#आसाम_मेघालय भ्रमंती५
शिलाँगमध्ये आमच्या सहलीचे तिन्ही दिवस एम क्राऊन या एकाच हॉटेलात मुक्काम होता त्यामुळे लगेज बरोबर घेऊन फिरण्याचा प्रश्न नव्हता. मात्र आज सकाळी सहा वाजताच बॅग्स भरून खोलीबाहेर ठेवल्या. इथे नाश्ता उरकून आज इथून मुक्काम हलवून आम्ही काझिरंगाकडे प्रयाण करणार होतो.
बरोबर साडेआठ वाजता आमचा हा प्रवास सुरू झाला.संपूर्ण सहलीतला हा सर्वात जास्त अंतराचा प्रवास होता. एकशे ऐंशी किलोमीटरच्या या प्रवासासाठी चार पाच तास सहज लागणार होते. दुपारी लंचसाठी एका ढाब्यावर ब्रेक वगळता सलग प्रवास झाला.काझिरंगा मधील हिरवाईने नटलेले रस्ते आमच्या स्वागतासाठी सज्ज होते.आता आम्ही काझिरंगामधील वन्य प्राण्यांच्या क्षेत्रातून चाललो होतो त्यामुळे ठिकठिकाणी स्पीड गन लावून वाहन वेगावर नियंत्रण आणले होते.रस्त्यावर आडव्या कमानीवर तुम्ही प्राण्यांच्या राज्यातून प्रवास करत आहात आणि त्यांना तुमचा त्रास होऊ नये अशी काळजी घेण्यासाठी वारंवार जाणीव करून दिलेली होती.आज जरी विशेष काही बघायला मिळाले नसले तरी काझिरंगा परिसरातील वातावरण अत्यंत आल्हाददायक असल्याने प्रवास कंटाळवाणा झाला नव्हता.
काझिरंगा परिसरात प्रवेश केल्यानंतर एका ठिकाणी हत्ती, एकदोन हरणे आणि लांबवर एका गव्याने दर्शन देऊन आमचा दिवस कारणी लावला होता.काझिरंगा येथील फॉक्सटेल ऑर्किड रिसॉर्ट येथे आमच्या रूम्स बुक केलेल्या होत्या तेथे पोहोचलो. फ्रेश होऊन चहा घेतला आणि सर्वजण थोडावेळ आराम करायला आपापल्या रूमवर गेले.
इथे मस्त आल्हाददायक थंड वातावरण होते.आज होळीचा दिवस होता त्याचे औचित्य साधून केसरी टूर्स आणि हॉटेलतर्फे रात्री शेकोटी आणि आसाममधील एक लोककला बिहू डान्सचे आयोजन केले होते. आठ साडे आठ वाजता शेकोटी पेटली आणि बिहू डान्स करणारे स्थानिक कलाकार जमा झाले. सुरुवातीला बिहू परंपरेबद्दल अगदी विस्ताराने माहिती देण्यात आली.बिहू डान्स मध्ये वाजवली जाणारी विविध वाद्ये वाजवून त्यांची प्रात्यक्षिके दाखवली गेली. बिहूसाठी स्री आणि पुरुष परिधान करत असलेली वस्रे व विविध मुद्रा यांचा आम्हाला परिचय करून देण्यात आला.प्रत्यक्ष बिहू डान्स सुरू झाला आणि विविध वाद्यांच्या ठेक्यात कलाकारांच्या जोशात आम्ही सगळे हरवून गेलो. त्या कलाकारांसोबत आम्हीही नाचावे असा आग्रह त्यांनी केला आणि आम्ही सर्वांनी त्यांच्याबरोबर फेर धरला.आपले वय पद प्रतिष्ठा विसरून बिहू कलाकारांबरोबर नाचात रमलेले आम्ही सर्वजण, आयुष्यभर लक्षात राहतील असे ते क्षण होते!
नंतर बिहू कलाकारांबरोबर मनसोक्त फोटो सेशन झाले आणि आम्ही हॉटेलात मांडून ठेवलेल्या जेवणावर तुटून पडलो.दुसऱ्या दिवशी तीन वाजता उठून एलिफंट सफारीला जायचे असल्याची जाणीव आमच्या टूर गाईडने करून दिली आणि सर्वजण आपआपल्या रूमवर परतले.
सहलीचा चौथा दिवस पहाटे तीनलाच सुरू झाला आम्ही तयार होऊन गाड्यात बसलो आणि गाड्या एलिफंट सफारी जेथे सुरू होते त्या स्पॉटवर आल्या.सर्वात आधी तेथे पोहोचून आमच्या टूर गाईडने एन्ट्री पास काढून घेतले होते .एका एका हत्तीवर चारजण असे बसवले गेले आणि आमची सफारी सुरू झाली.हत्तीवरच्या त्या ओबडधोबड अंबारीत तोल सावरत बसणे ही आमच्यासाठी सर्कस होती. त्यातून हातात मोबाईल घेऊन फोटो घेणे म्हणजे एक दिव्य होते, पण जमेल तसे फोटो घेतले जंगलातले चढउतार आणि झाडांच्या गर्दीतून व चिखलातून मार्ग काढत हत्ती आम्हाला ही जंगल सफारी घडवत होते.खड्ड्यात उतरताना आणि वर येताना हत्ती अत्यंत जबाबदारीने आमची काळजी घेत होते त्यामुळे पहिले काही क्षण वगळता अजिबात भीती वाटली नाही. जंगलात एकशिंगी रानगव्याचे बऱ्याचदा अगदी जवळून दर्शन झाले.काळवीट व रानगाईंचेही दर्शन झाले.साधारण दीड तास जंगलातून दलदलीतून हत्तीने आम्हाला फिरवून आणले. आयुष्यातला हा एक अविस्मरणीय असा अनुभव होता!
एलिफंट सफारी संपवून आम्ही परत हॉटेलवर आलो तर हॉटेलच्या गार्डनमध्ये होळी खेळण्याची तयारी झालेली होती.या सहलीच्या निमित्ताने वेगवेगळया ठिकाणाहून आलेले आम्ही,एकमेकांना रंग लावून आपली पारंपारिक होळी साजरी केली. रूमवर जाऊन फ्रेश होऊन लगेज पुन्हा बाहेर ठेवले आणि नाष्टा घेतला.नाश्ता होईपर्यंत आमच्या बॅगा गाड्यात पोहोचल्या होत्या.
दुपारी आम्ही काझिरंगा नॅशनल ऑर्किड अँड बायोडायव्हरसि पार्कला भेट दिली.ईशान्य भारतात आढलणाऱ्या ऑर्किड फुलाच्या सहाशेपेक्षा जास्त विविध प्रजाती इथे बघायला मिळतात.तिथल्या स्टाफने ऑर्किडसबद्दल छान माहिती दिली.याच आवारात विविध औषधी वनस्पती, तांदळाच्या विविध जाती, स्थानिक फळे आणि फुले,बांबूचे प्रकार इत्यादींची वेगळी माहितीपूर्ण संग्रहालये पाहणे हा उत्तम अनुभव होता.इथेही स्थानिक आदिवासी नृत्ये सादर केली जात होती...
त्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबलो .या हॉटेलमध्ये विविधरंगी फुलांची बाग सजवलेली होती.जेवण झाल्यावर सर्वजण या बागेत फोटो घेण्यात मग्न झाले होते...
दुपारनंतर आम्ही जीप सफारीसाठी सज्ज झालो.उघड्या जीपमधून जंगलातल्या ओबडधोबड धुळीच्या रस्त्यांवरून तब्बल तीस पस्तीस किलोमीटर प्रवासाची ही जीप सफारी निश्चितच थ्रीलिंग होती पण दुपारची वेळ आणि प्रखर उन्हामुळे दोन तीन गवे, काही हरणे, रानटी म्हशींचा कळप आणि काही दुर्मिळ पक्षी सोडले तर फार काही बघायला मिळाले नाही. धुळीने माखलेले ओबडधोबड रस्ते आणि उन्हाचा तडाखा यामुळे आम्हा शहरी पर्यटकांना जीप सफारी केव्हा एकदा संपते असे झाले होते...
जीप सफारी संपवून आम्ही आज मुक्काम असलेल्या "सुमित ग्रीन व्हीलेज अँड स्पा" या हॉटेलवर पोहोचलो. रूम ताब्यात घेईपर्यंत बाहेरच्या बागेत गरमागरम पकोडे आणि चहा आला होता. चहा घेऊन रूममध्ये थोडावेळ आराम झाला. पुन्हा सर्वजण बाहेर जमले.सदस्यांनी सादर केलेली गाणी,कविता,चारोळ्या,गप्पा याबरोबरच पुस्तक परिचय अशी विविधरंगी महफील रंगली.
हॉटेलच्या Kholong नावाच्या रेस्टॉरंटमध्ये डिनर झाले....दिवसभरात सगळे थकले होते आता आराम करणे आवश्यक झाले होते...
(क्रमशः)
©प्रल्हाद दुधाळ.