३०
@ अखिलेश
ती अंकिताच्या घरची 'होम व्हिजिट' झाली. डाॅ.गावस्कर एकदम जेन्युईन वाटतात. त्यांच्या म्हणण्यात तसं तथ्य आहे. शेवटी दुनिया चालते ती पैशांवर. फक्त एक आहे, जोवरी पैसा तोवरी बैसा म्हणणारे आपले कधीच नसतात. नि आयुष्यात आपल्या माणसांशिवाय दुसरे काय आहे? मला ते वाक्य आठवले, द रीच लाईफ हॅज नथिंग टू डू विथ मनी. थोडक्यात 'इट्स आॅल इन मनी, हनी!' आणि त्याचवेळी 'नथिंग टू डू विथ मनी' एकाचवेळी खरंय हेच खरं! दुधारी तलवारी सारखं! किंवा नसून अडचण.. असून नो ग्यारंटी आॅफ हॅपिनेस असे असावं. तरीही मला डाॅक्टर गावस्कर आवडले. मुख्य म्हणजे ते सदैव डाॅक्टरकीच्याच भूमिकेत वावरतात असे वाटते. डेडिकेशन टू प्रोफेशन म्हणजे काय ते पहावे. नायर हाॅस्पिटलातला राउंड त्यांचा कधीच चुकत नाही. आयसीयूत कधी ते रात्री बेरात्रीही जात असतात. तिकडे कोण त्यांना जास्ती पैसे देणार असते? ते तसे समाधानी दिसतात. काम भरपूर.. त्यात सदैव बिझी.
त्यांनी लंच पे बुलाया है म्हणाली अंकिता, तर मी म्हणालेलो,"व्हाॅटस् आॅन द मेन्यू कार्ड?"
"तुला जे हवं ते.."
"नको.. तुला हवं ते.."
"ओ.के.. मग बामिया, पिटा चिप्स आणि मुजादरा.. फट्टुश सलाद अँड हुम्मस.."
"ही कोणाची नावं? माणसं की पदार्थ? आयॅम नाॅट अ मॅन इटर! सलाद आणि चिप्स सोडून काही कळलं नाही.."
"सिंपल डियर.. लेबॅनिज डेलिकसीस.."
"लेबॅनिज? मला वाटलं आफ्रिकन काॅक्रोच पिकल्स आणि मुंग्यांची चटणी करणारेस तू.."
"ओह! यू वाँट दॅट? चालेल.. यू प्रिफर रेड आॅर ब्लॅक अँट्स? आणि फक्त काॅक्रोच पिकल्स साठी थोडी झुरळं पकडून दे.."
अंकिता इंग्रजीत ज्याला स्ट्रेट फेस म्हणतात तसा चेहरा ठेवत म्हणाली.
त्या दिवशी जेवण तिनेच बनवलेले. त्या आफ्रिकन किंवा लेबॅनिज डिशेस नाही अर्थातच.
अंकिताच्या हाताला चव आहे. नाहीतर हल्ली शिकलेल्या मुली स्वयंपाक कसल्या करतात?
लेबॅनाॅन मध्ये सुगरणीला काय म्हणत असतील? काही का असेना. अंकिता चक्क सुगरणीसारखा करते स्वयंपाक. शेवटी काय, आवड असेल तरच माणूस शिकतो. त्या इंटरकाँटिनेंटल डिशेसची नावे अंकिताने घेतलेली उगाच मला चिडवण्यासाठी .. हिला माझाच गुण लागला म्हणायचे!
जेवणानंतर मग डाॅ.गावस्करांनी प्रश्नांच्या बंदुकीने गोळीबार केला. मी मानसिक तयारीची ढाल घेऊन नि थोडे निलाजरेपणाचे चिलखत घालून गेललो म्हणून बरे. मी गेल्यानंतर तिचे पपा म्हणाले म्हणे,'विल गो अहेड.. पण तीन वर्षानंतर.' बरेच आहे ते. इन्टर्नशिपच्या पैशांवर तर एक आठवडाही निघायचा नाही. त्यात मी अजून घरी काही सांगितले ही नाहीये.
नंतर कैलास भेटला, तर म्हणाला,"दरसन दुरलभ हो गया भई.. का करे इस लौंडे का?"
"करू काहीच नकोस. बिझी होतो.."
"ठाऊक आहे मला. आता या कैलासला कैलासपर्वतावर जायलाही हरकत नसेल तुझी. तू आता तर काय फा इन लाॅ ला भेटून आलायस.."
"फा इन लाॅ? चाऊ एन लाय सारखं वाटतं.."
"वाटू देत.. अंकिताने मला स्टोरी सांगितली सगळी, तेव्हा हमें सब है पता..
हमसे है जमाना जमानेसे हम नहीं
जरूरत है कमाना.. पर कमाने में दम नहीं
असं काही सांगितलं नाहीस ना? तुझा काही नेम नाही.
कौन कंबख्त कमाने के लिए जीता है
हम तो वो हैं जो जीने के लिए कमाते हैं..
या दारिद्ररेषेखालील गरिबांच्या लोकल गालिबला असं काही तर नाही ना सुचलं?"
"तू आणि तुझे हे पाळीव सिंह! शेर.."
"अरे ऐक.. दोन लाईन्स..
ऐसे हैं शेर दिल हम.. क्या जानो तुम..
बस तुम्हारी खींचे टांग.. इसमें हुए हम गुम!"
"वा! वा!"
"तो किधर तक आई है यार कहानी तेरी
बाबुजी चलना धीरे, न खत्म होगी जवानी तेरी.."
"धीरे? सुपर स्लो.. नाही रे.. डाॅ.गावस्कर म्हणाले, तीन वर्षांनंतरच .. ते बरंच आहे.."
त्यानंतर अंकिताने निरोप आणला, डाॅ.गावस्करांनी मला एकट्याला बोलावलेय भेटायला, ते ही क्लिनिकवर. म्हणजे परत ती ढाल नि चिलखत घेऊन जाणे आले! तसा मी गेलोच.. सर क्लिनिक मधून ब्रेक घेऊन बसलेले. मी गेलो तसा त्यांनी रिसेप्शनिस्टला फोन केला,"नो वन शुड कम टिल आय टेल यू.."
मला वाटलं आता आली कंबख्ती. एकट्याला गाठून काहीतरी करण्याची योजना? म्हणजे सिनेमात दाखवतात तसे काही? जस्ट इनसल्ट द बाॅय.. किंवा त्याहून सोपे, त्याच्या घरच्यांचा अपमान. त्यांच्यासारख्या मोठ्या डाॅक्टरसमोर माझे गिरणी कामगार बाबा.. तुलनाच होऊ शकेल का? सरांनी त्यांचा माझ्यासमोर
पाणउतारा केला.. मी स्वाभिमान म्हणून चिडून उठून गेलो.. 'गरीब की भी इज्जत होती है' म्हणत.. मग मी अंकिताचं नाव टाकणार.. ती माझी वाट पाहात झुरणार काही दिवस.. नि मी.. तिला विसरून जायचा प्रयत्न करणार.. हे सारे कथानक डोळ्यांसमोर उभे राहिले.. पण घडले काही वेगळेच! मला बघताच म्हणालेले,
"वेलकम यंग मॅन.. सो आॅल प्रिपेअर्ड?
"कशासाठी सर?"
म्हणजे सरांच्या प्रश्नांच्या सरबत्तीसाठी तर नाही? त्या दिवशी पहिला भाग.. आज द्वितीय अध्याय?
"कशासाठी काय? फाॅर पोस्ट ग्रॅज्युएशन?"
"हो ते होय सर. जनरल सर्जरी.."
"ग्रेट! सर्जरीसाठी कुल टेम्परामेंट हवे.. ग्रेट. पुढे काय?"
"बहुतेक युराॅलाॅजी.. मला केईएममध्येच राहायचेय.. फुल टायमर.."
"बाहेर खूप पैसा आहे.."
"हो सर. पण प्रायव्हेट सेट अप मला जमणार नाही.. आणि मोठमोठी हाॅस्पिटल्स.."
"डोन्ट एव्हर जाॅइन देम. द काॅर्पोरेट्स ट्रीट डाॅक्टर्स ॲज बाँडेड लेबरर्स. मिंट मनी ॲट अवर काॅस्ट.. बाय आॅल मिन्स.. बी इन फुल टाइम. त्या दिवशी सांगायचे राहिले.. तुझे आईबाबा मस्ट बी प्राऊड आॅफ यू.. पण त्यांचा वाटा मोठा आहे माय बाॅय.. नेव्हर एव्हर फरगेट.."
"हो सर.."
"पण तुला बोलवायचे कारण वेगळे आहे.. आर यु शुअर अबाऊट अंकिता? म्हणजे महत्वाच्या काही गोष्टी आहेत.. त्यावर विचार कर.. आय फाइंड यू व्हेरी सिन्सियर म्हणून सांगतोय.. लाइक एनी फादर, आय हॅव टू टेक केअर.."
"हो सर.."
"हे बघ, तू अंकिताहून गोरा आहेस. व्हेरी फेअर. शी इज अ बीट डार्क. आपल्याकडे उलट असलेलं चालतं. बाॅय कॅन बी टाॅल डार्क हँडसम.. पण मुलगी मात्र गोरीच हवी.. पर्सनली मला त्यात काही फरक पडत नाही.. पण अ फेअर बाॅय मॅरिंग अ डार्कर गर्ल.. लोक बोलणारच.. तुझी तयारी आहे ऐकून घ्यायची?"
"हो सर. म्हणजे आपका स्कीन कलर आपल्या हातात थोडीच आहे. आणि ब्युटी इज स्किन डीप.."
"गुड.. प्रश्न इथे संपलेला नाही. इट स्टार्ट्स हिअर. गिव्हन दॅट यू आर बेटर लुकिंग दॅन हर.."
"पण सर.."
"लेट मी कम्प्लिट.. सो.. गिव्हन दॅट, लोक काय म्हणतील याचा अंदाज आहे तुला?"
"नाही सर.. पण त्याने काय फरक पडणार आहे?"
"पडतो माय बाॅय. फरक पडतो. लोक काय म्हणतील हे ऐकशील तर नक्कीच म्हणशील.. फरक पडतो. दुसरी गोष्ट अशी आहे, गिव्हन दॅट अंकिता इज अ रीच फादर्स ओन्ली डाॅटर.. आता दोन्ही क्लाॅज एकत्र कर.."
"सर..?"
"अर्थ काय होतो? इट डझन्ट मॅटर टू यू.. ती काळी आहे की गोरी.. तिच्या पैशांकडे पाहून तू तिला पटवलेस.."
"सर धिस इज नाॅट ट्रू.."
"यस माय बाॅय. आय नो. तसं असतं तर तुला मी घरी बोलावलं असतं? पण लोक हे बोलणार. बोलणारच.. ते ऐकून घ्यायची तयारी आहे तुझी?"
"सर असा विचार मी कधी केलाच नाही.."
"याच्यापुढे ऐक.. तिसरी गोष्ट, तुझ्या घरची साधारण परिस्थिती.. तेव्हा युवर पेरेंट्स गायडेड यू आॅन धिस पाथ टू कॅच अ रीच गर्ल.. दे विल युझ द वर्ड.. यू हुक्ड द गर्ल!"
"सर, पण हे सारं.."
"खोटं आहे. सपशेल खोटं आहे. आय हॅव अ लाॅट आॅफ रिस्पेक्ट फाॅर युवर पेरेंट्स. मी कधी भेटलो नाही.. पण लोक हे बोलणार. तू तुझ्यापर्यंतच्या गोष्टी सहन करशील, दुर्लक्ष करशील, पण घरच्यांबद्दल.."
"सर, माझ्या ध्यानात हे कधी नव्हते आले.."
"हे सारं ऐकायची तयारी हवी.. मला ठाऊक आहे, ॲक्च्युअली आॅल धिज डझन्ट मॅटर ॲट आॅल. पण हे सारे समजून घेण्याची गरज आहे यंग मॅन. जग आपल्याला जगू देत नाही नि मरू ही देत नाही.. सो यू नीड टू बी लेव्हल हेडेड.."
"यस सर.. तुम्ही सांगितलेल्या पाॅईंट्सवर विचार करतो मी सर. थ्यांक्स फाॅर द गायडन्स.."
एकूण सर हे असे आहेत तर! अगदी गरीबीतून वर आलेल्याला हे सारे दिसू शकते नि समजू शकते. आजही सर मला असाच गायडन्स देत राहतात.. गंमत म्हणजे सगळीकडे सांगताना एकच सांगतात,"नाइलाज झाला. मला हा मुलगा बिलकुल पसंत नव्हता.. पण अंकिताची इच्छा!"
ते हे का सांगत असतात देवास ठाऊक .. माणसाचं मन ते, असंच काॅम्प्लिकेटेड असायचे!