१ नवे सेमिस्टर
"बदलून गेलया सारं...
पिरतीचं सुटलया वारं...
आल्लड भांबावलया बिल्लोरी पाखरु न्यारं...
आलं मनातलं या वटामंदी..."
श्या..
फालतू गाणं
पियुष ने पटकन गाण बदललं.
हम्म...
आत्ता कसं
"सो बेबी पूल मी क्लोज़र,
इन दी बैक सीट ऑफ़ योर रोवर"
काय ही इंग्लिश गाणी,
प्रिया मनातल्या मनात पुटपुटत होती.
अस म्हणत तिने गाण बंद केल.
"चला माणगाव उतरणारे", कंडक्टर ची हाक आली.
गाडी पंधरा मिनिटे नाष्टयाला थांबली. प्रिया गाडीतून उतरली. वातावरणात थोडी थंडी होती. झाडांना नुकतीच पालवी फुटलेली. वसंत ऋतू नुकताच बहरलेला.
पियुष खेडेकर चिपळुणचा राहणारा.
कॉलेजनिमित्त तो महाडला आत्याकडे राहत होता.
एक सेमिस्टर संपल्याने तो सुट्टी संपून पुन्हा कॉलेजला चालला होता.
अखेर त्याच डेस्टिनेशन आलं - "महाड".
प्रिया नाष्टा करून पुन्हा गाडीत बसली.
अलिबागची प्रिया जाधव महाडला इंस्ट्रुमेंटेशन मध्ये डिप्लोमा करत होती.
अखेर तिची एस. टी. महाड ला पोहोचली.
आणि ती तिच्या आजीच्या घरी पोहोचली.
महाड मधील 'ने ने विद्यालय' हे रायगड मधील प्रसिध्द डिप्लोमा कॉलेज होते. त्याची कीर्ती सर्वदूर पसरलेली. म्हणूनच सर्वजण तिथे शिकायला येत.
पियुष त्यापैकीच एक. एक हुशार विद्यार्थी म्हणुन आल्याआल्या फर्स्ट सेमिस्टरलाच त्याची इलेक्ट्रिकल च्या कट्टयात चर्चा होती. दिसायला सावळा, सडपातळ, हसरा चेहरा. पियुषची स्ट्रॅटेजी सिंपल होती. आपण भले आणि आपले काम भले.
त्यामुळे तो अभ्यासावरच आपले लक्ष्य फोकस करत असे. अखेर कॉलेज सूरु झालं. फर्स्ट सेमिस्टर संपल्याने एव्हाना मित्रमैत्रिणींचें चांगले ग्रुप पडलेले.
"हाय प्रिया", अनु.
अनु ही प्रियाची बी एफ एफ.
ती इथली लोकलाइट होती. महाड जवळच्याच बिरवाडी गावात अनु पवार राहायची.
"हाय अनु, बोल कशी आहेस ? " प्रिया
"मी एकदम मजेत, तू ?"
"मी ही...".
बरं मी तुला इन्विटेशन द्यायला आलेय, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे त्यासाठी.
बरं! मी येइन नक्की. चल आता लेक्चरला जाऊया.
"काय आल्या आल्या लेक्चर नुसतं ?" तू पण ना पियुष.
अरे साहिल... चल!
पियुषचा बी एफ एफ साहिल. दोघांच्या आवडीनिवडी एकच होत्या. पण स्वभाव जरा भिन्न.
"बर बाबा, लेक्चर वेड्या, चल लेक्चर ला".
आज पहिलाच दिवस असल्याने हार्डली तीनच लेक्चर झाले.
"चल मी चाललो " अनु प्रियाला म्हणाली
"अगं चाललो काय चाललो , मी चालले म्हण तू काय पोरगा आहेस "प्रिया
"ए बया गप आमच्याकडं असच बोलतात, चल मी जातो आता घरी बाय' अनु
" बरं बाय"
पियुष देखील परतला.
"कसा गेला आजचा दिवस दादा?"
हा पप्पू, आत्याचा मुलगा. सहावीला होता.
"मस्त होता बघ ..."
"आत्या कुठे गेली रे ?"
ती ब्राह्मण सभा हॉलला गेलीये. कसलातरी सेल आहे.तिकडेच गेलीये.
हम्म...
"मी आलो फ्रेश होऊन", पियुष.
पप्पू ने टीव्ही ऑन केला आणि गाणी सुरु केली
"जब से तेरे नैना मेरे नैनो से लागे रे "
तोच बाथरूम मधून आवाज आला
"पप्पू ही भंगार गाणी बदल आधी" पियुष
"मी नाही जा" पप्पू किंचाळला
२ कबड्डी
इकडे कॉलेज संपल्याने अनु एसटी स्टॅन्डवर येऊन बसची वाट बघत बसली . आज बस स्टॉप रिकामा रिकामा होता. तिला समोर एक मुलगा दिसला चेहरा ओळखीचा वाटला. हो तो अक्षय होता.
अक्षय मूळचा कोल्हापूरचा. त्याला ईएनटीसी ला ऍडमिशन मिळालेलं. तो पट्टीचा कबड्डी प्लेयर होता. कोल्हापूरचा असल्याने रांगडा गडी होता. त्याने गेल्या सेमच्या स्पर्धा गाजविल्या होत्या. अनु सुद्धा खोखो खेळाडू होती. तिच्यामुळे च इंस्ट्रुमेन्टेशन (यापुढे इंस्ट्रु) ला स्पोर्ट्समध्ये चॅम्पियनशिप मिळालेली.
दरवेळी इलेक्ट्रिकल, इंस्ट्रु आणि ईएनटीसी यांच्यातच टफ फाईट असे. ईएनटीसी ची चॅम्पियनशिप अक्षयच्या एका पॉइंटने हुकली. स्पोर्ट्स प्लेयर असल्याने अक्षयचे मित्र त्याला अनुच्या नावाने चिडवायचे. एव्हाना अख्खा ईएनटीसीचा वर्ग अक्षयला अनुच्या नावाने ओळखत होता.
शेवटच्या मॅचला अक्षयची रेड होती. इंस्ट्रुच्या वर्गात काही जणांना कुणकुण होती अक्षयला चिडवतात त्याची.इंस्ट्रु वर्सेस ईएनटीसी मॅच होती.शेवटच्या रेडला Instru च्या काही मुलांनी ओरड केला..
"अनु आली अनु आली.."
कबड्डी खेळताना आजूबाजूच्या लोकांमुळे आधीच भारावलेला वातावरण असतं.
गेलं गेलं गेलं.. संपलं सगळं..
अक्षयची टीम हरली.
तिथून अख्ख कॉलेज आता अनु आणि अक्षयला एका वेगळ्याच कारणाने ओळखू लागलं. अक्षयच्या मनात आत्तापर्यंत काहीच नव्हते. पण त्या मोमेंटला त्याचं लक्ष्य कसं कसं हटलं त्याचं त्यालाच माहीत
हो तोच अक्षय आज इतक्या महिन्यांनी बस स्टॉपवर दिसला. त्याने अनुला स्माईल दिली अनूला काय रिअॅक्शन द्यावी हे कळत नव्हते .तिने जबरदस्तीने देतात तशीच स्माईल दिली. इतक्यात तिची एसटी आली. काही कळायच्या आतच ती गर्दीत नाहीशी झाली. गर्दीतून हळूच तिने खिडकीच्या कोपऱ्यातून बाहेर पाहिले. तो अजून तिथेच होता आज त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते.
३ त्याची कविता
'कुणीतरी असावी सगळ्यांपेक्षा खास
जिच्या नावाने आपल्याला चिडवले जावे
तिच्या आठवणीने चेहऱ्यावर हलकीशी स्माईल यावी
नसताना ती आसपास विचारांचे काहूर उठावे'
नाकावरचा चष्मा वर करत कविता फळ्यावरची कविता वाचत होती. हिची ओळख करून द्यायची गरज नाही. होईल ती आपोआप!
"किती भारी कविता करता ह्यो पोरगो"कविता म्हटली
"कविता कित्या वाचत बसलस पॉवर सिस्टीमचा लेक्चर असा चल " पियुषने तिच्या डोक्यात टपली मारली
"तुझ्या मालवणात अशा नसतात काय कविता, येवढी इम्प्रेस झालीस ते " पियुष
"मग ह्यो कवी खयचो असा " कविता
"पुण्याचा असा. कबीर तेचा नाव, कॉम्प्युटरमध्ये शिकत असा" पियुष
चल आता लेक्चराक दोघेही वर्गात केले .घरून मोठी सुट्टी खाऊन आल्याने आता कॉलेज बोरिंग वाटू लागले होते.
सगळे घरी आले.
'कुणीतरी येतली जिचा नाव घेऊन तुका चिडवतले
कुणीतरी अशी येतली जिंका आठवून चेहऱ्यावर हसू येतला'
आज बऱ्याच दिवसांनी कविताने आपल्या डायरीत मालवणी कविता लिहिली.