Aaropi - 15 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | आरोपी - प्रकरण १५

Featured Books
  • મૃગજળ

    આજે તો હું શરૂઆત માં જ કહું છું કે એક અદ્ભુત લાગણી ભરી પળ જી...

  • હું અને મારા અહસાસ - 107

    જીવનનો કોરો કાગળ વાંચી શકો તો વાંચજો. થોડી ક્ષણોની મીઠી યાદો...

  • દોષારોપણ

      अतिदाक्षिण्य  युक्तानां शङ्कितानि पदे पदे  | परापवादिभीरूण...

  • બદલો

    બદલો લઘુ વાર્તાએક અંધારો જુનો રૂમ છે જાણે કે વર્ષોથી બંધ ફેક...

  • બણભા ડુંગર

    ધારાવાહિક:- ચાલો ફરવા જઈએ.સ્થળ:- બણભા ડુંગર.લેખિકા:- શ્રીમતી...

Categories
Share

आरोपी - प्रकरण १५

प्रकरण १५
न्यायाधीश मंगरूळकर आपल्या बाकावर स्थानापन्न झाले.अत्यंत न्यायप्रिय, विचारी आणि वस्तुनिष्ठ असा त्यांचा लौकिक होता. आपल्या अंगाभोवती चा झगा त्यांनी सारखा केला आणि समोर बसलेल्या सगळ्या लोकांकडे आणि वकिलांकडे एक दृष्टिक्षेप टाकून ते म्हणाले, “महाराष्ट्र राज्य विरुद्ध क्षिती अलूरकर असा हा खटला आहे. तिच्या वर आरोप आहे की खुनाच्या उद्देशाने हातात हत्यार घेऊन हल्ला करणे. दोन्ही बाजूंचे वकील तयार आहेत?”
हेरंभ खांडेकर, सरकारी वकील उठून उभे राहिले.
“ इफ द कोर्ट प्लीज, आम्ही सरकार पक्ष तयार आहोत. मला एवढेच प्रतिपादन करायचं आहे की एका तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आलेला आहे. हा प्राथमिक खटला आहे आणि त्याचा उद्देश आरोपीला सदर खटल्यात दोषी ठरवून हे प्रकरण वरच्या मोठ्या कोर्टात सादर करणे एवढाच आहे. जिच्यावर हल्ला झाला आहे ती मधुरा महाजन सध्या इस्पितळात असून हा खटला चालू असताना जर त्यात तिचा मृत्यू ओढवला तर हाच खटला केवळ खुनी हल्ल्याचा न राहता खुनाचा खटला म्हणून गृहीत धरला जाईल”.
“जखमी स्त्री च्या नेमक्या स्थितीविषयी आत्ता असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही खटला चालवण्याची घाई न करता अजून थोडे थांबत का नाही?” न्यायाधीशांनी विचारले.
त्याला काही खास कारणं आहेत, म्हणजे कायदेशीर बारकावे आहेत, आम्हाला आत्ताच्या स्थितीत आरोपीला अशी कस्टडी मिळायला हवी आहे की हेबियस कॉर्पस चे रिट करून तिची सुटका होता कामा नये.”-खांडेकर
“ठीक आहे, बचाव पक्षाचं काय ? बचाव पक्ष तयार आहे?” न्यायाधीश मंगरूळकरांनी विचारलं
“आम्ही तयार आहोत”. पाणिनी पटवर्धन कुठून उभा राहत म्हणाला.
“छान तर मग खटला सुरू करा.” न्यायाधिशांनी आज्ञा दिली
“युवर ऑनर, मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे आम्हाला आरोपीला ज्या पद्धतीने या खटल्यात गुंतवायचे आहे, तसे गुंतवण्यासाठी आम्हाला असे काही साक्षीदार समोर आणायचे आहेत, की ज्याची सर तपासणी आम्ही अत्यंत सविस्तर पणे घेणार आहोत, जी सहसा प्राथमिक सुनावणीत घेतली जात नाही. आणि इतर बाबतीत मात्र आम्ही अशा कायदेशीर तरतुदीचा आधार घेणार आहोत ज्यामुळे प्राथमिक सुनावणीमध्ये गुन्हा घडल्याचं सिद्ध करणं आणि तो गुन्हा करण्यासाठी आरोपीकडे सबळ कारण असल्याचं सिद्ध करणं एवढंच आवश्यक असतं” खांडेकर म्हणाले.
“हे समजण्या एवढं हे कोर्ट नक्कीच सूज्ञ आहे. मी काही नवखा न्यायाधीश नाही प्राथमिक खटला कशासाठी असतो हे मला तुम्ही समजावून सांगण्याची गरज नाही” न्यायाधीशांनी खांडेकरांना ठणकावलं
“तुमचे , पुरावे आणि साक्षीदार सादर करायला सुरुवात करा मिस्टर हेरंभ खांडेकर”
“सर्वात प्रथम मी साक्षीदार म्हणून साहिर सामंत यांना बोलावू इच्छितो.” खांडेकर म्हणाले त्यांनी नाव उच्चारताच सामंत उठून साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन उभा राहिला
“तुझं नाव साहिर सामंत आहे?”
“हो सर”
“तुझी मधुरा महाजन ची ओळख आहे? आणि गेले काही काळापासून ओळख आहे?”
“हो सर”
“या महिन्याच्या चार तारखेला तिला भेटण्याचा प्रसंग आला होता?”
“आला होता सर.”
“ कुठे भेटलास तू तिला पहिल्यांदा ?”
“मी तिला भेटलो त्यावेळी तिने मला तिच्या घरी पाहुणा म्हणून रात्री जेवायला बोलावलं होतं”
“बर मग काय झालं पुढे?”
“त्या वेळेला तिथे गडबड गोंधळ आणि आरडाओरडा झाला. मिसेस मधुरा महाजन ला वाटलं की तिच्या घरी चोरी झाली आहे आणि ती खूपच एक्साईट झाली होती. आणि मला वाटत की तिचा आरोपीवर संशय होता.”
“या सर्व पार्श्‍वभूमीवर तू काय केलंस?”-खांडेकर
“एक खाजगी गुप्तहेर माझा मित्र आहे. त्याचं नाव जनार्दन दयाळ. तो एका फर्ममध्ये भागीदार आहे. मी मधुरा महाजन ला सुचवलं की आपण त्याला बोलावून घेऊ.”
“आणि तिने त्याला संमती दिली?”
“हो. अर्थातच तिच्या संमतीनेच मी त्याला बोलावून घेतलं”
“पुढे काय झालं”
“जनार्दन ने आरोपीला विचारलं की मी तुझे हाताचे ठसे घेऊ का?”
“मग आरोपीने संमती दिली?”
“,संमती तर नाहीच दिली उलटपक्षी तिने पाणिनी पटवर्धन ना बोलावून घेतलं. पाणिनी पटवर्धन तिथे आला आणि त्यानं आरोपीला सूचना दिली की.....”.
“ऑब्जेक्शन” पाणिनी पटवर्धन कडाडला
“ऑब्जेक्शन सस्टेंड.”- न्या.मंगरूळकर लगेच म्हणाले.
हेरंब खांडेकर वैतागले त्यांनी तपासणी ची नवीन पद्धत अवलंबण्याचे ठरवलं.
“मधुरा महाजन ना इस्पितळात दाखल केल्यानंतर त्या घरात जाण्याचा प्रसंग तुझ्यावर आला होता?”
“हो सर मला खात्री होती की....”
“ऑब्जेक्शन ! ” पाणिनी पटवर्धन पुन्हा एकदा ओरडला. “साक्षीदाराच्या मनात काय आले होते याबद्दल तो साक्ष देऊ शकत नाही”
“ऑब्जेक्शन सस्टेंड” न्यायाधीश म्हणाले
“ठीक आहे, ठीक आहे. तुझ्याकडे ठोस असं काहीतरी कारण असणार त्या घरात प्रवेश करण्यासाठी. असू दे ते नको सांगू, आम्हाला एवढेच सांग की त्या घरात तू गेल्या नंतर काय घडलं?” खांडेकरांनी विचारलं
“माझ्या हातात फाउंटन पेन च्या आकाराची छोटी बॅटरी होती. ती घेऊन मी त्या घरात प्रवेश केला बॅटरीचा प्रकाश झोत जमिनीवरच पडेल याची काळजी घेतली. दुसऱ्या मजल्यावर जिन्याने मी जात होतो मला असं वाटत होतं की काहीतरी......” साहिर सामंत बोलत होता.
“साक्षीदाराला काय वाटत होतं हे ऐकण्यात आम्हाला रस नाही.” पाणिनीने पुन्हा हरकत घेत म्हटलं.
“मिस्टर पटवर्धन बरोबर म्हणताहेत. काय घडलं त्या वस्तुस्थितीला धरून साक्ष द्या तुमच्या मनातल्या विचारांच्या संदर्भात नको.” न्यायाधीशांनी फटकारलं
------------------------------------------------------------------------------------------------------------
“ठीक आहे, सांगतो व्यवस्थित अत्यंत काळजीपूर्वक आणि आवाज न करता. मी जिन्याच्या वरच्या पायरी पर्यंत पोहोचलो. मला कसलीतरी एक चोरटी हालचाल जाणवत होती कोणीतरी जवळ असल्यासारखी.”
“बर मग तू काय केलंस?”
“मी अगदी शांतपणे आणि निश्चलपणे बसून राहिलो”
“तू म्हणालास की तुला कशाची तरी हालचाल जाणवली तुला काही ऐकू ही आलं का?”—खांडेकर
“हो एक विचित्र आवाज ऐकू आला” -साहिर
“म्हणजे कुणी तरी कुजबुजत असल्यासारखा?”
“नाही मला नाही वाटत की ते कुजबुज नव्हतं, एक वेगळाच आवाज होता.”
“तेव्हा किती वाजले होते हे समजायला काही मार्ग नव्हता तुला?”
“नाही काहीच कळायला मार्ग नव्हता किती वाजले होते ते”
“बर मग पुढे काय झालं?”
“नंतर एकदम कसलातरी मोठा आवाज झाला. मला त्याचं आश्चर्य वाटलं. मी खूप घाबरलो मी पळायचा प्रयत्न केला मग माझ्या लक्षात आलं माझ्या मागच्या पायऱ्या आणि माझ्या मध्ये तो आवाज झाला. मग मी पुढे पळायचा प्रयत्न केला. आणि तेवढ्यात पाणिनी पटवर्धन ने माझ्यावर हल्ला केला.”—साहिर
“त्याने स्वतः?”—खांडेकर
“त्याने हल्ला केला आणि त्याचा तो खाजगी गुप्तहेर ओजस. तो त्याला त्याच्यात मदत करत होता. मला त्यांनी पुरत जायबंदी करून टाकलं. आणि मग कनक ओजसने पोलिसांना फोन लावला.”
“तुम्ही चौकशी करू शकता मिस्टर पटवर्धन.” खांडेकरांनी पाणिनी ला आव्हान दिल्यासारखं सांगितलं.
पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. साक्षीदाराच्या पिंजरा कडे 2-3 पावलं चालत गेला. आणि त्याने विचारलं, “तू जेव्हा त्या घरात शिरलास तेव्हा तू तुझ्या बरोबर काही हत्यार बाळगलं होतंस?”
“माझ्याकडे पोईंट 38 कॅलिबर रिव्हॉल्वर होतं”
“ते रिव्हॉल्वर वापरण्याचं परमिट तुझ्याकडे होतं?” पाणिनी न विचारलं
“नाही”
“मग ते रिव्हॉल्वर तू कसं काय बाळगत होतास स्वतःकडे? तुला ते माहिती असणार की परवान्याशिवाय रिव्हॉल्वर बाळगणं गुन्हा आहे.”
“मी ते माझ्याकडे ठेवलं होतं. कारण मला वाटलं होतं की मला काही धोका होऊ शकतो”—साहिर
“कोणापासून धोका?”
“मला माहित नाही”
“म्हणजे ज्याच्यापासून धोका निर्माण झाला असता, त्याला तू गोळी झाडण्याचा तयारीत होतास?”
“मी स्वतःचा बचाव करण्याच्या तयारीत होतो.”—साहिर
“तुला वाटत होतं की तुझ्या जीवाला धोका आहे?”
हो”. वाटत होतं.”
“तू असं काय केलं होतंस की आपल्या जीवाला धोका आहे असं तुला वाटत होतं?”- पाणिनी न विचारलं
“मधुरा महाजन ला धोका होता.”
“तिच्यावर का हल्ला झाला होता तुला माहित्ये?”
“मला अगदी त्याची व्यवस्थित कल्पना आहे.”
“तुला असं वाटतंय की हा सगळा जो त्रास दिला झाला तिला, तो दोन हजार रुपयांच्या चोरीमुळे?”- पाणिनी न विचारलं
“मोकळेपणाने सांगायचं तर नाही”
“....एक मिनिट एक मिनिट एक मिनिट..” सरकारी वकील खांडेकर एकदम ओरडले. “हा प्रश्न हरकत घेण्याजोगा आहे मी प्रत्यक्षात हरकत घेत नाहीये पण मी लक्षात आणून देऊ इच्छितो की आरोपीचे वकील हे साक्षीदाराच मत विचारत आहेत. मगाशीच पाणिनी पटवर्धनांनी कोर्टाच्या नजरेला आणून दिलं की आम्हाला साक्षीदाराची मतं नको आहेत वस्तूस्थिती मध्ये आम्हाला रस आहे आणि आता मात्र ते स्वतः साक्षीदाराच मत विचारतात. वस्तुस्थिती विचारत नाहीयेत”
“ठीक आहे. तर मग मिस्टर साहिर सामंत, ज्या वेळेला मधुरा महाजन ने असा दावा केला की कोणीतरी दोन हजार रुपयाची नोट तिच्या कपाटातल्या खोक्यातून चोरली आहे, त्या वेळेला तू तिथे हजर होतास?”
“हो. मी हजर होतो.”
“आणि तूच सुचवलस ना तिला, का नाही सुचलवस, की आरोपी क्षिती हीच त्या चोरीत गुंतली असावी म्हणून?”
“मी असं काहीही सुचवले नाही. मी फक्त काही प्रश्न विचारले. शोध घेण्याच्या दृष्टीने” साहिर म्हणाला
“शोध घेण्याच्या दृष्टीने प्रश्न म्हणजे नेमकं काय म्हणायचय तुला?”
“मी एवढंच विचारलं की त्या घरात त्या वेळेला किती लोक हजर होते? त्यानंतर मी असंही विचारलं की मिसेस मधुरा महाजन च्या बेडरूम मध्ये वहिवाटीचा अधिकार असणारे किती लोक त्या घरात त्या वेळेला हजर आहेत? कोणा कोणाला माहिती होतं की मधुरा महाजन तिच्या कपाटात रिकामी खोकी ठेवत असे म्हणून?”
“रिकामी खोकी?” पाणिनीने आश्चर्यानं विचारलं
“हो. रिकामी खोकी”
“किती रिकामी खोकी?”
“परमेश्वरालाच माहित. मला नाही सांगता येणार. ती म्हणाली, की तिने त्या रिकाम्या खोक्यात पैसे ठेवले होते म्हणून”
“पण तू रिकाम खोकं, असा शब्दप्रयोग नाही वापरलास. तू हा शब्द अनेक वचनात वापरल्यास .रिकामी खोकी असा.”
“कदाचित मी तसा वापरला असेन.”-साहिर.
“तुला माहिती होतं की एकापेक्षा जास्त खोकी त्या कपाटात होती म्हणून?”- पाणिनी न विचारलं
“मला नाही माहिती. मला वाटत नाही तसं कारण ती म्हणाली रिकामा खोका”
“पण तू जेव्हा शोध घेण्यासाठी चे प्रश्न विचारत होतास तेव्हा तू त्या खोक्याचा उल्लेख अनेकवचनी केलास?”
“हो. ठीक आहे केला मी अनेकवचनी उल्लेख.”-साहिर
“आणि जेव्हा तू असा अनेकवचनी उल्लेख केलास तेव्हा मधुरा महाजन ने तुझं म्हणणं दुरुस्त केलं नाही? की तिथे फक्त एकच रिकामा खोका होता म्हणून?”
“नाही .तिने तसं काही केलं नाही कारण त्यावेळेला वातावरणात खूप तणाव होता.”
“एक मिनिट.. एक मिनिट.. मिस्टर साहिर सामंत,” पाणिनी पटवर्धन आपला हात उंचावून म्हणाला. “आम्हाला तुझ्या मनात काय विचार आले त्याच्यात रस नाही आणि मधुरा महाजन च्या मनात काय विचार आले असतील याबद्दल तू काय अंदाज केला असावास हे जाणण्यात सुद्धा आम्हाला रस नाही .मी तुला असे आत्ता वेगवेगळे प्रश्न विचारतोय ते हे जाणून घेण्यासाठी की तिच्या पुतणी वर म्हणजे क्षितीवर चोरीचा आरोप करण्याचे विचार, जे तिच्या मनातही नव्हते, ते तू तिच्या मनात भरून देत होतास की नाही?”
“मी असं कधी म्हणालो नाही की मी माझ्या मनातले विचार मधुरा महाजन वर लादत होतो”
“तू म्हणाला नाहीस रे तसं पण तुझ्या देहबोलीवरून ते सिद्ध होत आहे. तू प्रश्न असे विचारलेस तिला की घरात कोण माणसं होती? कुणाला तिच्या बेडरूम पर्यंत जाण्याचा अधिकार होता ?.वगैरे वगैरे त्या कपाटात पर्यंत जाण्याची आणि चोरी करण्याची संधी क्षिती व्यतिरिक्त आणखी कोणाला होती ?असा प्रश्न विचारला नाहीस !”
“नक्कीच नाही विचारला तसा प्रश्न”
“का नाही?”
“कारण एक जातिवंत व्यवसायिक आणि त्या कुटुंबाचा मित्र या नात्याने मी स्वतः कुठल्याही संशयाच्या पलीकडचा माणूस होतो.”
“असं का ! आणि मधुरा महाजन ची रक्ताची नातलग क्षिती हिला मात्र तू संशयाच्या पलिकडची व्यक्ती म्हणून गृहीत धरले नाहीस?”
“हे बघा मिस्टर पटवर्धन मी फक्त प्रश्न विचारत होतो”
“शोध घेणारे प्रश्न?”
“तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता.” सामंत म्हणाला
“ठीक आहे तू त्या घरात शिरलास साहीर, तेव्हा तू तुझ्याबरोबर बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगलं होतंस आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे गरज पडली तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मोडून बरोबर?” पाणिनी न विचारलं
“बरोबर”
“तू घर फोडून आत घुसलास?”
“मी घर वगैरे काही फोडलं नाही. मी फक्त कुल पाशी झटापट केली असं म्हणा फार तर”
“कायदेशीरदृष्ट्या ती घरफोडी ठरते”
“ठीक आहे . सरकारी वकिलांशी बोलून घ्या तो मुद्दा तुम्ही .मी त्यांना हे सगळं सांगितलं आहे आधीच .”
“अच्छा- अच्छा या आधी तू हे सरकारी वकिलांना सांगून पटवून ठेवलेस तर ! याचा अर्थ असा की तुझ्या या साक्षी च्या बदल्यात तू केलेल्या गुन्ह्यातून माफी द्यायचं सरकारी वकिलांनी तुला कबूल केलेले दिसतय” पाणिनी म्हणाला.
“अशी काही तडजोड वगैरे अजिबात झाली नाही आमच्यात. सरकारी वकिलांना मी हे पटवून देऊ शकलो की त्या घरात शिरण्या मागचा माझा हेतू शुद्ध होता.”
“ तू घरात शिरलास त्यावेळेला तुझ्याकडे 2000 ची नोट होती?”
“तो गुन्हा आहे का?” –साहिर
“तुझ्याकडे कधीपासून दोन हजाराची नोट होती?”
“मला माहित नाही”
“प्रयत्न कर आठवायचा” पाणिनी म्हणाला.
“मला नाही आठवत माझ्याकडे कधी आली”
“तस असेल तर तुझी स्मरणशक्ती फारच तकलादू आहे. कारण मी योग्य त्या व्यक्तिची साक्ष इथे घेऊन पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो की तू तुझ्या बँकेत जाऊन दोन हजार रुपयाची नोट मागून घेतलीस” पाणिनी म्हणाला.
“ठीक आहे, ठीक आहे. माझ्याकडे खात्यात दोन हजार रुपये होते. माझे होते ते पैसे. आणि मला अधिकार होता मला पाहिजे तेव्हा ते काढायचा”—साहिर
“मी तुला आता असे विचारतो साहिर, की तू जेव्हा त्या घरात शिरलास तेव्हा तुझ्या डोक्यात असंच होतं ना की ती तुझ्याकडे असलेली दोन हजार रुपयाची नोट आरोपी च्या खोलीमध्ये ठेवून द्यायची, एखाद्या ठिकाणी खुपसून ठेवायची म्हणजे पुढे केव्हातरी पोलीस जेव्हा त्या जागेची झडती घेतील तेव्हा त्यांना ती आरोपीच्या खोलीत कुठेतरी सापडावी आणि तिच्यावरचा चोरीचा आरोप सिद्ध होईल असच होतं ना तुझ्या मनात?”
“अजिबात नाही.”
“तू आत्ताचे बोलतोयस त्या शब्दांपेक्षा तुझी त्यावेळची म्हणजे तू खोलीत शिरला त्यावेळची देहबोलीच सर्व काही सांगून जाते. तुझा घरात शिरल्यानंतर चा हेतू क्षिती. अलुरकर वापरत असलेल्या खोलीत जाऊन ती नोट तिथे ठेवण्याचा होता पण तुझ्या दुर्दैवानी तुझी धडक वॉटर कुलर ला बसली आणि तो कुलर खाली पडून मोठा आवाज झाला त्याच वेळेला तुला जाणवलं की त्या घरात तू एकटा नाहीयेस तू पळून जायचा प्रयत्न केलास पण त्याच वेळेला
तू माझ्या आणि कनक ओजसच्या तावडीत सापडलास.”
“हे अजिबात खरं नाहीये आणि त्या वॉटर कुलर ला माझ्याकडं धक्का लागलेला नाही तुमच्या दोघांचा धक्का लागला असेल. त्या आवाजाने मी घाबरलो आणि पळायला लागलो”
“तू अजूनही नाकारणारच आहेस का की ती 2000 ची नोट तुला आरोपीच्या खोलीत ठेवायची होती हे?”
“हो नाकारतो मी ते”
“दॅट्स ऑल युवर ऑनर,” साक्षीदारा कडे तिरस्काराने पहात आणि आपली पाठ फिरवत पाणिनी म्हणाला.
पाणिनी पटवर्धन ने पाठ फिरवल्यावर साहिर सामंत साक्षीदाराचा पिंजरा सोडून जायला लागला तेवढ्यात न्या.मंगरूळकर यांनी टेबल वर आपली पेन्सिल वाजवून त्याला थांबवलं.
“ एक मिनिट थांबा मिस्टर सामंत मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. मला सांगा तुम्हाला माहिती होतं की या खटल्यातली आरोपी.क्षिती हिच्यावर त्या खोक्यात ले 2000 रुपये घेतल्याचा आरोप होता?”
“हो सर माहित होतं”
“तुम्ही तुमच्या बँकेत गेलात आणि बँकेतून काही पैसे काढलेत. काही शंभरच्या नोटा मध्ये आणि काही 2000 च्या नोटा मध्ये नंतर त्या रात्री तुम्ही या घरात शिरलात. त्यासाठी घरातल्या कुलपाची झटापट केलीत आणि त्यामुळेच तुम्हालाच शिरता आलं बरोबर?”
“तुम्हाला तसं म्हणायचं असेल तर बरोबर आहे तुमचं”
“तुम्हाला या कोर्टाची अशी समजूत करून द्यायची आहे का, की त्या घरात शिरायचा तुमचा हेतू अत्यंत निर्मळ असा होता?”
“हो सर माझा हेतू अत्यंत निर्मळ होता”
“मला पटत नाहीये हे मिस्टर सामंत तुम्ही खरं बोलत आहात असं मला वाटत नाही. तुम्ही त्या बँकेतून काढलेली रक्कम काही विशिष्ट हेतू साठीच काढलेली असणार” न्यायाधीश म्हणाले. त्यानंतर ते सरकारी वकील खांडेकर ना म्हणाले, “हा तुमचा साक्षीदार आहे खांडेकर. आणि मी आत्ता तुम्हाला अत्यंत अधिकृतरीत्या आणि स्पष्ट सांगतोय याच्या साक्षी वर माझा अजिबात विश्वास बसलेला नाही.”
“न्यायमूर्ती महाराज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही” खांडेकर म्हणाले
“नाही माझा तर बिलकुल विश्वास नाही माझं असं मत होत आहे की या बाईला चोरीच्या आरोपात गुंतवायचं असा हेतुपुरस्सर प्रयत्न केला गेलाय”
“परंतु न्यायमूर्ती महाराज आमच्याकडे दुसराही पुरावा आहे. आम्हाला दाखवून द्यायचे आहे त्या पुराव्याच्या आधारे की ज्या वेळेत मधुरा महाजन वर हल्ला झाला अगदी त्याच वेळेला आरोपींनी रात्री तिच्या घरात संशयास्पद रितीने प्रवेश केला होता. आमच्याकडे असा पुरावा आहे की ज्या खोक्यातून पैसे काढले गेले होते त्या खोक्यावर तिच्या हाताचे ठसे आहेत याशिवाय अत्यंत निर्दोष अशा परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आम्ही हे दाखवून देऊ शकतो की आरोपीने चोरी केली आणि ती लक्षात येऊ नये याकरता तिने पुढे मधुरा महाजन वर हल्ला केला” खांडेकर म्हणाले
“मला एक सांगा खांडेकर, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिने चोरी केली असेल तर ती सकाळच्या वेळेला केली मग ती मधुरा माझं वर हल्ला करायला रात्री कशाला येईल? चोरी दडपली जावी म्हणून तिने हल्ला केला असं तुमचं म्हणणं असेल तर तिने सकाळीच हल्ला करायला पाहिजे होता.” न्यायाधीश मंगरूळकर म्हणाले
“युवर ऑनर मी मान्य करतो की या सगळ्या मागे नेमका हेतू काय असावा हे अजूनही आम्ही पुरेसे स्पष्ट करू शकलेलं नाही? खांडेकर म्हणाले
“मी तुम्हाला आणखीन पुरावा सादर करण्यापासून वंचित करत नाही पण या साक्षीदाराचा विषय आपला चाललाय त्या बाबतीत मात्र मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मी त्याच्या साक्षी वर थोडा देखील विश्वास ठेवत नाही आणि ठेवणार नाही” न्यायाधीश म्हणाले आणि आपल्या खुर्चीवर मागे रेलून आरामात बसले त्यांची देहबोली सांगत होती की त्यांनी दिलेला हा निर्णय अंतिम होता.
“ठीक आहे मिस्टर साहिर सामंत मला फेर तपासणीत काही विचारायचं नाहीये” खांडेकर म्हणाले.
अचानक साहिर सामंत मोठ्याने ओरडून म्हणाला, “ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ,मी आता खरं काय आहे ते सांगतो मी तिथे आरोपीला मदत करायला गेलो होतो तिला त्रास देण्यासाठी नाही.”
पाणिनी पटवर्धन मी चमकून साक्षी दाराकडे बघितलं “अच्छा आणि तू कशी मदत करणार होतास म्हणे तिला?”
माझा विचार होता की ती दोन हजार रुपयाची माझ्याकडे असणारी नोट मी आरोपीच्या बेडरूम मध्ये नाही तर मधुरा महाजन च्या खोलीत कुठेतरी खुपसून ठेवणार होतो. तो खोका कपाटाच्या बाहेर टाकला गेला होता माझा असं दाखवायचा विचार होता की एखाद्या उंदराने किंवा मांजराने तो खोका खाली पडला असावा आणि तो पाडत असतानाच त्याच्यातली दोन हजार रुपयांची एक नोट बाहेर पडून कुठे तरी त्या कपाटात पडली असावी किंवा त्या कपाटाच्या खालच्या भागात असणाऱ्या रॅक मध्ये पडली असावी, असं वाटेल अशा प्रकारे मी ती नोट मधुरा महाजन च्या खोलीत कपाटा जवळ कुठेतरी खुपसून ठेवणार होतो माझा अंदाज होता की पोलीस आरोपीची खोली अगदी बारकाईने तपासणी करतील पण ते कपाट मात्र फारसं तपशीलवार तपासणार नाहीत. म्हणजे ज्या वेळेला पोलीस ते कपाट तपासतील आणि त्यांना मी तिथे ठेवलेली दोन हजार ची नोट सापडेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की प्रत्यक्ष चोरी झालीच नाही ती नोट फक्त त्या खोक्यातून बाहेर पडून कपाटात इतरत्र पडली होती”-साहिर
पाणिनी ने साहिर कडे विचारपूर्वक बघितलं “अच्छा अचानक तुला आत्ता त्या आरोपी बद्दल सहानुभूती कुठून निर्माण झाली? आणि तिला या चोरीच्या आरोपातून सोडवावा असं का वाटलं ?अशा प्रकारचा खोटा पुरावा तिथे निर्माण करून?”
“.त्याची काही वैयक्तिक कारण आहेत पण आत्ता मी एवढेच सांगतो मला असं वाटत होतं की आरोपी क्षिती आलुरकर एक स्त्री असल्यामुळे आणि तिचा भाबडा चेहरा बघून ती जर या चोरीच्या आरोपात आपण निर्दोष आहोत असे पोलिसांना पटवू शकली तर त्या चोरीचा दुसरा संशयित म्हणून माझ्याकडे पोलीस बोट दाखवू शकतात आणि मला ते परवडण्यासारखं नव्हतं म्हणून माझ्या दृष्टीने चोरी झालीच नाही असं भासवण महत्त्वाचं होतं. त्यासाठी मी दोन हजार ची नोट मधुरा महाजन च्याच कपाटात ठेवून देणार होतो.”
साहिर च्या अचानक बदललेल्या या पावित्र्यामुळे पाणिनी पटवर्धन वैतागला त्याने एकदा साक्षीदाराकडे रोखून बघितलं आणि म्हणाला “दॅट्स ऑल युवर ऑनर.”
साक्षीदार पिंजऱ्यातून निघून जाण्यासाठी उठला पुन्हा एकदा न्यायाधीश मंगरूळकर यांनी त्याला थांबवलं.
“ एक मिनिट थांबा मिस्टर सामंत. असं जर होतं तर ही वस्तुस्थिती तू पहिल्यांदाच का नाही सांगितलीस?”
“ न सांगण्याचे कारण म्हणजे मीच ती नोट तिथे ठेवण्याचा प्रयत्न करत होतो हे मला कबूल करायचं नव्हतं”-साहिर म्हणाला.
“तू साक्ष देताना खरं सांगण्याची शपथ घेऊन साक्ष येत होतास याची तुला जाणीव आहे ना?”
“हो सर जाणीव आहे”
“तुझ्या लक्षात येत आहे का? मी जेव्हा तुला आधी विचारलं होतं की तुझ्याकडे ती दोन हजार ची नोट कुठून आली तेव्हा ते तुला आठवत नसल्याचे तू भासवलंस. मी तुला जेव्हा आठवण करून दिली कि ती हे पैसे तू तुझ्या बँकेतून काढलेले असशील तेव्हा तू हे मान्य केलंस आणि त्याच्यानंतर तू आत्ता सांगितलेली सर्व कुभांड रचलस”
“ठीक आहे मी मान्य करतो करायला नको त्या अनेक गोष्टी मी केल्या पण तुम्ही माझ्यावर आरोप करू शकत नाही की क्षिती. आलुरकर ला अडकवण्यासाठी मी मुद्दाम तिच्या खोलीत पुरावा पेरला उलट तिला त्याच्यातून बाहेर काढायची अपेक्षा करत होतो आणि मदत करत होतो.”
“असं? परंतु सरकारी वकील यांना तर हे काही सांगितलं नाहीस ?” न्यायाधीशांनी विचारलं
“हो नाही सांगितलं खरं”
“एक फार विचित्र केस झाल्ये ही. असे काही बारकावे आहेत की मला ते आवडले नाहीत. अजिबात आवडली नाहीत”
“मी कुठल्याही पूर्वग्रह दूषित मनाने या खटल्याकडे बघणार नाहीये किंवा एकदम घाईत निर्णय घेणार नाहीये पूर्ण पुरावे मी तपासून घेणार आहे पण तरीही मला असं वाटतंय की ज्या स्त्रीवर आरोप करण्यात आलाय तो फार संशयास्पद आहे. साक्षीदारांनी जायला हरकत नाही. मिस्टर खांडेकर तुम्ही दुसरा साक्षीदार बोलवा पण मी तुम्हाला एक निक्षून सांगतो की सरकारी वकील या नात्याने तुम्ही या खटल्यात तुम्ही तुमची भूमिका व्यवस्थित बजावलेली नाही.”
“पाणिनी पटवर्धन यांनीसुद्धा ते त्या घरात काय करायला गेले होते याबाबत समाधानकारक खुलासा केलेला नाहीये या साक्षीदाराच्या वागणुकीबद्दल जर कोर्टाला संशय वाटत असेल तर पाणिनी पटवर्धनांच्या तिथे असण्याबद्दल सुद्धा कोर्टाने तेवढाच संशय दाखवायला पाहिजे होता असं माझं प्रामाणिक मत आहे” खांडेकरांनी आपली खंत व्यक्त केली
खांडेकरांना न्यायाधीशाने मध्येच थांबवले “हे पहा मिस्टर खांडेकर पाणिनी पटवर्धनांचा हेतू काय होता याच्याशी मला काही कर्तव्य नाही हा साक्षीदार तुम्ही आणलाय आणि त्याची साक्ष आणि उलटतपासणी घेतली गेली आणि या साक्षीदारांनी हे कबूल केले की त्यांनी काही गोष्टी कोर्टापासून दडवलेल्या आहेत. त्याची एकंदर वागणूक आणि देहबोली ही वस्तुस्थितीला धरून नव्हती. पाणिनी पटवर्धन यांनी उलटतपासणी घेताना केवळ त्याच्यावर दबाव टाकला म्हणूनच त्यांनी कबूल केलं की या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठीच तो त्या घरात शिरला होता अन्यथा त्याने कबूल केलं नसतं मग त्याचा हेतू आरोपीला मदत करण्याचा असो किंवा स्वतःला वाचवण्यासाठी असो पुराव्याची छेडछाड करण्यासाठी तो घरात शिरला होता हाच मोठा गुन्हा आहे आणि तो त्यांनी साक्ष देताना दडवून ठेवला.”
खांडेकर काहीतरी बोलायला गेले परंतु न्यायाधीशांनी पुन्हा त्यांना गप्प बसवले आणि ते पुढे म्हणाले ,
“मला माहितीये की ही प्राथमिक सुनावणी आहे कोर्ट कायदा आणि नियमाला धरून जास्तीत जास्त न्यायपूर्ण निर्णय देण्याचा प्रयत्न करेल पण मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे मी काही नवखा न्यायाधीश नाही आणि सरकारी वकिलांनी हे लक्षात ठेवावं की या प्रकरणाची अशी काही पार्श्वभूमी आहे की ती नक्कीच संशयास्पद आहे.”
सरकारी वकील खांडेकर उठून उभे राहिले
“या सर्व पार्श्‍वभूमीवर मी विनंती करतो की उद्या सकाळपर्यंत कोर्टाने आपलं कामकाज तहकूब करावं तोपर्यंत मी आणखीन काही पुरावा सादर करायचा प्रयत्न करेन किंवा ते शक्य झालं नाही तर हा खटला काढून घ्यावा अशी ही विनंती करीन तोपर्यंत मधुरा महाजन च्या आजारपणाबद्दल आपल्याला अद्ययावत माहितीही मिळेल आणि नंतर आपण ठरवू काय करायचं ते.” –खांडेकर
“बचाव पक्षाचे या बद्दल काही म्हणणे म्हणजे काय हरकत आहे? पाणिनी पटवर्धन यांची काही हरकत आहे? कोर्टाचं कामकाज तहकूब करण्यासाठी?”
“नाही काही हरकत नाही आमची” पाणिनी म्हणाला.
“ठीक आहे तर मग उद्या दहा वाजेपर्यंत आपण कोर्टाचं कामकाज तहकूब करू. मी असं सुचवतो उद्या सकाळी कोर्ट पुन्हा चालू होईपर्यंत पोलिसांतर्फे अत्यंत सखोल असा तपास याबाबत केला जावा”
एवढे बोलून उठले आणि आपल्या चेंबरकडे गेले अॅडवोकेट खांडेकर हेसुद्धा पटवर्धन कडे न बघता आणि त्याच्याशी एकही शब्द न बोलता कोर्टातून निघून गेले.
प्रकरण-15 समाप्त