Yeva konkan aaploch asa - 6 in Marathi Travel stories by Dr.Swati More books and stories PDF | येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ६

Featured Books
Categories
Share

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ६




भराडी देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही रूमवर आलो.. आर्या आणि अनिलही नुकतेच स्कुबा डायव्हिंग करून पोहचले होते..

दोघांनीही स्कुबा डायव्हिंगचा मनसोक्त आस्वाद घेतला होता.. इथे स्कुबा डायव्हिंग इतर ठिकाणापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त आहे.. सहाशे रुपये माणशी घेतात.. त्यातच आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करून मिळतं.. सिंधूदुर्ग किल्ल्याच्या जवळ जे स्कुबा डायव्हिंग करतात तिथं करावं असा मी सल्ला देईन.. कारण अगोदरच्या वेळी आम्ही देवबागला केलं होत तिथं आमच्या पैकी काहींना त्रास झाला..( त्रास म्हणजे समुद्राच्या बरच आत बोट जेंव्हा उभी राहते आणि एकेक करून माणसं स्कुबा डायव्हिंग साठी जात असतात.. आम्ही जी लोकं बोटीत होतो त्यांना सतत वाऱ्याने हलणाऱ्या बोटीमुळे उलटी- मळमळ, चक्कर सारखं वाटत होतं.. सिंधूदुर्गच्या इथं किल्ल्यामुळे वारा अडला जातो आणि बोट हिंदकळत नाही आणि त्यामुळे इथं हा त्रास होत नाही)

आता सगळ्यांना कडकडून भूक लागली होती. शिवकृपा हॉटेलमध्ये जाऊन क्षुधा शांती केली.

आज संध्याकाळ खूप खास असणार होती.. एकतर आम्ही 'त्सुनामी बेट' बघायला जाणार होतो आणि त्यानंतर मालवणच्या बाजार पेठेत जाऊन मालवणच्या जत्रेचा आनंद लुटणार होतो..

कर्ली नदी मालवणच्या टोकाला, जेथे अरबी समुद्राला मिळते तेथे देवबाग जवळ त्सुनामी बेट आहे. खर तर हे बेट पूर्वी पासूनच या ठिकाणी आहे. स्थानिक लोक याला “भाट” असं म्हणायचे. पण २००४ मध्ये आलेल्या त्सुनामी मुळे समुद्राच्या पाण्याबरोबर बरीच वाळू सुद्धा खाडी पात्रात आली. त्सुनामीचं पाणी हळू हळू कमी झालं, पण वाळूच्या परतीच्या मार्गात मोठे मोठे खडक असल्यामुळे ती वाळू समुद्रात न जाता या बेटावरच राहिली.

त्यामुळे आता या बेटाला आता 'त्सुनामी आयलंड' म्हणतात या बेटावर बोटीने जावं लागते. देवबाग, भोगावे, निवती या बीचेस वरून येथे पोहोचता येते, पण देवबाग वरून जास्त आणि सतत बोटी असतात. म्हणून देवबाग हा उत्तम पर्याय..

इथे तुम्हाला सर्व प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स करायला मिळतात..
आम्ही 2016 ला जेंव्हा या बेटा ला भेट दिली होती तेंव्हाचे बेट आणि आताचे बेट यात जमीन आसमानाचा फरक जाणवला..

सागरी वादळंमुळे दरम्यानच्या काळात बेटावरील बऱ्यापैकी रेती वाहून गेली आहे ... बेटावर आता दलदल माजली आहे..
आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की अगोदरचे ते त्सुनामी बेट आम्ही बघितले आहे..

तास दोन तास बेटावर मुलांनी मजा केली.. तिथूनच सूर्यास्त बघून आम्ही मालवण बाजारपेठत जत्रेचा आनंद घेण्यासाठी दाखल झालो..


मालवण शहराला ऐतिहासिक आणि शिवकालीन परंपरा लाभलेली आहे. येथील प्रत्येक सण-उत्सव जणू शिवकालीन परंपरेच्या धाग्याने जोडला गेला आहे.

या उत्सवांपैकी प्रमुख सोहळा म्हणजे श्री देव रामेश्वर-नारायण पालखी उत्सव. मालवणचे ग्रामदैवता श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक ऐतिहासिक पालखी प्रदक्षिणा सोहळा दीपावली पाडव्या दिवशी साजरा होत असतो. या सोहळ्याला शिवकालीन परंपरा लाभली असून ३५० वर्षापासून पालखी उत्सव गुण्या गोविंदाने साजरा केला जातो.

भावंडाच्या भेटीसाठी निघालेल्या हजारो मालवणवासीय भक्तांसाठी रामेश्वर-नारायण देवता आपले राऊळ (मंदिर) सोडून धावून येतात. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने होणाऱ्या या सोहळ्यात मालवणसह जिल्हावासीयही सहभागी होतात. शेकडो वर्षापासून सुरु असणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याची भव्यता दरवर्षी वाढत असताना भक्तांची मांदियाळी रामेश्वराच्या भेटीला एकत्र येते. अन उत्सवाच्या निमित्ताने मित्र-आप्तेष्टांच्या भेटीबरोबरच लाखोंची उलाढाल मालवणच्या बाजारपेठेत केली जाते. अन् आशिर्वादाबरोबरच लक्ष्मीची पावले घेऊन येणाऱ्या देव रामेश्वर-नारायण यांच्या पालखी उत्सवातच मालवणकरांची दिवाळी खऱ्या अर्थाने दीपोत्सव म्हणून साजरी होते. आपली मंदिरे सोडून पालखीत बसून समुद्रीमार्गे निघणारी ही दोन्ही देवता मार्गक्रमणेवरील मंदिरात जाऊन आपल्या बहिण-भावांनाही भेटी देतात. ठिकठिकाणी देवतांचे स्वागतही प्रत्येक मालवणवासीय सडा-रांगोळी आणि पुष्पवृष्टीने करतो.

देवस्थान मानकरी व भाविक यांच्या मेळ्यांबरोबरच ढोल-ताशाच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी अशा उत्सवातील आनंद सोहळ्यात शेकडो मालवणवासीय न्हाऊन निघतो.

आम्ही गेलो तेंव्हा भरड नाक्यापासून वाहनांसाठी रस्ता बंद केला होता..
त्या संपूर्ण रस्त्यावर दोन्हीं बाजूला खाण्यापिण्याचे , मालवणी स्पेशल जिन्नस, खेळणी आणि वेगवेगळे इतिहासकालीन देखावे उभे केले होते...

तिथली लोकांची गर्दी पाहता संपूर्ण मालवण आज इथेच अवतरले आहे का असं वाटत होतं..

स्त्री, पुरुष, मुलं नटून थटून जत्रेचा आनंद घेत होती.. तिथला प्रत्येक दुकानदार हात जोडून ग्राहकांचे स्वागत करत होता..

आम्हीही थोडी फार खरेदी केली.. जत्रेचा आनंद लुटता लुटता वेळ कसा गेला समजलेच नाही..

दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला परत निघायचे असल्याने नाईलाजाने आम्ही रिक्षा पकडुन रूमवर आलो..

सकाळी जरा आरामातच उठलो सर्वजण..

पोरं उठली आणि सरळ समुद्रात डुंबायला पळाली... समुद्रात डुंबायची मजाच काही और असते.. काही न करता नुसतं उभ राहील तरी त्याच्या प्रत्येक लाटेबरोबर आपण मनसोक्त भिजत असतो.. पायाला स्पर्श करणारी मऊ वाळू आणि लाट परत जाताना पायाखालून सरकलेली वाळू.. याचा अनुभव तर घ्यावाच एकदा..

खरं तर माझा पाय इथून अजिबात निघत नव्हता..मन जरासं खट्टू होतं.नाईलाजानेच सागराचा आणि मालवणचा निरोप घेतला..

माझ्या मित्राला पुन्हा लवकरच भेटू हे मनातून आश्वासन देत..

यावेळी कुडाळ स्टेशन ला परत जाताना एक वेगळा अनुभव घेण्यासाठी आम्ही रिक्षा ऐवजी लाल परीने चा पर्याय निवडला...

तासाभरात ही परी आपल्याला कुडाळ स्टेशनला पोहचवते..

जाताना वाटेत धामापूर असा फलक वाचला.. सुनीता देशपांडे यांची आठवण आली.. त्यांच्या आहे मनोहर तरी या पुस्तकात 'धामापूर तलाव' आणि 'धामापूरची आज्जी' याबद्दल वाचलं होत.. पुरेसा वेळ नसल्या कारणाने मनात असूनही तिथं भेट देता आली नाही..

या तीन दिवसाच्या भेटीत मालवण वासियांनी भरभरून प्रेम दिलं.. तो प्रेमाचा अनमोल साठा बरोबर घेऊन आम्ही मुंबईला परत आलो..