Ti Kaalratra - 1 in Marathi Horror Stories by तुषार खांबल books and stories PDF | ती काळरात्र - भाग 1

Featured Books
Categories
Share

ती काळरात्र - भाग 1

ती काळरात्र - भाग १
शब्दांकन : तुषार खांबल

सदर कथा हि पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाकरिता लिहिलेली आहे. यातून समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचे कोणतेही उद्दिष्ट नाही. तसेच नावात साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.

"आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस.... सर्वपित्री अमावस्या..... म्हणतात कि या पंधरा दिवसात स्वर्गाची दारे खुली असतात आणि या कालावधीमध्ये ज्या कोणाचा मृत्यू होईल त्याला सरळ स्वर्ग प्राप्ती होते." रुपेश आपल्या पत्नीला म्हणजेच रेवतीला सांगत होता.

रेवती - माहित आहे मला हे सर्व. लवकर उठ आता. तो देव्हारा पुसून घ्या. पूजा करून घ्या. मी जेवणाची तयारी करून घेते. आज आपल्याला पण वाडी दाखवायची आहे. आणि आज काय करायचे आहे ते माहित आहे ना?????

रुपेश - हो गं..... माहित आहे. म्हणूनच मी दोन-तीन दिवस ऑफिसला जाणार नाहीय. तश्या कामाच्या सर्व सूचना मी स्टाफला कालच देऊन आलोय. थोडा आराम करू दे. नंतर मी करतो सर्व.

रेवती - नको ना रे उगाच वेळ घालवू. हे सर्व झाल्या नंतर आपल्याला बाहेर पण जायचं आहे. परत रात्रीच जागरण. कसं होणार सर्व. खूप कमी वेळ आहे आपल्याकडे..... समजतंय का तुला????????

रुपेश - हो माझे आई...... उठतो........ बास्स......

रुपेश किर्तीकर. पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि बांधकाम व्यावसायिक. त्यांच्या RK कन्स्ट्रक्शनच्या यशाचा आलेख हा दिवसेंदिवस उंचावत होता. मंदी असली किंवा महागाई किंवा अजून काही यांचा व्यवसाय नेहमीच तेजीत असायचा. त्याला कारणही तसेच होते. उत्तम दर्जाचे बांधकाम, लोकांच्या खिशाला परवडतील अश्या घरांच्या किमती आणि तेथे राहताना लोकांना असणाऱ्या सर्व मूलभूत सुविधांची पूर्तता (उदा. मंडई, इस्पितळे, प्रवास सुविधा आणि बरेच काही) हे तत्व त्यांनी सुरुवातीपासूनच जपले होते. आणि म्हणूनच त्यांचा या क्षेत्रात विशेष दबदबा होता. तसं बघायला गेलं तर हे यश जितके रुपेशचे आहे तितकेच ते रेवतीचे देखील आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

रेवती रुपेश किर्तीकर...... पूर्वाश्रमीची रेवती राजाध्यक्ष..... एक नामांकित वास्तुविशारद आणि तज्ञ्...... RK कन्स्ट्रक्शनच्या बऱ्याच इमारती ह्या तिने डिसाईन केलेल्या होत्या. जवळपास ४-५ वर्षे एकत्र काम केल्यानंतर आपल्या दोघांमध्ये खास नाते आहे याची जाणीव या दोघांना झाली आणि मग त्यांनी विवाह करून आपला संसार सुरु केला......

रुपेश आणि रेवती बालपणापासूनच एकत्र होते. रहायला एकाच कॉम्प्लेक्स मध्ये, शाळा पण एकच, कॉलेज पण एकच त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाचे एकमेकांशी संबंध चांगले होते. पहिल्यापासून दोघेही अभ्यासात हुशार. अगदी पहिल्या पाच मध्ये त्यांचा नंबर हमखास असायचा. चित्रकला हा दोघांचाही आवडीचा विषय. रुपेशचे वडील इंटिरिअर डिझायनरचे काम करत होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला या सर्व कन्स्ट्रक्शन क्षेत्राची आवड होती. आणि ती त्याने स्वतःच्या हिमतीवर पूर्ण देखील केली.

रेवतीच्या घरी असा कोणता वारसा नव्हता. पण तिची आवड तिला या क्षेत्रात घेऊन आली. सुरुवातीला एक-दोन ज्यावेळी रुपेशने आपली स्वतःची कंपनी सुरु केली त्यावेळी सर्वात पहिले डिझाईन हे देखील रेवतीने बनविले होते. त्या कामात रुपेशला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि रेवतीची जागा रुपेशच्या कंपनीत पक्की झाली. यानंतर थोडासा वाईट काळ देखील RK कंस्ट्रक्शनने पहिला; पण न डगमगता सर्व कर्मचारी रुपेशच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. आणि त्यानंतर त्याच्या कंपनीने कधीही मागे वळून पहिले नाही.
रुपेश देखील आपल्या कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घेत होता. पगार, बोनस, बढती, हे तर होतेच. पण अगदी तळागाळातल्या कर्मचाऱ्यांसोबत देखील रुपेशने आपुलकीचे संबंध ठेवले होते. त्यामुळे सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे आपापली कामे करत असत. आणि त्याच गोष्टीमुळे कंपनी दिवसेंदिवस यशाचे नवनवे शिखर गाठत होती.

यासर्व कामात रेवतीची त्याला बहुमोल साथ लाभत होती. ती असताना त्याला कोणत्याही गोष्टीत त्याला लक्ष घालायची गरज पडत नसे. प्लान डिझाईन करण्यासोबतच ती कंपनीसाठी मोक्याच्या ठिकाणी जागेची पाहणी करणे, मालकाकडून जागा योग्य भावात जागा विकत घेणे, काम सुरु असताना तेथील स्थानिक लोकांना प्राधान्य देणे, अश्या अनेक गोष्टी करत होती. एकंदरीत सर्व काही अत्यंत सुखदायक सुरु होत.