सनातन धर्मात वृक्ष, वनस्पती, प्राणी आणि पक्षी तसेच जलस्रोतांना विशेष महत्त्व आहे. या धर्मात नद्यांना पवित्र आणि मातेसमान मानले गेले आहे. तलावांबद्दल बोलायचे झाले तर, सनातन धर्मात ज्या पाच तलावांचे वर्णन केले गेले आहे आणि जे तलाव पौराणिक काळाशी संबंधित आहेत. असे मानले जाते की या तलावांमध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो.
अशा पवित्र तलावांपैकी एक म्हणजे "पंपा सरोवर"कर्नाटक राज्यातील कोपल जिल्ह्यात आहे. हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये याचा समावेश आहे. त्यात स्नान केल्याने पुण्य मिळते आणि आत्मिक सुख प्राप्त होते अशी मान्यता असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने हिंदू धर्माला मानणारे भाविक पंपा सरोवरात स्नान करण्यासाठी येतात.
कमळ फुलण्याच्या हंगामात संपूर्ण सरोवर कमळाच्या कळ्यांनी भरून जाते.. जेंव्हा कमळ फुलतात त्यावेळी दिसणारं दृश्य ज्याला याची डोळा याची देही पाहायला मिळते तो खरचं भाग्यवान!!
तलावाच्या परिसरात भगवान शंकराचे मंदिर आहे. लक्ष्मीला समर्पित दुसरे अजून एक मंदिर आहे. तलावाजवळ एका मोठ्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत छोटे गणेश मंदिरही आहे.
तिथं अनुभवलेली एक वेगळी गोष्ट म्हणजे त्या परिसरातील माकडांचा मुक्त वावर..
लोकांना अजिबात न घाबरता ही माकड त्यांच्या हातातील खाण्याच्या वस्तू घेत होती..
मीही तिथल्या फळ विक्रेत्याकडून काही केळी आणि शेंगा घेतल्या.. शेंगा फोडून दाणे हातावर ठेवले आपले हे पूर्वज अजिबात न भिता शांतपणे एकेक दाणा उचलून तोंडात टाकत होते..
थोड्या अजून मर्कटलीला बघण्यासाठी मी केळी हातात पकडुन थोड उंच धरली.. तर अहो, आश्चर्यम !! माझ्या अंगावर चढून त्या खट्याळ खोडकर मर्कटाने ते हिसकावून घेतले..
थोडा वेळ या मर्कटलीला मनसोक्त एन्जॉय करून आम्ही अंजनेय टेकडीकडे आमचा मोर्चा वळवला..
प्रभू रामचंद्राच्या निस्सीम भक्ताचा जन्म या ठिकाणी झाला असं मानतात.
हनुमानाच्या आईचे नाव अंजनी म्हणून या टेकडीला अंजनेय असं संबोधतात.
टेकडीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.
अंजनेय टेकडी केळी आणि हिरवट पिवळ्या रंगाच्या भातशेतींनी वेढलेली आहे. टेकडीच्या शिखरावर जाण्यासाठी पाचशेहून अधिक पायऱ्या आहेत.
अर्धा ते पाऊण तास चढाई करून आपण टेकडीवर पोहचतो. तिथं असलेलं हनुमानाचे मंदिर पांढऱ्या रंगाने रंगविले आहे. वरून आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतो.
हातात जास्त वेळ नसल्याने आता आम्हाला आटपते घ्यायचे होते कारण संध्याकाळी पाचच्या सुमारास मुंबईसाठी निघायचे होते..
आजच्या दिवसातील शेवटचे ठिकाण म्हणजे "सानापूर तलाव"..
इथे आम्हाला सुप्रसिद्ध "कॉरेकल राइड" अनुभवायची होती.
सानापूर तलाव थोडा एका बाजूला, मानवी वस्तीपासून दूर आहे..
कॉरेकल राइड बरोबरीनेच इथे क्लिफ जंपिंग सुद्धा अनुभवता येते..
आम्ही पोहचलो तेंव्हा काही हौशी परदेशी पर्यटक तिथं क्लिफ जंपिंगचा आनंद घेत होते..
कॉरेकल राइड करण्यासाठी आपल्याला एका मोठ्या गोल बांबूच्या टोपलीत बसावे लागते आणि तिचा नाविक आपल्याला तलावाची सफर घडवून आणतो.
इथे आमच्या बरोबर एक गंमतीशीर प्रसंग घडला. आमच्या ग्रुपमधील भागवत काकांनी त्या कॉरेकल राइड करणाऱ्याला मानसी किती पैसे होतील असं सहज विचारलं.. त्यानेही प्रत्येकी सहाशे होतील असं मस्करीत सांगितलं.. हे ऐकून काका भडकले ना..
"इतना पैसा, मेरे को बैठने का ही नहीं तेरे टोपली मे 😂😂"
"मत बैठो "
दोघेही अगदी हमरीतुमरीवर आले..
प्रसंगाचा रागरंग पाहून आम्ही काकांना शांत केलं.. त्यांना समजावून सांगितलं की तो मस्ती करत आहे..
काका शांत झाले. पण तो नाविक चिडलेलाच होता.. आम्ही त्यालाही खुणेने गप्प बसायला सांगितलं..
आणि एकदाचे बसले सगळे कॉरेकलमध्ये.. खूप वेगळा अनुभव होता हा..
थोडी धाकधूकही होतीच..
आमच्या वजनाने कॉरेकल पाण्यात दबल्या सारखी वाटत होती.आम्हाला भीती होती की, आत पाणी शिरले तर..??
मध्येच कोणीतरी विचारलं, "पाण्यात मगरी नाहीत ना??"
झालं ना, भाऊ 🤪 हे ऐकून तर माझी पाचावर धारणच बसली..
मनातून घाबरलो असलो तरी बाहेरून आपण किती एन्जॉय करतोय असंच सर्वजण दाखवत होते..😅😅
शेवटी, वीस मिनिटांची राईड करून आलो बाबा एकदाचे काठावर..
हुश्श!! जीवात जीव आला माझ्या!!
सगळ्यांना त्या टोपलीत बसून फोटो काढायचे होते.. पण तो नाविक आधीच चिडला असल्याने तो कोणाला त्यात बसूच देईना .
"टोपली तुटेल, पहले बोलने का था, " अशी काहीही कारणे तो सांगू लागला..
आमच्यातील काहीजण निराश होऊन निघून गेले.. मी आणि अनिल मात्र तिथेच थांबलो..
त्याला थोडा मस्का मारला..
बाबापुता केल्यावर साहेब तयार झाले शेवटी !!आणि आम्ही दोघांनी कॉरेकलमध्ये मनसोक्त फोटो काढले ..
दुपारचे दोन वाजत आले होते. भूकही लागली होती.
आमच्या रिक्षावाल्याने खूप छान रेस्टॉरंटमध्ये नेलं.. भरपेट आणि चविष्ट जेवण करून मनात ट्रीपच्या आठवणी साठवत आम्ही हॉस्पेटकडे मुंबईची बस पकडण्यासाठी निघालो..
अशी ही टूर खूप साऱ्या अर्थानं अविस्मरणीय झाली..