सुट्टीचा दिवस असल्याने अभय आज जरा निवांतच होता. आजपासून त्याला चार दिवस सुट्टी होती. सकाळचे नऊ वाजले होते. त्याची नुकतीच अंघोळ झाली होती. आरशात पाहून तो केस विंचरत होता. तितक्यात त्याची पत्नी माया त्याच्यासाठी चहा घेवून आली.
चहाचा कप त्याच्या हातात देवून त्याच्या मुडचा अंदाज घेत ती हळूच म्हणाली,
“तुम्हाला चार दिवस सुट्टयाच आहेत तर आपण कोठेतरी फिरायला जाऊयात.”
“हो जाऊया ना.” अभयही उत्साहानेच म्हणाला.
तेवढयात मायाच्या मोबाईलवर कोणाचातरी फोन आला. मोबाईल स्वयंपाक घरात असल्याने माया आतमध्ये गेली. थोडयावेळाने ती बाहेर आली.
“कोणाचा फोन होता गं.” अभयने सहजच विचारलं.
“पप्पांचा फोन होता. माझ्या दूरच्या नात्यातील मोहन मामा वारले आहेत. अंत्यसंस्कार त्यांच्या गावी आज दुपारी 3.00 वाजता होणार आहेत. आपल्याला जावे लागेल.”
“मग मीच जातो बाईकवर. थंडीचे दिवस आहेत. गावाचा रस्ताही जरा आडमार्गे आहे. त्यामुळे दोघेही जाण्याची गरज नाही.”
मायाने होकारार्थी मान हलवली.
दूर व आडमार्गे गाव असल्याने व खराब रस्ता असल्याने अभय त्या गावी 2.00 वाजता पोहचला. मोहनमामाची एक मुलगी दूरच्या गावावरून निघाली होती. अमेरिकेला असलेला एक मुलगा योगायोगाने कालच सासरवाडीला आला होता. सासरवाडीहून तोही गावाकडे निघाला होता. गावात आई-वडीलांजवळ असलेला मुलगा गेल्या आठ दिवसांपासून आपल्या पत्नीसह फिरायला गेला होता. आता तोही जवळजवळ आला होता. तीन मुले असताना मोहनरावांच्या मृत्युवेळी एकही मुलगा किंवा मुलगी त्यांच्याजवळ नव्हते. केवळ त्यांची पत्नी त्यांच्यासोबत होती. जी लग्नापासून त्यांची सोबती होती. तिने शेवटीही त्यांची सोबत सोडली नव्हती. त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती अगदी सावलीसारखी त्यांच्यासोबत होती.
आता सर्वजण येईपर्यंत थांबावं लागणार होतं. अभय ओळखीच्या पाहुण्यांशी चर्चा करत होता. पाहुण्यांमध्ये, गावातील माणसांमध्ये मोहनरावां विषयी चर्चा चालू होती. मोहनराव खूपच चांगले होते. त्यांनी अत्यंत काबाडकष्ट केले, अत्यंत हलाखीच्या परिस्थीतीत त्यांनी मुलांना सांभाळले. पण मुलांनी आपल्या आई-वडीलांकडे व्यवस्थित लक्ष दिले नाही. लहान मुलगा तर वडील आजारी असनाही मुद्दाम फिरायला गेला. मोठा मुलगा अमेरिकेहून आल्यावर आपल्या आई-वडीलांकडे कमी व आपल्या सासरवाडीलाच जास्त राहतो. मुलगी तर परक्याचं धन अशा प्रकारची चर्चा त्याच्या कानावर येत होती.
हळुहळु पाहुणे येत होते. पाच वाजण्याच्या सुमारास एका पाठोपाठ एक मोहनरावांचे तीनही मुले आली. ते येताच वातावरण भेदणारा आक्रोश सुरु झाला. तिघेही वडीलांच्या जाण्याने दु:खी झाले होते. आता सर्वजण आले होते. लोकांनी मोहनरावांना शेवटची अंघोळ घातली. त्यांना तिरडीवर झोपवले गेले. मोहनरावांचा मोठा मुलगा सुधीर मढयाच्या पुढे हातात मडकं घेवून चालू लागला. मुलगी आपल्या बापाच्या पार्थीव देहाला पदराने वारा घालत मढयासोबत चालू लागली. अंत्ययात्रा मसणवाटयाजवळ आली. सरण रचलं गेलं. बाजूला काही लोक ‘नाशीवंत देह’ हा अभंग म्हणत होती. त्यावेळी अभयच्या मनात विचार आला, खरंच हा देह नाशीवंत नसता तर लोकांनी वर्षानुवर्ष हा देह जतन करुन ठेवला असता. जो जन्माला येतो त्याला मृत्यु आहे. आणि मेल्यानंतर हा देह नाशीवंत आहे. या सृष्टीचा करोडो वर्षांचा इतिहास आहे. आणि यामध्ये आपले अस्तित्व अत्यंत अल्प आहे. तरीही माणसाला एवढा घमंड का? थोडयाच वेळापुर्वी एका पाहुण्याने त्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं होतं. त्यावरही त्याच्या मनात विचार आला. एक तर हे पाहुणे सहा महिने किंवा वर्षाने भेटतात. त्यातही एकमेकांबद्दल मनामध्ये अढी का धरत असतील? जर मरण हे जर जीवनाचं अंतिम सत्य असेल आणि एक दिवस सगळयांनाच ते सत्य स्वीकारायचं असेल तर माणूस इतका घमंडीपणाने का वागतो?
सरणाला मोठया मुलाने अग्नी दिला. त्या अग्नीकडे पाहत अभयच्या मनातील विचारांचा अग्नीही पेटला होता. अभयच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. एक माणूस आयुष्यातील सर्व सुख, दु:खे भोगून आता या जगाचा निरोप घेवून परत कधीही न येण्यासाठी निघून गेला होता.
सुधीरला आता दु:ख अनावर झालं होतं. तो मोठयाने रडत बोलत होता.
“पप्पा मला माफ करा. मी किती स्वार्थी आहे. लहानपणी मी तुम्हाला सोडून कधीच राहिलो नाही. पण आता मी मोठा झालो आहे. स्वार्थीपणामुळे आता मला तुमची गरज राहिली नव्हती. तुम्ही आजारी असताना तुमच्या शेवटच्या क्षणी मी तुमच्या जवळ नव्हतो.”
लहान मुलगा सुनिललाही दु:ख अनावर झालं होतं. त्यालाही आपली चूक उमगली होती. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. मोहनरावांची मुलगी सुधाही रडत होती. मोहनरावांना शेवटचा निरोप देवून सर्व नातेवाईक, गावकरी, मित्र आता परत निघाले होते. आता सर्वजण मोहनरावांच्या घराजवळ आले होते. त्या गावातील प्रथेप्रमाणे एका वयस्कर माणसाने सर्वांना बाहेर शांत बसायला सांगीतले व मोहनरावांच्या मुलांना आपल्या वडीलांना हाका मारण्यास सांगीतले.
मोहनरावांची तिनही मुले पप्पा म्हणून आपल्या वडीलांना हाका मारत होती. त्यांच्या आवाजातील आर्तता स्पष्ट जाणवत होती. म्हणजे त्या प्रथेचा उद्देश असा होता आता कितीही हाका मारल्या तरी गेलेला माणूस परत येत नाही. त्या घरातून मोहनरावांच्या तिन्ही मुलांचा व त्यांच्या पत्नीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. मोहनराव आता अनंतात विलिन झाले होते. आता कोणी रडलं, पश्चाताप केला, हाका मारल्या, सर्व संपत्ती ओतली तरी ते परत येणार नव्हते.
सर्व लोक आपापल्या मार्गाने परत निघाले.अभयने परत निघाल्याचे मायाला फोन करुन सांगीतले. बाईक चालवताना त्याच्या डोक्यात विचारही चालत होते. त्याला त्याच्या आई-वडीलांची आठवण आली. तोही नोकरी निमित्त आपल्या आई-वडीलांपासून दूर गावी राहत होता. नोकरीसाठी बाहेरगावी राहणेही जरुरीचे होते. पण तो गेले कित्येक दिवस आपल्या आई-वडीलांना भेटायला गेला नव्हता. आताही सुट्टया असताना तो फिरायला जाण्यास निघाला होता. त्याला आठवलं. लहाणपणी तो आपल्या आई-वडीलांना सोडून कधीच कोठे राहत नव्हता. त्याचा त्यालाच राग आला. मला आता आई-वडीलांची गरज राहिली नाही कारण मी आता मोठा झालो आहे. माझे लग्न झाले. मी स्वत:ची कामे स्वत: करु शकतो. त्यामुळे मला आता त्यांची गरज राहिली नाही म्हणजे मी कीती स्वार्थी झालो आहे. आपली आई कितीही थकली तरी आपण एखादी गोष्ट खायला मागीतली तर आई कधीच नाही म्हणाली नाही. तिने तो पदार्थ तयार नसेल तर तलगेच आपल्याला बनवून आपल्याला खायला दिला.खरंच आई-वडीलांसारखी माया कोणालाच नसते. अशा प्रकारचे विचार त्याच्या डोक्यात घुमु लागले.थोडयावेळापुर्वी मुलांनी मोहनरावांकडे लक्षच दिलं नाही. हे वाक्य त्याला परत आठवलं. त्या वाक्यावरून तो अस्थस्थ झाला. त्याच्या लक्षात आलं. लहानपणी जशी मुलांना आई-वडीलांची गरज असते. तशीच उतारवयात आई-वडीलांना मुलांची गरज असते.
आपल्या वडीलांचे डोळयाचे ऑपरेशन झाले आहे. त्यांना व्यवस्थीत दिसत नाही. आईचेही सतत गुडघे दुखतात. तिलाही दम्याचा त्रास आहे. तरीही ते दोघे आपल्याविना विनातक्रार राहतात. पण आपल्याला त्यांच्याकडे जायला वेळ नाही. किमान सुट्टीच्या दिवशी तरी आपण त्यांच्याकडे जायला हवं. आपला लहान भाऊही नोकरी निमित्त परगावी राहतो. आपण मोठे असून आपणच आपल्या आई-वडीलांकडे नाही गेलो तर तो तरी कसा येईल ? आपण असूनही आपल्या आई-वडीलांना आपला काहीच फायदा नाही. या विचारांनी तो मनातंच दु:खी झाला. त्याने बाईक रस्त्याच्या बाजूला लावली आणि मायाला फोन करुन उद्या सकाळी आई-बाबांना भेटायला जायचे आहे असे सांगीतले.
सकाळी दोघेही लवकरच गावाकडे निघाले. अभयचे वडील खुर्चीवर बसून काही तरी वाचत बसले होते. आई स्वयंपाक घरात चहा करत होती. अभय व मायाला पाहताच त्याच्या आई-वडीलांना आनंद झाला. तो आनंद पैशाने विकत घेता येण्यासारखा नव्हता. अभय आल्यामुळे आईने स्वयंपाकाचा बेत बदलला होता. सण नसूनही खूप दिवसांनी मुलगा व सून घरी आल्यामुळे तिच्यासाठी आजचा दिवस एखाद्या सणासारखाच होता. मायानेही आपल्या सासुला आज स्वयंपाक करण्यासापासून सुट्टी देण्याचं ठरवलं. तिनेच स्वयंपाक बनवला.
थोडयाच वेळात अभयचा लहान भाऊही आपल्या पत्नीसह आला. त्यालाही सुट्टी असल्याने अभयनेच त्याला काल फोन करुन आई-वडीलांकडे येण्यास सांगीतलं होतं. त्याला पाहून त्याचे आई-वडील आणखी खूष झाले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या आई-वडीलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अभयलाही खूप आनंद झाला होता. आता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच ढळू द्यायचा नाही असे त्याने मनोमन ठरवलं होतं.
कालच्या अंत्यसंस्काराने त्याला इतकं समजलं होतं.म्हाताऱ्या आई-वडीलांना दुसऱ्या कशाची अपेक्षा नसते. त्यांच्या उतारवयात मुलं जवळ असणं हाच त्यांच्यासाठी मोठा आनंद असतो. माणूस गेल्यानंतर कितीही पश्चाताप, आक्रोश केला, कितीही पैसे मोजले तरी परत येत नाही. त्यामुळे आपलं माणूस आहे तोपर्यंत आपण त्याला जपलं पाहिजे.