सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हेमकूट टेकडी हे हम्पीमधील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे; आणि जवळच्या मातंगा टेकडीच्या तुलनेत माथ्यावर पोहोचणे तितकेसे अवघड नाही..
या टेकडीवर साधारण तीस पस्तीस मंदिरांचा समूह आहे.. त्यातील काही विजयनगर साम्राज्य अस्तित्वात येण्या अगोदर बांधलेली असावीत.
संपूर्ण टेकडीला दगडी तटबंदी आहे.. दोन मार्गाने इथे प्रवेश करता येतो.. दक्षिण बाजूला असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून किंवा बाजारपेठेत जे भगवान विरूपक्षाचे मंदिर आहे त्याच्या डाव्या बाजूने..
आम्ही मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केला. टेकडीवर जाण्याअगोदर समोरचं ससिवेकलू गणेशाची आठ फुटी सुंदर मूर्ती दगडी मंडपात विराजमान झालेली पाहायला मिळते.
या मूर्ती बाबतही एक कथा सांगितली जाते ती अशी एकदा खूप जास्त जेवण जेवल्याने गणेशाचे पोट इतकं फुगल की ते आता फुटेल की काय अशी भीती वाटू लागली. त्यावेळी त्याने एक सर्प पकडला आणि स्वतःच्या पोटाभोवती आवळुन बांधला.. तेंव्हा कुठं त्याचं पोट पूर्ववत झालं. पोटाचा आकार मोहरीच्या दाण्याएवढा झाला. मोहरीच्या दाण्याला स्थानिक भाषेत ससिवेकलू म्हणतात म्हणून या गणेशाचे नाव ससिवेकलू..
ही सुंदर मूर्ती पाहून आम्ही उजव्या हाताला असलेल्या दगडी पायऱ्या चढून टेकडीवर आलो..
सूर्यास्त बघण्यासाठी बरीच गर्दी जमली होती.. आम्हीही एक मोक्याची जागा बघून बसून सुर्यास्ताच्या सुंदर नजाऱ्याचा आनंद आम्ही घेतला.
बसल्या बसल्या माझे लक्ष टेकडीवरील इतर मंदिराकडेही जात होते.
मंदिरावरील शिखरे निमुळत्या पिरॅमिडसारखी आहेत. त्यामुळे अनेक लोकं यांना जैन मंदिर असही समजतात.. परंतु ही जैन मंदिर नसून शिव मंदिर आहेत.. या मंदिराच्या बाह्य भागावर पान फुलांची नक्षी आहे..
इथेच एक मंदिर त्याला स्थानिक मूळ विरूपाक्ष मंदिर म्हणतात.. हंपी बाजारपेठेत असलेल्या विरूपाक्ष मंदिरापेक्षा हे खूप जुने असल्याने बहुदा याला मूळ विरूपाक्ष मंदिर म्हणतात. मंदिराच्या शेजारीच एक पुष्करणी असून मंदिराच्या सभा मंडपातून पुष्करणीत उतरायला पायऱ्या आहेत.
या टेकडीबाबतही एक कथा आहे..
भगवान शंकर याच टेकडीवर तपाला बसले होते आणि त्यांच्या प्राप्ती साठी पंपा म्हणजे पार्वती तुंगभद्रा नदीच्या पलीकडच्या तीरावर तपशर्या करीत होती. तिच्या कठोर साधनेमुळे शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पंपाशी विवाह करण्यास मान्यता दिली. त्यावेळी स्वर्गातून इथे सोन्याच्या फुलांची पुष्पवृष्टी झाली.. म्हणून हे ठिकाण झाले हेमकूट.
इथले एकावर एक असलेले महाकाय दगड पाहिले की ते इतकी वर्षे कुठल्याही आधाराशिवाय न पडता हे कसं काय राहू शकतात याचे नक्कीच आश्यर्य वाटतं..
अशी ही पौराणिक महत्व आणि स्थापत्य कलेचा अजोड अविष्कार असलेली टेकडी बघून आम्ही डाव्या हाताला विरूपाक्ष मंदिरा जवळील गेटने बाहेर पडलो..
संध्याकाळची दिवेलागणी झाली होती.. विरूपाक्ष मंदिर आणि आजूबाजूचा परिसर अतिशय विलोभनीय दिसत होता..
मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं असं मनात आलं परंतु रूमवर जाऊन थोड फ्रेश होऊन मग येऊया असं मयुरेशने सुचवलं.. आमचा होम स्टे जवळच असल्याने आम्हालाही ते योग्य वाटलं..
हंपीतील भव्य दिव्य आणि आजही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेलं मंदिर म्हणजे विरूपाक्ष मंदिर..
हंपी हे तीर्थक्षेत्र असल्याचं मानलं जातं ते याच मंदिरामुळे..
याबाबत एक पौराणिक कथा आजही आपल्याला ऐकायला मिळते ती अशी की शिवाशी विवाह व्हावा म्हणून पंपा म्हणजे पार्वतीने तुंगभद्रा नदीच्या तीरावर घोर तपश्चर्या केली. शिव प्रसन्न झाले आणि त्या दोघांचा विवाह इथे पार पडला आणि त्याच ठिकाणी पंपापती म्हणजे विरूपाक्ष मंदिर बांधले गेले..
आजही स्थानिक लोक विवाह करण्यास या पवित्र स्थानी येतात. शिव आणि पंपाचा विवाह सोहळा दरवर्षी डिसेंबर महिन्यात इथे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो..
हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तीरावर आहे..
समोरच्या रथ रस्त्यावरून तुम्ही मंदिरांच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता, ज्याला हंपी बाजार म्हणतात.
डाव्या हाताला चपला ठेवण्यासाठी स्टँड असून तिथेच पुस्तक विक्रीचा विभागही आहे..
पूर्वाभिमुख गोपुरातून आपण मंदिर परिसराच्या पहिल्या प्रांगणात येतो. हे गोपूर नऊ मजली असून प्रत्येक थरावर विविध प्रकारच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात..
खास द्राविडी शैलीचे हे गोपुर कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही..
मंदिराला एकाला एक लागून दोन प्रांगण आहेत. गोपूरातून आत आल्यावर आपण पहिल्या प्रांगणात येतो. या ठिकाणी शंभर खांब असलेला भव्य मंडप, कल्याण मंडप आणि दगडी भली मोठ्ठी विहीर आहे..
इथेच आपणास तीन डोकी असलेला नंदीदेखील पाहायला मिळतो.
परदेशी नागरिकांच्या नोंदीसाठी छोटीशी पोलीस चौकीही आहे..
मी सगळ्यात जास्त उत्सूक होते लक्ष्मीला पाहायला.. ही हत्तीण सोंडेत तुम्ही पैसे ठेवले की सोंड आपल्या डोक्यावर ठेऊन आशीर्वाद देते. तिचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते.
मुख्य मंदिराच्या समोर एक उंच दीपस्तंभ, एक बलिस्तंभही आहे.
या प्रांगणात असलेली अजून एक भव्य वास्तू म्हणजे रंगमंडप.. अनेक खाबांनी नटलेला हा मंडप राजा कृष्णदेवराय याने बांधला आहे.
हे पाहून झाल्यावर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. गाभाऱ्यात देव शिवलिंग स्वरूपात विराजमान आहेत.
मंदिराच्या आवारात देवी पंपाचे आणि इतरही अनेक लहान लहान मंदिरे आहेत..
असे हे भव्य दिव्य भगवान विरूपाक्ष मंदिर पाहून, त्याचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रसन्न मनाने बाहेर पडलो..