रसिका लहानपणापासूनचं अतिशय तल्लख बुद्धी आणि जात्याच हुशार असणारी मुलगी.तिच्या या गुणांची छाप तिच्या पालकांना आणि शिक्षकांना अगदी शालेय जीवनापासून ते ती मेकॅनिकल इंजिनिअर होईपर्यंत दिसून येते.
मुंबई आय आय टी मधून डिस्टिंक्शन मध्ये पास होऊन कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत तिला गलेलठ्ठ पगाराची मिळालेली नोकरी, यावरून तिच्या कठोर परिश्रमाची आणि बुद्धिमत्तेची कोणालाही कल्पना येईल..
कॉलेजमध्ये असताना तिच्याच वर्गात शिकणाऱ्या कुणालशी तिची ओळख होते काय आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात होत काय.. दोघंही आपापल्या घरी सांगतात. घरून कसलाही विरोध होत नाहीं .अगदी थाटामाटात त्यांचं लग्न पार पडतं. कुणालची आई शिक्षिका पण आता सेवानिवृत्त असते.. मोठा भाऊ आणि वहिनी दोघंही नोकरी करणारे. असं छान, सुखी आनंदी कुटुंबात रसिकाचं स्वागत खूप प्रेमाने होते. लग्नानंतर काही दिवसांनी रसिका आणि कुणाल ऑफिस पुन्हा जॉईन करतात.आयुष्य दृष्ट लागावं इतकं सुंदर चाललेलं असतं.
दोघेही आपापल्या ऑफिस मध्ये कामात प्रगती करत प्रमोशन घेत असतात.अचानक एक दिवस, कुणालला एका खूप मोठ्या प्रोजेक्ट साठी बंगलोरला जावं लागेल असं ऑफिस मधून सांगण्यात येतं . कदाचित तिथेच त्याला पुढची काही वर्षे राहावंही लागेल असंही त्याचे बॉस सांगतात. पण ही खूप मोठी संधी असल्याने कुणाल लगेच होकार देतो. आता ही बातमी घरी कशी सांगू ?? याचा तो विचार करत असतो. सगळ्यांना सोडून बंगलोरला जावं लागणार याचं त्यालाही वाईट वाटत असतं परंतु अशी संधी पुन्हा पुन्हा येणार नाही हे ही तो मनोमन जाणून असतो.
घरी आल्यावर रात्री जेवणाच्या वेळी तो ही बातमी सांगतो.सुरवातीला सगळ्यांना खूप आनंद होतो . त्याला खूप मोठी संधी मिळाली होती पण तो बंगलोरला जाणार याचं आईला जास्त वाईट वाटते. परंतु त्याची प्रगती त्यातच असल्याने तीही आनंदाने तयार होते.
कुणाल बंगलोरला जातो रसिक मात्र मुंबईतच राहते कारण तिला तिथं नोकरी मिळाल्यानंतरच ही नोकरी ती सोडणार असते. तिला कुणालची खूप आठवण येत असते परिस्थितीसमोर दोघंही हतबल असतात. हळू हळू कासवाच्या गतीने दिवस जात असतात.
कुणाल थोड रुळल्यानंतर रसिकासाठीही एक चांगला जॉब बघून तिलाही तिथं बोलावून घेतो. रसिका खूप खूश होते. ती इथल्या नोकरीला राजीनामा देऊन बंगलोरला जाते.
सुरवातीला दोघांनाही बंगलोरमध्ये घरची खूप आठवण येत असते. पण कामाच्या व्यापात ते हळू हळू तिथं जुळवून घेतात.
थोड्याच दिवसात रसिकाला दिवस जातात. घरचे सगळे खूप खूप खुश होतात. कुणाल कामाचा व्याप सांभाळून तिची काळजी घेतो.कुणालची आईही बंगलोरला येते. बाळंतपण चांगल्या रीतीने पार पडते.
कुणालची आई सोबत असल्याने बाळा बाबत निर्धास्त होऊन रसिका तीन महिन्यांनी ऑफिस पुन्हा जॉईन करते.
पण नियतीचा मनात काही वेगळेच असते. अचानक आई खूप आजारी पडते आणि खूप प्रयत्न करूनही डॉक्टर तिला वाचवू शकत नाहीत.या धक्क्यातून दोघं सावरून ऑफिस जायला सुरू करतातही. पण बाळाला सांभाळण्यासाठी जी बाई ठेवलेली असते. तिच्याजवळ बाळ काही केल्या राहत नाही. बाई बदलून बघतात तरीही बाळ कोणाकडेच राहत नाही. सतत आजारी पडते.
डॉक्टर रसिका आणि कुणालला सल्ला देतात की दोघांपैकी कोणीही एकाने काहीकाळ बाळाजवळ राहावे.
घरी आल्यावर दोघं खूप विचार करतात. रसिकाला माहित असतं की ही नोकरी कुणालसाठी किती महत्वाची आहे. तो याचसाठी तर मुंबई सोडून बंगलोरला आलेला असतो.
शेवटी मनावर दगड ठेऊन रसिका स्वतः नोकरी सोडून काही वर्षे घरी राहण्याचा निर्णय घेते.तिचं काम हे फील्ड वर्कशी संबधित असल्यानं घरून काम करणे हा पर्याय तिला मिळत नाही.
रसिका घरी राहिल्यावर हळू हळू बाळाची तब्येत छान सुधारू लागते.सुरवातीला तिला नोकरी सोडल्याची खंत असते परंतु बाळाच्या चेहऱ्यावरील हास्य बघून ती सर्व विसरते.
आता बाळ सहा वर्षाचं होतं. शाळेत जाऊ लागते. पुन्हा नोकरी करण्याचा विचार रसिकाच्या मनात येऊ लागतो .
त्या अनुषंगाने ती आणि कुणाल तिच्यासाठी नवीन नोकरी शोधू लागतात.
एक दिवस, पेपरात जाहिरात बघून ती एका कंपनीत इंटरव्ह्यूला जाते.जेंव्हा इंटरव्ह्यू देण्यासाठी आत प्रवेश करते तर समोर असलेल्या स्त्रीला बघून तिला शॉक बसतो.