Ankilesh - 36 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 36

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 36

३६

@ अखिलेश

बिचारी अंकिता. ज्या वयात पोरींना दिसण्यातली गंमतच महत्वाची वाटायला लागते त्या वयात विद्रुप होण्याचं नशिबी आलं. ते कोड वाढत गेलं. नि दोन वर्षात चेहराही त्याच्या तडाख्यात आला. एकसंध रंग पांढरा झाला तर एकवेळ ठीक, पण थोडा थोडा कमी जास्त झाला की अधिक विचित्र दिसतो. दररोज उठून आज डाग कुठवर आलाय हे बघायची सवय झाली तर मनावर परिणाम होणारच. कितीही म्हणा, दिसण्यापेक्षा असणे महत्वाचे, पण ज्याला त्यातून जावे लागतं त्याची मनोवस्था कठीण आहे समजणे. लग्नाआधीच्या दोन वर्षात अंकिताला बऱ्यापैकी सांभाळून घ्यावे लागले. हळूहळू ती त्यातून सावरली. आता तर तिला त्याचे काही वाटेनासे झालेय. खरे सांगू ना तर हे सुंदर असणे हेच महत्वाचे. आतून येणारी सुंदरता आयुष्यभर टिकून राहते. बाह्य सौंदर्य काय.. आज आहे उद्या नाही. कित्येक वय उलटून गेलेल्या सिनेमातल्या नट्या त्यामुळे तरूण दिसायचा अट्टाहासाने प्रयत्न करतात तेव्हा केविलवाण्या वाटतात. एकदा अंकिता मला म्हणालेली,"इफ आय हॅड धिस काइंड आॅफ स्किन अर्लियर.. यू वुड हॅव स्टिल लाइक्ड मी?"

"खरं सांगू? आय डोन्ट नो. उगाच मी होय कशाला म्हणू? इट्स लाइक आस्किंग, समज आपल्या पहिल्या भेटीत तुला दिसलं असतं की मला एक हात नाही, किंवा पाय नाही तर वुड यू हॅव गाॅन अहेड? याला उत्तर एक.. आफ्टर नोइंग इच अदर, इट वुड प्रोबॅबली नाॅट मॅटर.."

"बट लव्ह ॲट फर्स्ट साईट? बहुतेक ते दिसण्यावरच अवलंबून नसतं का?"

"प्राॅबॅबली ॲट द यंग एज. पण ते टिकून राहात नाही."

कैलास म्हणजे माझा मेसेंजर आर एन ए! शरीरात हा आर एन ए संदेशवहनाचे काम करतो. कैलासने आजवर माझ्या आईला आम्हा दोघांबद्दल सगळ्या माहितीचे संदेश आपोआपच पोहोचवले होते. आता बाकी फक्त मी हलवून खुंटा बळकट करणे होते. तिच्या कोडाच्या उद्भवण्याआधी गोष्ट तशी सोपी वाटत होती. गावस्कर डाॅक्टर मोठे असतीलही पण तसा हा लग्नाच्या प्रस्तावाचा माझ्या घरून स्वीकार तितकासा कठीण नव्हता. डाॅ.गावस्करांनी आधी दिलेले ते धोक्याचे इशारे महत्वाचे असले तरी ते तितके कठीण काम नव्हते. पण आता ह्या कोडा नंतर?

इथेही कैलास कामी आला.

"मायूस नहीं होते बेटा, जिंदगी की इम्तिहान से

हमने तो की है मुहब्बत, पूछना इतिहास से..

तुला स्वत:ची खात्री आहे ना? मग नाॅट टू वरी. जस्ट हॅव सम करी.. कारण देव तारी त्याला कोण मारी?"

"म्हणजे? देव कशाला कुणाला तारी? नि मला कोण मारी? म्हणजे काय?"

"एवढंच, दरवेळी यमकांतून अर्थ शोधावाच असे नाही. जुळणारे शब्द प्रत्येक वेळी हवा असलेला अर्थच वहन करतीलच असे नाही.."

"नो वहन? मग त्या कवितारूपी शब्दासुराचे करावं दहन!"

"असो. तर गुद्दा असा.. नव्हे मुद्दा असा की.. जिंदगी की परिक्षा तुम मत होना फेल..

कुरमुरे के बिना बनी है कब भेल?"

"तू उगाच नकोस डोकं खाऊस.. पाठवीन तुला जेल.."

"हे बघ, मैं हूं ना.."

नंतर त्याने काय नि कसे सांगितले आईला ठाऊक नाही.. म्हणजे आजवर मी कधी त्याला विचारले नाही. पण आईनेच एक दिवस विषय काढला..

"त्या रत्नागिरीच्या सावंतांचा फोन होता.."

"कशाला?"

"अरे, त्यांची मुलगी डाॅक्टर आहे.. मी म्हटलं छानच. बोलावून घेते एकदा.."

"पण आई, माझी परीक्षा.. त्यात काम किती.."

"एवढंच ना? तू नको काळजी करूस. ते तुमच्या काॅलेजात ॲडमिशनला परीक्षा असतात तशी पहिली फेरी.. मी बघते. मग तू नंतर बघ.."

"अगं पण मध्येच हे कुठून आलं? आता मला अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे.."

"तो होत राहतो रे. उद्याच यायचेत सावंत. मुलगी चांगलीय म्हणे.."

"तशा जगात चांगल्या खूप असतात. म्हणून काय बघत बसायच्या?"

"हे खरं बोललांस.. आपल्याला एक पुरे! यंदा कर्तव्य नाही पण बघायला काय हरकत आहे?"

"तुला दुसरं काम नाही का?"

"आहेत, खूप सारी कामं पडलीत. एकदा लग्न म्हटलं म्हणजे कामंच कामं.."

"परत तेच.."

"म्हणजे तुला तसं लग्नच करायचं नाहीये.. की कुणी आहे.. निवडून ठेवलेली..तसा तू कुणाला अंकित होण्यातला नाहीस तरीही.."

"काहीतरीच तुझं."

"बरं राहिलं. पण कशी काय आहे तुझी अंकिता? अंकिताच ना नाव तिचं?"

अशी डायरेक्ट मेथड? तोवर मला कैलासकृपेने तिला काय ठाऊक आहे हे ठाऊक होतं म्हणून बरं.. तरीही ह्या प्रश्नाला काय उत्तर देणार होतो मी?

"अरे, रत्नागिरीत कोणी असे सावंत नाहीत.. तर सावंतांना मुलगी कुठून येणार.. म्हटलं पाहावं चोरीला वाचा फुटते का? पण नाही.. एकदा घेऊन ये घरी.."

"कुणाला?"

"तुला नक्की हा प्रश्न पडलाय?"

"तसं नाही.."

"मग कसं? अंकिता गावस्कर नावाची कुणी मुलगीच नाही?"

"तसं नाही.. आहे.."

"एवढी तर मुलगी पण लाजत नसेल.. अंकिता गावस्कर! डाॅक्टर गावस्करांची एकुलती एक.. गेली दोन अडीच वर्षे मांजर दूध पितंय.. डोळे मिटून. नायर ते केईएम फेऱ्या मारतंय. आणि त्या बोक्याला वाटतंय कुणाला दिसत नाहीए.."

"आई तू ना.."

"आता तरी घरी घेऊन ये.. तिला ठाऊक आहे ना आपले घर लहान आहे.. आता परत कुणाला म्हणून विचारू नकोस.."

"होय आई. तिला मी सगळी कल्पना दिली आहे आधीच.."

"तू चिंता करू नकोस अखिलेश. अरे, हाॅस्पिटलात नोकरी मिळाली की तिकडे रहायला घर ही मिळेल.. मुलगी चांगली असली तर बाकी गोष्टी आपोआप होत राहतील.."

"होय आई.."

"अजून काही सांगायचेय?"

"कशाबद्दल?"

"तिच्याबद्दल? की सांगायला बसलास की शब्द पुरे पडायचे नाहीत?"

"तू पण ना.."

"ऐक, तू कसलीच चिंता करू नकोस.. आणि एकदा जबाबदारी घेतली की मागे वळून पाहू नकोस.. मग कितीही अडथळे येवोत.. माणसाला एकदा आपलं म्हटलं की पुढचं सारं निभावून न्यावं लागतं.. मग शेंडी तुटो की पारंबी.."

"म्हणजे?"

"मला कैलासने सांगितलंय सारं. तू मागे हटण्यातला नाहीस. शेवटी तू आमचाच मुलगा. त्यामुळे तू अंकिताला असा सोडायचा नाहीस. मी सोडू देणार नाही.. लोकं काय काही ही बोलतील.. जे योग्य ते करायला घाबरायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही."

मला कोडं पडलं.. आई त्या कोडाबद्दल बोलतेय की काय? ती त्याबद्दलच बोलत होती..

"अरे, आपली जबाबदारी कधीच टाळू नये.. एकदा आपलं माणूस म्हटलं ना की मग ते कोड कुठे का असेना.."

आईने एवढ्या विश्वासाने सारे सांगितले की मनावरचे सारे ओझेच दूर झालं.. आज आई अंकिताला आईसारखीच आहे. अंकिताचं मराठी काही तितकं सुधारलं नसलं तरी प्रेमाची भाषा कुठलीही असली तरी ती शुद्ध असेल तर बाकी बोलण्यात कितीही चुका झाल्या तर काय बिघडणार आहे? लग्नाच्या वेळेपर्यंत अंकिताचा चेहराही बिघडलेला. पण आईने काय नि बाबांनी एका अक्षराने तिला त्याबद्दल कधी बोल लावला नाही. अशी पोर श्रीमंताघरणी म्हणून घरात आणली याबद्दल लोकं बोललेच.. पण तिकडे दुर्लक्ष करत आईने स्वत:साठी मुलगी मिळवली. मुलीची तिला हौस भारी.. अंकिताचे लाड करून ती पुरवून घेतली.. आणि अजून घेतेय.

आज विचार करताना वाटतं, माणसाच्या मनावर सारं काही अवलंबून असतं. तीच अंकिता आमच्या घरी इतक्या झटकन रूळली.. आम्ही क्वार्टर्समध्ये रहायला आलो तरी आई बाबांची काळजी स्वत:च्या ममीपपांसारखी घ्यायला लागली.. स्वत:च्या घरचे आरामाचे आयुष्य इतक्या सहज सोडायला तयार झाली.. माझ्या घरी ही तेच.. लग्न म्हटले की पहिली रिॲक्शन असते, मुलगी सुंदर आहे दिसायला .. इकडे बिचारी अंकिता विद्रुप चेहरा घेऊन घरात आली. आईबाबांनी तिला तशीच स्वीकारली, मनापासून.. हेच या सर्वांचे विचार वेगळे असते तर? अंकिता माझ्या प्रेमात पडते.. मग तिच्या पपांच्या पैशांच्या जोरावर मला तसल्या आयुष्यासाठी मागे लागते.. किंवा माझे आईबाबा तिचे ते रूप पाहून तिला सोडून देण्यासाठी मागे लागतात.. असे काहीही होऊ शकत नव्हते का? म्हणजे हा सगळा आपापल्या मनाचा नि विचारांचाच खेळ! विचार आयुष्य घडवू शकतो नि बिघडवू ही शकतो. खरोखरीच योग्य आणि अयोग्य काय यांच्याबद्दल योग्य पद्धतीने विचार करता आला तर आयुष्यातल्या कित्येक गोष्टी किती सोप्या होतील नाही?

कैलास म्हणालेला, मेरे दोस्त, कौन टाल सकता है होनी .. मार ले सात फेरे फिर करले बोहनी..

कैलास म्हणजे कहर आहे. यमकांच्या पाठी लागायची सवय अजूनही गेलेली नाही .. पण त्याच्या त्या चारोळी कवितांवर इंप्रेस होणारी खरीखुरी कविता तोवर त्याच्या आयुष्यात प्रवेश करती झालेली .. त्यामुळे त्याचे माझ्या प्रेमकथेवरील लक्ष थोडे कमी झालेलं असलं तरी तोवर माझी प्रेमनौका किनाऱ्यास लागलेली होती! आमचं लग्न नंतर झालं नि एकदम नांगर टाकून ती बंदरात उभी राहिली.. अजूनही तशीच आहे ती दिमाखात उभी!