Ankilesh - 17 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 17

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 17

१७

@ अखिलेश

एकूण माझी लक्षणं काही फार चांगली नव्हती. म्हणजे माझी ती दोन्ही मने हल्ली वारंवार बाहेर येऊन मारामारी करायला लागलेली. एकाला अंकिताचा मोह आवरेना. दुसऱ्याला पहिल्यास पटवून देणे जमेना. तरीही शनिवार संध्याकाळी वाटे अंकिताला फोन करावा नि सांगावे, उद्या सकाळी येत नाही म्हणून. पण शेवटी पहिले मन जिंके. नि दर रविवारी सायकल आपोआप ग्राउंडकडे वळे. अरविंदाची सायकल बिचारी कामी येई बहुतेकदा. पण कधी शक्य नसल्यास एका दुसऱ्या मित्राकडून सायकल मिळेच. हुशार नि निरीक्षण शक्ती तीक्ष्ण असणाऱ्या अंकिताच्या निरीक्षणातून ही गोष्ट सुटतेय कसली? मला आठवतं, आमच्या डिस्कशन्स मध्ये पेशंट एक्झामिनेशनबद्दल आम्ही बोलायचो. त्यात इन्स्पेक्शन म्हणजे बाह्य निरीक्षण खूप महत्वाचे. एका डाॅक्टरची नजर पेशंट आत येता येताच त्याच्या बद्दल आडाखे बांधायला मदत करते. ती नजर अंकिताची माझ्या सायकलीवर पडावी? म्हणायची, अरे वा! आज वेगळी सायकल? तिला त्या सायकलींच्या सोर्सबद्दल काय सांगणार होतो मी? तरीही उगाच एकदा 'डेस्टिनेशन इज मोअर इंपाॅर्टंट दॅन द वेहिकल' सांगून उगाच फिलाॅसाॅफरचा आव आणलेला मी! ही स्वत:च्या गाडीची मालकीण, मला दुचाकी परवडेल तर! पण दिल है की मानता नहीं हेच खरे! त्या दिवसात मध्ये मध्ये काही ना काही निमित्त काढून अंकिता केईएमला यायची. निमित्ते म्हणजे काय, पपांचे काम होते, ममीचा निरोप कोणाला द्यायचा होता.. असली काही. मी पण मग काहीतरी कारणे शोधून १६६ बसमधून तिला सोडायला जायचो. डबल डेकरच्या वरच्या पहिल्या सीटची गंमतच काही और आहे हे खरं! आजकाल ह्या डबल डेकर्स दिसत नाहीत. बिचारे प्रेमीजन काय करतात कोणास ठाऊक!

आमची ही घनघोर भेटाभेटी चाललेली. पुढे काय? प्रपोझ? प्रपोझल? माझी जीभ रेटेना. अगदी साधे कारण होते, एक टक्का तरी शक्यता होती, ती नाही म्हणाली तर? माझे ते दुसरे मन म्हणे, बरं होईल. संपवून टाक ही भानगड.. पण पहिले मन लगेच त्याचे म्हणणे खोडून काढे. तशात मिठीबाई काॅलेजचा एक मित्र आला भेटायला. त्याला नाटकाची हौस फार. त्याच्या नाटकासाठी स्क्रिप्ट शोधत होता. माझी लिखाणाची हौस त्याला ठाऊक होतीच. गेल्या सहा सात महिन्यांतल्या एकूण शी लव्हस मी.. लव्हस मी नाॅट अशा अवस्थेत मी प्रपोझल नावाचे दोन अंकी नाटक लिहून ठेवलेले.. मराठीतच अर्थात. मित्र खूश झाला.. हिंदीत करतो म्हणाला.. काही विचार करत मी म्हटले, एकच अट! लेखक म्हणून नाव माझे नको! विचार म्हणजे, माझी ती कल्पना, जी नंतर सत्यात आलीच.. नाटकाचा हाॅल.. पहिली दुसरी रांग, मी नि बाजूला अंकिता, माझी स्पेशल गेस्ट! नाटक माझे चांगले होतेच.. तिला आवडेलच. मुख्य म्हणजे न सांगता ही प्रपोझ करता येते नि ते ॲक्सेप्ट होते हे तिला त्यातून सांगता येईल! ते नाटक मीच लिहिलेले हे तिला आजही ठाऊक नाही! अर्थात तेव्हा मी लिहायचो त्याचे तिला अप्रूप नि कौतुक होते, हल्ली मी काही लिहित बसलो तर वेळेचा अपव्यय वाटतो! असो. टाइम्स हॅव चेंज्ड! आणि चेंज होणार नाही तर तो टाइम कसला? खरं की नाही?

त्या शी लव्हस मी.. लव्हस मी नाॅट वरून एकदा गंमत झालेली आठवते.. म्हणजे शनिवार संध्याकाळ. आमचा एक मराठी वाङमय मंडळाचा एक कार्यक्रम संपवून कट्ट्यावर बसलेलो. हातात एक गुलाबाचे फूल. एकटाच बसलेलो. चाळा म्हणून एक एक पाकळी खुडली जात होती. बाजूला कैलास कधी येऊन बसला कळलेही नाही. उगाच वाटत होतं की काही व्हावे नि अंकिता तिथे यावी. तिला हा लाल गुलाब द्यावा! एकाच वेळी पाकळ्या खुडताना हा विचार! एखाद्या आर्ट फिल्म सारखा सीन. म्हणजे हॅव द गुलाब आणि पाकळ्यापण खुडाव्या त्याच्याच! न राहवून कैलास म्हणालेला,

"कशाला त्या गुलाबाच्या फुलाची वाट लावतोयस? अरे बुद्धिजीवी तू. बारावीचं मॅथ्स आठवत असेलच. प्राॅबॅबिलिटी इज फिफ्टी फिफ्टी!"

"कशाबद्दल बोलतोयस?"

"अर्थात तुझ्या या शी लव्हस मी आणि शी लव्हस मी नाॅट करत गुलाबाची वाट लावण्याच्या लघु उद्योगाबद्दल! आणि हवाच असेल गुलाबाचा कौल तर सिंपल.. एकूण पाकळ्या मोज! सम संख्येत असतील तर शी लव्हस यू.. अदरवाईज नाॅट! बी वाईज, अदरवाईज खरं नाही!"

कैलासचे म्हणणे तार्किक होते! पण हे प्रेमाचे त्रांगडे.. तर्काच्या बाहेरचे होते त्याला काय करणार? त्या काळातले माझे आवडते गाणे ही होते ते हेच.. सर्दी खासी ना मलेरिया हुवा.. ये गया यारो इसको लव्हेरिया हुवा!

त्यानंतर एकदा आमची पिकनिक आठवते. इंटरकाॅलेजिएट पिकनिकची पद्धत नाही, पण तशी डेव्हलप व्हायला हवी! म्हणजे आंतरमहाविद्यालयीन प्रेमकथांना चालना मिळेल! तर शनिवार रविवार आमची पिकनिक. मराठी वाङमय मंडळ एक आॅरगनायझर. त्यामुळे जाणे भाग होते. नि इकडे रविवारची एक भेट चुकली तर डायरेक्ट अजून एक आठवड्याचा विरह! मला वाटले अंकिताला सांगावे, पण अगदी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत धीर होईना. शुक्रवारी रात्री न राहवून कैलासच्या घरी गेलो. म्हटले, तूच वाचव.. बिचारा कैलास! कुठे कुठे पुरा पडणार होता? पण शेवटी म्हणाला,"तुझा प्रतिनिधी म्हणून जातोय.. पण ध्यानात ठेव यू आर अनवेल! आणि एक अट आहे.."

"मान्य मान्यवर कैलास!"

"ह्या चार ओळी ऐकाव्या लागतील.. अँड दॅटस् नाॅट द ओन्ली थिंग.. वा! म्हणून दाद ही द्यावी लागेल.. अँड आॅल धिज, अडला हरी ही म्हण न वापरता!"

"मंजूर.."

"न करून जातोस कुठे.. अर्ज किया है..

 

उन्हें मिलने के लिए वो हैं इंपेशंट और बेताब इस कदर

जैसे नौ महिने के बाद बच्चा वाँटस् टू बी आऊटाॅफ उदर!

 

मिलकर उन्हें इन्हें हुई है इस तऱ्हा की बीमारी

लक्षण न डेंग्यु मलेरिया.. पर आयसीयु की तैयारी!"

 

"वा! क्या बात!"

आणि हे खोटे नव्हते. हा एंड स्टेज लव्हेरिया होता! आणि या मी न गेलेल्या पिकनिक बद्दल अजूनही अंकिताला ठाऊक नाही!

वो भी क्या दिन थे! अनामिक हुरहूर, नि रविवारची वाट पाहणे! सकाळची सायकल फेरी झाली की त्या आठवणीत आठवडा काढणे.

अशात मला आठवते ते एकदा पडलेले स्वप्न. तद्दन फिल्मी. हे ही मी कधी अंकिताला सांगितलेले नाही. स्वप्नात मी मागे नि अंकिता पुढे बसलीय. डबल सीट. सायकलीवर. अंकिता तू मेरा हीरो है गाणं म्हणतेय.. आमची सायकल सुसाट चाललीय, मी ती चालवता चालवता ते लिंबूपाणी पितोय. इतक्यात मागून एक मोठी गाडी येते. आतून डाॅ.गावस्कर बाहेर पडतात, हातात सिनेमात असते तशी लांबलचक बंदूक.. अंगात सूट बूट, हातात मोबाईल, गळ्यात हजारांच्या नोटांचा हार! अंकिताच्या 'तू मेरा हीरो है..' पाठोपाठ डाॅ.गावस्कर गातात.. 'पर प्रेमतंत्रके पन्नोंपर इसकी तकदीर तो झीरो है..' ते बंदुकीचा निशाणा साधत उभे असतानाच अंकिता गाणं बदलते.. 'लोगों न मारो इसे.. यही तो मेरा दिलदार है..' यानंतर एकाएकी मला जाग आलेली. पहाटेचे असो की अजून कधीचे, हे स्वप्न काही सत्यात उतरत नाही. अंकिताचे वडील पण एक डाॅक्टर आहेत. जीव वाचवण्याचा वसा घेतलेल्या डाॅक्टरला जीव घेणे कधीच जमायचे नाही.. तरीही एकूण माझ्याच प्रेमकथेबद्दलची साशंकता माझ्या मनात कुठेतरी खोल दडलेली या स्वप्नातून बाहेर पडली असावी!

दिवस असे कापरासारखे भुर्रकन उडून गेल्यासारखे वाटतात आज आठवताना. सोबत आठवते ते एक गाणे, सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई..! बिचाऱ्या अंकिताला असलेच दिव्य पार पाडावे लागणार आहे.. आमच्यातील फरकांच्या दऱ्या ओलांडाव्या लागणार आहेत. सात समुद्र ओलांडावे लागणार आहेत. प्रेमात पडल्याची ही किंमत! पण तरीही कुठल्यातरी सिनेमातला डायलाॅग आहे ना, ये प्यार भी कितना प्यारा है! तोच खरा!