रात्री जागल होते. आणि सकाळी उठल्यानंतर आम्ही तेथे पोहोचलो म्हणून त्यांनी वावरातल्या गव्हाच्या ओंब्या तोडून आणल्या. आणि तापावर भाजून एका घमेल्यात आमच्यापुढे ठेवल्या. आम्ही मस्तपैकी गव्हाच्या ओंब्या खात तोंडं काळेभोर केले. ओंब्या खायच्या नांदात किती वाजले याचे भानच राहिले नाही. इकडे शाळेचा टाइम होत असल्याने घरचे शोध घेऊ लागले. गल्लीवर, निंबाखाली, पारावर, सातीत, चावडीवर पाहिले, मी कुठेच दिसलो नाही, शाळेचा टाईम झाला तरी घरी आलो नाही, म्हणून सगळे चिंतेत सापडले. एकतर हा सांगून गेला नाही. कुठे गेला पत्ता नाही. असे करत असताना मी भवानी मायच्या रस्त्याने खालतून साहेबरावाच्या सोबत येतांनी वडीलांना पाराखाली दिसलो. हातात भाजलेल्या गव्हाच्या ओंब्या होत्या. त्यावेळी वडील काही तर बोलले नाही. एक हात धरला आणि एक कान असा पिरगाळला की, मी आतापर्यंत कानखडीच लावली. तसा त्यापूर्वीही कधी मार बसल्याचे मला आठवत नाही. पण तेव्हापासून मारच काय माझ्यावर रागवायचे काम वडिलांना आतापर्यंत पडले नाही. बस झाले कमावले आपून.
.....................
आमच्या आंबेटाकळी गावात श्री विठ्ठल रुखमाई मंदिरात सुरुवातीपासून विविध धार्मिक कार्यक्रम होतात. अभंग, भजन, किर्तन, काकडा आरती यामुळे गावात वारकरी सांप्रदाय बराच आहे. जुन्या आणि वयस्कर लोकांच्या कपाळी अष्टगंध, बुक्का (अबिर) आणि गळ्यात तुळशीची माळ असे चित्र पाहावयास मिळते. माले आजोबा भगवान गव्हाळे हेही वारकरी सांप्रदायातीलच. त्यांचा प्रभाव आजही आमच्या घराण्यावर दिसून येतो. तिसऱ्या-चौथ्या पिढीतही आमच्या घरांत कुणी मांसाहार करत नाही. हेच संस्कार म्हणावे लागतील.
दिवस निघाला, आजोबा झोपेतून उठले, हातपाय तोंड धुतले की, पहिला नमस्कार त्यांचा सूर्यदेवतेला असायचा. त्यांच्या दिवसाची सुरुवातच सूर्याला नमस्कार करून होत होती. स्रान केल्यानंतर पूजा पाठ, देवपूजा, आमच्या धाब्यातील, घरातील एका भिंतीला देवदेवतांच्या तसेच वेगवेगळ्या संतांच्या फोटोची रांगच लटकलेली होती. त्या प्रत्येक फोटोला नमस्कार करून अंगणातील तुळसीसमोर पाटावर बसत. एका तांब्यात पाणी घेऊन हातावर पाण्याचे थेंब टाकून त्यावर चंदनाचा खडा उगाळत. हे चंदन शंकराच्या पिंडीला, शाळिग्रामला लावून त्यावर अष्टगंध, बुक्का लावत. नंतर आरशात पाहून स्वत:च कपाळाला चंदनाचा टिळा लावत. एवढ्यावरच न थांबता ते दोन्ही हाताच्या मनगटाला, दंडाला, कानाला तसेच पोटाच्या ढेरीला चंदनाचे ठिपके लावत होते. नंतर हरिपाठ घेत. हा नित्यनेम अखंडपणे सुरू असायचा.
त्याचप्रमाणे दररोज सायंकाळी दिवस मावळण्यापूर्वी नित्यनेमाने दर्शनासाठी गावातील मंदिरात जात होते. पाराखालच्या मारोतीला नमस्कार करून गावाच्या फेरीला सुरूवात करत. रस्त्याने जाताना आपआपल्या घरासमोरील ओट्यावर बरेच जण शेतातून आल्यानंतर थकून भागून गप्पा मारत बसलेले असत. त्यांना रामराम करत आबांची दिंडी राममंदिरात पोहचे. तेथे सुरुवातीला मारुतीचे, नंतर राम-लक्ष्मण-सीतेचे दर्शन घेऊन विठ्ठल मंदिरात जात. सद्गुरु नारायण महाराजांच्या गादीचे दर्शन घेत. तेथे नारायण महाराजांची प्रतिमा असून बाजूला भुयारात मूर्तीही आहे. नारायण महाराजांच्या अंत्ययात्रेत स्वत: टाळ वाजवत सहभागी झालो होतो, असेे आबा अभिमानाने सांगत.
विठ्ठल मंदिरातून पुढे मारुती मंदिरात अर्थात मढीत जात. तेथे किसनगिरी महाराज यांचे दर्शन घेत. एवढ्यावरच न थांबता किसनगिरी महाराजांचे पाय चेपून देत. त्यानंतर वाणी वेटाळातील शिव मंदिराला दुरुनच हात जोडत असत. मी लहान असताना आबासोबत बरेचदा अशी दर्शनाची फेरी करत होतो. त्यामुळे आमचे वडील आजही कपाळाला अष्टगंध चंदनाचा टिळा लावतात. दरवर्षी त्यांची पंढरीची वारीही सुरू असते. सुरुवातीपासूनच धार्मिकतेचे वातावरण आमच्या घरी आहेे.
तर आमच्या घराच्या बाजुलाच तुळशीरामबुवा उंबरकार राहत. जवळचे नातलग. सुरुवातीला त्यांची मोठी माडी होती. रेशनचे दुकानही होते. तुयशीरामबुवा म्हणजे, त्या काळातील मोठी असामी होती. आमच्या वेटाळात रेडिओ फक्त त्यांच्याच घरी होता. रेडिओतील बातम्या ऐकण्यासाठी आणि रेडिओमधून येणाऱ्या त्या आवाजाचे कौतुक पाहण्यासाठी लोकांची तेथे गर्दी होत असे.
तुयशीराम बुवाचा स्वभाव म्हणजे फारच मजाकी. त्यांची खासियत म्हणजे, त्यांच्या आजूबाजूले नेहमी पोरासोरांचा गराडा असायचा. कारे बाबू, पुंगी नाही वाजवत का औंदा? असं म्हणून खिजोत जाये. म्हणून पोरंही बुड्याजोळ जाऊ जाऊ बसत, आबा, माह्यासाठी पोरगी पाहा ना, असं म्हणत आबाशी जाणून खेटे घेत. समाजातील एखाद्याचे लग्न जुळवायचेे म्हटले की,आजूबाजूच्या पाच पन्नास खेड्यातले लोक तुयशीरामबुवाजवळ येत. फार मोठा परिचय होता. काही लोकं त असंही म्हणत, ‘तुयशीराम बुवाजोळ बोंबाळ पोरंपोरी हायेत लग्नाच्या, काही वान नाही. कधीही जा, बुड्याच्या एका खिशात पोराईचे पत्ते अन् दुसऱ्या खिशात पोरीचे पत्ते असतात.’
दुसरं असं की, तुळशीराम बुवाले पान लागलेले होते. सर्पदंश होण्याला खेड्या-पाड्यात पान लागणे असे म्हणतात. या व्यतिरक्त गावातील ज्ञानदेव बेलदाराला सुध्दा पान लागलेले होते. तुळशीरामबुवाच्या अंगात चंदनशेख (चंदनशेष) तर ज्ञानदेव बेलदाराच्या अंगात डोंब्याशेक येत होता. अशातच मळसूर येथील सोपीनाथ महाराजांचे ठाण आमच्या आंबेटाकळीत आले. फाट्यावर सोपीनाथ महाराजांचे मंदिर उभारण्यात आले. तेथे चांदीची नागाची मूर्ती आणून पूजा अर्चा होऊ लागली. अजूनही नागपंचमीला भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.
सोपीनाथ महाराज किंवा नागराजाची भक्ती करणारी अरबडी मंडळी त्या काळात आमच्या गावात होती. त्यातील काही आजही हयात आहेत. या भक्तांना ‘अरबळे’ म्हटल्या जाते. तर त्यांच्या गाण्याला बाऱ्या आणि भजनाला ठावा म्हणतात. या ठाव्यात एक खंजेरी (डफळी) च्या तालावर दोन हंडे आणि त्यावर ठेवलेली परात एका हातात लोखंडी कडे घेऊन वाजवायची आणि दुसऱ्या हाताने परातीला थाप द्यायची. अधूनमधून तुळशीराम बुवाच्या घरी ठाव्याचा कार्यक्रम होत होता. या अरबळ्यामध्ये ठाकरेबुवा हे पुजारी होते. त्यांच्या समोर ठाव्यात तुळशीरामबुवाच्या आंगात येत असे. ठावा रंगात आला की, हळूहळू तुळशीराम बुवाच्या अंगात देव यायला सुरुवात होत होती. मग ते घुमू लागायचे. ठाव्यात समोर ठेवलेल्या नागोबाच्या पाटीजवळ डोक आदळायचे. नागोबाच्या पाटीजवळ बसलेले भगत ठाकरेबुवा एखादे लिंबू हुंगायला द्यायचे. आणि बोला देवा, म्हणून कोडे विचारायचे. असा हा ठावा आम्ही लहानपणी नेहमी पाहायचो.
मग तुळशीरामबुवा घरी नसले की, तुळशीरामबुवाचा मुलगा अंबादास, मी माझा लहान भाऊ आणि गणेश या ठाव्याची ‘कॉपी’ करायचो. अंबादास डफळी वाजवायचा, मी हंड्यावरची परात आणि गणेश झांज (भजन) वाजवायचा. आमचा ठावा सुरू असताना अचानक तुळशीरामबुवा घरी टपकायचे. ‘मस्त वाजवता रे पोरहो’ म्हणायचे. आम्हाला बाऱ्या म्हणता येत नव्हत्या. पण ठावा करता येत होता. एवढेच नाही तर कधी कधी या वाद्याचा आवाज ऐकून तुळशीरामबुवा रंगून जात, हळूहळू घुमायला लागत, आणि डोलता डोलता अंगात आल्याने असे ‘हुसहुस’ करत की मग आम्हालाही काही सुचेना !
हे तुम्हाले खरं वाटत असलं तरी खरं वेगळंच आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, म्हणून उल्लेख टाळला. तरी काही राहवलं गेलं नाही. आता ‘जे हाय ते असे हाय’. बहुतेक तेव्हा ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा.. मै नागीन, तू सफेरा‘ हे गाणं हिट झालं होतं. जो तो नगिना पिक्चरची स्टोरी सांगे. एकदिवस तुयशीरामबुवा आले,’काय लावलं रे नगिना, नगिना, चाला तुमाले नगिना दाखवतो’ असं म्हणत, दोन-चार पोराईले घेऊन आबा पायऱ्याईनं धाब्यावर गेले. उभे राहिले अन् समोरून धोतराचा काष्टा सोडत वाकले. मागून धोतर वर करत ढुंगण दाखवत म्हणाले, ‘आता पाह्यला किनी नगिना?’ पोट्टे गायब. असा स्वभाव होता, या आबाचा.
..................
सध्या खामगाव तालुक्यात सर्वात मोठी चौफुल्ली कुठे आहे, असं जर एखाद्याला विचारले तर ती आंबेटाकळीला आहे. असे सांगेल. पण जुन्या काळात आंबेटाकळी गाव कुठे आहे असे विचारले तर बऱ्याच लोकांना माहिती नव्हते. काळाच्या सोबत हळूहळू बदल होत गेले. कोपऱ्यात पडलेलं गाव रस्त्यावर आलं.
खामगाव ते मेहकर आणि बाळापूर ते उंद्री या रस्त्यावर हे गाव आहे. आता श्रीक्षेत्र शेगाव ते पंढरपूर हा महामार्ग येथून जाणार आहे.पूर्वीच्या काळात फक्त एकच एसटी बस आमच्या गावावरुन ये-जा करत होती. सकाळी १० वाजता आणि दुपारी ४ वाजता खामगाव येथून सुटणारी शिर्ला गाडी रेंगटीच्या माथ्यावर आली की इकडे १ किमी अंतरावर गावात ‘हँगहँग’ असा आवाज ऐकायला यायचा. दिवसभरात रस्त्याने दुसरे वाहनही येत नसे.
खामगावपासून २५ किमी पर्यंत आंबेटाकळीच्या जवळपास पर्यंतचा रस्ता म्हणजे आजच्या जागृती शाळेपर्यतचा रस्ता डांबरीकरण झाला होता. तर रेंगटीच्या कलव्यापासून ठाकरेचा मळा, त्या मयात रोडले लागून एक विहीर, त्यावर मोटीसाठी लावलेले एक लाकडी चाक दिसायचे. मध्येच बोंदाडीचा नाला, हटेलपर्यंत रस्ता गिट्टीचा होता. खामगावच्या दिशेकडून डांबरीकरणाचे काम पुढे-पुढे सरकत गावाकडे येत असल्याचे त्यावेळी समजले. मग ते काम पाहण्यासाठी टायरचे चक्के, आणि ताराच्या घनगड्या दामटत घेऊन पोरंपोरं रेंगटीच्या माथ्यालोक दररोज जात होतो. रस्त्याच्या बाजूला चुन्याने रंगवलेल्या गोट्यावर उभे राहून एसटीची वाट पाहत होतो. एसटी आली की लगेच सावधान होऊन जयहिंदची सलामी देत दगडावर उभे राहायचे, त्याला एसटी चालकही प्रतिसाद देत, ओळख नसताना ड्रायव्हरने नमस्कार केल्याने मोठेपणा वाटे.
दुसरे म्हणजे, त्यावेळी आतासारखे एका रात्रीतून ५-१० किमी डांबरीकरण होत नव्हते. आता मशिनद्वारे कामे लवकर उरकतात. गावाजवळच्या या १ कि.मी. च्या डांबरीकरणाला जवळपास आठवडाभराचा कालावधी लागला असावा.
खामगाव- दे. साकर्शा मार्गे मेहकर असा रस्ता पूर्वी नव्हता, इकडून देऊळगाव साकर्शा पर्यंत गिट्टीचा रस्ता होता. तर तिकडे मेहकरकडून गोमेधर-वरवंड पासून पहाडातील रस्त्याचे कामच सुरू होते. त्या काळात खामगावपासून थेट मेहकरपर्यंत एसटीही सुरू नव्हती. फक्त खामगाव ते शिर्ला अशा सकाळ संध्याकाळच्या दोन फेऱ्या व्हायच्या. काही दिवसानंतर पाथर्डीच्या घाटातून रस्त्याचे खडीकरणाचे काम हळूहळू सुरू झाले. पण मेहकर येथून देऊळगाव साकर्शांला जाणारी गाडी अमडापूर मार्गे खामगाव आणि नंतर खामगावहून दे. साकर्शा अशी बरेच वर्षे सुरू होती. नंतर पाथर्डीच्या घाटातील काम सुरू असताना मेहकर डेपोने लोणी-शेगाव-मेहकर अशी एक बसफेरी सुरू केली. या गाडीच्या बोर्डवरुन ही गाडी खामगावहून लोणीला चालली की मेहकरहून शेगावला चालली हे काहीच कळत नव्हते. कारण ही बस रिसोड तालुक्यातील सखाराम महाराजांच्या लोणीला जात होती. आणि आमची धाव फक्त खामगाव तालुक्यातील लोणी कदमापूरपर्यंतच होती. लोणीले आपले भावबंध असतात. एवढाच आवाका होता. त्यामुळे डोके काही चालेना.
अशातच आजोबांनी लहानपणी आम्हाला याच गाडीत बसवून वडीलांच्या फॅमिली पासवर लोणीला नेले होते. त्यावेळी हा रस्ता पहिल्यांदाच बघितला होता. आता तो पंढरपूर-शेगाव महामार्ग बनणार आहे.
दुसरे म्हणजे त्यानंतरच्या काळात उंद्री ते बाळापूर हा आडवा रस्ता टाकण्यात आला. त्यामुळे बुलढाणा ते आंबेटाकळी ही गाडी दुपारी १ वाजता काही दिवस सुरू झाली. कालांतराने मेहकर-लाखनवाडा, मेहकर-जळगाव जामोद, ह्या बस अनेक वर्षे सुरू राहून बंद पडल्या. दिवसेंदिवस खामगाव ते मेहकर मार्गावर सर्वाधिक आॅर्डनरी बसेस वाढल्या, सुरुवातीला जिंतुर ते शेगाव हीच एक जलद गाडी होती, आंबेटाकळी ते खामगाव या २६ किमी अंतराचे या गाडीचे तिकीट फक्त २ रुपये ४० पैसे एवढे होते. नंतर गंगाखेड-शेगाव ही जलद गाडी चालली. ती सध्या अमडापूर लव्हाळा मार्गे धावते. आणि आता एसटी बसेसची वर्दळ एवढी वाढली आहे की विचारता सोय नाही.
दरम्यानच्या काळात आणखी एक नवलाची गोष्ट आम्ही पाहायला बस स्टॅण्डवर, फाट्यावर जात होतो. खामगावला दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. तालुक्यातून खेड्यापाड्यातून शेतकरी तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणात बाजारला जात होते. खामगावची बाजारपेठ संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात मोठी आहे. कापूस विकण्यासाठी शेतकरी बैलगाड्या घेऊन लांबून येत जिनिंग-प्रेसिंगची संख्याही अधिक होती. तसेच दर गुरुवारी शेगावला जाणाऱ्या भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत होती. पण त्या तुलनेत एस.टी. गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे एस.टी बसगाड्या दाबून भरुन येत. यावर मात करण्यासाठी खामगाव डेपोने एक प्रयोग राबवला. शेगाव करीता एक जोडगाडी सुरू केली होती. आणि गुरुवारी अटाळी- आंबेटाकळी मार्गावर बाजारामुळे गर्दी होत असल्याने ही एसटीची जोडगाडी खामगाव ते शिर्ला अशा दोन फेऱ्या मारत होती. एकामागे एक अशा दोन गाड्या जोडलेल्या असल्याने त्या पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असे. ही लांबलचक जोडगाडी छोट्या-मोठ्या वळणावर पलटवणे चालकाला कठीण जात होते. जोडगाडीवर सीख ड्रायव्हर असे. आणि दोन कंडक्टर असत. मागच्या गाडीच्या कंडक्टरसाठी लांबलचक दोरीने घंटी बांधलेली असे.
त्या काळात आमच्या गावातल्या गल्लीवर बैलजोड्या बांधलेल्या असायच्या. गावातून कुठेही गेले तरी बैलाच्या गळ्यातील कसांड्यांचा आवाज यायचा. रस्त्याच्या बाजूला सोडलेल्या बैलगाडीवर, गाडीच्या धुऱ्यावर, चाकावर बसून रात्री उशीरापर्यंत गप्पांचे फड रंगत होते. आता बैलगाड्या आणि बैलजोड्यांची संख्या कमी झाली असून मोटार सायकलीची गर्दी वाढली आहे. ज्या गावात एकही ट्रँक्टर नव्हते, त्या आंबेटाकळीत आता ट्रॅक्टर उभे करायला जागा नाही. पाराजवळच्या पांढरीत नेऊन उभे करावे लागत आहेत. एवढी संख्या वाहनांची वाढली आहे.
तसेच मंदिरात आणि महालेबुवाच्या घरी बीएसएनएलचा लँडलाईन फोन होता. त्यावेळी त्या डब्याचीही नवाई होती. आता प्रत्येकाच्या खिशात एक आणि घरात चार-चार मोबाइल आहेत. घरात माणसं कमी आणि या मोबाइलची संख्या भरमसाठ झाली आहे. घरातल्या मातीच्या भिंती, त्याला खेटून उभी असलेल्या उतरंडी हारपल्या. कोयसा, राखोंड्याने गच्च भरून राहणाऱ्या मातीच्या चुली गेल्या, सिमेंटची घरे, ओटे बांधल्या गेले आहेत.
तोरणा मन नदीवर धरण बांधण्यात आल्यामुळे बरळाच्या जमिनीवर गहू, हरभरा, पिकत आहे. ज्या शेतात व्हलगं येत नव्हते, तेथे दोन-दोन पिकं शेतकरी घेत आहेत. व्हलगं म्हणजे पुण्या- मुंबईकडे त्याला “कुळीथ” म्हणतात. फाट्यावर सुपोबाच्या मंदिराजवळ वडाचे भले मोठे झाड होते. त्या झाडाच्या खालीच एक छोटीशी झोपडी होती. झोपडीवर नेहमी पारंब्या लोंबत. झोपडीचे म्हणजे हटेलीचे तोंड उत्तरेकडे, या हॉटेलच्या समोर वडाच्या बुडखाजोळ चोहोबाजूने दगड-मातीचा ओटा बांधलेला होता. तेथे रिकाम टेकडे येऊन आपला टाईम घालवत. खिशातली डायरी काढून वरली बहाद्दर त्यावर पेनाने आकड्याची जुळवाजुळव करत. दुपारी बकर्या चारणारे तेथे येऊन दुपारचे जेवण करत. या झोपडीच्या समोर एका बाजुला पाण्याचा रांजन आणि त्याला लागूनच एका काडीवर जर्मनचा ग्लास उलटा ठेवलेला असायचा. या हॉटेलमध्ये एका जर्मनच्या थाटलीत भजेच ठेवलेले दिसायचे. त्या भज्यातून कांदे बाहेर डोळे काढून पाह्यत. तेथे दुसरे खाण्यासारखे पदार्थ नसायचेच, फक्त भजेच असत आणि त्या भज्याच्या थाटलीजवळ हॉटेलचे मालक मुरलीधर इंगळे बसलेले असत. त्यांची विशेषत म्हणजे अंगात शर्ट कधीच नसे. नेहमी पट्ट्याचे शिवलेले बनियन, त्यांच्याही हातात छोटीशी डायरी असायची, त्यावर वरलीच्या आकड्यांचा हिशोब सुरू असायचा. याच हटेलच्या झोपडीत मागच्या बाजूला चूल, त्यावर बुवाची बायको स्वयंपाक करायची. मुलबाळ नसल्यामुळे ते तेथेच मुक्कामी राहायचे. त्यांचे घरदार म्हणजे ही हॉटेलच. बरेच वर्षे हे जोडपे फाट्यावरच्या झोपडीत वास्तव्याला होते.एके दिवशी रात्री अचानक पाच-सहा दरोडेखोर आले आणि मुरलीधर यांच्यावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांनी फाट्यावर मुक्कामी राहणे सोडूनच दिले. दरम्यानच्या काळात आंबेटाकळी फाट्यावर सायंकाळनंतर रात्री चिटपाखरुही राहत नव्हते. त्या आंबेटाकळी फाट्यावर आता हॉटेल, ढाबे, आणि इतर छोटी-मोठी दुकाने, व्यवसाय वाढले असून शेतजमीन प्लॉटचे भावही वाढले आहेत.
.......
आपण बाजारात गेलो की मेथीची भाजी, पालक, आंबटचुका, घोळाची भाजी ही नावे ऐकतो. शेतात, जंगलात गेलो की, अंबाडीची भाजी, फांजीची भाजी अशा भाज्या घेऊन येतो. पण ही बोंडाची भाजी काय असते? हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल.
आता सुरुवातीला हे पाहू की, बोंडं म्हणजे काय? आणि कशाला बोंडं म्हणतात. आमच्या ग्रामीण भागात पूर्वीच्या काळात फक्त सणा-सुदीच्या दिवसातच गोडधोड पदार्थ खायला मिळायचे. गव्हाची पोळीही लहानपणी मिळत नव्हती. सण असला म्हणजे पोळीकडे ‘टुकणी’ लावून टकटक पाहत बसायचे. जर गव्हाच्या पोळीची एवढी नवाई तर मंग ‘भजे’ म्हणजे फारच न्यारी गोष्ट. सणाशिवाय कोणी वडे-भजे करत नसे. कढईत तळलेल्या भजाची मजा अलगच असते. पण ते फक्त सणासुदीलाच केले जात.
आमच्या आबांना भज्याची भाजी खूप आवडायची. पण बुढा कंजूष म्हणून गावात परिचित होता. काही लोकं मला अजूनही म्हणतात, “दुसरा भगवानबुवाचं आहे हा, जरासाक नाई चुकला. कंजूष मारवाडी.‘ त्यामुळे कढईत भजे तळून काढायचे नाहीत. तर तव्यावर थोडे तेल गरम करून त्या कमी तेलातच भजे तळून काढायचे. आणि ते नंतर भाजीमध्ये टाकायचे. जे कढईतून तळल्या जातात त्याला भजे म्हणत आणि जे तव्यावर कमी तेलात काढल्या जातात त्याले ‘‘बोंडं’’ म्हणतात. दुसरे बोंड कापसाचेही असते. मात्र हे भाजीसाठीचे, बेसनाचे बोंडं आकाराने भजापेक्षा थोडे मोठे आणि चपटे बनतात. त्यात तेल कमी असते. असा तो बोंडं बनवण्याचा फॉर्म्युला होता. हे बोंडं भाजीच्या रश्यात टाकले की जोरदार बोंडाची मसाला भाजी तयार होत असे.
मी तेव्हा बहुतेक तिसरीतच असेल. एके दिवशी आमच्या आबांना अशीच बोंडाची भाजी खाण्याची इच्छा झाली. आणि आईला बोंडाची भाजी करण्याचे सांगितले. तेवढ्याच चुलीवरचे गरम झालेले पाणी आंघोळीसाठी टाकल्यामुळे मी टॉवेल घेऊन न्हाणीत आंघोळीला गेलो.
आमच्या घरची आंघोळीची न्हाणी म्हणजे अंगणातील एका बाजूला भिंतीजवळची कोपऱ्यातील जागा. खोल शोषखड्डा खोदून त्यात खाली विटा टाकलेल्या, त्यावर टोयगोट्यांचा थर. तुम्ही म्हणाल की, ‘ये टोयगोटे क्या होते है?‘ तो गोल गोल दगड कू हम टोयगोटे बोलते है. या दगडावर एक सपाट दगड ठेवलेला, त्यावर बसून आंघोळ करायची. तेथेच बाजूला मातीचे गंगाय आणि कौलाचे टुकडे असायचे. ते घासून अंगावरची माती काढली जायची. त्याचीही फार धास्ती असायची. अंगाला खरखर लागत असल्यामुळे कोणी आंघोळ घालून द्यायला यायच्या पहिलेच, भुरभुर अंगावरून पाणी घेत ‘हर बोला महादेव करत‘उरकून घेण्यातच भलाई होती. इकडे हे सगळं झाले.
तिकडे आईने चुलीवर तवा ठेवला. बोंड करण्यासाठी तव्यावर तेल ओतले. आणि बोंडं तयार करणे सुरू झाले.थोड्या वेळाने चुलीवर बोंड तयार झाले म्हणून त्याच्यातील तेल थंड होण्यासाठी आईने तवा चुलीच्या बाजुने ठेवला. सकाळची वेळ असल्याने थंडी होती. आंघोळ झाल्याने मी लाल रंगाचा आबाचा पतला रुमाल अंगावर गुंडाळून धावत पळत चुलीजवळ आंग शेकण्यासाठी आलो. आमच्या घरात खाली फरशी नव्हती. मातीने सारवलेल्या या घरात बाजुच्या घागरीतले पाणी सांडलेले होते. आणि नुकतीच आंघोळ केल्यामुळे माझ्या अंगावरूनही पाणी झिरपत होते. दोन्ही योग एकत्र आल्याने मी चुलीजवळ बसत असताना पाय घसरून रपकन पडलो. दोन्ही पाय पुढे आणि माझे ढुंगण आपटले, त्या गरम तव्यावर. आंघोळ केली, चड्डी बनियन न घालता नुसता पतला रुमाल अंगावर घेऊन पळाल्याने त्या गरम तेलात चांगलीच भाजल्या गेली. चांगले मोठे मोठे फोड आले. अंगार कशी झाली असेल याचा विचार न केलेला बरा.
रडत असताना कोणी दूध लावा म्हणे त कोणी पेनातली शाई लावा म्हणे. अशातच मला घरच्यांनी ताबडतोब गावातील डॉक्टरांकडे नेले. त्यांनी जळालेल्या, भाजलेल्या जखमेवर लावण्यासाठी मलम दिला. तो मलम लावता येत नव्हता. आणि मी दुसऱ्यांना लावू देत नव्हतो. चड्डी नेसणे बंदच होते. कसातरी लाजेखातर त्याच नरम रुमालाचा लंगोट गुंडाळत होतो, मलम लावण्यासाठीही मोठी कसरत करावी लागे. उपडे झोपल्याशिवाय ढुंगणाले मलम तरी कसा लावणार? बरेच दिवस हा कार्यक्रम चालला. अन् या घोरात त्या बोंडाच्या भाजीची टेस्ट घेण्याचेही राहून गेली.
तवा गरम, तेलही गरम, बाहेरच्या उजेडातून एकदम पळत घरात गेल्याने त्या ठिकाणी अंधारात काही न दिसल्याने हा प्रकार घडला. माझे ढुंगण भाजल्यामुळे मला कुणी फारसे बोलले नाही. मात्र गरम तवा बाजूला तसाच ठेवल्याबद्दल आईला याच्याहून- त्याच्याहून बोलणे ऐकावे लागले. त्यानंतर बहुतेक तव्यावरचे ‘बोंडं’ बंद झाले. आणि कढईत तळलेल्या भजांची भाजी आमच्या घरी तयार होऊ लागली. तेव्हापासून ‘बोंडंच’ नव्हे तर ‘भज्याची भाजी’ म्हटले की, ‘नाही.. नाही..माही गांडुली शेकली.' आता एखाद्यावेळी या गोष्टीची आपोआपच आठवण येते.
.....................
आमच्या वडिलोपार्जित घराजवळ म्हणजे जुन्या धाब्याजवळ भिंतीला लागून पाण्याचा आड आहे. ‘आड’ म्हणजे अंगणातील किंवा दारातील विहीर. तेव्हा नळ पाइपलाइन, टँकरची सुविधा नसल्याने जवळपास घरोघरी नाही म्हटले तर दोन घरांमिळून एक तरी विहीर होती, त्यातल्या काही आजही आहेत. आपल्या स्वत:च्या जागेत म्हणा किंवा वाड्यात स्पेशल विहीर असली तर भांडणाचे काम नाही. पण दोघां -तिघांमिळून असली म्हणजे पाणी ओढण्यावरून, काढण्यावरून, दोर-बाटलीवरून वाद- भांडण होतात. समजा कधी भांडण झालेच नाही तर एखादी जुनी कुरापत उकरून काढणारे असतात. म्हणजे भांडणाशिवाय ज्याईले गमतच नाही. असे नग प्रत्येक खेड्यात आजही दिसून येतात.
आमच्या घराजवळची विहीरही अशीच दोघांमिळून होती. पण पाणी भरायला कुणालाच मनाई नव्हती. तरीही एक गडी पाणी भरतांना जाणून बुजून खाजवायचा, दादागिरी करायचा. शेजारच्या या किसनाला दोन लहान भाऊ असल्याने पाठबळ मिळायचे. याला पठ्ठ्याले नुसते एकच काम होते. कोठ्यातले बैलं, ढोरं-वासरे सोडणे, अंगणात नेऊन बांधणे, या जनावराईले विहिरीवर पाणी पाजणे, शेतात चारायला नेणे. संध्याकाळी घरी येतांना डोक्यावर ढोरांसाठी गवताचा मोठा भारा आणणे. घरी आल्यावर गुरेढोरे गोठ्यात बांधणे अन् त्याईले चारा टाकणे एवढेच काम होते. बरं त्याचा गवताचा भाराही एवढा मोठा असे की, दोन माणसांना उचलणे भारी होते.
जवान असल्यामुळे अंगात मस्ती भरलेली. म्हणून की काय? हा गडी विहिरीवर पाणी भरतांना एखाद्या बाईच्या अंगावर बाटलीचा दोर भिरकावण्याच्या टवाळ्या करे. कोणी उलटून बोलले तर भांडणाचे धन. आपल्याजवळ भांडण करण्याची ताकद नाही. म्हणून सगळे चूपचाप सहन करत. सुरुवातीला गुरे ढोरे सोडबांध करतांना गडी विनाकारण ढोरा-वासरांना मारहाण करुन शिव्या देऊ लागला. नंतर माणसांकडे बाईकडे पाहून बैलांना, गाईला शिव्या देऊ लागला. पण याच्याशी कोण वाद घालणार? गडी धिप्पाडच तसा होता. चार जणांना उचलणार नाही एवढ्या वजनाचा आणि मोठा गवताचा भारा दूरच्या शेतातून घरी आणे. पण मंधात कधी डोक्यावरून खाली ठेवत नव्हता. वेटाळातील इतरांना मात्र माणुसकीने ‘रामराम’ करायला विसरत नव्हता. आणि इकडे विहिरीवर अंगातले सगळे कपडे काढून आंघोळ करायला भीत नव्हता.
आमच्या घरासमोरील विहिरीवर त्याची शिविगाळ सुरू राहायची. नंतर त्याला एकच वेड लागले. दोर बाटलीने केव्हाही पाणी काढायचे आणि दांडात ओतून द्यायचे. डेली सकाळ- दुपार- संध्याकाळ त्याचा कार्यक्रम सुरू असे, पण त्याला घरचेही काही म्हणत नव्हते. आम्ही समजावून सांगायला गेलो की, ‘‘जाऊ द्या ना मॅड आहे लेकाचा, त्याच्या कुठी नांदी लागता हो’’
मग आमचे आबा घाबरून विहिरीकडचा दरवाजाच बंद ठेवत. आम्ही घाबरतो हे त्याने ओळखले. आणि आमचा दरवाजा नेहमी आतून बंद असल्याने त्याने मग दरवाज्याला लाथा मारणे, दगड मारण्याचा प्रकार सुरू केला. त्यामुळे आम्ही घरातले सगळेच त्याला घाबरत होतो.
आजी-आबा थकलेले. वडील एस.टी. कंडक्टर असल्याने ड्युटीवर गेलेले असत. घरी आई आणि आम्ही छोटेमोठे तिघे-चौघे भावंडं. त्यामुळे आपोआपच त्याचे मनोबल वाढले. काही कारण नसतांना आमच्याशी खेटे घेणे सुरू केले. एवढेच नाही तर एके दिवशी त्याने चक्क घराच्या दरवाजाजवळ येऊन विनाकारण शिविगाळ सुरू केली. आईच्या छातीत दगड मारला. तेव्हा प्रकरण पोलिसांत गेले. हिवरखेड पोलिस ठाण्यात कैफियत दिली. त्याच्या दोन्ही भावांनी सोडून आणल्याने गडी पुन्हा चेकाळला. नंतर आमच्या घरातील कोणीही दिसले की, त्याच्या नाका-डोळ्यात सले. एवढा तो आमचा खार खात होता.
दिवस काही सारखे राहत नाहीत. चढउतार आयुष्यात येतातच. आम्ही लहानचे मोठे झालो. अशातच त्याने एके दिवशी मी आणि आबा आम्ही तिळाच्या पेंढ्या बांधत असताना कुरापत काढली. पेंढी बांधतांना याने माझ्याकडे पाहून ओठ दाबले. असे म्हणत मॅडने शिवीगाळ करणे सुरू केले. त्यावेळी घरातील सायकलची चेन आणून झोडपण्याच्या तयारीत असताना घरच्यांनी आवरल्याने हुकले. तरीही त्याचे सुरूच होते.
माणसाला जगात शिकण्यासारखे बरेच अनुभव येतात. जो गरीब आहे, दुर्बल आहे, त्यांना साधे जीवन जगणे कठीण होते. आपल्या पाठीमागे कोणी नसले की, जो तो फायदा घेतो. उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्याचे लेकरं लहान, त्यात वडील थकलेले असले की, लोकं त्रास द्यायला लागतात. सुरुवातीला पत्नीला, मुलगी असेल तर नंतर त्या मुलीला अशांच्या तावडीतून वाचवणे म्हणजे महाकठीण काम. तेच जर तुम्हाला दोन-तीन मुलं असू द्या, किंवा भाऊ असू द्या. त्याच्या कुटुंबाकडे पाहण्याचीही हिंमत सहजासहजी कोणी करत नाही, अशी समाजाची परिस्थिती आहे. इथे मुलीपेक्षा मुलाला अधिक महत्त्व देणे, हा माझा उद्देश नाही. पण आपल्या मागे-पुढे दादा, भाऊ, काका, तात्या, साला, मामा असा गोतावळा असणेही तितकेच आवश्यक आहे. एकंदरित आपण संघटित, एकत्रित राहण्याची फार गरज आहे, असंही वाटते माणसाले कधी कधी.
नेहमीप्रमाणे असंच एक दिवस उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी मी आणि आजी आम्ही शिवच्या वावरात गेलो होतो. तिकडेच त्या किसनाचे वावर आहे. जाण्या-येण्यासाठी एकच पाऊलवाट होती. घरून जातांना तो आम्हाला रस्त्याने दिसल्याने किंचित घाबरलो. पण मला खात्री होती की, तो गडी शेतात एकटा असला की, भांडण करत नसे. आणि स्वत:च घाबरत असे. त्यामुळे शेतात आम्ही त्याला घाबरत नसो. शेतातील थोडेफार काम आटोपून दुपारी १२ वाजताच्या सुमारास आजी आणि मी घराकडे निघालो. पाऊल सगराने जात असताना बाजूच्या ओसाड विहिरीतून फूस फूस असा आवाज येऊ लागला. वाटले त्या विहिरीत एखादा साप असावा. परंतु माणसाचा आवाज आल्याने विहिरीजवळ जाऊन आत डोकावून पाहिले तर हा किसना पाणी पिण्यासाठी चक्क विहिरीत उतरलेला होता.
बोरीअडगावचे शंकर ठाकरे यांच्या शेतातील ही पडकी विहीर. आजूबाजूला वाळलेले गवत, काठावर एक बैलगाडीची लोखंडी आख रोवलेली, तेथेच मोठमोठ्या दगडाच्या फाड्या ठेवलेल्या, रस्त्याने जाणारा येणारासाठी पाणी काढण्याचा डबा आणि दोरी तेथेच लपवून ठेवलेली असायची. पण या मॅडला डबा आणि दोरी दिसलीच नाही. तहान लागल्याने या भयताळ्याने मागचा पुढचा विचार केला नाही. उतरला विहिरीत, मग त्याला विहिरीतून वर काही चढता येत नव्हते. विहिरीच्या काठावर मोठमोठ्या दगडाच्या फाड्या पडून होत्या. पण त्या दगडांना धरून चढले म्हणजे फाडी आपोआपच अंगावर पाडून घेणे होय. त्यामुळे किसना संकटात होता. आणि त्याला काही सूचतही नव्हते. मी विहिरीत डोकावून पाहिले असता तो सुरुवातीला एकदम घाबरल्यासारखा झाला. मला पाहून त्याने केविलवाणा चेहरा करून हात मागितला. मी सुद्धा कोणताही मागचा- पुढचा विचार न करता बाजूला रोवलेल्या गाडीच्या आखेला धरून त्याला दुसरा हात दिला व विहिरीतून बाहेर काढले.
घरी आल्यानंतर ही गोष्ट मी घरच्यांसह इतरांना सांगितली. तेव्हा मला सगळेच च्युत्या समजले. ‘बरं झालं बाबू त्यानं तुले अंदर नाही ओढलं, नाही तर मेला अस्ता कानी आज’. असं सांगत, ‘तूनं एखादी फाडी त्याच्या डोक्यात टाकायला पाहिजे होती’. असा सल्ला मला जो- तो देऊ लागला. त्यावर मी म्हटले, ‘मले त फाडी टाकण्याचीही गरज नव्हती. आपोआपच पडली असती, तो स्वतःच अंगावर पाडून मेला असता’.
खरं म्हणजे, मला इथे माणुसकीचा धर्म दिसला, शत्रू असला म्हणून काय झाले, किसना बिचारा त्यावेळेला संकटात होता, सावधही नव्हता, अशावेळी त्याचा घात करणे ही गोष्ट आपल्या मनालाही पटली नाही. त्यामुळे कोणी त्याला मॅड म्हणो
की मला?
.............
आता कसं झालयं? बाळ जन्मलं, एक वर्षाचं झालं की, त्याचा फर्स्ट हॅपीबर्थडे साजरा केला जातो. आणि दुसऱ्या वर्षी प्ले ग्रुप मध्ये नाव टाकल्या जाते. नंतर नर्सरी आणि हळूहळू केजी वन- टू सुरू होऊन फर्स्ट स्टॅण्डर्डमध्ये पोहोचतो. जन्मापासून त्याला इंग्रजीचे वातावरण मिळते. हे मोठ्या शहरातीलच नव्हे तर गाव-खेड्यातील चित्र आहे. त्यामुळे या मुलांना एकदा मराठीतले शब्द समजणार नाहीत, मात्र इंग्रजी हमखास समजतात. बहुतांश मुलांना मराठीतले फुगा, शनिवार, रविवार, पिवळा, केळी, बाहुली, सफरचंद हे शब्द समजत नाही पण बलून, सॅटरडे, सन्डे, यलो, बनाना, डॉल, अॅपल हे कळते. सोबतच अॅन्ड्रॉइड मोबाइल, कॉम्प्युटरची जोड मिळाल्याने एक-दोन-तीन ऐवजी वन टू थ्रीचा वापर सर्रास सुरू होतो. एवढेच काय? एखाद्या मोठ्या उच्चशिक्षित व्यक्तीला एकोणसाठ, एकोणसत्तर, एकोणऐंशी किंवा एकोणनव्वद हे अंक सांगितल्यास चुकीचे लिहिल्या जातात. किंवा हमखास दोन मिनिट विचार करून लिहावे लागतात. आणि कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांच्या तर हे डोक्याबाहेर गेलेले असते. याचा अनुभव घ्यायचा असल्यास एखाद्याला फक्त मोबाइल नंबर मराठीत सांगून पाहा, तो इंग्रजीत सांगितल्याशिवाय अनेकांना लिहिता येत नाही. अशी वाईट अवस्था आपल्या मराठीची, मातृभाषेची झाली आहे.
विशेष म्हणजे, मराठीत नंबर सांगितल्यास तो समजत नसल्याने इंग्रजीत सांगा, असे म्हणतांना कोणालाही काहीही कमीपणा वाटत नाही, उलट इंग्रजीत सांगा. असे म्हटले म्हणजे आणखी प्रतिष्ठेचे वाटते. आजची ही परिस्थिती आहे.
तर मी लहान असताना अगदी उलट परिस्थिती होती. सर्वत्र खेड्यापाड्यात जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळा होत्या. मोठ्या शहरातच कॉन्व्हेंट असाव्यात, कारण सन १९७९-८० मध्ये ग्रामीण भागात आजच्या सारखा इंग्रजीचा प्रसार झाला नसावा. रस्त्यावर जे मार्गदर्शक फलक लावलेले होते. त्याच्यावरील आकडेही मराठीतच होते. जसे उंद्री-२५ किमी, बाळापूर-२० किमी, खामगाव-२६ किमी., मेहकर-५१ किमी. असे पेंटींग केलेले होते. मोबाइल, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटरचा एवढा वापर नसल्यामुळे आमच्या डोळ्यांना १,२,३,४ असे देवनागरीतील आकडेच दिसत. एवढेच नव्हे तर सातवी पर्यंतच्या गणिताच्या पुस्तकातही मराठी आकड्यांचा वापर होता. त्यामुळे तिसरी चौथीच काय सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना 1,2,3,4 असे लॅटीन लिपीतील म्हणजे इंग्रजी आकडे लिहिता येत नव्हते. ते लिहिण्यासाठी प्रॅक्टीस नसल्याने खूपच भारी जात होते. एखाद्या शिकल्या सवरलेल्या मोठ्या माणसाला विचारावं तर ‘आमच्यावेळी असे इंग्रजी आकडे नव्हते बुवा, आम्ही मराठीतच शिकलो’. असं सांगून मोकळे होत.
त्याचे असे झाले की, मी चौथी पास झालो, तोपर्यंत गणिताच्या पुस्तकात सर्रास मराठी आकडे वापरत होते. पण चौथी पास होऊन मी ज्यावर्षी पाचवीत गेलो, त्याचवर्षी पाचवीचे सगळे पुस्तके बदलली आणि नवीन अभ्यासक्रम सुरू झाला. त्यानुसार पाचवी पासूनच्या गणितात इंग्रजी आकडे सुरू करण्यात आले. आमची ती पहिलीच बॅच होती म्हणा. आम्ही काय चेंडू- दांडू एकाचा, बदकाची चोच दोनाचा, चुलीवर चूल तिनाचा, बैलाची शिंगोटी चाराचा, उभा माणूस पाचाचा, उलटी चूल सहाचा, चंद्राची कोर साताचा, बुड्याची कुबडी आठाचा, झोपेल माणूस नवाचा आणि एकावर पुज्य दहा. नंतर एकावर एक अकरा हे आकडेमोड लेखनीनं पाटीवर केली होती. अन् हे वन-टू का फोर कधी पाहिलेच नव्हते. आता तुम्हीच सांगा लिहिणार तरी कसे? इंग्रजी आकडे लिहिता येत नसल्याने जीव रडकुंडी येत असे. आणि वर्गशिक्षक लयमोठे गणित घरून करून आणायचे सांगत. इकडे तं आकडे समजत नव्हते, वहीवर लिहिणे तर दूरच.
आम्ही त्यावेळी आमच्याच वेटाळातील आंबिलकार वाड्यात राहात होतो. घर होते, मात्र त्या श्रीकृष्णा मॅडच्या त्रासाला कंटाळून आम्ही काही दिवस या वाड्यात किसना पद्मणेच्या खोलीत राहायला आलो होतो. छोटेसे अंगण होते, शाळा सुटली की, संध्याकाळी तेथे बाज टाकून पुस्तक उकलून बसायचो. मात्र पाटीवर गणित लिहिणे, ते सोडवणे फारच कठीण जात होते.
शेतातून किसनाबुवा पद्मणे आले की, मी त्यांना विचारो. तेही मला काही इंग्रजीतले आकडे लिहून दाखवत आणि प्रॅक्टीस करून दाखवत. कधी-कधी आईकडून होमवर्कसाठी लिखाण कामासाठी मी मदत घेत होतो. पण या इंग्रजी आकड्यामुळे नुसता हिवताप आला होता. वाटे शाळेत जाणंच बंद करावं. अभ्यास नाही झाला की, शाळेत झोडपे बसत. मग रडत-पळत वहीमध्ये पेनाने हे आकडे लिहिण्याची प्रॅक्टीस करत मुकाट्यानं अभ्यास सुरू केला. हा भाषेतीलच नव्हे तर आयुष्यातील फार मोठा बदल म्हणावा लागेल.
.......
ज्यावेळी आणि ज्या वयात अभ्यास करायला पाहिजे, त्यावेळी आपल्याले अभ्यासाचे महत्त्व समजत नसते. हे नंतर मोठं झाल्यावर कळायला लागते. तोपर्यंत काळ आणि वेळ आपल्या हातातून गेलेला असतो. म्हणजे, लहानपणी बहुतांश मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो, असे मला वाटते.
त्यामुळे थोडाफार अभ्यास केला की चुळबुळ सुरू व्हायची, मग नदीवर जाण्याची घाई. आमच्या गावातल्या तोरणा नदीला चांगले पाणी असायचे. कव्हाच्या डव्हाजवळ पुरुषभर पाणी राहे. इथे पुरुष हे पाण्याची खोली मोजण्याचे एकक समजावे. पाण्यात तळाशी पाय टेकवून दोन्ही हात वर उंच करून इतरांना फक्त हाताचे पंजे दिसले की, समजावं इथं पुरुषभर पाणी आहे. तसेच इकडे आमच्या वेटाळातील शेवग्या खालीही पोहण्यालायक पाणी असे. नदीच्या काठावरून, खडकावरून पोट्टे धडाल उड्या मारत. एकमेकाच्या सोबतीने प्रत्येक जण पोहणे शिकत होते. एकदा पोहण्याची आवड लागली की, पाणी पाहताबरोबर उडी मारावी वाटते. जसे एखाद्या नाचणाऱ्याला बँड पार्टीचा आवाज आला की, कुठूनही घुसते. तशी परिस्थिती पोहणाऱ्याची असते.
नदीला तुडुंब पाणी, ते काय नुसतं पाहावं? शाळेत दुपारी जेवणाची सुटी झाली की, अर्धे पोरं नदीत असतं. काही छोटे काठावर पोहण्यासाठी गेलेल्यांचे कपडे घेऊन बसत. नदीत आंघोळ करून शाळेत गेले की, मास्तर बरोबर ओळखत जाय. डोक्याचे केसं तेल न लावल्यामुळे भुरके दिसतात. मग शाळेत पोहणाऱ्यांचा एक क्लास चाले. कधी कधी मास्तर या पोराईचे कपडे जप्त करून घेऊन जाये. त्यामुळे आंगातले सर्व कपडे काढून पोहणाऱ्यांची मात्र पाण्याबाहेर निघायची पंचाईत होत असे. मग शाळेतही मार अन् घरीही पिटाई, असा दुहेरी कार्यक्रम असायचा.
तेव्हा तोरणा नदीला पाणी असल्यामुळे मासोळ्याही भरपूर असायच्या. आमच्या नदीची विशेषत हे की, पात्रात रेती कमी आणि दगड जास्त आहेत. दगडं म्हटले की, त्या आडी मासोळ्या राहत. आमच्या घरचे सर्व वारकरी सांप्रदायाचे असले तरी लहानपणीचा मित्र साहेबराव हा मात्र मासोळ्या पकडण्यात तरबेज. शनिवारी सकाळची शाळा संपली, दप्तर फेकले की, गडी थेट नदीवर जायचा. विशेष म्हणजे, मासोळ्या पकडण्याच्या त्याच्या तीन पद्धती होत्या, त्यातलीएक म्हणजे एका हाताने हळूच दगड उचलायचा व त्या खालची मासोळी दुसऱ्याच हाताने पकडायची. यात तो मोठमोठे डोकळे पकडायचा. दुसरी पद्धत म्हणजे नदीकाठावर उभे राहून खोल पाण्यात गळ सोडायचा. त्या गळाच्या टोकाला शिदोड(गांडुळ) खोसायचा, आणि गळ पाण्यात सोडून मासोळी लागली की, वर फेकायचा. यात तो टेपल्या मासोया जास्त पकडत होता. तिसरी पद्धत होती कमी पाण्यात ‘डाब’ लावण्याची. डाब म्हणजे एखादी वाटी घेऊन तिला पालू बांधायचा पालू म्हणजे कपडा, त्या कपड्याच्या मध्यभागी एक छोटेसे भोकं पाडायचे. त्या डाबामध्ये अगोदरच भाकरीचे तुकडे टाकून ठेवायचे. थोडा वेळ डाब पाण्यात ठेवला की, चिंगळ्या मासोळ्या त्यातील भाकर खाण्यासाठी भोकातून डाबात घुसतात. मग त्यांना बाहेर काही निघता येत नाही. कधी कधी दगडाखालचे, खेकडेही पकडून आणायचा. त्यातही दुधी अन् टणक पाठीचा असे प्रकार होते.
नदीत मासोळ्या पकडल्या की, दुपारी कोणी घरी नसायचे. आपलेच राज्य असायचे. ताबडतोब काड्या लावून चूल पेटवायची, त्यावर तवा ठेवून थोडे तेल टाकले की, थेट त्या जिवंत मासोळ्या तव्यावर भाजायचा शौक साहेबरावला होता. तेल-मीठ टाकल्यानंतर या भाजलेल्या, सैतवलेल्या मासोळ्यावर तो ताव मारायचा. मी नुसते पाहत राहायचो. कारण माह्या गळ्यात गाठी होती.
तर काहींना तितुर बाट्या खाण्याचा शौक होता. पारधी लोक शेतात एक गाय घेऊन तितुर बाट्या पकडून विकण्यासाठी गावात आणतं. त्यांच्याभोवती खाणाऱ्यांची, विकत घेणाऱ्यांची निरा झुंबड होये. हे पारधी लोकं जसे तितुर बाट्या पकडतात. याची उत्सुकता होतीच. म्हणून आम्ही रविवारी सुटीच्या दिवशी वेगळाच अॅटम केला, वाड्यातले सगळे वावरात गेल्याचे पाहून आम्ही पोरांनी चिमण्या, व्हलग्या पकडण्याचे ठरवले. त्यावेळी चिमण्यांचे थवे अंगणात वाळू घातलेले धान्य खाण्यासाठी येत असत. मग आम्ही चिमण्या पकडण्यासाठी अंगणात ज्वारीचे दाणे टाकले. पण चिमण्या हाती लागत नव्हत्या. आम्ही पकडायला गेलो की, त्या भुर्रकन उडून जात. मग आणखी अक्कल सुचली घरातून एक लोखंडी घमेले (टोपले) आणले. अंगणात ते टोपले काडीला टेकवून उपडे ठेवले. तेथे ज्वारीचे दाणे पसरवून त्या काडीला बारीक दोरा (धागा) बांधला. त्या काडीचा रिमोट कंट्रोल असलेला धागा पकडून आम्ही इकडे घराच्या ओसरीत सावलीत बसून चिमण्यांची वाट पाहू लागलो. दाणे खात-खात दोन चार चिमण्या टोपल्या खाली घुसल्या की, इकडून दोºयाने काडी ओढायची. ज्या चपळ चिमण्या असत, त्या निसटून जायच्या मात्र त्यातली एखादी चिमणी टोपल्या खाली अडकायची. मग चिमणी पकडून खायची काय? त्या काय तितर-बाट्या आहेत. कोणी विकत घेईल.
हळूच टोपल्या खाली अडकलेली चिमणी, कपडा हातात घेऊन पकडायची. काही चिमण्या टोपल्याखालून काढत असताना, पकडतांना हातीही लागत नव्हत्या. एखादी भुली भटकी चिमणी पालवात पकडली तर तिला सोडून द्यायचेच होते. पण आपण पकडलेली चिमणी कोणती? हे नंतर ओळखता यावी म्हणून तिच्या अंगावर आम्ही पेनातली निळी शाई लावायचो. आणि मोकळ्या वातावरणात सोडून द्यायचो.
पण अशावेळी त्या बिचाऱ्या चिमणीला इतर चिमण्या टोचकण्या मारायच्या. माणसाचा स्पर्श झाल्याने ती बाटली होती, बाट म्हणजे स्पृशास्पृश्यता पाळणे. एकंदरीत पक्ष्यांनाही माणसाचा स्पर्श नकोसा होता. पकडलेल्या चिमणीला केवळ आमचा स्पर्श झाल्याने इतर चिमण्यांकडून त्रास व्हायचा. मग तिला पकडून फायदा तरी काय? आमचा खेळ व्हायचा अन् बिचाऱ्या चिमणीचा जीव जायचा. अशी ही अस्पृश्यता. काय कामाची?
......................................
खेड्यांचे एक वैशिष्ट्ये असते. तेथे वास्तव्यास असणारे गावात राहणारे सर्व कुटुंब एकमेकांच्या परिचयाचे, ओळखीचे असतेस. कमी लोकसंख्या असल्याने आणि पूर्वापार चालत आलेल्या व्यवहारामुळे गावातील सर्वच जण एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत असतात. अमाच्या आंबेटाकळी गावात चांभार, कुंभार, वाणी, कुणबी, मातंग, बौध्द, शिंपी, माळी, पाटील, बेलदार, धनगर, धोबी अशा जवळपास सर्वच जातीचे घरे आहेत. बहुतांश गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे गावात कमी आणि शेतातच त्यांचा वेळ जास्त जातो. आता शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पाचे पाणी कालव्यातून सोडण्यात येते. त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसांतही आमच्या तोरणा नदीला पाणी असते. एवढेच नाही तर सर्वत्र पाणी टंचाई असताना पाटाच्या पाण्यामुळे शेती हिरव्या पिकांनी बहरलेली दिसते. हरभरा, गहू, उन्हाळी भुईमुगाने रेंगटीच्या माथ्यावरील, बरळाच्या जमिनीचे भाग्य उजळले आहे. उन्हाळ्यातही हिरवाई असते. मेहकर-खामगाव रस्त्याने गेलो तर कालव्यातून वाहणारे आणि काही ठिकाणी तलावासारखे साचलेले पाणी पाहून अनेकांना हिरस वाटतो.
पूर्वी फक्त कोरडवाहू शेती होती. अनेकांजवळ बैलगाड्या, जोड्या होत्या. कोणाजवळ जोडी नसे तर कुणाजवळ गाडी नसे. एकमेकांच्या भरवशावजर दैनंदिन व्यवहार केले जात. पेरणीसाठी एकमेकांशी ‘सायळ’ लावत. शेती करणे जमत नसले की, कुणाला तरी कसण्यासाठी. वाहण्यासाठी ठोक्या-बटाईने देत. गावात एक दोन खटले होते. तेथे काही गडी माणसं. मजूर बाया साला-महिन्यानं राहतं. तर मुले शाळेत जात. आपआपल्या गरजेनुसार कोणत्याही जाती-पातीचा विचार न करता एकमेकांशी गट्टी, मैत्री जमत असे.
धुऱ्याला धुरा असलेल्या काही भावा-भावात भांडणं होत असली तरी अनेक इतर जातीतील शेजाऱ्यांमध्ये आजची चांगले संबंध असल्याचे पाहावयास मिळते. शेतीची कामे उरकतांना जो मदतीला धावून येईल. अशांशी जुळवून आपली कामे करायची. यातून संबंध घनिष्ठ होत. हे संबंध असेही असतात की, ते पूर्वापार चालत तिसऱ्या पिढीतही सुरू च आहेत.
आमचे जुने धाब्याचे घर चंभार येटायात, या घरासमोर गाडी सोड्याले की, ढोरं वासरं बांध्याले जागा नाही. उत्तरेकडच्या दरवाजातून निघाले की बेपट. दोन पायऱ्या उतरल्या की, थेट गलीवर आणि गलीवरून उतरले की नदीत. तर घराच्या दक्षिणेकडच्या दरवाजातून निघाले की उजव्या हाताला विहीर अन पूर्वेकडे जाणारी सांबट. तेथून निघाले की माणूस थेट पाराखालीच पोहोचते. दोन्हीकडचे रस्ते गल्ली बोळातून जाणारे. शेतातून माल आणला, कोणत्याही रस्त्याने घरी न्यायचा म्हटले की, हिवताप यायचा. अशा या घरात माझे आजोबा भगवान रामू चांभार, आजी मैनाबाई, आई देवकाबाई, वडील गोविंदा गव्हाळे, आम्ही दोघं-तिघं भाऊ, एक बहीण संगीता राहायचो. तर आत्या सुभद्राबाई कवठा बहादुऱ्याला आणि नर्मदाबाई चिंचोलीला दिलेली.
सुरुवातीच्या काळात म्हणजे, माझे वडील लहान असताना आबा भगवान चंभार हे सालाने कामावर होते. भारंबे यांच्या शेतात गडी म्हणून राबायचे. गावातील सरुबाई भाकरे हिला भाऊ नसल्यामुळे तिच्या वडीलांनी शालीग्राम भारंबे यांना टेंभुर्णा येथून शेती पाहण्यासाठी दत्तक म्हणून आणले. आबा त्यांच्या शेतात राबत असताना या परिवाराशी एकदम घनिष्ठ संबंध जुळले. कुणबी समाजातील भारंबे, भाकरे कुटुंबातील मंडळी त्या काळापासून म्हणजे बाट धरत होते तेव्हापासून आमच्या घरी जेवतात, सोबत खातात, त्यांना आमचा वापरच काय? चुलीपर्यंत सर्व माहीत आहे. आपल्या जातीतील एखाद्याला आमच्या घराण्याची नातेवाईकांची माहिती नसेल, ओळख नसले एवढी माहिती त्यांना आहे.
कालांतराने आबांनी त्यांच्या घरी सालं- महिने भरून, दुसऱ्याच्या कामाला जाऊन शेती विकत घेतली. सरुबाईचे वडीलही वारले. पण ज्या जमिनीसाठी त्यांनी पुतण्या शालीग्राम यांना दत्तक म्हणून वारस घेतले होते. त्यांनी फार वाट लावली. एवढेच काय? शालीग्राम बुवाचा मुलगा गजानन हा काही कामधंदा करत नसल्याने ऐदी निघाला, शेतीचे काम जीवावर येत असल्यामुळे तो गुराढोरांमागे जातो. गावातले काही लोकं या गजाननरावले ‘अम्पूबुवा’ म्हणत. जाऊ द्या, असो.
पण सरुबाई भाकरेंचा मुलगा हरीभाऊ शेती पाहतो. तर मोठा मुलगा नारायण हॉटेलचा व्यवसाय करतो. आज त्यांचीही मुले शिकून मोठी झाली आहेत. बहुतेक तिसरी पिढी सुरू आहे, तरी आबाच्या काळातील घरोबा आजही टिकून आहे. एवढेच नव्हे तर यंदा २०१७ मध्ये जानेवारीत हरीभाऊच्या शेतात पिकलेले सोयाबीन आमच्या घरात आणून ठेवले. भाव आल्यावर विकायचे आहेत. पण माल ठेवण्यासाठी घरी जागा नाही. तसेही इतर धार्मिक कार्यात लगन, मरण, बिमारी आणि सत्संग या कामात ते नातेवाईकांपेक्षा जास्त जवळ असतात. दररोज येणे जाणे, भेटी ख्याली- खुशाली विचारणे सुरू असते. बहुतेकवेळा क्षुल्लक कारणावरून वाद, मतभेद, झाले असतील, अजूनही होतात. पण घरोबा कायम आहे.
आमच्या गावातील दुसरे उदाहरण म्हणजे, मोतीराम उंबरकार आणि मोतीराम चऱ्हाटे यांचे देता येईल. चऱ्हाटेबुवाचा खटला आमच्या गावात नावाजलेला आहे. चार-पाच भाऊ, त्यांची मुलेबाळे एकाच ठिकाणी राहत होते. त्यांच्याकडे शंभराच्यावर शेळ्या मेंढ्या होत्या. त्यांच्या घरातील मेंबरची संख्या तुमच्या आपल्या सारख्यांना मोजताही येत नव्हती, पण एकत्र कुटुंबात राहतांना कधी वाद झाल्याचे आम्ही ऐकले नाही. या कुटुंबातील संपूर्ण आर्थिक व्यवहार व जनसंपर्काचे खाते मोतीराम मामाकडेच होते. त्यांच्या व्यवहाराला घरातील सर्वांचे अनुमोदन असे. घरातून कोणीही विरोध करत नसे. अशा या मोतीरामबुवा चऱ्हाटे आणि आमच्या वेटाळातील मोतीराम उंबरकार यांचे फार पूर्वीपासून घरोब्याचे संबंध होते. कोणतेही काम असले की, दोघेही एकमेकांच्या सल्ल्याने करत. पण पुढे मुले नोकरीवर लागल्याने, वेगळे झाल्याने याता अंतर पडत चालले आहे. पण जुने लोकं अजूनही या दोघांचीही आठवण आवर्जून काढतात.
ग्रामीण भागात शेतीच्या व्यवसायातून वेगवेगळे कुटुंब जवळ येतात. तसेच शाळेतील मित्र, समव्यवसायिक यांच्यातही चांगले संबंध प्रस्थापित होतात. पण आजकाल बरेच जण चुलीपर्यंत मैत्री करण्याचे टाळतांना दिसतात. काळ बदलला, समाजात स्वार्थीपणा वाढला, परस्परांबद्दलची वागणूक बदलली, अनैतिकता वाढली. परिणामी एकमेकांवरील विश्वास कमी कमी होत चालला आहे. असेच एकेकाळचे जीवलग मित्र, दररोज २४ तासापैकी २० तास सोबत एकमेकांशिवाय कोणाचंच पत्तं हालत नव्हते. आमच्या गावात त्या दोघांची मैत्री फारच प्रसिद्ध होती. सोबत खाणे-पिणे, वरली मटका लावणे, खेळणे सगळं सोबतच चाले, जेथे अवैध धंदे, व्यसने करतांना काही आड येत नव्हते. तेथे अनैतिकता वाढणार नाही तर काय? दिवस निघाला म्हणजे एकमेकांच्या घरी गेल्याशिवाय करमत नव्हते. ‘याची बायको, त्याची भाभी,’ मजाकला वाण नाही. मग काय? घरी गेले की, काय म्हणतात भाऊ? चौकशी करत प्रेमसंबंध वाढत गेले, चांगल्या मैत्रीचे रुपांतर चुलीपर्यंत जाऊन पोहोचले.
मधुची बायको मिरा आणि गजानन यांचे नाव संपूर्ण गावात पसरले. पण या गड्यांची दोस्ती लय भारी. सुरुवातीच्या काळात मधुच्या कानाला खबर नव्हती. पण बायकोचं वागणं पाहून त्यांनंही नजर ठेवली. अनैतिक संबंध चर्चेचा विषय झाला असताना मित्र गजानन हा एक दिवस मधुच्या घरात गेला. थोडे काही होत नाही, तोच बाहेरून मधु आला, घरात पाहिले असता भलतेच दिसले. मधुने मागचा पुढचा विचार न करता कुऱ्हाडीने वार करून आपल्या बायकोचे, मिराचे तुकडे पाडले. यात मुलांची आई गेली. तिकडे बाप जेलात गेला. पोरं पोरके झाले आणि मित्र मात्र फाट्यावर मोकाट. असा घरोबा काय कामाचा?
. ..................
माहा आबा, म्हणजे बुराट कंजुष माणूस, एकदम हेकड स्वभावाचा. असं लोकं म्हणतात. बुड्याचां अन् पोराचं कधी पटलं नाही. बुडीही परेशान असे. भगवान बुडा म्हणजे ‘मेरी मुर्गी की एकही टांग’, असा कडक स्वभावाचा माणूस. असे सगळ्यांना वाटे. त्या बुड्याचे आम्ही नातू. आबाचे संस्कार नातवावर होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मलाही कधी कधी गावातले जुने लोकं ‘भगवान बुवाचा नातू’ आहे ना, असे चिडवतात. स्वभावगुण आहे तो. आमच्या घरातील कुणीच बुड्याच्या पुढे बोलत नसे. आई-वडील, आजीही मान ठेवून असत, उलट बोलत नव्हते. कुणाचीच हिंमत चालेना, तेवढा धाकही होता.
अशा म्हाताऱ्या माणसांसोबत राहणे म्हणजे कठीणच काम. असं सगळ्यांना वाटते. पण मुळात आबाचा स्वभाव तितकाच सरळ आणि मयाळूही होता. काहीही झाले कितीही नुकसान झाले तरी खोटं बोलणार नाही. धार्मिक वृत्तीचा आणि दिलेला शब्द पाळणारा माणूस, आणि जर समोरचा माणूस जास्त बोलून अपमान करीत असेल तर मग त्याचा पाणउतारा करण्यात पटाईत.
त्या काळात वाहने नसल्यामुळे बैलगाडी, छकडे, दमणीचाच वापर असे. लग्नाचे वऱ्हाडही बैलगाडीतून येत असे. नवरदेवासाठी एक दमणी आणि वऱ्हाडासाठी बैलगाड्या असत. जुने माणसं त्याकाळातल्या गोष्टी कधी कधी अजूनही सांगतात. एकदा काय झाले ? आमच्या यटायात मोतीराम बुवाच्या घरी मुलीचे लग्न होते. त्या लग्नासाठी कवठा बहादुरा येथून बैलगाड्यांनी नवरदेवाचे वऱ्हाड आले होते. वऱ्हाडाने सोबत बैलांचा चारा कडब्याच्या पेंड्याही आणल्या होत्या. तसेच इकडे आंबेटाकळीतही बैलजोड्यांची चारापाण्याची व्यवस्था घरमालकाने केली होती.
हे लग्न उत्साहात लागले. पंगती बसल्या, बहुतेक शिऱ्याचीच पंगत होती. पंगतीत वऱ्हाडी, वाजंत्री सर्व मंडळी जेवली. दुपारी ऊन असल्यामुळे पाहुणे मंडळी विश्रांतीसाठी धाब्यात बैठकीत बसली होती. गप्पांचे फड रंगू लागले. आमचं गावं असं, आमच्या इकडे तसं, इकडच्या-तिकडच्या मोठेपणाच्या लंब्या लंब्या गप्पा सुरू झाल्या. त्यातला एक पाहुणा म्हणे, ‘शिरा किती गोड झाल्ता. जराही ढंगाचा नोता. आजची काय पंगत होती काय राजा? असा शिरा त आम्ही बैलाले खाऊ घालतो’. हे ऐकून आपल्या गावाची बाजू राखल्या जावी म्हणून आबांनीही कोटी केली, ंम्हणाले, ‘मंग त राजा तुमचे बैलंही गोड ऽऽ पादत असतीन.’ असे अफलातून उत्तर देणारे आबा समोरच्या व्यक्तीला चूप बसवण्यात धन्यता मानत.
ही स्वभावाची एक बाजू असली तरी ते प्रेमळ अन मनमिळावू सुध्दा होते. माझी बहीण संगीता त्यावेळी पहिलीत असेल. शनिवारी सकाळची शाळा असायची. पण कोणालाच थंडीच्या दिवसात सकाळी उठून शाळेत जायचा हरीक नसतो. नेहमीप्रमाणे संगीता उशीरा उठली. शाळेची घंटी वाजल्याने तिने आंघोळ न करताचा तोंड धुवून दप्तर उचलले आणि सकाळच्या शाळेत पटकन निघून गेली.
आमच्या आंबेटाकळीची म.पू.मा. शाळा मंदिराजवळ गावाच्या पश्चिमेला आहे. समोरच गाईंचे गोठाण होते. तर आमचे घर इकडे नदीच्या काठी. म्हणजे गावाचे हे टोक आणि ते टोक. त्यामुळे शाळेकडे कोणी फारसे जात नसे.आता इतक्या सकाळी शाळेकडे जाणारे कोणी नव्हते. पण आबाच्या मनात एक रुखरुख होती. ‘आज संगीतानं तोंडावर पोतेरा मारला, अन् तशीच शाळेत गेली. तिनं चहाही घेतला नाही’. असं आबा म्हणाले, तर आई म्हणे, ‘तुम्ही घिऊन जा मंग तिचा चहा’.
बुड्यानं बाजूच्या गोठातल्या गाई सोडल्या. गोठाणावर रोज सकाळी हाणत न्याव्या लागतात. आज जर्मनचा कडीचा डबा काढला, खरचं आईला चहा बनवून मागितला व डब्याचे झाकण लावून दुसऱ्या हाती बशी घेऊन आबा ढोरामांगं गेले. गोठाणावर गाई सोडल्या, त्यावेळी शाळेत प्रार्थना सुरू होती. शाळेच्या गेटजवळ येऊन आबा हातात चहाचा डबा घेऊन प्रार्थना संपण्याची वाट पाहू लागले. नंतर सगळी मुले रांगेत वर्गात जाऊ लागली. त्यावेळी आबांनी दुरूनच ‘संगीता संगीता’ आवाज देत गेटजवळ तिला बोलावून घेतले.
शाळेच्या गेटजवळ पिल्लरला लागून सिमेंटचा ओटा आहे. त्या ओट्यावर दोघे आजे-नाते बसले. आबा डब्यातला चहा बशीत ओतून, फुक मारून थंड करून संगीताला पाजत होते. हे चित्र शाळेजवळून रस्त्याने जाणारे-येणारे पाहत होते. कारण कोणी चहा घ्यायचा राहिला म्हणून, कुणाला चहा शाळेत आणून पाजल्याचे आजपर्यंत पाहिले नव्हते. असा साखऱ्याचा शिऱ्यावाणी आणि चहावाणी गोड स्वभाव होता आमच्या आबाचा.
................
सन १९९६-९७ मधील एक मामुली गोष्ट आहे. आम्ही त्यावेळी खामगाव येथील चांदमारी भागात राहत होतो. आमच्या घरासमोरील एका १० बाय १० च्या खोलीत काळेगावचे अवचित पाटील हे कुटुंबासह राहत होते. कुटुंब तरी केवढं, दोघे नवरा बायको अन् त्यांची मुलगी. त्यावेळी ही मोना ४-५ वर्षाची असेल. एके दिवशी तिच्या आईने घराची साफसफाई करण्यासाठी घरातील छोटे मोठे सामान बाहेर काढले. त्यात एक फोटोचा जुना अल्बम तिला दिसला. त्या अल्बममधील प्रत्येक फोटो ती न्याहाळून पाहत होती. व उत्सुकतेने आईला विचारत होती. हे कोण? ती कोण? असे प्रश्न विचारुन तिने तिच्या आईला भंडावून सोडले. तो अल्बम अवचित पाटील यांच्या लग्नातील फोटोंचा असल्याने आई-वडील हे नवरदेव- नवरी होते. एवढ्यात मी तेथे टपकलो. अल्बम पाहत असताना सहज मोनाला विचारले ‘‘कां ग यात तुझा फोटो कोणता आहे? तुला मम्मीनं लग्नात नेलं नव्हतं का? तुझा एकही फोटो काढला नाही? नुसते पप्पाचे अन् मम्मीचे फोटो आहेत. तु एवढी लाडाची पोरगी, पण तुला घरीच ठेवले होते वाटते. तुझ्या मम्मीनं’’ असं म्हणताचं मोनाने मागचा पुढचा विचार न करता ‘मम्मटली टम्मटली’ म्हणत अल्बम रागानं फेकून दिला. तिच्या त्या वयात तिने व्यक्त केलेला राग साहाजिक आहे.
आणि २०-२५ वर्षांनी आज जरी तिला हे प्रश्न विचारले तरीही राग अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. ‘काय मूर्खासारखे प्रश्न विचारता?’ असे म्हणून टापरल्याशिवाय राहणार नाही. पण हाच प्रश्न मला विचारला तर मी म्हणेल ‘‘हो माझ्या बाबांच्या लग्नात मी होतो’’ घडीभर तुम्ही बुचकळ्यात पडसान? मात्र विचार करा, ते खरं आहे.
मी तिसऱ्या वर्गात शिकत असताना बाळंतपणात १९८० मध्ये माझ्या आईचे, देवकाबाईचे निधन झाले. आमच्या कुटुंबाची गैरसोय होऊ नये, म्हणून बाबांनी दुसरे लग्न केले. १३ मे १९८१ रोजी अकोला येथील पोळा चौकातील कामगार कल्याण केंद्राच्या आवारात हा विवाह पार पडला. विशेष म्हणजे माझ्या डोळ्यासमक्ष आई-वडिलांचे लग्न लागले. मी प्रत्यक्ष साक्षीदार असल्याने दाव्याने सांगू शकतो की, माझ्या वडिलांच्या लग्नात मीही होतो.
एवढेच नाही तर लग्नापूर्वी मी पंचगव्हाणला गेलो असता. आजी गिरजाबाईने मला व भाऊ गणेशला तेल्हारा येथे फोटो काढायला नेले होते. तेल्हारा येथील भुजबलेच्या स्टुडिओमध्ये आमच्या तिघांचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो काढला आहे. तो फोटो पाहिला की स्वतः ला ‘वान्नेर’ म्हणून हिणावतो. काही तरी फोटो काढायचा म्हणून काढला होता. मात्र त्या फोटोतही एक आठवण दडलेली आहे. माझ्या खिशामध्ये काहीतरी ठेवलेले दिसते. एखाद्याने फोटो पाहिला आणि त्याला हा कोण ? मी कोण ? अशी ओळख सांगितली की, लगेच तुझ्या खिशात काय? असा दुसरा प्रश्न विचारतो. तर माझ्या खिशात फोटो काढते वेळी ‘माझ्या आई-वडिलांच्या लग्नाच्या पत्रिका होत्या’ असे सांगताच अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. आणि मी काहीतरी बोलत आहो की काय? असे वाटते.
यात काही नवीन नाही, आणि विशेषही नाही. पण सांगतांना, मी आई- वडिलांच्या लग्नात होतो असे फुशारकी मारत बढाईने सांगत असलो तरी हा प्रसंग कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. आणि तो प्रसंगही आठवू नये. असे मला मनातून वाटते.
.............................
माणूस कामानिमित्त, नोकरीनिमित्त किंवा कमाईसाठी आयुष्यात कोण्याही गावाला गेला, कुठेही स्थायिक झाला तरी मुळ गावाची आठवण विसरत नाही. जेथे बालपण गेले तेथील आठवणी कायम स्मरणात राहतात. त्या काळातले चित्र डोळ्यासमोर तरळते. ‘हमारे जमाने मे’ च्या गोष्टी आठवतात. सारखे-वारके जमले की, जुन्या घडलेल्या गोष्टींना उजाळा मिळतो, त्यामुळे आपले ते गाव म्हणजे अनमोल ठेवाच असतो. सर्वकाही ठिकठाक आणि व्यवस्थित चाललेलं असताना जर आपले अचानक निधन झाले तर गावात कसे पडसाद उमटतील याचे स्वप्नही पाहू नये. पण अनुभव आले तर सामोरे जायला हरकत नाही.लोकमतची नोकरी सोडल्यानंतर मेहकर येथून दैनिक दिव्य मराठीत अकोला येथे सप्टेंबर २०१३ मध्ये रुजू झालो होतो. त्यामुळे दोन मुले आणि आम्ही पती-पत्नी असे चौघे जण मेहकरची भाड्याची खोली सोडून अकोल्यात राहायला गेलो. दि. २ नोव्हेंबर २०१५ ची गोष्ट आहे. आम्ही त्यावेळी अकोला येथील रविनगर, संताजीनगरच्या कोपऱ्यात सुमित्राबाई इंगळे बुढीच्या खोलीत भाड्याने राहत होतो. सोमवारचा दिवस असल्यामुळे अमानखाँ फ्लॉटमधील कार्यालयात साप्ताहिक मिटींग होती. दर सोमवारी सकाळी ११ वाजतापासून मिटींग दुपारी १ ते २ वाजेपर्यंत चालायची. सकाळी नेहमीप्रमाणे मी गाडी घेऊन आॅफीसला गेलो. मिटींग वेळेवर सुरू झाली. त्यामुळे मी माझा मोबाइल सायलेंटवर ठेवला. दरम्यानच्या काळात मला आंबेटाकळीहून वडिलांचे १८ ते २० मिसकॉल आल्याचे दिसले आणि पाच -सहा नातेवाईकांचे तसेच काही अनोळखी नंबरवरूनही कॉल आले होते. पण मिटींग सुरू असल्याने आणि मोबाइल सायलेंट असल्याने माझ्या काही लक्षातही आले नाही, अन् समजले नाही.
विशेष म्हणजे, मी त्यादिवशी नेहमीपेक्षा लवकर घरून निघालो. त्यामुळे सौ. ज्योतीचे कामधंदेही लवकर आटोपले. एरव्ही मी दुपारी २ वाजल्याशिवाय ड्युटीवर येत नसतो. त्यामुळे तिचेही कामधंदे लांबतात. आज सोमवारी तिनेही लवकरच कपडे धुण्यासाठी काढले. व रुमच्या बाजूला असलेल्या बाथरुममध्ये कपडे धुत बसली. इकडे मी माझा फोन उचलला नाही म्हणून सर्वांनी घरच्या म्हणजे सौ. ज्योतीच्या मोबाईलवर फोन लावले. पण ती कपडे धुण्यासाठी गेलेली असल्याने नुसती बेल वाजायची. नो रिस्पॉन्समुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कोणताच चांगला विचार मनात न आणता, खात्री न करता एकमेकांना फोन लावून विचारू लागले की, जनार्दन फोन उचलत नाही, त्याच्या घरी लावून पाहिला तर तोही कुणी उचलत नाही. काय झाले? समजायला मार्ग नाही. या गोंधळात घरचे, नातेवाईक, मित्र पडले. सर्वजण एकमेकांना फोन करून विचारू लागले की, ही ती घटना खरी आहे का? ज्याला काही घणे देणे नाही, माहीत नाही, त्यानेही उत्सुकतेने अपघाताची गोष्ट पुढे सरकवली.
आमच्या आंबेटाकळी फाट्यावर चहूकडच्या खबरा अर्ध्या तासात येऊन धडकतात. अशीच घटना त्यादिवशी सोमवारी सकाळी १०-११ वाजताच्या सुमारास तिकडे अकोला जिल्ह्यात मेहकर मार्गावर आलेगावजवळ घडली. त्यात दुचाकीस्वार आॅनस्पॉट गेला होता. गाडीवाला मेहकरहून अकोला जात असताना ठोस झाली. यात जनार्दन गवई नावाचा माणूस जागीच ठार झाला होता. ही वार्ता आंबेटाकळी फाट्यापर्यंत पोहचली. कोण्या एकाने तर्क लावला की, आपल्या गावातल्या गोविंदा गव्हाळेचा पोरगा आहे वाटते राजा. मेहकरहून अकोल्याले जातांनी ऑनस्पॉट गेला असे सांगोवांगी ऐकत वाघोळेबुवानं गोष्ट गावात पेरली आणि आमच्या वेटाळात वाऱ्यासारखी पसरली. घटना लोकांना माहिती व्हावे, म्हणून इकडे आमच्या गावातला नवखा पत्रकार संदीपनेही विलंब न लावता व्हॉटसअॅपवर पत्रकार जनार्दन गव्हाळे अपघातात ठार अशी पोस्ट टाकली होती. त्यामुळे आणखीनच खळबळ उडाली होती.
वडील शेतात गेलेले होते. तर बाजूच्या शेतातील गोपाल घोपेच्या मोबाइलवर कुणीतरी निरोप दिला. त्यानेही माझ्या नंबरवर फोन लावून पाहिला. पण मी मिटींगमध्ये होतो. कोणतेही उत्तर न मिळाल्याने शेतातून तो सरळ वडिलांना घेऊन घरी आला. संपूर्ण आंबेटाकळी गावात आणि फाट्यावर एकच बबाल झाला होता.
आमच्या घरी वडील एकटेच चिंतेत बसले होते. त्यांच्याजवळ जाऊन विचारायला गेलो तर माहोल आणखी खराब होईल. या भीतीने शेजारी-पाजारी बोलत नव्हते, परिस्थिती पाहून घरातलेही कुणी एकमेकांशी बोलत नव्हते. इकडे आमच्या घराच्या बाहेर गावातल्या, गल्लीबोळातल्या बाया-माणसांची गर्दी झाली होती. काहींनी मोटार सायकल काढून वाहन सांगण्याची तयारी सुरू केली होती. गावोगावच्या नातेवाईकांना माहिती देत होते. ‘मी ठार झाल्याने सगळीकडे दु:खाचेच वातावरण तयार झाले होते.
अशात भिकाभाऊंनी गावातून त्यांचे अकोला येथील नातेवाईक विश्वनाथबुवांंना विचारले तर त्यांनीही जनार्दन गव्हाळे दवाखान्यात भरती असल्याचे सांगितले. त्यामुळे आणखी भीतीचे वातावरण तयार झाले. कुणी म्हणे अॅक्सिडंटमध्ये ऑनस्पॉट गेला, अन् भिकाबुवा म्हणे सिरीयस आहे. अकोल्याच्या दवाखान्यात भरती आहे.
दरम्यान, घरी जाऊन कुणीतरी वडिलांना सांगितले की, दवाखान्यात भरती केलं. तेव्हा सर्वांनी एसटीने अकोल्याला येण्याची तयारी केली, नेमके काय झाले समजेना. सुरुवातीला ठार झाल्याची वार्ता पसरली. नंतर सिरीयस असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. बुडाबुडीच्या मन समजावणीसाठी तसं सांगतच असतात, असे जो तो बोलत होता.
तेवढ्यात माझी मिटींग संपली. अालेले मिसकॉल पाहून मी गोपाल घोपेला फोन केला तर तो म्हणाला, ‘मामा मी शेतात आहो. तुम्ही ताबडतोब बुड्याले फोन लावा’. त्यानुसार मी तत्काळ फोन करून घरी सांगितले की, ‘मी मिटींगमध्ये होतो, फोन सायलेंटवर होता. म्हणून आता लावला, काय म्हणता?’ तर म्हणाले, ‘अॅक्सिडंट कुठी झाला?’ म्हटले, ‘कुठीच नाही’, ज्योतीला घरी फोन लावला तर तिनेही उचलला नाही. म्हटले, ‘ती कपडे धुत होती’. तरी त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांना वाटले की, अॅक्सिडेंट झाला असावा.
मी आॅफीसबाहेर गॅलरीत बोलत असताना सहकारी राजू चिमणकर यांना नातेवाईकांनी विचारले तर त्यांनीही सांगितले की, ‘आतापर्यंत ते मिटींगमध्ये होते, पण आता रस्त्यात काय झाले? माहीत नाही.’ असे सांगताच आणखी वातावरण चिंतेचे झाले होते. इकडे नातेवाईक आमचे साडू चिमसाहेब, अंबादास उंबरकार, प्रकाश उंबरकार, अकोल्याला येण्याच्या तयारीत होते. मी फोन करून सर्वांना खुलासा करून सांगितले. तरी कुणाचाच विश्वास बसत नव्हता. शेवटी दुपारी वडिलांजवळ घरी बसल्यानंतर तेथून काशीरामदादाने फोन लावला. त्याच्या साल्याला आमच्या घरी प्रत्यक्ष भेटीसाठी पाठवले. व खात्री करून घेतली. तरीही घरच्यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी आजुबाजूच्या लोकांनी म्हटले, ‘खरं काय झाले तर भेटून या?’ त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळीच वडील आंबेटाकळीहून पहिल्याच गाडीने अकोल्याला आले, पाहतात तो काय? सगळे टण टणाटण.कुठेही काहीही झालेले नाही. काही अपघात नाही ना काहीच नाही. नुसतीच अफवा होती.
दरम्यान, दोनच दिवसापूर्वी मी अकोला मलकापूर येथे गणराज अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला होता. ३१ ऑक्टोबरला झालेली फ्लॅटची खरेदी दाखवून मी त्यांना ‘सरप्राईज’ देत नवीन घर दाखवले.
आंबेटाकळी गावात परतल्यानंतर त्यांना जो तो विचारत होता की, ‘अपघात कुठे झाला? किती लागले?’ तर काहीच नाही. त्यादिवशी आलेगावजवळ जनार्दन गवई नावाचा माणूस अपघातात ठार झाला. कुणीतरी गव्हाळे समजून निरोप आणला. त्यामुळे एवढा मोठा दांगळो झाला. तिकडे तर आपल्या जनार्दननं १०॥ लाखाचं घर घेतलं. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
..........
कसं आहे? काहीतरी लिहायचं म्हटलं की, माणूस काही ना काही तरी विसरतोच. वर्षभर अभ्यास केला, पाठांतर केलं तरी परीक्षेत पेपर सोडवतांना बऱ्याचवेळा सूचत नाही. प्रश्नाचं संपूर्ण उत्तर पाठ असते. पण ज्यावेळी आपण लिहायला सुरुवात करतो, त्यावेळी ‘स्टार्टीगंच’ आठवत नाही. उत्तराच्या सुरुवातीचा एक शब्द वेळेवर आठवला नाही की, पेपर सोडवण्यासाठी दिलेल्या कालावधीतील ‘अमूल्य वेळ’ डोकं खाजवण्यात जातो. वर्षभर रात्रंदिवस टोले घेतले तरी जे काही परीक्षेच्या तीन तासात आपण पेपरवर लिहू. त्यावरच आपलं भवितव्य अवलंबून असते. तर एखादा गडी वर्षभर पुस्तक उघडूनही पाहत नाही. मात्र शाळेत शिकवतांना लक्षपूर्वक ऐकलेले असते आणि त्यावर पेपरात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सहजरित्या लिहून काढतो. आणि परीक्षेत त्याला चांगले मार्क मिळतात. म्हणजे वेळेला महत्त्व आहे. माझेही तसेच झाले. बालपणातील काही कटू-गोड आठवणी लिहायला घेतल्या, पण ऐनवेळी विसरूनच गेलो. त्यामुळे यात आपल्याला मार्क कमी पडू नये म्हणून पुन्हा लिहायला बसलो.
तशी ही काही घटना नाही. पण राहावले गेले नाही. मनातलं जे आहे, ते कागदावर उतरवून मोकळं व्हावं म्हणून हा खटाटोप. जसे की, आमचा सौरभ हा लहानपणापासूनच ‘आटेल’ आहे.आटेल म्हणजे जिद्दी, हट्टी त्याउलट मोठा मुलगा ‘राहुल’ सुरुवातीपासून समजदार आहे. त्यामुळे सौरभचे वागणे घरातील सर्वांनाच त्रासदायक ठरले. विशेषत: त्याच्या आईला, ज्योतीला. आता तोही समजदार झालाय.
सांगायचे म्हणजे लहानपणी एक वय असते. साधारणत आठव्या-नवव्या वर्षी दुध दात पडतात. चौथ्या-पाचव्या वर्गात असताना काही मुले आणखी हट्टीपणाने वागतांना दिसतात. त्याची आई म्हणते ‘काही झोंबलं का या काट्ट्याले, निरानाम ऐकत नाही, मनानंच करते’. सौरभला बोलतांना मलाही ते दिवस आठवले. कारण मी ही लहानपणी असाच होतो. आजी मैनाबाई मला पाहून नेहमी म्हणे ‘‘याले काही पिसं लागलं वाटते. एखांद्या देवाजोळ न्या लागते दाखोयाले.’’ तसा मी काही पागल नव्हतो, पण वागणं हट्टीपणाचं होतं. कुणाचे ऐकायचं नावचं नव्हतं. ‘मनचे राजे’.
म्हणून मग कुणीतरी घरच्यांना सांगितलं, ‘याले दर मंगळवारी भवानी मायच्या दर्शनाले नेत जा. उरय झुरयले ठाणं आहे देवीचं, तठी भगतबुवाजोळं कोडं मांडा. पाच हप्ते केले की फरक पडते’.
हे ऐकून घरच्यांनी उरळच्या पाच वाऱ्या करण्याचं ठरवलं. मला सोबत घेऊन आबा उरळला येण्यासाठी मंगळवारी सकाळी आंबेटाकळीहून निघतं. तेथे देवीजोळ कोडं लावण्यासाठी दोन-चार निंबू, बांडसाच्या खिशात घेत. उरळ हे गाव अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात असले तरी त्यावेळी सरळ रस्ते आणि एस.टी बसेसची सोय नव्हती. त्यामुळे आम्हाला खामगाव -शेगाव- निंबाफाटा मार्गे उरळला ये- जा करावी लागत होती. विशेष म्हणजे, त्यावेळी शेगावहून- अकोला जाणाऱ्या सर्व सुपर गाड्या निंबा उरळ मार्गेच जात होत्या. घरून निघालो की, खामगावच्या बस स्टॅण्डवर ऑडनरी शेगाव गाडी लागलेली असायची. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील उदगीर डेपोची एक गाडी दिवसभर शेगाव ते खामगाव फेऱ्या मारत होती. उदगीरहून शेगावला आलेली ही रातराणी गाडी दिवसा खामगाव- शेगाव चाले. सगळ्या फाट्यावर थांबे. त्या गाडीवर पल्हाडे कंडक्टर आणि डोक्याच्या टकलावर पांढरा रुमाल गुंडाळलेला ड्रायव्हर नेहमी असे. तेव्हा ही लेलॅण्ड मॉडलची ऑर्डनरी गाडी दुरूनच ओळखू येत होती.
इकडून जातांनी शेगावला उतरल्यावर गजानन महाराजांच्या मंदिरात जायचे. दर्शन घेऊन निघाल्यानंतर उरळ येथे दुपारी १२ वाजेपर्यंत पोहचायचे. गल्लीबोळातून देवीच्या ठाण्यावर गेलो की, तेथे भक्तांची मोठी गर्दी असे. भवानी मायच्या मंदिरात एक भगतबुवा आपल्या हातावर कापूर जाळून अंगारे, धुपारे द्यायचा. प्रत्येक जण आपल्या समस्या मांडत होते. माझा नंबर आला. ‘काय झाले?’ तर काहीच नाही. ‘एवढ्यात हा हट्टीपणा करते. काही देवाचं आहे का?‘ विचारले तर बुवा म्हणाले, ‘काही नाही. लहान मुले तसेच वागतात काही दिवस. समजदार झाले की, आपोआप बदल होते. तरी तुम्ही पाच मंगळवारी दर्शनाले उरळले येत जा’. बुवाच्या म्हणण्यानुसार दर मंगळवारी आमची ‘आजे-नात्यांची’ सवारी शेगाव मार्गे उरळला येत होती.
पाच वाऱ्याही झाल्या, पण माह्या स्वभावात बदल झाला अशीन, असं त काही मले वाटलं नाही.
.............
माझा जन्म १९७२ सालचा. म्हणजे गिट्टीच्या सालचा. १९७२ मध्ये फारच मोठा दुष्काळ पडला होता. लोकांना खायला अन्न नव्हते. अनेकांनी फांजीची भाजी, तरोट्याची भाजी, झाडाच्या पाल्यासोबत भाकरी खाऊन दिवस काढले. याच काळात अमेरिकेतील डुकरांना खाऊ घातली जाणारी मिलोची ज्वारी लोकांना खावी लागली. हाताला कामे नसल्यामुळे सरकारने डोंगरातील दगड फोडण्याचे काम सुरू केले होते.
बुलढाणा जिल्ह्यातून अजिंठा डोंगररांग पश्चिमेकडून -पूर्वेकडे पसरलेली आहे. मेहकर आणि खामगाव तालुक्याच्या सिमेवर हा डोंगर आहे. आमच्या आंबेटाकळी पासून जास्त दूर नाही. ८ ते १० कि.मी. अंतरावर जाऊन लोकांना त्या डोंगरावरील दगड फोडावे लागतं. प्रत्येक मजुराजवळ छन्नी आणि हातोडा हे अवजार आवश्यक होते. दगडाचे तुकडे बारीक करुन ही गिट्टी रस्ते तयार करण्यासाठी वापरली जात होती. त्या काळात आजच्या सारखे स्टोन क्रशर नव्हते. त्यामुळे आमच्या गावातील प्रत्येकाच्या घरात छन्नी-हातोडे हे ‘स्टोन क्रशर’ आजही पाहावयास मिळतात. साधारण एक वर्षे गिट्टी फोडण्याचे काम चालले. या दरम्यान ज्यांचा जन्म झाला. त्यांची ओळख पक्की झाली,‘ तू गिट्टीच्या सालातला आहेस’ नाही का? असं सहजतेनं विचारतात. मला तेव्हा समजत नसेल पण आठवते जरुर.
शाळेत शिकत असताना आता सारखी खिचडी किंवा तांदुळ मिळत नव्हते. तर जो पोषक आहार होता तो ‘सुकळी’ चा होता. सुरुवातीला या ‘सुकळीचा’ दर्जा एकदम चांगला होता. त्यावेळी मुले शाळेत भेटलेलेच सुकळीचे पाकीट घरी नेऊन मस्त शिरा बनवून खात. परंतु नंतरच्या काळात दर्जा घसरल्याने ही सुकळी कोणी खाईना. मग वाटपही आपोआप बंद पडले. परंतु वडिलांनी लहानपणी जी सवय लावली होती. ती बरीच वर्षे सुरू होती. दररोज एक पान मराठी शुद्धलेखन लिहिण्याची.
अशातच चौथ्या वर्गात असताना स्कॉलरशिपची परीक्षा देण्याचे सरांनी सांगितले. मी माझा मित्र रामकृष्णा देऊळकार आणि इतर दोघे अशा चौघांनी परीक्षेची तयारी केली. त्यावेळी स्कॉलरशिपच्या परीक्षेचे सेंटर बहुतेक संपूर्ण खामगाव तालुक्यासाठी एकच असावे. नॅशनल हायस्कु लमध्ये परीक्षा, पेपर असल्याने आम्ही मनातून पहीलेच घाबरलेलो. त्यातही खेड्यातले येडे म्हणून मांगं मांगं राहण्याची सवय. परीक्षेचा दिवस उजाडला. बावस्कार सरांनी आम्हा चौघांना एस.टी. बसने खामगावला नेले. तेथे उतरल्यानंतर पायदल चालत रस्त्यातील नटराज गार्डन मध्ये नेले. आत जाण्यासाठी असलेले फिरणारे छोटेसे लोखंडी गेट पाहूनच आम्हाले नवल वाटले. गार्डनमध्ये जेवण झाल्यानंतर नॅशनल शाळेत पोहोचलो. तर सकाळची शाळा सुटली होती. एकाच वेळी मुला-मुलांची गर्दी आणि शाळेचा हिरवा पॅन्ट व पांढर शर्ट यूनिफॉर्म सर्वांच्या अंगावर पाहून रामकृष्णा अवाक झाला. ‘‘बाप रे बाप, एकाच माय बापाचे एवढे मोठे लेकरं, सगळ्याईले सारखाच ड्रेस मेलो लेका,’’ असे आम्ही झांबलट होतो. भयताळ्यासारखे काहीही प्रश्न विचारत होतो.
परत येतांना खामगाव ते शिर्ला एस.टी बसने निघालो. मग रस्त्यानं गाडीत असेच काही बाही प्रश्न विचारणे सुरू. ड्रायव्हरच्या मागचे सीट त्यावेळी लांबलचक सहा जणांचे असायचे. तेथील जाळीला धरुन टोंगळ्यावर बसून समोर ड्रायव्हर गाडी कशी चालवतो. हे पाहतांनाच गोष्टी करायचो. ते ड्रायव्हरलाही ऐकू जायचे. विशेष म्हणजे, त्यावेळच्या गाड्यांना आता सारखे ड्रायव्हरच्या कॅबिनसाठी बाजूला चढण्या उतरण्यासाठी उघडणे, बंद करण्याचे दरवाजे नव्हते. मोठ्या खिडकीतून ड्रायव्हर चढत असे. आणि उतरत असे. ‘गाडी सुरू असताना पडू नये म्हणून आपण सीटला पकडतो. लोखंडी जाळीला पकडतो. पण ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी तर उघडीच आहे. ड्रायव्हरला तिकडून खाली पडण्याची भीती वाटत नसीन काय?’ असाही खुळचट प्रश्न एकमेकांना विचारत होतो. एवढेच नाही तर ‘या ड्रायव्हरले इतके गाव कसे काय माहीत आहेत, कोण्याही गावचा रस्ता जसाकाही पाठच असते. कुठीच एसटी भुलत नाही लेका’. असेही एकमेकांना विचारत होते. त्यामुळे आम्हाला किती बुध्दी, अक्कल असेल? हे समजू शकेल.
वडील एस.टी. महामंडळात कंडक्टर असल्यामुळे दरवर्षी दोन महिने मोफत सवलत पास मिळत असे. या पासवर असेच आम्ही घरची मंडळी पंढरपूरला गेलो होतो. सोबत वडिलांचे मित्र लोणी गवळीचे काळे काका, त्यांचे कु टुंब आणि पानकन्हेरगावचे जिरवणकर आप्पा यांचे कुटुंब होते. पंढरपूरहून पुढे सातारा जिल्ह्यातील मोठ्या महादेवाच्या दर्शनाला जाण्याचे ठरले. व बसने निघालो. ‘नातेपुते’ ओलांडल्यानंतर गाडी महादेवाच्या डोंगरावर चढू लागली. जागच्या जागी वळणात गाडी दम तोडत घाटावर चढत होती. शिखरावर चढतांना दोन्ही साईडने काचातून नुसत्या खोल-खोल दऱ्या दिसत होत्या. काचातून बाहेर पाहिल्याने ज्यांचे डोळे फिरत ते खिडकीतून मधल्या सीटवर येऊन बसले. अनेकांना नुसत्या खिडकीजवळीत सीटवर बसणे सहन झाले नाही. आम्ही दोन-चार मुले मात्र ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसून घाटाचा रस्ता पाहत आनंद घेत होतो. मोठमोठ्याने ओरडत होतो. तर गाडीत बसलेले प्रवासी फक्त देवाचं नाव घेत होते. गाडी सुरू असताना मला एक शंका आली मी विचारले, ‘आता जर का आपली गाडी खोल दरीत पडली तर?’ लगेच बाजूचा एक प्रवासी खेकसला ‘‘चूप बस, देवाचं नाव घे’, दुसरा म्हणाला, आपण देवाला चाललोय, त्यामुळं असं बोलायचं नसतं.’ आणि मी चूप बसलो. घरचे म्हणाले, ‘या भयताळ्याले कुठी काय बोलावं, काहीच समजत नाही. बोंगाळ्या लेकाचा’.
त्या काळात अजून एक प्रश्न मला पडायचा. ‘मोठे माणसंही विचारात पडत. आपण एसटीत बसलो, सोबतच आपल्या डोळ्यासमोर किंवा डोक्यावर एखादी माशी भिरभिरत असली, आणि एसटी बस सुरू झाली की, ती माशी पंख न उडवता एका जागी आपल्यासोबतच प्रवास करत असते. एकिकडे एसटी जोरात धावत असताना माशीला धावावे लागत नाही. कोणतेही कष्ट न करता, पंख न उडवता एसटीबसमधील माशी आपल्या डोळ्यासमोर प्रवास करत असते. जर एसटी जोरात धावते तर पण त्या माशीला इतक्या वेगाने एसटीबरोबर धावावे लागत नाही. तरीही ती आपल्यासोबत प्रवास कशी काय करते ?’ माझा हा प्रश्न काय हे अनेकांना समजतच नव्हते, कारण तो त्यांना अजब वाटे. परंतु त्यांच्याजवळ सांगण्यासारखे परफेक्ट उत्तरही नसे. त्यामुळे ते हसण्यावर नेत. आता मोठेपणी समजले की, पृथ्वीवर वेगात धावणाऱ्या वाहनातील माशीलाही गुरुत्वाकर्षणामुळे गती प्राप्त झालेली असते. व पृथ्वीच्या गतीशी एकरूप होत असते.
दुसरा प्रसंग असा, आमच्या वेटाळातील शंकरराव आंबिलकर हे बऱ्याच वर्षांपासून औरंगाबादला असतात. त्यांचे लग्न होते वाशीमला. त्याकरिता स्पेशल एस.टी बस होती. ही गाडी आंबेटाकळीच्या कोंडवाड्याजवळ येऊन थांबली. आमच्या गावात अजूनपर्यंत एस.टी आली नव्हती. कारण सर्व गाड्या फाट्यावरून सरळ रोडने जातात. पहिल्यांदाच एस.टी गावातील पश्चिमेकडील कोंडवाड्याजवळ उभी राहिली. एसटी गावात आल्याने पाहण्यासाठी आजुबाजूचे माणसं-पोरं गाडीभोवती जमा झाले होते. मीही घरून फक्त एस.टी. पाह्याले शाळेच्या कोपऱ्यावर गेलो होतो. खाकीची चड्डी आणि पांढरा मनिला अांगात होता. दोन्ही खांद्याच्या बाह्या शेंबुड पुसल्यानं कयकल्या होत्या. एवढ्यात वऱ्हाडी मंडळी लग्नाला जाण्यासाठी तेथे आली. सगळे गाडीत चढले. माझे वडीलही लग्नाला जाण्यासाठी निघाले. हे पाहून नवरदेवाचे काका शालीग्राम मामा मला म्हणाले ‘चालतं का रे वाशीमले, चाल लग्ना जाऊ’. त्यामुळे मी मनातून हरखून गेलो. पण म्हटले, घरी सांगतले नाही, कपडे धुयेल नाहीत. जाऊ द्या, आणि वडिलांचेही तसेच म्हणणे होते. तरीही शालीग्राममामाने बळजबरीने हात धरून गाडीत चढवले. अन लग्नाला नेले. वाशीमच्या राजगुरू परिवारातील हेे एकदम स्टॅण्डर्ड लग्न होते. आणि त्यात मी एकटाच येरा गबाळ्या दिसत होतो. हेही आज आठवते.
तसं म्हणसानं त मले लहानपणापासून प्रवासाची आवड आहे. गावं हिंडणे हा शौकच म्हणा लागीन. तसेच सार्वजनिक कार्यात सहभागी होणे, गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रमात जाणे आवडते. काही लोकांचा स्वभाव कसा आहे? नाही बुवा तिकडे लय गर्दी आहे. नंतर ‘अरवाडी’ जाऊ कधीतरी. पण माझं सुरुवातीपासून उलटं आहे. कारण गर्दीच्या ठिकाणी सगळे लोकं भेटतात. त्यामुळे गर्दीतला चेहरा होणे आवडते. भागवत सप्ताह, जत्रा, कीर्तन, दिंडी, गणपती, देवी, पोळा, तसेच लग्न कार्यात हजर राहून सहभागी होण्यात मजा वाटते. आमचा छोटा मुलगा सौरभही तसाच आहे, त्यालाही सामाजिक कार्यात आवड आहे.
गावातील लग्न लागण्यासाठी कोण्याही गावाले जावो. वऱ्हाडासंगं जाण्याची आपली तयारी असते. मी लहानपणी सगळ्यात पहिले पंचगव्हाणच्या आजीसंग माळेगाव बाजार ता. तेल्हारा येथून बैलगाडीने रात्रीच्यावेळी आडसूळ - पाडसूळ ता. शेगाव येथे लग्नासाठी आल्याचे आठवते. आमच्या वेटाळातील बहुतेक लग्नात मी नवरदेवासोबत लग्न लावायला गेलो असेल. पण आता सुट्या मिळत नसल्याने खंत वाटते. लग्न कार्यातच ओळखी पाळखी होतात. एकमेकांच्या भेटी गाठी होतात. माझा हा स्वभाव पाहून ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ हे लहानपणीच दोन तीन सोयऱ्यांनी ओळखले होते व बोलूनही दाखवले होते. आमचे पहुरजिरा येथील नातेवाईक कृष्णाभाऊ घोपे आणि शेगावच्या मंदिराजवळील रहिवासी असलेले नातेवाईक बाबुराव भटकर हे त्यावेळी कुठेही लग्न समारंभात भेटत. माझा स्वभाव पाहून ते नेहमी म्हणत ‘गड्या आताच लहानपणी तू एवढा लग्नकार्यात हिंडतं, एवढी ओळख-पाळख आहे. पुढे मोठा झाल्यावर त लेका सगळ्याइकडे तुही ओळख वाढीन,’ खरंच.. त्यांच्या तोंडात साखर पडल्यासारखं आज मले वाटते. वास्तविक मला जवळचे नातेवाईक फार कमी आहेत. पण दूरचे अधिक आहेत. कारण मला मामा, मावशी, काकासारखे कुणीच नाही हीच परिस्थिती पत्नी सौ. ज्योती आहे तिलाही मामा, मावशी, सख्खे कोणी नाही. तरीही आज आमची समाजातच नाहीतर इतरत्र, मित्रमंडळीत आणि गावागावातही बरीच ओळखी आहे. ही मोठेपणाची गोष्ट नाही, पण समाधानाची मात्र निश्चितच आहे.
तसेच आमच्या नात्यातील सर्व मामेभाऊ, आत्याभाऊ यांनाही एकमेकांची मजाक घेण्याची एक सवय आहे. आम्ही जवळच्या म्हणा, दूरच्या कोणत्याही कार्यात भेट झाली की, गमती सुरू असतात. एकमेकांची उडवून हासी मजाक करण्याचा उद्योग सुरू असतो. मी लहान असताना नात्याने आत्याभाऊ असलेले पुंडलिकभाऊ वानखडे पुण्यात राहत होते. प्रॉपर घाटपुरीचे असल्याने खामगाव परिसरात लग्न कार्यात त्यांची भेटगाठ होत असे. एका लग्नात माझी गंमत करतांना त्यांनी विचारले, ‘काय जनार्दन, सध्या काय सुरू आहे.’ म्हटले ‘दादा शिक्षण सुरू आहे.’ ते म्हणाले ‘कितवीला आहेस’ म्हटले ‘सध्या सहावीला आहे, पुढच्या वर्षी सातवीला, नंतर आठवीला जाईल’ ते म्हणाले, ‘ मंग पुढे काय करणार?’’ म्हटले ‘आपल्याले काहीतरी अलग सलग करायचं आहे.’ ‘म्हणजे काय?’ ‘पांडेबुवा, मास्तर, ड्रायव्हर, कंडक्टर, डॉक्टर त सगळेच होतात. आपल्याले विमान चालोनं शिकायचं आहे.’‘मग असं म्हण ना मला पायलट बनायचं आहे. म्हणून.’ ‘हा तेच ते पायलट’ ‘पण तू अशाने कसा बनणार पायलट?’ इथं तुला शिकण्यासाठी कोण विमान आणून देईल? म्हटले. ‘मंग जाऊ द्या, सोडा पिच्छा, त्या पायलट फायलटच्या नांदी नाही लाग्याले पुरत. आपलं हेच बरं आहे,‘‘झांबलट’’.
शेवटी पुंडलिकभाऊ मजाकीत म्हणाले ‘हो गड्या, हेही अलग सलगच आहे.’
...........................
आमचं घर धाब्याचं होतं. त्याच्यासमोर छोटेसं कवेलूचं घर बांधलेले होतं. त्या घराच्या मावच्यावर शेतीची अवजारे ठेवलेली असतं. आणि इकडे तिकडे सरते, वखराच्या डवर्याच्या पासा, आणि इतर औतफाटा पडेल असायचा. अशाताच आमच्या गावात पिंपळगाव राजा येथील वायरमन बदलून आले होते. जातीचे असल्यामुळे त्यांनी हे कवेलूचे वरतल्ले घर भाड्याने मागितले. आबांनी २० रु. महिना कबूल करून घर भाड्याने दिले.
वायरमनचे नुकतेच लग्न झालेले होते. त्यांची पत्नी लताबाई दिसायला सुंदर असली तरी अडाणीच होती. वायरमनने त्या बाईला घरच्या घरी शिकवले. मी शाळेत जात असल्याने माझ्या पुस्तकातूनही ती बाई लिहिणे वाचणे शिकत होती. दरम्यानच्या काळात त्यांना मुलगा झाला.त्याचे नाव संजय ठेवले होते. तेव्हा आमच्या घरात कुणी एवढे लहान बाळ नव्हते.म्हणून आम्ही सर्व जण त्याचा फारच लाड करायचो. तो घरात कमी आणि आमच्या अंगणातच जास्त रमायचा. हळूहळू तो सरकायला लागला, रांगायला लागला. त्यामुळे आवडायला लागला हसणे-बोलणे-खेळणे असे गुण करु लागला. हे सर्व ठिक होते. पण तो बाळ मला सुखाने जेवण करु देत नव्हता. मी ताट घेऊन बसलो की जवळ येऊन ताटात मारुन भाजी सांडवून देई, पाण्याचा ग्लास सांडवून देई, त्यामुळे त्याच्यावर लक्षच ठेवावं लागतं होतं. तरीही नजर चुकवून तो तिखट भाजीत हात मारुन डोळ्याला लावत असे आणि डोळ्याची अंगार झाली की, बोंबलत असे. त्याच्या आईला सांगितले की, त्या उलट मलाच म्हणायच्या तूने लक्ष दिले नाही का त्याच्याकडे? इकडे माझी आई म्हणायची, ‘‘लहान आहे तो, त्याले समजत नाई’’ असे म्हणत मामला खलास होई.
असेच एक दिवस मी सायंकाळी ५ वाजता शाळेतून घरी आलो. भूक लागली होती. म्हणून तडकाफडकी वळ्याची भाजी केली होती. त्या भाजीत मस्तपैकी हिरव्या मिरच्याच्या गंडोर्या टाकलेल्या होत्या. एवढ्यात संज्या ताटाजवळ येत होता. म्हणून मंग मीच त्याला जवळ बोलावले. ‘‘हे घे’’ म्हणत त्याचा हाती भाकर देण्याऐवजी वळ्याच्या भाजीतल्या हिरव्या मिरचीच्या गंडोऱ्या दिल्या. गंडोऱ्या म्हणजे हिरव्या मिरच्या कापून केलेले छोटे छोटे तुकडे. ते त्याने उचलून तोंडात घातले अन लागला भोकाड पसरायला. आणि वरून मीच म्हणत सुटलो, ‘काय झाले.. काय झाले?’ त्यामुळे सगळेच जमा झाले. मी म्हटले,‘माझे लक्ष नसतांनी यानं ताटातली मिरची खाल्ली वाटते’ असं म्हणून माजोन मिटवून टाकले. त्यावेळी कुणाला वाटलेही नसेल की बिचारा संज्या काऊन रडतोय? मिरची त्यानं स्वत:हून घेतली की, मी खाऊ घातली. माणसाचा स्वभाव कधी कसा बदलतो हे यावरून दिसून येते.
दुसरा एक वेगळा प्रसंग म्हणजे, आमची चुलत बहीण पंचफुलाबाईचे लग्न होते. आम्ही लहान होतो. त्या लग्नाला आमचे अकोल्याचे सुखदेवमामा डामरे आले होते. त्यांनी आई-बाबांसाठी भर आहेर आणला. त्यात मला आणि गणेशला रेडीमेड ड्रेस आणला होता. त्यांनी मोठेपणाने म्हणा किंवा मनापासून आणला असेल. पण मी लग्नाच्या वेळेसही तो ड्रेस घालायला तयार नव्हतो.कारण काय तर काहीच नाही? भंग नेसनं हा ड्रेस तर नाही. सगळे माझ्यामुळे परेशान झाले. लग्नाच्या गडबडीत सारे माझीच मनधरणी करत. पण मी नाव ऐकायला तयार नव्हतो. कारणही सांगत नव्हतो अन ड्रेसही घालत नव्हतो. शेवटी रागारागाने तो ड्रेस ठेवून दिला आणि मी मात्र जुन्याच कपड्यात राहणे पसंद केले.
त्यावेळचे खरे कारण आता कळायला लागले. आमचं छोटसं खेडं त्यात दररोज शाळेत जाण्यासाठी पांढरा मनिला वा खाकी हाफ पॅन्ट नेसणे, हा नित्यक्रम ठरलेला, त्यामुळे पांढऱ्या रंगाचेच शर्ट आवडायचे. आणि मामांनी आणलेले कपडे शहरी भागातले. अकोल्यातील लहान मुले रंगीत कपडे वापरतात. म्हणून त्यांनी रंगीत कपडे आवडीने आणले. पण मी माझी आवडं जपली होती.म्हणजे मले जे पटेल ते मी करीन. माह्या मनाचा मीच राजा. कधी कधी अशा स्वभावामुळे नुकसानही होऊन जाते,हेही अनुभव आता येऊ लागले आहेत.
...........
आम्ही लहान होतो, त्या वक्ती म्हणजे ‘हमारे जमाने मे’ कृषी खात्यानं अनेक म्हणी गावागावात लिहून ठेवल्या होत्या. गेरुनं गावातल्या सारवेल, चोपड्या भिता रंगवल्या होत्या. शेतकऱ्यांईले मार्गदर्शन हा उद्देश असीनं, सगळ्या म्हणी वाक्य तं आता आठोत नाही, पण ‘‘सुपीक’’ काळ्या जमीनीवर कपाशी लावा, मुरमाळ जमिनीत भुईमुग ‘‘पेरा’’ असा सल्ला खेड्यातल्या लोकाईले देला व्हता.
हा शेतकऱ्यांना दिलेला सल्ला अजूनही आमच्या गावातले लोक पाळतांना दिसतात. आणि त्याच्या अगोदरही ‘‘भारी वावरात पऱ्हाटी, अन् बरळात व्हलगं’’असं पीक घेणं सुरू होतं. आंबेटाकळी शिवारात नदीच्या उत्तरेकडून रेंगटीचा माथा आहे. या माथ्यावरची जमीन म्हणजे गोटाळी आहे.‘माती कमी गोटेचं जास्त’ अशा शेतात काय पिकणार? म्हणून जनावराच्या चाऱ्यासाठी एका डुंग्यात व्हलगं पेरतं होते. ‘व्हलगं’ं हे कडधान्य आता तुम्हा आम्हाले डोयानंही दिसत नाही. ओळखणं तं दूरच राह्यलं.
घरी बैलाची जोडी असायची. संध्याकाळी बैलासाठी टोपल्यात दुपारपासून दान भिजू घाला लागे, रोजचा अलपच होता ढोराईले. त्यात ते व्हलगं मिसय करत होते. बस दुसरं काही पीक येत नव्हतं बरळात.
या बरळात एका बांधावर टेंभरुणीचे झाड होते. ते २५-३० वर्षापासून आजही आहे. म्हणून या मुरमाळ मातीच्या शेताला आम्ही ’टेंभरुणंचं वावरंच’ म्हणतो. या वावरात सुरुवातीला दरवर्षी भुईमुगाचं पीक घेतल्या जात होते. भुईमुग उपटण्यासाठी गावात भरपूर मजूर भेटतं. पावसाळाही बरापैकी असे. सगळीकडे भुईमुगचं दिसे. या भुईमुगाच्या पिकावर रखवाली साठी शेताच्या मधोमध बांधावर एक लहानशी खोपडी उभारल्या जाई. तात्पुरती राहुटी म्हणता येईल. मधात एक दोन लहानशा ठुण्या रोवल्या, त्यावर दोन्हीकडून कोरडे गवत शाकारले की, झोपडी तयार. पाण्याची घळ्ळी नाहीतर मातीचं लहानसं भरणं, त्याच्यावर जर्मनची थाली (गडवा), बसायला पोतं, अन चहा करण्यासाठी तीन गोट्याची चुल अन् खरकट भगुनं एवढच त्या झोपडीत राहे, वान्नेरं, डुकरं, अन् येणाऱ्या जाणाऱ्यावर आणि चोरुन शेंगा खाणाऱ्यावर निगराणी एवढचं काम या खोपडीतून दिवसा चाले. आणि रातच्या जागलीसाठी चार धारण उभे करुन मावचा तयार करतं. धारण म्हणजे लाकडाचे खांब आणि मावचा म्हणजे मचान, त्यावर चढलं की, आजूबाजूचा जंगल न्याहाळता येते. कुठी कोणाचा ‘चाय’ (चाहुल) येते का? आला तर आजूबाजूच्या रखवाल्याईले शिट्ट्या वाजवून जागे करणे, हे काम सुरु असे. नाहीतर मग लटकवलेला कंदील जागरण करे आणि मावच्यावरचे ढाराढूर झोपतं. इचू काट्याची भिती नाही, घरच्या पेक्षा मोकाट हवा. एकदा झोप लागली की, उजीड पडल्याशिवाय उठणेच नाही. नाव काय तर म्हणे‘‘जागलं’’.
असं म्हणतात की, ‘भुईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात की, जमिनीच्या वर’ हे कोण्या एका कृषिमंत्र्यालेही माहीत नव्हतं’. तशीच गत आमच्या मुलाबाळांची झाली आहे. कामानिमित्त गाव सोडलं. मुलं शहरातच लहानचे मोठे झाले त्यांनी कधी वावर पाह्यलं नाही. मंग शेंगा खाली लागो की वर लागो फक्त शेंगदाणे खायाचे मालक आम्ही अशी गत आहे. मंग नंतर सुरू होये, भुईमुंग उपटण्याचा आणि शेंगा तयार करण्याचा हंगाम. एका-एका वावरात १५-१५ बाया माणसं, लेकरं बाकरं चाल्ले भुईमुंग काढ्याले. बरळाच्या जमिनीतून पिकवलेला भुईमुंग काढणे सोयीचे असते. उलट काळीच्या मातीतला भुईमुग कठीण जाते. तसंही शेंगांना काळी माती चिकटते, म्हणून सुपीक जमिनीत कोणी भुईमुग पेरत नाही.
पहिल्यांदा भुईमुग उपटून कौटेच्या कौटे एका ठिकाणी आणून जमा करणे हेच काम चालते. नंतर शेंगा झाडण्यासाठी वावरात चांगले डोबले (खड्डे) खंदा लागत. जशा जास्तीच्या स्वयंपाकासाठी जमिनीत चुली खोदतात. तशा चुलीसारखे खड्डे खोदून त्यावर वखराच्या पासा आडव्या ठेवायच्या एकाने भुईमुगाचे उपटलेले झुडुपं बाजूला आणून ठेवायचे अन् दुसऱ्यानं लोखंडी पासावर झपके द्यायचे. खाली खड्ड्यात भईमुंगाच्या ओल्या शेंगा जमा होत. याले काही लोकं गमतीनं ‘ फल्ल्या झाळणे’ असंही म्हणतात. संध्याकाळी त्यातल्या टोपल्याभरं घेतल्या की,भाजल्या तव्यावर ‘एकादस उपास नसला तरी फराळ व्हायचं.’ कोणी म्हणे जास्त खाल्ल्या की उराई होते, ओल्या शेंगा खाल्ल्या की, खोकला येते, पोटात खदखद करते. पण लहानपणी नवाईचं तशी, भिडले की भिडले.
जमा झालेल्या शेंगा पोत्यात भरून घरी आणल्या जात. आमच्या घरात जुनी कणगी होती. निरगुडच्या कामट्याची, मातीने लिपलेल्या त्या कणगीत वरुन पोतड्यातल्या शेंगा टाकत. सगळ्या शेंगा टाकून झाल्या की, ती कणगी चोहोबाजुंनी शेणामातीने लिपून घेत. एकही तोंड उघडं नसे. पण काही शेंगा पाहिजे असल्यास खालच्या साईडने एक छोटंसं भोकाडं ठेवलेलं असे. त्यातून जशा लागल्या तशा शेंगा काढता येतं. पण कोणी काढत नसे. या भोकाडाचा उपयोग फक्त उंदर घेत. जागा केली की, घुसली कणगीत. कितीही लिपले तरी त्याईच्या येरझारा सुरु असायच्या. मग त्याच तोंडातून(भोकाडातून) आम्हीही चोरुन एक-एक शेंग बोटाने अल्लद बाहेर ओढायचो. दोन-चार दाने खाल्ले की, टप्पर रस्त्यावर नेऊन फेकून द्यायचो.
सुकलेल्या, वाळलेल्या शेंगापैकी काही बाजारात नेऊन विकल्या जात. काही शेंगाचे घाण्यावरुन तेल काढून आणले जाई. तर त्यातल्यात काही शेंगांचे दाणे काढून पुढच्या वर्षाच्या बिजवाईसाठी ठेवले जात होते. मंग शेंगा फोडून त्यातले दाणे काढण्यासाठी बाया पोरांनो सांगितले जाई. ५० पैसे किलो प्रमाणे शेंगा फोडून घेण्यात येत. बीजवाईसाठी फुटलेले दाणे चालत नसल्याने दाणे फुटू देऊ नका असे पोरांना वारंवार सांगावे लागे. बाया मात्र दाणे फुटले की, दिसू न देता मटकन तोंडात टाकतं. आणि ‘‘आजी त्यानं दाणे तोंडात टाकले बरं.’’ अस म्हणून दुसराही झकोला देत असे. ‘खाऊ नका रे’ म्हणू म्हणू बोंबला पण कोणी नाव ऐकेना. शेंगो फोडावे म्हटलं की, दिवसभर तोंड मुखुर मुखुर सुरुच राहे पोराईचं. सगळे काम सोडून शेंगा फोडण्यासाठी कुणीही पटकन तयार होत असे. दिवसभर नुसती दाणे खायाची मजा असे. त्यामुळे ते लहानपणीचे दिवस अजूनही आठवतात.
सुदैवाने आजही आमच्या या बरळात धरणाच्या पाण्यावर उन्हाळी भुईमुगाची लागवड केली जाते. शिर्ला येथील मन प्रकल्पाचा एक पाट आमच्या या टेंभरुणच्या वावरातून गेला आहे. पावसाळ्यात धरण भरले की, उन्हाळ्यात हमखास भुईमुगाले पाणी भेटते. व्हलग्यासारखे पीक नामशेष झाले, पर्हाटीचा पेरा कमी झाला. सोयाबीनचे प्रमाण वाढले, तरी आमचं बरळाचं वावर अजूनही ‘भुईमुगालेच’ आवाज देते.
....................
कसं कोणतंही गाव म्हटले की, एक ओळख असते. ती कशावरूनही होऊ शकते. बहुतेक आजच्या भाषेत म्हटले तर त्याला ब्रॅण्ड म्हणतात. त्या गावात तयार होणाऱ्या किंवा तेथील प्रसिद्ध वस्तू ठिकाणामुळे तशी ओळख बनते. चप्पल म्हटली की कोल्हापूर, संत्रा म्हटले की, नागपूर, सरोवर म्हटले की लोणाऱ़, कचोरी म्हटले की शेगाव, गुळपट्टी म्हटले की गांधीग्राम असे बरेच ब्रँड बनले आहेत. तसेच संतांच्या गावावरुन किंवा त्या गावातील कर्तबगार घराण्यावरुनही गावं प्रसिद्ध आहेत. शिरला नेमाने, उमरा भिसे, पिंप्री कोरडे, कान्हेरी सरप, जयपूर लांडे, त्याचप्रमाणे देऊळगाव साकर्शा, पळशी सुपो, धानोरा महासिध्द या नावानेही गावांची ओळख बनली आहे.
आमच्या आंबेटाकळी गावाचीही ओळख व्यक्ती आणि काळपरत्वे बदलत आहे. येथे नारायण महाराजांसारखे संत होऊन गेल्याने त्यांचे नाव अमर आहे. त्यानंतर धार्मिक क्षेत्रात बालब्रह्मचारी किसनगिरी महाराज होऊन गेले. त्यांच्याबद्दल असे सांगण्यात येते की, श्री संत किसनगीर सोमगीर महाराज यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील वरखेड वाघजळ येथील पाटील घराण्यात सन १८६० साली झाला. त्यांच्या आई वडिलांनी वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना अमरावतीचे गुरुवर्य नरसिंह महाराज यांच्या ओटीत टाकले. दरम्यानच्या काळात त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. अमरावती येथे १० वर्षे राहून त्यांनी गिरींचा अभ्यास पूर्ण करून ते तीर्थयात्रा करण्यास निघाले. नंतर त्यांनी माहूर येथे १२ वर्षे सेवा केली. त्यानंतर लोणार येथील सरोवराजवळ एका ठिकाणी ६ महिने राहून योगसाधना केली. असे फिरत फिरत चारीधाम करत अमडापूरच्या महादेव मंदिरात १२ वर्षे राहिले. तेथून काही शिष्य मंडळींनी त्यांना बाळापूर तालुक्यातील घुई येथे राहण्याचा आग्रह केला. त्यानुसार ते १०-१२ वर्षे घुईला राहिले. या काळात म्हणजे सन १९५१ च्या दरम्यान, आंबेटाकळीतील काही लोक डागण्या देण्यासाठी घुई येथे जात होते. गणपत पाटील, यादवबुवा, तुकाराम इंगळे, संभू इंगळे ही मंडळी तेथे गेली व महाराजांना सांगितले की, आमच्या आंबेटाकळी गावात संत नारायण महाराजांनी वारकरी सांप्रदाय चालवून बऱ्याच लोकांना भक्तीमार्गाने लावले आहे. १९३८ पासून म्हणजे त्यांच्या वैकुंठागमनापासून जवळपास १३ वर्षे ही संतांची भूमी रिकामी आहे. ही पोकळी आपण भरून काढून मारुतीरायाची सेवा करावी, असा आग्रह करून किसनगिरी महाराजांना १९५१ साली आंबेटाकळीत वास्तव्यास आणले. आम्ही त्यांना गोसाईबुवाच म्हणो. येथील मारुतीच्या मंदिरात राहून त्यांनी शेवटपर्यंत म्हणजे आश्विन कृष्ण २अर्थात २७ ऑक्टोबर १९९६ पर्यंत मारुतीरायाची सेवा केली. जीवनभर ब्रह्मचर्येचे पालन करून दररोज घरोघरी भिक्षा मागून त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवला. दरम्यान, त्यांनी २ एकर शेती घेतली. दररोज ते शेतात जात, दुपारी ४ वाजताच्या सुमारास घरी येताना ते पाळलेल्या गाई वासरांसाठी गवताची पेंडी डोक्यावर आणत. त्यांची पादत्राणे म्हणजे खडावा. कापडाचे दोन पट्टे असलेल्या लाकडी चपला. आमच्या बालपणात त्यांचे शेतात जाणे-येणे सुरू असायचे. महाराज नदीच्या काठावर वावरातून येताना दिसले की, आम्ही दोन चार लहान पोरं त्यांना रस्त्यातच थांबवून त्यांच्या पाया पडत असो. नंतर वृद्धापकाळामुळे किसनगीर महाराजांनी ती शेती मारुती संस्थानला दान दिली. तसेच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी ३५ हजार रुपयाची रोख देणगी दिली. ते दररोज पहाटे उठून स्वत: सडा सारवन करून पूजापाठ करत. अगदी बालपणापासून ब्रह्मचारी असलेल्या किसनगिरी महाराजांचे या परिसरात आज रोजी असंख्य शिष्य आहेत.
तर राजकीय क्षेत्रातही आंबेटाकळी गाव सुरुवातीपासून आघाडीवर राहिलेले आहे. खामगाव मतदार संघाचे माजी आमदार स्व. गोविंदसेठ भाटिया यांचा त्या काळात काँग्रेस पक्षात फारच दबदबा होता. हा माणूस साधा आमदार असला तरी कुणी मंत्री असो, मुख्यमंत्री असो की, काँग्रेसचा खासदार वा बडा नेता असो, गोविंदसेठची भेट घेतल्याशिवाय जाऊच शकत नव्हता. आणि तेही आजच्या सारखे नाही. मंत्री येत आहे म्हणून द्या खामगाच्या जाहीराती, पुढे-पुढे जाऊन करा त्या पुढाऱ्याचे स्वागत, हा प्रकार त्यांच्या जवळ चालतच नव्हतां. जो कुणी येणारा नेता आहे, तो स्वतहून त्यांच्या घरापर्यंत येत होता. आणि भेट घेऊन निघून जायचा. एवढा काँग्रेस पक्षात स्व. भाटीयाजींचा दरारा होता. आणि हे गोविंदसेठ भाटीया होते. आमच्या आंबेटाकळीचे. त्यामुळे त्याकाळात गावाची ओळख गोविंदसेठचे गाव म्हणून अशी बनली होती.
त्यानंतरच्या काळात आमदार गावातील श्री विठ्ठल रुखमाई संस्थानचा कारभार बऱ्यापैकी सुरू होता. संस्थानकडे शेती, बैलजोड्या असल्यामुळे भरभराट होती.त्यावेळी संस्थानचे अध्यक्षपद आनंदराव धोटे पाटील यांच्याकडे होते. फार रुबाबदार माणूस असल्याने संस्थानचे कामकाज अगदी व्यवस्थित आणि सुरळीत चालले होते.
श्री संत गजानन महाराजांची पायदळ वारी दिंडी पंढरपूर वरुन शेगावला परत येतांना आंबेटाकळीत मुक्कामाला असायची. विशेष म्हणजे या छोट्याशा गावातून अश्व, गज, मेणा यांच्यावर श्रींची पालखी गावप्रदक्षिणा मारत होती. दिंडीतील वारकऱ्यांसोबतच गावातील लोकांसाठी भोजनदान व्हायचे. संस्थानची गावाची किर्ती वाढल्याने अध्यक्षांचेही नाव परिसरात होऊ लागले. त्यामुळे आंबेटाकळी म्हटले की, आनंदराव पाटलाची काय? असे विचारल्या जाऊ लागले.
याच काळात शिक्षण क्षेत्रात मोठे नाव कमावणारी एक व्यक्ती होऊन गेली. लहानपणापासूनच खूप हुशार असलेला मुलगा मोठेपणी प्रोफेसर झाला होता. ज्या काळात आमचे बहुतांश गाव हे अडाणी होते. त्या काळात भास्कर ज्ञानदेव टिकार यांनी आंबेटाकळी गावाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या शिक्षणातील योगदानामुळे गावाचा लौकिक वाढला. पण नियतीने मध्येच त्यांच्यावर घाला घातला. वडील ह.भ.प. ज्ञानदेवबुवा टिकार हे हयात असताना हुशार गुणी मुलगा आपल्यातून निघून गेला. स्व. भास्कर टिकार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ गावातील जि.प. म. पू. मा. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी बक्षीस देण्यात येते. त्या निमित्ताने गावाला त्यांची आठवण अजून स्मरणात आहे.
अलिकडच्या काळात सांगायचे झाल्यास राजकीय क्षेत्रात खामगाव पंचायत समितीचे सभापतीपद आंबेटाकळी येथील भाजपचे नेते पुंडलीकराव घोगरे मामा यांच्याकडे आले होते. फारसे शिक्षण झालेले नसले तरी त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे घोगरेमामाच्या रुपाने एक चेहरा गावाला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात आणखी एक नेतृत्व आंबेटाकळीतून उदयास आले आहे. शिरु पाटील अर्थात श्रीकृष्ण तुकाराम धोटे या युवा नेत्याच्या माध्यमातून गावाच्या विकासात भर पडली. तर सन २०१७ मध्ये झालेल्या जि.प.च्या निवडणुकीत लाखनवाडा सर्कलमधून भाजपच्या सौ. वर्षा अंबादास उंबरकार ह्या निवडून आल्या आहेत.
ज्यांना गावासाठी काहीतरी करावेसे वाटते, असे आमच्या गावाचे एक अधिकारी वनखात्यात होऊन गेले. श्रीराम दत्तुजी शेळके यांनी गावात श्री संत नारायण महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले आहे. तसेच गावात सार्वत्रिक वाचनालय उघडले आहे. आतापर्यंत सातवी पास झाल्यावर बाहेरगावी पोरांना जावे लागत होते. आता आमच्या गावात आजूबाजूचे पोरं शाळा शिकायला येतात.
गावाचं नाव व्यक्तीमुळे, संस्थेमुळे मोठं होते. विविध क्षेत्रातील कर्तृत्वान माणसामुळे गावाची प्रसिद्धी होते. त्याचप्रमाणे वारकरी सांप्रदायात आंबेटाकळीची ओळख निर्माण करण्यात ह.भ.प. गणेश महाराजांचाही वाटा आहे. आमच्या येथील पांडुरंग महाराज गणेश हे दरवर्षी शेगाव येथून पायी जाणाऱ्या दिंडीमध्ये पंढरपूरला जात होते. त्यांचे चिरंजीव महादेव महाराज गणेश हे सुद्धा खामगाव तालुक्यातच नव्हे तर वऱ्हाडमध्ये एक चांगले कीर्तनकार म्हणून नावारुपास आले आहेत. सध्या महादेव महाराजांचे वास्तव्य माक्ता कोक्ता येथे असले तरी आंबेटाकळीकर म्हणूनच ह्यांची ख्याती आहे. त्यांच्यामुळेही आंबेटाकळीचे नाव दूरपर्यंत पोहचण्यास मदत झाली असे म्हणायला हरकत नाही. माझ्या नजरेसमोर ज्यांची नावे आहेत. त्यांचा मी आवर्जून उल्लेख केला आहे, पण ज्यांचा अनावधानाने उल्लेख राहून गेला असेल ते सुध्दा कमी नाहीत.ज्यांच्यामुळे गावाची इतरत्र ओळख निर्माण झाली. अशी छोटी-मोठी पात्रे भरपूर आहेत. काही होऊन गेली, होतीलही. पण ज्यांना संपूर्ण गाव मानते अशा संत नारायण महाराजांनीच गावाची खरी ओळख करून दिलेली आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे. दिवसेंदिवस श्री नारायण महाराजांच्या भक्तांची संख्या वाढत आहे. दरवर्षी आंबेटाकळी येथून महाराजांची पायदळ दिंडी पालखी इलोरा (ता.जळगाव,) येथे जाते, चरित्र ग्रंथाच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनकार्याचा प्रसार परिसरात होत आहे.
एवढेच काय? आता ‘जय नारायण’ सुरू झाले आहे. पूर्वीपेक्षा गावात वाहनांची संख्या वाढली आहे. मोटार सायकल, मिनीट्रक, ट्रॅक्टर, कार इत्यादी वाहनांवर आता सर्रास ‘‘जय नारायण’’ असे लिहिलेले दिसते. त्यामुळे रस्त्याने जाणारे अनोळखी वाहन हे कुण्या गावाचे आहे. हे सांगण्याची गरज उरली नाही. शेवटी ‘जय नारायण’ बोले तो आंबेटाकळी, बस्स एवढेच.
.............................
कसं हाय भाऊ कोणालेही वाटते की, शेती करणे फार सोपे आहे. पण प्रत्यक्षात शेती करणे किती कठीण आहे, हे ज्याचे त्यालाच समजते. “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ अशी परिस्थिती आहे. टोले एवढे पडतात की, सांगता सोय नाही. दिवस निघाल्यापासून संध्याकाळपर्यंत काहीना काही टोले घेणे सुरूच असते. त्याले घडीची फुरसत नसते. तरीही बाकीच्यांना शेती मात्र सोपी वाटते. शेतकऱ्यांना किती टेन्शन असते, हे नोकरीवाल्यांना कसं समजणारं? इथे महिना संपला की, तारखेची वाट पाहणे सुरू असते. दरमहा ठरलेली रक्कम ठरलेल्या तारखेला हमखास मिळते. दुसरे म्हणजे, भविष्याचे काहीच टेन्शन नसते. त्यामुळे सगळं कसं हिरवं हिरवं दिसते. शेतकऱ्याला काही समजत नाही आणि आपणच किती हुशार आहो, हे दाखवायचे असते. आपल्या मनाचे मांडे मांडून तो शेतकऱ्याचे गणित कसे चुकते आणि मला शेतीबद्दल किती माहिती आहे, असे अक्कल पाजळून जो- तो सांगताना दिसतो. पण भल्या-भल्यांना हे ठाऊक नाही की, शेतकऱ्यांचं गणित हे निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असते. पाणी नाही, पाऊस नाही म्हटलं की, शेतकऱ्यांना रात्र-रात्र झोप लागत नाही. इकडे नोकरदार, व्यापारी मात्र निर्धास्त, ढाराढूर झोपा काढत असतात. शेत पिकलं नाही तर वर्ष कसं काढायचं ? हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा असतो. आई-वडिलांचं पालन-पोषण, मुलांचं शिक्षण, मुलीचे लग्न आणि दवाखान्याचा खर्च तसेच वेळेवर येणारे दुसरे विषय, हॅन्डल करताना कशी फजिती होते? हे खेड्यात गेल्याशिवाय शहरी बाबूला समजू शकणार नाही. जे लोक शेती करतात ते प्रत्यक्ष जाऊन पाहिल्याशिवाय कळणार नाही. इकडून तिकडून निसर्गाने साथ दिली आणि चांगले पीक आले तर शेतमालाला भावही मिळत नाही. हे एक प्रकारचे सुलतानी संकट शेतकऱ्याच्या बोकांडीवर दरवर्षी बसलेले असते. कोणतेही सरकार सत्तेत आले तरीही शेतमालाच्या भावाकडे लक्ष देत नाही. “शेतकऱ्यांचे शोषण हेच आमचे शासन’ असा खाक्या सत्ताधिकारी पूर्वापार चालवत आलेले आहेत. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही आशा उरली नाही. ज्याला सगळ्या मार्गाने रोखल्या जाऊ शकते, जागोजागी शोषण होते, असा थट्टा,मस्करीचा विषय ठरलेला एकमेव प्राणी म्हणजे शेतकरी आहे. त्याला घडीघडी ठोकरा खाव्या लागतात. कुठेही अपमानच सहन करावा लागतो. त्याला प्रतिष्ठा नाही. जी मुले “शेतकरीपुत्र’ म्हणून शेखी मिरवितात, त्यांचीही अक्कल पुढे पुढे आणखी वाढत जाते. ते सुद्धा आपल्या शेतकरी बापाला मूर्खातच काढतात. म्हणजे त्यांनी काबाडकष्ट करायचे, मला शिकवायचं, मोठा करायचं, नोकरीवर लावायचे. आणि उलट त्यांना उपदेशाचे डोस पाजणार की, तुम्हाला काहीही कळत नाही. व्वाह रे बेट्या. खूप हुशार झाला.
बरं जाऊ द्या. आमच्याकडेही शेती आहे. खामगाव तालुक्यात आंबेटाकळी हे आमचं गाव. आजोबा पूर्वीपासून शेतीच करत होते. “उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ असा समज त्या काळात होता. म्हणून आपल्या मुलानेही शेतीच करावी असे आबांना वाटत होते. वडिलांचे प्राथमिक शिक्षण त्या काळात गावातील शाळेत आणि पुढील शिक्षण गावापासून जवळच म्हणजे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरला नेमाने येथे झाले. सातवी पास झाल्यानंतर मॅट्रीकसाठी वडिलांना खामगाव येथील नॅशनल हायस्कूलमध्ये टाकण्यात आले. त्यावेळी वडील खामगावपासून जवळच असलेल्या घाटपुरी येथे आपल्या बहिणीकडे राहत होते. तेथून दररोज पायी शाळेत जाणे- येणे करत होते. त्या काळात आमच्या गावात बहुतेक मोजके लोक शिकलेले होते. सातवी पास झालेलेसुद्धा नोकरीवर लागले होते. मास्तरची नोकरी सहज मिळत होती. असे असताना पण नोकरीवर जाण्यासाठी किंवा गाव सोडण्यासाठी कुणीच सहजासहजी तयार होत नव्हते. मुलाला नोकरीवर पाठवले तर आपलं कसं होईल, शेतीवाडी कोण पाहील? हा प्रश्न माझ्या आबासमोरही होता. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना नोकरी करू दिली नाही. त्यामुळे वडीलही शेतातच काम करू लागले. घरी गाडी-जोडी होतीच.
या काळात गावात फारसे शिकलेले कोणी नव्हते. पण आमच्या गावाच्या बाजूला असलेल्या बोथाकाजी येथे गावंडेसाहेब हे नामांकित व्यक्ती होते. ते आमच्या आंबेटाकळी गावातील शिकलेल्या तरुणांना नोकरीवर लावण्यासाठी वेळोवेळी निरोप पाठवायचे. पण नोकरीला जाण्यासाठी कोणी सहजासहजी तयार होत नव्हते. माझे आई-वडील सांगतात की, त्यावेळेस सहजच मास्तरची नोकरी लागत होती, पण केली नाही. दरम्यानच्या काळात वडिलांचे लग्न झाल्यानंतर १९७८ मध्ये एसटीची ऑर्डर आली म्हणून खामगाव डेपोत फक्त एकच महिना काम केले. नंतर नोकरी सोडून पुन्हा शेती करणे सुरू केली. आमच्याकडे त्यावेळी एक शिवचे वावर आणि दुसरे म्हणजे टेंभुर्णीचे वावर होते. शिवचे वावर तिकडे दूर बोरीअडगाव शिवारात होते. टेंभुर्णीचे वावर रेंगटीच्या माथ्यावर म्हणजे अलिकडेच होते. या वावराच्या बाजूला म्हणजे, धुऱ्याले धुरा लागूनच घोगरे मामांचे वावर आहे. माझ्या वडिलांचे ते वर्गमित्र आहेत. पुढे पुंडलिकराव घोगरे मामा हे खामगाव पंचायत समितीचे सभापतीही बनले होते. पण लहानपणापासूनचे मित्र असल्याने वडिलांसोबत शेतात जात, सोबतच काम करत आणि सोबतच घरीही येत. त्यांच्यात गप्पा टप्पा चालत. “शेतीत काही पडेल नाही गड्या’ असं मत त्याचं झालं. मग घोगरेमामांनी पुन्हा सल्ला दिला. “जमत असीन त नोकरीचं पाह्य गड्या गोविंदा’. म्हणून नांदा लावायचे. मग वडिलांनी नोकरीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. एसटी महामंडळाकडून नोकरीची ऑर्डर आली. पण तरीही आबा त्यांना नोकरीवर जाऊ देण्यास तयार नव्हते. “आपल्या घरचे कसे होईल, मुलाबाळांचे कसे होईल, एकुलता एक पोरगा तू आणि आम्ही थकलेले म्हातारे. मग आमचं कोण करणार? आपली शेतीच बरी आहे गड्या’ असे म्हणत होते. पण यावेळी वडिलांनी शेतात करावे लागणारे काबाडकष्ट पाहिले. आणि नोकरीवर जायला परवडते काय? याबाबत गावातल्या दोस्तमित्रांचा, वडीलधाऱ्यांचा सल्ला घेतला आणि एसटी वाहकाची नोकरी स्वीकारली. सुरुवातीला बरीच वर्षे त्यांनी मेहकर आगारात ड्युटी केली. नंतर १९८४ मध्ये जळगाव जामोद डेपो अस्तित्वात आला, त्यावेळी त्यांची बदली जळगाव जामोद येथे झाली, तेथे काही वर्षे काम केल्यानंतर पुन्हा ते मेहकरला बदलून आले.
दरम्यान, १९९१ साली आम्ही काही कारणास्तव गाव सोडण्याचे ठरवले आणि खामगावला राहण्यासाठी छोटेसे घर विकत घेतले. चांदमारी भागातील त्या कुडाच्या घरात राहायला गेलो, नंतर सिमेंट-विटाचे घर बांधून त्यावर टीनपत्रे टाकले आणि तिथलेच झालो. याचकाळात आजोबांचे निधनही खामगाव येथेच झाले. आम्ही चारही भावंडे शाळा-कॉलेजात खामगावला शिकत होतो. वडील एसटीची ड्युटी करत होते. मग शेती कोण पाहणार ? हा प्रश्न निर्माण झाला होता. खामगाव येथून शेती पाहणे होत नसल्यामुळे बटाईने किंवा ठोक्याने दिल्याशिवाय पर्याय नव्हता. पण पीक काही हाती लागत नव्हते. तरीही शेती करणे परवडत नव्हते म्हणून मग मी स्वतःच शेती करण्याचे ठरवले. म्हटले, खामगाववरून पाहतो, आणि त्या वर्षी शिवच्या वावरात फक्त बाजरी पेरण्याचे ठरवले. उन्हाळ्यात शेती तयार केली आणि पावसाळ्यात नुसती बाजरीच पेरून घातली. आजूबाजूचे शेतकरी म्हणत की, “एवढी साजरी जमीन आहे. तू लेका बाजरीचं पेरली, तुहा आबा होता तेव्हा या वावराने कधी बाजरं पाहिलं नाही. बुडा चांगला माल काढत होता’. मी म्हणालो वावर पडित राह्यल्यापेक्षा बरं आहे.
पहिला पाऊस पडला. पण शेतात मागच्या वर्षीचे हायब्रीडचे फनकटं तसेच होते. ते काड्या फणं उचलण्यासाठी बाया सांगितल्या. शेतातील हा केरकचरा जमा करून धुऱ्यावर न्यावा लागत असे. नुकताच पाऊस पडल्यामुळे त्यावेळी या कचऱ्याच्या एका ढिगाखाली विंचू असावेत, याचा साधा अंदाजही येत नव्हता. आणि तुम्हीही काढू शकत नाही जमा केलेल्या कचऱ्याखाली किती विंचू असावेत.? शेतात जागोजागी जमा केलेले हे फणकटं शिंदाड्या टोपल्यात डोक्यावर घेऊन धुऱ्यावर नेऊन टाकणे म्हणजे डेंजर काम होते. एका-एका टोपल्यांमध्ये मी त्यावेळी साधारण १५ ते २० जिवंत विंचू डोक्यावर वाहून नेले असावे. पण एकानेही दणका दिला नाही, त्यामुळे तो अनुभव माझ्या वाट्याला आला नाही.
पाऊस पडल्यानंतर बाजरीचे पीक बहरले होते. पण ते पतले झाले होते. शेती करण्याचे ठरवले पण मी आंबेटाकळी गावात कधी नेटाने राहिलो नाही. दररोज खामगांव येथून येणे-जाणे करत होतो. आमचं हे शेतही अलिकडच्या स्टॉपजवळ होते. गवंढाळा फाट्यावर उतरून पूर्वेस पायी गेल्यास अगदी जवळ होते. त्यामुळे मी शक्यतो आंबेटाकळी गावात जात नव्हतो. इकडच्या इकडे खामगावला परत येत होतो. फक्त मजूर सांगण्यासाठी कधीमधी गावात जात होतो. मला त्या काळी आमची आत्या सरुबाई भाकरे यांची फार मदत मिळायची. शेतात कामासाठी बाया-माणसं सांगणे आणि इतर चिल्लर वस्तू गावातून, घरून आणणे हे सर्व त्याच करत होत्या. मी नुसता खामगाववरून जाऊन “वर वर’ हल्लमटल्लम करत होतो. १९८५ साली सातवी पास झालो अन मी गाव सोडलं. आठवीपासून दहावीपर्यंत पंचगव्हाण येथे शाळा शिकलो. नंतर खामगाव येथे कॉलेज केले. त्यामुळे मला गावात कुणी फारसं ओळखत नव्हतं. आणि शेतातलंही काही जमत नव्हतं, तरी म्हटलं यंदा बाजरं पेरूनच पाहावं. पण ते पतलं झालं होतं. तरी झडती चांगली येईल असे वाटत होते.
कोणत्या पिकावर कोणता रोग येईल, कोणती किड पडेल? हे सांगता येत नाही. बाजरीचेही तसेच झाले. या पिकावर वसई आली होती. वसई ही कातिणीसारखी असते. असं म्हणतात की, ती अंगावर मुतल्यास फोड येतात आणि पिकाचे नुकसानही करते. त्यामुळे पिकाचे कसे करावे हा प्रश्न होता. शेजारच्या वावरावाल्यांनी सल्ला दिला की, रात्रीच्या वेळी शेतात जाऊन रॉकेलचे टेंभे मिरवा. रात्रीच्या अंधारात आजूबाजूला असलेली वसई आपोआप टेंभ्यावर येऊन पडते आणि जळते. त्यामुळे होणारे नुकसान टळेल, असे सांगितले. त्यानुसार मी गावातल्या काही मित्रांना घेऊन रात्री शेतात जात होतो. रात्री अंधारात टेंभे लावण्याचा प्रकार एकदम भुतासारखा वाटत होता. पण आमच्यापैकी कुणालाही कशाचीही भीती वाटली नाही. किर्र अंधारात आम्ही कल्ला करत शिवच्या वावरात टेंभे मिरवत होतो.
ही बहुतेक १९९४ सालची गोष्ट आहे. बाजरीचे पीक चांगले आले होते. पण मी तेव्हा दवाखान्यात होतो. बाजरी खुडणे आणि काढण्यासाठी काही दिवस मला आंबेटाकळीला राहावे लागले होते. दरम्यानच्या काळात पोळ्याचा सण आला. त्यामुळे मला तेथील शेगोकार टेलर यांनी त्यांच्या घरी जेवणासाठी सांगितले होते. तेव्हा मी मस्तपैकी पुरणाच्या पोळ्या दामटल्या. हरभऱ्याच्या डाळीचे गोड पुरण खाल्ल्याने दाढदुखी सुरू झाली.आणि रात्री दात ठणकणे सुरू झाले. त्रास एवढा वाढला की, मला ताबडतोब खामगावला येणे भाग पडले. तेथे डॉ. सुषमा सरोदे मॅडमकडे उपचार घेऊन थेट अकोला येथे भरती व्हावे लागले. दाढ आतून सुजल्यामुळे तोंड उघडणे कठीण झाले होते. खाणेच काय चहा, दूध पिणेही बंद झाले होते. कारण दाढ एवढी सुजली की उजवा गाल टम्म फुगला होता. त्यामुळे तोंड उघडणेही जमत नव्हते. सगळं डोकं ठणठण करत होते. रात्रभर झोप लागत नव्हती. त्यामुळे अकोला येथील डॉक्टर मापारी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये मला भरती करण्यात आले. शस्त्रक्रिया करून दाढ काढावी लागली. सांगायचे हेच की, त्या क्षणाला मला विंचू डसण्यापेक्षाही दाढीचे दुखणे वेदनादायक वाटत होते. आणि या दाढीच्या दुखण्यापेक्षाही शेती करणे अधिक त्रासदायक, कठीण आहे. असे आता वाटते.
आज मी कुठेही राहायला असलो तरी माझे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र आणि इतर सर्व कागदपत्रांवर चांदमारी खामगावचाच पत्ता आहे. एवढंच नाही तर मुलांच्या सर्व कागदपत्रांवरही हाच कायमचा पत्ता आहे. सध्या खामगावच्या त्या घरात लहान भाऊ गणेश आणि त्याचा परिवार राहात आहे तर आई-वडील आणि सर्वात लहान भाऊ ज्ञानेश्वर व त्याचा परिवार हे सगळे आता आंबेटाकळी येथे राहतात, पण नवीन जागेत. विशेष म्हणजे, आंबेटाकळीतील जुने वडिलोपार्जित घर ओसाड पडले आहे आणि वडिलोपार्जित असलेले शिवचे वावर विकले आहे. त्या बदल्यात गावाजवळील भवानी मायच्या देवळाजवळ खाल्त दुसरे शेत विकत घेतलेले आहे. आता एखादे वेळी आंबेटाकळी गावात जातो आणि शेतात गेलो की, सरुबाई भाकरेआत्या भेटते आणि अजूनही आठवणीनं विचारते ?
बाबू, ..यंदा पेरतं का मंग बाजरं?
..................
......समाप्त ........
Thanks & regards,
Janardan Gavhale
Senior SubEditor,
Dainik Divya Marathi
AURANGABAD
cell. 9168147080
.....................................................