Ti Kaalratra - 2 in Marathi Horror Stories by तुषार खांबल books and stories PDF | ती काळरात्र - भाग 2

Featured Books
Categories
Share

ती काळरात्र - भाग 2

ती काळरात्र - भाग २
शब्दांकन : तुषार खांबल

अतिशय कमी वयातच रुपेशने स्वतःच्या हिंमतीवर अमाप प्रसिद्धी आणि पैसा कमावला. रेवती देखील तिच्या या आयुष्यात आनंदी होती. बंगले, गाड्या, नोकर सर्व काही होत. थोडक्यात काय तर सुख पायाशी लोळण घेत होत. दोघांनाही दुःख फक्त एकाच गोष्टीच होत ते म्हणजे संतती.

लग्नाला बारा वर्षे उलटून गेली होती. पण घरात अजून काही पाळणा हलला नव्हता. पैश्याने श्रीमंत होते म्हणून लोक समोरून बोलत नसत. परंतु पाठीमागे सर्वांची कुजबुज चालत असे. सर्व तपासण्या करून झाल्या होत्या. सर्व इलाज करून झाले. देव-नवस पण झाले. परंतु पदरी मात्र निराशा. या निराशेमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी दोघांनीही स्वतःला कामात झोकून दिलं होत खरं, पण मनाला कसं समजावता येणार होत. कोणी काहीही सांगितलं तरी दोघे मागचा पुढचा विचार न करता सर्व उपाय करत होते. कधी तरी आपली कूस उजवेल या अपेक्षेवर दोघे एकमेकांना साथ देत होते.

या त्रासलेल्या मनाला थोडासा विसावा मिळावा म्हणून दोघांनी काही दिवस कुठेतरी बाहेर फिरून येण्याचा बेत आखला. तसे तर दोघे बहुतेक देश फिरून आले होते. म्हणून यंदा कुठे लांब ना जाता जवळच कुठेतरी जाण्याचा निर्णय घेतला.

गुगलवर सर्च करताना त्यांना भुरळ घातली ती कोकणातल्या किनारपट्टीने. निळाशार समुद्र, स्वच्छ किनारपट्टी, सफेद वाळू, नारळी फोफळीच्या बागा, असं अजून बरंच काही. यापूर्वीही अनेकदा ते कोकणात जाऊन आले होते. पण यावेळी तिथला झालेला विकास त्यांना अधिक भावला होता. शेवटी त्यांनी कोकणात फिरून येण्याचा निर्णय घेतला.

दरवेळीप्रमाणे यावेळी आरामदायी प्रवास करण्यापेक्षा लोकल प्रवास करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार रेवतीने सर्व बुकिंग केली. ट्रेन, हॉटेल्स, तिकडे फिरण्यासाठी टुरिस्ट कार इत्यादींची बुकिंग झाल्यावर त्यांनी जाण्याची तयारी सुरु केली. ४ दिवसांनंतर ते प्रवासाला निघणार होते. रुपेशने इकडे ऑफिसमध्ये सर्व स्टाफला त्यांची कामे वाटून आणि समजावून दिली. या सर्व गडबडीत चार दिवस कसे निघून गेले ते त्यांनाच समजले नाही. आणि अखेर ठरल्या दिवशी ड्रायव्हरने त्यांना पनवेलला सोडले. तिकडून रात्रीची कोकणकन्या ट्रेन पकडून ते पुढच्या प्रवासाला निघाले.

आलिशान कार मधून फिरणाऱ्या त्या दोघांसाठी हा अनुभव काहीसा वेगळा होता. गच्च भरलेल्या ट्रेन मध्ये शिरकाव करणाऱ्या प्रवाश्यांची धडपड, प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ आणि पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांच्या विविध तऱ्हा, प्रवासाला जाणाऱ्यांची आणि त्यांना सोडायला आलेल्यांची संभाषणे आणि खूप काही. त्यांची तिकीट हि फर्स्टक्लास एसीची होती. समोर आलेल्या त्यांच्या बोगीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आणि काही क्षणातच ट्रेन पुढील प्रवासाला निघाली.

नुकतीच दिवाळी सरली होती. हवेत थंडीचा जोर हळूहळू वाढू लागला होता. एसी कोच असल्याने बाहेरील थंडीचा प्रभाव आत जाणवत नव्हता. थोड्या वेळातच ते दोघे झोपी गेले. पहाटे ७:०० वाजता रुपेशला जाग आली. खिडकीतून त्याने बाहेर डोकावले. सर्वत्र हिरवळ आणि त्यावर पसरलेली धुक्याची चादर हे मनमोहक दृश्य त्याच्या मनाला एक सुखद आनंद देऊन गेले. त्याने लगेचच रेवतीला उठवले आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात ते दृश्य साठवून ठेवू लागला. जसजशी ट्रेन पुढे सरकत होती. तसतशी अशी अनेक दृश्य त्यांच्या नजरेस पडत होती. दोघेही ह्या सुखाचा मनमुराद आनंद घेत होते.

ट्रेन आता कुडाळ स्टेशनला पोचली. तसे ते खाली उतरले. बाहेर रिक्षाच्या रांगा लागल्या होत्या. प्रवासी आणि रिक्षावाले यांच्यात भाडे आकारणीवरून भावतोल सुरु होता. त्यांनी आधीच कारचे बुकिंग केले होते त्यामुळे त्यांनी कारच्या ड्रायव्हरला फोन केला तसा तो लगेच त्यांच्या समोर हजर झाला. तो देखील त्यांचीच वाट बघत होता. स्मितहास्य करून ड्रायव्हरने त्यांचे स्वागत केले. रुपेशने त्याला त्याचे नाव विचारले तर त्याने त्याचे नाव हर्षल आहे आणि तो याच गावात राहतो असे सांगितले. तसेच तो ह्या संपूर्ण प्रवासात त्यांच्या सोबतच असणार होता. हर्षल पुढे होऊन त्यांच्या बॅग उचलू लागला तसे दोघांनी त्याला नको म्हणून सांगितले. कार स्टेशनच्या समोरच उभी होती. हर्षल दोघांना घेऊन कार जवळ गेला. त्याने दरवाजा उघडून दोघांना आत बसण्यास सांगितले. त्यांचे सामान मागे ठेवून तो आपल्या जागेवर येऊन बसला.

गावातील असून देखील गाडीमध्ये बऱ्याच सुविधा होत्या. हर्षलने गाडीतील गणपतीला नमस्कार करून गाडी सुरु केली. तो अतिशय व्यवस्थित गाडी चालवत होता. सोबतच त्यांना थोडीथोडी गावातील माहिती देखील देत होता. २०-२५ मिनिटात ते त्यांनी बुक केले असलेल्या हॉटेलपाशी येऊन पोहचले. छोटेखानी असले तरी पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अश्या सुखसुविधा त्या हॉटलमध्ये होत्या. रुपेश आणि रेवतीनी आपले सामान घेतले आणि रिसेप्शन वर आले. काउंटरवरील स्टाफने त्यांना त्यांच्या रूमची चावी दिली आणि तेथील एका मुलाला त्यांचे सामान त्यांच्या रूमवर सोडण्यास सांगितले. रुपेशने हर्षलला आजच्या दिवसाच्या वेळापत्रकाविषयी विचारणा केली. त्यावर हर्षलने त्यांचे आजचे दुपारचे जेवण हॉटेलमध्येच असेल आणि संध्याकाळी काही स्थानिक प्रसिद्ध स्थळे फिरवून पुन्हा हॉटेलवर यायचे असे सांगितले.

रुपेश आणि रेवती आता आपल्या रूम मध्ये आले. हॉटेलने त्यांची रूम सुंदररित्या सजवली होती. आपले सामान व्यवस्थित ठेऊन रेवती फ्रेश होण्यास गेली. तोवर रुपेशने फोन करून नाश्ता आणि कॉफीची ऑर्डर दिली आणि तो टीव्ही पाहू लागला. रेवती बाहेर आल्यावर रुपेश फ्रेश होण्यास गेला. तो बाहेर येईपर्यंत वेटरने कॉफी आणि नाश्ता आणून ठेवला होता. नाश्ता करून झाल्यावर दोघांनी थोडा आराम केला. अखेर प्रवास करून दोघेही दमले होते. दुपारी हॉटेलच्या डायनींग हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती. लज्जतदार जेवणासोबत पारंपरिक मालवणी पदार्थांची मेजवानी देखील होती. दोघांनी मनसोक्त जेवणाचा आनंद लुटला आणि आपली रूममध्ये जाऊन झोपी गेले.

संध्याकाळी हर्षलच्या फोनने त्यांना जाग आली. तो बाहेर त्यांची वाट बघत होता. दोघांनी पटापट आवरून घेतले आणि हर्षलसोबत जाण्यास निघाले. हर्षलने त्यांना जवळील समुद्रकिनारा, मंडई, माळरान इत्यादी जागी फिरवून पुन्हा हॉटेलला आणून सोडले. आता तो उद्या सकाळी ९:०० वाजता पुन्हा त्यांना नेण्यासाठी येणार होता. हॉटेलमध्ये आल्यावर दोघांनी आपले जेवण आपल्या रूमवरच उरकले आणि उद्याच्या दिवसाची स्वप्ने रंगवत झोपी गेले.