अभयाराण्याची सहल
भाग ७
भाग ६ वरुन पुढे वाचा....
“थांब, थांब, हे बघ आत्ता, तुझ्या मनात कृतज्ञतेची भावना प्रबळ आहे. पण वर्षभरातच ती ओसरून जाईल आणि हे सगळं खटकायला लागेल. तू खूप सुंदर आहेस, आणि माझ्या अंगावर, चेहऱ्यावर या जखमांचे व्रण, आणि त्यामुळे कुरूप झालेला चेहरा, चार लोकं जेंव्हा बोलायला लागतील, तेंव्हा तुला तुझी चूक कळून येईल. पण तेंव्हा फार उशीर झाला असेल. म्हणून म्हणतो. आताच सावध पणे पावलं उचल. नको या भानगडीत पडू. मी पुन्हा पूर्ववत होणं शक्य नाही.” संदीप काकुळतीने म्हणाला.
“तुमचं बोलून झालं का?” – शलाका.
“हो. आणि माझी विनंती आहे की आजची आपली ही भेट शेवटची समज आणि पुन्हा इथे येऊ नकोस.” संदीपने शेवटचं सांगितलं.
“आता मी काय सांगते आहे ते ऐका.” शलाकाने आता शांत स्वरात पण ठामपणे, बोलायला सुरवात केली. “जेंव्हा तुम्ही माझ्या आणि वाघाच्या मध्ये येऊन उभे राहिलात, त्याच्या आधीच परमेश्वराने आपली गाठ बांधली होती. नाही तर तुम्हाला तशी बुद्धी झालीच नसती, माझ्या भावा प्रमाणे तुम्ही पण पळून गेला असता. तो तर माझा सख्खा भाऊ होता, तुम्ही तर कोणीच नव्हता, आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो. त्यावेळी तुमचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही पळून गेला असता तर कोणी दोषही दिला नसता. तुम्ही आला नसता तर मी ही, या जगात राहिले नसते. वाघाने केंव्हाच माझा फडशा पाडला असता. आणि तुम्ही म्हणता तशी कृतज्ञतेची भावना वगैरे माझ्या मनात नाहीये. बायको साठी जिवाची बाजी लावणारा शूर वीर नवरा, कोणच्या स्त्रीला आवडणार नाही? तुम्ही पण आता हे अॅक्सेप्ट करून टाका.”
“अग अंगभर जखमांच्या खुणा असणार आहेत माझ्या, त्याही आयुष्यं भर, विचार कर. विद्रूप नवऱ्या बरोबर आयुष्य काढायच म्हणजे चेष्टा नाहीये. भारी पडेल. दु:खी होशील.” – संदीप.
“अहो, हे उलटंच होतेय, मुलगाच नकार देतोय. का तर मुलगी दिसायला चांगली आहे म्हणून. नवलच आहे.” आता शलाका पुन्हा खेळकर मूड मधे आली.
“शलाका चेष्टा नको. आजची परिस्थिती काय आहे, आणि तू काय बोलते आहेस! मी काय सांगतोय त्यावर शांतपणे विचार कर. यातलं गांभीर्य लक्षात घे.” – संदीप.
“मी एक विचारू? खरं खरं उत्तर द्याल?” – शलाका.
“देईन.” – संदीप.
“मी खरंच तुम्हाला आवडत नाही का?” – शलाका.
“आवडीचा प्रश्न नाहीये. परिस्थितीचा प्रश्न आहे.” – संदीप.
“एक वेळ, फक्त एक वेळ, परिस्थिती नजरे आड करा आणि खरं खरं उत्तर द्या.” शलाका पुन्हा म्हणाली.
“अग तू दिसायला सुंदर तर आहेसच, पण त्याच बरोबर माझी किती काळजी करतेस. अशी बायको फक्त नशीबवान लोकांनाच लाभते.” – संदीप.
“खरं सांगताय? माझी शप्पथ?” - शलाका.
“हो. तुझी शप्पथ.” – संदीप.
शलाका हसली. हसतांना ती किती लोभस दिसते हाच विचार संदीप करत होता. पण हंसता, हंसता शालाकाच्या डोळ्यातून अश्रु धारा वाहायला लागल्या होत्या. संदीप गोंधळला. त्याने अभावितपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
“आता तुझ्या मना सारखं झालं ना मग रडते कशाला?” – संदीप.
“नाही रडणार आता.” असं म्हणून तिने डोळे पुसले.
संदीपनी आता टोटल शरणागती पत्करली होती. आता वादाचा कोणताच मुद्दा राहिला नव्हता.
शलाका त्याला काही हवंय का असं विचारून झोपायला गेली आणि दिवसभराचे श्रम आणि दिवस अखेर संदीपने दिलेला रुकार याने तिला लवकरच गाढ झोप लागली.
संदीप मात्र जागाच होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न उठले होते त्या प्रश्नांची उकल होणे त्याच्या दृष्टीने फार जरुरीचे होते. तो मनातल्या मनात आढावा घेत होता.
आपण वाघांशी लढण्याचा निर्णय घेतला तो कशा साठी? प्रसिद्धी आणि कीर्ती साठी?
नाही नक्कीच नाही.
वाघांशी लढण्यातलं थ्रिल अनुभवण्यासाठी?
अरे बापरे, मुळीच नाही. शलाका तिथे नसती, तर आपण पळूनच गेलो असतो. वाघाशी लढण्याचा मूर्खपणा कोण करेल ?
मग शलाका सारखी सुंदर मुलगी पटवण्या साठी?
छे छे, तिला तर आपण पाहीलं सुद्धा नव्हतं. तिचं नावही माहीत नव्हतं.
वाघाशी लढतांना आपला जीव जाऊ शकतो हे माहीत नव्हतं का?
पूर्ण कल्पना होती आपल्याला.
समजून उमजून, जीवावरची कामगिरी सैनिक घेतात आपण का घेतली?
शलाकाचा जीव वाचवायला. आपण तिथे हजर असतांना तिला इजा व्हावी, तिचं काही बरं वाईट व्हावं, असं आपल्याला वाटत नव्हतं म्हणून.
म्हणजे जे काही केलं ते स्वत:च्या समाधानासाठी केल. करेक्ट?
करेक्ट.
म्हणजे तू काही उपकार केला नाहीस.
नाही. पण शलाकाला तसं वाटतंय. आणि ती परतफेड करायच्या मागे आहे.
पण आपण जर उपकार केलाच नाही, तर परतफेडीची अपेक्षा तरी का धरावी ?
बरोबर आहे. तिचं आयुष्य बरबाद करण्याचा आपल्याला काहीच हक्क नाही. या बाबतीत काहीतरी करणं आवश्यक आहे. तिच्या भावाशी बोलावं का सविस्तर ? यस. तिचा भाऊ येईलच आज उद्या कडे त्याच्याशीच बोलून मार्ग काढू. असा विचार पक्का केल्यावर, मग त्याला झोप लागली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शलाका बरोबर शशांक आणि नलिनी पण आले. इतक्या लोकांना खोलीत गर्दी करायला परवानगी नसल्याने, सांदीपचे आई, बाबा आणि शलाका बाहेर कॉरिडॉर मधे थांबले. संदीपला शलाका बाहेर गेली हे बघून आनंदच झाला. त्यांनी लगेच विषयाला हात घातला. शशांक आणि नलिनीला सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि म्हणाला
“आता तुम्हीच समजवा तुमच्या बहिणीला. ती जो हट्ट धरून बसली आहे तो कसा चुकीचा आहे हे तुम्हीच पटवून द्या. आणि मला हा अपराध करण्या पासून वाचवा.”
शशांक म्हणाला “मला पटतेय तुमचं म्हणणं. मी प्रयत्न करतो. तिला...”
पण त्याला पुढे बोलू न देता नलिनीनेच बोलायला सुरवात केली.
“अहो, काहीतरीच काय बोलता आहात तुम्ही, थांबा जरा” आणि मग संदीपला उद्देशून म्हणाली, “संदीप भाऊजी, तुम्ही हा असा विचार करूच नका. अहो तुम्ही जी, शलाकाचं सौन्दर्य आणि तुमचा कुरूप झालेला चेहरा यांची जी सांगड घालता आहात तीच चुकीची आहे. अहो तुमच्या चेहऱ्यावर, जखमेच्या ज्या खुणा असणार आहेत, त्या वाघा बरोबर ज्या हिमतीने तुम्ही लढा दिलात त्याच्या आहेत. त्याचा शलाकेलाच काय, कोणत्याही स्त्री ला अभिमान वाटेल अशाच आहेत. अहो सौन्दर्य जसं स्त्रीला शोभून दिसतं तसंच शौर्य, आणि कर्तबगार पणा हा पुरुषांनाच शोभून दिसतो, तोच त्यांचा दागिना आहे. मर्दानगी म्हणतात त्याला. पुरूषार्थ म्हणतात. कुठल्याही स्त्रीला आपला नवरा असा आहे याचा अभिमानच वाटेल. तेच पुरुषी सौन्दर्य आहे आणि तसंच ते शलाकाला वाटते आहे. स्त्री आणि पुरुष दोघांचाही point of view म्हणजे दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला जी भीती वाटते आहे की काही वर्षानंतर शलाकाला पश्चात्ताप होईल, तर तसं काहीही होणार नाहीये. तुम्ही निर्धास्त रहा.”
शलाका जरी कॉरिडॉर मध्ये होती तरी तिचे कान हे लोकं काय बोलतात या कडेच होते. ती आतमधे आली. नलिनीला मिठी मारली आणि म्हणाली,
“वहिनी किती नेमक्या शब्दांत तू माझ्या मनातलं बोललीस ग.” आणि मग संदीप कडे वळून कमरेवर हात ठेवून म्हणाली
“काय म्हणण आहे तुमचं आता.?”
सगळे तिच्या आविर्भावा कडे बघतच राहिले. लग्न होऊन वर्ष दोन वर्ष झाल्यावर बायको जशी नवऱ्याशी बोलेल तसा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. कोणाला काही मत प्रदर्शन करण्याचा काहीच चान्स नव्हता. सगळं काही फायनल झालं होतं.
समाप्त
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.