ग…गणवेशाचा भाग ५
मुन्नीमध्ये असलेली हुशारी, चिकाटी बघून
मालकिणीने मनोमन निश्चय केला की या हि-याला चांगले पैलू पाडायचेच. तो असा मातीत हरवू द्यायचा नाही.
असं होता होता दोन चार महिने निघून गेले. मुन्नीला आता अक्षर ओळख चांगली झाली होती. पाढे बिनचूक म्हणून लागली होती .गाळलेले अंक कोणते ते समजू लागलं होतं. शाळेच दार, शाळेतील वर्ग बघण्याची मुन्नीला झालेली घाई तिच्या बोलण्यातून नजरेतून मालकिणीलाच नाही तर रखमा आणि आज्यालाही दिसू लागली होती.
****
एकदा शाळेची तयारी करत असताना मालकिणीच्या मुलीने विचारले,
" आई मुन्नीला आमच्या शाळेत घेतील?"
" बघू.कोणत्या वर्गात तिला घेतील हे मला माहीत नाही.जर तुमची शाळा नाही म्हणाली तर तिला काॅर्पोरेशनच्या शाळेत घालू."
" काॅर्पोरेशनच्या शाळेत का? आमची शाळा किती छान आहे."
" तुमची शाळा छानच आहे पण या मोठ्या शाळांचे खूप नियम असतात.त्यांना डोनेशन पण लागतं."
" मुन्नी चे बाबा नाही देऊ शकत?"
" बेटा डोनेशन देण्याची त्यांची ऐपत असतीनं तर कधीच त्यांनी मुन्नीला शाळेत घातलं असतं."
मालकिणीच्या मुलीचा चेहरा जरा हिरमुसला.हे मालकिणीच्या लक्षात आलं.पण ती काय करू शकणार!
दिवस हळूहळू पुढे सरकत होते.मुन्नीचं शाळेचं स्वप्न साकार करण्यासाठी आज्या,रखमा आणि मालकीण तिघही जोमाने प्रयत्न करत होते.
मालकिणीच्या लक्षात आलं की मुन्नीच्या बाबतीत बुद्धीचा अडसर नाही तर पैशाचा अडसर आहे. तो पैशाचा अडसर आपण दूर करायचा हेही मालकिणीने मनाशी पक्कं केलं.
मुन्नी ची वर्णमाला पाठ झाली होती.मालकीण आता आपल्या मुलीच्या जुन्या पाटीवर छोटी छोटी वाक्य लिहून द्यायची.ते मुन्नीला वाचायला लावायची.मग तेच वाक्य तिला पाठीवर लिहायला लावायची.लवकलच मुन्नी यात तरबेज झाली.
नंतर मालकीण तिला छोट्या संख्येची बेरीज, वजाबाकी शिकवू लागली. हे करताना आपल्या बोटांचा उपयोग कसा करायचा हेही शिकवलं.
एक संख्या घेऊन बेरीज वजाबाकी नंतर दोन संख्येची बेरीज वजाबाकी मुन्नी सहज करू लागली. मग मालकिणीने तिला सुरवातीला एक संख्या घेऊन गुणाकार भागाकार शिकवला.हेही मुन्नी लवकर शिकली.
मुन्नी त्या आकलनाचा आवाका खूप मोठा असल्याचं मालकिणीच्या लक्षात आलं. मुन्नीला शिकवताना मालकिणीलाही खूप आनंद मिळत असे.
****
मालकीण शिक्षीका नसली तरी तिला आपल्या मुलीला शिकवताना जो आनंद मिळत असे त्यापेक्षा जास्त आनंद तिला मुन्नीला शिकवताना मिळत असे. याचं कारण मुन्नी मातीचा गोळा असल्याने तिला आकार देताना मालकिणीचाही कसं लागत होता.
****
मालकिणीकडे जेव्हा पासून मुन्नी शिकायला जाऊ लागली तेव्हापासून खूप खूष असायची. तिच्या डोळ्याला अचानक शाळेचा गणवेश, गणवेश घातलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद या गोष्टी बघायला मिळाल्या तेव्हा मुन्नीला शाळेत गेल्याने मिळणारा आनंद दिसला.त्यामुळे दरदिवशी ती मुलं दिसल्यावर तिच्या मनातील आनंद वाढत गेला.शाळेत जायची इच्छा तीव्र होऊ लागली.
मालकिणीच्या रूपाने तिचं शाळेचं स्वप्नं साकार होणार याची तिला खात्री पटू लागली. मालकिणीकडून घरी येताना मुन्नी हवेतच चालत घरी यायची. तिच्या लहान भावंडांना कळायचं नाही मुन्नी रोज कशी आनंदाने नाचत नाचत घरी येते.एक दिवस लहान बहिणीने मुन्नीला विचारलं
" मुन्नी तू रोज कायदे नाचत नाचत घरला येते.तू खाऊन इथली खूष राह्यते?" लहान बहीण
बहिणीच्या या प्रश्नावर मुन्नी आनंदाने म्हणाली
"मी साळचा अभ्यास करते. लिवाले,वाचाले शिकते म्हून मी आनंदात राह्यते. तू मोठी झाली का तू बी शिक साळा.साळा शिकवलं छान राह्यते." मुन्नी
" साळा इथली चांगली राह्यते?" लहान बहीण
" हो." असं म्हणून मुन्नी ची तंद्रीलागली.
मुन्नीच्या लहान बहिणीला मुन्नी कोणत्या तंद्रीत रमली हे कळलं नाही.हे कळायचं तिचं वय नव्हतं.
मुन्नीला खूप शिकायची इच्छा होती.त्या मुलांसारखे दप्तर,वाॅटरबॅग, पुस्तकं तिला आपल्या जवळ घ्यायची होती.त्या पुस्तकावरून,दप्तरावरून हळुवारपणे हात फिरवायचा होता.
मुन्नी शाळेच्या स्वप्नात रमली.
_____________________________
क्रमशः पुढे काय झालं वाचू पुढील भागात.
ग…गणवेशाचा
लेखिका…मीनाक्षी वैद्य