Ankilesh - 32 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 32

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 32

३२

@ डाॅ.अरूणा गावस्कर

आयुष्याची ही गंमत असावी. आज गंमत शब्द वापरतेय मी.. तेव्हा इट वाॅज टफ. म्हणजे एका डोळ्यात आनंदाचे अश्रू आले की दुसऱ्यात संकटामुळे पाणी यायलाच हवे असा माझ्या बाबतीत नियतीचा काही नियम असावा की काय? माझे सुरेन्द्रशी लग्न ठरले.. सगळे ठरवले त्यानंतर लगेच सुरेन्द्रच्या वडलांनी इहलोक सोडावा? अंकिताच्या जन्माच्या आनंदाच्या वेळी सुरेन्द्रचा गावच्या घरावरील हक्क जाण्याचा निकाल यावा? माणसाचं मन उगाच या योगायोगांमध्ये लिंक जोडत असतं. पण इजा बिजा नंतर तिजा अशा वेळी व्हावा? ते ही अंकिताबाबत?

सुरेन्द्र मोठ्या मुश्किलीने तयार झालेला तिच्या लग्नाला, त्यात त्याच्या भास्कराचार्य पंडित गुरूजींचा सल्ला महत्वाचा होता. माझ्यासाठी अखिलेश अंकिताला सांभाळेल याची खात्री हाच खरा महत्वाचा भाग होता. काही असो, अंकिताचं सुख महत्वाचं नि ते तिला मिळणारच या आनंदात असतानाच एक दिवस सकाळ सकाळी अंकिताला तो हातावर उपटसुंभासारखा उमटलेला पॅच दिसलेला..

आपल्याकडे मुलीचा रंग नि तिचे रूप ह्यांनाच जास्त महत्व दिलं जातं. कुठल्याही मॅट्रिमोनियल मधली वधू पाहिजे मधली जाहिरात बघा, मुलगी गोरी हवी, सुंदर हवी असेच काही असणार. हेच म्हणे अनुरूप! घरचे सर्व काम करायला तयार यासाठी अति सुंदर शब्द योजतात लोक.. गृहकृत्यदक्ष! आजवर कोणी हुशार मुलगी हवी असे म्हटले आहे? सुस्वभावी मुलगी म्हणजे घरात राहून सर्वांना सांभाळणारी.. एकेक जाहिरातीतले शब्द असे 'लोडेड विथ हिडन मिनिंग' असतात. खरे सांगणे त्या शब्दांत पटत नाही नि सांगितल्यावाचून तर राहवत नाही. घरातल्या सर्व माणसांसकट घर सांभाळणारी नि घरातून बाहेर जाण्याची इच्छा नसणारी किंवा बाहेरचे सांभाळून घराकडे बघणारी सुंदर गोरी तरूण मुलगी वधू म्हणून हवी इतक्या स्वच्छ शब्दात आम्ही सांगत नाही. जाहिरातीत हुंड्याबद्दल तर शब्द ही छापला जात नाही. खरेतर 'मुलगा चांगला इंजिनियर असल्याने किंवा पर्मनंट सरकारी नोकरीत असल्याने अमुक अमुक भाव परवडणाऱ्यांनीच संपर्क करावा' असं रोखठोक लिहायला हवे की नाही? पण आमच्या मानसिकतेत आम्ही दातांचे दोन सेट्स वापरत असतो. जगाला दाखवण्याच्या सुंदर दंतपंक्ती वेगळ्या, त्या कधीच अ सुंदर होऊ देत नाही आम्ही. आणि खाण्यासाठी? वेगळ्या दातांचा सेट! दाखवायचे दात दाखवत नकळत त्या खाण्याच्या दातांनी प्रत्यक्षात चावे घेतो आम्ही. तेव्हा अशा मानसिकतेत वधू वरांसाठी जाहिराती अशाच असणार. हे तर ठरवून लग्नांची जुळवाजुळवी केली जाते त्यांच्यासाठी. लव्ह मॅरेजचे तारू कुठल्या दगडावर कधी नि कसं आपटेल सांगता येत नाही. तशी कारण रूपी खडकांची मुबलक सोय आम्ही करून ठेवली आहे. तरूण वयात अक्कल कमी असताना पोरं पोरी नैसर्गिक आकर्षणाने येतही असतील जवळ, पण मोठे म्हणून पालक नि नातेवाईक नि समाज यांनी त्यांना सांभाळायला नको का? मग हे जहाज जात, धर्म, भाषा, पंथ इत्यादी अनादी काळापाडून अडिग अशा खडकांवर आदळवून फोडलं जातं.. नि बुडवलं जातं. माझ्या अंकिताच्या नौकेच्या शिडात आधी श्रीमंतीचा वारा शिरलेला.. त्यापुढे अखिलेशच्या घरचे जहाज म्हणजे एखादी छोटीशी बोट. गलबत, अगदी बिन शिडाचे. मोठ्या मेहनतीने ही जहाजे पाण्याच्या प्रवाहात न बुडता भेटलेलीत.. त्यात मग अंकिताचे सावळेपण खपून गेले.. स्वत: अखिलेश गोरापान असूनही.. कदाचित अरेंज्ड मॅरेजमध्ये हा मोठाच मुद्दा ठरला असता.. साळवींच्या घरची सामान्य परिस्थिती.. ती ही एक तडजोड म्हणून मान्य झाली.. आणि आता? एका रात्रीत बाजी पालटणार? बाजी हा माझा शब्द नाहीच. दोन जीवांच्या मिलनात बाजी मारणे किंवा कुणी वरचढ ठरणे हे कसं काय होऊ शकतं? पण अगदी तटस्थपणे लग्नाच्या बाजाराचा कानोसा घेतला तर बाजी शब्द अगदी योग्य वाटायला लागतो!

अंकिताच्या सावळ्या कातडीवरचा हा पांढरा कोडाचा डाग? एकाएकी उगवलेला. आजवर सावळेपणा मिरवणारी ऐन तारूण्यातली माझी मुलगी.. आता हे कोडाचे डाग कसे सांभाळणार आहे? अखिलेश असेलही कितीही चांगला पण ह्या कोडवाल्या अंकिताचा स्वीकार जाणूनबुजून कसा करणार आहे? वैद्यकीय शास्त्राप्रमाणे कोड संक्रमित होत नसेलही, पण त्यावर इलाज तरी कुठे आहे? आज हातावर थोडंसं दिसणारं कोड उद्या किती वाढेल सांगता येणार आहे? दोघांची अजून एंगेजमेंटही नाही. मानसिक कमिटमेंट मानणारी पिढी आहे का ही? खरेतर पिढीचा मुद्दा गैरलागूच म्हणावा, कारण काही गुण हे कालातीतच नव्हेत का? तर आता अखिलेश नि त्याहून महत्वाचे, साळवी कुटुंब यापुढे काय करणार? आधीच अंकिता अखिलेशहून सावळी, त्यात परत कोड अंगावर आलेली मुलगी. ती स्वीकारली जाणार? तिथे सुरेंद्रची किती ही असली तरी संपत्ती काय कामी येणार? आपल्या समाजाची स्थिती पाहिली तर एका डाॅक्टर मुलाला एका हुंड्याच्या रकमेत स्व-दारिद्र्य निर्मूलन सहज शक्य आहे. त्यासाठी त्याला डाॅ.गावस्करांची कन्याच कशाला हवी?

खरं सांगते, आजवर अशा संकटाची कल्पनाही केली नव्हती मी. आज कोड मर्यादित आहे, ते कधी नि कसे कुठवर वाढेल थोडीच सांगता येणार आहे? तीन वर्षांत ते कदाचित सर्वांगावर पसरेल. मग माझ्या अंकिताचं अखिलेशशीच काय.. इतर कोणी तिला पसंत करेल?

"आता पुढे रे काय सुरेन्द्र?"

न राहवून त्याला मी म्हणाले. त्यावर तो म्हणाला,"गुरूजी म्हणालेत ना तसेच होणार."

"पण गुरूजी हे कोड उठणं वगैरे तर म्हणाले नव्हते.."

"अरूणा, तुला मी सांगितलं नव्हतं. गुरुजी बोलले होते. ही हॅड प्राइम्ड मी.. अगदी व्हिटिलिगो नाही पण समथिंग दॅट विल डिस्टर्ब हर थ्रु आऊट हर लाइफ.. गुरूजी बोललेले. तेव्हा मी मेंटली प्रिपेअर्ड होतो. एखाद्या सिरीयस आजारापेक्षा हा बिनाइन आजार परवडला. इट्स ओन्ली आऊटवर्ड्स. आतून अंकिता तशीच राहणार आहे, हुशार आणि स्ट्राँग."

"पण लग्न?"

"गुरूजी म्हणालेत त्याप्रमाणे लग्न अखिलेशशीच.. अँड शी वुड बी हॅपी इन हर लाइफ.."

"मला तर कठीण दिसतंय.."

"अगं, हे आताचं सोड, असंही अंकिता मॅरिइंग अ सिंपल मिल वर्कर्स सन.. हे तरी कुठे सोपं होतं. कॅन एनी वन एव्हर इमॅजिन? बट आय वुड स्टिल से धिज.. आय रिस्पेक्ट हिज पेरेंट्स. त्यांनी मोठ्या मेहनतीने त्याला इतके वर आणले आहे.. आता इतकं झालंच आहे, पुढे ही होईल. होप फाॅर द बेस्ट!"

सुरेन्द्र बोलला खरा असं, पण होप फाॅर द बेस्ट आणि प्रिपेयर फाॅर द वर्स्ट म्हणतात! वर्स्ट म्हणजे काय? माय अंकिता विल सफर द होल आॅफ हर लाईफ? होप फाॅर द बेस्ट म्हणून माझ्यातली आई कशी शांत होणार? मुग्धाला फोन केला.. अजून एक दोघींशी बोलले. त्यात माझी स्कीन स्पेशालिस्ट मैत्रीण ही आली. एकतर अमेरिकेतली आहे, तिला ही फोन केला. तिकडे काही उत्तर असेल तर. पण ज्या प्रश्नाचे उत्तर ठाऊक आहे, त्यासाठी वेगवेगळ्या जणांकडून वेगळे काय निष्पन्न होणार होते?

एकूण बाह्य रूपावर घाला घालणाऱ्या नि विचित्र विद्रुपीकरण करणाऱ्या ह्या कोडाने मला हलवून टाकले. आज हातावर डाग आहे, तो पसरणार, चेहऱ्यावर येणार, ॲक्रल टाइपच्या कोडात ओठ नि हाताची बोटे पांढरी होतात. हत्तीच्या कातडीवर असे डाग दिसतात, त्याला पॅचीडर्म म्हणतात. सावळ्या कातडीवर हे डाग.. किती उठून दिसतील? किती विद्रुप दिसेल सारे? ऐन विशीतल्या वयाच्या तरूण मुलीच्या मनाशी हे डाग काय खेळ करतील? त्यात अखिलेशने पुढे जायला नकार दिला तर? किंवा अंकिताने स्वत:च विड्राॅ केले तर? एखाद्यावर आत्यंतिक प्रेम असले तर ती मुलगी काहीही करू शकते.. आधी ती हा सगळा ऐषोआराम सोडायला तयार झालेली. आता त्याच्या भल्याचा विचार करून त्यालाही सोडू ही शकते. काय होणार?

सुरेन्द्र सेज एव्हरी थिंग विल बी फाईन.. त्याला विश्वास टाकायला पंडित गुरूजी होते.. मी सुरेंद्रवर विश्वास टाकायचा ठरवले. दुसरे अजून मी करणार तरी काय होते?