Ankilesh - 8 in Marathi Love Stories by Nitin More books and stories PDF | अंकिलेश - एक प्रेमकथा - 8

Featured Books
Categories
Share

अंकिलेश - एक प्रेमकथा - 8

@ डाॅ.अरूणा गावस्कर

त्या दिवशी मला अंकिताच्या पर्समध्ये काय सापडावे? बसची दोन तिकिटे? नि त्या पॅथाॅलाॅजीच्या पुस्तकात त्याच दिवशीची रिसिट. केईएम जवळच्या बुक स्टोअरची. मला पोलिसांसारखे इंटरोगेशन आवडत नाही. पण आजकाल अंकिता थोडी गप्प गप्प वाटते. सुरेन्द्रला कुठला आलाय वेळ? ती त्या मुलाबरोबर तर गेली नसेल?

त्या दिवशी मी काही बोलले नाही. थोडी सिच्युएशन शांत झाली की डोकं नीट चालतं.

दुसऱ्या दिवशी अंकिता उठली तर तिला म्हणाले,

"तू पॅथाॅलाॅजीत करणारेस पीजी?"

"नो. मला नाही आवडत."

"नाही, मग एकाच वेळी दोन दोन राॅबिन्सन वाचतेयस. एकच एडिशन. काल अजून एक तेच पुस्तक आणलेयस. नाही कदाचित नवीन मेथड असेल अभ्यासाची.."

"अगं नाही.. ते माझं नाहीए बुक. माय फ्रेंड वाॅंट्स इट.."

"अंकिता, आयॅम युवर मदर. सुरेंद्रच्या हार्टच्या चारही चेंबरमध्ये असशील तू, पण अ मदर्स हार्ट बीट्स विथ हर चाइल्ड्'स. मला माहितीय. काहीतरी शिजतय. समथिंग इज ब्रुइंग. अँड हू इज बेटर दॅन युवर मदर.. तुला ठाऊक आहे आय एम लाइक युवर फ्रेंड. तशी मी स्ट्रिक्ट आहे.. बट आय नो कुठे कडक व्हायचं नि कुठे साॅफ्ट. बिलिव्ह मी, मला सगळं सांगून टाक. आय विल हेल्प यू आऊट.."

"नो ममा.. तसं काही नाही."

"नक्की ना.. नाही म्हणजे केईएममधून माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला. तू काल गेलेलीस तिकडे?"

माझा अंधारात मारलेला बाण होता तो. केईएममध्ये माझ्या मैत्रिणी आहेतच. आणि अंकिताला त्या ओळखतातही. आता परिक्षा अंकिताची होती. तिला तसं सराईतपणे खोटं बोलता येत नाही. आणि तिच्या चेहऱ्यावरून ते लपणार नाहीच.

"नाही गं. मी कुठे जातेय?"

"नक्की ना? तसे एकासारखे एक दिसणारे असतात म्हणा!"

अंकिताने विषय टाळला तेव्हा. तिच्या चेहऱ्यावरून वाटले मला, बहुधा ते केईएम प्रकरण खरेच असणार. मला आमचे दिवस आठवले. सुरेन्द्र नि माझी जोडी जमली तेव्हा मी तरी अगदी लगेच जाऊन थोडीच माझ्या आईला सांगितले होते? तेव्हा ही लपवाछपवी होतीच. कुणीतरी आमच्याबद्दल घरी सांगितले तेव्हा कुठे मी घरी कबूल केले होते. आणि माझी आई देखील माझ्यासारखीच अगदी मनमोकळी असून देखील. प्रेमप्रकरणात चोरटेपणा चोरपावलांनी नव्हे तर राजरोस येतो! अंकिताला कुणी आवडण्याबद्दल मला आॅब्जेक्शन नव्हते. फक्त तो चांगला हवा.. तशी अंकिता चूझी आहेच, त्यामुळे बहुधा ती चुकणार नाहीच..

मी थांबायचे ठरवले. पुढे बघू काय होते. अंकिता तशी वाहवत जाणाऱ्यांतली नाहीच. तेव्हा इट्स सेफ. आगे आगे देखिए होता है क्या!

यानंतर पोरीकडे जरा जास्त लक्ष ठेवायला हवे! पण लक्ष ठेवणे म्हणजे काय? तिच्या मागे मागे फिरणे? माझ्या ओळखीच्या एकाने तर चक्क डिटेक्टीव्ह हायर केलेला आपल्या मुलावर लक्ष ठेवायला! म्हणजे कोणी किती थरापर्यंत जाऊ शकतो? मला यातील काहीच करायचे नव्हते. माय अंकिता इज सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबलही. थोडी वाटते ती आंग्लाळलेली.. दॅट्स ड्यू टू हर प्युअर काॅन्व्हेंट एज्युकेशन. पण मनाने मात्र अस्सल देशी आहे ती. त्यामुळे तिला आवडणारा कोणी फार फ्लॅशी नसणारच.. हल्ली ते वुमन आॅफ सबस्टन्स म्हणायचे फॅड आहे ना तसा हा मॅन आॅफ सबस्टन्स असणार! आणि सबसिस्टन्ससाठी मॅन आॅफ सबस्टन्सच हवा!

अंकिताच्या वागण्याचा विचार केला तर वाटायला लागलेले.. नक्की पाणी कुठेतरी मुरतेय. पण तिथे सुरेन्द्रला प्लंबरगिरी करायला सांगणे म्हणजे आजाराहून औषध भयंकर. त्यापेक्षा पाणी अजून मुरू द्यावे. जमीन भुसभुशीत झाली की खणणे सोपे. म्हणजे अंकिताकडूनच.. फ्राॅम हाॅरसेसे'स माऊथ ऐकावे प्रत्यक्ष! सुरेन्द्रला हे म्हटले तर म्हणेल.. हुं हाॅर्सेसेस? म्हणजे घोडी? एवढी मोठी घोडी झाली.. कळत नाही हूम टू चूझ! सुरेन्द्रचे डोके खाणे म्हणजे एक नाईटमेअर.. यस.. हाॅरसेस.. नव्हे, तर घोडी म्हणजे मेअर!

*****

@ अखिलेश

अंकिताला सोडून परत आलो तर कैलास जणू माझी वाट पाहात उभा होता.. तो आता माझी खेचणार ठाऊक होते पण त्याला इलाज नव्हता..

"काय मग? प्यार की गाडी तेज चल रही है?"

"गाडी नाही, बस स्टाॅपवर सोडले तिला.."

"ऐक हां.. इन्स्टंट कविता..

वो आए थे मिलने चंद मिनट ही बस

वो चले गए.. ना गाडी में.. पकडके बस!

मिले दो चार घंटे लगते कुछ मिनिट ही बस"

"वा! खूपच शीघ्र कवित्व.. आता बस! मैं कहूं जमानेसे, डोन्ट पुल माय लेग.. बस!"

"अरे, बसलोच आहे मी! उभा तू आहेस! कदाचित बाशिंग गुडघ्याला बांधून. लव्हस्टोरी समोर घडते आहे नि मी तिचा चश्मदीद गवाह! बाय द वे.. तिला इंप्रेस करायला काही कविता वगैरे हव्या असतील तर आॅर्डर दे. होलसेल रेट मध्ये रिटेल. वुई प्रोव्हाइड आॅल कांइंड्स आॅफ पोएम्स.. आणि लव्ह लेटर्स टेम्पलेट्स ॲज वेल.. इन कन्सेशनल रेट्स.. सॅंपल ऐक..

पाहताच तुला कळले

काय तो तुझा रूबाब

हातात होते फूल झेंडूचे

वाटत होते जसा गुलाब.."

"अशी कविता? याला प्रेमकविता म्हणतात?"

"अरे, दुसरा भी माल तयार है.. यह देखो साहब, एकदम ताजा ..

डोळ्यांत घालून बसेन वाटे मी जीवन भर डोळे..

पण बसूनच गं .. नाहीतर पायात येतील गोळे..!"

"कुणी या.. कोंबा याच्या तोंडात बोळे.."

"मग? आॅल सेटल्ड? ठरले? इजहार हुवा? प्रपोझ हुवा?"

"तू चुप रे. झाले काहीच नाही. ती पुस्तक घ्यायला आलेली."

"तू कधीपासून बुकडेपो सुरू केलास?"

"ते सोड. पण शी लुक्स जेन्युईनली इंटरेस्टेड!"

"आणि तू?"

"मी? माझे काय.."

"लाजतोयस चक्क तू.. तुझे हे गोबरे गाल सफरचंदासारखे लाल झालेत.."

"चुप रे. मला ना कथा कादंबऱ्यातील वाटावे असे वाक्य सुचतेय.. आमच्या प्रेमनौकेच्या जहाजाच्या शिडात कितीही प्रेमाची हवा भरली तरी ते तारू परिस्थितीच्या खडकांवरच जाऊन आदळून फुटायचे.. अपघात हा ठरलेलाच. पण दुसरे मन म्हणते, प्रेमात शक्ती आहे, तीच परिस्थितीच्या दुस्तर सागरातून तुझी प्रेमनौका अलगद तारून नेईल..विश्वास ठेव.. प्रेमाच्या ताकदीवर विश्वास ठेव!"

"वा! लिहायला घे बेस्ट सेलर!"

"टेन्शन यार! अरे, मला वाटलं ती परत काही भेटायची नाही. पण ती आलीच. काहीतरी कारण काढून."

"तुला नकोय का ती? तर मी ट्राय करतो.."

"चुप रे. आय लाइक हर. म्हणूनच तर सगळा प्राॅब्लेम आहे रे. अरे, आपण कसेबसे इथवर पोहोचलोय. आता या सगळ्यात मन गुंतवायला परवडेल? आणि शी इज फ्राॅम अ वेल टू डू फॅमिली. आमची जोडी कसली जमायला! उगाच मनस्ताप. मलाही नि मुख्य म्हणजे तिला ही!"

"आतापासून तिची काळजी? वा! तुम बहुत आगे निकल चुके हो वत्स. हमारी बात सुनो. जो दिल कहे उसकीच सुनो. बाकी सब अपने आप सहन कर लोगे!"

"ओके गुरू कैलाशनाथ.."

व्हायचे काय होते? हल्ली लोक मोबाईलवर आंतरजालीय.. इंटरनेटीय प्रेमं जुळवतात म्हणे. आम्ही बॅकवर्ड! म्हणजे आमचे ते इंटरकाॅलेजिएट प्रेम पुढे सरकावे कसे? मी त्या दोन मनांच्या द्वंद्वात अडकलेलो. पण शेवटी ती मला आवडलेली हे खरेच. खरे सांगतो, अगदी तेव्हाही दिसण्याहून असणे महत्वाचे हे माझे मत होते. म्हणजे त्यावयात सुंदरतेचे आकर्षण नव्हते असे नाही. पण नुसत्या दिसण्यावर प्रेमे झाली असती तर मदनाच्या पुतळ्यांसारख्या नि रंभा ऊर्वशी सारख्या नटनट्यांच्या जोड्या झटाझटा तुटल्या नसत्या. नि ओबडधोबड चेहऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या जोड्या टिकल्या नसत्या. असो. तर मला अंकिता आवडलेली. प्रथम दर्शनात का कोणास ठाऊक आवडलेली.. पण गेल्या दोन भेटींत ती स्वभावानेही आवडायला लागलेली हे खरे. पण आता पुढे काय? कशी सरकावी गोष्ट पुढे? तिच्या काॅलेजला गेल्याशिवाय ती भेटणे नाही. नि तिथे जायला कारण काय शोधावे? तिने शोधले तसे काहीतरी?

एकूण काय तर हा मोठाच तिढा होता. याचे उत्तर काय नि कसे मिळावे?

"आता पुढे काय करू आचार्य कैलासनाथ? म्हणजे बाकी सारे पुढचे पुढे पण इस इंटरकाॅलेजिएट लव्हस्टोरीको जमाए कैसे?"

"अब आया ऊंट पहाड के नीचे! सो इट्स फायनल!"

"तसंच काही नाही.. पण तसंच.."

"दिसतंयच ते. मनमें लड्डू फुटे.. आवाज येतोय तडतड.. हे बघ.. काहीतरी चक्कर चालवायला लागेल. तिच्या काॅलेजात तू वारंवार जाशील असं काहीतरी.. मला एक सांग, पोलिस लोक काय करतात?"

"काय करणार? तुला पकडून नेतात.. आणि काय?"

"अरे, पोलिस लोक तपास करतात. तपास करण्यासाठी काय करतात.. नाही तू सांगू नकोस.. तर आधी जिथे गुन्हा घडला तिथे जाऊन सगळी जागा व्यवस्थित पाहतात.. मौका ए वारदात.."

"पण इथे कुठला गुन्हा झालाय?"

"ते गाणं गा.. प्रेम केले प्रेम.. काय हा झाला गुन्हा. अरे, एवढा मोठा हादसा झाला.. दिलकी चोरी हो गयी आणि तुला अजून प्रश्न पडतोय? तर, व्हिजिट टू हर काॅलेज. तिकडे कुठे काही क्ल्यू मिळतो का ते पाहणे.. मला तरी दुसरा मार्ग दिसत नाही.. साॅरी, अजून एक थेट मार्ग आहे.."

"बोला मार्गदर्शकजी.."

"तो असा की ताकाला जाताना हाती भांडं घेऊन जाणे आणि डायरेक्ट ताक मागणे.. आता ठोंब्यासारखे विचारू नकोस.. म्हणजे?"

"म्हणजे?"

"विचारलंसच! म्हणजे हेच. ताकवाली समोर जा, आपलं वाडगं पुढे धर आणि माग डायरेक्ट .."

"काय?"

"हे पण मीच सांगू? एक लिटरभर प्रेमाचे ताक वाढतेस का विचार तुझ्या अंकिताला.."

"ती हो म्हणेल?"

"सच्चे दिलसे मांगो तो भगवान भी मिलते हैं. तीच नाहीतर तिचा बाप ही हो म्हणेल!"

"बाप रे! हर बाप इज नोन टू बी खड्डूस नंबर वन!"

"त्याच्याशी तुला काय? यु आरन्ट गोइंग टू बी घरजावई की तुला सासरावास होईल.. डायरेक्ट ॲक्शन .. बेस्ट!"

"बेस्ट म्हणे.. बोलायला सोपेय.."

"अरे दीदार ए यार के लिए करना पडेगा

जहर अगर मिले तो पीना पडेगा.."

अशा चिक्कार गप्पा झाल्या. उगाच विचार करणे झाले. कैलासने दोन चार अजून इन्स्टंट कविता ऐकवून डोकं उठवलं. भवति न भवति झाली. वेळ खूप गेला नि चर्चेअंती निष्कर्ष एकच निघाला.. कठीण आहे. कदाचित.. तिच्या काॅलेजात जाऊन क्ल्यू मिळू शकतो.. अदरवाइज.. वेट फाॅर अ मिरॅकल!