Ankilesh - 15 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 15

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 15

१५

@ डाॅ.सुरेन्द्र गावस्कर

टू टेल यू.. अस्थाना येऊन गेले नि माझी एक चिंता मिटलेली. केतन इज अ व्हेरी स्टुडियस बाॅय. हुशार आणि अँबिशियस, ॲस्पायरिंग. आणि परफेक्टली फिट फाॅर माय गर्ल. अबोव्ह धिस, मुळात श्रीमंत! माय प्रिन्सेस विल आॅटोमॅटिकली रूल द अस्थाना'स किंग्डम! किंग्डम म्हणजे एखाद्या उद्योगपतीचे वगैरे असते तसे नाही. डाॅ.अस्थाना इज अ सीनियर अँड रिस्पेक्टेड डाॅक्टर विथ अ रोअरिंग प्रॅक्टिस. सो दे हॅव देअर ओन सेट अप अँड आॅल. अंकिताला हे सर्व मिळेलच. अँड माय प्रिन्सेस इज बाॅर्न टू रूल!

अस्थाना लोकं येऊन गेले.. अस्थाना इज अ थरो जंटलमॅन. केतनची आई लवकरच गेली. अस्थानांनी एकट्याने सारे सांभाळून घेतलेले. मुलाचे अपब्रिंगिंग एकट्याने करणे सोपे नाही. दॅट बाॅय इज गुड. आणि केतन आणि अंकिता एकमेकांबरोबर अगदी कम्फर्टेबल दिसले. ओळख तर करून दिली. दे वेअर डिस्कसिंग

अबाऊट द स्टडीज. इथे नेहमीसारखे, सीनियर जो कुणी असेल तो ज्युनियरला गायडन्स देतो.. घाबरवतो.. टीप्स देतो.. इत्यादी गप्पा झाल्या त्यांच्या. दे जेल्ड वेल. जोडी चांगली जमेल. बाकी भाषा, जात वगैरे मी मानत नाही. जगात दोनच जाती.. गरीब नि श्रीमंत. काही दुर्दैवाने मी आधी गरीब जातीत होतो. बट अरूणा नेव्हर बाॅदर्ड अबाऊट दॅट देन. पण मग मी देखील त्यानंतर खूप मेहनत केली. नाऊ आय डोन्ट वाँट टू गो बॅक टू दोज डेज.. आणि माझ्या अंकिताला पण परत तसे दिवस नकोत दिसायला.

मागे एकदा त्या मुलाला अंकिताबरोबर पाहिले होते. पण परत मला तो दीड दमडी बाॅय दिसला नव्हता. बहुतेक मागे एकदा आमच्या काॅलेजात कशासाठी तरी आला असणार. आणि अंकिताने जस्ट कर्टसी म्हणून एंटरटेन केलं असणार. उगाचच मी त्याच्या मागोमाग गेलो. आणि तसा आता मी काॅलेज कँप‌समध्ये शक्य तितके लक्ष ठेऊन असतोच. आय डोन्ट थिंक दॅट बाॅय हॅज कम अगेन. बरंय, तेवढंच एक टेन्शन कमी. पोर सांभाळणे सोपे काम नाही बरं. अरूणाला पण सांगून ठेवलंय. आपल्या पोरीकडे लक्ष ठेव. अरूणाला माझे हे गरीब श्रीमंत पटत नाही. म्हणते, तुम्ही पण गरीब होतात एकदा. दिवस बदलतात.. असतील ही. पण मी दुसऱ्याच भलत्या कुणाची काय खात्री द्यावी? पण गेले काही महिने तरी परत काही त्या मुलाबद्दलची काही खबरबात नाही मिळाली. अंकिता पण तशी अभ्यासात बिझी असते. मी तिला सांगून ठेवलंय, नो सबस्टिट्यूट फाॅर हार्ड वर्क. सगळे एक्झामिनर्स मला ओळखत असतील तरी अंकिताने तिचा अभ्यास नीट करायलाच हवा. हल्ली ती तशी सीरियस दिसते.. रात्री बराच वेळ पुस्तक घेऊन बसलेली असते. एम बी बी एस इज शियर हार्ड वर्क. डाॅक्टरकीची डिग्री लावायची नावापुढे तर मेहनतीला पर्याय नाही. ते ती करतेच. पण हल्ली दर रविवारी सकाळी सायकलिंगचं वेड घेतलंय म्हणे. म्हटलं तेवढाच तिच्या त्या नवीन सायकलीला व्यायाम! नाहीतर मोठ्या हौसेने घेतलेली ती सायकल गंजून जायची. पण या पोरींची डोकी कशी चालतात कुणास ठाऊक! म्हणते, वजन वाढतेय ते कमी करायला हवे! मला तर ती काही तशी वाटत नाही. म्हटलं तुझा बी.एम.आय चोवीस आहे.. अजून किती परफेक्ट हवाय? त्यावर ती म्हणाली, पपा तुम्हाला काही कळत नाही! हे नवीन! ही सेकंड इयरची पोर मला बी.एम.आय वगैरे शिकवणार? पण तिला मी काय बोलणार? आपले ते मेडिकल ज्ञान बाकी पोरांपुढे. आपल्या पोरीपुढे सारे शून्य! चाइल्ड इज अ फादर आॅफ अ मॅन म्हणतात.. इथे मदर म्हणावे कदाचित. पण आय कान्ट आर्ग्यू विथ हर. तुम्हाला सांगतो पोरी असतातच अशा. लाघवी. एकदा मी म्हणालो ही तिला उगीच, मी पण येतो सकाळी सायकलिंगला! तर म्हणाली, पपा एकच तर रविवार मिळतो तुम्हाला, विश्रांती घ्या. डोन्ट एक्झर्ट! बिचारीला काळजी किती!

तुम्हाला सांगतो, नथिंग लाइक हॅविंग अ डाॅटर. तशी ती परक्याघरी जायचे टेन्शन असते, पण तरीही मुलगी ती मुलगीच. अगदी अंकिताचा जन्म झाला ना त्या दिवशीची गोष्ट आठवते.. एका डोळ्यात आनंदाश्रू.. दुसऱ्याने रडणे.. अरूणाला मी म्हटलेले तिच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी.. मी हिला सासरी कसा पाठवू शकेन? यावर ती म्हणालेली, वेडा आहेस अगदी. असेनही. पण ते आजतागायत वाटत आलेय. फाॅर आॅल फादर्स.. डाॅटर्स आर समवन व्हेरी स्पेशल.. त्यात अंकितासारखी कोणी सेन्सिटिव्ह अन हळवी असेल तर..

विचार करतोय, अस्थांनाशी बोलावे. ही परीक्षा उलटली की काही नाही तर एंगेजमेंट करून ठेवावी. तोवर केतनचे थर्ड इयर संपत येईल. बाहेर देशी जायची तो तयारी करेपर्यंत अंकिता शुड बी इन हर लास्ट इयर. आणि इंटर्नशिप नंतर अब्राॅड. काय ठेवलंय या इथल्या ओबडधोबड पेशंट्स मध्ये? आणि दगडांच्या देशात? अगदीच तसं नाही, पण कम्फर्ट लेव्हल अब्राॅड इज डेफिनेटली डिफरंट. नाहीतर आमची निम्मी प्रॅक्टिस पेशंट्स कडून 'साहब बहुत गरीब हूं. पयसा नहीं है' नाहीतर 'पढा लिखा नहीं हूं साब' ऐकण्यात गेली. मला स्वत:ला त्याबद्दल काही नाही वाटत पण आपल्या पोरांना कशाला ते सारे?

केतन अंकिताची जोडी.. जमेल का? जमेल ना?

केतन माझ्याच युनिटमध्ये आहे मेडिसीन टर्मला. लवकरच डाॅ.अस्थानांशी बोलायला हवे. शुभस्य शीघ्रम! पण सध्या परीक्षांचा हंगाम आहे. मुलं तर बिझी आहेतच, पण एक्झामिनर म्हणून आम्ही ही बिझी. परीक्षा अरेंज करणं ही एक मोठं कामच आहे. त्यामुळे डाॅ.अस्थाना ही थोडे प्री आॅक्युपाइड असणार. त्यामुळे थांबणे नि वेळ आली की विषय काढणे.. हे अरूणाने मला सांगितलेले! तुम्हाला सांगतो ही मॅनिप्युलेशन्स मला कधी जमत नाहीत. अगदी बुद्धिबळाचा खेळ ही म्हणून आवडत नाही मला. जे वाटतंय ते करून मोकळे व्हा की. हलवा आपले घोडे नि प्यादे.. हवे तेव्हा. मग डावपेचाचे डाव कशाला? पण तरीही मी अरूणाचे ऐकायचं ठरवलं. काही बाबतीत तिला माझ्याहून जास्त समज आहे. नि माझ्यासारख्याला मॅनेज करताना ती असल्या स्ट्रॅटेजिस वापरत असणारच.. तेव्हा वेट अँड वाॅच..

मला तेव्हा भास्कराचार्य पंडित गुरूजींची आठवण झाली. बाकी माझा ज्योतिष वगैरेवर विश्वास नाही. देवळात वगैरे मी जात नाही. ना ही अरूणा जाते. ज्योतिषशास्त्र वगैरे आहे की नाही यावर माझं ठाम असं मत ही नाही. पण एक नक्की, माझा विश्वास मात्र पंडित गुरूजींवर ठाम. गुरूजी म्हणतील तसंच होणार.. खरंतर जे होणार तेच गुरूजी सांगतात. बाकी ज्योतिषांसारखे नाहीत गुरूजी. त्यांना विचारावे असे वाटून गेले.. पण मग आठवले ते त्यांचेच शब्द.. सारे उपाय थकले, तुझ्या कडून करता येतील तेवढे सारे प्रयत्न करून झाले की मगच तू येतोस.. नि मला देखील तेच आवडते. माणसाने दैवाधीन राहूच नये. प्रयत्नांती परमेश्वर म्हणाताना, हा परमेश्वर दैवबिव न जाणता तुमच्या समोर उभा ठाकत असतो. तेव्हा तो म्हणत नाही.. नाही ह्याचा हरी तर कशाला देऊ खाटल्यावरी.. त्याच्या प्रयत्नांना यश येतंच, त्याच्या प्रयत्नांती साक्षात देवाला समोर उभे रहावे लागतंच. थोडक्यात सर्व मार्ग खुंटले की कुठल्या मार्गावर गेल्यास आपल्याला हवे तिथे पोहिचता येईल, तो मार्ग दर्शनाचं काम गुरूजींचे. त्यानंतर ती वाट चालायची आपल्यालाच.. त्या साठी जावं त्यांच्या कडे? ते ही अजून कुठलेच हात पाय न हलवता? गुरूजी माझेच पेशंट. ते आले की क्लिनिकवर ही मी कधी त्यांना असा सल्ला मागत बसत नाही. तर आता जाऊन त्यांना अर्धवट विचारावे ते काय? मग बाकी सगळ्या ज्योतिष सल्ल्यानुसार कामं करणाऱ्यांत नि माझ्यात काय फरक राहिला? थोडक्यात तो गुरूजींकडे जाण्याचा मार्ग बंद. म्हणजे सध्या बंद. अस्थानांशी जुळलं तर गरज पडणार नाही. फक्त आशीर्वाद घ्यायला जाता येईल.. आणि माझं मन सांगतंय, हे होईलच.. थोडा धीर तर धरावाच लागेल..

शुद्ध बीजापोटी जशी रसाळ गोमटी फळं येतात, तशीच ती धीरापोटी ही येतात.. तेव्हा धीर धरी.. धीर धरी..