Ankilesh - 21 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 21

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 21

२१

@ अखिलेश

दिल्ली दरबारातून परतलो.. शाही मेजवानीनंतर! रविवार असल्याने बसला गर्दी नव्हती. ते ठीक, पण ट्रॅफिक नसल्याने बसला वेळ ही कमी लागला! अंकिता घरी गेली. मी आपल्या घरी. येत्या आठवड्यात सेकंड सर्जिकल टर्म सुरू होतेय. मी सर्जिकल दास तोंडपाठ करून ठेवलेय. आता एक एक चाप्टर करत लव्ह अँड बेलीचे सर्जरी टेक्स्टबुक संपवायला हवे.. इतके जाडजूड पुस्तक. त्यात मध्ये मध्ये छोट्या अक्षरात काही महत्वाची माहिती.. इतके सारे वाचावे नि लक्षात कसे ठेवावे? आज लक्षात येते ते हेच, वाॅर्डात प्रत्यक्ष पेशंट बघत काम केल्याशिवाय मेडिसिन आणि सर्जरी शिकताच येत नाही. पुस्तके वाचून डाॅक्टर बनता येत नाही पण पुस्तके वाचल्याशिवाय ही बनता येत नाही! एक इनसाइट डेव्हलप व्हावा लागतो, तो व्हायला लागणारी वर्षे म्हणजेच डाॅक्टर होणे. मग डिग्री मिळायला साडेपाच वर्ष लागतात ह्याला काहीच अर्थ उरत नाही! हे विषयांतर झाले नाही? अंकिताबरोबर राहून राहून ही सवय झाली असेल का? ती विषयाला सुरूवात करताना नमनाला घडाभर तेल काय घालेल, मग मध्येच अन रिलेटेड गोष्टी काय सांगेल.. तिचा मूळ मुद्दा काय हे समजता समजता किती वेळ लागावा? एरव्ही ठीक आहे, पण भांडण करताना किती कठीण जात असेल याचा विचारच केलेला बरा! तुम्ही म्हणाल, दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर असा शेवट असलेल्या प्रेमकथेत हे भांडण कुठून आले? तर भांडणे इज स्पाइस आॅफ लाईफ! फक्त जास्त मसालेदार लाईफ बनवणे टाळावे आणि काय?

तर मूळ मुद्दा.. दिल्ली सर केल्यासारखा परतलो. दुसऱ्या दिवशी कैलासला साद्यंत वृत्तांत द्यावा अशी त्याची अपेक्षा. कैलासचे काय? चारोळ्या रचायची संधी गमावेल तर तो कैलास कसला!

"एक बिल्ली गई दिल्ली.. बनके आई बोका

मैंने पूछा.. खुश इतना, उसने हां कहा, हो का?"

कैलासला भाषांच्या सरमिसळीचे वावडे नाही, फक्त यमक जुळणे महत्वाचे!

"पण बाबुजी धीरे चलो पुढे आहे धोका

नकोस मारूस चौक्यावर चौका, साधुनि असला मोका!

वा वा म्हणा अखिलेशकुमार.."

"म्हणावेच लागेल.. पण तुला काय सांगावे? मला आठवत नाही काय झाले काल, काय काय झाले? इतना तो याद है मुझे, उनसे मुलाकात हुई.. बादमें जाने क्या हुवा.. न जाने क्या बात हुई!"

"नसेल सांगायचे तर नको सांगूस..

वो कहते हैं उनको नही है कुछ याद

पर पडने आएंगे पांव मेरे, जरूरत पडने के बाद!

खरंय की नाही?"

"खरंय गाढवा! पण हा सध्या न अडलेला नारायण खरंच सांगतोय, आम्ही गप्पा मारल्या खूप. पण आता फक्त एकच आठवते.. आम्ही गप्पा मारल्या खूप! आणि अजून एक.. डे बाय डे आय लाइक हर मोअर! ये प्यार नहीं तो क्या है मेरे दोस्त?"

"चूक! हा डायलाॅग माझा. तू कन्फ्यूज्ड असणार.. मग मी तुला समजावून सांगणार.. शेवटी कन्क्ल्युजन एकच.. यह प्यार नहीं तो क्या है दोस्त! दॅट इज द सिक्वेन्स!"

"प्यार सिक्वेन्स बिक्वेन्स नहीं जानता मेरे दोस्त!"

"नसेल. नो अनुभव. तुझा क्लास लावेन योग्य वेळ येईल तेव्हा!"

त्यानंतर दोन दिवस गेले. आमची क्रिकेट मॅच होती दुपारी. मी अर्थातच टीम मध्ये होतो. दुपारी कट्ट्यावर बसलेलो इतक्यात कोणीतरी म्हणाले, अखिलेश तेरीवाली आ रही है..

गर्लफ्रेंडला तेरीवाली हा शब्द कुठून आला? शब्द कुठूनही आलस असो, पण अंकिता आता कुठून आली? मी मोठ्या अपेक्षेने उठून उभा राहिलो.. अंकिता नव्हतीच. त्या कुणीतरी मुद्दामच टांग खेचलेली..

"अरे हीरो का मॅच है. हिराॅईन तो आएगी ही!"

का कुणास ठाऊक मला वाटले की खरेच तिने यावे.. त्यानंतर नक्की काय झाले आठवत नाही. माझे लक्ष उडाले असावे, पण थोड्याच वेळात अंकिता समोरून येताना दिसली. यालाच टेलिपथी म्हणतात की काय? पण एरवी हसरी अंकिता अशी चेहरा पाडून येतेय?

ती आली नि थोड्याश्या रडक्या आवाजात म्हणाली,

"अखिलेश, आय नीड टू टाॅक टू यू.."

"बोल.."

"इथे नाही. सम आयसोलेटेड प्लेस.."

एरवी आयसोलेटेड प्लेस म्हटल्यावर आमची गँग गप्प नसती बसली, पण तिचा आवाजच असा होता की कोणी कसले इशारे केले नाहीत.

पॅथाॅलाॅजी म्युझियमच्या बाहेर एक कट्टा होता जिथे जास्त कुणी जात नसत, तिकडे जाऊन बसलो..

"काय झालं? व्हाय आर यू लुकिंग सो डिस्टर्बड..?"

यावर आधीतर अश्रुपात झाला. पूर्ण भरून ओव्हरफ्लो व्हाव्यात तशा दोन डोळ्यांच्या विहीरी वाहू लागल्या. मग दोन तीनदा छोट्या रूमालाने डोळे पुसणे झाले.. त्यानंतर अंकिता म्हणाली,

"माय पपा.."

"काय झाले? ही इज अनवेल?"

"नाही.."

"मग?"

"ही वाॅटस टू गेट मॅरीड!"

मी तीन ताड उडालो! डाॅ.गावस्कर रिमॅरिइंग? मोठ्या लोकांचे काय सांगता येते?

"काय सांगतेस.."

अंकिताला आपली इंग्लिश भाषेतली चूक कळली असावी..

"आय मीन.. ही वाँटस मी टू गेड मॅरीड!"

हा अजून एक पण जास्त जोरदार धक्का..

"कोणाशी?"

"देअर इज वन बाॅय.."

"बाॅयच असणार ना?"

"आमच्या काॅलेजातला आहे.."

"चांगला नाही?"

"नाही.. नाही.."

"का? व्यसनी आहे? उडाणटप्पू आहे?"

"नाही.. चांगला आहे.."

"मग?"

"पण मला नकोय.."

"काय?"

"लग्न.."

"मग तसं सांग.."

"नाही ऐकत ते .."

"परत सांग.."

"मला आता नको लग्न.."

"मग नंतर कर.."

"नाही.."

"मग नको करूस.."

"करायचंय.."

"मग प्राॅब्लेम कुठेय?"

अंकिता चिडली. जोरात म्हणाली,

"मला त्या मुलाशी लग्न नकोय.."

"मग कोणाशी हवंय?"

"आहे एक मुलगा.."

"त्याला सांग मग.."

"नाही. त्याने ऐकलं नाही तर?"

"पण सांगितलं नाहीस तर कसं कळेल?"

"मग घरी सांग.."

"ते ऐकणार नाहीत.."

"मग तुला नक्की काय हवेय?"

"मला माहितीय पण माहिती नाही.."

आता अंकिताचा पेशन्स संपत आला होता. मी डायरेक्ट तिला 'मैं हूं ना' म्हणावे अशी अपेक्षा असावी तिची..

"माझ्याकडे याचे उत्तर आहे.."

डोळ्यातले पाणी पुसत ती हळूच हसली.

"पण दोन अटी आहेत.. माझी आता मॅच आहे. तिला तू थांबशील.."

"ओ के. थांबशील.. नाही थांबेन.."

"आणि यू विल वेट टिल द एंड.."

"ओके.. पण माय सोल्यूशन..?"

"प्राॅमिस.. यू विल गेट दॅट ॲट द एंड आॅफ द मॅच!"

"नक्की?"

"माय वर्ड..! चल, मॅचला उशीर होतोय.. अँड नो मोअर शेडिंग टियर्स.."

डोळे पुसून अंकिता निघाली. ग्राउंडवर पोहोचेतोवर माझ्या मनात एकाएकी विचार आला.. असे तर नसेल ना.. अंकिताला कुठलातरी तिसराच मुलगा पसंत असेल.. पहिला मी नाही.. दुसरा तो घरच्यांनी आणलेला नाही.. मग अजून कुणी तिसरा? मला म्हणायची ती.. अखिलेशदादा.. तुझा कित्ती कित्ती आधार वाटतो म्हणून सांगू.. असं काही? तिला मी सांगितलेले सोल्यूशन बद्दल पण मी खरेतर काहीच विचार केला नव्हता. अंकिताला एकाएकी काय सांगावे? मॅच दरम्यान विचार करू म्हणून तिला फक्त म्हटले.. तिने मानले.. आता व्हाॅट नेक्स्ट? म्हटले, बघू. जो होएगा देखा जाएगा.

ग्राउंडवर पोहोचलो. कॅप्टनला सांगून बाउंड्रीलाइनजवळ फिल्डिंगला उभा राहिलो.. अंकिता जवळच बसलेली. मध्ये मध्ये तिला दुरून पाहात होतो. तिच्या त्या सुपर आय क्यू वाल्या मेंदूत काय सुरू असावे? गालिब म्हणाला ते ठीकच.. इश्कने निकम्मा किया नहीं तो ब्रेन बहुत कामकी चीज है! विचार करताना वाटले, कोण अंकिता? मोठ्या घरची पोरगी. माझ्यावर जीव ओवाळून टाकायला निघालीय..आता माझ्यावर अधिकच जबाबदारी आहे..

मॅच संपली.. आम्ही जिंकलो. सगळी टीम ग्राउंडच्या मध्यभागाकडे धावली.. मी सोडून. मी उलट्या दिशेने अंकिताकडे.. जाता जाता खाली वाकलो. जवळच हिरव्यागार गवताची काडी होती. ती गुंडाळून तिची अंगठी बनवली. बाजूला एक रंगीबेरंगी रानफूल होते ते घेतले.. पहिल्या रांगेतल्या अंकितासमोर जाऊन गुडघ्यावर उभा राहिलो.. फूल हातात देत ती गवताची अंगठी तिच्या बोटात घालत म्हटले,"विल यू मॅरी मी?"

माझ्या प्रपोझल नाटकात मला वाटलेले, शब्दांवाचून कळले सारे हेच खरे. पण नाही. समथिंग्स नीड टू बी टोल्ड. वन कान्ट टेक देम फाॅर ग्रांटेड! म्हणजे अंकिताला मी सांगणे आलेच! खरेतर ती इतकी बिनधास्त.. तिनेच मला का डायरेक्ट विचारू नये? काही असो, आय डिड इट! माझ्या डोक्यात ही अंगठीची आयडिया कशी आली, केव्हा आली मलाच ठाऊक नाही. एक मोमेंटरी डिसिजन होता.. नव्हे डिसिजन आधीच झालेला, त्याचे फक्त इंप्लिमेंटेशन त्या क्षणी होत होते! अर्थात माझ्या नाटकात नि एकांकिकांच्या लिखाणातही मी असा एकाएकी आलेल्या विचारांवरच अवलंबून असायचो! तोच फंडा इथे!पण प्रपोझल नाटक परत लिहून काढायला हवे की काय?