mrunmayichi dayri in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मृण्मयीची डायरी

Featured Books
Categories
Share

मृण्मयीची डायरी

नमस्कार

वाचकांसाठी यावेळी मी वेगळ्या विषयावर कथा मालिका घेऊन आले आहे. हा वेगळा विषय वाचकांना आवडेल अशी आशा करते.माझं लिखाण आवडत असेल तर नक्की तुमच्या ओळखीच्या लोकांना पाठवा ही विनंती

धन्यवाद.

##मीनाक्षी वैद्य.





मृण्मयीची डायरी. भाग १ला



मृण्मयीला जाऊन पंधरा दिवस झाले होते तरी घरात सगळ्यांना तिची प्रकर्षानी आठवण येत होती. मृण्मयी हयात असताना एवढी आठवण आपल्याला कधीच कशी आली नाही याचं वैजू ला आश्चर्य वाटलं.


मृण्मयी खूपच संवेदनशील मनाची होती. हेही घरच्यांना माहिती नव्हतं तिच्यावर अनेक घातक प्रसंग आले.पण घरच्यांना ते कधीच कळले नाही.


ते सहन करताना ती बोलणच विसरली. याचीपण घरात कोणाकडून दखल घेतल्या गेली नाही. घरच्यांना यत् किंचीत ही तिच्यावर आलेल्या प्रसंगांची माहीती नव्हती. कशी असणार?


ती तशीही मितभाषी होती. स्वतःला व्यक्त करणं तिला जमत नसे. शेवटी शेवटी काही वर्ष ती व्यक्त व्हायची पण स्वतःशीच. तेच तिचं वागणं घरात सगळ्यांना खटकू लागलं.


तिच्या अश्या असंबद्ध बडबडण्याची घरातल्यांना काहीच तर्कसंगती लागतं नव्हती. त्यामुळे निष्कर्ष तरी काय काढणार?


वैजू मृण्मयीची मोठी बहीण होती.तिला आज तिची खूपच आठवण येऊ लागली तशी ती मृण्मयीच्या खोलीत गेली.जाऊन तिच्या पलंगावर बसली आणि पलंगावरच्या चादरीवर हळूवार हात फिरवू लागली.हात फिरवता फिरवता मृण्मयीच्या आठवणींनी कधी वैजूचे डोळे पाझरायला लागले तिचं तिलाच कळलं नाही.


थोड्या वेळानी वैजूनी मृण्मयीचं कपाट उघडलं. त्यातील प्रत्येक ड्रेसमध्ये तिची आठवण होती.त्या कपड्यांना तिचा स्पर्श झाला होता.तो स्पर्श वैजू त्या कपड्यांमध्ये शोधत होती.शोधता शोधता कपड्यांवर तिनी फवारलेला सेंट दरवळला. इतके दिवस होऊनही त्या सेंटचा वास त्या कपड्यांनी अजून जपून ठेवला होता.


तोच सेंटचा वास वैजू मुक्तपणे हुंगत होती. त्याबरोबर मृण्मयी बरोबर घालवलेले अनेक दिवस, त्या दिवसांच्या आठवणी मोत्यांचा सर ओघळून अंगभर मोती घरंगळावेत तशाच त्या आठवणी वैजूच्या मनावर घरंगळून विसावल्या.


मृण्मयीच्या टेबलाकडे वैजूची नजर गेली.तशी चटकन तिनी त्यांचं ड्राॅवर उघडलं.त्यात तिला मृण्मयी ची डायरी सापडली.

वैजूनी थरथरत्या हातांनी ती डायरी उघडली.मृण्मयीला डायरी लिहीण्याची सवय होती हे तिला आत्ताच तिची डायरी बघून कळलं. डायरीवर किती छान पांढ-या शुभ्र सश्याचं चित्र होतं.


त्या चित्रावरुन हात फिरवताना वैजू स्वतःशीच बोलली "मृण्मयी या सशासारखीच कोमल होती, मनानी हळवी होती,भीत्री होती.


तिनी कधीच कोणालाच दुखावलं नाही. तिच्याजवळ कोमल शब्दच होते. कठोरता हा गूणच नव्हता तिच्याकडे पण आयुष्यात असं तिनी काय बघीतले की ही हळवी पोरं एकदम बावरली आणि गप्पच झाली.


घरच्यांना कधी कळलंच नाही.ती इतकी गप्प झाली की तासंतास तिच्या बोलण्याची आपण वाट बघीतली तरी ती बोलत नसे. "मृण्मयी काय झालं होतं ग तुला?इतकी गप्प का झाली होतीस?" रडत वैजू स्वतःशीच बोलली.


भावनावेग अनावर होऊन वैजूच्या डोळ्यातून घळघळा पाणी येऊ लागलं आणि ते डायरीवर टपटप पडू लागलं. वैजूनी हळूच डायरीवर पडलेलं पाणी पुसलं. डायरी उघडली.


पहिल्या पानावर मृण्मयीनं लिहीलं होतं.


'माझ्या सगळ्या प्रेमळ कुटूंबासाठी...'


हे का तिनी लिहीलं होतं हे वैजूला कळलं नाही.तिनी डायरीचं पुढचं पान उघडलं.


तारीख होती... ०२/०४/१९८८


वैजू तारखे खालचा मजकूर वाचू लागली.


त्यादिवशी म्हणजेच २तारखेला मी रमतगमत शाळेतुन येत होते.माझं कुणाकडे फारसं लक्ष नव्हतं. मी आपल्याच नादात चालले होते.एवढ्यात मागून एकानी माझ्या पार्श्वभागावर चापट मारली.


मी दचकून मागे वळले तर कोणीच दिसलं नाही मग मी पुढे बघीतलं तर एक मुलगा सायकलवर बसून हसत होता.माझ्या डोक्यात राग राग उसळू लागला.माझ्या रागाची पातळी इतकी वाढली की ओठातून नुसते आवाज बाहेर पडले.


तो मूलगा हसत हसत सायकलला टांग मारुन निघून गेला.मी रागानीच घरी आले.आईनी मी का रागावले हे न विचारताच मला राग कसा माणसासाठी वाईट असतो हा उपदेश केला.त्या ऊपदेशामुळे माझा राग अजून वाढला.


मी रागातच माझ्या खोलीत गेले.त्यादिवशी मला झोपच लागली नाही.त्या मुलाने भर रस्त्यात मला अशी चापट मारण्याची हिम्मत कशी केली.राग...राग नुसता राग येत होता.त्या रागात मी रात्री जेवलेच नाही तशीच झोपून गेले.


आईनेही दोन हाका मारण्यापलीकडे काही चौकशी केली नाही.

माझा खूप तळतळाट होतं होता.पण आईनी काहीच विचार केला नाही. त्यानंतरही तो मुलगा मला सारखा त्रास द्यायचा पण मी रागानी काहीच बोलू शकायचे नाही.


हळुहळू मला शाळेत जायला नको वाटायला लागलं.मी शाळा सोडली म्हणून आई-बाबांना राग आला.पण मी का शाळा सोडली हे कोणी कधीच विचारलं नाही.


दादा तर हसत म्हणाला "अगं आई ही मंद आहे.कशाला पाठवते शाळेत." मला दादाचा खूप राग आला का मला सारखं तो मंद म्हणतो.मी ढ नाही. हे वाचल्यावर वैजूला हुंदका आवरला नाही.


तारीख..४/४/१९८८


आजपण मी जेवली नाही. आईला काहीच वाटलं नाही."नेहमीचच झालंय हिचं" असं म्हणून आईनी सगळं आवरून ठेवलं. दादा ताई जेवले नाही की कशी त्यांच्या मागेमागे जेवणाची ताट घेऊन जाते.भरवू का विचारते. का?असं का करते आई? मीपण तिच्याच पोटातून आले नं.मग माझ्यावर ती प्रेम नाही करत का?


बाबा पण काही म्हणत नाही.ते सारखे आपल्यातच दंग असतात.त्यांचं ऑफीस,त्यांचे मीत्र,त्यांचा रमीचा अड्डा आणि दादा ताईशी बोलायला त्यांना वेळ असायचा. पण माझ्याशी बोलायला बाबांना वेळ कधीच नसायचा.


बाबा माझ्याशी बोलावे म्हणून मी किती धडपडायचे.त्यांच्या जवळ जाऊन बसायचे. पण बाबा आई, दादा, ताई यांच्याशीच बोलत. थोड्यावेळानी मला खूप वाईट वाटायचं.मी तिथुन ऊठुन निघून जायचे.तरी बाबा मला विचारायचे नाही. का चाललीस ग ? बेटा बस. बाबांच्या प्रेमळ वाक्याची मी रोज वाट बघते.अजूनपर्यंत बाबा असं मला म्हणाले नाही.


वैजूला हे वाचणं कठीण झालं होतं. तिच्या लक्षात आलं आपण सगळ्यांनीच किती मृण्मयीला दुखावलं.आपल्या कसं लक्षात आलं नाही.आपल्या बाबतीत आई-बाबा असं वागले असते तर आपण सहन करू शकलो असतो का?मीच काय सारंग पण सहन करू शकला नसता.ही पोरं तर आमच्यापेक्षा लहान होती.हळवी होती.का आपण हिला जपलं नाही.जपलं असतं तर आज मृण्मयी जीवंत असती.


मनावर दगड ठेऊन मृण्मयी ची सगळी डायरी वैजूनी वाचायचं ठरवलं.


तारीख...६/४/१९८८

आज डायरी लिहावीशीच वाटतं नाही.मनावर साचलेले दु:खाचं मळभ दूर व्हावं म्हणून मी डायरी लिहीते.पण आज काहीच लिहुनये वाटतंय. लिहावं न वाटणं हेपण दु:खच आहे. का म्हणून लिहु नये वाटतंय. आज इतकंच लिहीते. आज फार नाही लिहवत आहे. डायरीत शब्दच उतरत नाहीत.



माझ्यावर झालेला अन्याय मी माझ्या शब्दांवर नाही करणार. शब्दांनो तुम्हाला जेव्हा मनमुराद हुंदडायचं असेल नं तेव्हा या माझ्या डायरीत आणि मनसोक्त हुंदडा



६/५/१९८८

आज एक महिना उलटला डायरी लिहुन महिनाभर मनच स्वस्थ नव्हतं.माझं मन कधीच स्वस्थ नसतं असं आई येता जाता म्हणत असते. म्हणून मी आईला काही सांगणच सोडलं आहे.शांत बसते.


सगळ्यांना न्याहाळत असते. माझं मन स्वस्थ नसतं म्हणून आईनी दुकानात किंवा भाजीबाजारात पाठवणंपण बंद केलं. मी घरी मजेत असते. माझ्या खोलीत मी खूप आनंदात असते. माझ्या खोलीच्या भींती माझ्याशी बोलतात. खिडकीत बसलं की खूप काही मला बघता येतं. खिडकीतून मोकळं आकाश दिसतं.


त्या निरभ्र आकाशाकडे बघून मन खूप मोकळं होतं.मनावरचं दडपण दूर होतं.



तारीख...१०/६/१९८८


मनातलं काही कसं सांगावं कुणाला याचा नेहमीच प्रश्न पडतो.ऐकणारा भला असेल तर ठीक नाहीतर माझी कहाणी कॅश करायच्या प्रयत्नात माझ्या जीवनाची वाताहत होईल. म्हणून खूपदा ओठापर्यंत आलेलं बोलायला धजावत नाही.


समुपदेशकांना टिव्हीवर सांगतांना ऐकलंय "बोला मोकळेपणानी बोला" त्यांना काय जातंय बोला म्हणायला. इथे माझ्या आयुष्यात इतके अतरंगी प्रसंग घडलेत की मी स्वतः अजून त्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. घरचे तर नाहीच विश्वास ठेवत मग दुसरे कसा विश्वास ठेवतील?


तारीख… ११/६/१९८८


जेव्हा समज नव्हती तेव्हाही खूप त्रास झाला. पण सहन केला. कोणालाच सांगीतलं नाही. हळुहळू मी माझ्याच कोषात जाऊ लागले.सगळं मला कळत होतं तरी मला हा कोष खूप सुरक्षीत वाटू लागला.


माझं जे असायला हवं होतं ते सगळं या जगात होतं. माझी डायरी,माझं पेन,माझी चित्रकलेची वही आणि क्रेयाॅन.हेच माझं जग झालय.


इतरांना मात्र मी अशी एकटीच जगतेय यावर काळजी असण्यापेक्षा कुत्सीतपणाच जास्त होता. मी त्याकडे लक्षच देत नव्हते. माझ्या जगात मात्र मी कुणा अगांतुकाला मुळीच प्रवेश देत नसे.


या पानावर लिहीलेले एवढंच होतं. वैजूला हे सगळं वाचुन स्वत:च्या नकळत झालेल्या चुका लक्षात आल्या. त्या चूका लक्षात येऊन आता उपयोग काय? त्या कशा सुधरवता येणार?


आपण आपल्याही नकळत खूप कृरपणे वागलो मृण्मयीशी .रडत रडत न राहवून मृण्मयी समजून वैजू त्या डायरीची पापी घेत सुटली.बराच वेळ तिची तंद्री लागली होती.तिचं डोकं काम करेनासं झालंय हे तिच्याकडे बघून कोणीही ओळखलं असतं.

------------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका मीनाक्षी वैद्य.



मृण्मयीची डायरी भाग २रा.


तारीख… १६/६/१९८८


इतरांचं जाऊ दे आईनी पण कधी गंभीरपणे माझी दखल घेतली नाही. वैजुताई आणि सारंग दादा सारखं मलापण माझी मतं आहेत हे तिला कळतच नव्हतं.


मला वाटायचं माझ्याजवळ आईनी येऊन बसाव.प्रेमानी डोक्यावरून हात फिरवावा.पण असं कधीच झालं नाही.मग दादा,ताईंच्या डोक्यावरून कशी येता जाता हात फिरवायची. त्यांचा गालगुच्चा घ्यायची. माझ्यावेळी तीला हे आठवलं नाही कधी.


आई जेव्हा दादा ताईचे लाड करायची तेव्हा ते मी आधाशासारखं माझ्या डोळ्यांनी पिऊन घ्यायचे.


तारीख...१५/६/१९८८


मला नेहमीच सगळेच मंदच समजत आले.मला ओरडून सांगावं वाटतं की मी मंद नाही. मी इतरांसारखी हसू शकतेस, रागाऊ शकते, बोलू शकते.


मला सगळं येतं पण मला दादा ताई सारखं खूप बडबड करायला नाही आवडत. म्हणून मी खूप बोलत नाही. म्हणून लोकांना वाटतं मी मंद आहे.


एकदिवस मित्रांसमोर दादा मला म्हणाला "एक मंदे पाणी घेऊन ये पटकन" मला कळलं नाही म्हणून त्यांच्याकडे बघत बसले. तेवढ्यात त्याचा मित्र म्हणाला " अरे हिचं नाव तर मृण्मयी आहे.मंदा काय म्हणतोस?"


त्यावर दादा म्हणाला "बघ गेली का ती? तिला जरा उशीराच कळतं म्हणून मंदा म्हटलं.मला हे नाव खूपच आवडलं.मंदे पाणी आण." आणि दादा बरोबर सगळे त्याचे मित्र खो-खो हसायला लागले.



ही माझी टर ऊडवली दादानी. त्याला गंमत आली.पण माझ्या मनाला किती जखम झाली असेल याचा त्यांनी विचारच केला नाही.त्यादिवशीपासून आई प्रमाणेच दादाही माझ्यापासून लांब गेला.


तारीख...५/७/१९८८


खूपदा मी माझ्याशीच बोलायचे. ते बघीतल्यावर लोक म्हणायचे वेड लागलंय हिला. मला हसू यायचं स्वत:शी बोलणं म्हणजे वेडेपणा आहे का?आपण स्वतःशी कधीच बोलत नाही. इतरांशी मात्र खूप बोलतो.आपल्याला आपली ओळख कधीच होत नाही. हा आपल्यावरच आपण अन्याय नाही का करत.


तसं बघीतलं तर माझ्या घरी सगळेच माझ्यावर प्रेम करणारे आहेत अजूनही करतात. मी अशी जगाच्या दृष्टीनी वेड्यासारखं वागत असले तरी.


सगळे माझ्यावर प्रेम करतात मला माहिती आहे.पण दादा ताई वर करतात तसं नाही करत. कोणालाच माझ्या जगात येऊन बघावं वाटतं नाही. मी आजकाल आणखी गप्प का झाले? याचा शोध नाही घ्यावासा वाटत त्यांना. का?



तारीख… १०/७/१९८८


मला छोट्या छोट्या गोष्टी लिहायला आवडतात.माझ्या गोष्टीत राक्षस असतोच.देवमाणुस असतो.प्रत्येक वेळी माझ्यासाठी त्या राक्षसाला मारतो. एक गोष्ट मी आईला दाखवली तर आई म्हणाली "हे काय वेडविद्र लिहीलय.गोष्ट लिहायची होती तर छान लिहायची.आणि तिच्या कामात मी गोष्ट वाचायला लावली म्हणून वही दणकन जमीनीवर आदळून ती तिचं काम करू लागली.



हीच गोष्ट मी वैजूताईला पण दाखवायला नेली तर तिची मैत्रीण आली होती.त्या दोघींचं माझ्याकडे लक्षच नव्हतं.मी तशीच निराश होऊन आपल्या खोलीत गेले.



तारीख...११/७/१९८८


काल माझा संतोष मामा आला होता. मला संतोष मामा आवडायचा कारण तो माझ्याशी बोलायचा. माझ्या कविता गोष्ट वाचायचा. तो आला की मला आनंद व्हायचा.यावेळी त्यानी माझ्यासाठी खूप छान पेन आणलं होतं. म्हणाला "मृण्मयी तुला लिहायला आवडतं नं ! हां बघ तुझ्यासाठी छान पेन आणलाय.आता या पेननी आणखी छान छान लिहीशील नं?".


तो पेन बघून मला नाचावंस वाटलं.मी तो पेन घेणार तेवढ्यात दादानी तो पेन मामाच्या हातून घेतला. मला रडू आलं. दादा मामाला म्हणाला " अरे एवढा महागाईचा पेन हिला कशाला देतोय? मी घेतो हा. तिच्यासाठी कोणताही साधा पेन आणून दे. तिला चालेल." मामांनी लगेच त्याच्या हातातला पेन घेऊन मला दिला.


दादा खूप चिडला.मामा म्हणाला " हे बघ ती छान लिहीते म्हणून तिला हा पेन दिलाय. तुला देईन नंतर." "अरे संतोष कसली छान लिहीते ती. वेडविद्र काहीतरी भयानक लिहीते." असं आई मामाला म्हणाली.यावर मामा म्हणाला


"तिला जश्या पद्धतीनं व्यक्त व्हायचंय होऊ दे.त्याच्यावर कोणतीही कमेंट करू नका. असं लिहीता लिहीताच ती आपल्या कोशाच्या बाहेर येईल.आणि छान लेखिका सुद्धा होईल.हो कि नाही माझी मनीमाऊ? लिहीणार नं छान छान?"



मामाचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला.या जगात कोणीतरी माझ्या बरोबर आहे.माझी भावना समजून घेत आहे.तो दिवस माझ्यासाठी खास होता. मला पेन दिलं म्हणून नाही तर तो मला इतरांसारखा मंद समजत नव्हता.



वैजूनी डायरीची पुढचं पान ऊलटवलं


तारीख… २०/७/१९८८


आज वैजूताईला बघायला मुलगा आला होता. मला खोलीबाहेर यायचं नाही म्हणुन आई बाबांनी निक्षून सांगीतलंहोतं. मला खूप उत्सुकता होती त्या मुलाला बघायची. मी आईला सांगीतलं. आई म्हणाली "काही नको बाहेर यायला. त्यांच्यासमोर काहीतरी वेडवाकड़ बोलशील नाहीतर काहीतरी करशील. तुझ्यामुळे मुलाला वैजू पसंत आली तरी नाईलाजानी तो नाही म्हणेल. चांगलं स्थळ ऊगाच हातचं जाईल.गप बस खोलीतच."


मी वेडं वाकडं कुठे वागते मला कळत नाही.मी डोक्यानी कमी नाही त्या नानू सारखी. तो आपट्यांचा नानू वेडा आहे.तो रस्त्यांनी जातांना स्वतःशीच जोरजोरात बडबड करतो.हातवारे करतो.कोणाकडेपण बघून हसतो.मी कुठे अशी बडबड करते. मी तर कमीच बोलते. तरी मला वेडं म्हणतात.


त्या नानुवर त्याचे आई-बाबा कधी ओरडत नाही. दिवसभर तो भटकत असतो. मी तर कुठेच जात नाही. माझ्या खोलीच्या बाहेरच येत नाही. कोणावर ओरडत नाही. तरी मी वेडी आहे.

मी वेडी आहे की ज्यांना मी वेडी वाटते ते वेडे आहेत? कळत नाही.


तारीख...२०/८/१९८८


वैजू ताईला खूप मैत्रीणी होत्या. त्या घरीपण यायच्या.त्यांना मी कशी आहे हे माहिती होतं.ताईची एकच मैत्रीण निलीमा माझ्याशी बोलायची.बाकीच्या माझ्याकडे वेगळ्याच नजरेनी बघायच्या.त्या असं बघतात तर ताईंनी कधी त्यांना सांगीतलं नाही की तुम्ही असं बघू नका तिच्याकडे.का नसेल सांगीतलं? तिला भीती वाटली का आपल्या मैत्रीणी आपल्याला सोडून जातील याची.


दादाचे पण मीत्र घरी यायचे. तोही तसाच वागायचा.तोतर मला खोलीबाहेर येऊ नको म्हणायचा. त्याचे मीत्र आले की मी खोलीतच असायची. माझी मैत्रीण म्हणजे ही डायरी ,क्रेऑन कलर, आणि ही वही. मी मनातलं सगळं वहीवर चित्रात काढते. डायरीत लिहीते. मी इतकं छान लिहू शकते मग मी वेडी कशी असेन?


मला चित्र काढता येतात.मग मी कशी वेडी असेन? मला खूप बोलता नाही येत.जमत नाही खूप खूप वेळ बोलायला.म्हणून मी वेडी आहे का?जे खूप बोलत नाही ते वेडे असतात?


मला कमी बोलायला आवडतं. चित्र काढायला खूप आवडतं.

डायरीत लिहायला आवडतं.मी चित्र काढते मग मी वेडी कशी? मी डायरी लिहीते मग मी वेडी कशी?


त्या नानूला कुठे येतं चित्र काढता! त्याला तर अ,आ,इ पण येत नाही.पण त्याचे आई बाबा नाही रागवत त्याला.मग त्याच्यापेक्षा मी शहाणी आहे.हो मी खरंच शहाणी आहे.पण तरी मला मंद समजतात.


तारीख २२/८/१९८८


माझं गप्प राहणं.बघून आईच्या मैत्रीणीनी आईला सांगीतलं की मृण्मयीला समुपदेशनासाठी घेऊन जा.आई बाबांना सांगत होती तेव्हा मी ऐकलं.काय असतं हे समुपदेशन?


मला हिम्मत झाली नाही आईला विचारायची.

आईनीच काल सांगीतलं. की "ऊद्या तुला एका डाॅ.कडे घेऊन जाणार आहे.शहाण्यासारखी वाग. ते जे प्रश्न विचरतील त्याला नीट उत्तर दे." आता हे डाॅ.कुठून आले.?



तारीख...२३/८/१९८८


आज आई मला त्या डाॅ.कडे घेऊन गेली होती.थोडावेळ मला बाहेर बसवून आईचं फक्त आत गेली.थोड्यावेळानी आई बाहेर आल्यावर मला आत पाठवलं.


मी आत गेले.डाॅ.हसून म्हणाल्या बस मृण्मयी.मला खूप आनंद झाला कोणातरी अनोळखी व्यक्तीला माझं नाव माहिती आहे.मी त्यांच्याकडे बघून हसले.त्यापण हसल्या. त्या हसल्या की खूप गोड दिसत होत्या.त्यांच्या गालाला खळी पडते होती.


त्यांनी विचारलं." मृण्मयी तुला काय आवडतं?"

"मला तुम्ही नावांनी हाक मारलं ते आवडलं.तुमच्या गालाला खळी पडते तीपण मला आवडली." यावर हसतच त्या म्हणाल्या" अरे वा! तुझ्या लक्षात आलं माझ्या गालाला खळी पडते." "हो."यावर डाॅ.हसत म्हणाल्या " किती छान. लोकांना कळतच नाही ग माझ्या गालाला खळी पडते. तुला एका क्षणात कळलं.मला तू आवडलीस..आणखी तुला काय आवडतं?"


"मला चित्र काढायला आवडतं.मला लिहायला आवडतं"

"हो.काय लिहायला आवडतं?" " काहीपण.मनात येईल ते मी डायरीत लिहीते." " छान. तू रोज लिहीतेस डायरी?" " हो.पण कधीकधी नाही लिहीत." " का?" " मला लिहावसच वाटतं नाही." " काग लिहावस वाटत नाही?"


"मला कोणी वेडी म्हटलं,मंद म्हटलं की मला लिहावंस नाही वाटतं." "पण तू वेडी कुठे आहेस?तू मंदपणे नाहीस." "आहे. माझा दादा मला मंद म्हणतो.त्याच्या मित्रांना पण सांगतो."

"काय सांगतो? तू मंद आहे असं?" " हो."


यानंतर त्या खूप वेळ काहीच बोलल्या नाही.मीपण त्यांच्याकडे बघत होते.नंतर त्या म्हणाल्या."आपण पुढच्या आठवड्यात परत भेटू.तेव्हा तू तुझी चित्रकलेची वही घेऊन येशील.मला दाखवायला.तुला आवडेल? मला आवडेल तुझी चित्र बघायला डायरी वाचायला." " हो.मी आणीन.तुम्ही मला आवडल्या." मी बाहेर आले..


आज मी खूप आनंदात होते कारण घराबाहेरच्या या मॅडमनी मला नावानी हाक मारली.माझी डायरी आणि चित्रांची वही मागीतली.

बाहेर आई बसली होती. तिच्याबरोबर मी घरी आले.पूर्ण रस्ताभर तिनी काहीच विचारलं नाही बोलली नाही. मला वाटलं त्या मॅडम माझी आई असत्या तर किती छान झालं असतं.


मी त्यांना माझी डायरी माझी चित्रांची वही नक्की दाखवीन.


मृण्मयीच्या मनात काय विचार चालू आहे याच्याशी आईला काही देणं घेणं नव्हतं. मैत्रीणीनी सुचवल्याप्रमाणे एकदाचं दाखवलं डाॅक्टरला झालं. संपला विषय असे भाव आईच्या चेह-यावर होते.मृण्मयी मात्र पुढल्या भेटीची वाट बघत होती.


वैजू ला मात्र आठवलं की आई मृण्मयीला पुन्हा त्या मॅडम कडे घेऊन गेलीच नाही आपण विचारलही होतं.पण आईनी काहीतरी थातूरमातूर कारणं सांगीतली होती. आपणही आपल्या संसारात व्यस्त झालो आणि पुढे विसरून गेलो.याची आज वैजूला खूप खंत वाटत होती.


तेव्हाच आपण आईच्या मागे लागलो असतो तर आज मृण्मयी या कोषातून बाहेर आली असती.आपल्यासारखीच तिच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे गेली असती. वैजूच्या डोळ्यातून टपटप पाणी येऊ लागलं.


--------------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका...मीनाक्षी वैद्य.


मृण्मयीची डायरी भाग ३रा


तारीख...५/९/१९८८


काल दादाचा फायनल ईयरचा निकाल लागला.तो प्रथम श्रेणीत प्रथम आला होता.सगळे खुप कौतुक करत होते त्यांचं. मीपण त्याचं अभिनंदन केलं तर माझ्याकडे लक्ष न देता आईला म्हणाला "आई ही मंद माझं अभिनंदन करतेय" आणि हसला.


मी अभिनंदन केल्यावर इतरांना थॅंक्यू म्हणतो तसं मला का म्हणाला नाही.मंद म्हणून का हसला.


माझी कोणतीच गोष्ट दादाला का आवडत नाही. त्याला माझ्याशी बोलायला का आवडत नाही? मी तर त्याला त्रास होईल असं कधीच वागत नाही. त्याचे मीत्र आले की मी खोलीच्या बाहेरच येत नाही.


कोणाला सांगू मनातलं कळतच नाही.आई बाबा दादा ताई सगळे आपल्याच कामात असतात. दादा आणि ताईला काही अडचण आली की आई बाबा कसे धावत जातात. मग माझ्यावेळी का नाही आई-बाबा येत?


हा मृण्मयीचा प्रश्न वाचल्यावर वैजूला एक जबरदस्त हुंदका फुटला. तिच्या मनात आलं की का आपण मृण्मयीच्या मनाच्या जवळ जाण्याचा कधीच प्रयत्न का केला नाही?


ती इतकी अपेक्षा करत होती आमच्या सगळ्यांकडून. आमच्यापैकी एकालाही कशी तिची हाक ऐकू आली नाही. खूप तिला आपल्याही नकळत आपण दूर लोटलं.


ती आमच्यासारखी बडबडी नव्हती म्हणून आम्ही सगळ्यांनी तिला मंद का ठरवलं. डायरीत जे तिनी लिहलय ते कोणी वेडी माणूस लिहीलं का असं? वैजूला आणखी रडायला आलं.


ती मीतभाषी होती हे आमच्या लक्षात का आलं नाही. आम्ही चौघेही खरच आपल्याच विश्वात असायचो. तिच्या जगात कधीही डोकावुन बघण्याचा आमच्या चौघांपैकी कुणीही प्रयत्न केला नाही. केला असता तर आज मृण्मयी वेगळी घडली असती.आज जीवंत असती.


तिच्यातले गूण आम्हीं ओळखायचा प्रयत्न केला नाही.आमची महत्वाकांक्षा आमच्यासाठी खूप मोठी होती. तिला छान लिहीता येतं. चित्र काढता येतात हे आम्ही कधी बघीतली नाही.


तिच्याकडे तेव्हाच लक्ष दिलं असतं तर आज तिनी काहीतरी वेगळं करून दाखवलं असतं.


वैजूनी रडत रडतच पुढं पान उघडलं.


तारीख...८/९/१९८८


आज वैजूताईचं लग्नं पक्कं झालं. घरातले सगळे खूष आहेत. पण हा आनंद माझ्यापर्यंत त्यांनी पोचवलाच नाही. त्या सगळ्यांचं आनंदीत होणं.चेष्टामस्करी करणं मी सगळं लांबून बघत होते. मी नव्हते त्यांच्या जगात. माझं जग ही डायरी आणि चित्र एवढंच होतं.


ताईचा होणारा नवरा बघायची माझी खूप इच्छा होती. दादानी बघीतलं. तो तर बोलला सुद्धा त्यांच्याशी. मी नुसतंच बघीतलं असतं. ताईनी सुद्धा मला सांगीतलं नाही त्यांच्याबद्दल.माझी ओळखपण करून दिली नाही.


का सगळे असं वागतात माझ्याशी.माझं डोकं आजकाल खूप दुखतंय या सगळ्या विचारांनी.मी एकदा दोनदा आईला सांगीतलं डोकं दुखतं म्हणून.तिनी लक्षच दिलं नाही.


मी शाळा सोडली तेव्हापासून आईचा माझ्या वर राग आहे.मी का शाळेत जात नाही हे मी तिला सांगीतलं तर म्हणाली

" तुलाच अभ्यास नकोसा झालाय.काम करायला नको असतं. दुकानातुन काही आणि म्हटलं की नाही उत्तर तयार असतं. नुसती घरात बसली असतेस. डोकं दुखायला झालंय काय? नाटकं सगळी."


माझं म्हणणं कोणालाच कधीच कळणार नाही का?देवांनी का मला असं बनवलं. दादा ताई सारखं बडबडं का नाही केलं?मी बडबडी असती तर ताई दादा माझ्याशी किती बोलले असते.दादा मला सारखं मंद म्हणाला नसता.आई बाबा माझ्यासाठी धावत आले असते.


मी जेवले नसते तर आईनी येऊन प्रेमानी भरवलं असतं. किती वेगळं जग असतं माझं. दादा, ताई ,आई ,बाबा यापैकी कोणालाही देवा माझ्यासारखं कमी बोलणं का नाही दिलं? तसं दिलं असतं तर माझ्या बरोबर आणखी कोणीतरी असतं. फक्त ही डायरी क्रेयान कलरच नसते.


माझं जग किती आनंदी झालं असतं.


या ओळीवर पण वैजूला ढसढसा रडू येऊ लागलं. तिच्या लक्षात आलं खरच माझ्या होणा-या नव-याला बघण्याची भेटण्याची तिची इच्छा असणं किती स्वाभाविक होती. मलाच कळायला हवं होतं.मी आईच्या म्हणण्यात आले आणि माझा आनंद तिच्यात वाटून घेतला नाही.


आता काय उपयोग? मृण्मयी आम्ही खूप दुष्टपणा नी लागलो ग तुझ्याशी. तू आमची असून सोयीस्कर तुझ्याकडे दुर्लक्ष करत गेलो. सुरवातीला चुकून झालं.नंतर तेच बरोबर वाटायला लागलं.आम्हा चौघांना तुझं अस्तीत्व आमच्या आयुष्यात नको होतं.म्हणूनच सारंग तुला मंद म्हणाला तरी आईनी कधीच त्याला रागावली नाही. हे आईचं चुकलं. सारंगचही चुकलं.


तारीख...१०/९/१९८८


आई मला त्या डाॅक्टरकडे घेऊन गेली होती. त्या माझ्याशी छान बोलल्या. इतकं छान आई नाही बोलत माझ्याशी.त्या डाॅक्टर हसतात पण किती छान. त्यांच्या गालाला खळी पडते.मला नाही पडत तशी खळी.


जे जे लोकांमध्ये चांगलं ते माझ्यात नाही.माझ्याजवळ फक्त ही डायरी आहे. हा पेन आहे आणि माझे क्रेयाॅन. मी मनातलं या डायरीत लिहीते आणि चित्र काढते. त्या डाॅक्टर मॅडमनी मला ही डायरी आणायला सांगीतली. माझी डायरी मी सगळ्यांपासून लपवून ठेवते.पण त्या डाॅ.मॅडमना दाखवीन.


त्या मला खूप आवडल्या म्हणून त्यांना मी दाखवीन. आमच्या घरातले सगळे मला आवडतात.मीच त्यांना आवडत नाही.असं का?


वैजू स्वतःशी पुटपुटली. "आम्ही सगळ्यांनी तुला दूर लोटलं. आयुष्यात आम्ही केवढी मोठी चूक केली.तू इतकी भावना प्रधान मुलगी होतीस आम्हीच तुला ओळखलं नाही. आज जग इतक्या वेगानी धावतय तू त्याचा वेग पकडू शकली नाहीस कारण तू खूप हळवी आणि संवेदनशील मनाची होतीस.आम्हाला तेच कळलं नाही.


आम्ही मात्र तुला बरोबर न घेता जगाबरोबर धावलो.तू मागे पडलीस तरी लक्ष दिलं नाही.तू खूप प्रयत्न केलास आमच्याबरोबर येण्याचा.तुझे प्रयत्न ही डायरी वाचल्यावर कळले.


आधी कळले असते तर ? आत्ता तू सुद्धा आमच्याबरोबर असतीस मग ही तुझी डायरी वाचायची वेळ नसती आली.कसं समजवू स्वतःला मलाच कळत नाही.


आम्ही खूप अपराधी आहोत ग तुझे. आता आम्ही कितीही आमचा गुन्हा कबूल केला तरी तू कशी येणार परत. तू तर अशा ठिकाणी गेलीस जिथुन परत येण्याचा रस्ताच नाही.


वैजू हमसून हमसून रडू लागते. ती डायरीची पुढची पानं ऊलटवू शकत नाही. तिची हिम्मत होत नाही पुढचं वाचण्याची. आपल्या निष्काळजीपणा मुळे एका संवेदनशील मुलीची जीवनयात्रा संपली. संपली नाही आपण सगळ्यांनी मिळून तिला तिचं जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त केलं.असच वैजू ला वाटायला लागलं. म्हणजे आपण तिचे खुनी आहोत. ही गोष्ट वैजूच्या मनात वारंवार यायला लागली.


वैजू मृण्मयीच्या खोलीतल्या सगळ्या वस्तूंना पुन्हापुन्हा स्पर्श करुन त्यात मृण्मयीला शोधू लागली. वैजूच्या मनात इतकी अपराधी भावना दाटून आली की हताशपणे ती स्वतःच्या कपाळावर मारून घेऊ लागली. बराच वेळानी तिचा स्वतःवरचा राग हळुहळू कमी झाला.


कितीतरी वेळ ती डायरी वरच्या सश्याच्या चित्राकडे बघत होती. सश्यासारखीच कोमल मनाच्या मृण्मयीचं आयुष्य किती खाच खळग्यांनी भरलं होतं. तिनी कशी सगळ्यां खाच खळग्यातून वाट काढली असेल?


आपल्याला तर पावलोपावली कुणाचा तरी आधार लागतो. इतकं छान सुखी जीवन असताना एखादी क्षुल्लक गोष्ट मिळाली नाही तर आपण किती अस्वस्थ होतो.आणि मृण्मयी तिला तर क्षुल्लक गोष्टी सुद्धा मिळाल्या नाहीत. हक्काचं आई-बाबा आणि आमचं प्रेम पण मिळालं नाही. कसं वाटलं असेल तिला?


वैजूनी हळूच थरथरत्या हातांनी पुढचं पान उघडलं.


तारीख...५/१०/१९८८


आज खुप दिवसांनी डायरी उघडली कारण मनात अपमानाचा बाॅम्ब फुटण्याच्या बेतात होता.तो फुटाण्याच्या आधी या डायरीत त्याला बंद करून ठेवायचं आहे. सगळीकडुन माझा अपमान होतो.ताईच्या साखरपुड्याला हाॅलमधील एका खुर्चीवर चुपचाप बसून राहायचं असं आईनी मला बजाऊन सांगीतलं.


ताई खूप सुंदर दिसत होती. तिच्याभवती तिच्या मैत्रीणी होत्या. त्या तिला खूप चिडवत होत्या.मी हाॅलमधील एका कोप-यात बसले होते.जशी काही मी ताईची कोणीच नाही.त्या नानुला तो वेडा असून त्याचे आई-बाबा कसे त्याला आपल्या जवळ घेऊन बसले होते..


ताईशी आणि तिच्या नव-याशी त्या नानुनी हात मीळवला. त्याच्याशी ताई कसं गोड बोलत होती.तोतर वेडा आहे त्याला काही कळत नाही. तरी बोलले त्याच्याशी. मी कुठे वेडी आहे.मग माझी का नाही ओळख करून दिली?


मी आता ताईंशी कधीच बोलणार नाही.अगदी या जगातून जाईपर्यंत.मी या जगातून गेले तर काय होईल? सगळे खूष होतील. आई कशाला रडेल? तिला मी तिच्या गळ्यातलं ओझं वाटते.दादा तो सुद्धा नाही रडणार.तो मला मंद म्हणतो.मी मंद नाही तरी त्याला लाज वाटते.


यानंतर या तारखेला मृण्मयीनी काहीच लिहीलं नव्हतं.वैजू सुन्न झाली.


केवढं भयाण सत्य या डायरीतुन वैजू समोर ऊलगडलं होतं.मृण्मयी म्हणाली तसं खरच बाॅम्ब होता तिच्यावर आलेला एकेक प्रसंग.


त्या नानूला किती प्रेमाने जवळ घेतलं मी. माझ्याबरोबर फोटोही काढला त्याचा.लाळ गाळत असलेल्या आणि चिकट तोंडाच्या मुलाचा.शी: मृण्मयीचा नानू पेक्षा जास्त हक्क होता माझ्याबरोबर फोटो काढण्याचा.


आपण आपल्या सुखात इतके रमलो की नानू आणि मृण्मयी यामधला फरक नाही बघू शकलो.जतीन माझा नवरा दोनदा म्हणाला होता तुझ्या बहिणीला बोलव फोटो काढू. आपण दुर्लक्ष केलं.कारण आईनीच तंबी दिली होती.


फार वाईट घडलं ग मृण्मयी त्या दिवशी. मीच वागले तसं.आता कितीही पश्चात्ताप केला तरी पुन्हा तू परत येणार नाहीस की तो साखरपुड्याचा दिवस परत येणार नाही.


मृण्मयी सशासारखी नाजूक,मनानी हळवी होती.तिच्यापुढे आम्ही चौघेही कठोर हृदयाचे अगदी दगड आहोत म्हटलं तरी चालेल.आपल्याच घरून एवढा तिरस्कार सहन केला तिनी तरी आमच्या जवळ येण्याची,आमचं प्रेम मिळवण्याची तिची धडपड सुरू होती.


आम्हाला दिसलीच नाही तिची धडपड.वैजू आता इतकी खंतावली की तिला स्वतःला स्वतःचा इतका राग आला की रागाच्या भरात तिनं स्वतःच्याच थोबाडीत लगावलं आणि रडत पलंगावर कोसळल्या सारखी पडली.


---------------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका...मीनाक्षी वैद्य.


मृण्मयीची डायरी भाग ४था..


किती तरी वेळ वैजू डायरीकडे सुन्न नजरेनी बघत बसली होती. तिला वाटू लागलं एका मुग्ध निरागस मनाच्या जीवाला आपण खूप मोठ्ठी शिक्षा दिली.अशी शिक्षा देण्याचा आपल्याला काय अधिकार होता?


आपल्या स्वप्नांच्या कळ्या वेचण्यासाठी आपण धडपड केली नं! तिची स्वप्नं तर खूपच छोटी होती.ती फुलवण्याचा तिला आपल्यासारखाच अधिकार होता. मी, आई, बाबा, सारंग सगळ्यांची जबाबदारी होती तिच्या स्वप्नांना ऊमलविण्यासाठी हवी ती मदत करायची. मदत सोडा आपण तिची स्वप्नंसुद्धा समजून घेतली नाही.


तिची स्वप्नं या जगातील स्वप्नांपेक्षा वेगळी होती. निरागस होती. सच्ची होती. तिची स्वप्नं आपल्याला पेलवली नसती कदाचित.


आपण नेहमीच जगाच्या वेगवान शर्यतीत दौडत होतो. या जगात निरागसतेला किंमत नाही. आहे फक्त व्यवहार. तो मृण्मयीला कधी जमला नाही आणि पुढेही जमलाच नसता. इतकी ती हळवी होती.


वैजूला डायरी पुढे वाचवेना.तिच्या डोळ्यातून अखंड पाणी वहात होतं.अजून जवळपास अर्धी डायरी वाचायची होती.


कशी वाचू मी ही डायरी? जेवढी वाचली तेवढ्यानीच मनात गुन्हा केल्याची भावना आली आहे. इतकं अपराधी वैजूला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं.


आज आपण मृण्मयी ची डायरी वाचली. आईबाबा आणि सांरंगला कशी वाचाविशी नाही वाटली. मृण्मयी डायरी लिहीते हे आम्हा कोणालाच माहिती नव्हतं.आज मला तिची डायरी सापडली. तिची खोली आवरताना.


आईला दिसली नसेल का?,की दिसूनही जाणून बुजून तिनं लक्ष दिलं नाही. कारण आईला मृण्मयीच्या कोणत्याच गोष्टी पटत नव्हत्या.


आपल्याकडे बघून आई जशी हसायची तशी मृण्मयी कडे बघून नाही हसायची. आता एकेक गोष्टी वैजुच्या लक्षात येऊ लागल्या. वैजूच्या डोक्यात विचारांचा नुसता गुंता झाला.


आत्तापर्यंत आपण इकडून तिकडून बाहेरच्या लोकांबाबतीत घडलेल्या अश्या गोष्टी ऐकल्या. आज आपल्या बहिणी बाबतीतच असं घडलंय. आपण तिच्याजवळचे असून आपल्याला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली नाही.


आपण सगळे इतके स्वतःतच रममाण झालो होतो की आपल्या बहिणीनी मदतीसाठी मारलेली हाक आपल्याला ऐकू आली नाही. इतके कान बंद करून एकाच घरात आपण वावरलो? असं नको होतं व्हायला.पण झालं.भयानक पद्धतींनी झालं.


किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही. पण ती घडलीय आमच्या चौघांकडुनच

आता याचं प्रायश्चित्त घेणार कसं? आणि घेतलं तरी उपयोग काय? जी व्यक्ती आमच्याजवळ येण्याचा अहोरात्र प्रयत्न करत होती तीच आता या जगात नाही. प्रायश्चित्त केलं तरी ते सांगणार कोणाला? आणि दाखवणार कोणाला?


वैजू हताश झाली. सारंग आणि मी मृण्मयीची सख्खी भावंडं असून असं कसं वागलो हा विचार तिच्या मनाला पोखरत होता. तिची कुठेतरी तंद्री लागली होती.कोणीतरी तिला गदागदा हलवलं म्हणून ती भानावर आली.बाजूला सारंग उभा होता.


"अगं वैजू काय झालं?अशी मृण्मयी च्या खोलीत का बसली आहेस?आणि रडते का? "

" सारंग मी मृण्मयी ची डायरी वाचत होते.आपण खूप वाईट वागलो तिच्याशी."

"ऐ काहीतरी काय बोलतेस?अगं ती मंदच होती म्हणून वेड वाकडं वागून आपली बोलणी खायची." " नाही सारंग ती मंद नव्हती.ही डायरी वाच तिची. म्हणजे तुला कळेल मी काय म्हणते आहे."सारंग वैजू च्या हातातली डायरी बघून हसला.


"ही डायरी... मृण्मयी डायरी लिहायची! काहीतरीच काय. तिला शाळेचा अभ्यास जमला नाही ती मुलगी डायरी लिहेल! वैजू तू नं विचीत्र गंम्मत करते आहेस."


"नाही सारंग ही डायरी मृण्मयीनीच लिहीली आहे. डायरी वाचताना माझे डोळे रडायचे थांबत नाहीत. खूप कठोरपणे आपण तिच्याशी लागलो. तिच्या छोट्या छोट्या इच्छांना आपण बावळटपणा समजलो. तिच्या इच्छा आपल्या इच्छांपेक्षा खूप छोट्या होत्या पण त्या टाकाऊ नव्हत्या.


मोठी महत्वाकांक्षा असणं चांगलं आणि छोटीसी इच्छा जिला आपण महत्वाकांक्षा म्हणणार नाही ती असणं वेडेपणा आहे का रे ?"


"वैजू तू फारच सेंटी झालीस एकदम. बघू असं काय आहे त्या डायरीत?" " सारंग तू चेष्टा करणार असशील तर नको वाचू ही डायरी. मी मुळीच जबरदस्ती करणार नाही तुझ्यावर."


"अगं नाही करणार चेष्टा.मला गंम्मत वाटतेय जिला बोलणं सुचायचं नाही ती लिहू कशी शकेल? हा माझा छोटासा प्रश्न आहे."


"आपण खूप बोलतो सारंग पण तरीही चार ओळी आपल्याला कोणी लिहायला सांगीतलं तर आपली ततपप होते.नाही लिहू शकत आपण. मृण्मयी कमी बोलायची पण शब्दातून छान सविस्तर बोलायची. तू वाच डायरी पण को-या मनानी वाच.ही डायरी मृण्मयीची आहे असं समजून वाचू नको.मग तुला तिनी लिहीलेलं कळेलं"



वैजू मृण्मयी बद्दल इतकं हळवं कशी झाली याचं सारंगला आश्चर्य वाटलं.त्याने हातात घेतलेली डायरी खाली ठेवली.हे बघून वैजू म्हणाली" सारंग डायरी का खाली ठेवलीस?वाच ती."


"मला फारसा इंटरेस्ट नाही हे वाचण्यात.तू इतकी कशी मृण्मयी साठी हळवी झालीस.मंदच होती ती." " नाही सारंग ती मंद नव्हती.आपण तिला त्या रूपात बघीतलं. तिला आपण समजूनच नाही घेतलं कधी. तू तिला सारखं मंद म्हणायचास."


"अगं ती मंद होती म्हणून म्हणायचो." "डायरी वाचली की तुला कळेल आपण सारखं तिला मंद म्हणायचो पण किती अन्याय केला आपण तिच्यावर."


" हं... काहीतरीच तुझं.मी एक चुकलो असेन पण तुमच्या तिघांचं काय? तुम्हालाही ती मंदच वाटायची नं? बोल नं?"


"इथेच तर चुकलं आपलं. सारंग तिनी ज्या पद्धतींनी डायरी लिहिली आहे त्यातुन कुठेही ती मंद असल्याचं जाणवत नाही.

तिची भाषा, तिचे विचार, तिच्या इच्छा सगळं खूप स्वाभाविक होतं. आपण आपल्या इच्छा अपेक्षा ओळखल्या नं! आई बाबांकडून त्या पूर्णही करून घेतल्या. मग मृण्मयीला का आपण संधी दिली नाही.?"


"वैजु असं असतं तर तिनी शाळा का सोडली? हा प्रश्न येतोच."


"तिला एक मुलगा शाळेत जाता येता त्रास देत असे.तिनी आईला सांगायचा प्रयत्न केला.पण आईनी ऐकूनच घेतलं नाही.त्या मुलापायी मृण्मयीचं शैक्षणिक नुकसान झालं.


आपण त्या गोष्टीचा इतक्या गांभीर्याने विचार केला का? नाही. तिला मंद ठरवून मोकळं झालो. अरे तिला शाळा आवडायची. तिला आपल्यासारखंच शिकायचं होतं. आणि मृण्मयी...ती बिचारी सगळ्यांना सांगून सांगून थकली आणि आपल्याच कोषात गेली."


वैजूला रडू आवरेना ती पुढे बोलूच शकली नाही.सारंगही कुठंतरी हरवल्या सारखा बघत होता.त्याच्या मनात आलं वैजू म्हणते ते खरं असेल? खरच आपल्या सगळ्यांचं वागणं चुकलं असेल का? आता त्यालाही लक्षात आलं की आपण कधीच तिच्याशी प्रेमानी बोललो नाही. आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती.


दादा म्हणून आपण कधी तिचं कौतुक केल्याचं आठवतं नाही. वैजू आणि आपल्यात दोनच वर्षांचं अंतर असल्याने आपली गट्टी जमली होती.पण मृण्मयी लहान असल्याने आपल्या आणि वैजूच्या विश्वात तिला स्थानच नव्हतं.


आपण तिला मंद म्हणायचो का म्हणायचो तेच कळत नाही.ती खूपच कमी बोलायची. वैजू म्हणते तसं आपण ती कमी का बोलते त्यामागचं कारणच कधी शोधलं नाही आणि तिला मंद ठरवून मोकळं झालो.



सारंग अश्या विचारात असतानाच त्यांचं लक्ष खुर्चीवर ठेवलेल्या डायरी कडे गेलं.त्याने डायरी उचलली.वैजूनी ते बघीतले.म्हणाली

"तू डायरी वाच. इतकी वर्ष आपल्या सहवासात असलेली आपली बहिण आपल्याला कळलीच नाही. ही डायरी तिची ओळख करून देते. ही आपल्यासाठी शरमेची गोष्ट आहे."


"वैजू आपलं सोडं आई बाबांना सुद्धा ती कशी आहे ते कळलं नाही? कधीही मला आई म्हणाली नाही की तिला मंद म्हणून नकोस.आईनी एकदा जरी मला म्हटलं असतं तर.."


"तू ऐकलं असतं? तुझा स्वभाव मला माहिती आहे. तुझं काय मी सुद्धा तशीच वागले.फक्त तुझ्यासारखं येता जाता तिला मंद म्हटलं नाही एवढंच."


"मी वाचीन मृण्मयीची डायरी.पण तू म्हणतेस तसं असेल तर आपण तिच्यापासून जवळ असूनही खूप दूर होतो. सख्खी बहीण होती मृण्मयी आपली. आपणच तिला आपल्या जगापासून लांब ठेवलं. कधीच तिच्या मनात डोकावून बघण्याचा विचार कसा आपल्या मनात आला नाही? आता वाईट वाटतं. आपण असं कसं वागलो?"



"डायरी वाचलीस की अपराधीपणाची भावना तुझ्या मनात पण येईल. मी मलाच दोषी मानते आहे."


"असं नको वाटून घेऊस. खरतर आई बाबांची आधी चूक आहे.त्यांनी तिला समजून घेतलं नाही.त्यामुळे आपल्याही चुका त्यांना दिसल्या नाहीत.आपण तर लहान होतो.तेव्हा कुठे कोणाला समजून घेणं वगैरे कळतं.आई बाबा पण आपल्या जगात होते.खरतर आपण चौघेही स्वतःच्याच जगात होतो."


"माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. आपण आपल्यातच मस्त होतो. तिचे प्रश्न, तिच्या मनाला होणारा त्रास हे सगळं आपल्याला समजण्या पलीकडे होतं.तीनी किती आशेनी काही गोष्टी मला सांगीतल्या होत्या.त्यातून तिला बाहेर पडायचा मार्ग हवा होता.पण मी तिची समस्या जाणूनच घेतली नाही.घरातच असणा-या मुलीला काय समस्या असू शकतील असं वाटून मी दुर्लक्ष केलं.आणि तिथेच मी चुकले होते.आता असं वाटतंय."


सारंग वैजूजवळ जाऊन तिच्या खांद्यावर थोपटून म्हणाला.

"आता कशाचाच उपयोग नाही वैजू. वेळ निघून गेली."


सारंग आणि वैजू दोघंही सुन्न झाले होते.


अचानक वैजू म्हणाली "सारंग आपण काहीतरी केलं पाहिजे." "आता काय करू शकतो? आता मृण्मयी नाही. जे काय करायला हवं होतं ते आधीच करायला हवं होतं."


"मृण्मयी सारखे अनेक मुलं मुली असतील. त्यांच्यासाठी काहीतरी करू.मृण्मयीला आपण ओळखू शकलो नाही म्हणून तिला वाचवू शकलो नाही पण इतरांना आपली मदत झाली तर ते या जगातून जाण्याचा विचार करणार नाही."


"तुझा विचार योग्य आहे पण अशी मुलं कोण आहेत हे आपल्याला कसं कळणार?"


"कळेल.आपण त्या काऊंन्सलरला भेटू. मला वाटतं आपल्याला त्यांची मदत होईल. मृण्मयीच्या वेळी आपण काही करू शकलो नाही. जगात अनेक मुलं मुली मृण्मयी सारखे असतील. त्यांच्यासाठी काही करता येतं का बघू." सारंग होकारार्थी मान डोलावतो


"आईकडून त्या काऊंन्सलरचा फोन नंबर आणि पत्ता घ्यायला हवा. आजच मागते आईला त्यांचा नंबर.फोन करून त्यांची वेळ घेते. सारंग मला वाटतं मृण्मयीची डायरी आणि चित्र कलेची वही बरोबर घेऊन जाऊ."


" हो हे ठीक राहील." एवढं बोलून वैजू आईला फोन आणि पत्ता वीचारायला गेली.

सारंग ही खूप अस्वस्थ झाला होता.केवढी मोठी चूक आपल्या हातून घडली यांचं त्याला दु:ख होतं होतं.वैजू म्हणते तसं केलं तर थोडं तरी प्रायश्चित्त घेतल्या सारखं होईल.


आमच्यासारखी भावंड नको कोणत्याही मृण्मयीच्या सहवासात यायला.हे असं वाटलं तरी दुस-या बाजूनी त्याला हेही वाटलं होतं की यात जास्त चूक आई बाबांची आहे. आपण तर तेव्हा लहान होतो पण मोठं झाल्यावरही आपलं तिच्याशी वागणं का बदललं नाही?


मोठं झाल्यावर आपल्याला नानू आणि मृण्मयी मधला फरक कसा लक्षात आला नाही. नानू तर वेडाच आहे.आता वाटतं मृण्मयी नानू सारखी नव्हती.आपणच चूक केली तिला समजून घ्यायला कारण आपण आपल्याच जगात मस्त होतो.


आपलं करीयर, आपली नोकरी हेच आपलं लक्ष्य होतं.या सगळ्यात आपल्या बरोबरीनी घरातले सगळे होते.फक्त मृण्मयी नव्हती कारण मृण्मयी ची चाल हळू होती म्हणून ती मागे राहीली.


मागे वळून मला आणि वैजूला तिचा हात धरता आला असता. एवढं कठीण नव्हतं.पण आपण चुकतोय हेच कळत नव्हतं आम्हा दोघांना. हे आई बाबांनी आम्हांला सांगायला हवं होतं. 'थांबा जरा मृण्मयीला पण बरोबर घ्या.' ते म्हणाले नाहीत आणि आमच्या बुद्धीची पोहोच नव्हती तेवढी आम्हीं पण थांबलो नाही.


सारंगचा आता बांध फुटला.कसं आवरायचं स्वतःला हे त्याला कळत नव्हतं.शेवटी मुक्तपणे त्यांनी डोळ्यातून पाणी ओघळू दिलं.

सारंगही वैजू सारखाच विचारांच्या भोव-यात अडकला.

---------------------------------------------------------------

क्रमशः


लेखिका... मीनाक्षी वैद्य.



मृण्मयीची डायरी भाग ५वा


"सारंग मला वाटतं आपण त्या काऊन्सलरला भेटाव.."


" आता काय उपयोग भेटून?"


"नेमकं तिला काय झालं होतं हे तरी कळेल.तिला आई घेऊन गेली होती पण नंतर आपण कुठे काही विचारलं आईला. ऊलट मृण्मयीला काऊंन्सलरची गरज पडली यावरच आपण हसलो. खरच हसण्यासाठी होतं का काही. सारंग आपण असताना तिला काऊंन्सलरची गरज पडायला नको होती."


"हो...खरय तुझं म्हणणं. आपण तिच्या प्रश्नांना किती सहजपणे टाळायचो वरून म्हणायचो बावळटासारखं काहीतरी विचारु नकोस.आपण हे नेहमीच म्हणायचो."एक उसासा सोडून सारंग पुन्हा म्हणतो.


"आपण कायमच ती विचीत्र बोलते ,वागते असं धरुनच चाललो. देवानं आपल्याला तेव्हा का बुद्धी दिली नाही.?"


"आता त्यावर विचार करून उपयोग नाही.आपण त्या काऊंन्सलरला भेटू.मला वाटतं मृण्मयीच्या वेळी काही करू शकलो नाही पण जगात अनेक मृण्मयी असतील. त्यांच्यासाठी काही करता येतं का बघू." वैजूच्या या बोलण्यावर सारंगनी होकारार्थी मान डोलावली..


दोघं त्या काऊन्सलरला भेटायचं ठरवतात


वैजू आईला म्हणते" आई त्या काऊंन्सलरचा पत्ता दे. जिच्याकडे तू मृण्मयीला घेऊन गेली होतीस.आम्ही जाऊन त्यांना भेटुन येतो."


"आता कशाला जायचय?जिला दुखणं होतं तीतर गेली." आई निर्विकार पणे म्हणाली.


"आई तुला असं बोलवतो कसं? तिची डायरी वाच मग तुला कळेल की आपण किती तिच्याशी वाईट वागलो.आपण तिला कधीच समजून घेतलं नाही."


"ऐ काहीतरी बोलू नकोस. समजून काय घेतलं नाही? नेलं होतं न त्या डोक्याच्या डाॅक्टरकडे."


"आई मृण्मयी वेडी नव्हती. डोक्याच्या डाॅक्टरकडे हा काय शब्द वापरते?"


"डोक्याची नाही मनाची डाॅक्टर होती. डाॅक्टर. तर होती नं? तुम्हाला नाही न्यावं लागलं कोणाकडे."


आता सारंग पण चिडला."आई खरंतर तुम्हा दोघांकडून तिच्याकडे दुर्लक्ष झालं आहे आम्ही दोघं तर लहानच होतो.तू आणि बाबा यांना मी कधीच तिच्याशी प्रेमानी बोलताना बघीतलं नाही. सांग नं असं का केलं तुम्ही?तुमचं बघून आम्ही पण तसच वागलो."


"तुम्ही काय वकील पत्र घेतलंय तिचं ? ती गेल्यावर मला जाब विचारता? मी तिला म्हटलं होतं का आत्महत्या कर." आई रागानी फणफणत बाहेरच्या खोलीत निघून गेली.


"अरे हे काय आईचं विचीत्र वागणं आहे. मृण्मयी गेल्या बरोबर हिचा संबंध संपला तिच्याशी?आई -मुलगी हे नातंही संपलं? वैजू मला आईचं काही कळत नाही. ती नक्की कुणा काऊंन्सलरकडे मृण्मयीला घेऊन गेली होती का? की उगीच सारखं सांगत होती."


"गेली होती आई मृण्मयीला घेऊन. मृण्मयीनं लिहलय डायरीत.ती काऊंन्सलर मृण्मयीला फार आवडली होती.पण पुन्हा गेली होती याचा उल्लेख नाही केला मृण्मयीनी."


"वैजू जे व्हायचं ते होऊन गेलं.आता पुन्हा त्यांचं मुद्द्यावर कशाला चर्चा हवी? तिच्यासाठी आम्ही काहीच केलं नाही असं नाही." बाबांचा बोलतानाचा सूर विचीत्र. होता.त्यांना फारसा रस नव्हता त्या काऊंन्सलरला भेटण्यात.


आई वडील दोघंही आता हे सगळं करण्याची काय गरज म्हणून वाद घालतात याचंच वैजू आणि सारंग यांना आश्चर्य वाटतं. वैजू आणि सारंग यावर काही उत्तर न देता काऊन्सलरला भेटण्याची वेळ घ्यायचं ठरवतात.



"आई तू नंबर दे त्यांचा. तुम्हा दोघांना यात रस नसेल आणि आमच्याबरोबर यायचं नसेल तर नका येऊ."


आईनी भुणभुण करतच वैजूला नंबर दिला.


आई बाबांना वैजू आणि सारंग असं का करताहेत हेच कळत नाही.बाबा जरा वरच्या आवाजात बोलतात.


"तुम्हा दोघांना असं वाटतंय का की आम्ही मृण्मयीची हयगय केली. तिच्याकडे लक्ष दिलं नाही. तिला कोणतीही गोष्ट किती वेळा समजावून सांगावी लागायची हे तुम्हालापण माहिती आहे."


"बाबा हे आम्हाला माहीत असलं तरी तेव्हा आम्ही लहान होतो.तिला कसं सांगीतलं म्हणजे समजेल हे आम्हाला त्या वयात थोडी कळत होतं.पण तुम्हाला कळत होतं नं? तुम्ही आणखी प्रयत्न का केला नाही? "वैजू नी चिडून विचारलं.


"सारंग आत्ता तुम्ही दोघं आम्हाला जाब विचारताय पण जेव्हा तिला काही समजावून सांगायचं असायचं तेव्हा आमचच रक्तं आटायचं.तुम्ही घेतलं तिला कधी समजून. स्वत:बरोबर खेळायला नेलं कधी? आत्ता तोंड वर करून प्रश्नं विचारताय?" आईनी पण तोफगोळा सोडला.


"आई आम्ही असं वागलो पण त्यात आमची काय चूक? आमची पण बालबुद्धीच होती नं? तुम्ही सांगीतलं कधी आम्हाला की तिला जरा उशीरा समजतं तिला समजून घ्या.

तुम्ही तिचे दादा ताई आहात. हे तर कधी तुम्ही आम्हाला शिकवलं नाही. तुमच्याकडूनही तिला खूप प्रेम मिळतंय असंही कधी आम्हाला दिसलं नाही. ती डायरी लिहीते हेही आत्ता कळलं.ती गेल्यावर पंधरा दिवसांनी." सारंग पुढे बोलू शकला नाही.


"आई तुला तर माहितीच असायला हवं होतं की मृण्मयी डायरी लिहीते. तिला त्या काऊंन्सलरनी डायरी घेऊन बोलावलं होतं. गेली होतीस तिला घेऊन?"


आई काहीच बोलली नाही."तू काही उत्तर देत नाहीस म्हणजे तू नंतर गेलीच नाहीस तिला घेऊन. धन्य आहे तुझी."


"तुम्हा दोघांना मृण्मयी आपली वाटली नाही कधी? तिच्यातला दोष काढून टाकण्याची गरज वाटली नाही कधी? अगं आई आमच्यासारखी तीही तुझ्याच कुशीतून जन्माला आली होती.असं कसं वागले तुम्ही दोघं?"वैजूनी पोटतिडकीने विचारलं.


आई बाबा काहीच उत्तर देत नाही हे बघून वैजूनी तणतणत पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा आई जे बोलली ते शब्द म्हणजे वैजू आणि सारंग दोघांवर झालेला बाॅम्ब हल्लाच होता.


"अरे बघताय काय असे दोघं ?खरं तेच सांगते.मला हे तिसरं मूल नको होतं. एवढी काळजी घेऊनही मृण्मयी झाली. तुमच्या दोघांच्या वेळी तरूण होते. तिसरं बाळंतपण माझ्यावर जबरदस्तीने लादल्यासारखं वाटत होतं."


"आई अग काय बोलतेस तू? म्हणून मृण्मयीकडे तू लक्षच दिलं नाही. यात मृण्मयीचा काय दोष.सगळी काळजी घेऊनही मृण्मयीचा जन्म तुझ्या पोटी व्हायचाच होता असं का नाही तुझ्या मनात आलं?"


"मी इतकीही बावळट नाही.देवानं दिलं म्हणून आपलं म्हणायचं?"


" मलातरी यावर काय बोलावं कळत नाही वैजु!"


"आपण काय बोलणार सारंग.आई आपल्या मनातला संताप मृण्मयी वर काढत होती आणि बाबा तिला साथ देत होते हे आता कळतय.आई बोलल्यावर.त्या वयात आपल्याला कुठे कळणार होतं?"


"तुम्हाला वाढवण्यात काही हयगय केली का आम्ही? दोघं चांगले शिकलात.सारंगला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आहे.वैजु तुलाही चांगलं घर मिळालंय.बॅंकेत नोकरी करतेस. आणखी काय हवं?"


"मुलांनो ऊगीच आम्हाला दुषणे देऊ नका. ती लहान असताना किती अपमान सहन करावे लागले आम्हाला हे तुम्हाला काय माहिती?" बाबा तिरीमीरीत बोलले.


"आई बाबा ही गोष्ट दुस-यांच्या घरातील नाही बोलतंय. आपल्या घरातली ही गोष्ट आहे.आमची सख्खी बहिण होती मृण्मयी." सारंग कळवळून बोलला.


"आई तो नानू ठार वेडा आहे तरी त्याचे आई-वडील कुठेही गेले तरी त्याला आनंदानी बरोबर नेतात.आपली मृण्मयी नानू सारखी वेडी नव्हती तरी तिच्याबरोबर आपण सगळेच इतके विचीत्र वागलो.का?"


"त्या नानूच्या बापाजवळ बक्कळ पैसा आहे. नंबर दोनचा. म्हणून तो आनंदीत असतो."बाबांनी बोलताना चेहरा विचीत्र केला.


"बाबा पैशाचा तेही दोन नंबरचा आणि नानूचं वेड याचा काय संबंध?" वैजूनी विचारलं.


"नाही कसा? त्या पैशामुळेच तर तर त्याला कोणी तोंडावर बोलून दाखवत नाही नानूच्या वेडाबद्दल. पैसा काहीही करू शकतो.वेड्याला शहाणं ठरवू शकतो.आम्हाला चार जण बोलायचे मृण्मयीवरून." बाबा सुस्कारा सोडत बोलले.


"तुम्ही त्यांना सांगू शकत होतात मृण्मयी वेडी नाही.ती कमी बोलते."

"मंद तर होतीच नं. सारंगच तर सारखा येताजाता तिला मंद म्हणायचा.विसरलास का सारंग?" आईनी सारंगची उलट तपासणी सुरू केली.


"नाही विसरलो.त्याचीच तर खंत वाटते आता.तू किंवा बाबांनी मला तेव्हाच रागावलं असतं तर मी तिला मंद कसा म्हणालो असतो?"


"छान. सगळ्याचं खापर आई बाबांवर फोडा.एरवी काही करतांना तुम्ही दोघं विचारायचे आई बाबांना?" आई तडकून बोलली.


"आई गल्लत करु नको इतर गोष्टी आणि मृण्मयीशी जसं वागायचो त्याची."


" होका.आता तुम्ही दोघं शिकवा आम्हा दोघांना आम्ही कसं वागायचं ते. पूर्वी वागलो ते चूक होतं हेही सांगा."


"आई मृण्मयी झाली तेव्हा मी खूप मोठी नव्हते. सातच वर्षांची होते.पण मला आठवतंय मृण्मयी रडली, तिनी शू केली,शी केली की तुझा चेहरा रागातच असायचा. तोडांनी काहीतरी बडबडत किती हिडीसफिडीस करायची तिला.पण नेमकं तू का करते असं हे समजण्याचं वय नव्हतं तेव्हा."


"ते लहान बाळ म्हणजे तुमचं खेळणं होतं पण केवढी मोठी जबाबदारी होती आमच्यावर हे तुम्हाला कसं कळणार?"


"आम्ही नव्हतो तुमची जबाबदारी? मग मृण्मयी ची जबाबदारी तुम्ही का नाकारली?' सारंगनी विचारलं.


" हे बघा आता बास्स करा.मी जे वागले ते चूक नव्हतं.तुम्हाला पटत नसेल तर ते तुमचं मत आहे.मला आता या विषयावर चर्चा नको." आई आपल्या पायात चपला घालून घराबाहेर गेली.थोड्या वेळानी बाबाही तिच्या मागोमाग गेले.


वैजू आणि सारंग दोघंही आई बाबांच्या या वागण्यानी थक्क झाले होते.त्यांना आईबाबांकडून अश्या प्रकारच्या वागणूकीची अपेक्षाच नव्हती.


आई वरून कोरडी असली तरी आतून तिच्या मनात मृण्मयी वरची मायाच असेल असं या दोघांना आत्तापर्यंत वाटत होतं. पण इथे दोघांचे सगळेच आडाखे चुकले होते.


आई बाबा दोघांनाही माहिती होतं की ते चुकीचं वागताहेत मृण्मयी बरोबर तरीही ते मान्य करत नाहीत आपली चूक. आईबाबांच्या या विचीत्र वागण्यामुळे वैजू आणि सारंगचं तर डोकंच काम करेनासं झालं.


किती तरी वेळ ते नुसतेच बसले होते.


"सारंग आतातर आपण जायचच त्या काऊंन्सलरकडे. आपल्या हातून अजाणतेपणी जी चूक झाली आहे तिचं प्रायश्चित्त आपण घ्यायचं.आईबाबांनी जाणून बुजून चूक केली आहे पण त्यांना मान्य नाही आपण चूक केली ते.त्यांचं त्यांच्यावर सोडू."


"हो वैजू मलाही असंच वाटतं. मृण्मयी जीवंत असताना जे आपण केलं नाही हे आपल्याला आत्ता कळतंय जर आत्ताही आपण काही केलं नाही तर मग आपण मृण्मयीचे गुन्हेगार ठरू."


"हो.खर बोलतोस तू.सारंग आपण जे करणार आहोत ते फक्त आपली जबाबदारी म्हणून करायचं.त्यात आता आई बाबांकडून काहीही अपेक्षा करायची नाही.त्या काऊन्सलरला भेटलो की आपल्याला कळू शकेल आपण काय करू शकू?"


" हो.आपल्याला कोणाची मदत घ्यायची असेल किंवा मदत लागणार असेल तर त्या मॅडमनाच विचारू.कोण आहे या क्षेत्रातील जे मनापासून आम्हाला मदत करू शकतील."


"मला वाटतं सांगतील त्या. त्यांच्या ओळखीपण खूप असतील. आपल्याला मदत करणारा योग्य माणूस त्याच सुचवू शकतील.सारंग जी कोणी व्यक्ती आपण या कामात मदत म्हणून घेऊ तिचं मानधन आपण देऊ."


"हो नक्कीच देऊ.माझ्याजवळ पैसे आहेत.गरज पडली तर कर्ज काढीन.तुझं काय?तू तर बॅंकेत आहेस.हा हा हा."हे बोलून सारंग हसला.


"किती वेळाने सारंग हसलास तू. खूप बरं वाटलं.आहे माझ्याजवळ पैसा."

" नवरा हिशोब मागतो का?" सारंगनी विचारलं.

"नाही. बराच दिलदार आहे. मुख्य खूप पुढारलेल्या विचारांचा आहे. समाजसेवा तर त्याच्या अंगात भिनली आहे. ऊलट तो मदतच करेल."

"अरे मग फारच छान होईल.मी ठरवलय कितीही अडथळे येऊ दे मृण्मयीसाठी हे करायचच. तिला या कामातून श्रद्धांजली वाहिल्या सारखं होईल."


"उशीरा का होईना पण आपल्याला जाग आली. आपली चूक कळली. आता मागे हटायचं नाही हे ठरलं" वैजू हात पुढे करते.तिच्या हातावर टाळी देत सारंग म्हणतो"ठरलं."

-----------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका... मीनाक्षी वैद्य.










मृण्मयी ची डायरी भाग ६वा


वैजू काऊंन्सलर अमीता पटवर्धन यांना फोन करून त्यांची वेळ आणि पत्ता विचारून घेते.


"सारंग ऊद्या संध्याकाळी पाच वाजता या म्हणाल्या. आपण दहा मिनीटे आधी पोहचू असंच घरून निघू. पहिलीच वेळ आहे आपल्या भेटीची उगीच उशीर नको व्हायला.या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही."


"हो बरोबर बोलते आहेस.आपल्या या मिटींगबद्दल आई- बाबांना सांगायची काही गरज नाही."


"अर्थातच नाही.का सांगायचं? त्यांना मुळी पटत नाही आपण जे करतोय ते.मग कशाला सांगायचं?"


" हं. चार सव्वा चारलाच निघू आपण."

"हो. मृण्मयीची डायरी आणि चित्रांची वही दोन्ही बरोबर घेऊन जायला हवं.मी आत्ताच दोन्ही गोष्टी माझ्या पर्समध्ये ठेवते नाहीतर विसरेन." वैजूनी मृण्मयीची डायरी आणि चित्रांची वही आपल्या पर्समध्ये ठेवली.


या दोन गोष्टींमुळे अमीता पटवर्धन मृणृमयीच्या मनाचा ठाव घेऊ शकतील. मृण्मयी नेमकी अशी का वागते होती याचं ऊत्तर देऊ शकतील असं वैजूला वाटलं.


अमीता पटवर्धननी दिलेल्या वेळेत सारंग आणि वैजू त्यांच्या क्लिनीकमध्ये जाऊन पोहोचले.मॅडमनी थोड्याच वेळात त्यांना आत बोलावलं.


"नमस्कार मॅम.मी वैजयंती मृण्मयीची मोठी बहीण आणि हा सारंग माझा भाऊ." वैजूनी मॅडमना स्वतः:ची आणि सारंगची ओळख करून दिली.


"बसा" समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत अमीता मॅडम म्हणाल्या.दोघही बसतात.बसल्यावर लगेच वैदू आपल्या पर्समधून मृण्मयी ची डायरी आणि चित्रांची वही काढते आणि मॅडमना दाखवते.


मॅडम वही चाळतच असतात की वैजु मृण्मयी आता नाही असं सांगते.मॅडम ते ऐकताच दचकतात." हे कधी झालं?"

वैदू त्यांना सगळी घटना सांगते.

"तुमची आई तर पुन्हा तिला घेऊन येणार होत्या.मी मृण्मयीलापण सांगीतलं होतं की येताना तुझी डायरी आणि चित्रांची वही आणशील.पण त्या दोघी आपल्याच नाहीत."


"मॅडम आम्ही तिला नीट ओळखू शकलो नाही आणि खरं सांगायचं तर आमच्या आई बाबांनी पण फारसं मनावर घेतलं नाही म्हणून आई तिला तुमच्याकडे पुन्हा घेऊनच आली नाही."सारंग म्हणाला.


," मॅडम मृण्मयीच्या वेळी चूक झाली आमची ती सुधारायची असेल तर तिच्यासारख्या मुलांसाठी काहीतरी करण्याची आमची इच्छा आहे."वैजू मॅडमना म्हणाली.


"बरेच आई वडील असे आहेत जे या मुलांना समजून घेऊ शकत नाही. काहीजण मात्र आपल्या मुलांना आमच्याकडे आणतात आणि त्यांच्याशी कसं वागायचं हे आमच्याकडून शिकतात.


आम्ही त्या मुलांचं काऊंन्सलींग करतो. हळुहळू त्यांच्यात प्रगती दिसते.मी आजपर्यंत खूप वेगवेगळ्या केसेस बघीतल्या.पण मला तुमची बहीण तशी वाटली नाही.


ती खूप समंजस होती.त्या एकाच सिटींग मध्ये मी तिचं जे काही निरीक्षणं केलं त्यात हे लक्षात आलं की ती मीतभाषी होती.तिला खूप बडबड करणं जमायचं नाही.अश्या केस मध्ये घरच्यांनी त्यांचा स्वभाव ओळखला नाही तर ते आपल्या कोषात जातात."


"हो मॅडम मला तर हे सगळं तिची डायरी वाचल्यावर कळलं. त्याआधी आम्हीपण तिला मंद समजायचो. खूप मोठी चूक झाली. गुन्हाच म्हणायला हवं.मृण्मयी तर नाही पण इतर मुला मुलींसाठी काही करता आलं तर आम्हाला करायचंय. मृण्मयीला तर वाचवू शकलो नाही. इतरांच्या आयुष्यात चांगलं घडवता आलं तर हीच मृण्मयीला आमची श्रद्धांजली असेल."


" हं...मृण्मयीसाठी तुम्ही काही करु शकला नाहीत हे वाईट झालं पण उशीरा का होईना तुम्हाला जाग आली.इतर मुलांसाठी तुम्हाला काही करावसं वाटतंय हे चांगलं आहे.तुम्ही यावर काही विचार केलाय का?" मॅडमनी दोघांना विचारलं.


"मॅम मला असं वाटतंय की एखादं असं सेंटर ऊघडावं जिथे कोणीही व्यक्ती जी खूप गोंधळलेली आहे.तिला निर्णय घेण्यात त्रास होतोय किंवा आमच्या मृण्मयी सारखी असेल तर तिला मनमोकळी करता येईल. चर्चमध्ये असतं नं तसं. एखाद्याला कन्फेस करता येतं.असं काहीसं करावं असं मला वाटतंय." वैजूनी तिच्या डोक्यातली कल्पना सांगितली.


"कल्पना छान आहे.पण ती अंमलात कशी आणता येईल यावर विचार व्हायला हवा.जी व्यक्ती मनातलं सगळं बोलेल तिला आपली गोष्ट कुठे कळणार नाही याची खात्री असायला हवी तरच ती मोकळेपणाने बोलेल."


"हो बरोबर आहे तुमचं.मला आणि वैजुला असं सेंटर ऊघडावं असं वाटतं होतं."

" म्हणजे कसं?" मॅडमनी विचारलं.


"मॅडम दोन खोल्या जर आपण भाड्यानी घेतल्या आणि दोन वेगळ्या खोल्यांत माईक वगैरे बसवलं.एका खोलीत काऊंन्सलर बसेल.दुस-या खोलीत ती व्यक्ती बसेल जी मनातलं सांगेल.तिनी आपलं नाव गाव सांगायचं नाही.तिला एक नंबर दिल्या जाईल.तो सांगून तिनी मनातलं बोलावं.काऊंन्सलर कडून तिने सल्ला विचारला तर त्याने सांगाव.असं माझ्या मनात आहे." वैजू मॅडम कडे बघत होती.


थोडा विचार करून मॅडम म्हणाल्या " तुझी कल्पना चांगली आहे पण ही प्रत्यक्षात उतरेल का ही शंका आहे."


" का मॅडम.हे नाही होऊ शकणार?"

" हे बघा जिला आपल्या मनातलं सगळं सांगायचं आहे ती कुठल्याही अद.श्य माणसाला नाही सांगणार.तिला ती व्यक्ती जी तिचं सगळं ऐकणार आहे ती समोर दिसल्या शिवाय ती बोलणार नाही.ती खूप खाजगी गोष्टी सांगणार आहे तर ती फक्त आवाजावर कशी विश्वास ठेवेल?"


" वैजू हा पण मुद्दा बरोबर आहे मॅडमचा." सारंग म्हणाला.

"आज मी इतकी वर्ष या क्षेत्रात आहे.मला वीस वर्ष झाली हे काम सुरु करून.माझा अनुभव हा आहे की पहिल्या सिटींग मध्ये कुणीच खूप आतल्या गोष्टी मोकळेपणाने सांगत नाहीत.आम्हालापण त्याचा अंदाज असतो.


पहिल्या भेटीत आम्ही येणा-या व्यक्तीला जसं चाचपडतो तसंच येणारी व्यक्तीही आम्हाला चाचपडत असते.पहिल्या भेटीनंतर काहीजण येत नाही.

त्या आल्या नाहीत म्हणजे आम्ही कुठे कमी पडतो असं नाही किंवा आमचं ज्ञान कमी पडतं असं नाही. इथे मनाचा संबंध येतो.या क्षेत्रात येणा-या व्यक्तीला हळुवारपणे बोलणं करायचं असतं.


काही व्यक्ती का येत नसतील? याचं कारण हे की येणा-या व्यक्तीचं आणि आमचं ट्युनिंग जर जुळलं नाही तर ती व्यक्ती पुन्हा येत नाही. जिचं आमच्याशी जमतं ती वारंवार येते.आम्ही सांगीतलेल्या गोष्टी लक्षात ठेऊन वागते आणि स्वतः:मध्ये बदल घडवते.


यासाठी काऊंन्सलरनी समोर असायला हवं."


" मला वाटलं होतं. की मला खूप ग्रेट आयडिया सुचली.पण त्या मागे हा एवढा विचार मी केला नव्हता."वैदू बोलली.यावर मॅडम हसतच म्हणाल्या " म्हणून मी या खुर्चीवर बसले आहे आणि तुम्ही समोर बसलात."


" हो खरय तुमचं."सारंग ही हसतच बोलला.

" मॅडम मग आम्हाला काहीच करता येणार नाही का?" वैजूनी निराश होऊन विचारलं.

"निराश का होता? आपण करूया काहीतरी.तुम्हा दोघांची इच्छा आहे तर नक्कीच आपण काही तरी चांगलं करू.आपण पुन्हा कधी भेटू शकतो?"


"तुम्ही सांगा तसं भेटू. मी अमरावतीला असते. तिथून नागपूरला येणं कठीण नाही" वैजू बोलली.

"मी नागपूरलाच असतो.त्यामुळे मलाही तुम्ही सांगाल तेव्हा जमेल."


"यासाठी विचारतेय कारण शनिवारी सेक़डहाफ मला फ्री असतो.तेव्हा आपण निवांत बोलु शकू. एरवी पेशंट असतात.आताही तासभर बोलतोय."

" हो चालेल.तुम्ही एक दोन दिवस आधी सांगीतलं यक्ष मी अमरावतीहून येऊ शकेन."

"ठीक आहे.तुमचा नंबर द्या मला म्हणजे मला कळवता येईल." " हो देते.दोघांचेही नंबर देते पण कुणाला एकाला कळवलं तरी चालेल." वैजू तिचा आणि सारंगचा नंबर लिहून देते.

" येतो मॅम आम्ही." सारंग म्हणतो." हो" अमीता मॅडम हसत मान बोलावतात.

वैजू आणि सारंग मनात एक समाधान घेऊन त्यांच्या क्लिनीक च्या बाहेर पडतात.

" सारंग घरी गेल्यावर या विषयावर चर्चा करायची नाही."

" हो पण आई विचारल्याशिवाय थोडीच राहणार आहे."

" तिनी विचारलं तर मी देईन उत्तर."

" ठीक आहे. काय ऊत्तर द्यायचं ते ठरवून घे आधीच. आई फार खोदून वीचारते.पोलीस असल्यासारखी.चल बस गाडीवर.' वैजू सारंगच्या गाडीवर बसली आणि दोघं घराच्या दिशेनी निघाले.

"सारंग आता किती काही विचारुदे.मी तिचीच मुलगी आहे तिच्यासारखच लागणार आता.बघ तू." वैजू हसत म्हणाली.

"भांडू नका.तुमचं भांडण सुरू झालच तर मी ऊदयकडे कल्टी मारणार ठरलं माझं."

"आधी घरी तर चल."

" वैजू लिहून घे माझी वाक्य .आई आणि बाबा दोघंही आपण कधी येणार याची वाट बघत समोर हाॅलमध्ये बसले असतील. टिव्ही चालू असेल पण नावापुरता."

यावर दोघंही हसतात.

---------------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका... मीनाक्षी वैद्य.






मृण्मयीची डायरी भाग ७


वैजू आणि सारंग घरी पोचतात तेव्हा सारंग म्हणाल्या प्रमाणे आई बाबा समोरच्या हाॅलमध्ये या दोघांची वाट बघत असतात.


टिव्ही नावालाच चालू असतो.वैजू आणि सारंग एकमेकांकडे बघून हसतात.सारंग मान आणि डोळे मिचकाऊन वैजूला म्हणतो "बघ मी म्हटलं होतं तसंच झालं की नाही?"


दोघंही हसत घरात शिरतात.आईबाबांना वाटतं की हे दोघं काहीतरी सांगतील.कुठे गेले होते इतक्या वेळ.पण दोघांपैकी कोणीच बोललं नाही.पुढील प्रश्नाची सरबत्ती टाळण्यासाठी वैजू आत जाऊ लागली तेवढ्यात जतीनचा तिच्या नव-याचा फोन येतो.तिला मनातून हायसं वाटतं.ती आत जाते.


पायातील काढलेल्या चपला सारंग पुन्हा पायात अडकवतो आणि " आई मी येतो थोड्याच वेळात." असं म्हणत घराबाहेर पडतो आणि तो ऊदयकडे पळतो.


वैजू आणि सारंगच्या वागण्यामुळे आई-बाबांच्या चेह-यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह ऊभं राहतं.बाबा निराश होऊन टिव्हीकडे बघू लागतात.आई...आई दबक्या पावलांनी वैजू ज्या खोलीत गेली त्या खोलीच्या बाहेर सावधपणे उभी राहते. वैजू नव-याला काही सांगते का याचा अदमास घेत असते.पण इथेही नकारघंटाच.


वैजू मुद्दाम नव-याशी वेगळं काही बोलते आहे? अशी शंका आईला येते.शेवटी आई कंटाळून पुन्हा बाहेरच्या खोलीत येऊन बसते. बाबा नजरेनीच आईला विचारतात.आई नकारार्थी मान हलवते.शेवटी तीपण कंटाळून टिव्ही बघू लागते.



दोन दिवस असेच गेलेत. वैजू आणि सारंग इकडच्या तिकडच्या गप्पा करत होते. बाबांपेक्षा आईची अस्वस्थता वाढलेली तिच्या हालचालीवरून वैजू आणि सारंगला कळतं. . त्यामुळे दोघांनाही मनातच हसू येत असतं.


ऊद्या वैजू अमरावतीला परत जाणार असते. प्रायव्हेट बसचं तिनी तिकीट काढलेलं असतं.


आज रात्री जेवण झाल्यावर वैजूला विचारायचच असं आई ठरवते.कालपासून वैजू आईनी पण नीट बोलत नसते.ते आईंच्या मनाला टोचत असतं.



"वैजू कालपासून बघतेय माझ्याशी बोलत नाहीस."

"नाही ग असं का वाटतंय तुला?"

"वैजू खोटं बोलायला पण शिकलीस का?"

" तुला असं का वाटतंय? मी तुझ्याशी खोटं बोलावं असं काही तू वागलीस का?"

" मृण्मयीचा राग माझ्यावर काढते आहेस हे कळतंय मला."

" आई उगीचच तर्कवितर्क करू नकोस."

" मग सांग मला काल कुठे गेला होतात तुम्ही दोघं?"

"हं आत्ता आलीस मुद्द्यावर. मग हे कालच विचारायचं होतंस."

"तुम्ही दोघं घरी आल्यापासून गप्प आहात.म्हणून आज विचारते आहे."

"आम्ही दोघं काल काऊंन्सलर अमीता पटवर्धन कडे गेलो होतो."

" कशाला?"

" मृण्मयीसाठी जे करू शकलो नाही ते आता तिच्यासारख्या इतर मुला मुलींना काही मदत करू शकतो का हे विचारण्यासाठी गेलो होतो."

" इतरांशी काय करायचं आहे तुम्हाला?"

"आपल्या मृण्मयीसाठी तुम्हा दोघांना काहीच करायचं नव्हतं.आता आम्ही इतरांसाठी काय करतो यात तुम्हाला दखल देण्याची गरज नाही."

" आई वडील आहोत तुमचे.लक्षात आहे नं?"

" आहे नं.तुम्ही मृण्मयीचे सुद्धा आई-वडील होता.हे तुम्ही मृण्मयीशी वागताना विसरलात."

" आम्ही काही विसरलो नव्हतो."

"मग मृण्मयीची अशी दशा का झाली? तिला तुम्ही दोघांनी समजून घेतलं नाही आणि आम्हाला आमची जबाबदारी समजून दिली नाही.यात तुमची चूक आहे असं नाही वाटत?"

" मला झेपलं नाही तिला जन्म देणं. तुम्हा दोघांत आणि तिच्यात इतकं अंतर.हेच झेपलं नाही."

"मला हे पटत नाही.माझ्या चुलत सासूबाईंना गार्गी नंतर १२वर्षांनी आमोद झाला.पण ते दोघंही मस्त आहेत.त्या दोघांमध्ये छान ट्युनिंग आहे.अग तुझ्यापेक्षा त्यांना किती जड गेलं असेल.पण सुरवातीपासूनच त्यांनी गार्गीला बाळाची गोष्ट सांगून तिच्या मनात बाळाची ओढ निर्माण केली.आज ती त्यांचं प्रत्येक काम ताई या नात्याने जबाबदारीने करते.


तू असं नाही केलंस. आम्हाला मृण्मयी बद्दल ओढ निर्माण केली नाहीस. मृण्मयी बद्दल सदैव नकारात्मकच बोलत आलीस.मी आणि सारंग लहान होतो.तेव्हा काय बुद्धी असणार आम्हाला तू बरोबर आणि मृण्मयी चूक असंच वाटलं.म्हणून आम्हीपण मृण्मयीशी तुझ्यासारखच वागलो. आई तुझं चुकलं. तू मृण्मयीवर अन्याय केलास आणि आमच्याकडून ही तिच्यावर अन्याय झाला.तोच दूर करायचा आहे.आमच्या गुणी बहिणीला आम्ही समजून घेतलं नाही ही खंत मनाला पोखरते आहे.तिची डायरी वाचल्यावर आमची चूक कळली.


आता मी आणि सारंग जे करणार आहोत ते आम्ही केलेलं प्रायश्चित्त असेल.यात तू आणि बाबांनी पडायचं नाही आणि आम्हाला अडवायचंपण नाही.कळलं.विषय संपला. यावर मला तुझ्याशी काही बोलायचं नाही."वैजू तणतणत समोरच्या खोलीत गेली.जातांना बाबा दाराशी उभे असलेले तिला दिसले.त्यांचा चेहरा काळाठिक्कर पडला होता.


वैजू आणि आईमध्ये तू तू मै मै झाली हे वैजुनी घरातल्या घरात सारंगला प्रत्यक्ष न सांगता मेसेज नी सांगितले.


दुस-या दिवशी रात्री वैजू अमरावतीला जायला निघाली. निघतांना रितीप्रमाणे तिनी आई बाबांना खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाली "आई बाबा स्वतःची काळजी घ्या.

"आमच्याशी लपंडाव खेळते आणि वर आमची काळजी असल्याचं दाखवते."आईचं हे तिरकस बोलणं वैजु कानाआड करते आणि घराबाहेर पडते.


बसस्टॅंडवर पोचल्यावर सारंगी गाडी पार्क केली आणि दोघं वेटींग रुममध्ये आले.दोघं बसले आणि सारंग वैजूला म्हणाला.


"वैजू तू आज निघालीस मी आता सापडणार आईच्या तोफे पुढे."


"सारंग ते जाऊ दे.मला सांग प्राजू काय म्हणतेय?"

" तुझ्याशी या विषयावर मला बोलायच होतं."

"कारे काही प्राॅब्लेम झालाय?"

"आपली आई माझ्या आणि प्राजूच्या लग्नाचं कळल्यावर कशी रिअॅक्ट होईल सांगता येत नाही. प्राजूच्या घरचे आणखी थांबायला तयार नाही.आई मृण्मयीशी अशी वागू शकते तर प्राजू वेगळ्या जातीची म्हटल्यावर त्रास देऊ शकते."

" असं एकदम का वाटलं तुला?"

"अगं आत्तापर्यंत आई बाबांशी आपल्या दोघांचा कधीच कुठला वाद झाला नाही. पण मृण्मयीची गोष्ट कळल्यावर मला वाटायला लागलं की आई बाबांची ही बाजू आपल्याला कधीच दिसली नाही.


मृण्मयीला हे सगळं किती जड गेलं असेल सहन करणं. आई प्राजूशी पण अशी वागू शकते. आई असं वागली तर कस़ करायचं?"


" हं… तू म्हणतोस ते खरं आहे.सारंग मला सांग प्राजू कडचे सहा महिने थांबतील का?"


" तिलाच विचारावं लागेल.का ग?"


" मी पटवर्धन मॅडमनी पुढल्या भेटीसाठी बोलावलं की येईन नं तेव्हा आई बाबांवर सुतोवाचं करते.त्याचे काय पडसाद उमटतात बघू.मग ठरवू पुढे काय करायचे ते."


"आई भडकणार.बाबा तिला साथ देणार हे मला आत्ताच कळतंय."


" हो मलापण कळतंय.पण विषय तर मांडायला हवा.कारण तू मुली बघत नाहीस म्हणून ती आधीच ओरडते आहे त्यात आता तू तुझी प्रेमकहाणी सांगीतल्यावर घरात धरणीकंप होणारच आहे त्याची तयारी ठेव. सारंग हे काम आपण सहा महिन्या पूर्वीच करायला हवं होतं.


ठीक आहे.पुढच्या भेटीत करू हे काम.तोपर्यंत प्राजूला जरा सावध कर.नाहीतर एकदम गोंधळून जाईल."


सारंग फारच विचारात पडला.वैजूनी त्याला हलवून भानावर आणलं." अरे सारंग काय झालं?"


" माझं लग्नं होईल की नाही ही शंका आहे."

सारंगच्या चेह-यावरचे भाव बघून वैजूला हसायला यायला लागलं.तिला हसतांना बघून सारंग म्हणाला"एक बाई हसतेस काय?माझं लग्नं होईल की नाही हा प्रश्न पडलाय आणि तू हसतेस.तुझं झालय बाई लग्नं.मी डेंजर झोन मध्ये आहे."


" अरे साॅरी मी हसले तुला वाईट वाटलं.अरे पण एवढा ताण नको घेऊन.पुढल्या वेळी आली की तुझं लग्नं पक्कं करते."


" हं बघू.चल तुझी बस आली."


अमरावतीची बस आली.वैजू आता चढली.खिडकीतून हसत सारंगला म्हणाली. " सारंग निघालास तरी चालेल.जाताजाता प्राजूला भेटून जा.बेस्ट लक" आणि हसली.सारंगनी वाजुन मान हलवली.त्याने गाडीला किक मारली आणि तो निघाला.


गाडी चालवताना सारंगच्या मनात स्वतःच्या आयुष्याचा विचार सुरू झाला. आजवर आई बाबांच्या स्वभावाची काळी बाजू दिसली नाही म्हणून आपण खूप आनंदी होतो.मृण्मयीचं कळल्यापासून आपल्याला काय सहन करावं लागू शकतं याची जाणीव सारंगला झाली.


तो मनातून हादरला. प्राजू त्याच्यावर विसंबून होती.आलेली स्थऴ नाकारत होती. सारंग नोकरीत थोडा स्थीर स्थावर झाल्यावर लग्नं करायचं असं दोघांचं ठरलं होतं.


आता हे नवीनच संकट समोर उभं राहिलं आहे.वैजूची मदत घेतल्याशिवाय आपण लग्नं करू शकणार नाही याची त्याला जाणीव झाली.


विचाराच्या नादात तो घरापाशी आला तरी त्याला कळलं नाही.तो आपल्याच नादात गाडी जागेवर ठेवून घरात शिरला.चपला स्टॅंडर्ड ठेऊन तो खोलीत जाऊ लागला तसा त्यांच्या कानावर आईचा ओरडा पडला.


" अरे मी काय विचारतेय?लक्ष कुठे आहे तुझं?"

" अं..मला काही म्हणाली का?"

" नाही तुला काही म्हटलं नाही मला भींतींशी बोलायची सवय आहे.आणि आपल्या घरच्या भींतींना खूप मोठ्यानी बोललं तरी ऐकू जातं."आईचा ऊपरोधी सूर लागला होता.


"ऐ आई काहीतरी बोलू नको.डोक्यात विचार चालू होते म्हणून तू काय म्हणाली ते ऐकू आलं नाही.भरीस भर हा टिव्ही ओरडतो जोरजोरात."


"कळतं सगळं बोलणं.वैजूची बस निघाली का?हे विचारलं मी."


"हो निघाली.जाऊ आत."

"हं…." आई फुत्कारली.सारंगनी त्याकडे दुर्लक्ष केलं.तो आपल्या खोलीत गेला आणि आधी दार लावलं.विचार आणि टिव्हीचा ढणढण आवाज यांनी त्यांचं डोकं दुखायला लागलं.


------------------------------------------------------------

क्रमशः


लेखिका... मीनाक्षी वैद्य.






मृण्मयीची डायरी भाग ८


वैजू साधारण महिनाभरानी परत नागपूरला येते. कारण अमीता मॅडमनी येत्या शनिवारी साधारण दोन वाजेपर्यंत क्लिनीकमध्ये सारंग आणि वैजूला बोलावलं असतं.


वैजू सकाळी बसमधून उतरल्या उतरल्या सारंगला म्हणते. "सारंग आपण परवा आधी अमीता मॅडमच्या क्लिनीकला जाऊ नंतर प्राजूला भेटू असं मी म्हटलं होतं तुला.तसं सांगीतलं कातू तिला ?"


" हो.तिलाही हाफ डे आहे तर जमेल म्हणाली."


"घरी या गोष्टी बोलणं म्हणजे आ बैल मुझे मार असं करण्यासारखं होईल. अमीता मॅमशी बोलणं कधीपर्यंत आटपेल त्यावर प्राजूला कधी भेटायचं ठरवू." वैजू म्हणाली.


" हो चालेल.मी तसंच सांगीतलं आहे प्राजूला."


बोलता बोलता दोघं घरापाशी आले.वैजू बॅग घेऊन घरात शिरली.आईची चांगली,वाईट या मधील कोणतीच प्रतिक्रिया वैजूनी अपेक्षीत केली नाही.


बाबा नेहमी प्रमाणे सकाळी फिरायला गेले होते.आई स्वयंपाकघरात चहा आणि इतर कामं करत होती.वैजू हातपाय धुवून स्वयंपाकघरात शिरली."आई चहा झाला?" तिथेच खुर्चीवर बसून वैजूनी विचारलं.आईनी होकारार्थी मान डोलावली आणि चहाचा कप वैजु समोर ठेवला.


आईचं हे मुकाटपणे वागणं म्हणजे आपल्यावरचा निषेध आहे हे वैजूच्या लक्षात आलं.वैजूनेही आईच्या निषेधाची पर्वा केली नाही.


वैजूनी शांतपणे चहा घेतला आणि बाहेरच्या खोलीत आली. बाबा नुकतेच बाहेरून फिरून येऊन फ्रेश होऊन हाॅलमध्ये येऊन बसले होते.


आईनी तिचा आणि बाबांचा चहा आणला आणि तीही बाहेरच बसली.


थोड्यावेळानी सारंग आणि वैजू ची काहीतरी नेत्रपल्लवी झाली ते आईनी बघीतले पण स्वतःहून काही विचारलं नाही. बाबा तर पेपरमध्ये तोंड खुपसून बसले होते.


"आई बाबा हा फोटो बघा." वैजूनी आई समोर मोबाईल धरला.


"कोणाचा फोटो आहे?" आईनी विचारलं.


"प्राजक्ता.सारंगला ही मुलगी आवडते.हिच्याशी त्याला लग्नं करायचं आहे."


"काय? सारंग इतके दिवस मी सतत तुला म्हणत होते तर तेव्हा का सांगीतलं नाही?"


"कुठे मिळाला हा फोटो तुला?" पेपरमधून तोंड वर करून बाबांनी विचारलं.


"बाबा हा फोटो रस्त्यावर मिळाला नाही. सारंग हिला काॅलेजमधे असल्यापासून ओळखतो."


"अच्छा म्हणजे तेव्हाच ठरवलं लग्नं करायचं. मग आतातरी कशाला सांगतो आहेस?"


"सारंग तुझ्या लग्नाबद्दल वैजू का बोलतेय?" बाबांनी सारंगला बरोबर शब्दात पकडलं.


"बाबा प्राजक्ता आपल्या जातीची नाही." सारंग म्हणाला.


" मग कोणत्या जातीची आहे?" आईनी विचारलं.


" त्यांनी काय फरक पडतो?" सारंगनी आईला ऊलटप्रश्नं केला.


" पडतो.चालीरिती सगळ्यात फरक पडतो."


"आई सारंग आणि प्राजूचं एकमेकांवर प्रेम आहे. आत्ता झालेलं त्यांचं प्रेम नाही. काॅलेजपासून आहे. दोघही एकमेकांना चांगले ओळखतात. समजून घेतात. सारंग नोकरीत थोडा स्थिरावला की लग्न करायचं दोघांनी ठरवलं होतं. म्हणून इतके दिवस सारंग गप्प होता." वैजू बोलली.


"आतातरी कशाला सांगतोय?ठरवलं न लग्नं दोघांनी. करा मग. लग्नाला आम्ही येऊ अशी अपेक्षा करू नका." बाबा करवादून बोलले.


" तुम्हाला सांगीतल्या शिवाय मी लग्नं कसं करणार?" सारंग म्हणाला.


"जसं आम्हाला न सांगता लग्नं ठरवलं तसं." आई म्हणाली.


"आई उगीचच अर्थाचा अनर्थ करू नको.जर सारंगला तुम्हाला सांगायचच नसतं तर आताही सांगीतलं नसतं.लग्नं करून मग सांगीतलं असतं." वैजू म्हणाली.


"आता सांगतो आहे हे तसंच आहे.ऊद्या लग्नं करून वेगळं घर केलं तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही." बाबांचं हे बोलणं ऐकून सारंग भडकला.


" बाबा तुम्ही मला सुचवताय का मी वेगळं रहावं म्हणून."


" आम्ही कोण सुचविणारे?"


" अहो पण मी लग्नं केलय का? तुम्हाला आज सांगतोय ते हे की प्राजक्ता या मुलीशी मला लग्नं करायचं आहे. माझ्या मनात नसतं सांगायचं तर सांगीतलच नसतं.सरळ लग्नं केलं असतं." सारंगचा पारा आता चांगलाच चढला होता.


"आई बाबा प्राजूला मी बघीतले. तिच्याशी बोलले आहे. चांगली मुलगी आहे.माझ्या लग्नात ती आली होती."


" काय? हे कधी बोलली नाहीस तू?" आई उसळून म्हणाली.


"आई माझ्या काॅलेजचे मित्र-मैत्रिणी आले होते. त्यात प्राजू पण होती. तुला माहिती होतं माझ्या काॅलेजचे मित्र-मैत्रिणी येणार आहेत." सारंग म्हणाला.


" त्यात ही मुलगी येणार आहे हे कुठे माहिती होतं?"


"आई जरा शांत हो.प्राजू सारंग साठी योग्य आहे.जात काय महत्वाची?दोघांचे सूर जुळणं महत्वाचं.ते जुळलेत म्हणून दोघं लग्नं करणार आहेत."


" नातेवाईकांना काय तोंड दाखवायचं?"


"नातेवाईक! त्यांना स्पष्टीकरण कशाला देत बसायचं? त्यांच्यापैकी एकजण तरी आपल्या आयुष्यातील निर्णय घेतांना तुम्हाला विचारायला येतात का? कधी आलेत का? सांग नं आई?"


"मला नातेवाईकांना माझी होणारी सून वेगळ्या जातीची आहे सांगणं जमणार नाही." आईचा राग धुमसत होता.बाबा कुठेतरी नजर रोऊन बसले होते.


"अरे हो बरी आठवण झाली. मी जेव्हा काॅलेजला होते तेव्हा तुझ्या मावस बहिणीच्या मुलींनी केलं होतं. दुस-या जातीतील मुलाशी लग्नं. आठवतय का? ती मावशी आली होती तुझ्याकडे माझ्या मुलीला समजव म्हणून."


" त्याला झाली आता पाच वर्ष."आई तिरीमीरीत बोलली.


"किती वर्ष झाली हे नाही विचारलं मी आई तुला.तू उत्तर टाळू नकोस आई. पत्रीका बघून केलेली सगळी लग्नं यशस्वी होतात का? काही टक्के भीती असतेच. मग हे दोघं एकमेकांना छान ओळखतात. समजून घेतात तर का नाही म्हणता त्यांच्या लग्नाला? फक्त जात वेगळी आहे म्हणून?"


" तुम्हाला जे करायचं ते करा." बाबा चिडून बोलले आणि उठत म्हणाले." मला जेवायला वाढ".


आईपण उठली तशी वैजू म्हणाली. "आई बाबा दोघांना सांगतेय.येत्या आठ दिवसांत सारंगच्या लग्नाला होकार द्या.अन्यथा तो कोर्ट मॅरेज करेल."


" वा! छान सगळं ठरलय तुमचं तर हा फार्स कशाला केला. बघीतलं का मॅडम आपली मुलौ फार हुशार झालीत." बाबा चिडले की आईला मॅडम म्हणायचे.जुनी सवय होती त्यांची


"बाबा हा फार्स नव्हता. तुम्ही हट्टाला पेटला तर हा मार्ग आम्हाला निवडावा लागेल एवढंच वैजूचं सांगणं होतं."


"ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते करा." बाबा निर्वाणीचं बोलले.


"सारंग आपण आई बाबांना आठ दिवसांचा वेळ दिलाय.आता आपण आठ दिवस शांत बसूया. नंतर ते काय निर्णय घेतात त्या वर आपण ठरवू. आपल्याला इतर कामं तोवर करायची आहे."


सारंग या वादळी चर्चेमुळे अस्वस्थ झाला.पुढे काय होणार आहे याचा त्याला अंदाज बांधता येत नव्हता. प्राजूचा तिनदा फोन येऊन गेला पण सारंगला तिच्याशी बोलण्याची हिम्मत होत नव्हती.


'सारंग काय झालं?फोनकडे काय बघत बसलात?" वैजूनी विचारलं.सारंग शुन्यात नजर लावून बसला होता.वैजूनी त्याला हलवलं,


"काय कसला विचार करतोयस?"


"प्राजूचा तिनदा फोन येऊन गेला मी घेतला नाही.या वादावादी मुळे तिच्याशी काय बोलावं समजलं नाही."


" ठीक आहे ऊद्या ऑफीसला गेलास की कर फोन."


" तिला हे जातीबद्दल वाद झाला हे कसं सांगू?"


" ते कशाला सांगतोय. आठ दिवस वेळ आहे आपल्याकडे .हेच कारण तिलाही सांग.आठ दिवसानंतर बघू." वैजू म्हणाली.


" समजा आई बाबा तयार नाही झाले तर?"


" तर कोर्ट मॅरेज कर. इतर कोणाशीही तू लग्नं करून सुखी होशील?"


" नाही."


"मग झालं तर. ते हट्टाला पेटले तरी त्यांच्यापुढे झुकू नकोस. मृण्मयीशी ते खूप चुकीचं वागले.आताही तीच चूक करतात आहेत.तिचा जीव गेला.तू जीवंत असून मेल्यासारखा जगशील एकतर एकटा राहून किंवा दुस-या मुलींबरोबर लग्नं करून. तुला काय मंजूर आहे? तुझं सूख की आईबाबांचा हट्ट?"


" तू म्हणतेस ते बरोबर आहे.मी प्राजू शिवाय दुस-या मुलीशी लग्नं करू शकणार नाही."


" पक्कं ठरवलं नं तू?" सारंगहो म्हणून मान बोलावतो.

"काळजी करू नको. तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोधून मगच अमरावतीला जाईन.


" वैजू तुझ्या मदतीशिवाय हे होणार नाही."


"माहिती आहे मला. लहानपणापासून मीच आले नं तुझ्या मदतीला धावून. लग्नासारख्या एवढ्या महत्वाच्या कामासाठी कशी येणार नाही?" वैजू हसून म्हणते.


" आज जेवावसही वाटतं नाही." सारंग ऊदासपणे म्हणाला.


" ऐ जेवण वगैरे नाही सोडायचं.चल जेवायला."

वैजू बळबळच सारंगला जेवायला आत घेऊन जाते.

---------------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका... मीनाक्षी वैद्य.



मृण्मयी ची डायरी भाग ९


शनीवारी वैजू आणि सारंग अमीता मॅडम ना भेटतात.


" मी बोलले आमच्या सरांशी.दोन पर्याय आहेत तुमच्यासमोर.

एक तर एखाद्या शाळेत तुमच्या तर्फे काऊन्सलर नेमा..छोटी शाळा निवडा. ज्या शाळेची प्रगती दिसतेय. ती शाळा निवडा. खूपदा अशा शाळांना काऊंन्सलर नेमणं परवडत नाही कारण त्यांची फी खूप नसते.


अश्या शाळेत तुम्ही काऊन्सलर नेमला तर त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल.शाळेची सर्वांगीण प्रगती होईल.

तुमचा जो हेतू आहे तो पूर्ण होईल."अमीता मॅडम म्हणाल्या.


" दुसरा कोणता पर्याय आहे?" वैजूनी विचारलं.

"मी आणि माझे काही मित्र मैत्रीणी आहेत. त्यांच्यापैकी कुणाचाही असा एखादा पेशंटची फी तुम्ही देऊ शकता.पुष्कळदा काही पालकांना दोन सिटींग्ज नंतर पेशंटचा खर्च झेपत नाही. त्यामुळे ते मुलांना घेऊन येत नाहीत. तर अश्या पालकांना तुम्ही मदत करू शकता."


" कोणत्या पालकाला मदत करायची हे कसं ठरवणार?"


" आम्ही देऊ तुम्हाला त्यांची नावं." अमीता मॅम म्हणाल्या.


"मला असं वाटतं वैजू एका पेशंटसाठी आपण काम मर्यादित न ठेवता जर शाळेला मदत केली तर एकावेळी अनेक मुलं यांचा फायदा घेऊ शकतील."


" हो मलाही असंच वाटतं मॅम." वैजू म्हणाली.


" हरकत नाही तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल तो घ्या."


" या पर्यायातून जर आमचा उद्देश सफल होतोय असं दिसलं तर पुढे तुम्ही म्हणता तसे तुमच्याकडच्या पेशंटना मदत करू." सारंग म्हणाला.


" असं आम्ही केलं तर चालेल नं?"


"हो.तुम्हाला असं काही करावसं वाटतंय हेच महत्वाचं आहे.मला खरच तुम्हा दोघांबद्दल आदर वाटतो." अमीता मॅम म्हणाल्या.


" मॅम हे सगळं मृण्मयी असताना सुचलं असतं तर खूप छान झालं असतं." वैजूचा स्वर जरा दु:खानी भरला होता.तिच्या हातावर थोपटत सारंग म्हणाला "ठीक आहे.देरसे आहे दुरूस्त आहे असं समजायचं."


"तुम्ही परत कधी जाताय?"


" मी ऊद्या जाईन."


" ठीक आहे मी शाळेची लिस्ट दोघांनाही पाठवीन.शाळेची ग्रेड आणि शाळेची प्रगती शाळेच्या नावासमोर लिहीलेली असेल. तुम्ही ते बघून शाळा निवडा.मग त्या शाळेच्या कमीटीशी आपण बोलू नंतर पुढचं काम होईल."

" ठीक आहे चालेल." वैजू म्हणाली.


वैजू आणि सारंग दोघंही क्लिनीक मधून बाहेर पडले.


"सारंग प्राजूला कुठे बोलवलं आहे?"


"तिला मेसेज केलाय.क्लिनीकमधून बाहेर पडल्यावर मी फोन करीन सांगितलं."


" होकार मग कर तिला फोन."

सारंग फोन करून प्राजूला सांगतो.


ठरलेल्या ठिकाणी वैजू सारंग आणि प्राजू पोचतात.


" कशा आहात वैजूताई?"


" मी मस्त.तू सांग कशी आहेस? माझा भाऊ वेळेवर पोचतो नं तुला भेटायला की छळतो?" यावर प्राजू खळखळून हसली आणि म्हणाली,


" नाही हो. येतो वेळेवर.पण घरी जायची फारच घाई असते?"


" सारंग तुला घरी काय काम असतं?एवढी घरी जायची घाई का करतोस?"


" अगं आईचा तोंडाचा पट्टा सुरु होतो."


" मी त्याला म्हटलं मी मुलगी असून घाई करत नाही तू किती घाई करतोस?"


" बरोबर आहे तिचं.आता यापुढे अशी घाई करायची नाही हा माझा आदेश आहे." वैजू नाटकी आविर्भावात बोलली.


" जी हुकूम." सारंग बोलण्यात कमी नव्ह्ता.


" वैजूताई तुम्ही घरी आमच्या लग्नाबद्दल बोललात?"

" हो."


" आई बाबा काय म्हणाले? तयार आहेत नं ते."


" आठ दिवसांचा वेळ दिलाय त्यांना."


" का?"


" अगं काही आईवडलांचा अहंकार आडवा येतो मुलानी जर परस्पर लग्नं ठरवलं तर.तसं आहे हे."


" आठ दिवसांनी त्यांनी नकार दिला तर?" प्राजूचा आवाज कातर झाला होता.


" अगं नकारात्मक का बोलतेस?आठ दिवसांनी बघू.नाही म्हणाले तर कोर्ट मॅरेज हा पर्याय आहे आपल्याकडे."


" माझ्या घरचे तयार आहेत." प्राजू म्हणाली.


" ही जमेची बाजू आहे आपल्यासाठी.तू चिंता करू नकोस आठ दिवस दोघंही एन्जाॅय करा.कळलं."


" हो.प्राजू मी थोडा प्रयत्न करीन त्यांचं मन वळविण्याचा?"


" प्राजू मला सारंग शिवाय तू दुस-या कोणाशी लग्नं करू शकशील का?"


" नाही ताई.इतकी वर्ष आम्ही थांबलो. आता दुस-या शी लग्नं करणं नाही जमणार."


"झालं तर. विषय संपला.आमचे आई-बाबा तयार झाले नाहीत तर फार त्यांना समजवण्याच्या भानगडीत पडायचं नाही. तुमचं आयुष्य कसं घालवायचं, कोणाबरोबर घालवायचं हा अधिकार तुम्हा दोघांचाच आहे.त्यात इतरांच्या संमतीची फार काळ वाट बघू नका.कोणाकोणाची मनन जपणार तुम्ही?सांग मला?"


" बरोबरचा हे तुझं." सारंग म्हणाला.


" प्राजू तुला पटतंय?" वैजूनी विचारलं.


" हो."


" मग आता फार विचार करू नका.तुम्ही पळून जात नाही. आमच्या आई-बाबांना तुमच्या लग्नाबद्दल सांगीतलं.ते जर तयार नसतील तर तो तुमचा दोष नाही."


" ताई मी वेगळ्या जातीची आहे म्हणून ते तयार नाहीत का?"


" हे काय नवीन? तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडताना जात बघीतली होती?"


" नाही."


" मग आता का विचार करतात? सोडा हे सगळे विचार.ठाम रहा आपल्या निर्णयाशी. कळलं का दोघांनाही?"


" हो" सारंग आणि प्राजू दोघंही म्हणाले.


" ऐनवेळी दोघांपैकी कोणीही मागे हटायचं नाही आधीच सांगतेय.मी तुम्हा दोघांची जबाबदारी घेतली आहे.मला तोंडघशी पाडू नका."


" वैजू असं होणार नाही.आई बाबा तयार झाले तर ठीक नाहीतर आम्ही कोर्टमॅरेज करू. घरी येऊ नका म्हणाले तर वेगळा राहीन पण आता मागे हटणार नाही."

"आत्ता कसं बोललास. चलं निघूया. की तुम्हा दोघांना बोलायचय.मी तिकडे बसू?"


"नाही हो ताई.आम्ही उद्याही भेटू शकतो.तुम्ही कधीपर्यंत आहात इथे?"


" मी परवा जाईन. नंतर येईन पुन्हा.चल बाय."


" बाय."

तिघही त्या हाॅटेलमधून बाहेर पडले आणि आपल्या घराच्या दिशेनी गेले.


गाडीवर बसल्या बसल्या वैजुनी सारंगला प्रश्नं केला.

" कायरे जातीवरुन घरी रामायण घडलं हे सांगितले का तू प्राजूला?"


" नाही."


" मग आज तिने हा मुद्दा असा काय काढला?"


"तिला बरेच दिवसांपासून शंका येत होती.मला विचारलं तिने. पण मी स्पष्ट काही सांगीतलं नाही."


"बरं केलंस नाही सांगीतलं. सारंग ती तुझ्यापेक्षा एकच वर्षांनी लहान आहे. तुझ्याशी लग्नं करायचं म्हणून ती आणि तिच्या घरचे इतकी वर्ष थांबले.आता आपल्या आईबाबांच्या हट्टापुढे तू झुकलास आणि तिला नाही म्हणालास तर तिचं पूर्ण आयुष्य उध्वस्त होईल.


मी पण एक मुलगी आहे मी तिच्या भावना समजू शकते.तिला वाटणारी भीती समजू शकते.त्यामुळे तुला आता ठाम राह्यला हवं.आपण मृण्मयीच्या वेळी आईबाबांच्या हट्टाची किंमत मोजली आहे.तशीच वेळ पुन्हा प्राजू वर आणून नकोस आणि तुझ्यावरही आणू नकोस. सारंग मी काय बोलतेय तुला कळतंय नं?"


" हो वैजू.मी आता ठरवलय आई-बाबांना एका मर्यादेपर्यंत आपल्या आयुष्यात लुडबुड करू द्यायचं.त्यांचा वेडा हट्ट मात्र नाही ऐकणार.


आता वाटतं वैजू की मृण्मयीने कसं सहन केलं असेल? आपल्या बाबतीत प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळाली.पण मृण्मयीला केवढं झगडावं लागलं. शेवटी कंटाळून तिने मरण जवळ केलं. वैजू तू तिची डायरी वाचली नसती तर तिच्यावर झालेला अन्याय आपल्याला कळलाच नसता."


" हो म्हणूनच तुला सांगतेय ते जरी आपले आई-वडील असले तरी त्यांच्या वेड्या हट्टाला पूर्ण करायचा नाही.जतीन नेहमी म्हणायचा मृण्मयीला तुम्ही कोणी समजूनच घेत नाही. तेव्हा ते मला पटायचं नाही. मृण्मयीची डायरी वाचल्यावर मला सगळं लक्षात आलं.जतीन बाहेरचा माणूस होता त्तरी त्याने ओळखलं. आपण तर आधीपासून तिची भावंडं होतो आपल्याला नाही कळलं. आता आईबाबांची मनमानी बस्स झाली."


" घर आलं वैजू.आता शांत रहा." सारंग गेटमधून गाडी आत घेत म्हणाला." हो.'


गाडी पार्क करून सारंग आणि वैजू घरात शिरले.

---------------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका... मीनाक्षी वैद्य.




मृण्मयी डायरी भाग१०



घरात शिरल्यावर वैजू आणि सारंगला समोरच्या खोलीतच आईबाबा बसलेले दिसले पण दोघांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही.


आईने त्यांना जेवायला वाढलं नाही. त्याचीही पर्वा न करता वैजू आणि सारंग जेवायला बसले. जेवताना तोंडाने बोलण्याआधी चॅटवर बोलत होते कारण दोघांनाही त्यांच्या बोलण्यात आईबाबांच्या कुचकट कमेंट्स नको होत्या.


बाहेरच्या खोलीत बसलेल्या आईबाबांना आश्चर्य वाटलं कारण वैजू आणि सारंग यांच्या बोलण्याचा आवाज येत नव्हता. दोघेही त्रस्त झाले होते.दोघांचं महत्व कमी झालय ही जाणीव त्यांची चिडचीड वाढवत होती.


वैजू आणि सारंग शांतपणे जेवले.दोघांच्या चेहे-यावर समाधान होतं.


वैजूला ऊद्या नागपूरहून निघायचं होतं. तिने ऑफीसची शनिवार रविवार सुट्टी बघूनच नागपूरला यायचं ठरवलेलं होतं.


मृण्मयी आता नाही तरी हे दोघं हे उपद्व्याप का करतात आहे हेच आईबाबांना कळत नव्हतं. त्यांच्या बुद्धीची पोहच आणि संवेदनशीलता वैजू आणि सारंग सारखी नव्हती. त्यांना समजतच नव्हतं की आपल्याकडून मृण्मयी कडे दुर्लक्ष झालेलं आहे.त्याहीपेक्षा ते मान्यच करत नव्हते की त्यांनी मृण्मयीच्या संवेदनशील मनाला डावलून फक्त आजच्या स्पर्धेत धावणा-या वैदू आणि सारंगकडेच फक्त लक्ष दिलं.



आईबाबा आपल्याच अहंकारामध्ये बुडालेले होते. हेच वैजू आणि सारंग दोघांना खटकत होतं.आईबाबांच्या स्वभावात बदल करणं आता शक्य नव्हतं. वेळ निघून गेलेली होती.


मृण्मयी वर झालेला अन्याय उशीरा कळला याचं दुःख दोघांना होतं म्हणून त्यांची धडपड चालू होती. हे आईबाबांच्या मनापर्यंत पोचलच नाही.


आपल्या मृण्मयी सारख्या आणखी मृण्मयी जन्माला येऊ नये हीच इच्छा सारंग आणि वैजूच्या मनात असल्याने एवढ्या तळमळीने त्यांचे प्रयत्न चालू होते.


मृण्मयी सारख्या ज्या मुली अशा अडचणीत आल्या असतील त्यांना मदत करण्यासाठी एक काॅऊंन्सीलींग सेंटर सुरू करण्याचा दोघांचा मानस होता.त्याच दिशेने दोघांची धडपड चालू होती.त्या धडपडीत आईबाबांच्या नकारात्मक सुरांची अडचण वैदू आणि सारंगला नको होती.


याच कारणामुळे दोघांनीही आईबाबांना स्पष्ट बोलून त्यांचा विरोध मोडून काढला.


सारंग आणि वैजू आता अमीता मॅडमच्या मेसेजची वाट बघत होते.

_________________________________

क्रमशः

लेखिका…मीनाक्षी वैद्य


मृण्मयीची डायरी भाग ११वा( अंतीम भाग)


सेंटरचे व्यवस्थापन


अमीता मॅडम शाळांची यादी वैजू आणि सारंग यांना पाठवतात. त्या यादीमधील एक शाळा दोघं निवडतात. वैजू अमीता मॅडम ना फोन करून निवडलेल्या शाळेबद्दल सांगते. त्या आठ दिवसांचा वेळ मागतात.


आठ दिवसांनी त्यांचा वैजू आणि सारंग दोघांनाही मेसेज येतो.त्या शाळेच्या कमीटीशी बोलल्या आहेत.शाळेची हरकत नाही. त्यांना ही गोष्ट विद्यार्थ्यांसाठी कोणीतरी करतंय याचा आनंद झाला आहे.


काऊन्सलर कोण असावा याबद्दल त्या सांगतात की दोन तीन काऊन्सलर त्यांचे विद्यार्थी आहेत जे हे काम आवडीनी करायला तयार आहेत. त्यापैकी कोण जास्त चांगलं आहे हे बघून त्याची नेमणूक करूया असं वैजूला अमीता मॅडम सांगतात.


वैजू नागपूरला यायचं ठरवते.या दहा दिवसांत आई-बाबा काही म्हणाले का असं ती सारंग ला विचारते.


"नाही.मीच काल विचारलं तर मला काही उत्तर दिलं नाही. तू येशील तेव्हा आपण बोलू." सारंग म्हणतो.


" ठीक आहे मी दोन तीन दिवसात येते. नंतरच आपण बोलू.तू मात्र शांत रहा.प्राजूनी पुन्हा विचारलं का?"


"हो.मी तिला सांगीतलं की ते काहीच बोलले नाहीत.वैजू आल्यावर विषय काढेल."


" ठीक आहे मी बहुतेक तरी परवा रात्री निघेना. बसमध्ये बसली की तुला मेसेज करीन.ठेवते मग."


" हो चालेल.



वैजू नागपूरला आल्यावर ती सारंगशी घरी काय बोलायचं यावर चर्चा करते. दोघही घरी पोहचतात.घरी आनंदी वातावरण वैजूला अपेक्षीत नसतंच. ती सहजपणे घरात शिरते, फ्रेश होते आणि आईला चहा मागते.आईपण मुकाटपणे तिच्यासमोर चहाचा कप धरते. तू का आलीस असं चकार शब्दानी तिला विचारत नाही. वैजूला आईची अशीच प्रतीक्रिया अपेक्षीत असते.त्यामुळे तीही फार सांगत बसत नाही.


सकाळी साधारण अकरा वाजता वैजू अमीता मॅडमना आपण आल्याचं फोन करून कळवते. त्या दुपारी दोघांना त्यांच्या क्लिनीकमध्ये यायला सांगतात.


वैजू आणि सारंग दोघंही वेळेत पोहचतात.


"मी त्या तीन काऊन्सलरपैकी एकीला बोलवलं आहे.ती येईलच थोड्या वेळात.तुमची ओळख करून देते.मग तुम्ही तुमची त्यांच्याकडून एक काऊन्सिल म्हणून असलेली अपेक्षा सांगा."


" मॅडम दुसरे दोघं कोण आहेत?"


" ती मुलं आहेत. तुम्ही मुलींची शाळा निवडली आहे म्हणून मी या स्त्री काऊन्सलरला बोलवलं आहे.शाळेत काऊन्सलिंग करायला कोणीतरी येणं हे या शाळेतील विद्यार्थिनींसाठी नवीन आहे.तसच मुलींची शाळा असल्यामुळे मुली पुरूष काऊन्सलरशी इतक्या मनमोकळेपणाने बोलणार नाहीत.


त्यासाठी आपण या स्त्री काऊन्सलरला बोलावलंय.मी ओळखते हिला. हुशार आहे. प्रत्येक मुलीशी ती स्वतंत्रपणे बोलेल.ती खुप हार्डवर्कर पण आहे."


" तुम्ही त्यांना निवडलय म्हणजे त्या असणारच तशा हुशार."


" तुम्हाला तिला काय करायचं ते सांगा.शाळेच्या पगार पटावर तिचं नाव नसेल.तुम्ही तिचा पगार देणार.त्यामुळे तुम्हाला अपेक्षीत असं काम ती करतेय की नाही हे तुम्हाला बघावं लागेल. शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला तिच्या कामाबद्दलचा रिपोर्ट दर महिन्याला तुम्हाला देतीलच."


" आम्हाला तिची नेमणूक करायची तर शाळेत जावं लागेल." वैजू विचारते.

"हो.जेव्हापासून ती त्या शाळेत किम करायला लागेल तेव्हा त्या महिन्याच्या पालक शिक्षक सभेत शाळेचे मुख्याध्यापक तिची पालकांना ओळख करून देतील.तेव्हा फक्त सारंग सर असले तरी चालेल."


" पगार किती द्यायचा?"


"पूर्ण शाळेतील विद्यार्थिनींसाठी ती काऊन्सलर म्हणून काम करेल म्हणजे पूर्ण वेळ तिला शाळेत थांबावं लागेल म्हणजे तिची ही नोकरी झाली तर त्या हिशोबाने तिला महिना दहा हजार द्यावा असं मी तुम्हाला सुचवेन."

" ठीक आहे.त्या आल्या की त्यांच्याशी बोलून घेऊ." वैजू म्हणते.


तेवढ्यात ती काऊन्सलर आत येते.अमीता मॅडम तिची ओळख करून देतात.


"ही सुखदा अभ्यंकर.माझी विद्यार्थ्यांनी आहे.सुखदा तुला काल ज्यांच्याबद्दल बोलले त्या या वैजू आणि हे सारंग."


दोघांनाही ती नमस्कार करते. वैजू सुखदाला त्या शाळेत काऊन्सलर म्हणून नेमण्यामागे वैजू आणि सारंगचा उद्देश सांगते.


तिच्याशी पगारा बाबतीत बोलणं होतं.सुखदाला महिना दहा हजार पगार कबूल असतो.


पुढच्या शनिवारी शाळेच्या पालक शिक्षक सभेत तिची ओळख विद्यार्थीनींना करून देण्यात येईल असं अमीता मॅडम तिला सांगतात.


वैजू आणि सारंग दोघंही समाधानानी क्लिनीक मधून बाहेर पडतात.


" सारंग हा हेतू साध्य झाला.आता तुझ्या लग्नाला हिरवी झेंडी मिळवायची आहे.घरी जाऊन तोही प्रश्न सोडवू." गाडीवर बसत वैजू म्हणते.


" तुझ्यावरच अवलंबून आहे सगळं.तू ही लढाई जिंकली तरच मी घोड्यावर बसून शकेन." सारंगचा स्वर जरा काळजीचा असतो.


"कशाला चिंता करतो.मी यावेळी प्राजूशी तुझं लग्नं पक्कं करणारच असा पैजेचा विडा उचलून आले आहे तेव्हा घाबरू नको." आणि हसायला लागते.


दोघं घरी पोचतात.घरात शिरल्या शिरल्याच वैजू मुद्याला हात घालते.


" आई बाबा काय ठरवलय तुम्ही?"


" आमच्या निर्णयाचा काही फरक पडणार आहे का?" बाबा कुत्सीतपणे बोलतात.


" तुम्ही आमच्याबरोबर असाल तर आनंद आहे.नाहीतर तुमच्याशिवाय सुद्धा लग्न होऊ शकतं.कारण नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघंही तयार आहेत.तुमचा निर्णय सांगा?"


वैजू एकदम एवढ्या सरळपणे आई-बाबांना विचारेल याची सारंगला कल्पना नव्हती.तो गडबडला एकदम.


"आम्ही तयार नाही कारण आम्हाला आमच्या मुलाने आपल्या जातीची लग्नं करावं अशी इच्छा आहे." आई बोलली.


" तसंही त्या मुलीशी प्रेम करताना सारंग नी विचारलं होतं का? मग मांडवात आई वडील हवे म्हणून आम्हाला कशाला नेतात?" बाबा तणतणतच बोलले.


" आई बाबा तुम्ही दोघंही गोड गैरसमजूतीत आहात. तुम्ही मांडवात आले नाही तरी सारंगचं लग्नं होईल. तुम्हाला तुमचा मान राखायचा असेल तर आनंदानी आमच्या आनंदात सामील व्हा.तुम्ही नाही आलात तरी मी आणि जतीन सारंगच्या लग्नाला येणार.ठरवा तुम्ही."


वैजू आज खरंच पैजेचा विडा ऊचलल्यासारखच बोलतेय याची सारंगला जाणीव झाली. आईबाबा नाही म्हणाले तरी आपलं प्राजूशीच लग्नं होणार याची त्याला खात्री पटली.


"आमचा निर्णय आम्ही सांगीतला.आमची या लग्नाला मान्यता नाही.आम्ही बळजबरीनं या लग्नाला येणार नाही."


" ठीक आहे.सारंग उद्याच जाऊन कोर्टात लग्नाची नोटीस दे.लग्न करून सारंग या घरात प्राजूला घेऊन आला तर चालणार आहे का?" वैजू विचारते.


"अजीबात नाही.लग्नाचा निर्णय सारंगचा आहे तर लग्न झाल्यावर त्याने स्वतःच्या हिमतीवर घर घ्यावं आणि रहावं. हे घर माझं आहे." बाबा प्रत्येक शब्दावर जोर देत बोलतात.


" मला याची थोडी कल्पना होती म्हणूनच तुम्हाला हा प्रश्नं विचारला.जोपर्यंत सारंगचं लग्नं होतं नाही तोपर्यंत तो इथेच राहील.तुमचं घर आहे म्हणून लगेच उद्यापासून तो वेगळा राहणार नाही.हे मी बाबा तुम्हाला स्पष्ट सांगते आहे.ऊद्या त्याने लग्नाची नोटीस दिली की महिनाभर तो इथे राहील."


आईबाबा वैजूच्या तोफखान्यापुढे काही बोलू शकत नाही.


वैजू आत जाते.पाठोपाठ सारंगही आत जातो.समोरच्या हाॅलमध्ये आई बाबा दोघंही सुन्न होऊन बसलेले असतात कारण वैजू त्यांना अजीबात किंमत देत नाही.ते सुन्न असले तरी त्यांच्यात अकड होती.ते नरमाईनी वागणारे नव्हते.


" वैजू तू तर आई बाबांना नेस्तनाबूतच करून टाकलं." सारंग म्हणाला.


"हे कधीतरी करायलाच हवं होतं. मृण्मयीवर या लोकांनी केलेल्या अन्यायाचा इतका राग येतो आहे मला की तेच सगळं पुन्हा तुझ्या आयुष्याच्या बाबतीत घडू नये असं मला वाटतं. म्हणूनच आज मी खूप तडकफडक वागले. ऊद्या लग्नाची नोटीस दे.प्राजूला आणि तिच्या घरच्यांना खरं ते सांग. नवीन घर भाड्याचं शोधायला लाग.कळलं?"


" हो." सारंग म्हणाला.


"आई बाबांनी कितीही बडबड केली तरी तुझ्या लग्नाच्या वेळी घराबाहेर पड.नवीन आयुष्य नवीन घरात सुरू कर. मी ऊद्या निघते. एकदम लग्नाच्या वेळी मी जतीन आणि प्रज्वल आम्ही तिचं येऊ."


" ठीक आहे."

" चल जेऊन घेऊ आणि लवकर झोपू.मगाच्या वादावादीने डोकं जाम दुखतंय."


" चल."


दोघंही जेवायला स्वयंपाकघरात जातात.आई बाबा जेवायला बसले असतात.त्यांना काही न विचारता आपलं ताट वाढून दोघंही बाहेरच्या हाॅलमध्ये येऊन बसतात.


वैजू आणि सारंग दोघांच्याही दृष्टीने एक मोठा निर्णय सहज घेता आला होता. सारंगच्या दृष्टीने तळ्यात मळ्यात असलेली परीस्थिती संपून एक निश्चित निर्णय घेता आला होता.


दोघंही शांतपणे जेवत होते. कारण मृण्मयी साठी काहीतरी करण्याचा त्यांचा उद्देश सफल झाला होता.

स्वयंपाकघरात आई बाबांची काहीतरी धुसफुस चालू होती.पण तिकडे या दोघांनीही लक्ष दिलं नाही.

--------------------------------------------------------------

समाप्त

लेखिका... मीनाक्षी वैद्य.


तळटीप...

आपल्या अवतीभवती अशा मृण्मयी आणि तिच्या सारखी मुलं दिसतात पण त्यांची हाक आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचलीच तर ती ऐकण्याची आपण तळमळ दाखवत नाही.बरेचदा त्यांनी मारलेली हाक आपल्याला समजत नाही.


मृण्मयी तर गेली पण ही कथा वाचल्यावर दहापैकी दोन मृण्मयींना किंवा तिच्यासारख्या मुलांना वाचवण्याचे प्रयत्न झाले तर ही कथा लिहीण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल.


सारंगची गोष्ट, वैजूचं पात्र आणि आई-बाबा एका घरातील सदस्य म्हणून रंगवण्यात आलं आहे.

धन्यवाद.

---------------------------------------------------------------




काऊंन्सलरला शाळेत नेमतात.


आई बाबा तयार नाही त्यामुळे सारंग कोर्ट मॅरेज करायचं ठरवतो.


आई बाबा सारंगला स्पष्ट सांगतात की लग्नानंतर तू या घरात येऊ नको. सारंग दुसरं घर बघतो.


कोर्टमॅरेजसाठी. अर्ज करतो.


********


आपल्या अवतीभवती अशा मृण्मयी आणि तिच्या सारख्या मुलं दिसतात पण त्यांची हाक आपल्यापर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचलीच तर ती ऐकण्याची कोणी तळमळ दाखवत नाही.


मृण्मयी तर गेली पण ही कथा वाचल्यावर दहापैकी दोन मृण्मयींना किंवा तिच्यासारख्या मुलांना वाचवण्याचे प्रयत्न झाले तर ही कथा लिहीण्याचं सार्थक झालं असं मला वाटेल.


सारंगची गोष्ट आणि वैजूचं पात्र,आणि आई-बाबा एका घरातील सदस्य म्हणून रंगवण्यात आलं आहे.

धन्यवाद.

---------------------------------------------------------------

समाप्त

लेखिका…. मीनाक्षी वैद्य.