पोटभर रुचकर नाष्टा करून तृप्तीचा ढेकर दिला.. आता दुपारी वेळेत जेवायला उशीर झाला तरी चालू शकणार होते.
आमच्या रिक्षा तयार होत्याच, आम्हाला हंपी दर्शन घडवून आणण्यासाठी..
आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही गणपतीच्या दर्शनाने केली..
आमच्या होम स्टेच्या जवळच असलेल्या हेमकूट टेकडीवर
हे गणेश मंदिर आहे..
हंपीचा इतिहास जरी तुम्ही वाचून गेला असलात तरी तिथला लोकल गाईड घ्यावा असं अनुभवाने मी सांगेन..
त्यामुळे होते काय, आपण वाचलेल्यापैकी जे काही पॉइंट्स आपल्याकडून राहून जातात ते एकतर गाईडकडून कव्हर होतात आणि दुसरं म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांचे कमाईचे मुख्य साधन टुरिस्ट हेच आहे.. तर आपण नकळत त्यांना आर्थिक मदतही करत असतो. आम्हीही तिथला ऑफीशियल गाईड बरोबर घेतला.
आता ज्या गणपती मंदिराबाबत मी तुम्हाला सांगणार आहे त्याला स्थानिक लोक "काडवेकलू गणेश" म्हणतात.
"काडवेकलू" याचा अर्थ हरबऱ्याच्या डाळीसारखा दिसणारा. एका बाजूने गोल आणि समोरून चपटा.. या मूर्तीचे पोट हिरे मोत्यांच्या हव्यासापायी त्याकाळी मुघलांनी तोडले या कारणाने ते समोरून चपटे वाटते.
गणेशाची मूर्ती साधारण पंधरा फूट उंच आहे. मूर्तीच्या सभोवताली प्रदक्षिणा घालता येईल असे गर्भगृह आहे.
बाहेरचा मंडप भव्य दगडी खांबांनी तोलून धरला आहे. प्रत्येक खांबावर काल्पनिक प्राणी , पूर्वीच्या काळातील शिकारी स्त्री , रामायणातील व्यक्तिरेखा कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील..
प्रत्येक खांब एका अखंड दगडात बनवलेला आहे.
मंदिराच्या पाठीमागे हेमकूट टेकडी पसरलेली आहे. इथून हंपी आणि विरूपाक्ष मंदिराचा सुंदर नजरा दिसतो..
पहिलेच मंदिर पाहिले, त्याचा इतिहास ऐकला आणि मी हरवून गेले तिथं.
जर माझ्याकडे वेळ असता तर अख्खा दिवस मी एक मंदिर अनुभवत काढला असता.पण सध्यातरी पुढे जायचे होते.
तिथून जवळच असणाऱ्या कृष्ण मंदिराकडे आम्ही निघालो..
कोणतेही साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी शेजारच्या राज्यावर अतिक्रमण किंवा लढाया या ओघानेच आल्या.. विजयनगरच्याही ओडिसा या शेजारील राज्याशी अशा स्वरूपाच्या लढाया होत असतं.
यात ओडीसाच्या सैन्याचा निर्णायक पराभव केल्यावर विजयाचे प्रतीक म्हणून राजा कृष्णदेवराय याने हे कृष्ण मंदिर बांधले..
रिक्षातून उतरून आम्ही मंदिरात जाण्याअगोदर मंदिराच्या समोर असलेल्या पुष्करणी आणि त्या काळच्या बाजारपेठेचे अवशेष पाहिले. या अवशेषांच्या व्याप्तीवरून एकेकाळी ती बाजारपेठ किती समृद्ध असावी याचा अंदाज येतो.पायऱ्यांच्या बाजूलाच एक भली मोठ्ठी दगडी दानपेटी आपले लक्ष वेधून घेते.
कृष्णमंदिरावरील गोपूर वेगवेगळ्या मुर्त्या आणि बारीक नक्षीकाम यांनी सजलेले आहे.. अशी नक्षीकाम केलेली गोपूरे कर्नाटकातील मंदिरांचे वेगळेपण अधोरेखित करतात.
हे सगळ न्याहाळत आपण मंदिराच्या प्रवेश द्वारावर येऊन थबकतो.
या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम काही काळापूर्वी सुरू करण्यात आले होते पण युनिस्कोने ते बंद केले.. कारण जिर्णोद्धार केला तर त्याचं मूळ स्वरूप, वैभव नष्ट होऊ शकते.. अगदी योग्य निर्णय घेतला युनिस्कोने..
इथे इतर देवदेवतां आणि नर्तिका यांच्या अप्रतिम मूर्ती तर कोरल्या आहेतच बरोबरीने भगवान विष्णूंची दहा रूपेही भिंतीवर कोरून काढली आहेत.
कृष्ण मंदिर त्याच्या उत्कृष्ट कोरीव काम आणि मोहक वास्तुशिल्प रचनांसाठी ओळखले जाते.
राजा कृष्णदेवराय हे कला आणि स्थापत्यकलेचे प्रेमी होते आणि त्यांच्या कारकिर्दीत बांधलेली मंदिरे आणि स्मारके त्यांच्या स्थापत्य रचनांसाठी प्रसिद्ध आहेत.
मंदिरातील मुख्य मूर्ती भगवान बालकृष्णाची होती जी राजाने ओडिशा मधून आणली होती. सध्या ती चेन्नई येथील राज्य संग्रहालयात आहे.
मंदिराच्या आवारात अनेक लहानमोठी मंदिरे आहेत. इथेही दगडी खांब आणि त्यावर कोरलेला "व्याल" हा काल्पनिक प्राणी आपले लक्ष वेधून घेतात..
व्याल हा एक काल्पनिक प्राणी असून त्याचे शीर मगरीचे, कान कोल्ह्यासारखे, अंग सिंहासारखे आणि पाय घोड्यासारखे कोरलेले दिसून येतात.. हा बहुतेक त्याकाळच्या सैनिकांचे किंवा राजाचे प्रतीक असावा..
हे मंदिर मुख्य रस्त्याला लागूनच असल्याने सहजगत्या पाहून होते..
गाईड सांगत असलेला इतिहास आणि माहिती ऐकत ऐकत शांतपणे मंदिर आणि त्याचा परिसर पाहून , बाजूलाच असणाऱ्या ' उग्र नरसिंह " मंदिराकडे आम्ही चालत निघालो..
नरसिंह (म्हणजे अर्धा मनुष्य अर्धा सिंह) भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी एक अवतार.
हम्पीतील सर्वात नेत्रदीपक मूर्ती .. अंदाजे वीस फूट उंच असलेली ही मूर्ती मूर्तीकलेला एक अजोड नमुना आहे..
नरसिंह हे शेष नावाच्या सात मुखी नागाच्या वेटोळ्यावर बसले आहेत. नागाने आपला पाच मुखी फणा देवाच्या डोक्यावर धरला आहे..
ही मूर्ती पाहिली की मनात एक अनामिक भीती दाटते.. त्याचे ते दोन बटबटीत डोळे आणि मुखातून बाहेर आलेले दोन सुळे बघितले की थोड्यावेळा पुरता का होईना अंगावर काटा येतो..
उग्र नरसिंह असे या मूर्तीला का म्हणत असतील याची जाणीव होते..
या मूर्तीचे उग्रनरसिंह हे नाव जरी प्रचीलित आहे तरीसुध्दा ही मूर्ती लक्ष्मी नारायणाची आहे ..
मूळ मूर्तीमध्ये देवी लक्ष्मीची प्रतिमा होती, देवाची पत्नी लक्ष्मी त्याच्या मांडीवर बसलेली होती. पण विजयनगरच्या पडझडीला कारणीभूत ठरलेल्या मुघलांच्या हल्ल्यामध्ये या पुतळ्याचे गंभीर नुकसान झाले आहे. त्यांच्या मांडीवर कोरलेल्या लक्ष्मीच्या मूर्तीचा भागही गायब आहे. पण देवीचा हात आणि बोटे नरसिंहाच्या खांद्यावर पाठीमागच्या बाजूने पाहता येतात.. या आवारात जाण्याची संधी मिळाल्यास देवीच्या हाताचे दर्शन घेता येते. तिच्या बोटातील नखे आणि अंगठ्याही अगदी अचूकपणे साकारल्या आहेत.
यामुळेच या मूर्तीला उग्र नरसिंह ऐवजी लक्ष्मी नारायणाची मूर्ती म्हणणं जास्त योग्य ठरेल..
हा पुतळा मानवी मन किती सर्जनशील आणि त्याच वेळी किती विध्वंसक असू शकते हे दर्शवतो..
याच्याच बाजूला एक शिवमंदिर आहे.. मंदिरात सतत पाणी भरलेले असल्याने आत जाता येत नाही.. यातील शिवलिंग महाकाय असे असून एकाच पाषाणात घडविलेले आहे..
एकाहून एक सरस आणि नेत्रदीपक मूर्ती आणि मंदिरे पाहून भारावून जायला होतं..
ही तर नुसती झलक आहे.. अभी तो पिक्चर बाकी हैं!!
क्रमशः