प्रकरण ९
दुपारी साडे तीन ला सौम्या ने पाणिनी च्या केबिन मधे आलेला रिसेप्शनिस्ट चा फोन उचलला.
“ क्षिती बाहेर आल्ये.”
“बोलव तिला आत,सौम्या.”
आत आल्यावर क्षिती हसून पाणिनी ला म्हणाली, “राजे साहेबांनी सांगितलं की तुम्ही मला भेटायला सांगितलंय म्हणून. काय झालंय अचानक?”
“ मी आणि कनक ओजस एक छोटी ट्रीप करून आलो आत्ता.” पाणिनी म्हणाला.
“ आपल्या प्रकरणा संदर्भात?”
“ अर्थात.”
“ काय प्रगती झाल्ये , काही नवीन बातमी समजल्ये?”
“ त्या आधी मला, काही प्रश्न विचारायचे आहेत तुला.” पाणिनी म्हणाला.
तिने संमती दर्शक मान हलवली.
“ आज तुझं आत्याशी बोलणं झालंय?”
तिने मान हलवून नाही म्हणून सांगितलं.
“ तुझ्या आत्या बद्दल तू काही ऐकलं आहेस आज?”
“ आत्या बद्दल ऐकलंय का?... म्हणजे, पटवर्धन सर? मला समजायला हवं होतं असं काही आहे का... पण समजलं नाही असं काही घडलय?” क्षिती ने घाबरून विचारलं.
“ कोणीतरी अज्ञात व्यक्ती ने तिच्यावर काल रात्री हल्ला केलाय. तिच्या डोक्यात पाच सेल ची मोठी टॉर्च मारण्यात आल्ये.”
“पाच सेल ची मोठी टॉर्च !! बापरे ती तर माझी आहे. ” क्षिती उद्गारली.
पाणिनी ने तिच्या कडे गंभीर पणे पाहिलं.
“ पटवर्धन सर तिची तब्येत कशी आहे?फार लागलंय का हो तिला? मी भेटायला जाते तिला.ती घरी आहे की हॉस्पिटल मधे?”
“हॉस्पिटल मधे, मला समजलेल्या माहिती नुसार ती कोमात आहे. गेले काही तास.तिच्या मेंदूत गाठ तयार झाल्ये,आणि ती धोकादायक आहे.”
क्षिती विस्फारलेल्या डोळ्यांनी पाणिनी कडे पहात राहिली.
“ तू शेवटचं कधी बघितलंस तिला?” पाणिनी न विचारलं
“ का? असं का विचारताय? तुम्हाला माहित्ये ना , मी घर सोडलं तेव्हाच. तुम्हीच मला हॉटेल मधे जागा घेऊन दिलीत ना?”
पाणिनी ने ठाम पणे मान हलवली. “ आम्ही ते केलं, नक्कीच ,पण आम्ही गेल्यावर तू परत आत्याच्या घरी गेलीस.”
“ त...तु...म्हा...ला कसं कळलं? पाठलाग केलात माझा?”-क्षिती
“ तुझ्या पायात आता जे बूट आहेत ते आत्याच्या घरून तुझं समान आणलं तेव्हा आणले गेले नव्हते.तुला ते हवे होते. तू तसं सौम्या ला बोलून दाखवलं होतंस. आणि लगेच नंतर असू दे राहिले तर मी चालवून घेईन असं म्हणाली होतीस.आठवतं? ते मधुरा आत्या कडे विसरलेले बूट तू आणल्या शिवाय आता तुझ्या पायात कसे आले? याचाच अर्थ तू आत्याकडे गेली होतीस पुन्हा. आता प्रश्न एवढंच आहे की कधी गेलीस? आदल्या रात्री की दुसऱ्या दिवशी लौकर?” पाणिनी न विचारलं
“ मी...मी. रात्री उशिरा... पटवर्धन सर भयानक आहे हे !”
“ बरं, रात्री उशिरा म्हणजे किती उशिरा?”
“ तुम्ही मला हॉटेल मधे सोडून गेल्यावर दोन तासांनी. मला झोप लागत नव्हती. मी विचार केला की वेट्रेस च्या कामासाठी मला ते बूट लागणारच होते.माझ्या कडे तिच्या घराची किल्ली आहे तर आपण का आणू नयेत ते बूट. घरात गेल्यावर काही मिनिटांत आपण ते आणू शकू,आत्या झोपलेली असेल, तिला कळणार पण नाही.”
“ मला ती किल्ली दे क्षिती.” पाणिनी म्हणाला.
तिने पर्स मधून किल्ली काढून पाणिनी च्या हातात ठेवली.
“ मला आता सविस्तर सांग, काय केलंस तू?” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही मला खर्चासाठी दिलेल्या पैशातील काही रक्कम मी घेतली आणि टॅक्सी केली. टॅक्सी ला मी आत्याच्या घरा बाहेर उभी करून , घराच्या दाराजवळ गेले,माझ्या कडच्या किल्ली ने दार उघडलं.आत गेले.सर्व शांत होतं. अंधार होता. मी पायातले बूट काढले , वरच्या मजल्यावर गेले.कोणताही आवाज येत नव्हता.”
“ अंधारात, दिसण्यासाठी काय केलंस? उजेडाची व्यवस्था काय केलीस?” पाणिनी न विचारलं
“ कोरीडोर मधून मी अंधारातूनच गेले.माझ्या खोलीत गेल्यावर दिवा लावला.मला हवे होते ते बूट, काही कपडे, आणि मला लागणाऱ्या वस्तू घेऊन, दिवा बंद करून मी घरा बाहेर पडले. हे सगळ करायला दोन तीन मिनिटापेक्षा जास्त वेळ नसेल लागला.”
“ तू म्हणतेस की ती बॅटरी तुझी आहे?”
“ हो.म्हणजे मी आत्याच्या घरी रहायला जाण्या आधी माझ्या खोलीत ती बॅटरी होती. मी फक्त त्यातले सेल बदलून नवे पाच सेल घातले.आधीचे खराब झाले म्हणून. मी सकाळी आत्याच्या आधी उठले किंवा रात्री उठले तर कोरीडोर चा दिवा लाऊन आत्याला डिस्टर्ब न करता मी वावरू शकत असे. ”-क्षिती
अचानक दार उघडलं आणि इन्स्पे.तारकर आत आला.आला म्हणजे आत घुसलाच !
“ हाय, पाणिनी, हाय सौम्या ! ” तारकर म्हणाला.
कनक , सौम्या, आणि पाणिनी खास मित्र होते. वर्ग मित्र.एकमेकांना काहीही बोलू शकत होते,एकमेकांसाठी कधीही काहीहीकरू शकत होते. कनक गुप्त हेर झाला,पाणिनी च्याच मजल्यावर त्याने ऑफिस थाटले. इन्स्पे.तारकर हा त्यांच्याच बरोबरचा खास मित्र.पण तो पोलीस झाला. अनेकदा तो आणि पाणिनी एकमेकांच्या विरुध्द उभे ठाकले पण मैत्री आणि व्यवसाय ,यात त्यांनी कधी गल्लत केली नाही.मैत्रीत कधीच गैरसमजाला थारा दिला नाही.
“ माफ कर पाणिनी, असा आत घुसलो, तुझ्या ऑफिस च्या फॉर्मॅलिटी न पाळता. काय आहे ना पाणिनी, आम्हाला पगार मिळतो तो तुमच्या सारख्या टॅक्स भरणाऱ्या अनेक सज्जन माणसांच्या उत्पन्नामुळे .आता तुम्हा लोकांची अशी अपेक्षा नसणारच की तारकर ने आपल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी एखाद्याच्या ऑफिस च्या बाहेर थांबावे आणि थंड एअर कंडीशन ची हवा खात बसावे, दरम्यान गुन्हेगाराच्या वकीलाला आपल्या अशिलाला पढवून ठेवण्यासाठी वेळ द्यावा ! ”
पाणिनी त्याच्या बडबडीकडे पहात राहिला.
“ तर मग पाणिनी, नमनाला घडाभर तेल आणखी वाया न घालवता सांगतो की तुझ्या अशिलाला ,क्षिती ला पकडण्यासाठी माझ्याकडे वॉरंट आहे. आणि मिस क्षिती अलूरकर, तुला मी सांगू इच्छितो, की तुला अटक करायला मी इथे आलोय, तू कोणतेही विधानं करायची गरज आहे असं नाही, पण जर काही बोललीस तर त्याचा वापर आम्ही तुझ्या विरुध्द करू शकतो. तू तुझ्या वतीने वकील नेमू शकतेस. ”-तारकर म्हणाला.
“ तिच्या विरुद्धच्या आरोपाचं स्वरूप?” पाणिनी न विचारलं
“ खून करायच्या उद्देशाने केलेला हल्ला. अत्ता तरी हे स्वरूप आहे,ते पुढे खुनाचा आरोप असे बदलू शकतं.”-तारकर
क्षिती विस्फारलेल्या नजरेने तारकर कडे बघत राहिली.
“ मधुरा महाजन ची तब्येत अजूनच खालावली आहे.शेवटच्या घटका मोजत्ये ती.”-तारकर
“मी...पण...” क्षिती बोलायचं प्रयत्न करत म्हणाली.
“ तू काहीही बोलणार नाहीस.त्याच्या कुठल्याही प्रश्नाला तू उत्तर देऊ नकोस, अपवाद फक्त मी सांगेन तेव्हा.ही खूप गंभीर घटना आहे आणि काही गोष्टींबाबत तू मौन बाळगणं हेच हिताचं आहे.”
“ती काल रात्री टॅक्सी ने मधुरा महाजन च्या घरी गेली होती हे आम्हाला समजलंय” उत्साहाने तारकर म्हणाला. “ तिने बाहेर टॅक्सी थांबवली होती, त्या ड्रायव्हर ने टॅक्सी चे इंजिन सुध्दा बंद केले नाही. त्या आवाजाने त्रस्त झालेल्या शेजाऱ्याने टॅक्सी चा नंबर टिपून ठेवला होता.त्या नंबर वरून आम्ही टॅक्सी शोधून काढली.त्या ड्रायव्हरला आठवतय, त्याने एका तरुणीला एका हॉटेल मधून त्या घरी नेल्याचं, तो म्हणतो की तिनेच सांगितलं होत की टॅक्सी सोडणार नाही मी लगेच येणार आहे ,दोन मिनिटात. आणि खरंच ती सात मिनिटात तिच्या हातात काही वस्तू घेऊन आली. हे सर्व मध्यरात्री नंतर लगेचच घडलं, आणि त्याच सुमाराला मधुर महाजन वर हल्ला झालाय.”
पाणिनी बोलणार होता तेवढ्यात तारकर म्हणाला, “ मी तुला हे एवढंच सांगू शकतो.आणि हे उद्या हे सर्व पेपरात येणारच आहे.या प्रकरणावर परिणाम करणाऱ्या इतर मुद्द्यांबाबत मी काही सांगणार नाही.” –तारकर
“ तर मग मिस महाजन,तुम्हाला आता माझ्या बरोबर पोलीस स्टेशन ला यावं लागेल. काही प्रोसिजर पूर्ण करावी लागेल.त्याला इलाज नाही, पण त्यात तुम्हाला कमीत कमी त्रास होईल असे मी पाहीन.तुम्हाला मी बेड्या घालून नेणार नाही,आणि उगाचच लोकांसमोर प्रदर्शन होईल असं मी करणार नाही.पण काय आहे ना, पोलीस स्टेशनात पत्रकार येतीलच, त्यांच्या समोर कसं वाग याचा तुला एक सल्ला देतो, तुझा चेहेरा लपवू नकोस त्यांच्या पासून.बिनधास्त पणे त्यांच्या नजरेला नजर दे.ताठ मानेने वाग. तुझा वकील या नात्याने पाणिनी सुध्दा हाच सल्ला देईल तुला. बरोबर आहे ना पाणिनी? ” तारकर म्हणाला.
“ मी आणखी एक सल्ला देईन, मगाशी सांगितल्या नुसार, एकही शब्द बोलू नकोस. तुझे शत्रू तुला अडकवायला टपलेत लक्षात ठेव. तुला तुझं नाव जरी विचारलं कोणी तरी तू बोलायचं नाहीस.झेपेल तुला हे सर्व? अजून बऱ्याच घटना घडणार आहेत पुढच्या काही तासात. मी आहेच तुझ्या मदतीला.” पाणिनी म्हणाला. आणि तिला खांद्यावर थोपटल्या सारखं केलं.
( प्रकरण ९ समाप्त)