उग्र नरसिंह मंदिर बघून आम्ही आता अशा मंदिराकडे निघालो की ज्याच वर्णन करताना शब्दही अपुरे पडतील.
हे मंदिर फक्त हंपीची शान नसून संपूर्ण भारत देशाचे भूषण म्हणावे लागेल.
हंपी, विठ्ठलपूरा येथील सुप्रसिध्द "विठ्ठल मंदिर"!!
रिक्षाने विठ्ठलपूरा परिसरात पोहचल्यानंतर आपल्याला मुख्य मंदिरापाशी जाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर चालत जावे लागते..
ज्यांना पायी चालण्याचा कंटाळा येतो किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरी कार उपलब्ध आहे.. पण सुट्टीच्या दिवशी त्यासाठी बरीच मोठी रांग असते.
मला वाटतं, हळू हळू पायी चालत मुख्य मंदिर येईपर्यंत लागणारे बाजारपेठेंचे अवशेष, एक दोन छोटी मंदिरे आणि उजव्या हाताला असलेली अतिशय सुंदर अशी पुष्करणी हे बघत बघत जाणं जास्त उत्तम..
यावेळी पाऊस चांगला झाल्याने पुष्करणी पाण्याने भरलेली होती.. आम्ही तिथं एक फोटो स्टॉप घेतला.दुपारच्या भर उन्हात तिथं गारवा जाणवत होता.. पुष्करणीच्या आजूबाजूला असलेल्या दगडी अवशेषात तुम्ही थोडा वेळ विसावू शकता.
तिथून बाहेर पडलो की समोरचं असलेलं विठ्ठल मंदिराचं भव्य गोपूर् लांबूनच आपलं लक्ष वेधून घेतं..
तिकीट घेऊन आम्ही त्या गोपूरातून मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर मी तर अक्षरशः भारावून गेले.. काय पाहू नि काय नको??
कुठून सुरवात करूया हेही समजत नव्हते मला!!
चारही बाजूंनी अतिशय सुंदर आणि कलाकुसरींनी सज्ज खांबांनीयुक्त अशा अनेक वास्तू समोर दिसत होत्या..
हंपीचे विठ्ठल मंदिर 16व्या शतकात बांधले गेले आहे. हे त्या भागातील सर्वात सुंदर आणि विजयनगरच्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल.
आमच्या गाईडने आम्हाला हंपीचे आणि या मंदिराचेही मुख्य आकर्षण असलेल्या दगडी रथाजवळ आणले.. इथेही माझी तिचं अवस्था झाली.. आधी नुसतं डोळे भरून हे रथशिल्प पाहू की गाईड काय सांगतोय ते ऐकू.😅😅
हे रथशिल्प म्हणजे रथाच्या रूपात बांधलेले देवस्थान जणू! गरुड देवताची प्रतिमा मूळतः त्याच्या गर्भगृहात प्रतिष्ठित होती. सध्या तिथं ती नाहीये. हिंदू पौराणिक कथेनुसार गरुड हे भगवान विष्णूचे वाहन आहे. विठ्ठल मंदिराच्या गाभार्याकडे मुख असलेले गरुड मंदिर म्हणून प्रतीकात्मक आहे.
अतिशय देखणा असा हा रथ सगळ्या मंदिर परिसरात शोभून दिसतो..
प्रथम दर्शनी आपणास हे एका अखंड दगडात कोरलेले शिल्प भासू शकते..मात्र नीट लक्ष देऊन पाहिले तर प्रत्यक्षात हे दगडी मंदिर अनेक ग्रॅनाइट दगडांनी बांधले गेले असावे हे समजते. दगडी रथ सुशोभित करणारे कोरीव काम आणि इतर सजावटीच्या वैशिष्ट्यांमध्ये दगडांचे सांधे हुशारीने लपलेले आहेत. एक फूट किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या आयताकृती चौथऱ्यावर हे शिल्प उभारलेले आहे.
चौथऱ्याच्या सभोवती पौराणिक युद्धाची दृश्ये कोरलेली आहेत. रथाची चाकांवर फुलांचे नक्षीकाम केलेले दिसते..
असं म्हणतात की यातील एक चाक अगोदर फिरायचे पण काही हौशी पर्यटक फक्त मजा घेण्यासाठी ते फिरवत असत. त्याला फिरवून फिरवून त्याची दुर्दशा होऊ नये यासाठी कालांतराने रथाभोवती लोखंडी साखळदंड लावले गेले ..
रथाच्या कोरीव कामावर काही ठिकाणी आजही आपल्याला त्याकाळचे रंगकाम पाहायला मिळते .
दोन हत्ती रथ ओढत असल्यासारखे रथासमोर उभे दिसतात. परंतु नीट पाहिले तर त्यांचा आकार आणि रथाचा आकार यात साधर्म्य वाटत नाही.. रथाच्या मानाने ते हत्ती खूपच लहान वाटतात .. बहुतेक ते नंतर आणून ठेवले असणार.. गाईडने सांगितल्यावर आम्ही लक्ष देऊन पाहिले तर घोड्यांच्या शेपट्या आणि मागचे पाय या हत्ती शिल्पांच्या मागेच दिसतात. कदाचित हे घोडे भंगले असतील म्हणून त्यांच्या जागी हे हत्ती आणून ठेवले असणार..
हाच रथ आपल्याला नवीन पन्नास रुपयाच्या नोटीवर पाहायला मिळतो..
याच्या समोर जो आहे विठ्ठल मंदिराचा सभामंडप.. याला "महामंडप" असे म्हणतात..
मंडपात जाण्यासाठी दगडी पायऱ्या चढून जावे लागते.. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत..
तसेच हा मंडप ज्या चौथर्यावर उभा आहे तो चौथराही व्याल आणि हत्तीचे युद्ध, त्या काळचे भारतीय व्यापारी,
वेगवेगळ्या प्रकारची फुले, बारीक नक्षीकाम केलेल्या स्त्रियांच्या हातातील बांगड्या, विविध वादक, नर्तकी अशा विविध शिल्पांनी समृद्ध आहे..
इथे कोणताही खांब शिल्प कलेविणा दिसत नाही..एका ठिकाणी संपूर्ण विठ्ठल मंदिराची छोटी प्रतिकृतीही कोरलेली आहे.
या मंडपाचे अजून एक आकर्षण म्हणजे मंडपाचे खांब..
नाजूक आणि एकाच आकाराचे चार खांब त्यांच्या मधोमध एक खांब अशी रचना आहे. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे या खांबावर तुम्ही हलक्या हाताने वाजवले तर त्यातून "सा रे ग म प" हे सूर उमटतात..
सध्या या मंडपातही पर्यटकांना बंदी आहे.. कारण आपल्या लक्षात आलेच असेल.
यालाच लागून असलेल्या मंडपात सध्या कोणतीही मूर्ती नाहीये. इथेच अगोदर विठ्ठलाची मूर्ती होती.याबद्दल एक आख्यायिका प्रचलित आहे..
ती अशी..
ज्या वेळी महाराष्ट्रातील पंढरपूर येथील मंदिरावर आक्रमण होते त्यावेळी भक्त विठ्ठलाची मूर्ती वाचविण्यासाठी शेजारच्या विजयनगर ( आजचे हंपी) राज्यातील राजाकडे सोपवतात..
तिथला राजा खूप मोठे मंदिर बांधून त्याची स्थापना तिथं करतो.. पण काही दिवसांनी महाराष्ट्रातील लोक परत ती मूर्ती घेण्यासाठी जातात तेंव्हा राजा सुरवातीला नकार देतो.. कारण त्याचा ही आता या मूर्तीवर श्रद्धा बसलेली असते..
मग राजाचे गुरू त्याला समजावतात आणि राजा ती मूर्ती देऊन टाकतो.. ती आपले लोक पंढरपूरात आणून स्थापना करतात..
विजयनगरचा राजा त्या मंदिरात तिरुपती वरून विठ्ठलाची मूर्ती आणून स्थापना करतो.पंढरपूरचा विठ्ठल काही काळ कर्नाटकात राहिला म्हणून त्याला "कानडा राजा" संबोधिले जाते..
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा।कानडा राजा पंढरीचा।।
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू। येणे मज लावियला वेधू।।
विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहाला प्रदक्षिणा मारण्यासाठी अंधारातून जाणारा मार्ग आहे.
या मंदिरातून बाहेर पडलो की बाजूलाच "कल्याण मंडप" आहे.. जिथे विवाह समारंभ साजरे केले जायचे.
इथल्या खांबांवरील व्यालप्रतिमा अजूनही सुस्थितीत आहेत..
आपले डोळे इथली शिल्प कला बघून थकून जातील.. आपण विस्मयाने तोंडात बोट घालावित अशा अनेक कलाकृती आपणास इथे बघता येतील..
अत्यंत भरभराटीला आलेल्या साम्राज्यात जेंव्हा कलेला प्रोत्साहन देणारे राजे राज्य कारभार करतात तेंव्हा अशी सर्वोच्च प्रतीची शिल्पकला घडवली जाते..
इथे असलेले प्रत्येक शिल्प कारागिराने आपके कसब पणाला लावून बनविलेले आहे..
हंपीला आल्यावर घाई घाईत ही मंदिरे पाहू नयेत असा सल्ला मी देईन आणि सोबतीला गाईड असावाचं कारण काही खास शिल्पे आणि त्यातील वैशिष्ठ्य तोच आपल्याला सांगू शकतो..
विठ्ठल मंदिराच्या जवळच असणारी राजतूला आणि भगवान शंकराचे मंदिरही आवर्जून पहावे..
एकदा त्याचबरोबर हे सगळ पाहून आणि समजून घ्यावे मग आरामात मनसोक्त फोटो काढत फिरावे.
क्रमशः