विरूपाक्ष मंदिरातून बाहेर पडलो आणि पोटपूजा करायला गेलो.. त्याआधी तिथल्या लोकल मार्केट मध्ये थोडी खरेदीही केली. इथे हंपी मधील स्थळांचे चित्र असलेले टी शर्ट वाजवी दरात मिळतात.. सांगताना दुकानदार दुप्पट किंमत सांगतात, आपण योग्य घासाघीस केली की अर्ध्या किमतीत देतात..
जेऊन परत रूमवर आलो. पहाटे लवकर सूर्योदय बघण्यासाठी मातंग टेकडी चढून जायचे असल्याने जास्त वेळ न काढता सरळ झोपून गेलो..
पहाटे साडेचार वाजता गजराने आपलं काम चोख केलं. पटापट आंघोळ उरकून आम्ही सगळे तयार झालो.
मातंग टेकडीच्या पायथ्यापर्यंत आम्ही रिक्षाने जाणार होतो व तिथून पाऊण तास ट्रेक करून टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते..
बाजारपेठेपासून टेकडीच्या पायथ्याशी रिक्षाने जायला साधारण दहा मिनिटे लागतात.
आम्ही अगदी वेळेत माथ्यावर पोहोचलो.. अजून सूर्योदय व्हायचा होता. वातावरण ढगाळ असल्याने सूर्योदय कसा दिसेल या संभ्रमात होतो..
मातंग टेकडीवरून हंपीचा विहंगम नजारा दिसतो.. एका बाजूला भव्य अच्युत्यराय मंदिर, त्याच्या एका अंगाने वाहणारी तुंगभद्रा नदी, जरा वळून नजर फिरवली की हंपी नगर, मोठमोठे दगड अंगावर घेऊन विसवलेल्या टेकड्या .. काय बघू आणि काय नको असं होतं.
आजूबाजूची शांतता आणि पायथ्याशी दिसणारे विजयनगर साम्राज्याचे अवशेष बघता भान हरपून जाते.
टेकडीच्या माथ्यावर एक चक्कर मारली की चहूबाजूचा नजारा पाहता येतो.
वरून विरूपाक्ष मंदिर तर अतिशय विलोभनीय भासते.
या टेकडीवर भगवान वीरभद्र यांचे मंदिर आहे. इथे नियमित पूजाअर्चा चालू असते.
इथून सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहता येतात पण सूर्योदय बघणे इष्ट, कारण सकाळी उठून पर्यटक येत नाहीत मग पर्यायाने गर्दी कमी असते..
मनातील शंका खरी ठरली. वातावरण ढगाळ असल्याने सूर्य देवतेने ढगांच्या चादरीतून एक एक पदर उलगडत जरा सावकाशच दर्शन दिलं. त्यांचे दर्शन घेऊन आम्ही टेकडी उतरण्यास सुरुवात केली.
आता नाष्टा करून आम्हाला रूम सोडायची होती.
आमचे सामान रिक्षात ठेऊन राहिलेली ठिकाणं आज आम्ही पाहणार होतो..
परत आम्ही आमचा मोर्चा "सागर हॉटेल"कडे वळवला. तिथं आजही खूप गर्दी होती.
मयुरेश म्हणाला, आपण तो पर्यंत तुंगभद्रा नदी आणि तिथं लक्ष्मी हत्तीणीला रोज आंघोळ घालतात ते पाहून येऊया..
आम्ही काय, तयारच होतो, चला!😂
विरूपाक्ष मंदिराच्या अगदी बाजूने हा रस्ता जातो. रस्त्याच्या एका बाजूला मंदिर आणि दुसऱ्या बाजूला तुंगभद्रा नदी..
आम्ही जिथं माहूत लक्ष्मीला आंघोळ घालत होता तिथं नदीच्या पात्रात खाली उतरलो..
आपली इच्छा असेल तर आपणही लक्ष्मीचे अंग चोळून तिला आंघोळ घालू शकतो. आमच्यापैकी बाकी कोणी नाही पण मी मात्र हे सत्कृत्य केलं.
परतून येऊन भरपेट नाश्ता केला.अम्माला परत भेटण्याचं आश्वासन देत आम्ही तोंडावर रेंगाळणारी कर्नाटकी चव घेऊन तिथून तृप्त मनाने बाहेर पडलो..
आज चेक आउट असल्याने आम्ही रूम्स रिकाम्या केल्या..
सामान रिक्षात ठेऊन आता "अनेगुंदी" हा तुंगभद्रा नदीच्या दुसऱ्या काठावर असणारा भाग बघायचा होता..
आजच्या दिवसाची सुरुवात "मल्यवंता रघुनाथ" मंदिरापासून केली..
कमलापुरापासून काही किलोमीटर अंतरावर कंपिलीच्या दिशेने दिसणार्या टेकडीच्या पायथ्याशी डावीकडे दगडी कमान दिसते. तिथून मुख्य रस्ता सोडून आत वळायचे.
या ठिकाणाचा रामायणाशी संबंध आहे. हनुमानाच्या सैन्यासह लंकेकडे कूच करण्यापूर्वी पावसाळा संपेपर्यंत राम आणि लक्ष्मण येथेच वास्तव्यास होते अशी दंतकथा आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात राम लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती आहेत.. मंदिर परिसर खूप भव्य आहे. अशी अनेक मंदिरे हम्पीमध्ये पाहायला मिळतात. विजयनगर स्थापत्यकलेचे हे एक सुंदर उदाहरण आहे.
मंदिर परिसर हम्पीमधील कोणत्याही मोठ्या मंदिर संकुलांप्रमाणेच आहे. संकुलाच्या मध्यभागी पांढराशुभ्र स्तंभ असलेला सभामंडप आहे. आजूबाजूला इतरही लहानमोठी मंदिरे आहेत.
इथे वर्षाचे बाराही महिने रामायणाचे वाचन अखंडित चालू असते.. आम्ही गेलो तेंव्हाही दोन पंडित अतिशय मधुर आवाजात रामायण वाचन करत होते..
इथून निघावेसे वाटत नसले तरी अनेगुंदी येथील आदिशक्ती मंदिर पाहायची उत्सुकता तेवढीच असल्याने आम्ही भगवान राम, लक्ष्मण ,सीता माता आणि हनुमानजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन तिथून बाहेर पडलो..
"दुर्गा मंदिर" तुंगभद्रा नदीच्या पलीकडे अनेगुंदीपासून साधारण एक किमी अंतरावर दुर्गा बेट्टा येथे स्थित आहे.
अनेगुंदी किल्ल्याच्या आत असलेले हे मंदिर प्राचीन आहे.
विजयनगरचे राजे युद्धाला निघण्यापूर्वी या मंदिरात प्रार्थना करायचे असं आम्ही गाईडकडून ऐकलं..
कार पार्किंग एरियापासून, अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायऱ्या आहेत. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलेला आहे.
इथे प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे मंदिराजवळील एका झाडाला अनेक भाविकांनी रंगीबेरंगी कापडं गुंडाळलेली होती.. बहुतेक नवस बोलण्याची किंवा तो पूर्ण झाल्यावर परतफेड करण्याची अशी प्रथा असावी..
देवीचे दर्शन घेऊन वरच्या बाजूला अजून चालत गेलो की व एक गुहा आणि भगवान गणेशाचे मंदिर आहे..
आपण गुहेत प्रवेश करून गणेशजींच्या मंदिराला एक प्रदक्षिणा मारू शकतो..
या किल्ल्याची थोडी बहुत तटबंदी अजूनही शाबूत आहे.
गणेश मंदिराच्या आवारात गर्द झाडांच्या सावलीत दगडावर थोडं बसून आपण आपलं मन शांत करू शकतो..
इथे क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पंपा सरोवर पाहण्यासाठी कूच केली..